एराइडस : फुलांच्या सौंदर्याबद्दल व कधीकधी सुगंधाबद्दल प्रसिद्ध असलेल्या ऑर्किड वनस्पतींच्या [→ ऑर्किडेसी] कुलातील एका वंशाचे हे नाव असून यात समाविष्ट असलेल्या सु. ३०–४० जातींचा प्रसार भारत, इंडोचायना, मलेशिया (न्यू गिनी वगळून), जपान इ. प्रदेशांत आहे. महाराष्ट्रात (कोकण, महाबळेश्वर इ.) तीन जाती आढळतात. ग्रीक भाषेत एराइडस या संज्ञेचा अर्थ वायवी वनस्पती असा आहे व ते नाव ह्या जाती अपिवनस्पती असल्याने दिले गेले आहे. समशीतोष्ण कटिबंधात त्या उष्ण पादपगृहात (काचगृहात) वाढवतात.
यांच्या पर्णयुक्त खोडावर पानांच्या दोन रांगा असून पाने रेषाकृती किंवा शूलाकृती, जाड व मांसल असतात. त्यांचा तळभाग (उरलेला पडून गेल्यावरही) खोडाला सतत वेढून राहतो. महाराष्ट्रातील जातींना मेमध्ये फुले येतात ती विपुल व आकर्षक असून बहुधा ती बाजूस व खाली वळलेल्या साध्या किंवा संयुक्त मंजरीवर येतात. संदले प्रदलाएवढी व पसरट बाजूच्यापेक्षा वरचे संदल मोठे, बाजूची तळास जुळलेली व स्तंभास चिकटलेली प्रदले वरच्या संदलासारखी ओष्ठ उभा किंवा वाकलेला, शुंडिका लहान, वाकडी व पोकळ परागपुंज दोन [→ फूल]. महाराष्ट्रातील तीन जातींपैकी एराइडस क्रिस्पमची फुले सुगंधी व पांढरी असून त्यांवर गुलाबी छटा असते ए. मॅक्युलोजमच्या फुलांना वास नसतो, पाकळ्या गुलाबी असून त्यांवर गडद रंगाचे ठिपके असतात ए. रॅडिकोसमच्या पाकळ्या फिकट जांभळट गुलाबी व त्यांवर गर्द ठिपके असतात. ए. ओडोरॅटम या चीन व भारत येथे आढळणाऱ्या जातीची फुले मोठी, सुगंधी, पांढरी असून त्यांवर टोकास किरमिजी ठिपके असतात.
परांडेकर, शं. आ.
“