औद्योगिक धोके: एखादा उद्योग (कारखाना) चालू असताना त्यातील माणसांच्या किंवा कारखान्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला बाधा किंवा जीवितास इजा होण्याचा संभव म्हणजे औद्योगिक धोका. धोका व प्रत्यक्ष अपघात यात फरक आहे. धोका असला तरी अपघात होईलच असे नाही. कारखान्यातील विद्युत् फलक, उघडे पट्टे व दंतचक्रे, फरशीवर सांडलेले वंगणाचे तेल, कापड गिरणीत टाकलेली सिगारेटींची व विड्यांची न विझविलेली थोटके ही धोकास्थळांची उदाहरणे म्हणून सांगता येतील.
इतिहास व कारखाने अधिनियम :अनादी कालापासून मनुष्य प्राणी स्वतःचे जीवन सुखमय करण्यासाठी अनेक साधनांचा उपयोग करीत आहे. सुतार, लोहार, एवढेच नव्हे तर केस कापणारा कारागीरही निरनिराळ्या प्रकारची हत्यारे शेकडो वर्षे वापरीत आला आहे. काही विषारी पदार्थांचा उपयोगदेखील थोड्याफार प्रमाणात मानव करीत असे. या सर्व साहित्याचा स्वतःचा व आजूबाजूच्या प्राण्यांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही याची खबरदारी तो घेत असलाच पाहिजे. परंतु पुढे कारखान्यांची स्थापना व त्यांत सुरू झालेला यंत्रांचा वापर आणि त्यांतील एकंदर कामाची पद्धती यांमुळे धोकादायक साधनांचा कामगारांशी निकट व प्रत्यही संबंध येऊ लागला. वास्तविक आपणास काहीही दुखापत होऊ नये याची काळजी मनुष्याने घ्यावयास पाहिजे. परंतु यंत्रयुगाच्या सुरुवातीला कामगार स्वतः व त्याचा मालक या बाबतीत उदासीन राहिले, ही चमत्कारिक परिस्थिती मात्र सत्य आहे. कदाचित कारखान्यात काम करताना दुखापत होणारच अशी भ्रामक कल्पना सुरुवातीस कामगार व कामखानदार या दोघांचीही झालेली असण्याचा संभव आहे. औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभीच्या काळात कारखान्यात घडणाऱ्या दुर्घटनेची व त्यामुळे झालेल्या कामगारांच्या नुकसानीची जबाबदारी आपल्यावर नाही अशीही मालकांची समजूत असावी.
कारखान्यांतील कामगारांचे संरक्षण करण्यासाठी १८०२ साली इंग्लंडमध्येप्रथम अधिनियम अंमलात आले. शारीरिक दुखापती टाळण्यासाठी अधिनियम इंग्लंडमध्ये १८४४ मध्ये, फ्रान्समध्ये १८९३ मध्ये व अमेरिकेत १८७७ मध्ये करण्यात आले. समाजाच्या इतर व्यवहारांत वापरले जाणारे सर्वसाधारण नुकसान भरपाईचे अधिनियम अपुरे वाटल्यामुळे कामगार नुकसान भरपाईचे नवे अधिनियम १८८५ मध्ये प्रथम जर्मनीत, १८८७ मध्ये अमेरिकेत व १८९७ मध्ये इंग्लंडमध्ये करण्यात आले. कामखानदाराचा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची या अधिनियमान्वये जरूरी नव्हती.
भारतात कामगारांच्या संरक्षणाचे किंवा कारखाने अधिनियम प्रथमतः १८८१ मध्ये करण्यात आले. परंतु या अधिनियमांत वाफ एंजिनाचे प्रचक्र (एंजिनाच्या वेग बदलास विरोध करणारे मुख्य दंडावरील चक्र) किंवा जल टरबाइनासारख्या (पाणचक्कीसारख्या यंत्रासारख्या) मूलचालकाबद्दलच (यांत्रिक शक्ती उत्पन्न करणाऱ्या यंत्राबद्दलच) फक्त उल्लेख करण्यात आला होता. धोक्याच्या इतर यंत्रांबद्दल कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते हुकूम देणे सरकारी अधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून होते. कामगार नुकसान भरपाई अधिनियम भारतात १९२३ मध्ये अंमलात आले. प्रत्येक इलाख्यातील चीफ सेक्रेटरीकडून सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाला या १८८१ च्या अधिनियमांच्या अंमलबजावणीबाबत १८८८ मध्ये अहवाल पाठवण्यात आला. मुंबई इलाख्याच्या चीफ सेक्रेटरीच्या अहवालावरून त्यावेळचा कामगारांच्या संरक्षणाबद्दलचा सरकारी दृष्टिकोन कळून येतो. ह्या अहवालाप्रमाणे हिंदुस्थानातील कारखानदार यंत्रापासून कामगारांचे संरक्षण करण्यास योग्य ते इलाज करण्याबाबत निष्काळजी नव्हते. कामगार मात्र कारखान्यात पौर्वात्य लोकांच्या नेहमीच्या विचित्र उदासीन वृत्तीने वागताना आढळले व धोक्याची दखल न घेता व विचार न करता निष्काळजीपणे वागल्याने कित्येक वेळा मृत्युमुखी पडले. कारखानदार व त्यांचे व्यवस्थापक मात्र आपल्या नोकरांच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य पार पाडण्यास तत्पर असून त्याकरिता त्यांच्यावर कोणतेही दडपण आणण्याची जरूरी भासली नाही. ‘अपघात होत नाहीत तर ते घडविले जातात’ ह्या हल्लीच्या कल्पनेत व वरील सु. ८० वर्षांपूर्वीच्या सरकारी अहवालाच्या दृष्टीकोनात मूलभूत फरक दिसत नाही.
सन १८८१ च्या अधिनियमात फक्त कलम १२ मध्येच कामगारांच्या संरक्षणाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर १८९१, १९११, १९२२, १९२६, १९३४ व १९४८ मध्ये या अधिनियमात सुधारणा करण्यात आल्या. १९४८ चा कारखाने अधिनियम सबंध भारतास लागू करण्यात आला आहे [→ कामगार कायदे].
मागील अपघात : भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालातील अपघातांची विश्वसनीय माहिती मिळविणे कठीण आहे. शिवाय मिळालेल्या आकडेवारीची इतर देशांच्या आकडेवारीशी तुलना करणे जवळजवळ अशक्य आहे. निरनिराळ्या प्रांतांतील अंमलबजावणी व देशोदेशींचे या बाबतीतले नियम वगैरेंत एकवाक्यता नाही. कारखाना म्हणजे काय, अपघाताबद्दल केव्हा माहिती पुरविली पाहिजे यांसारख्या मूलभूत बाबींतसुद्धा मतभेद आहेत. जखमी झालेला कामगार ४८ तासांपेक्षा जास्त तास कामावर येण्यास असमर्थ झाला तर अपघात झाला असे भारतीय अधिनियमानुसार मानले जाते. पण इंग्लंडात असमर्थतेची मर्यादा ७२ तास आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तर ही मर्यादा २४ तासांची धरावी असा सल्ला देते.
भारतातील कामगारांसंबंधी चौकशी करण्याकरिता नेमलेल्या व्हिटली आयोगाने १९३१ मध्ये सादर केलेल्या अहवालात असे मत मांडले आहे की, दर वर्षी अपघातांचे प्रमाण वाढत आहे, असे जे दिसते त्याचे कारण कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेतील बिघाड हे नसून अपघातांची जास्त तत्परतेने नोंद होत आहे हे आहे. इंग्लंडमध्ये देखील मुख्य निर्मिती निरीक्षकांच्या १९६३ च्या अहवालात म्हटले आहे की, कारखान्यातील अंदाजे ४० टक्के व बांधकामातील ६० टक्के अपघात संबंधित अधिकाऱ्यांना कळविले जात नाहीत. १९४८ च्या भारतीय कारखाने अधिनियमाप्रमाणे नोंद झालेल्या देशातील कारखान्यांत सरासरी ३६ लक्षावर कामगार दररोज कामावर असत. १९५९ च्या भारत सरकारच्या अहवालावरून असे दिसून येते की, औद्योगिक अपघातामुळे यांपैकी दरमहा १२ हजारांना दुखापत झाली व २८ कामगार मेले.
मागील अपघातांची छाननी केल्यास अपघातांचे प्रकार वारंवार घडणारे व क्वचित घडणारे असे वर्गीकरण इ. तपशील मिळविता येतो. या तपशीलावरून मग अपघातांची कारणे व त्यांवरील खबरदारीचे उपाय या बाबतीत निष्कर्षही काढणे शक्य होते. या दृष्टीने पुढील पानावरील कोष्टक क्र. १ व २ मध्ये महाराष्ट्र राज्यातील १९६१ – ६४ या कालातील औद्योगिक अपघातांचा तपशीलच दिला आहे.
या कोष्टकांतील आकडेवारीवरून असे दिसून येते की, सर्वांत जास्त प्रमाणात धोका हलत्या-फिरत्या भागांच्या यंत्रांपासून संभवतो. मृत्युपर्यवसायी अपघात सर्वांत जास्त पडण्यामुळे व त्या खालोखाल विजेच्या धक्क्याने होतात.
धोक्यांचे प्रकार, त्यांची कारणे व अपघात टाळण्याचे उपाय : (१) पडण्यामुळे होणारे अपघात : उंचावर काम करीत असताना तोल जाऊन पुष्कळ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. छप्पर दुरूस्त करताना, उंच खांब रंगविताना किंवा धुराड्यावर काम करताना जर पुरेशी काळजी घेतली नाही तर मृत्युशीच गाठ पडते. काही वेळा कामगार टाकीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये पडतात. गटारामुळे किंवा निसरड्या जमिनीवर झालेले अपघात गंभीर स्वरूपाचेही असू शकतात. महाराष्ट्र राज्यामध्ये जमिनीवरच पडून किंवा फक्त १·५० मीटर उंचीच्या स्टुलावरून पडून मृत्यु झाल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणून जमिनी सुस्थितीत ठेवणे, गटारे, खड्डे, टाक्या यांवर झाकणे घालणे यांसारख्या साध्या उपायांकडेही पूर्ण लक्ष ठेवणे आवश्यक असते. उंचावर काम करताना कामगारांनी शरीराभोवती पट्टा बांधून दोरीने मजबूत ठिकाणी आधार घ्यावा. ढिल्या फळ्या किंवा बांबूचे पायंडे असलेल्या परांच्या वापरणे धोक्याचे आहे.
कोष्टक क्र. १. १९६१ – ६४ ह्या काळात महाराष्ट्र राज्यात झालेल्या कारखान्यांतील अपघातांच्या कारणांचा तपशील (कंसातील आकडे मृत्युपर्यवसायी अपघात दर्शवितात) |
||||||||
कारणे |
एकूण अपघात |
|||||||
१९६१ |
१९६२ |
१९६३ |
१९६४ |
|||||
संख्या |
टक्के |
संख्या |
टक्के |
संख्या |
टक्के |
संख्या |
टक्के |
|
गतिमान यंत्रे |
११,६००: |
२८·५७ |
१२,०३७: |
२८·६१ |
१३,५२९: |
२८·९७ |
१५,३५७ : |
३१·९३ |
(१२) |
(८) |
(८) |
(८) |
|||||
वस्तूवर आदळणे |
५,२०१: |
१२·८२ |
५,८८२: |
१३·९८ |
६,४८२: |
१३·८८ |
५,७४४ : |
११·९४ |
(२) |
(३) |
(१) |
(२) |
|||||
पडणार्या वस्तू |
५,४३३: |
१३·३७ |
५,५३२: |
१३·१५ |
५,९६२: |
१२·७७ |
५,९९९ : |
१२·५७ |
(३) |
(४) |
(५) |
(९) |
|||||
विविध वस्तू हाताळणे |
३.६५७: |
९·०१ |
४,३२४: |
१०·२८ |
४,७९६: |
१०·२७ |
४,४८४ : |
९·३२ |
(२) |
(२) |
(१) |
||||||
हत्यारे |
३.१११: |
७·६५ |
२,९९९: |
७·१३ |
३,०९१: |
६·६२ |
२,६५५ : |
५·५२ |
(१) |
||||||||
पतन (पडणे) |
१,४२८ : |
३·५२ |
१,७१७: |
४·०८ |
१,८३३: |
३·९२ |
१,९४१ : |
४·०३ |
(१५) |
(१४) |
(१२) |
(३४) |
|||||
गरम वस्तू व रसायने |
१,५६८ : |
३·८५ |
१,६५८: |
३·९४ |
१,७९६: |
३·८४ |
१,५७१ : |
३·२६ |
(२) |
(१०) |
(८) |
(३) |
|||||
विद्युत् |
१३४ : |
०·३६ |
१४०: |
०·३३ |
१५८: |
०·३३ |
१४० : |
०·३१ |
(१५) |
(१२) |
(१५) |
(१४) |
|||||
आग |
१२५ : |
०·३१ |
१५१: |
०·३५ |
१०२: |
०·२१ |
९९ : |
०·२५ |
(१०) |
(१२) |
(६) |
(१३) |
|||||
स्फोट |
४६ : |
०·१० |
३२: |
०·०७ |
३७: |
०·०८ |
३३ : |
०·०६ |
(२५) |
(७) |
(२) |
(४) |
|||||
विषारी धूर |
२४ : |
०·०६ |
३०: |
०·०७ |
५९: |
०·११ |
४९ : |
०·१० |
(१) |
(४) |
(६) |
||||||
किरकोळ कारणांनी |
८,२३७ : |
२०·३८ |
७,५६५: |
१८·०१ |
८,८४१: |
१९·०० |
१०,०१४ : |
२०·७१ |
(५) |
(९) |
(१७) |
(२०) |
|||||
एकूण |
४०,५६४ : |
१००·०० |
४२,०६७: |
१००·०० |
४६,६८६: |
१००·०० |
४८,०८६ : |
१००·०० |
(९०) |
(८६) |
(८२) |
(१०८) |
कोष्टक क्र. २. १९६१-६४ या काळातील महाराष्ट्र राज्यातील कारखान्यांत घडलेले मृत्युपर्यवसायी अपघात. |
||
कारणे |
संख्या |
टक्के |
पतन (पडणे) विद्युत आग स्फोट गतिमान यंत्रे गरम वस्तू व रसायने पडणार्या वस्तू वस्तूवर आदळणे विविध वस्तू हाताळणे हत्यारे विषारी धूर इतर कारणे |
७५ ५६ ४१ ३८ ३६ २३ २१ ८ ५ १ ११ ५१ |
२०·४८ १५·३० ११·२० १०·३८ ९·८८ ६·२८ ५·७३ २·१८ १·३७ ०·२८ ३·०० १३·९२ |
एकूण |
३६६ |
१००·०० |
(२) विद्युत् : कारखान्यांत झालेल्या अपघाती मृत्यूत विजेच्या धक्क्याने होणार्या मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या स्थानी आहे. विद्युत् उपकरणे, यंत्रे व त्यांना जोडणाऱ्या तारा या बसविण्यात बारीक लक्ष न घालणे या कारणांनी बहुधा हे अपघात होतात. तारा,स्विचे, धारक (होल्डर), गुडद्या (प्लग) वगैरेंबद्दल जागतिक मान्यता मिळालेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. हात दिवे, इस्त्री,विजेची छिद्रण यंत्रे यांसारखी छोटी उपकरणे यांच्या बाहेरचे लोखंडी (धातूचे) वेष्टन पक्के भूयोजित केल्याशिवाय (जमिनीस जोडल्याशिवाय) वापरल्यास अपघात होण्याचा बराच संभव असतो. ही उपकरणे जरी दोन तारांनी (व दोन खिळींच्या गुडदीने) चालू करता आली तरी तीन तारा व तीन खिळ्यांची गुडदी वापरावी. यांतील तिसरी खीळ भूयोगासाठी वापरली जाते. अवरोहित्र (विद्युत् प्रवाहाचा दाब कमी करण्याचे साधन) व कमी दाबाची (११० व्होल्टची) उपकरणे वापरल्यास धोका बराच कमी होतो.
(३), (४) आग व स्फोट : आगीच्या व स्फोटाच्या अपघातांची संख्या कमी असते पण हे अपघात घडल्यास आर्थिक हानी फार होते व माणसांच्या इजा गंभीर स्वरूपाच्या व पुष्कळदा मृत्युपर्यवसायी होतात. काही वेळा तात्कालिक प्राणहानीही बरीच होते. आग प्रतिबंधक उपाय सर्व तऱ्हांच्या कारखान्यांत संबंधित अधिनियमान्वये सक्तीचे असतात. कापड गिरण्यांसारख्या कारखान्यात जेथे सहज पेट घेणारे पदार्थ इतस्ततः पसरलेले असतात तेथे आगीचा संभव उत्पन्न होताच किंवा आग लागताच त्याबद्दल इशारा देण्याची व लगेच आग विझविण्याचीही स्वयंचलित व्यवस्था करतात.
फटाक्यांचे, दारुगोळ्याचे कारखाने व काही प्रकारचे रसायनांचे कारखाने यांत स्फोट होण्याचा संभव असतो. स्फोट टाळण्यासाठी सुरक्षित कार्यपद्धती वापरलेली असतेच पण तीत थोडीशी जर नजरचूक झाली तरी लगेच स्फोट होतो. अशा कारखान्यात वैद्यकीय मदत जय्यत तयार ठेवलेली असते. सिगारेटींची व विड्यांची न विझवून टाकलेली थोटके व क्वचित प्रसंगी विजेच्या तारांतील मंडल संक्षेपही (शॉर्ट सर्किटही) आगीला व स्फोटांना कारणीभूत होतात.
(५) यंत्रामुळे अपघात: अपघातात सापडलेला कामगार हा अत्यंत निष्काळजीपणे वागला किंवा त्याने मूर्खपणा केला असे क्वचितच प्रसंगी घडत असले,तरी प्रत्येक वेळी तसे म्हणणे म्हणजे कारखान्यातील अनिष्ट प्रसंगाचा सर्वांत कनिष्ठ माणसाकडे दोष ढकलणे होय. यंत्रावरील अपघाताच्या बाबतीत विचार करताना अशा प्रकारचा दृष्टिकोन हा विशेष आक्षेपार्ह ठरतो. उदाहरण घ्यायचे झाले तर शक्ति-दाबयंत्राचे (यांत्रिक शक्तीने चालणाऱ्या दाबयंत्राचे) घेता येईल. अशा दाबयंत्राचे हत्यार दर मिनिटास ३० ते ४० वेळा वरखाली होते. यावर काम करणाऱ्या कामगारास नर आणि मादी मुद्रा (डाय) यांच्यामध्ये हाताने पत्रा ठेवावा लागतो. अशा वेळी वेगाने हालणाऱ्या नरमुद्रेखाली तासन्तास क्षणभरही चूक न करता, कामगाराने आपल्या हातापायांचा उपयोग करावा अशी अपेक्षा करणे योग्य नाही. यंत्रावरील अपघात टाळावयाचे असतील. तर माणसावर बंधन घालण्यापेक्षा यंत्रालाच कुडण (आवरण) घालणे हे तत्त्व स्वीकारावे लागेल. प्रचलित अधिनियमाप्रमाणे यंत्राच्या सर्व धोका असलेल्या भागांना कुडण घालून ते संपूर्णपणे बिनधोक केले पाहिजेत. दंतचक्र, पट्टे, कप्प्या, दंड, तरफा हे यंत्राचे काही धोकादायक भाग होत. त्यांना कुडण घालणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कुडण हे सर्व बाजूंनी घातले असले पाहिजे. कुडण उघडझाप करण्याच्या पद्धतीचे असेल तेव्हा ते यंत्राशी अशा प्रकारे जोडलेले असले पाहिजे की,ज्या वेळेस धोकादायक भाग हलत असतील त्यावेळेस कोणासही ते कुडण उघडता येऊ नये व जेव्हा कुडण उघडलेले असेल तेव्हा कोणासही ते यंत्र सुरू करता येऊ नये.
अशा प्रकारची योजना अंतर्भूत असलेले यंत्र साबणाच्या वड्यांची स्वयंचलित बांधणी करण्याकरिता वापरतात. मोकळ्या वड्या एका बाजूकडील सरकत्या पट्ट्यावरून यंत्रात जातात व बांधणी झालेल्या यंत्राच्या मागच्या बाजूने दुसरीकडून बाहेर पडून दुसऱ्या पट्ट्यावरून पुढे जातात. कुडणाचा वरचा भाग चालू अवस्थेत उघडला तर एका स्विचमुळे यंत्र बंद पडते. कुडणाचा बाजूचा भाग उघडला तर दुसरे स्विच तेच कार्य करते. येथे आणखी अशीही व्यवस्था करण्यात आलेली असते की, चुकून कुडण उघडल्याने यंत्र बंद पडले म्हणून कोणी ते लगेच लावले, तरीही यंत्राची मोटर पुन्हा आपोआप चालू होत नाही. ती नेहमीच्या पद्धतीनेच सुरू करावी लागते.
गोल किंवा पट्टी करवतीपासून इजा होऊ नये अशी सोय करता येते. वेगाने फिरणारे अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे) चाक किंवा केंद्रोत्सारी (मध्यबिंदूपासून बाहेर फेकणार्या) यंत्रामुळे उडणार्या कणांपासून संरक्षण मिळविण्यासाठी मजबूत पेटीसारखे कुडण वापरावे लागेल. कागद कापण्यासाठी जे गिलोटिन यंत्र वापरतात त्यात कामगारांची बोटे सापडून तुटू नयेत म्हणून प्रकाशविद्युत् (पदार्थाच्या पृष्ठावर प्रकाश टाकल्यामुळे होणार्या विद्युत् निर्मितीच्या) तत्त्वावर चालणार्या संरक्षण व्यवस्थेचा समावेश करणे रूढ होत आहे. या योजनेमध्ये अशी सोय असते की, कामगाराचा हात धोक्याच्या जागीच असेल तर गिलोटिन (सुरी) खाली येऊच शकत नाही. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने निरनिराळ्या धोक्यांच्या परिस्थितींत किंवा यंत्रांवर कशा प्रकारची संरक्षण योजना करावी या बाबतीत तपशीलवार आराखडे तयार केलेले आहेत. अशा प्रकारची संरक्षण योजना यंत्रावर एकदा बसविल्यानंतर ती चांगल्या स्थितीत ठेवणे हेही अत्यंत जरूरीचे असते. कामाच्या योग्य पद्धतीचे कामगारांना योग्य ते शिक्षणसुद्धा देण्यात आले पाहिजे.
(६) विषारी वायू आणि तरंगणारे कण : साठवणाच्या किंवा रासायनिक द्रव्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या टाक्या किंवा भुयारी गटारे यांसारख्या बंदिस्त जागांत एकदम प्रवेश करणे धोक्याचे असते. अशा जागेत एखादा कामगार निःशंक मनाने प्रवेश करतो आणि आत असलेल्या विषारी वायूमुळे बेशुद्ध पडतो. त्याला सोडविण्यास जाणारेसुद्धा असेच बेशुद्ध पडतात. शेवटी असा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचाही ठरतो. अशा ठिकाणी प्रथम शुद्ध हवा आत सोडावी नंतर रासायनिक चाचणीने विषारी वायू संपूर्णपणे बाहेर गेला किंवा नाही हे पडताळून पहावे आणि नंतरच आत प्रवेश करावा. अशा वेळीसुद्धा स्वतःभोवती दोर बांधून व दुसरे टोक बाहेर उभ्या असलेल्याच्या हातात देऊन प्रवेश करणे सुरक्षित ठरेल.
ज्या रासायनिक प्रक्रियेत धोक्याचे वायू निर्माण होतात अशी प्रक्रिया बंदिस्त जागेत घडवावी. बंदिस्त जागेत हवेचा ऋण दाब (बाहेरच्या हवेपेक्षा कमी दाब) ठेवावा म्हणजे धोकादायक वायू बाहेरच्या हवेत मिसळणार नाहीत किंवा दूषित झालेली हवा बाहेर काढून नेण्यासाठी निष्कास (हवा बाहेर फेकणाऱ्या) पंख्यांचा उपयोग करावा.
केव्हा केव्हा दूषित वातावरणात काम करण्याचे दुष्परिणाम पुष्कळ वर्षांनंतर दृष्टोत्पत्तीस येतात. रेयॉन कारखान्यातून हायड्रोजन सल्फाइड किंवा कार्बन डाय-सल्फाइड यासारखे विषारी वायू निघत असतात. मातीची भांडी बनविण्याऱ्या कारखान्यातून मातीचे कण वातावरणात उडून जात असतात. विद्युत् घटमाला (बॅटरी) तयार करणाऱ्या कारखान्यांत शिशाच्या कणांपासून धोका संभवतो. पण हे धोके काही कालांतरानेच जाणवू लागतात. या विषारी द्रव्यांमुळे होणार्या हानीसंबंधी आकडेवारी जरी दिलेली नसली, तरी त्यामुळे होणारे अपघात नेहमी अगदीच दुर्लक्षणीय नसतात व म्हणून या धोक्यांचा गंभीरपणे विचार करणे जरूर असते.
(७)इतर विविध धोके: यंत्रांच्या दोन रांगांमधील किंवा दोन यंत्रांमधील अरुंद वाट, यंत्रांचे बाहेर डोकावणारे हस्तक व मुठी, जडवस्तू, धारेच्या अथवा तीक्ष्ण कडा असलेल्या वस्तू यांच्या वापरात धोका गर्भित असतो. हातकामाची हत्यारे वापरताना जरा जरी दुर्लक्ष झाले तरी कामगाराला इजा होते. छिनीवर हातोड्याने फटका मारताना हातोडा हातावर बसतो, स्क्रू पिळताना ढिसपीस (स्क्रू ड्रायव्हर) सटकून हाताला किंवा पायाला लागते, ओतशालेत उभ्या भट्टीतील बिडाचा रस बाहेर काढताना त्यातून उडणाऱ्या ठिणग्या अंगावर उडून अंग भाजते किंवा रसाची किटली भरून नेताना रस बाहेर सांडतो व मागून येणाऱ्याचा त्याच्यावर पाय पडून भाजतो, रासायनिक कारखान्यात अम्ले वगैरे हातापायावर उडतात, मिश्रणे करताना चुकून स्फोट होतो. ही विविध प्रकारची धोक्याची आणखी उदाहरणे आहेत. योग्य प्रकारची काळजी घेऊन व आखून दिलेल्या पद्धतीनुसार काम करून अशा प्रकारचे अपघात टाळणे शक्य असते.
(८)अव्यवस्थितपणा : कारखान्यात अव्यवस्थितपणामुळे अनेक धोके उद्भवतात व अपघातही होतात. यंत्रांची व अन्य साधनांची अयोग्य मांडणी, ये-जा करण्याच्या आखलेल्या मार्गात अडथळे आणणे, तेल व रसायने वाटेवर सांडणे वगैरे अव्यवस्थितपणाची अनेक उदाहरणे देता येतील. एकंदर अपघातांत अव्यवस्थितपणामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाण फारच मोठे आहे. पण जरूर ती काळजी घेतल्यास या अपघातांचा धोका सहज टाळता येण्यासारखा आहे.
अपघातांच्या कारणांची चिकित्सा: कारखाने, धोके व अपघात या तीन शब्दांचा एक समुच्चय (गट) करून त्यांचा विचार करणे म्हणजे कारखान्यांतील काम धोकेदायक असतेच व अपघात होणारच असा गैरसमज करून घेणे होय. एखाद्या अनियंत्रित व अनियोजित घटनेत एखादी वस्तू, द्रव्यकिंवा किरणोत्सर्ग (भेदक कण वा किरण बाहेर फेकणे) यांच्या क्रिया-प्रतिक्रियांमुळे माणसाला दुखापत झाली तर त्या घटनेस अपघात असे म्हणता येईल. अपघाताची अशी व्याख्या केल्यास मनुष्याच्या साध्या दैनंदिन व्यवहारात देखील, जर ती अनियंत्रित असली तर धोके व अपघात आढळतील. परंतु नियंत्रित योजना केल्यास अजस्त्र यंत्रे चालविणे किंवा मोठाली धरणे बांधणे सुद्धा धोकाविरहित करता येतील. यावरून कारखान्यांत अपघात होणारच हा दृष्टिकोन चूक आहे हे कळून येईल.
अपघाताचे तात्कालिक कारण शोधून काढणे हे सोपे असले, तरी असा अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी मूळ कारण शोधून काढणे हे अतिशय महत्त्वाचे असते. परंतु ही गोष्ट तितकीच अवघडही आहे. प्रत्येक अपघाताच्या मागे निरनिराळ्या घटनांची एक मालिकाच असते. उदा., यंत्रशालेत (वर्कशॉपमध्ये) यांत्रिक हत्यारावर एका वस्तूचे यंत्रण (तासण्याची क्रिया) चालू असता ती वस्तू यंत्रावरील शेगड्यातून सटकून दूर फेकली गेली व दुसर्या कामगाराला लागून तो जायबंदी झाला. या अपघाताचे तात्कालिक कारण म्हणजे शेगड्यात ती वस्तू नीट पकडली गेली नाही हे होय. पण ती का नीट पकडली गेली नाही, तर कामगाराच्या निष्काळजीपणामुळे. निष्काळजीपणा का घडला, तर वस्तू शेगड्यात बसवताना हा कामगार दुसऱ्या माणसाशी बोलत होता व त्यामुळे त्याचे हातातील कामाकडे दुर्लक्ष झाले. दुसरा माणूस तेथे का आला, तर कामगाराच्या घरी कोणी आजारी झाल्याबद्दलचा निरोप सांगायला. तो माणूस त्यावेळी तेथे कसा येऊ शकला, तर त्याला कारखान्यात शिरण्यास कोणी प्रतिबंध केला नाही म्हणून. प्रतिबंध का केला गेला नाही तर शिस्त नव्हती म्हणून इत्यादी. ही कारणपरंपरा आणखीही लांबू शकेल. सारांश, ह्या सर्व घटनांचे मूळ दूरदर्शीपणा व आकलनशक्ती यांचा अभाव यांतच सर्वसाधारपणे दिसून येते.हाइन्रिक यांच्या मते प्रत्येक दुखापतीच्या मागे चार कारणे असतात. ही कारणे म्हणजे (१) प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, (२) व्यक्तीची चूक, (३) धोकादायक कृत्य व (४) अपघात. यांतील कोणतेही एक कारण टाळता आले तर दुखापत टाळता येईल.
सामाजिक परिस्थिती आणि आनुवंशिक गुण-दोष केव्हाकेव्हा माणसाला बेजबाबदार, दुराग्रही व लोभी बनवितात. यांमुळे माणूस निष्काळजी, रागीट व उदास बनतो. या व्यक्तिगत दोषांमुळे यंत्र चुकीच्या पद्धतीने हाताळणे, कुडणे काढून टाकणे, बालिश खेळ करणे वगैरे प्रकारची धोकादायक कृत्ये तो करतो. अशाप्रकारे पहिल्या तीन कारणांमुळे कुणालातरी दुखापत होईल अशी परिस्थिती म्हणजेच धोका उद्भवतो. उदा., वरीलप्रमाणे एखाद्या वेळेला यंत्राचा एखादा भाग मोडून दूर उडून जातो किंवा उंचावरून वस्तू खाली पडते किंवा कोणीतरी घसरून पडतो वगैरे. अशी अपघात होण्यासारखी परिस्थिती ३३० वेळा निर्माण झाली असता, त्यातील ३०० प्रसंगी कसलीही दुखापत होत नाही, २९ प्रसंगी बारीक सारीक दुखापत होते व एक वेळा गंभीर स्वरूपाची दुखापत होते, असा एका संशोधनाच्या आधारे अंदाज बांधण्यात आलेला आहे. परंतु वरील पहिल्या तीन कारणांवर नियंत्रण ठेवता आले तर दुखापत होण्याची परिस्थिती म्हणजेच धोका व पुढे अपघात टाळता येईल.
जरूर ती बुद्धिमत्ता, मानसिक अनुरूपता व हस्तकौशल्य असलेल्या योग्य कामगाराची निवड करून व त्याला शिक्षण देऊन त्याच्यातील बेजबाबदारपणा, उद्धटपणा, संतापी मनोवृत्ती वगैरे दुर्गुणांचे निर्मूलन करता येईल. तसेच त्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते प्रशिक्षण देऊन त्याला चांगल्या सवयी लावता येतील. अशा सवयी जर त्याला लागल्या तर तो कोणत्याही प्रकारचे काम धोकादायकपणे करणार नाही किंवा धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. असे झाल्यास अपघातांचे उच्चाटन होईल, म्हणजेच कामगार सुरक्षित राहील. सर्वसाधारणपणे अपघात टाळण्यासाठी तात्कालिक कारणांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, त्यालाच वर धोकादायक कृत्य असे म्हटले आहे. हे कारण जर टाळता आले तर अपघात व दुखापत ही दोन्हीही टाळता येतील.
कामगाराच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त कामाच्या ठिकाणचे शांत व प्रसन्न वातावरण, कामाला जरूर तेवढा पण डोळ्यांना त्रास न होईल असा प्रकाश, यंत्रे, भिंती वगैरेंना आल्हाददायक रंग, चांगले संवातन (वायुवीजन) इ. अपघातांचे धोके कमी करण्यास साहाय्यकारी होतात.
अपघातांमुळे होणारे आर्थिक नुकसान: अपघातामुळे कामगाराचे, कारखान्याचे आणि पर्यायाने देशाचे किती नुकसान होते हे पहाणे उद्बोधक ठरेल. अपघातामुळे कामगारास दुखापत तर होतेच पण त्याचे खूप आर्थिक नुकसानसुद्धा होते आणि त्याचे एकंदर जीवन कष्टमय बनते. कायद्याने मिळालेल्या नुकसान भरपाईने त्याच्या मनातील समाजाबद्दलची कटुता कमी होत नाही. ज्या कारखान्यांत अपघात होतात तेथे चालू असलेल्या कामात अपघातांमुळे व्यत्यय येतो. कुशल कामगारास अपघात झाल्यास नव्या माणसास शिकवून तयार करावे लागते. यंत्रे व इतर सामग्रीची मोडतोड झाल्यास ती दुरुस्त होईपर्यंत त्या यंत्राचे काम बंद राहते. ज्या ठिकाणी अपघात होतो त्याच्या आजूबाजूचे कामगार आपले काम सोडून अपघाताच्या ठिकाणी जमा होतात व अपघात पाहिल्यानंतर या कामगारांचे मनोधैर्य खचण्याची शक्यता असते. शिवाय जखमी कामगाराकडे लक्ष देणे भाग असल्यामुळे पैसा आणि वेळ खर्ची पडतो. अपघातासंबंधीचे कागदपत्र तयार करावे लागतात ते निराळेच. या सर्व गोष्टी अपघातामुळे होणारे नुकसान ठरविण्यासाठी लक्षात घ्याव्या लागतात. अपघातामुळे होणारे असे अप्रत्यक्ष नुकसान साधारणपणे प्रत्यक्ष नुकसानीच्या म्हणजेच कामगाराला द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईच्या तीन ते चारपट असते असा अंदाज आहे.
अमेरिकेतील नॅशनल सेफ्टी कौन्सिलच्या मते १९६५ मध्ये २०·५ लाख अपघातांत, ६०० कोटी डॉलर एकूण नुकसान झाले. अपघातामुळे बुडालेला कामगारांचा रोजगार १३५ कोटी डॉलर आहे. राहिलेल्या ४६५ कोटी डॉलरमध्ये वैद्यकीय मदत, विमा खर्च, यंत्रसामग्रीची दुरुस्ती, चालू कामात आलेल्या व्यत्ययामुळे झालेले नुकसान, इतर कामगारांचा फुकट गेलेला वेळ इ. गोष्टींचा समावेश होतो. यावरून असे दिसते की, मजुरीचे नुकसान आणि इतर नुकसान यांचे प्रमाण १ : ३·५ असे आहे.
महाराष्ट्रात १९६४ मध्ये झालेल्या औद्योगिक अपघातांमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज खाली दाखविण्याचा प्रयत्नकेलेला आहे. यामध्ये रेल्वे कारखान्यांच्या आकडेवारीचा समावेश नाही :
एकंदर अपघात (मृत्यू वगळून) |
… |
४४,५०० |
त्यामुळे गैरहजेरी (कामगार-दिवस) |
… |
४,२६,००० |
या दिवसांचे बुडालेले कामगारांचे वेतन |
… रु. |
२४,५८,७०० |
मृत्युपर्यवसायी अपघात |
… |
१०५ |
त्याची अधिनियमानुसार नुकसान भरपाई |
…रु. |
७,३५,००० |
एकूण प्रत्यक्ष नुकसान |
…रु. |
३१,९३,७०० |
अप्रत्यक्ष नुकसान (प्रत्यक्ष नुकसान × ३.५) |
…रु. |
१,११,७८,००० |
एकूण नुकसान |
…रु. |
१,४३,७१,७०
|
अपघातांमुळे सु. १·४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असे म्हटले तरी खरे नुकसान याहून अधिक असण्याची खूप शक्यता आहे. अपघात कमी करून या नुकसानीतील थोडा भाग जरी आपण वाचवू शकलो, तरी तो पैसा कामगारांच्या व पर्यायाने समाजाच्या कल्याणासाठी वापरता येईल [→ अपघात, औद्योगिक].
धोके टाळण्याच्या साधनांची काही उदाहरणे : (अ) उद्योगांसाठी वा वाफ एंजिनासाठी लागणारी पाण्याची वाफ बनविण्याकरिता जे बाष्पित्र (बॉयलर) वापरतात त्यात वाफेचा दाब मर्यादेबाहेर वाढला, तर बाष्पित्राचा स्फोट होऊन माणसांना इजा होते व आर्थिक नुकसानही होते. दाब वाढण्याचे कारण वाफेचा वापर थांबून जळण पेटत राहणे हे असते. बाष्पित्रात पाणी कमी झाले तर आतील भट्टीच्या कवचाला झोळ येतो व ते निकामी होते. बाष्पित्रावर देखरेख करणार्या माणसाचे जर लक्ष असेल तर बाष्पित्रात दाब वाढणार नाही व पाण्याची पातळीही धोका पोहोचण्याइतकी खाली जाणार नाही. पण माणसाचे कदाचित दुर्लक्ष झाले, तरीही अपघात होऊ नये म्हणून आ. १ मध्ये दाखविलेली स्वयंचलित उच्च दाब व नीच जलपृष्ठाची सूचना देणारी जोड-झडप वापरतात.
आ. १ आ मध्ये दोन झडपांचाजोड थोडा मोठा काढून दाखविला आहे. (१) ही प्रत्यक्ष झडप असून ती (२) या तिच्या बैठकीवर बसते. या झडपेच्या पोटात (३) ही अर्धगोलाकृती दुसरी एक झडप असून तिला (१) मध्येच बैठक आहे. (३) या अर्धगोल झडपेला खाली एक (४) हा गज लावलेला असून त्याच्या टोकाला (५) हे वजन लावलेले आहे. बाष्पित्राच्या आत (६) ही एक तरफ असून तिचा (७) हा टेकू आहे. तरफेच्या उजव्या टोकाला (८) हे एक मातीचे वजन लावलेले असून ते आकृतीतल्याप्रमाणे पाण्यात बुडून निलंबित (लोंबकळत) राहील इतके वजन तरफेच्या डाव्या टोकाला लावले आहे. पाण्याची पातळी खाली जाऊन (८) हे वजन मोकळे झाले तर डावीकडील वजन समतोल राखू शकत नाही व (८) खाली जाते. (४) या गजाला तरफेच्या थोडे वर एक कडे असते. (८) च्या खाली जाण्यामुळे तरफ सव्य (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) वळते व तिला काढलेले कान कड्याद्वारे (३) या झडपेला वर उचलतात. त्याबरोबर तेथून वाफ बाहेर पडू लागते व त्यामुळे तेथील कर्मचाऱ्याचे तिकडे लक्ष वेधून तो जरूर ते उपाय योजतो. वजन (५) व झडपेच्या कोशाच्या बाहेरील तरफेला लावलेले वजन मिळून वाफेच्या दाबाचे नियंत्रण साधतात.
ही झडप लँकॅशायर व कॉर्निश जातीच्या बाष्पित्रात उपयुक्त असते. या झडपेला शिटी लावली तर बाहेर पडणारी वाफ शिटीतून जाऊन धोक्याची आवाजी सूचनाही देऊ शकते.
(आ) यंत्रातील दोन फिरत्या रुळांच्या सांधीत (फटीत) जेव्हा एखादी चादरीसारखी वस्तू भरावयाची असते, तेव्हा तसे करताना सांधीत हाताची बोटे सापडून ती चेंगरण्याचा संभव असतो. माणसाचा हात कुठपर्यंत जावा याची सुरक्षित मर्यादा प्रयोगाने ठरवून आखल्यावर हात त्या मर्यादेपलीकडे जाणार नाही. पण जाऊ लागल्यास यंत्र तत्काल बंद व्हावे अशी स्वयंचलित व्यवस्था आ. २ मध्ये दाखविली आहे. चित्रात कामगार व समोरचा रुळ यांमध्ये एका ठिकाणी एक (रुळांना समांतर) दांडी बसविली असून तिचा यंत्राच्या चालनाशी संबंध जोडलेला आहे. कामगार यंत्रात वस्तू भरीत असता जर त्याच्या शरीराचा दाब या दांडीवर पडला, तर ती दांडी सरकून चलित्र (विद्युत् मोटर) बंद करील व यंत्रही बंद पडेल. अशा रीतीने कामगाराला होणारा धोका टळेल.
(इ) एखाद्या पदार्थाची चादर, उदा., रबराची किंवा प्लॅस्टिकची दाबून पातळ करून जर रुळावर गुंडाळायची असेल, तर रुळाखालील पाट व रूळ यांच्या बारीक सांधीत चादरीचे टोक देताना अशीच बोटे चिमटण्याचा धोका असतो. बोटे पुढे नेण्याची सुरक्षित मर्यादा यंत्रावर दाखविलेली असतेच. पण दुर्लक्षाने जर बोटे जास्त पुढे जाऊ लागली तर यंत्र तत्काल बंद पडावे यासाठी आ. ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्था करता येते. पाट व रुळ यांच्या सांधीसमोरून रुळालासमांतर असा एक प्रकाशाचा किरण सोडलेला असतो व तो एका प्रकाशविद्युत् घटावर (प्रकाशाच्या क्रियेने विद्युत् स्थितीत बदल होणाऱ्या घटावर) पडतो. घटावर किरण पडत असेपर्यंत यंत्र चालू राहते. पण हात सुरक्षित मर्यादेच्या पुढे येऊन जर प्रकाश किरण तुटला, तर लगेच यंत्र बंद पडेल अशी स्वयंचलित व्यवस्था असते. विविध यंत्रांच्या बाबतीत येणारे धोके टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनीय उपकरणांवर आधारलेल्या स्वयंनियंत्रक योजना आता मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहेत.
ऐच्छिक सुरक्षितता चळवळ : इंग्लंड-अमेरिकादी पाश्चात्त्य प्रगत देशांत या चळवळीची सुरुवात जरी १९१३ पासून झाली, तरी तिला जगन्मान्यता मात्र पहिल्या महायुद्धानंतरच मिळाली. व्हर्सेलच्या कराराच्या तेराव्या भागाच्या प्रास्ताविकात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, कामगारांचे अपघातांपासून संरक्षण करणे हेही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन स्थापन करण्यामागे एक उद्दिष्ट आहे. अमेरिकेत १९१३ मध्ये नॅशनल सेफ्टी कौन्सिल स्थापन करण्यात आले. ब्रिटनमध्ये ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडंट्स’ ही संस्था पहिल्या महायुद्धानंतरच महत्त्वाचे कार्य करू लागली.
सर्वसाधारण अपघात टाळण्यासाठी १९३१ मध्ये प्रथमच भारतात ‘सेफ्टी फर्स्ट ॲसोसिएशन’ स्थापले गेले. औद्योगिक अपघात हा त्या मंडळाच्या कार्याचा एक विभाग होता. मुंबई राज्याने नेमलेल्या पुरूषोत्तम कानजी समितीच्या १९५० च्या अहवालात म्हटले आहे की, कारखाने अधिनियम व त्याखाली करण्यात आलेली नियमावली यांचे जरी पूर्ण पालन केले, तरी अपघातांचे आकडे फारसे कमी झालेले दिसून येणार नाहीत, असे अनुमान केल्यास ते फारसे चुकीचे ठरणार नाही. कारखाने अधिनियम हे कामगारांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यांसाठी कमीत कमी काय केले पाहिजे ते सांगतात. पण कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कमीत कमी ध्येय गाठण्यासाठीच फक्त अधिनियमांचे पालन करून भागणार नाही, तर त्यासाठी प्रत्येक संबंधीत व्यक्तीने आपण होऊन जास्तीत जास्त प्रयत्न करणे जरूर आहे. अशा प्रकारची शिफारस मुंबई सरकारकडून स्वीकारली गेल्यानंतर मुंबईत १९५५ मध्ये सरकारी साहाय्याने एक खाजगी औद्योगिक सुरक्षितता मंडळ (कौन्सिल फॉर इंडस्ट्रियल सेफ्टी) स्थापण्यात आले. सुरुवातीच्या प्राथमिक अडचणींनंतर हे मंडळ सध्या कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधाने प्रचार करण्याचे व शिक्षण देण्याचे कार्य जोरात करीत आहे. हे मंडळ खाजगी स्वरूपाचे असून नफा न घेता चालविले जाते. हे मंडळ कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधाने प्रगती करण्यासाठी कार्यरत आहे. असेच एक अखिल भारतीय मंडळ स्थापावे अशी शिफारस १९६५ च्या डिसेंबरमध्ये ‘प्रेसिडंट्स कॉन्फरन्स ऑन इंडस्ट्रियल सेफ्टी’ ने केली आहे.
प्रत्येक कारखान्यात एक सुरक्षितता समिती नेमल्यास अपघात टाळण्यास बरीच मदत होईल. ही समिती पुढील कामे करू शकेल : (१) अपघात टाळण्यासाठी उपाय योजणे, (२) कारखान्याची तपासणी करणे, (३) अपघाताची चौकशी करणे व अपघाताची पुनरावृत्ती टाळण्याचा उपाय सुचविणे, (४) कामगारांसाठी सूचना पत्रिका तयार करणे व वाटणे, (५) सुरक्षितता-चित्रे, फलक, घोषणा या संबंधाने निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करणे वगैरे. थोडक्यात, कामगारांसमोर सुरक्षिततेच्या सवयी सतत ठेवण्यासाठी प्रचार करीत रहाणे हे सुरक्षा समित्यांचे कार्य होय. मुंबईच्या काही कारखान्यांतून अशा समित्यांनी, ३०—४० लक्ष कामगार-तासांत एकही अपघात न होऊ देण्याचे यश मिळविले आहे.
संदर्भ : 1. Annual Reports on the Administration of the Factories Act in the State of Bombay and
Maharashtra 1947-64.
2. Handley, W. Industrial Safety Handbook, London, 1969.
3. National Safety Council, Accident Facts, Chicago, 1965.
4. Statistics of Factories, Labour Bureau, Ministry of Labour and Employment, Government
of India, 1947-49.
गडकरी, ना. ल. ओगले, कृ. ह.
“