पीसा : झुकत्या मनोऱ्यासाठी जगप्रसिध्द असलेले इटलीतील ऐतिहासिक शहर. ज्योतिषशास्त्रज्ञ व भौतिकीविद गॅलिली गॅलिलीओ याचे हे जन्मस्थान. हे आर्नो नदीच्या दोन्ही तीरांवर लीव्होर्नोच्या ईशान्येस १६ किमी. व फ्लॉरेन्सच्या पश्चिमेस ७२ किमी. आहे. लोकसंख्या १,०३,४७९ (१९७६ अखेर). इटलीतील लोहमार्गांचे एक महत्त्वाचे केंद्र. काच, वस्त्रे, मृत्स्नाशिल्पे, औषधे, रेल्वेसामग्री, सायकली इ. निर्मितिउद्योगांमुळे पीसाची भरभराट झाली आहे.

पीसा हे प्रथम लिग्यूरियन वसाहत म्हणून उदयास आले. त्यावर इट्रुस्कनांचाही अंमल होता. रोमनांनी पीसा ताब्यात घेतल्यावर इ. स. पू. ८९ मध्ये त्याचा लष्करी तळ व महत्त्वाचे नाविक ठाणे म्हणून विकास करण्यात आला. रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर गॉथ, बायझंटीन व लाँबर्ड यांचा क्रमाक्रमाने पीसावर अंमल राहिला. नवव्या शतकात व्हेनीशिअन व सारासेन आक्रमणांविरुध्द पीसाला तोंड द्यावे लागले. याच काळात संस्था, व्यापार व नौसामर्थ्य यांचा या नगरराज्यात विकास झाला. नंतरची सु. तीन शतके पीसाची मुस्लिमांविरुध्द अनेक युध्दे झाली. तेराव्या शतकात पीसाने आपले स्थान सार्डिनियात दृढमूल केले. तथापि अंतर्गत सत्तास्पर्धेमुळे १२९९ मध्ये पीसाला कॉर्सिका व सार्डिनिया यांच्यावरील आपले हक्क सोडून द्यावे लागले. चौदाव्या शतकात व्हेनिस, जेनोआ व बार्सिलोना यांच्याशी पीसाला फार मोठी स्पर्धा करावी लागली. तथापि याच शतकाच्या पूर्वार्धात कला व संस्कृती या दोहेंमध्ये पीसाने विकासाचे परमोच्च टोक गाठले. १४०६ मध्ये पीसा हे फ्लॉरेन्सच्या हाती पडले व त्याचे पूर्वीचे लोकरनिर्मितीचे, तसेच व्यापाराचे केंद्र म्हणून असलेले महत्त्व ( संपले. मेदीची राजवटीच्या काळात मात्र (चौदावे ते सोळावे शतक) पीसाला पूर्ववैभव प्राप्त होण्याची संधी लाभली. १३४३ मध्ये स्थापन झालेल्या पीसा विद्यापीठाचा दर्जा वाढविण्याच्या कामी मेदीची राज्यकर्त्यांनी फार परिश्रम घेतले. निसर्गविज्ञानक्षेत्रात ह्या विद्यापीठाची विशेष ख्याती झाली. गॅलिलीओ, तत्त्ववेत्ता व वनस्पतिशास्त्रज्ञ आंद्रेआ छेझाल्पीनो (१५१९–१६०३), शारीरविज्ञ गाब्रिएले फालॉप्यो (१५२३–६२) तसेच मार्झेल्लो मालपीगी (१६२८–९४) इ. अध्यापक लाभल्यामुळे पीसा विद्यापीठ वैज्ञानिक अभ्यासाचे केंद्र बनले. १५०९ मध्ये पीसाला पुन्हा एकदा फ्लॉरेन्सच्या अंमलाखाली जावे लागले. १८६० मध्ये ते तस्कनीसह सार्डिनिया राज्यामध्ये सामील करण्यात आले व पुढे ते इटलीच्या राज्यात समाविष्ट झाले. दुसऱ्या महायुध्दात बाँबवृष्टीमुळे पीसाचे अतोनात नुकसान झाले.

पीसाच्या जुन्या भागात कॅथीड्रल चौक असून त्यामध्ये जगप्रसिध्द कलात्मक वास्तू आहेत. पीसन–रोमनेस्क शैलीमधील संगमरवरी कॅथीड्रलच्या बांधकामास १०६३ मध्ये प्रारंभ झाला. तेराव्या शतकात ते पूर्ण झाले. या कॅथीड्रलमध्ये जोव्हान्नी पिसानो याचे शिल्पांकित संगमरवरी व्यासपीठ, तसेच आंद्रेआ देल सार्तो, जोव्हान्नी चीमाबूए इत्यादींच्या कलाकृती आहेत. कॅथीड्रलचा घंटामनोरा हा ‘पीसाचा झुकता मनोरा’ म्हणून जगद्विख्यात आहे. कॅंपो सांतो या आयताकृती स्मशानभूमीच्या भिंती चौदाव्या-पंधराव्या शतकांतील कलाकारांच्या भित्तिलेपचित्रांनी विभूषित असून त्यांपैकी ट्रायम्फ ऑफ डेथ ही भित्तिलेपचित्रमालिका उल्लेखनीय आहे. या सर्व कलाकृतींचे तसेच ‘सांता मारीआ देल स्पीना’ यांसारख्या उत्कृष्ट चर्चवास्तूंचे दुसऱ्या महायुध्दात अतिशय नुकसान झाले. त्यांपैकी बऱ्याच कलाकृतींचे नंतर पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. कॅव्हल्येरी चौकात सान स्टेफानो चर्च आणि दोन सुंदर राजप्रासाद असून त्यांचे वास्तुकल्प व्हाझारी (१५११–७४) या कलाकाराने तयार केले. याच भागात मेदीची राजप्रासाद आहे. पीसाच्या राष्ट‌्रीय संग्रहालयात तस्कन संप्रदायाच्या कलाकारांच्या उत्तमोत्तम कलाकृती आहेत.

पीसा शहरातील अनेक प्रेक्षणीय वास्तूंपैकी झुकता मनोरा जगातील एक आश्चर्य मानतात. त्याची उंची ५४·५५ मी. व व्यास १५·८ मी. आहे हा मनोरा ५·१८ मी. (म्हणजेच लंबापासून ५०) झुकलेला असून दरवर्षी त्याचे कलणे ०·०२५ मीटरचा चौथा भाग एवढे होत असते. पीसा येथील बोनॅनो व इन्सब्रुक येथील विल्यम ह्या दोन वास्तुशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या मनोऱ्याच्या बांधकामास ११७४ मध्ये प्रारंभ झाला. रोमनेस्क या शोभादायक वास्तुशैलीमध्ये मनोऱ्याचा अभिकल्प तयार करण्यात आला होता. कॅथीड्रलचे घंटाघर म्हणून हा मनोरा बांधण्याचा उद्देश होता परंतु कॅथीड्रलचे बांधकाम पन्नास वर्षे अगोदर पूर्ण झाले होते. मनोऱ्याचे अर्धेअधिक बांधकाम झाले, तोच मनोऱ्याच्या पायाकडील एका बाजूची जमीन खचू लागली व मनोरा त्या बाजूला कलला. यामुळे पुढे शंभर वर्षे याचे बांधकाम स्थगित करण्यात आले. १२७५ मध्ये वास्तुविशारदांनी या झुकावाची भरपाई करण्यासाठी एक योजना आखली. मनोऱ्याचा तिसरा व पाचवा असे दोन मजले इतर मजल्यांच्या सरळ रेषेबाहेर (मनोऱ्याच्या खऱ्या लंबरेषेबाहेर) उभारण्यात आले. यायोगे मनोऱ्याचा गुरूत्वबिंदू बदलविण्याचा उद्देश होता. हे काम १२८४ मध्ये पूर्ण करण्यात आले आणि १३५० मध्ये सर्वांत वरचा व अखेरचा मजला मूळ लंबरेषेला सोडून उभारण्यात आला व वास्तू पूर्णपणे बांधून झाली.

झुकावामुळे मिळालेल्या प्रसिध्दीखेरीज मनोऱ्यावरील अप्रतिम वास्तुशिल्पासाठीही तो जगभर प्रशंसेस पात्र ठरला आहे. आठ मजली मनोरा शुभ्र संगमरवरी असून शोभिवंत कमानी आणि रंगीबेरंगी संगमरवराचे जडावकाम यांनी युक्त आहे. तळमजला पंधरा स्तंभांनी युक्त असून सहा मजल्यांवर प्रत्येकी एक असे सहा कमानमंडप आहेत. प्रत्येक कमानमंडप ३० स्तंभांवर आधारित असून सर्वांत वरती बारा स्तंभांनी आधारलेले अत्यंत शोभिवंत घंटाघर आहे. मनोऱ्याला आतून वरपर्यंत जाण्यास २९६ पायऱ्या असून वरच्या टोकाला दृश्यासन आहे. मनोऱ्याचा प्रतिवर्षी वाढणारा झुकाव थोपविण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. १९२० पासून मनोऱ्याच्या पायामध्ये काँक्रीटची भर घालून हा दोष दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तथापि अद्याप हा झुकाव थांबलेला नाही. (पहा : मराठी विश्वकोश : २, चित्रपत्र ३९).

गद्रे, वि. रा