चिमणी -१ : सगळ्यांच्या परिचयाचा हा पक्षी फ्रिंजिलिडी या पक्षिकुलातील आहे. संबंध यूरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या बहुतेक भागात चिमणी आढळते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात देखील तिने प्रवेश केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांत मात्र तिचा अद्याप प्रवेश झालेला नाही. भारतात ती सगळीकडे आढळते. पण दाट अरण्यात मात्र ती नसते.

चिमणी

चिमणीचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस  हे आहे. हिच्या पुष्कळ उपजाती आहेत. चिमणी बुलबुलापेक्षा लहान असून तिची लांबी सु. १५ सेंमी असते. चिमणा (नर) आणि चिमणी (मादी) आकाराने जरी सारखी असली, तरी त्यांच्या रंगव्यवस्थेत फरक असतो. चिमणा : डोक्याचा माथा आणि मागची बाजू भुऱ्या रंगाची मानेचा मागचा  भाग तांबूस काळसर व दोन्ही बाजू पांढऱ्या गाल पांढरे हनुवटी गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळसर पट्टा जातो पाठ आणि पंख तांबूस काळसर पंखांवर दोन आडवे पांढरे पट्टे मागचा भाग (ढुंगण) भुरा खालचा भाग पांढरा शेपटी गर्द तपकिरी. चिमणी : डोळ्याच्या वर तांबूस-पांढरी रेघ पाठ मातट तपकिरी आणि त्यावर काळ्या व तांबूस रेघोट्या पंख आणि शेपटी तांबूस रंगमिश्रित काळसर तपकिरी पंखांवर दोन आडवे पट्टे खालची बाजू भुरकट पांढरी

डोळे व चोच तपकिरी चोच आखूड, जाड आणि मजबूत नराची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते पाय तपकिरी पंख विशेष मजबूत नसल्यामुळे या पक्ष्याला एकसारखे लांब उडता येत नाही जमिनीवर पावले टाकीत चालता येत नाही. तो टुणटुण उड्या मारतो.

कावळ्याप्रमाणेच चिमणीही माणसाच्या आश्रयाला येऊन राहिलेली आहे. चिमण्यांचे प्रमाण काही ठिकाणी कमी तर काही जागी जास्त असते व ते नेहमी अन्नाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते अन्नाच्या पुरवठ्याचा संबंध या ना त्या प्रकारे सामान्यतः माणसाशी असतो. यामुळे चिमणी वस्तुतः माणसावर परजीवी असते.

कावळा आणि चिमणी आपापल्या परीने मनुष्याला त्रास देत असतात, पण कावळ्यापेक्षा चिमणी शतपटीने अधिक त्रासदायक आहे. कावळ्याला हाकलल्यावर तात्पुरता तरी तो दुसरीकडे जातो, परंतु चिमणी इतकी खमंग असते की कितीही हाकलले तरी लोचटासारखी ती जागेवरून हालत नाही. अगदीच नाइलाज झाला म्हणजेच ती दृष्टीआड होते, पण आपली पाठ फिरताच ती परत येते. कावळा घरात शिरायला भितो पण चिमणी मात्र घराची सगळी दालने ओलांडून स्वयंपाकघरात प्रवेश करते. ती इतकी धीट आहे की, पुष्कळदा उडत उडत येऊन जेवणाऱ्या माणसाच्या ताटातील पदार्थ पळवून नेण्याचा प्रयत्न करते. चिमणी सर्वभक्षक आहे. मनुष्याने स्वतःकरिता शिजविलेले अन्न, सगळी धान्ये, किडे, सुरवंट, नाकतोडे, कोळी, कोवळ्या रोपांचे शेंडे वगैरे ती खाते. शेतातील तयार कणसांवर चिमण्यांचे थवे हल्ला चढवून दाणे खातात आणि कणसांची नासाडी करतात. बाजारातील धान्यांच्या दुकानांसमोर मांडलेल्या टोपल्यांतले धान्य चिमण्या सर्रास खातात. कोणी हाकललेच तर उडून जातात व पुन्हा येतात.

चिमणीची वीण वर्षातून निदान तीन वेळा तरी होते. ज्या ठिकाणी घरटे बांधता येईल असे त्यांना वाटते, त्या ठिकाणी त्या ते तयार करतात वा बांधण्याचा प्रयत्न करतात, घरातील हंड्या, झुंबरे, तसबिरींच्या मागची जागा, वापरण्यात नसलेले कोनाडे, भिंतीतली भोके, वळचणीची जागा वगैरे ठिकाणी त्यांची घरटी असतात. झाडांवर त्या कधीच घरटी बांधीत नाहीत. गवत, कागद, लोकर, काथ्या, कापूस, चिंध्या, पिसे वगैरे पदार्थ वापरून चिमणा व चिमणी मिळून घरटे तयार करतात.

घरटे तयार झाल्यावर चिमणी त्यात तीन-पाच अंडी घालते ती पांढरी असून त्यात हिरव्या रंगाची छटा असते आणि वर तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविण्याचे काम दोघेही करतात आणि पिल्ले बाहेर पडल्यावर सुरवंट, अळ्या व इतर किडे आणून त्यांना खायला घालतात. पिल्ले मोठी होऊन त्यांचे पंख वाढल्यावर आईबाप त्यांना घरट्याबाहेर आणून उडण्याचे शिक्षण देतात.

चिमण्यांची झोपी जाण्याची रीत मजेदार असते. तिन्हीसांजांच्या सुमारास पुष्कळ चिमण्या एखाद्या झाडावर किंवा दाट झुडपांवर जमतात व एकसारख्या खूप कोलाहल करीत असतात. जसजसा अंधार वाढत जातो, तसतसा त्यांचा गोंगाट कमी कमी होत जाऊन अखेरीस चांगला अंधार पडल्यावर त्या स्तब्ध होतात व झोपी जातात.   

कर्वे, ज. नी.