गुहा, बी. एस्. : (१५ ऑगस्ट १८९४–२० ऑक्टोबर १९६१). एक प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्र. शिलाँग (आसाम) येथे मध्यम स्थितीतील कुटुंबात जन्म. कलकत्ता विद्यापीठाचे एम्. ए. (१९१५) हार्व्हर्ड विद्यापीठाचे ए. एम्. (१९२२) आणि पीएच्. डी. (१९२४). भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेत मानवशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती (१९२७–४५). १९४६ मध्ये गुहांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानवशास्त्र सर्वेक्षण संस्था स्थापन झाली. तिचे पहिले संचालक-सूत्रधार तेच झाले (१९४६–५४). पुढे एक वर्ष त्यांनी रांची येथे प्रशिक्षण शैक्षणिक केंद्रात संचालक म्हणून काम केले आणि नंतर ते बिहार आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक झाले (१९५६–५९). भारतात जनगणनेच्या कार्यपद्धतीत त्यांनी मौलिक भर घातली. मानवमितीच्या आधारे त्यांनी सहा मुख्य मानववंश व त्यांचे नऊ उपप्रकार स्पष्ट केले. १९५८ मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या मानवशास्त्राच्या जागतिक परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. त्यांना अनेक सन्मानार्थ पदव्या व पदके मिळाली. मानवशास्त्र विषयातील बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतामध्ये मानवशास्त्र व मुख्यत्वे शारीरिक-मानवशास्त्र यांचा पाया घालण्याचे श्रेय गुहा यांना द्यावे लागेल. मॅन इन इंडिया, सायन्स अँड कल्चर, जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी वगैरे मान्यवर नियतकालिकांतून त्यांनी अनेक संशोधनपर लेख लिहिले. याशिवाय त्यांची विविध परिषदांतील भाषणे, जनगणनेसंबंधीचे व उत्खननांवर आधारित असे अहवाल लेखरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. जमशेटपूरजवळ घटशिला येथे ते अपघातात मरण पावले.
संदर्भ : Ray, S. K. Bibliographies of Eminent Anthropologists, Anthropological Survey of India, Vol. VIII, Calcutta, 1974.
देशपांडे, सु. र.
“