पांगारा : पांगारा हे नाव एरिथ्रिना  वंशातील अनेक वृक्षांना लावलेले आढळते. या वंशातील सु. ८ जाती मूळच्या भारतातील असून सु. १० जाती आयात केलेल्या आढळतात. बहुतेक सर्व आकर्षक फुलांचे वृक्ष असून शोभेकरिता त्यांची लागवड केलेली आढळते त्यांच्यापासून हिरवे खतही बनवितात. मुळे, साल व बिया यांपासून कीटकनाशके तयार करतात. काहींची खोड आणि मुळे चेचून मासे गुंगविण्याकरिता वापरतात. ‘हाई तुंग पी’ हे चिनी द्रव्य सर्व जातींच्या सुक्या सालीपासून मिळते ते स्टॅफिलोकॉकस ऑरियस  या सूक्ष्म जंतूविरुद्ध जंतु-वृद्धिरोधक म्हणून उपयुक्त आहे.

लाल पांगारा : (रक्त मंदार हिं. फराद, पांगारी, दादप, मंदार गु. बांगारो क. हळीवन, हालिवाळ सं. मंदार, रक्तपुष्पा, पारिजात, परिभद्रा इं. इंडियन कोरल ट्री, इंडियन कोरल बीन, मोची वुड लॅ. एरिथ्रिना इंडिका, ए. व्हॅरिएगेटा, प्रकार ओरिएंटॅलिस कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). हा सुंदर वृक्ष सु. १८ मी. उंच, काटेरी, पानझडी, शिबांवंत (शेंगा येणारा), मध्यम आकारमानाचा व जलद वाढणारा असून समुद्रकिनाऱ्यावरील जंगलात निसर्गतः आढळतो तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वा बागेत, शोभेकरिता किंवा शेतांच्या कुंपणाकडेने लावलेलाही आढळतो. जावा, पॉलिनेशिया, ब्रह्मदेश, अंदमान व निकोबार बेटे, पाकिस्तान व भारत इ. प्रदेशांत त्याचा प्रसार विशेषतः पानझडी जंगलांत भरपूर आहे. या वृक्षांची साल गुळगुळीत, पातळ करडी किंवा पिवळट असून पातळ ढलप्यांनी सोलून जाते. लहान फांद्यांवर तीन-चार वर्षे टिकून राहणारे, काळपट, शंकूसारखे काटे येतात. पाने संयुक्त त्रिदली, एकाआड एक, पातळ व झडणारी असून प्रत्येक दल १०–१५ सेंमी. लांब व तितकेच रुंद असते. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात सु. ५–७ सेंमी. लांब, पतंगरूप, लाल पोवळ्यासारखी (त्यावरून इंग्रजी नाव व लॅटिन वंशनाव ही पाडली आहेत), मोठी, बिनवासाची फुले सु. १०–३० सेंमी. लांब मंजऱ्यांवर फांद्यांच्या टोकास येतात. फुलात भरपूर मध असल्याने अनेक पक्षी व भुंगे त्याभोवती सदैव गर्दी करतात व ⇨परागण (पराग एका फुलातून दुसऱ्या नेणे) घडवून आणतात. फुलांची सर्वसाधारण संरचना ⇨ अगस्त्याच्या [किंवा गोकर्णाच्या ⟶ गोकर्ण-२] फुलाप्रमाणे अथवा ⇨ लेग्युमिनोजी कुलातील पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्या प्रमाणे असते. संवर्त टोकाशी पंचदंती, महाछदासारखा लालसर परंतु प्रदले (पाकळ्या) तळापर्यंत चिरलेला, गर्द लाल, ५–७ सेंमी. लांब आणि केसरदले दहा व लाल असतात [⟶ फूल]. शिबा (शेंगा) १३–३० सेंमी. लांब गोलसर, गाठाळ, काळी असून मे-जुलैमध्ये पक्व होते त्यात सु. ६–८ पिंगट किंवा गर्द लाल, आयत, गुळगुळीत बिया असतात. नवीन लागवड बिया किंवा कलमे (१·८ मी. x ७·५ सेंमी.) लावून करतात. पांढऱ्या फुलांचा एक प्रकार आणि चित्रित पानांचा दुसरा प्रकार हे लागवडीत आहेत. मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल व जाईजुई इत्यादींना आधार देण्यास आणि चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता ही झाडे लावतात. पाने गुरांना खाऊ घालतात. तसेच त्यांचे खतही बनवितात. पाने सारक (पोट साफ ठेवणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), कृमिघ्न (जंत वगैरे मारणारी), आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) आणि दुग्धवर्धक असतात. सांसर्गिक रोगातील सांधेदुखीवर व गाठीवर पाने बाहेरून लावतात. कानदुखीवर व दातदुखीवर पानांचा ताजा रस गुणकारी असून जखमांतील किडे मारण्यासही उपयुक्त असतो. साल ज्वरनाशक,पित्तनाशक, कृमिघ्न असते नेत्रदाहात (डोळ्यांची जळजळ होण्यावर) तिचे अंजन घालतात. कच्च्या बिया विषारी असतात परंतु उकळून व भाजून खातात. लाकूड पांढरे, हलके व टिकाऊ असल्याने पालखीचे दांडे, नक्षीकाम, फळ्या, खेळणी, पेट्या, नौका-बांधणी, तराफे, पडाव इत्यादींसाठी उपयुक्त असते. पोहावयास शिकताना याचे लाकूड वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि त्यातील धागे दोऱ्याकरिता वापरतात. फुलांपासून लाल रंग काढतात. हा वृक्ष सु. २ मी. उंच वाढल्यापासून फुले येऊ लागतात. याच्या लागवडीमुळे जमीन सुपीक होते.

शेंदरी पांगारा : (हि. मंदार, पांगरा क. कडु परिवला लॅ. एरिथ्रिना सुबरोजा). पांगाऱ्याच्या वंशातील हा दुसऱ्या जातीचा वृक्ष हिमालयापासून ते श्रीलंका व ब्रह्मदेशापर्यंत शुष्क वनात सर्व भारतात आढळतो. शोभेकरिता लागवडही करतात हा वरच्या जातीपेक्षा लहान असून खोडावरील साल जाड व भेगाळ असते. फांद्या अधिक वाकड्या आणि त्यांवर व क्वचित पानांवरही फिकट पिवळे काटे असतात. फुले शेंदरी असून ती एप्रिल-मे मध्ये येतात. संवर्त पंचदंती, दोन ओठांप्रमाणे शिंबा लहान १२–१५x१·२५ सेंमी. व बिया लहान, २–५, पिंगट किंवा काळ्या व काजूच्या आकाराच्या असतात. नवीन लागवड तसेच इतर लक्षणे लाल पांगाऱ्याप्रमाणे असतात. याचे लाकूड पांढरे, फारच हलके, नरम व सच्छिद्र असते. उघड्यावर ते लवकर खराब होते परंतु इमारतीच्या आतील बाजूस चांगले टिकते. तुपाच्या बरण्या, तरवारीचे म्यान, पळ्या, ढोल, चाळणीच्या चौकटी, फळ्या, खोकी, पाण्याची टाकी, चहाच्या पेट्या, फळांची खोकी, तक्ते, आगकाड्या, आगपेट्या, बुचे इ. विविध वस्तूंकरिता ते उपयुक्त असते. सालीचे उपयोग व इतर औषधी उपयोग लाल पांगऱ्यात दिल्याप्रमाणे आढळतात. 

महाभारतातव काही संस्कृत ग्रंथांत मंदार हे नाव आले असून काहींच्या मते तो मंदार म्हणजे पारिजातक असावा तथापि तो पांगारा असणे अशक्य नाही.  

शेंदरी पांगारा हे नाव पांगाऱ्याच्या वंशातील दुसऱ्या एका जातीस (एरिथ्रिना स्ट्रिक्टा) दिले आहे. हिच्या फांद्यांवरचे काटे पांढरट व असंख्य असतात. पानांची दले लाल पांगाऱ्याप्रमाणे . शेंदरी फुले १०–१२ सेंमी. लांबीच्या मंजऱ्यांवर फांद्यांच्या टोकाशी मेमध्ये येतात संवर्त लाल पांगाऱ्याच्या फुलातील महाछदासारखा पण टोक विभागलेले नसते. फळे (शिंबा) जूनमध्ये येतात शिंबा ९–१२ सेंमी. लांब, तपकिरी व बिया २–३ फिकट पिंगट असतात. या वृक्षांचा प्रसार ब्रह्मदेशात व प. द्वीपकल्प भागातील (कोकण व उ.कारवार) पानझडी व मिश्र जंगलात विशेष आहे. याचे लाकूड लाल जातीप्रमाणेच उपयोगात आहे. 

पावसाळी हवेत पांगाऱ्याच्या झाडावरच राहिलेल्या काही शेंगांतील बिया तेथेच रुजून त्यातून वाढलेली रोपे खाली पडतात. अशा प्रकारचे अंकुरण (अपत्यजनन) समुद्रकिनाऱ्यावरील खारट चिखलात वाढणाऱ्या अनेक वनस्पतींत (उदा., कांदळ, चिप्पी, कांकरा इ.) आढळते परंतु जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींत अपवाद म्हणून क्वचित विशिष्ट परिस्थितीत आढळते [⟶ वनश्री]. (चित्रपत्र ५७).

संदर्भ : 1. Blatter, E Milliard, W. S. Some Beautiful Indian Trees, Bombay, 1954.

   2. C. S. I. R.The Wealth of India, Raw Materials, Vol.III,  New Delhi. 1952.

परांडेकर, शं. आ.