चुनखडक : हा भूकवचाचा एक सामान्य घटक असून तो अवसादी (गाळाच्या) खडकांचा एक प्रकार आहे. मुख्यत्वेकरून कॅल्शियम कार्बोनेटाने बनलेल्या खडकास चुनखडक असे म्हणतात. त्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम या दोहोंचे जोड कार्बोनेट किंवा या दोन्हीच्या कार्बोनेटांचे मिश्रण असते. निर्मितीचा प्रकार, रासायनिक संघटन, वयन (पोत) व संरचना आणि खडकाची भूवैज्ञानिक घडण यांनुसार चुनखडकांचे प्रकार ठरतात. रासायनिक दृष्ट्या चुनखडक मुख्यत्वेकरून कॅल्शियम कार्बोनेटाचा बनलेला असतो. त्यात मॅग्नेशियम कार्बोनेट दुय्यम असते. तसेच त्यात लोहाची ऑक्साइडे, ॲल्युमिना, सिलिका, फॉस्फरस आणि गंधक यांसारखी मलद्रव्ये असतात. इतर खडक, मृदा, धातुके (कच्च्या स्वरूपातील धातू) इत्यादींमध्ये देखील ही कार्बोनेटे आढळतात. परंतु चुनखडक होण्यासाठी खडकामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक कार्बोनेटे असावी लागतात. काही अगदी काटेकोर अपेक्षांप्रमाणे खडकांत ७५ अथवा ९० टक्के कार्बोनेटे असावी लागतात. ५ ते २० टक्के मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या चुनखडकास मॅग्नेशियमयुक्त चुनखडक म्हणतात व २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ⇨डोलोमाइट  म्हणतात. कॅल्शियम कार्बोनेटाचे रूपांतरणाने पुनर्स्फटिकीभवन (पुन्हा स्फटिक तयार होण्याची क्रिया) होऊन तयार होणाऱ्या अधिक घन व स्फटिकी खडकास ⇨संगमरवर  (मार्बल) म्हणतात. सागरी प्राण्यांच्या सूक्ष्मकणी आकारमानाच्या अवशेषांपासून तयार झालेल्या खडकास ⇨चॉक  म्हणतात. सागरी प्राण्यांच्या कार्बोनेची सांगाड्यांचे व कवचांचे भाग एकत्र साचले व गाडले जाऊन काही चुनखडक तयार होतात. ज्या प्राण्यांच्या अवशेषांपासून चुनखडक तयार झाला असेल, त्याची नावे अशा प्रकारच्या चुनखडकास देतात. उदा., क्रिनॉइडी चुनखड, शंखाचा-शिंपल्याचा चुनखडक, प्रवाळी चुनखडक इत्यादी. सामान्य चुनखडकात कॅल्शियम ऑक्साइड २२ ते ५६ टक्के व मॅग्नेशियम ऑक्साइड २१ टक्क्यांपर्यंत असते. ॲल्युमिनियम ऑक्साइड अगदी कमी प्रमाणात पण मृत्तिकामय चुनखडकात ५ टक्क्यांपर्यंत असते. लोहाचे ऑक्साइड ३ ते ४ टक्के असते. सिलिका क्वॉर्ट्‌झाच्या स्वरूपात किंवा मृत्तिकेतील घटक म्हणून असते.

अगदी प्राचीन काळापासून मानव चुनखडकाचा उपयोग चुनखडीच्या स्वरूपात करीत आला आहे. इतिहासपूर्व कालीन मानवाने चुनखडकाची अनेक उपयुक्त हत्यारे, आयुधे व इतर साधने वापरली होती.

उत्पत्ती : नैसर्गिक अजैव (अकार्बनी) रासायनिक विक्रियांनी व जीवरासायनिक विक्रियांनी चुनखडक तयार होतात. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्यात आजूबाजूच्या खडकांतून विरघळून आलेले कॅल्शियम कार्बोनेट बरेच असते. या पाण्यावर रासायनिक व जैव क्रिया होऊन चुनखडकाचे निक्षेपण (साचण्याची क्रिया) होते. भूकवचाच्या खडकांत कॅल्शियम अगदी सामान्यपणे आढळत असून कवचामध्ये त्याचे प्रमाण ३ ते ४ टक्के असते. चुनखडकातील हे बहुतेक सर्व कॅल्शियम अग्निज खडकांतून आलेले असते. अपक्षरण (झीज होऊन) व रासायनिक विक्रिया यांमुळे निरनिराळ्या खडकांचे विघटन होते व त्यांतील कॅल्शियम पाण्यामध्ये विरघळते. हे पाणी वाहत जाऊन अखेरीस समुद्रास मिळते. अशा प्रकारे जे पदार्थ समुद्रात जाऊन पडतात, त्यांचे प्रमाण फार मोठे असते. उदा., एकट्या टेम्स नदीमधून दर वर्षी ६ लाख टन विरघळलेले पदार्थ समुद्रात नेण्यात येतात. यापैकी सु. दोन तृतीयांश भाग कॅल्शियम कार्बोनेट असते. समुद्राच्या पाण्याच्या कमी विद्रावकतेमुळे (विरघळविण्याच्या क्षमतेमुळे) काही कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण (न विरघळणारा साका तयार होणे) होते. तसेच पाण्याच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन आणि तापमानातील बदल यांमुळे पाण्यातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण कमी होऊन पाणी कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त (विरघळलेल्या पदार्थांचे, येथे कॅल्शियम कार्बोनेटाचे, प्रमाण जास्तीत जास्त असलेले) होते व त्याचे अवक्षेपण होते. थंड हवामान असलेल्या ध्रुव प्रदेशांखेरीज इतर सर्व भागांत समुद्राचे पाणी पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत कॅल्शियम कार्बोनेटाने अशा रीतीने बऱ्याच प्रमाणात संतृप्त झालेले असते. त्यातील कॅल्शियम कार्बोनेटाच्या वरील प्रकारच्या अवक्षेपणाने तयार होणारे चुनखडक जीवाश्मरहित (जीवांचे शिळारूप अवशेष नसलेले) असतात आणि ते सूक्ष्मकणी असतात. या प्रकाराने तयार होणारे चुनखडक पूर्णपणे अकार्बनी रासायनिक प्रक्रियेने तयार होणारे होते.

कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर निघून गेल्यामुळे भूपृष्ठावरील गोड्या स्वच्छ पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण होते. भूमिजलात (भूपृष्ठाखालील पाण्यात) कॅल्शियम कार्बोनेट असते. या पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडसुद्धा असल्यास आजूबाजूच्या खडकांतील अधिक कॅल्शियम विरघळून त्याचे प्रमाण बरेच वाढते. असे पाणी खडकातील चिरांतून जेव्हा त्यात असणाऱ्या पोकळ्यांत-गुहांत-झिरपू लागते तेव्हा बाष्पीभवन होऊन कार्बन डाय-ऑक्साइड निघून जातो व कॅल्शियम कार्बोनेट निक्षेपित होते. अशा रीतीने चुनखडकाची झुंबरे, स्तंभ, खांब, पडदे इ. संरचना तयार होतात. झिरपून येणाऱ्या एका मागून एक येणाऱ्या अशा थेंबांचे बाष्णीभवन होऊन कॅल्शियम कार्बोनेटाचे पातळ असे थर एकावर एक चढतात. त्यामुळे या प्रकाराच्या चुनखडकातील संरचना कांद्यातील पापुद्र्यांप्रमाणे असते. चुनखडकाच्या स्तंभात निरनिराळ्या रंगांचे पट्टे असले व त्यांना गुळगुळीत करून चकाकी देता आली, तर त्यास ऑनिक्स म्हणतात.

उन्हाळ्यांच्या (गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांच्या) व ⇨ गायझरांच्या आसपास कधीकधी चुनखडकाचे निक्षेप आढळतात. उन्हाळ्यांच्या व गायझरांच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट विरघळलेले असले, तर हे पाणी भूगर्भातून भूपृष्ठाकडे येत असताना त्यावरील दाब कमी झाल्यामुळे ते कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त होते व भूपृष्ठावर आल्यावर त्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे निक्षेप तयार होतात. त्यांना कॅल्क टूफा, कॅल्क सिंटर किंवा ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. कॅल्शियमी शैवलांच्या व सूक्ष्मजंतूंच्या क्रियांनीही अशा प्रकारचे निक्षेप तयार झाले असल्याचे आढळून आले आहे. चुनखडकांच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यातून कॅल्क टुफाचे काही जाड थर निक्षेपित झाले आहेत.

जेथे पावसाळ्यानंतर दीर्घकाल कोरडे हवामान असते अशा उष्ण कटिबंधातील प्रदेशात कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त असे भूमिजल केशिका क्रियेने (बारीक व्यास असलेल्या नलिकांद्वारे द्रव पदार्थ वर ओढला जाण्याच्या क्रियेने) भूपृष्ठाकडे येते आणि भूपृष्ठाजवळ त्याचे बाष्पीभवन होऊन शेतमातीच्या बाजूस कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण होते, अशा कॅल्शियम कार्बोनेटाचा कठीण असा थर तयार होतो. या थरामध्ये बऱ्याच वेळा संधिते (एखाद्या कणाभोवती निक्षेपित झालेल्या गाठी) आढळतात आणि त्यात लोहाचे प्रमाण अधिक असते. याला भारतात  ⇨ कंकर  म्हणतात.


सूक्ष्म आकारमानाच्या वालुकाश्माच्या किंवा इतर पदार्थांच्या कणांभोवती किंवा जीवाश्मांच्या बारीक तुकड्यांभोवती कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण होऊन संकेंद्री (एकाच केंद्राभोवती) संरचना असलेले गोलाकार अंदुक किंवा कलाय तयार होतात व त्यांचे ⇨ अंदुकाश्म  व कलायाश्म तयार होतात. नवीन तयार झालेल्या अंदुकाश्मातील कॅल्शियम कार्बोनेट हे ॲरॅगोनाइट असल्याचे दिसून आले व समुद्राच्या पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटांचे अवक्षेपण केल्यास त्यापासून ॲरॅगोनाइट तयार होते. यावरून अंदुकाश्म समुद्रातील पाण्यापासून तयार झाले असावेत, असे समजतात. कलायाश्म कलिल प्रकारच्या (पाण्यामध्ये सूक्ष्मकणांच्या स्वरूपात लोंबकळत असलेल्या) कॅल्शियम कार्बोनेटाच्या अवक्षेपणाने तयार होतात. काहींच्या मते अंदुकाश्मदेखील कलायाश्मांप्रमाणे कलिल प्रकारच्या अवक्षेपणाने तयार होतात. काहींच्या मते कॅल्शियमी गोळ्या किंवा संधिते यांच्याप्रमाणे अंदुकाश्म कॅल्शियमी पायसाच्या (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांच्या मिश्रणाच्या) घनीभवनामुळे तयार होतात. पायसापासून स्फटिक निर्माण झाल्यास अरीय संरचना तयार होते पण कॅल्शियम कार्बोनेटाबरोबर इतर पदार्थही अवक्षेपित होत असतील, तर संकेंद्री संरचना तयार होते. दुसऱ्या एका मतानुसार तंतुमय शैवलांच्या क्रियांमुळे अंदुकाश्म तयार होतात. काही अंदुकाश्मांत गिर्वानेला प्रकारच्या कॅल्शियमी शैवलांसारखे दिसणारे नागमोडी तंतू वा नळ्या आढळतात. ज्या पाण्यात अंदुकाश्म तयार होतात तेथे कॅल्शियमी शैवले भरपूर प्रमाणात असतात, मात्र अंदुकाश्मात ती सापडणे, ही गोष्ट काही लोक निव्वळ योगायोगाची समजतात.

जैव पदार्थापासून तयार झालेले कॅल्शियमी खडक हे बव्हंशी कॅल्साइटाचे बनलेले असतात. अशा प्रकारचे बहुतेक खडक सागराच्या तळावर तयार होतात. त्यांत आढळणाऱ्या इतर खनिजांमुळे वालुका, मृत्तिका, ग्लॉकोनाइट, लोह, फॉस्फेट इत्यादींनी युक्त असे चुनखडकाचे प्रकार होतात. जैव चुनखडक सामान्यतः जीव-यांत्रिकी क्रियांनी तयार होतात. त्यांचे संघटन अनियमित असते कारण कॅल्शियमी गाळामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांच्या अवशेषांचे तुकडे असतात. ज्या प्राण्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात असतात, त्याचे नाव चुनखडकास दिले जाते. जे प्राणी कॅल्शियमी लाळ अथवा इतर स्राव बाहेर टाकून कडक व कठीण असे शरीराचे भाग किंवा कवचे तयार करतात, अशा अनेक प्राण्यांचे भाग जैव चुनखडकात असतात. हे चुनखडक विशेषेकरून फोरॅमिनीफेरा, प्रवाळ, क्रिनॉइड, मॉलस्का (मृदुकाय) व क्रस्टेशिया (कवचधारी) या गटाच्या प्राण्यांच्या अवशेषांपासून बनलेले आढळतात. कॅल्शियमी शैवले व इतर अनेक प्रकारच्या प्राण्यांचे अवशेषदेखील चुनखडकात आढळतात, पण सामान्यतः ते वरील प्रकारच्या विपुल अवशेषांबरोबर मिसळलेले असतात.

मुख्यत्वेकरून किंवा सर्वस्वी फोरॅमिनीफेरांचे चुनखडक फार मोठ्या विपुल प्रमाणात आहेत व ते सतत तयार होत आहेत. निरनिराळ्या प्रकारची ऊझे [भूखंडांपासून दूर असलेल्या महासागरांच्या भागातील तळाशी साठलेल्या सूक्ष्मकणी चिखलाचे साठे, → ऊझ] कॅल्शियमी फोरॅमिनीफेरांची असतात. या ऊझांपैकी ग्लोबिजेरीना ऊझ फार मोठ्या प्रमाणात तयार होते. मुख्यत्वेकरून अटलांटिक आणि काही प्रमाणात हिंदी व पॅसिफिक महासागरांत या ऊझांच्या निक्षेपाने सु. साडेसात कोटी चौ. किमी. जागा व्यापली आहे. हे निक्षेप २,५०० ते ४,५०० मी. खोलीपर्यंतच आहेत. टेरापोडा या मॉलस्कांच्यापासून तयार झालेला सूक्ष्मकणी शिंपल्याचा व कवचांचा चुनखडक १,४०० ते २,७०० मी. खोलीपर्यंत आढळतो. तो अटलांटिक महासागरात विषुववृत्ताच्या आजूबाजूला आढळतो. बहुतेक सर्व उझे अगदी सावकाश तयार होत असतात.

चॉकच्या निक्षेपात फोरॅमिनीफेरांचे व विशेषकरून ग्लोबिजेरिनाचे तुकडे मोठ्या प्रमाणात व शंख-शिंपल्यांचे बारीक तुकडे, स्पंजाच्या बारीक कंटिका, कोकोलिथ व रॅब्‌डोलिथ हे असतात, परंतु चॉकच्या निक्षेपाचा बराचसा भाग सूक्ष्मकणी कॅल्शियमी चिखलाचा असतो. फोरॅमिनीफेरांपासून तयार होणारे इतर चुनखडक म्हणजे न्युम्युलाइट, सॅकमिना व फ्युस्युलिना यांचे होत.

प्रवाळभित्ती म्हणजे सुरुवातीपासून घन व सलग असलेले चुनखडक होत. हा चुनखडक संरचनारहित, अनियमित व भिंगांच्या आकारात तुटक तुटक आढळतो. यात इतर गाळात आढळणाऱ्या स्तरणाचा अभाव असतो. प्रवाळभित्ती निर्माण करण्यात कॅल्शियमी शैवलांसारखे इतर काही जीवही भाग घेतात, असे आढळून आले आहे. प्रवाळांच्या सहवासात राहणाऱ्या अनेक जीवांचे भाग व शंख-शिंपल्यांचे तुकडे प्रवाळभित्तीच्या चुनखडकात मिसळलेले आढळतात.

क्रिनॉइडांच्या चकत्या, स्तंभ, तुकडे इ. गाळात पडून त्यांपासून क्रिनॉइडी चुनखडक तयार होतो. क्रिनॉइडी चुनखडक प्रामुख्याने उत्तर पुराजीव महाकल्पात (सु. ४२ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झालेले आढळतात. काही सागरी भागांत मॉलस्कांचे आणि विशेषकरून शंख-शिंपल्यांचे मोठाले थर आहेत. त्यांच्याबरोबर ब्रॅकिओपॉड आणि एकायनोडर्म यांचे अवशेषही आढळतात. कॅल्शियमी शैवलांच्यामुळे चुनखडक तयार होतात. उदा., पूर्व कँब्रियन कालीन (सु. ६० ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) क्रिप्टोझून चुनखडक हा शैवलांच्या स्रावितापासून तयार झाला आहे.

ज्या कॅल्शियमी गाळापासून चुनखडक तयार होतात त्याच्या निक्षेपणाच्या वेळी सिलिकामय, मृत्तिका वा लोही गाळ त्यात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे चुनखडकाच्या रासायनिक संघटनात आणि त्याच्या गुणधर्मांत फरक पडतात. कॅल्शियमी कणांचा आकार व आकारमान, दाब, तापमान यांची परिस्थिती आणि निक्षेपणाच्या वेळी असणारी विद्रावकता यांच्यामुळे चुनखडकाच्या भौतिक गुणधर्मांत फरक निर्माण होतात. निरनिराळ्या चुनखडकांचे संघटन भिन्न असते. काही अगदी अलगदपणे एकमेकांना चिकटलेले असतात, तर काहींचे रूपांतरण होऊन ते घट्ट व कठीण होऊन त्यांचे स्फटिकी संगमरवरासारखे खडक तयार झालेले असतात. या दोन टोकांमध्ये इतर प्रकारचे अनेक चुनखडक आढळतात. आज व सतत तयार होणाऱ्या चुनखडकांची उदाहरणे म्हणजे ग्लोबिजेरिनाचे ऊझ व प्रवाळाचे खडक ही होत.

रासायनिक दृष्ट्या वर्गीकरण : (१) उच्च कॅल्शियमी : हा मुख्यत्वेकरून कॅल्शियम कार्बोनेटाचा बनलेला असतो आणि त्यातील मॅग्नेशियम कार्बोनेटाचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असते.

(२) मॅग्नेशियमी : यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दोहोंची कार्बोनेटे असतात. मॅग्नेशियम कार्बोनेट ५ ते २० टक्के असते.

(३) डोलोमाइटी : यात २० टक्क्यांहून अधिक मॅग्नेशियम कार्बोनेट असते, मात्र ते ४५·६ टक्क्यांपेक्षा कमी असावे लागते. बाकीचा भाग कॅल्शियम कार्बोनेटाचा असतो.

जागतिक वाटप : विविध आकारमानांचे आणि निरनिराळ्या शुद्धतेचे चुनखडक जगभर सर्वत्र आढळतात. पृथ्वीवर सर्वांत जास्त आढळणाऱ्या घटकांपैकी सिलिकेच्या खालोखाल चुनखडक बनविणाऱ्या कॅल्साइटाचा क्रमांक लागतो. जवळजवळ सर्व भूवैज्ञानिक शैलसमूहांमध्ये चुनखडक आढळतो. ब्रिटिश बेटांमध्ये, यूरोपात डेव्होनियन (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या), पूर्व कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ कोटी वर्षांपूर्वीच्या), जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांमध्ये चुनखडक प्रामुख्याने आढळतो. अमेरिकेत वरील काळाव्यतिरिक्त कँब्रियन व सिल्युरियन (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील चुनखडक आहे. थोडा चुनखडक पूर्व कँब्रियन कालीनही आहे. परंतु सामान्यतः पूर्व पुराजीव महाकल्पात चुनखडक अगदी कमी प्रमाणात सापडतो.


भारतातील चुनखडक : भारतात चुनखडक कँब्रियनपूर्व ते अगदी अलीकडच्या अशा सर्व भूवैज्ञानिक शैलसमूहांत आढळतो. चुनखडकाचे खाणकाम भारतात फार मोठ्या प्रमाणात चालू असून निरनिराळ्या खनिजांच्या उत्पादनात कोळसा व लोहधातुकाच्या खालोखाल त्याचा तिसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सिमेंट तयार करण्यास योग्य अशा चुनखडकाचे सु. १,८५० कोटी टनांचे साठे आहेत. त्याचे उत्पादन सतत वाढत आहे.

भारतातील चुनखडीचे उत्पादन व उत्पन्न 

वर्ष 

उत्पादन (हजार टनांत) 

किंमत (कोटी रुपयांत) 

१९६७ 

१९,५८६ 

१५·२५ 

१९६८ 

२१,०३० 

१८·४३ 

१९६९ 

२२,५१७ 

२१·१९ 

१९७० 

२३,८०१ 

२०·४४ 

१९७१ 

२५,०२० 

२१·४३ 

१९७२ 

२५,९४६ 

२७·७० 

१९७३ 

२३,८३० 

२३·५७ 

भारताचे चुनखडकाचे निक्षेप मुख्यत्वेकरून पुढील भागांत आहेत. आंध्र प्रदेश (गुंतूर, कुर्नूल व अनंतपूर जिल्हे) आसाम (खासी, गारो, जैंतिया व मीकीर टेकड्या व सिल्हेट) बिहार (मोंघीर, पालामाऊ, शहाबाद व सिंगभूम जिल्हे) गुजरात (सौराष्ट्र) कर्नाटक (विजापूर, गुलबर्गा, तुमकूर, बेळगाव, चितळदुर्ग व शिमोगा जिल्हे) मध्य प्रदेश (जबलपूर, बिलासपूर जिल्हे तसेच माह्‌हूर व सटना) तमिळनाडू (तिरूनेलवेली, रामनाथपुरम्, तिरूचिरापल्ली व सालेम व जिल्हे) ओऱिसा (सुंदरगढ जिल्हा) पंजाब (अंबाला जिल्हा) राजस्थान (चितोड, नींबहेर आणि अरवली टेकड्या) उत्तर प्रदेश (मिर्झापूर जिल्हा तसेच मसूरी, नैनिताल व डेहराडून यांच्या आसपास) व प. बंगाल (दार्जिलिंग जिल्हा). बिहारमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात चुनखडी काढतात. त्याखालोखाल ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश ही महत्त्वाची उत्पादक राज्ये आहेत. देशात कंकर सर्वत्र मोठ्या प्रमाणात सापडतो. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व काही प्रमाणात उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांत त्यापासून चुना तयार करतात. कॅल्शियमी टुफाचे निक्षेप सर्वत्र डोंगराळ भागात आढळतात. तमिळनाडूच्या रामनाथपुरम् व तिरूनेलवेली या जिल्ह्यांच्या समुद्रकिनाऱ्यालगत तसेच किनाऱ्यापासून सु. ७–८ किमी. अंतरावरील सु. २० बेटांमध्ये प्रवाळ आढळतात. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार या जिल्ह्यांत तसेच गुजरातच्या ओखामंडल येथील किनाऱ्यालगतच्या समुद्रतळावर प्रवाळी चुनखडक आढळतात.

आगस्ते, र. पां.