खाकसार चळवळ : खाकसार दल या लष्करी संघटनेचे संस्थापक इनायतुल्ला खान ऊर्फ अल्लामा मश्रिकी हे होत. २५ ऑगस्ट १९३० रोजी त्या वेळच्या पंजाबात लाहोरजवळ या संघटनेची स्थापना झाली.

बलुचिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, वायव्य स‌रहद्द प्रांत इ. भागातल्याप्रमाणे पंजाब, संयुक्त प्रांत आणि बंगाल येथे मुस्लिम स‌त्ता स्थापन करून एक मोठे इस्लामी साम्राज्य निर्माण करणे त्याचे नाव पाकिस्तान (पवित्र स्थान) ठेवणे व अखेरीस स‌र्व जगावर मुस्लिम वर्चस्व स्थापणे, हा तिचा मूळ उद्देश होता.

संस्थापक मश्रिकी प्रथम हिंदुस्थान स‌रकारच्या शिक्षणखात्यात नोकरीस होते. अत्यंत विद्वान असून कुराण-शरीफचा त्यांचा गाढा व्यासंग होता. मुस्लिम स‌माजासाठी नोकरीवर लाथ मारून त्यांनी खाकसार चळवळीस वाहून घेतले. तिच्या प्रचारार्थ त्यांनी अल् इस्लाह हे साप्ताहिक काढले व इशारात हे पुस्तक लिहिले. उन्नतीसाठी युद्धाची आवश्यकता आहे आणि युद्धानेच शांतता नांदते, अशी त्यांची श्रद्धा होती.

संस्थेचा प्रचार गुप्तपणे चाले. प्रारंभी पेशावर, लाहोर इ. ठिकाणी संस्थेच्या शाखा होत्या व स‌दस्यसंख्या पाचशे-सहाशे एवढीच होती. पुढे पंजाब स‌रकारने संस्थेची वाढती शक्ती पाहून १५ पेक्षा अधिक जणांच्या संचलनावर बंदी घातली आणि एका गावात २५० पेक्षा अधिक स‌भासदांस मनाई केली. या अटी सांभाळून प्रचार झाले. पेशावर प्रांतातही बंदी घातली गेली. पण परिणामी जोर वाढून १९३४ मध्ये ८० शाखा आणि सु. १,७०० स‌भासद होते. १९३९ मध्ये त्यांची खाकसार सिपाई, खाकसार साप्ताहिक, अल् इस्लाह  वगैरे वृत्तपत्रे चालू होती.

दिल्ली येथे मध्यवर्ती केंद्र होते. तेथे २७० केंद्रचालकांना लष्करी शिक्षण देण्यात येई (१९३५). १,००० केंद्रे, २०० शिक्षण-शिबिरे १९३६ साली झाली. सिंधच्या अमीर मीर नूर हुसैन यांनी संस्थेस ९-१० लाखांची संपत्ती दिली (१९३७). त्यानंतर अनेकांनी देणग्या दिल्या. पंजाब स‌रकारने बंदी घातली. अगदी गुप्तपणे कार्य चालू राहिले. १९३८ साली १ लाख ६४ हजार स‌भासदसंख्या झाली.

संघटनेची शिस्त अत्यंत कडक असे. हुकूम अमान्य करणे हा गुन्हा होता. रक्ताने प्रतिज्ञा लिहावी लागे. केव्हाही प्राणार्पणास तयार असावे लागे. सिनेमा, नाटक, तमाशा पाहण्यास स्वयंसेवकांना बंदी होती. नियमभंग करणाऱ्यास‌ फटके, उपवास इ. शिक्षा असत. प्रत्येक स‌दस्य काटक, कणखर असला पाहिजे, असा दंडक होता. स‌र्वाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असे. गुप्तहेरांचा स्वतंत्र विभाग असे. प्रचारमंत्रीही असत. त्यांना सालार-इ-अहतिसाव म्हणत. यांच्या कचेरीत भाषातज्ञ असत. नाजीम-इ-आला, सालार-इ-आला, सालार-इ-एरार, सालार-इ-शहर, सालार-इ-इलाका, स‌र-सालार असा अधिकारी वर्ग होता. त्यांचे पुन्हा चार वर्ग – जाम्बाज, मुजाविज, मुजाहिद आणि मुहाफिज असे होते.

 १९४६ साली पंजाबपासून बंगालपर्यंत जे हिंदू मुसलमानांचे दंगे पसरले, त्यांत खाकसर दलाचा भाग फार मोठा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबादच्या निजामशाही संस्थानात खाकसार दल वाढीस लागले. हिंदूंचा छळ करण्यात त्यांचा पुढाकार होता. खाकसार दलाचे त्यानंतर कोठेच नाव ऐकू येत नाही. त्याचे संस्थापक इनायतुल्ला खान १९६३ मध्ये वारले. त्यांनी तमाम शद या नावाने खाकसारांची हकिकत लिहिली आहे.

संदर्भ : Shan Muhammad, Khaksar Movement in India, Bombay, 1973.                                            

केळकर, इंदुमति