हद्‍दू खाँ : (? –१८७६). ग्वाल्हेर गायकीमधील एक ख्यातनाम संगीतकार. त्यांची जन्मतारीख व अन्य तपशील यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अठराव्या शतकातील ख्याल गायक कादरबक्ष यांचे धाकटे चिरंजीव व नथ्थन पीरबक्ष यांचे ते नातू होत. त्यांचा उल्लेख नेहमी त्यांचे बंधू ⇨ हस्सूखाँ यांच्या बरोबरच होतो. या दोघांनी मिळून ग्वाल्हेर गायकीचा पाया रचला.

हद्दूखाँ यांचे कुटुंब मूळचे लखनौचे पण वडील कादरबक्ष यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे आजोबा नथ्थन पीरबक्ष त्यांना ग्वाल्हेरला घेऊन गेले. तत्कालीन महाराजांनी त्यांना आश्रय दिला आणि त्यांच्या संगीत- साधनेस प्रोत्साहनही दिले. एकोणिसाव्या शतकात ⇨ ग्वाल्हेर घराणे संपूर्ण देशात संगीताचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जात होते. ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज जनकोजी शिंदे (कार. १८२७–४३) यांचे संगीत-कलेस खूप प्रोत्साहन होते. त्यांच्या दरबारात त्यावेळी देशातील अनेक प्रख्यात ख्याल गायक, धृपदिये, वादक नियमितपणे हजेरी लावत असत. ग्वाल्हेर दरबारातील बुजुर्ग गायक ⇨ बडे महम्मदखाँ यांचे गायन पडद्याआडून ऐकून या दोन्ही भावांनी स्वतः संगीतसाधना व तपश्चऱ्या करून आपली गायकी समृद्ध केली. अर्थात हे सर्व महाराजांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले.

थोरले बंधू हस्सूखाँ यांच्या विचित्र मृत्यूनंतर काही काळ हद्दूखाँ व्यथित आणि काहीसे विक्षिप्त वागू लागले होते. त्या सुमारास त्यांचे महाराजांशी किरकोळ मतभेद झाल्यानंतर त्यांनी पुन्हा लखनौला जाण्याचा निर्णय घेतला. लखनौला आल्यानंतर मात्र त्यांनी आपला रियाज पुन्हा जोमाने सुरू केला. देशभरात ठिकठिकाणी मैफिली करून त्यांनी मोठे नाव मिळविले आणि अनेक मानसन्मान प्राप्त केले.

पुढे हद्दूखाँ यांची संगीतक्षेत्रातील विलक्षण कामगिरी पाहून ग्वाल्हेरच्या महाराजांनी त्यांना परत बोलविले. फारसे आढेवेढे न घेता महाराजांचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आणि ते ग्वाल्हेरला येऊन राहिले. असे म्हणतात की, हद्दूखाँ यांचा आवाज आपल्या भावासारखा जन्मतः मधुर नव्हता पण त्यांनी तो खास मेहनतीने कमावून अतिशय प्रभावी बनविला.

राग सादर करताना प्रथम विलंबित बडा ख्याल, त्यानंतर अंतरा, मग बोल, ताना तसेच विविध प्रकारच्या ताना, त्यानंतर द्रुत लयीतील छोटा ख्याल, त्यात रागप्रकृतीनुसार तार सप्तकातील बढत, जलद गतीच्या ताना असा खास ग्वाल्हेरी आकृतिबंध त्यांनी अंगीकारला. आजही बहुतेक गायक याच पद्धतीने राग सादर करताना दिसतात.

हद्दूखाँ यांनी दोन विवाह केले. पहिल्या पत्नीपासून त्यांना महम्मदखाँ आणि रहिमतखाँ अशी दोन मुले झाली. या दोघांनीही ग्वाल्हेर गायकी अधिक समृद्ध केली आणि मोठे नाव कमावले. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन कन्यारत्ने झाली. त्यांपैकी एकीचा विवाह इनायतखाँ यांच्याशी, तर दुसरीचा विवाह प्रख्यात बीनकार ⇨ बंदे अलीखाँ यांच्याशी झाला.

पहा : ग्वाल्हेर घराणे.

कुलकर्णी, रागेश्री अजित