क्वेट्टा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान विभागातील क्वेट्टा-पिशिन जिल्ह्याचे केंद्र. लोकसंख्या लष्करी विभागासह १,३०,००० (१९६९ अंदाज). हे कराचीच्या उत्तरेस रेल्वेने ८६३ किमी., समुद्रसपाटीपासून १,६७६ मी. उंचीवर असून क्वेट्ट्याच्या आजूबाजूस ३,००० मी. हून जास्त उंचीचे पर्वत आहेत. बोलान खिंडीजवळ मोक्याच्या जागी असल्याने प्राचीन काळापासून अफगाणिस्तान, इराण यांच्या पंजाबशी होणाऱ्या व्यापाराचे केंद्र म्हणून क्वेट्ट्याला महत्त्व होते. क्वेट्ट्यापासून अफगाणिस्तान हद्दीवरील चमनपर्यंत व इराण हद्दीवरील बोस्तानपर्यंत लोहमार्ग असल्याने व्यापाराव्यतिरिक्त लष्करी दृष्ट्याही क्वेट्ट्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील हवामान

क्वेट्टा शहराचा एक भाग

अत्यंत विषम आहे. येथे गालीचे, कातडी सामान, लोकर, फळे, सुका मेवा, धान्य इत्यादींचा मोठा व्यापार चालतो. तसेच मोटारदुरूस्ती व किरकोळ अभियांत्रिकी, रसायने, डबाबंद फळे वगैरेंचे कारखाने येथे आहेत. आसपास डाळिंबे, द्राक्षे, पीअर वगैरे फळांच्या बागा आहेत.

कलातच्या खानाकडून १८७६ साली ब्रिटिशांनी क्वेट्टा मिळविल्यानंतर त्याचा झपाट्याने विकास झाला. येथे लष्करी अधिकाऱ्यांचे महाविद्यालय व एक वेधशाळा आहे. १९३५, १९५५ आणि १९७५ च्या प्रचंड भूकंपानी जवळजवळ सर्व क्वेट्टा शहर उद्ध्वस्त होऊन अपार हानी झाली. दर वेळेस सर्व शहर पुन्हा वसविण्यात आले आहे.

ओक, द. ह.