हवाई : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पन्नासावे राज्य व मध्य पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह. या द्वीपसमूहात क्षेत्रफळाच्या दृष्टीने हवाई, माउई, ओआहू, काउई, मॉलकाई, लनाई, नीहाऊ, काहोलाव्ही ही आठ मोठी बेटे व इतर १३७ लहानलहान बेटे आहेत. याचा विस्तार १८°५४’उ. ते २८°१५’उ. अक्षांश व १५४°४०’प. ते १७८°२५’प. रेखांश यांदरम्यान २,४५१ किमी. क्षेत्रात आहे. याचे क्षेत्रफळ १६,७५९ चौ. किमी. असून ही बेटे उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सु. ३,२०० ते ४,८०० किमी. अंतरावर आहेत. या द्वीपसमूहातील सात मोठ्या बेटांवर बहुसंख्य स्थायी लोकवस्ती असून राज्याची एकूण लोकसंख्या १३,६०,३०१ (२०१०) होती. होनोलूलू ही या राज्याची राजधानी (लोक. ३,९०,७३८–२०१०) आहे.

 

भूवर्णन : हवाई द्वीपसमूह ज्वालामुखीजन्य असून ही बेटे म्हणजे पॅसिफिक महासागरातील जलमग्न ज्वालामुखी पर्वतश्रेणीचे माथे आहेत. या द्वीपसमूहाचे तीन भाग केले जातात : (१) आग्नेय भागातील आठ मोठी बेटे, (२) मध्यभागाची (मिडल) खडकाळ द्वीपके आणि (३) वायव्येकडील कंकणद्वीपे, प्रवाळ व वालुकाद्वीपे. यातील पहिला भाग वगळता अन्य भागांवर स्थायी वस्ती नाही. त्यांचे एकूण क्षेत्र फक्त सु. ८ चौ. किमी. आहे.

 

आठ प्रमुख बेटांना १,२०७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या द्वीपसमूहाचे ९०% पेक्षा जास्त भूक्षेत्र ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हा, राख यांपासून बनलेले आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, टिटॅनियम व जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता वाढवणारे घटक आहेत. हवाई बेटांवरील ज्वालामुखी मोठे व खोलगट गोलाकार आहेत. येथील काही ज्वालामुखी पर्वतांव्यतिरिक्त इतर पर्वत हे उंच, सरळ कडे व तीव्र उतार असणारे असून यामुळे ईशान्य व्यापारी वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. या तीव्र उतार असणाऱ्या पर्वतांचा प्रतिकूल परिणाम बेटांवरील अंतर्गत दळणवळणावरही होतो. या द्वीपसमूहातील आठ प्रमुख बेटांची माहिती पुढीलप्रमाणे.

 

(१) हवाई : हे राज्यातील सर्वांत मोठे बेट असून ते स्थूलमानाने त्रिकोणाकृती आहे. याची लांबी १५० किमी. व रुंदी १२२ किमी. असून याचे क्षेत्रफळ १०,४५८ चौ. किमी. आहे. यास बिग आयलंड, व्होल्कॅनो आयलंड किंवा ऑर्किड आयलंड असेही म्हणतात. या बेटावर कोहाल, हूललाई (उंची २,५२१ मी.), मॉउनाकेआ, मॉउनालोआ, कीलाउआ हे ज्वालामुखी पर्वत आहेत. मॉउनाकेआ (उंची ४,२०५ मी.) व मॉउनालोआ (उंची ४,१६९ मी.) ही राज्यातील सर्वोच्च ज्वालामुखी पर्वतशिखरे या बेटावर आहेत. मॉउनालोआ व कीलाउआ (उंची १,२४७ मी.) हे ज्वालामुखी जागृत असून अन्य निद्रिस्त आहेत. इतर जागृत ज्वालामुखींपेक्षा मॉउनालोआमधून जास्त प्रमाणात लाव्हा बाहेर पडतो व यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीजन्य पदार्थांचे संचयन होते. येथे १९५० मध्ये झालेल्या उद्रेकातून अंदाजे ४६० द. ल. घ. मी. लाव्हा बाहेर पडला होता. कीलाउआचे हाले माऊ माऊ मुख अंडाकृती असून या ज्वाला-मुखातून वारंवार उद्रेक होतो व यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हा आणि इतर पदार्थांमुळे येथील जमीन, वसाहती व इतर मालमत्तेचे नुकसान होते. येथे १९५९ मध्ये झालेला उद्रेक विनाशकारी होता. लोक या ज्वालामुखीस ‘ड्राइव्ह इन व्होल्कॅनो’ असे म्हणतात. या बेटाच्या ईशान्य व आग्नेय किनाऱ्यावर मोठमोठे कडे असून येथे धबधबे आढळतात. या बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर कॉफीची लागवड होते. हीलो हे या बेटावरील प्रमुख शहर असून हवाई परगण्याचे हे मुख्यालय आहे.

 

(२) माउई : यास ‘व्हॅली आयलंड’ असेही म्हणतात. याची लांबी ७७ किमी. व रुंदी ४२ किमी. असून याचे क्षेत्रफळ १,८८८ चौ. किमी. आहे. येथील दोन्ही ज्वालामुखी सुप्त असून त्यांतील हालेआकाला (उंची ३,०५५ मी.) हे सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. याच्या मुखाचा परिघ सु. ३२ किमी. असून त्याची खोली ९१४ मी. आहे. काहूलूई हे या बेटावरील मोठे शहर असून वाईलूकू हे माउई परगण्याचे मुख्यालय आहे.

 

(३) ओआहू : यास ‘गॅदरिंग प्लेस’ असे म्हणतात. याची लांबी ७१ किमी. व रुंदी ४८ किमी. असून याचे क्षेत्रफळ १,५७५ चौ. किमी. आहे. या बेटावरील कोओलाऊ व वाईनाई या दोन पर्वतरांगांमध्ये रुंद सुपीक मैदानी भाग आहे. या ठिकाणी शेती केली जाते. राज्यातील सु. ७०% लोक या बेटावर राहतात. याच बेटावर पर्ल हार्बर हे इतिहासप्रसिद्ध बंदर असून बेटावरील होनोलूलू येथे राज्याची राजधानी आहे. याच्या नजीक डायमंड हेड, पुंचबाउल, कोको हेड हे सुप्त ज्वालामुखी आहेत.

 

(४) काउई : येथील निसर्गसौंदर्य व बागबगीचे यांमुळे यास ‘गार्डन आयलंड’ म्हणतात. हे वर्तुळाकार दिसते. याची लांबी ५३ किमी. व रुंदी ४४ किमी. असून याचे क्षेत्रफळ १,४३२ चौ. किमी. आहे. भूशास्त्रज्ञ यास सुप्त ज्वालामुखींनी बनवलेले ‘डिसेक्टेड डोम’ म्हणतात. कावाईकीनी (उंची १,५९८ मी.) हे येथील सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. वाई-आलेआले (उंची १,५४८ मी.) हे देशातील सर्वांत जास्त पावसाचे (वार्षिक सरासरी १,१७० सेंमी.) ठिकाण आहे. तसेच नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने नमूद केल्यानुसार हे जगातील सर्वोच्च आर्द्रतेचे ठिकाण समजले जाते. येथील वाईमे कॅन्यनची खडकरचना ग्रँड कॅन्यन ऑफ ॲरिझोनासारखी दिसते. येथील खडक रंगीबेरंगी असून याची खोली १,०४८ मी.पर्यंत आहे. कापा हे येथील मोठे शहर असून काउई परगण्याचे मुख्यालय लिहूई येथे आहे. वाईमे हे येथील प्रमुख बंदर आहे.

 

(५) मॉलकाई : या बेटास ‘फ्रेंडली आयलंड’ म्हणतात. येथील तीन ज्वालामुखींमुळे याचे तीन भाग झालेले आहेत. याची लांबी ६१ किमी. व रुंदी १६ किमी. असून याचे क्षेत्रफळ ६७६ चौ. किमी. आहे. या बेटाच्या पूर्व भागात ओबडधोबड डोंगर व खोल दऱ्या आहेत. पश्चिम भागात विस्तीर्ण पठार असून तेथे गुरे पाळण्याचा व्यवसाय चालतो. मध्य भाग सुपीक मैदानी असून तेथे शेती केली जाते. येथील कलाउपाप हे ठिकाण मॉलकाई परगण्याचे मुख्यालय असून कुष्ठरोग्यांचे शुश्रूषा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. काउनकाकाई हे येथील प्रमुख बंदर आहे.


 

(६) लनाई : हे बेट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याची लांबी २९किमी. व रुंदी २१ किमी. असून याचे क्षेत्रफळ ३६३ चौ. किमी. आहे. येथील ९८% भूक्षेत्र डोले पाइनॅपल कंपनीच्या मालकीचे होते. यांच्यामार्फत बेटावर अननसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. आता बेटावरील डोलेचे हे भूक्षेत्र कॅस्टल अँड कूके कंपनीच्या अखत्यारित आहे.

 

(७) नीहाऊ : या बेटाचे बहुतांश क्षेत्र १८६४ पासून रॉबिन्सन कुटुंबाच्या अखत्यारित आहे. यास ‘फॉरबिडन आयलंड’ असेही म्हणतात. याची लांबी २९ किमी. व रुंदी १० किमी. असून क्षेत्रफळ १८९ चौ. किमी. आहे. या बेटावर हवाईअन भाषा व चालीरीतींचे जतन केलेले आहे. पूवाई हे येथील मोठे खेडे आहे. जमीनमालकाच्या परवानगीशिवाय या बेटावर जाता येत नाही.

 

(८) काहोलाव्ही : हे लहान बेट आहे. याची लांबी १८ किमी. व रुंदी १० किमी. असून याचे क्षेत्रफळ ११७ चौ. किमी. आहे. १९४५–९० पर्यंत अमेरिकन संरक्षक दल या बेटाचा उपयोग गोळीबार मैदान म्हणून करत असत. येथे कायमस्वरूपी वसाहत नाही.

 

ओआहू बेटावर आनाहूलू, कामानानूई, नॉर्थ हलाव्ह, पोआमोहो, वाईआवा व हवाई बेटावर वाईलूकू या नद्या आहेत. तसेच ओआहू बेटावर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. येथील आर्टेशियन विहिरींचा उपयोग जलसिंचनासाठी केला जातो. हवाई बेटांवर काळी व तांबडी मृदा आढळते. येथील काळी मृदा शेतीच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

 

हवामान : बेटांचे स्थान व ईशान्य व्यापारी वारे यांचा परिणाम येथील हवामानावर झालेला दिसून येतो. येथील हवामान सौम्य आहे. हवाई बेटावर किमान तापमान १४°से. व कमाल तापमान ३१°से. नोंदले गेले आहे. होनोलूलू येथे हिवाळ्यात २२°से. व उन्हाळ्यात २६° से. तापमान असते. पर्वतीय भागात, विशेषतः हिवाळ्यात, तापमान अतिथंड असते. मॉउनाकेआ व मॉउनालोआ या पर्वतशिखरांवर हिवाळ्यात कित्येकदा बर्फ असते. राज्यात स्थानपरत्वे पर्जन्यमानात फारच तफावत आढळते. हवाई बेटांवरील उंच भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,०२० सेंमी. तर मैदानी भागात २५ सेंमी.पेक्षा कमी असते.

 

हवाई बेटांवर अनेक प्रकारची फुलझाडे व वृक्ष आढळतात. येथे ऊस, अननस, नारळ, आंबा, पपई, केळी, ब्रेडफ्रूट , चिंच, लिंबू , पेरू, लिची, तारो, मॅकडेमीया नट्स, ॲव्होकॅडो यांची व्यापारी दृष्टीने व घरगुती वापरासाठी लागवड करण्यात येते. येथे हवाईअन हंस, हवाईअन स्टिल्ट, चिमण्या, मिन्स इ. पक्षी व मुंगूस, हरिण, मेंढ्या, डुकरे इ. प्राणी आहेत.

 

इतिहास व राज्यव्यवस्था : पॉलिनीशियन हे येथील पहिले रहिवासी होत. ते पॅसिफिक महासागरातील इतर बेटे व ताहिती येथून आले असावेत. त्यांनी या द्वीपसमूहास हवाई असे संबोधले. पूर्वीच्या हवाईअन लोकांत लेखी भाषा रूढ नव्हती. त्यांची संस्कृती पूर्णतः बोली भाषा, दंतकथांवर आधारित होती. त्यांना लाकूड, दगड, हाडे यांचा उपयोग करण्याची कला व नौकानयन अवगत होते. ते कुशल योद्धे होते.

 

इंग्लिश नाविक, समन्वेषक कॅप्टन जेम्स कुक २० जानेवारी १७७८ रोजी काउई बेटावरील वाईमे या ठिकाणी आला होता. त्याला या द्वीप-समूहाचा शोध लावणारा पहिला यूरोपियन समजण्यात येते. त्याने या द्वीपसमूहाचे नामकरण ‘सँडविच आयलंड्स’ असे केले होते. केआलककू उपसागरावर हवाईंच्या दंगलीत तो मारला गेला (१७७९). याच्या भेटीनंतर पश्चिमेकडील लोकांचा या बेटांशी संपर्क आला. लोकर व्यापारी व समन्वेषक यांनी आपल्याबरोबर येथे जनावरे, विविध वस्तू व वनस्पती आणल्या. पहिले यूरोपियन येथे आले, तेव्हा येथे सु. ३,००,०००हवाईअन होते. १८०० मध्ये येथील पुष्कळ मूळ हवाईअन इतर देशांतून आलेल्या रोगांमुळे मरण पावले.

 

कुकने या द्वीपसमूहास ज्या वेळी भेट दिली त्या वेळी स्थानिक प्रमुखांची विविध बेटांवर सत्ता होती. पहिला कामेहामेआ याने यूरोपियन सैनिकी तंत्र, शस्त्रे यांचा उपयोग करून हवाई द्वीपसमूहातील बेटांवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली होती (१८१०). १८११ व १८३० मध्ये येथून चीनसोबत चंदनाचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होता. याच सुमारास उत्तर समुद्रातील व्हेल मासेमारीमुळे अमेरिकन व इतर व्हेल शिकारी यांचा या द्वीपसमूहाशी संपर्क वाढला.

 

पहिल्या कामेहामेआच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा दुसरा कामेहामेआ लिहोलिहो सत्ताधीश बनला (१८१९). त्याने जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र वैयक्तिक चालीरीतींचे अनुपालन करण्यास मुभा दिली होती. १८२० मध्ये अमेरिकेने प्रॉटेस्टंट मिशनरी व शिक्षक येथे पाठविले होते. त्यांनी येथील मौखिक हवाईअन भाषेसाठी लिपी सुचविली, मिशनरी शाळांची स्थापना केली व स्थानिक लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले. १८२७ मध्ये रोमन कॅथलिक मिशनरी येथे आले. त्या वेळी हवाईअन सत्ताधीशांनी प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला असल्याने १८३१ मध्ये रोमन कॅथलिकांना येथून जाण्यास बाध्य करण्यात आले.

 

अमेरिकेतील काही कंपन्यांनी १८३५ मध्ये काउई बेटावरील कोलो येथे उसाची आणि अननसाची व्यापाराच्या दृष्टीने लागवड केली.


 

१८४० मध्ये हवाई द्वीपसमूहासाठी पहिल्यांदा संविधान करण्यात आले. यान्वये कार्यपालिका, विधायिका व सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली होती. १८४२ मध्ये अमेरिकेने हवाई राजसत्तेस स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली. १८४० मध्ये जमीनधारणेविषयी ग्रेट मॅहेले हा कायदा करण्यात आला होता. या कायद्याचे परिणाम १८४८ च्या सुमारास दिसून आले. त्यामुळे बहुसंख्य हवाईअन भूमिहीन व दरिद्री झाले.

 

चौथा व पाचवा कामेहामेआ यांच्या कारकीर्दीत विदेशी लोकांचे वास्तव्य येथे वाढीस लागले. या वेळी ऊस व अननस लागवडीत वाढ झाली. यासाठी ऊस मळेवाल्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीन, जपान, पोर्तुगाल, फिलिपीन्स, कोरिया व प्वेर्तरीको येथून मजूर आणले. १८८७ मध्ये पर्ल हार्बर हे बंदर नाविक तळ म्हणून अमेरिकेस देण्यात आले. राजा कालाकाउआ (१८७४–९१) याच्या मृत्युनंतर त्याची बहीण लिलीवोकलानी ही सत्तेवर आली परंतु १८९३ मध्ये तिला सत्तेवरून दूर करण्यात आले व १८९४ मध्ये अमेरिकेच्या साहाय्याने येथे हवाई प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या वेळी सॅनफर्ड बी. डोले हे राष्ट्राध्यक्ष झाले.

 

हवाई प्रजासत्ताक हा अमेरिका अंकित प्रदेश व्हावा अशी येथील ऊस बागायतदारांची मागणी होती. १४ जून १९०० रोजी या मागणीस यश मिळून हवाई प्रजासत्ताक हे अमेरिकेचा प्रदेश बनले. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेने पर्ल हार्बर येथे नाविक तळ उभारण्यास सुरुवात केली व ओआहू बेटावर सैनिकी तळ उभारला. येथील नाविक तळामुळे दुसऱ्या महायुद्धात या बेटास महत्त्व होते. ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर जपानने हल्ला केला. यामध्ये पर्ल हार्बरची मोठ्या प्रमाणात हानी झाली व अमेरिका दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर १९५० मध्ये हवाईस राज्याचा दर्जा मिळाला व अमेरिकन काँग्रेसच्या मान्यतेने २१ ऑगस्ट १९५९ रोजी हे अमेरिकेचे पन्नासावे राज्य झाले. यास १९६० पासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला. २००६ मध्ये लिंडा लिंगले या महिलेस गव्हर्नर म्हणून निवडण्यात आले. जॉर्ज डब्ल्यू. बुश या राष्ट्राध्यक्षांनी येथे नॉर्थ वेस्टर्न हवाईअन आयलंड्स मरिन नॅशनल मॉन्युमेंटची स्थापना केली (२००६). या स्मारकाने ३,६३,००० चौ. किमी. समुद्रक्षेत्र व्यापले आहे. २००७ मध्ये याचे पॅपॅहॅनाउमोकुआकेआ असे नामकरण करण्यात आले आहे.

 

येथील राज्यकारभार १९५० च्या संविधानानुसार चालतो. राज्य विधिमंडळाची सीनेट व लोकप्रतिनिधिगृह अशी दोन गृहे आहेत. सीनेटचे २५ व लोकप्रतिनिधिगृहाचे ५१ निर्वाचित सदस्य असतात. सीनेटचे सदस्य चार तर लोकप्रतिनिधिगृहाचे सदस्य दोन वर्षांसाठी निवडले जातात. राज्यपाल हा राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. चार वर्षांसाठी निवडलेले राज्यपाल, उपराज्यपाल व सीनेटच्या संमतीने राज्यपालाने नेमलेले महाधिवक्ता, वित्तसंचालक व लेखापरीक्षक यांच्यामार्फत राज्याचा कारभार चालतो. नील ॲबरक्रॉम्बी हे डिसेंबर २०१० ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे राज्यपाल म्हणून व ब्रायन स्कॅट्झ हे उपराज्यपाल म्हणून निवडण्यात आलेले आहेत. देशाच्या काँग्रेसवर राज्यातून दोन सीनेटर व दोन प्रतिनिधी पाठविले जातात.

 

राज्याचे पाच परगणे आहेत. राज्यात सर्वोच्च न्यायालय, इंटरमीजिएट कोर्ट ऑफ अपील, चार सर्किट कोर्ट, चार जिल्हा न्यायालये यांशिवाय कुटुंब न्यायालय, दिवाणी न्यायालय व कर अपील न्यायालये आहेत. सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व चार इतर सहन्यायाधीश असतात. त्यांची नेमणूक सीनेटच्या मान्यतेने राज्यपाल करतो.

 

आर्थिक स्थिती : प्रारंभी हवाई बेटांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ऊस व अननस यांच्या उत्पादनावर अवलंबून होती मात्र आता सेवा उद्योगांचाही येथील अर्थव्यवस्थेत अग्रणी सहभाग आहे. येथील पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत झाल्याने सेवाउद्योग भरभराटीस आले आहेत. तसेच आशिया व अमेरिका यांदरम्यान पॅसिफिक महासागरातील या राज्याच्या मोक्याच्या स्थानामुळे अमेरिकेने येथे मोठा सैनिकी तळ उभारला आहे व उपग्रह संदेशवहनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचीही मदत येथील अर्थव्यवस्थेत झालेली आहे.

 

हवाई बेटांवर महत्त्वाचे खनिज साठे नाहीत. वीजनिर्मिती डीझेल जनित्राद्वारे केली जाते. जलविद्युत् फारच थोड्या प्रमाणात तयार होते. १९८० पासून येथे भूऔष्णिक वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे.

 

देशाच्या मुख्य भूमीपासून दूर व आयातीवर अवलंबून असणारे जनजीवन यांमुळे हवाई राज्यातील जीवनमान अत्यंत खर्चिक आहे. लोकसंख्येतील वाढ व जागेच्या कमतरतेमुळे राहण्याच्या जागेच्या किंमती जास्त आहेत. सर्वसाधारण उत्पादन शुल्क, आयकर, केंद्र शासनाची अनुदाने हे राज्याच्या महसूलाचे प्रमुख स्रोत आहेत. केंद्रीय करप्रणालीस अनुसरून कर जमा केले जातात.

 

शेती : हवाई, काउई, माउई यांसारख्या सात मोठ्या बेटांवर (काहोलाव्ही या बेटाव्यतिरिक्त) शेती व्यवसाय चालतो. शेती मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने व व्यापारी दृष्टीने करण्यात येते. येथील बहुसंख्य शेतमळे मोठ्या संस्थांच्या मालकीचे आहेत. ऊस व अननस उत्पादनात राज्य अग्रगण्य आहे. हवाई, काउई, माउई, ओआहू या बेटांवर ऊस तर ओआहू, काउई व लनाई या बेटांवर अननसाची लागवड प्रामुख्याने होते. ऊस व अननसाव्यतिरिक्त येथे कॉफी, केळी, पपई, पेरू, मॅकडेमीया नट्स, तारो इत्यादींचेही उत्पादन घेतले जाते. हीलो हे ऑर्किड उत्पादनाचे व निर्यातीचे केंद्र आहे. गुरे पाळणे, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, कुक्कुटपालन हेही शेतीपूरक व्यवसाय या राज्यात चालतात. याशिवाय मत्स्योद्योगामध्ये ट्यूना मासेमारी महत्त्वाची आहे. हवाई बेटांवर १.७५ द. ल. एकर वनक्षेत्र होते (२००७).


 

उद्योगधंदे : कच्चा माल, वीज यांची कमतरता यांमुळे येथे अवजड उद्योगांचा विकास झालेला नाही. शेती उत्पादनांवरील प्रक्रिया उद्योग, साखरनिर्मिती, अननस डबाबंदीकरण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. तसेच जॅम, जेली, थंड पेये, छपाई व प्रसिद्धी साहित्य, कपडे, बांधकाम साहित्य इ. निर्मितिउद्योगात बहुसंख्य लोक गुंतलेले आहेत. अवजड उद्योग ओआहू बेटावर केंद्रित आहेत. येथून साखर, डबाबंद अननस, मॅकडेमीया नट्स, कपडे, फुले, डबाबंद मासे, कॉफी यांची निर्यात, तर इंधन, वाहने, अन्नपदार्थ यांची येथे आयात होते.

 

पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच पर्यटनामुळे अमेरिकेच्या अन्य राज्यांतून व परदेशी कंपन्यांनी येथे मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक केली आहे. या व्यवसायामुळे येथील वाहतूक सुविधा व स्थानिक उद्योगात वाढ झालेली आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधून व कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान इ. देशांतून येथे पर्यटक येतात. पर्यटकांना येथे गोल्फ मैदाने, टेनिस कोर्ट, बगीचे, पुळणी, हॉटेले, रंगमंदिरे इ. अनेक प्रकारच्या मनोरंजनाच्या व सांस्कृतिक सुविधा उपलब्ध आहेत. ओआहू बेटावर हॉटेल सुविधा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या बेटास जास्तीत जास्त पर्यटक भेट देतात. हॉटेले विशेषतः वायकीकी येथे व ॲला मोॲना नजीकच्या भागात आहेत.

 

वाहतूक व संदेशवहन : सागरीमार्गे वाहतूक हा हवाईचा प्रमुख दळणवळण मार्ग आहे. होनोलूलू बंदरावरील गोदी व वखारसुविधांमुळे हे बंदर हवाईअन सागरी वाहतुकीचे केंद्र बनलेले आहे. राज्याच्या सागरी वाहतुकीच्या ७५% सागरी वाहतूक येथून होते. याशिवाय ओआहू बेटा-वरील बारबर्झ पॉइंट आणि इतर बेटांवरील काहूलूई, हीलो, कावाईहाउ, नविलिविली, काउनकाकाई ही राज्यातील प्रमुख बंदरे आहेत.

 

होनोलूलू, हीलो, कोना, लिहूए व काहूलूई येथील विमानतळ प्रमुख आहेत. सैनिकी व खाजगी विमानतळेही येथे आहेत. राज्यात २००७ मध्ये ६,९८६ किमी. लांबीचे रस्ते होते.

 

द होनोलूलू ॲडव्हरटायझर, होनोलूलू स्टार बुलेटिन ही सध्याची येथील प्रसिद्ध दैनिके आहेत. बहुतेक दैनिके इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होतात. याशिवाय चिनी, जपानी व कोरियन भाषेतही वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. १९२२ पासून येथे आकाशवाणी सुविधा आहे.

 

लोक व समाजजीवन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील लोक-संख्येच्या दृष्टीने हे चाळीसावे राज्य आहे. येथे लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ८१.८ होती (२०१०). हवाई बेटांच्या एकूण लोक-संख्येपैकी ७०% लोक ओआहू बेटावरील होनोलूलू या नागरी भागात राहतात. २००८ मध्ये येथील जननदर हजारी १५.१ व मृत्युदर हजारी ७.४ होता. तसेच अर्भक मृत्युदर हजारी ६.१६ होता (२०११).

 

येथे पॉलिनीशियन, यूरोपियन, जपानी, चिनी, फिलिपिनी, कोरियन व सामोअन लोक आहेत. येथील बहुतांश लोक इंग्रजी भाषा बोलतात. हवाईअन भाषा पॉलिनीशियन भाषासमूहातील आहे. पिजन इंग्रजी भाषाही बोलण्यात येते. तसेच जपानी, चिनी लोक त्यांच्या मातृभाषा बोलतात.

 

शिक्षण : राज्यात ६–१८ वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. शिक्षणाची भाषा इंग्रजी आहे. २००९ मध्ये शिक्षणावर ३,५५७ द. ल. अमेरिकन डॉलर खर्च करण्यात आला होता. हवाई विद्यापीठ प्रमुख असून याची शाखा हवाई बेटावरील हीलो येथे आहे. सार्वजनिक ग्रंथालय पद्धती येथे सुरू आहे. सार्वजनिक व शाळांतील ग्रंथालयांशिवाय येथे सैनिकी सेवा ग्रंथालये, सर्वोच्च न्यायालय ग्रंथालय आणि खाजगी ग्रंथालये आहेत.

 

राज्याच्या आरोग्य विभागामार्फत येथील रुग्णालये, आरोग्य केंद्रे, चिकित्सालये व परिचारिका सेवांचे नियोजन करण्यात येते. येथे २००७ मध्ये चार क्षयरोग आरोग्यधाम, दोन कुष्ठरोग शुश्रूषा केंद्रे व दोन मानसोपचार केंद्रे तसेच २३ सार्वजनिक रुग्णालये होती.

 

स्कीइंग, टेनिस, गोल्फ, पोलो तसेच पोहण्याचे विविध खेळ येथे लोकप्रिय आहेत.

 

महत्त्वाची स्थळे : हवाई द्वीपसमूह हा त्याचे निसर्गसौंदर्य, तेथील आल्हाददायक हवामान, हिवाळ्यातील बर्फाच्छादित शिखरे, पुळणी, धबधबे इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. येथे साजरे होणारे महोत्सव लोकांना आकर्षित करतात. यामध्ये ऑगस्ट मध्य ते ऑक्टोबर मध्यापर्यंतचा अलोआ महोत्सव प्रमुख आहे. हवाई बेटावरील आकको पॉइंट, केआलककू उपसागर, हवाई व्होल्कॅनोज राष्ट्रीय उद्याने, पूऊहोनू ओ होनाउनाउ राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यान ओआहू बेटावरील लाईए येथील पॉलिनीशियन सांस्कृतिक केंद्र, कॅपिओलान्नी पार्क काउई बेटावरील बार्किंग सँड समुद्रकिनारा, मेनेहुने फिश पाँड, कोकी स्टेट पार्क, वाईमे कॅन्यन स्टेट पार्क माउई बेटावरील हालीआकला राष्ट्रीय उद्यान मॉलकाई बेटावरील कलाउपाप राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यान इ. स्थळे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

 

ओआहू बेटावरील होनोलूलू हे राज्याचे राजधानीचे शहर असून हे प्रमुख बंदर आहे. याशिवाय राज्यातील हीलो, काउनकाकाई, कलाउपाप, कापा, लिहूई, लहिन, काहूलूई, वाईलूकू व पुवाई ही प्रमुख शहरे आहेत.

 

गाडे, ना. स.