कोलियस : (कुल-लॅबिएटी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एका वंशाचे ग्रीक नाव. यामध्ये सु. १५० जाती असून त्यांचा प्रसार पूर्व गोलार्धाच्या उष्ण कटिबंधात व विशेषतः आफ्रिका, पूर्व भारत व त्यालगतची बेटे यांवर आणि ऑस्ट्रेलियात आहे. त्या सर्व वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या), सरळ वाढणाऱ्या लहान ⇨ ओषधी  किंवा क्षुपे (झुडपे) आहेत. खोड चौकोनी पाने साधी, समोरासमोर, दातेरी फुले लहान किंवा मध्यम आकाराची, निळी किंवा फिकट गुलाबी, कणिशासारख्या मंजरीवर येतात. संवर्त पंचदली असून फळावरही दिसतो. पुष्पमुकुट द्वयोष्ठक, केसरदले चार, दीर्घद्वयी व खाली वाकलेले आणि तंतू जुळून नळीसारखे (त्यावरून ग्रीक नाव ‘आवरक’ या अर्थी पडले) परागकोश संलग्न किंजपुट चार भागांचा आणि प्रपिंडासारख्या (ग्रंथीसारख्या) बिंबाने वेढलेला [→ फूल लॅबिएटी] असतो.

कोलियसाच्या अनेक जाती व उपजाती आणि प्रकार (उदा., को. ब्ल्यूमी ), बागेत, कुंडीत, वाफ्यात अथवा खिडकीबाहेरच्या लहानशा वाफ्यात लावल्यास फार शोभिवंत दिसतात सुंदर फुले व विशेषत: पानावरच्या विविध रंगांचे मिश्रण आकर्षक दिसते. नवीन लागवड कलमे किंवा बिया लावून करतात. कलमांना मुळ्या लवकर फुटतात. वाफ्यात गालिचाप्रमाणे जमीन झाकण्यात उपयुक्त. जून झाल्यावर चमक कमी होते. पिठ्या ढेकणांचा उपद्रव होतो, तसेच सूत्रकृमीमुळे त्यांच्या मुळांना गाठी येतात. अशा वेळी कलमे काढून घेऊन उरलेला जुनाट व रोगट भाग जाळून टाकतात आणि जमीन भाजतात किंवा अतिथंड करतात. पानांचा काढा अग्निमांद्यावर देतात.

कोलियस  वंशातील एक मूळची आफ्रिकेच्या उष्ण भागातील जाती, माइनमूळ (को. बाबॅर्टस ), भारतात लागवडीत आहे. कोकण, दख्खन  व माळव्यात ती रानटी अवस्थेत आढळते [→ माइनमूळ].

पानाचा ओवा : (सं. पाषाणभेदी इं. इंडियन बोरेज लॅ. को. अँबोइनिकस  किंवा को. ॲरोमॅटिक्स ). ही याच वंशातील बहुवर्षायू जाती असून राजस्थानात आढळते इतरत्र फक्त बागेत लावलेली आढळते. पाने जाड, मांसल, हिरवी, गोल-दातेरी, लवदार, सुगंधी आणि तिखट असतात. फुले फिकट जांभळी फांद्या व खोड ठिसूळ आणि लवदार. हिची पाने वासाकरिता स्वयंपाकात वापरतात. मद्यात वासाकरिता अर्क घालतात. ही वायुनाशी असून ५-६ थेंब रस साखरेबरोबर दिल्यास अपचन व पोटदुखी यांवर गुणकारी असते दमा, खोकला, फेपरे वगैरे विकारांतही ती उपयुक्त आहे. पाने मूत्ररोग व आर्तव दोषावर (मासिक पाळीच्या दोषावर) देतात.

को. पार्व्हिफ्लोरस : (हिं. कूर्कन इं. मादागास्कर पोटॅटो लॅ. को. रोटुंडिफोलियस ). ही ओषधी द. भारतात व मध्य प्रदेशात पिकवितात. हिचे भूमिस्थित (जमिनीतील) मांसल खोड भाजीकरिता बटाट्याप्रमाणे उपयुक्त आहे [→ कुरका].

जमदाडे, ज. वि.