चार्ल्सटन – २ : अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलायना राज्यातील अटलांटिक समुद्रकिनाऱ्यावरील बंद. लोकसंख्या ६६,९४५ (१९७०). हे ॲशली व कूपर या नद्यांच्या संगमावर वसले असून दळणवळणाचे, व्यापाराचे व उद्योगधंद्यांचे मोठे केंद्र आहे. येथून मुख्यतः कोळसा, फॉस्फेट, खनिज तेल पदार्थ निर्यात होतात. येथे कित्येक भट्ट्या असून, यंत्रे, जहाजबांधणी, खते, कागद, लाकूडसामान, तेल, रसायने, पोलाद, ॲस्बेस्टॉस, रंग, कापड, डबाबंद अन्नपदार्थ इत्यादींचे कारखाने आहेत. विमानतळ, दारूगोळा साठविण्याचा तळ, अमेरिकेच्या सहाव्या नौदलाचे केंद्र, अमेरिकेच्या स्थापत्य संस्थेचे केंद्र, दक्षिण कॅरोलायनाचे भिषग्‌ महाविद्यालय, कॅसल पिंकनी राष्ट्रीय स्मृतिस्तंभ, सीटर नावाचा जुना किल्ला, उद्याने वगैरे अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत. १८६१ मध्ये येथे मोठा भूकंप झाला.

 लिमये, दि. ह.