हायड्रोकॅरिटेसी :फुलझाडांपैकी एकदलिकित [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨ जलवनस्पतींचे कुल. याचा समावेश जल-वनस्पतींच्या हेलोबी या गणात केला आहे. हायड्रोकॅरिटेसी या कुलातसु. १८ प्रजाती व १२० जाती समाविष्ट असून त्यांचा प्रसार विशेषेकरून उष्णकटिबंध व थोड्या प्रमाणात समशीतोष्ण प्रदेशांत आहे. या कुलात ऑटेलिया (४० जाती), लॅगारोसिफॉन (१५ जाती), एलोडिया ( ॲनाकॅरिस यासह १२ जाती), ब्लायक्सा (१० जाती), हॅलोफिला (१० जाती), व्हॅलिस्नेरिया (१० जाती) व थॅलॅसिया (२ जाती) या मोठ्या प्रजातींचा समावेश होतो.

 हायड्रोकॅरिटेसी कुलातील वनस्पती गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात, अंशतः किंवा पूर्णपणे बुडलेल्या असतात. पाने एकांतरित, संमुख किंवा मंडलित कधीकधी मूलज पानांचा झुबका असतो. फुले बहुधा एकलिंगी व स्वतंत्र वनस्पतीवर (उदा., ⇨ हायड्रिलासवाला), क्वचित द्विलिंगी (उदा., एलोडिया व ऑटेलिया) असतात. हायड्रोकॅरिसमध्ये एकलिंगी फुले एकाच वनस्पतीवर, तर ब्लिक्सि मध्ये एकलिंगी व द्विलिंगी फुले एकाच वनस्पतीवर असून ती नियमित, अपिकिंज व महाछद वेष्टित असतात. पुं-पुष्पात परिदले ६ (३ + ३), बहुधा संवर्त व पुष्पमुकुट असा भेद दर्शविणारी व तळापर्यंत सुटी असतात. केसरदले तीन किंवा अधिक, तथापि प्रत्येक मंडलात तीनच आतील मंडलात काही वंध्य परागकोश उभे तडकतात या फुलांत कधी वंध्य किंजमंडल असते. स्त्री-पुष्पातील संरचना सर्वसाधारण पुं-पुष्पाप्रमाणे असून २–१५ किंजदले असतात. किंजपुट संयुक्त, अधःस्थ व एकपुटक बीजके अनेक व सरळ किंजले विभागलेली फळ मांसल, चिवट किंवा शुष्क व तडकणारे बिया अपुष्क असतात. पाण्याशी अनुकूलन करून घेतल्याने वनस्पतीच्या रचनेत बरेच बदल घडून आलेले दिसतात [→ जलवनस्पति]. परागण पाण्याखाली (उदा., हॅलोफिला) अथवा पाण्यावर (उदा., सवाला) वाऱ्याच्या आणि कधीकधी कीटकांच्या साहाय्याने (उदा., ऑटेलिया, हायड्रोकॅरिस) घडून येते. या कुलातील वनस्पतींना व्यावहारिक महत्त्व फारसे नाही. तथापि, काही वनस्पती जलजीवालयात शोभेकरिता लावतात (उदा., सवाला), तर काहींचे औषधी उपयोग आहेत. थॅलॅसिया च्या जाती खतासाठी उपयुक्त आहेत. हॅलोफिलाच्या जाती समुद्रवासी आहेत. 

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.