स्ट्राँशियनाइट : ॲरॅगोनाइट गटातील कार्बोनेट खनिज. याचे स्फटिक समचतुर्भुजी व सूच्याकृती ( सुईसारखे ) असतात. स्फटिकांचे वारंवार यमलन झाल्याने षट्कोणीय रचनेचा भास होतो [⟶ स्फटिकविज्ञान]. स्फटिकांची अरीय मांडणी होऊन तंतूंचे पांढरे पुंजके झालेले आढळतात. स्फटिक मऊ व ठिसूळ असतात. स्ट्राँशियनाइट स्तंभाकार व कणमय रूपांतही आढळते. ⇨ पाटन : (110) चांगले रंग पांढरा, करडा, पिवळा वा हिरवा पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी चमक काचेसारखी कठिनता ३.५ वि.गु. ३.७६. रा.सं. SrCO3. यामध्ये स्ट्राँशियमाच्या जागी थोडे कॅल्शियम येऊ शकते. यावर हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया होऊन कार्बन डाय-ऑक्साइडाचे बुडबुडे निर्माण होतात. स्ट्राँशियनाइट हे बराइट, सेलेस्टाइट इ. खनिजांबरोबर चुन-खडकांतील किंवा मार्लमधील शिरांमध्ये आढळते. कधीकधी अग्निज खडकांतील सल्फाइडी शिरांत मलखनिज म्हणून ते आढळते. जर्मनी, स्पेन, मेक्सिको, भारत, इंग्लंड व अमेरिका येथे स्ट्राँशियनाइट आढळते. मुख्यतः स्ट्राँशियम धातू मिळविण्यासाठी आणि शोभेच्या दारूकामात तांबडा रंग मिळविण्यासाठी ते वापरतात. साखर निर्मळ करण्याची प्रक्रिया व लष्करी रॉकेटे यांमध्ये तसेच स्ट्राँशियमाची विविध संयुगे बनविण्यासाठी हे खनिज वापरतात. स्कॉटलंडमधील स्ट्राँशियन या ठिकाणी ते प्रथम आढळल्याने त्याचे स्ट्राँशियनाइट हे नाव पडले.

पहा : स्ट्राँशियम.

ठाकूर, अ. ना.