स्पेत्स्या : ( ला स्पेत्स्या ). इटलीच्या लिग्यूरिया प्रदेशातील याच नावाच्या प्रांताची राजधानी तसेच सागरी बंदर, प्रमुख नाविक तळ, औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या ९५,६४१ (२०११). हे शहर जेनोआच्या आग्नेयीस ८० किमी. लिग्यूरियन समुद्राच्या ला स्पेत्स्या आखातावर वसलेले आहे. हे जेनोआ-रोम लोहमार्गावर असून पो नदीखोर्‍याशी ट्रान्सॲपेनाइन्स लोहमार्गाने जोडलेले आहे.

रोमन काळात येथे वसाहत झाली. १२७६ मध्ये हे शहर जेनोआच्या ताब्यात होते. फ्रेंच साम्राज्यात एक महत्त्वाचे शहर व सार्डिनियाच्या राज्यात जेनोआच्या ड्यूकचा भाग म्हणून यास महत्त्व होते. १८५७ मध्ये येथे सैनिकी तळ उभारण्यात आला, तेव्हा यास नाविक दलाच्या मुख्यालयाचा दर्जा मिळाला. १९२३ मध्ये ही लिग्यूरिया प्रांताची राजधानी करण्यात आली. दुसर्‍या महायुद्धात बाँब हल्ल्यांमुळे शहराची हानी झाली होती.

येथे दारूगोळा निर्मिती, जहाजबांधणी, खनिज तेलशुद्धीकरण, लाकूड, कापडाच्या गिरण्या, मद्य, विद्युत् साहित्य, गंधक, अन्नपदार्थ, रेशमी व अन्य वस्त्रेनिर्मिती इ. उद्योग चालतात. शहराच्या पश्चिम भागात इटलीचा प्रमुख नाविक तळ असून तेथे तदनुषंगिक उद्योग आहेत. येथील सेंट जॉर्जिओ किल्ला, पंधराव्या शतकातील कॅथीड्रल, सांता मारिया चर्च ( अवर लेडी ऑफ ॲझम्पशन चर्च, तेरावे शतक) व पुरातत्त्वीय संग्रहालय प्रसिद्ध आहे. येथून चांदी, मद्य, संगमरवर, बारदान ( तागाची पोती ) यांची निर्यात तर कोळसा, लोखंड, लाकूड, कच्चा ताग यांची आयात होते. येथील मार्कोनी विद्यापीठ प्रसिद्ध आहे.

गाडे, ना. स.