म्हाइंभट : (? –मृ. सु. १३००). आद्य मराठी ग्रंथकार आणि मराठीतील आद्य चरित्रकार. म्हाइंभट हे मराठवाड्यातील सराळे या गावचे. त्यांचे मामा गणपती आपेयो ह्यांच्यापाशीच त्यांचे संस्कृत अध्ययन झाले. गणपती आपेयो ह्यांच्यी कन्या देआंबा हिच्याशीच त्यांचा विवाह झाला. गणपती आपेयो यांच्या सांगण्यावरून महानुभाव पंथसंस्थापक श्रीचक्रधर ह्यांच्या भेटीसाठी म्हाइंभट डोमेग्रामास आले. या भेटीत श्रीचक्रधरांच्या निरूपणशैलीने प्रभावित होऊन म्हाइंभट स्वगृही परतले. त्यानंतर लवकरच रिधपूरला (ऋद्धिपूरला) त्यांनी चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभु यांच्याकडून महानुभाव पंथाची दीक्षा घेतली. आपले उर्वरित आयुष्य त्यानी पंथाच्या सेवेसाठी वेचले.

म्हाइंभटांनी लीळाचरीत्र हा आपला पहिला ग्रंथ सु. १२७८ मध्ये पूर्ण केला. या ग्रंथात श्रीचक्रधरांच्या आठवणी ऊर्फ लीळा त्यांनी संकलित केल्या आहेत. लीळाचरीत्राचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. त्याशिवाय लोकांना उपदेश करण्यास सुरुवात करण्यापूर्वी चक्रधरजे एकाकी भ्रमण करीत होते, त्याबद्दलाच्या आठवणी एकांक ह्या भागात अंतर्भूत आहेत. ह्या लीळा गोळा करण्याच्या कामी म्हाइंभटांना महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्रीनागदेवाचार्य ऊर्फ भटोबास ह्यांचे बरेच साहाय्य झाले होते. चक्रधरांच्या चरित्राचा उत्तरार्ध उभा करण्यासाठी श्रीनागदेवाचार्य हे म्हाइंभटांच्या उपयागी पडले परंतु चक्रधरांच्या जीवनाच्या पूर्वार्धातील लीळा नागदेवाचार्यांना ठाऊक असणे शक्य नव्हते कारण चे या पूर्वार्धाच्या अखेरीअखेरीस चक्रधरांकडे आले होते. त्यामुळे त्या लीळा म्हाइंभटांना अन्य जाणकारांकडून मिळवाव्या लागल्या. काही प्रसंगी अक्षरशः एकेका लीळेची भीक त्यांनी चक्रधरभक्तांकडे मागितली.

म्हाइंभटांचा हा ग्रंथ अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. मराठी भाषेतील पहिला चरीत्रग्रंथ म्हणून त्याला महत्त्व आहेच परंतु यातील लीळा किंवा आठवणी अगदी घरगुती अशा गद्यात सांगितलेल्या असल्यामुळे तत्कालीन मराठी भाषेचे लौकिक किंवा व्यावहारिक स्वरूप ह्या ग्रंथावरून लक्षात येते. लीळाचरीत्राची भाषा साधी, सोपी व सरळ असून त्याचा एकांक हा भाग भाषाशैलीच्या दृष्टीने उत्कृष्ट उतरला. हा ग्रंथ महानुभाव पंथाच्या पुढील सर्व वाङ्‌मयाचा पाया ठरला आणि सिद्धांतसूत्रपाठदृष्टांतपाठ यांसारखे ग्रंथ त्यातूनच निर्माण झाले. समाजाच्या सर्व थरांशी संबंध आलेल्या एका नवपंथसंस्थापकाचे हे चरित्र असल्याने त्यात समाजदर्शनही प्रत्ययकारी रीतीने घडते. त्यातील व्यक्तिचित्रे वाङ्‌मयीन दृष्ट्या रोचक आहेत. असा हा अष्टपैलू माहात्म्य असलेला ग्रंथ निर्माण करून म्हाइंभटांनी मराठी भाषेची अपूर्व केली व आपल्या पंथाला त्याचा धर्मग्रंथ करून दिला.

गोविंदप्रभुचरित्र किंवा ऋद्धिपूरचरित्र हा म्हाइंभटांचा दुसरा ग्रंथ. त्याची रचना सु. १२८८ मध्ये झाली. त्यात गुंडमराउळ किंवा गोविंदप्रभु ह्या महानुभावांच्या पंचकृष्णांपैकी एका अवताराच्या लीळा सांगितल्या आहेत. या लीळांत चक्रधरांच्या लीळांप्रमाणे विविधता, संघटन, साक्षेप इ. गुण दिसत नसले, तरी भाषा मात्र अधिकच घरगुती स्वरूपाची आहे. ह्या दोन चरीत्रग्रंथांशिवाय ‘जतिचा दशकू’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दहा आरत्या म्हाइंभटांच्या नावावर आहेत. महानुभावांच्या नित्यपाठात त्या असतात.

संदर्भ : १. कोलते, वि. भि. संपा. लीळाचरित्र, मुंबई, १९७८.

            २. कोलते, वि. भि. संपा. श्रीगोविंदप्रभुचरित्र, मलकापूर, १९६०.

            ३. तुळपुळे, शं. गो. संपा लीळाचरित्र, पाच भाग, पुणे, १९६४–१९६७. 

तुळपुळे, शं. गो.