कृत्तिकापुंज : नक्षत्रमालिकेतील तिसरे नक्षत्र. यातील एक चरण (चतुर्थांश) मेष राशीत उरलेले तीन चरण वृषभ राशीत आहेत, परंतु पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे हा पुंज वृषभ या समूहात मोडतो. यात अगदी जवळजवळ पाचव्या किंवा सहाव्या प्रतीचे [→ प्रत] सात तारे पुंजक्याच्या स्वरूपात दिसतात [क्रांती २३ १°/2 उ., होरा ३ ता. ४० मि., → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र या नक्षत्रात असतो म्हणून त्या महिन्याचे कार्तिक नाव पडले आहे. कार्तिकात हे नक्षत्र सायंकाळी पूर्वेस उगवते व सकाळी पश्चिमेस मावळते म्हणून रात्रीची वेळ कळण्यास याची मदत होते. फेब्रुवारीमध्ये हा पुंज सायंकाळी डोक्यावर येतो. वैदिक वाङ्मयामध्ये याच्यात सात, तर पौराणिक वाङ्मयात सहा तारे सांगितले आहेत. त्यांची नावे अशी : अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती व चुपुणिका (तै. ब्रा. ३, १, ४,१). कार्तिकेयाच्या सहा माता असा यांचा पुराणात उल्लेख आहे. यास बहुला असे दुसरेही एक नाव आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात हे पहिले नक्षत्र व कार्तिकापासून वर्षारंभ मानलेला आहे. कारण चार पाच हजार वर्षांपूर्वी वसंतसंपात (सूर्य त्याच्या वार्षिक भासमान गतीत वसंत ऋतूत जेथे खगोलीय विषुववृत्त ओलांडतो तो बिंदू) कृत्तिका नक्षत्रात होता.
ग्रीक पौराणिक कथेमध्ये यातील तारका ह्या ॲटलासच्या मुली होत, असा उल्लेख आहे. कृत्तिकेतील अल्सायनी हा योग तारा आहे. हाच वृषभातील ईटा किंवा अंबा होय. जे सहा तारे नुसत्या डोळ्यांनी दिसतात ते पाचव्या प्रतीचे आणि सातवा जो दिसत नाही तो सहाव्या प्रतीच्या नऊ ताऱ्यांपैकी एक असावा. हा पूर्वी दिसत असावा, मात्र हळूहळू त्याचे तेज कमी होऊन तो दिसेनासा झाला असावा. परंतु मोठ्या दूरदर्शकातून पाहिल्यास या १० त्रिज्येच्या वर्तुळाच्या लहानशा जागेत ३०० ते ५०० तारे दिसू शकतात. या क्षेत्रात असलेल्या धुळीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे साध्या लहानशा दूरदर्शकातूनसुद्धा हा पुंज अभ्रिकेसारखा दिसतो. या पुंजाचा व्यास १५ प्रकाशवर्षे व सूर्यकुलापासून याचे अंतर सु. ४१० प्रकाशवर्षे आहे.
काजरेकर, स. ग.
“