आमापाला : मध्य अमेरिकेतील हाँडुरस देशाचे पॅसिफिकवरील मुख्य बंदर. लोकसंख्या ३,५६८ (१९६९). फॉन्सेकाच्या आखातात तीग्रे बेटावर हे वसले आहे. मोठ्या बोटी सुरक्षित येऊ शकतात म्हणून हाँडुरसच्या आयात-निर्यातीचे हे केंद्र झाले आहे. यातून निर्यात होणाऱ्या मालात मुख्यत: चांदी, कॉफी, नीळ, इमारती लाकूड, कातडी व मासे असतात. येथे साबण, विटा, फर्निचर, पेये यांचे उत्पादन होते. येथे विमानतळही आहे.

शहाणे, मो. ज्ञा.