कीथ, आर्थर बेरिडेल : (५ एप्रिल १८७९–६ ऑक्टोबर १९४४). विख्यात प्राच्यविद्याविशारद आणि संविधानतज्ञ. जन्म पॉर्टोबेलो (एडिंबरो) येथे. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत आणि पाली ह्या भाषांचे तसेच प्राच्यविद्यांचे अध्ययन केले. १९०१ मध्ये त्यांनी सनदी नोकरीत प्रवेश केला. ह्या नोकरीत असतानाच कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर झाले. वेदादी संस्कृत साहित्याचे अध्ययन व संविधान कायदा हे अखेरपर्यंत त्यांच्या आस्थेचे आणि व्यासंगाचे विषय होते. १९१४ पासून एडिंबरो विद्यापीठात संस्कृत आणि तौलनिक भाषाशास्त्र ह्या विषयांचे अध्यासनस्थ प्राध्यापक म्हणून हयातभर त्यांनी काम केले.

वेदिक इंडेक्स ऑफ नेम्स अँड सब्जेक्ट्स (आर्थर अँथनी मॅक्‌डॉनल ह्यांच्यासह, दोन खंड, १९१२) हा त्यांच्या ग्रंथांपैकी एक विशेष उल्लेखनीय ग्रंथ होय. वैदिक साहित्याच्या अभ्यासकांना ह्या ग्रंथाने एक मोलाचा आधार उपलब्ध करून दिला. रिलिजन अँड फिलॉसॉफी ऑफ द वेद अँड उपनिषद्स (दोन खंड, १९२५) हा त्यांचा ग्रंथही ख्याती पावला. द सांख्य सिस्टिम (१९१८), बुद्धिस्ट फिलॉसॉफी (१९२२), कर्ममीमांसा  आणि इंडियन लॉजिक अँड ॲटॉमिझम  हे त्यांचे भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. अ हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२०), क्लासिकल संस्कृत लिटरेचर (१९२३) आणि द संस्कृत ड्रामा (१९२४) हे ग्रंथ लिहून त्यांनी संस्कृत साहित्यविषयक ग्रंथांत मोलाची भर घातली आहे. ह्यांशिवाय ऋग्वेद ब्राह्मणाज  ह्या नावाने त्यांनी ऐतरेय  आणि कौषितकि  ब्राह्मणांचे इंग्रजी  भाषांतर प्रसिद्ध केले आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचे आणि ऐतरेय   व सांख्यायन  आरण्यकांचेही इंग्रजी भाषांतर त्यांनी केले. त्यांची स्वतंत्र प्रज्ञा, चिकित्सक वृत्ती आणि साक्षेपीपणा त्यांच्या सर्व लेखनातून प्रत्ययास येतात. ऑक्सफर्ड बॉदलीअन ग्रंथालयातील संस्कृत – प्राकृत हस्तलिखितांची सूची त्यांनी तयार केली.

रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द डॉमिनिअन्स (१९०९), कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी ऑफ द फर्स्ट ब्रिटिश एंपायर (१९३०), अ कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी ऑफ इंडिया १६००–१९३५ (१९३६), द ब्रिटिश कॉमनवेल्थ (१९४१) आणि द फेडरेशन : इट्स नेचर अँड कंडिशन्स (१९४२) हे त्यांचे संविधान कायद्याच्या क्षेत्रातील काही उल्लेखनीय ग्रंथ होत. 

एडिंबरो येथे ते निधन पावले. 

कुलकर्णी, अ. र.