लिंपेट : मॉलस्का (मृदकाय प्राण्यांच्या) संघातील गॅस्ट्रोपोड (शंखधारी प्राण्यांच्या) वर्गाच्या पटेलिडी (खरे लिंपेट) व ॲक्मीइडी कुलांतील सागरी मृदुकाय प्राण्याना लिंपेट म्हणतात. त्यांचे कवच (शंख) शंकूच्या आकाराचे किंवा तंबूसारखे असते. कवचावरील वरंबे शिखराकडून कडेपर्यंत जातात. बहुतेक लिंपेट लहान, ५ सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी लांब असतात. ते शैवले, जैव पदार्थ व वनश्रीवर उपजीविका करतात. खडकाळ किनाऱ्यावरील जीवनासाठी त्यांच्या बहुतेक जातींमध्ये अनुकूलन झालेले आढळते म्हणजे त्यांनी जुळवून घेतलेले असते व त्यांचे जीवन ⇨ कायटॉनसारखे असते.

सामान्य लिंपेटचे (पटेला व्हल्गेटा) कवच वर्तुळाकृती असते व तो आधाराला घट्ट चिकटतो. तो आपल्या शोषकासारख्या पायाने आधारावर हळूहळू चालतो. स्‍नायुमय पाय व कवचाच्या कडा यांच्यामध्ये प्रावार खातिका (शंखाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीलगतची खाच) असते. खरे मूळचे क्लोम (कल्ले) नसल्यामुळे प्रावार खातिकेत पुष्कळ द्वितीयक क्लोम असतात. प. व्हल्गेटा ही जाती पूर्व अटलांटिक किनाऱ्यावर आढळणाऱ्या गॅस्ट्रोपॉड प्राण्यांमध्ये हमखास असते. 

पसरट, शंक्वाकृती कवच खडकाळ किनाऱ्यावरील लाटांचा प्रतिकार करते. ॲक्मीइडी कुलातील लहान लिंपेट समुद्राच्या संथ भागात राहतात. दोन्ही कुलांतील लिंपेच आपले एकेक अंडे समुद्राच्या संथ पाण्यांत सोडतात. पटेलाचा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) प्लवकीय असून डिंभावस्था दहा दिवस टिकते. बहुतेक लिंपेट एकलिंगी असतात परंतु ॲक्मीया रुबेला ही जाती द्विलिंगी/ उभयलिंगी आहे. म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये उत्तम विकास पावलेल्या पुं.- व स्त्री-जनन ग्रंथी असतात व दोन्ही प्राणी एकाच वेळी अंडाणू व शुक्राणू (स्त्री- व पुं-जनन पेशी) उत्पन्न करतात व त्यांतील प्रत्येकाचे लैंगिक वर्तन सारखे असते. लिंपेट सापेक्षतः दिर्घायुषी असतात व काही जातींचे प्राणी १७ वर्षांपर्यंत जगतात. अगदी थोड्या जातींचा उपयोग अन्न म्हणून होतो, बाकीच्या जातींना आर्थिक महत्त्व नाही.

प. ग्रॅन्युलॅरिस या जातीच्या अभ्यासावरून लिंपेटमध्ये निवासस्थानी परतण्यांची प्रवृत्ती असल्याचे दिसून येते. ही जाती अन्न मिळविण्यासाठी दिवसा किंवा रात्री बाहेर पडली असता १५० सेंमी. अंतरावरून परत आपल्या निवासस्थानी येते.

पहा : कायटॉन.

जमदाडे, ज. वि.