सुपीरिअर सरोवर : उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा यांदरम्यान असलेल्या पंचमहासरोवरांमधील तसेच जगातील सर्वांत मोठे गोडया पाण्याचे सरोवर. सुपीरिअर हे पंचमहासरोवरांपैकी सर्वांत पश्चिमेकडील व उत्तरेकडील, सस.पासून सर्वाधिक उंचीवरील (१८३ मी.) आणि सर्वाधिक खोलीचे (६९३ मी.) सरोवर आहे. फ्रेंच लॅक सुपीरिअर म्हणजे वरचे सरोवर यावरुन सरोवराला हे नाव पडले असावे. सुपीरिअरच्या उत्तरेस व पूर्वेस कॅनडाचा आँटॅरिओ प्रांत, दक्षिणेस मिशिगन व विस्कॉन्सिन राज्ये (सं.सं.) आणि पश्चिमेस मिनेसोटा राज्य (सं.सं.) आहे. सरोवराची पूर्व-पश्चिम कमाल लांबी ५६३ किमी., दक्षिणोत्तर कमाल रुंदी २५७ किमी. व क्षेत्रफळ ८२,१०३ चौ. किमी. आहे. एकूण क्षेत्रफळापैकी सु. एक तृतीयांश क्षेत्र कॅनडात तर उर्वरित संयुक्त संस्थानांमध्ये आहे. कॅनडा व यांच्यातील आंतरराष्ट्रीय सरहद्द या सरोवरातून जाते. पंचमहासरोवरांमध्ये असलेल्या एकूण जलसाठ्यांपैकी ५३·८ टक्के पाणी सुपीरिअरमध्ये आहे. या सरोवराच्या पूर्वेस पंचमहासरोवरांपैकी एक असलेले ह्यूरन सरोवर हे सुपीरिअरपेक्षा सहा मीटर खालच्या पातळीत आहे. सेंट मेरी नदीमार्गे सुपीरिअरमधील पाणी ह्यूरन सरोवराकडे वाहत जाते. सुपीरिअरमध्ये आइल रॉयल (सर्वांत मोठे), सेंट इग्नेस, सिन्सन, मिचिपिकोटन ही प्रमुख बेटे असून त्यांशिवाय अनेक लहान लहान बेटे येथे आहेत. उदा., ॲपॉस्टल द्वीपसमूह.

फ्रेंच समन्वेषक एटिने ब्रूल व फर कंपनीच्या व्यापाऱ्यांनी १६१२ मध्ये या सरोवराचे समन्वेषण केले असावे मात्र या सालाबाबत एकवाक्यता आढळत नाही. पिअरी रॅडीसन व सिउर देस ग्रॉसेलिअर हे १६५९-६० मध्ये या परिसरात येऊन गेले. अलौएस धर्मगुरुने १६६५ मध्ये ॲरालंड येथे मिशनची स्थापना केली. सिडर डलूथ याने १६७८-७९ मध्ये या सरोवराला भेट दिली होती.

सरोवराचा बराचसा किनारा अनियमित असून तेथे उपसागर व द्वीपकल्प निर्माण झालेले आहेत. उत्तर किनारा अधिक दंतूर असून तेथे खोल उपसागर व उंच कडे आढळतात. दक्षिण किनारा सामान्यपणे कमी उंचीचा व वालुकामय आहे. सरोवराचा परिसर खडकाळ, ओबडधोबड व वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक संसाधनांनी युक्त आहे. कॅनडातील अरण्यांचा विस्तार सरोवरापर्यंत झालेला आढळतो. मिशिगन राज्यातील किनाऱ्यावर काही ठिकाणी रंगीत वालुकाश्म खडक भिंतीसारखे उभे आहेत. त्यांना पिक्चर्ड रॉक्स म्हणतात. सरोवराला सु. २०० आखूड व वेगवान नद्या येऊन मिळतात. त्यांमध्ये सेंट लूइस, निपीगॉन, कॉमिनिस्टीक्वीआ, पिक, व्हाइट, मिचिपिकोटन, पिजन या प्रमुख होत. त्यांपैकी सेंट लूइस ही सर्वांत मोठी नदी सरोवराच्या अगदी पश्चिम टोकाला येऊन मिळते. काही नद्यांच्या मार्गात जलप्रपात आढळतात. दक्षिणेकडून मात्र कोणतीही मोठी नदी येऊन मिळत नाही. पंचमहासरोवरांमधील इतर सरोवरांच्या तुलनेत येथील पाणी स्वच्छ असते. संयुक्त संस्थाने व कॅनडा यांच्यात १९७२ मध्ये झालेल्या एका करारात या सरोवरातील पाण्याची शुद्घता व गुणवत्ता कायम राखण्यासाठी आणखी प्रदूषण होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले आहे.

विविध निर्मिती उद्योग, खाणकाम, शेती, व्यापार, वनोद्योग हे सरोवराच्या परिसरातील प्रमुख व्यवसाय आहेत. लोहखनिज, तांबे, चांदी, निकेल, चुनखडक इ. खनिजसाठे परिसरात आढळतात. सरोवरात पाइक, पर्च, बॅस, मस्कलंज, ट्राउट, व्हाइटफिश व स्टर्जन जातीचे मासे सापडतात. परिसरात मृग, मूस, अस्वल, शिकारी व गाणारे पक्षी, पाणकोंबडे आढळतात.

संयुक्त संस्थाने व कॅनडा यांदरम्यानच्या अंतर्गत जलमार्गाच्या दृष्टीने तसेच अटलांटिक महासागराकडे जाणाऱ्या जलमार्गाच्या दृष्टीने हे सरोवर महत्त्वाचे आहे. अटलांटिक महासागरातून सेंट लॉरेन्स नदी, पंचमहासरोवरातील इतर सरोवरे यांच्यामार्गे सुपीरिअर सरोवरापर्यंत पोहोचता येते. डलूथ, टू हार्बर्स, टॅकोनाइट हार्बर, सिल्व्हर बे, ग्रँड माराइस, सुपीरिअर, ॲशलँड, मार्क्वेटे, थंडर बे, मिचिपिकोटन हार्बर ही या सरोवराच्या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. थंडर बे, फोर्ट विल्यम व पोर्ट आर्थर येथे मोठे धान्य उच्चालक आहेत. सरोवरातून लोहखनिज, टॅकोनाइट, तांबे व इतर खनिजे, गहू व इतर धान्ये, लाकूड यांची वाहतूक केली जाते. सरोवर पूर्णपणे कधी गोठत नाही. साधारणपणे आठ महिने त्यातून जलवाहतूक चालते. येथील दाट धुक्याचाही वाहतुकीत व्यत्यय येतो. सुपीरिअर-ह्यूरन सरोवरांदरम्यान असलेल्या सॉल्ट स्टी मारी कालव्यामध्ये पाच वाहतूक मार्ग असून त्यांपैकी चार संयुक्त संस्थानांच्या हद्दीत, तर एक कॅनडाच्या हद्दीत आहे. प्रत्येक मार्गात एकाच जलपाशाची गरज भासते.

सरोवराच्या संयुक्त संस्थानातील किनारी प्रदेशात लोकवस्ती दाट आहे. डलूथ (मिनेसोटा), सुपीरिअर, ॲशलँड (विस्कॉन्सिन), सॉल्ट स्टी मारी, मार्क्वेटे, आँटॉनगॉन व ह्यूजटन (मिशिगन) आणि कॅनडातील थंडर बे (पोर्ट आर्थर), मिचिपिकोटन व मारी (फोर्ट विल्यम) ही सरोवराच्या किनाऱ्यावरील प्रमुख नागरी केंद्रे आहेत. सरोवरातील बेटांवर तसेच सरोवराच्या किनारी प्रदेशात राष्ट्रीय, राज्य व प्रांतीय उद्याने आहेत. त्यांपैकी रॉयल बेटावरील राष्ट्रीय उद्यान व आँटॅरिओमधील पुकाशक्वा राष्ट्रीय उद्यान ही उल्लेखनीय आहेत. सुपीरिअरचा संपूर्ण किनारा अतिशय रमणीय असून त्यातील उत्तर किनाऱ्याचे सृष्टिसौंदर्य विशेष विलोभनीय आहे. उत्तर किनाऱ्यावरील खडकाळ व तीव्र उताराच्या भागातील कडे ९० ते ४५७ मी. उंचीचे आहेत. तेथून जाणारा कॅनडियन पॅसिफिक हा लोहमार्ग अनेक बोगद्यांमधून जात असून त्या मार्गावरुन सरोवर मनोहारी वाटते. मिनेसोटा किनाऱ्यावर रस्त्यालगत उन्हाळी हवेशीर ठिकाणे, मासेमारीसाठी प्रसिद्घ असलेली खेडी, राज्य उद्याने तसेच दीपगृह आहे. प्राण्यांची पारध व मत्स्यपारध करण्यासाठी हौशी लोक येथे येत असतात.

चौधरी, वसंत