जयगड : रत्नागिरी जिल्ह्यातील एक चांगले बंदर. लोकसंख्या २,४७६ (१९६१). हे मुंबईच्या दक्षिणेस सु. १६० किमी. व रत्नागिरीच्या उत्तरेस सु. ६५ किमी. आहे. हे बंदर जयगड खाडीवर शास्त्री नदीच्या मुखाशी असून किनारी वाहतुकीसाठी पूर्वीपासून उपयोगात आहे. हे सुरक्षित बंदर आहे. मालाची चढउतार आणि प्रवासी वाहतूक यांकरिता नवीन धक्का बांधण्यात येणार आहे. तसेच जहाजांच्या मार्गदर्शनासाठी पाण्यात तरते दिवे ठेवण्यात येणार आहेत. येथील दीपगृहाचा दिवा २१ किमी. वरूनही दिसतो. येथील निर्यातीत गूळ आणि जळाऊ लाकूड यांचा व आयातीत तांदूळ व मीठ यांचा समावेश असतो.

समुद्रकिनाऱ्याला लागून ६१ मी. उंच टेकडीवर जयगड किल्ला असून पायथ्याशीही विस्तृत क्षेत्रावर तटबंदी आहे. हा किल्ला विजापूरकरांनी सोळाव्या शतकात बांधला. बराच भाग शिवाजीनेही बांधला. १७१३ मध्ये हा किल्ला व बंदर कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होते. पेशवाईनंतर ती दोन्ही इंग्रजांनी घेतली. किल्ल्यात दोन इमारती आहेत. गावात प्राथमिक व माध्यमिक विद्यालये आहेत.

कांबळे, य. रा.