ओरुरो : बोलिव्हियातील ओरुरो प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,१९,७०० (१९७० अंदाज). १५९५ मध्ये चांदीच्या खाणकामाकरिता निर्माण झालेले हे शहर, समुद्रसपाटीसून सु. ३७०० मी. उंचीवर वसलेले आहे. एकोणिसाव्या शतकात चांदीचे उत्पादन घटल्याने आणि शुष्क, थंड प्रदेशातील वैराण जीवनामुळे हे नामशेषच झाले होते. अलीकडे चांदीचे उत्पादन पुन्हा सुरू झाले शिवाय तेथेच वुल्फ्रॅम, तांबे आणि मोठ्या प्रमाणावर कथील सापडल्याने यास वैभव प्राप्त झाले असून, आता बोलिव्हियातील शहरांत त्याचा चवथा क्रमांक लागतो. रेल्वे आणि सडका यांचे हे केंद्र आहे.

शहाणे, मो. ज्ञा.