पिके, मशागती : मनुष्य जेव्हा भटक्या जीवनाकडून शेतीकडे वळला तेव्हा त्याने निसर्गात रानटी स्थितीत वाढणार्‍या अनेक वनस्पतींपैकी काही वनस्पतींची अन्न, वस्त्र व इतर गरजा भागविण्यासाठी निवड करून त्यांची काळजीपूर्वक लागवड सुरू केली. लागवडीखाली असलेल्या वनस्पतींच्या समूहाला पीक या नावाने ओळखले जाते. सूर्यप्रकाश व उत्सर्गी वायू (कार्बन डाय-ऑक्साइड) यांच्यापासून जैव पदार्थ तयार करण्याचे कार्य फक्त वनस्पती करू शकत असल्याने पिकांपासून मनुष्याला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या पाळीव जनावरांना फायदा होतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूळ गरजांखेरीज इतर गरजांसाठीही पिकांची लागवड केली जाते. उदा., वारा आणि पाणी यांच्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबविण्यासाठी, कोणतेही पीक नसलेल्या जमिनीतून पोषक द्रव्यांचे पाण्यावाटे होणारे शोषण थांबविण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारण्याच्या दृष्टीने हिरवळीच्या खतासाठी तसेच विशिष्ट पिकाची लागवड निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या उद्देशांनी करण्यात येते. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत मक्याच्या उत्पादनापैकी ९०% उत्पादनाचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी होतो व केवळ ८% उत्पादन मनुष्याच्या आहारात वापरले जाते. याउलट द. यूरोप, मेक्सिको, आशिया व आफ्रिकेमध्ये मक्याचा उपयोग मुख्यत्वेकरून मनुष्याच्या आहारात केला जातो. सातूचा (बार्लीचा) उपयोग अमेरिकेत जनावरांचे खाद्य आणि माल्ट तयार करण्यासाठी केला जातो. उत्तर आफ्रिका आणि आशियामध्ये ते मनुष्याचे खाद्यान्न आहे. तिसरे उदाहरण सोयाबिनाचे देता येईल. अमेरिकेत त्याची लागवड औद्योगिक उत्पादनात वापरण्यासाठी, तेल आणि जनावरांचा चारा या दोन उद्देशांसाठी करतात. आग्नेय आशियात त्याचा अन्नासाठी वापर केला जातो. कारण त्यातील प्रथिनाची किंमत तुलनेने कमी असते.

पिकांच्या लागवडीची महत्वाची क्षेत्रे : पिकांच्या लागवडीच्या जगातील महत्वाच्या क्षेत्रांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा मध्यभाग व कॅनडा, (२) उत्तर अर्जेंटिना व दक्षिण ब्राझील, (३) दक्षिण आफ्रिकेचा काही भाग, (४) उत्तर आफ्रिकेचा काही भाग (ईजिप्त, अल्जीरीया व मोरोक्को), (५) मध्य व पश्चिम यूरोप, (६) भारत, (७) चीन, (८) ऑस्ट्रेलियाचा काही भाग आणि (९) आशियाई रशियाचा काही भाग.विशिष्ट पिकाखालील क्षेत्र पुढील परिस्थितीवर अवलंबून कमी-जास्त होते : (१) हवामान (पर्जन्य, आर्द्रता, तापमान, पिकाच्या वाढीला योग्य अशी वर्षातील दिन-संख्या, सूर्यप्रकाशाचे दिवसाचे तास) (२) जमिनीची परिस्थिती (मातीची संरचना, जमिनीचा पोत, शेताचा चढउतार, जैव पदार्थाचे प्रमाण वगैरे (३) आर्थिक परिस्थिती (जमिनीचे मूल्य, बाजारपेठपासून अंतर, मजुरांची उपलब्धता, वाहतुकीसाठी रस्ते व साधने आणि बाजारात विशिष्ट पिकाला मागणी).

पिकांचे वर्गीकरण : पिकांचे वर्गीकरण निरनिराळ्या पद्धतींनी करता येये. अर्थात प्रत्येक पद्धतीमध्ये गुण तसेच दोषही हेत परंतु प्रत्येक पद्धत काही विशिष्ट तत्वावर आधारलेली आहे. वर्गीकरणाच्या निरनिराळ्या पद्धती व त्यांतील काही पिके पुढीलप्रमाणे आहेत.

वनस्पतिवैज्ञानिक वर्गीकरण : आकारविज्ञानावर [ ⟶ आकारविज्ञान ] आधारलेल्या प्रत्येक पिकाचे गण, कुल, वंश व जाती निश्चित करण्यात आलेली असून निरनिराळ्या पिकांचे निरनिराळ्या कुलांत वर्गीकरण करण्यात आले आहे. [ ⟶ वनस्पतींचे वर्गीकरण]. उदा., भात, गहू, ज्वारी व बाजरी यांचा समावेश ग्रॅमिनी कुलात होतो. हरभरा, वाटाणा, तूर, मूग, उडीद ही कडधान्याची पिके लेग्युमिनोजी या कुलात मोडतात. या वर्गीकरणामुळे निरनिराळ्या पिकांतील वानस्पतिक साधर्म्य कळून येते. एकाच कुलातील पिकावर पडणार्‍या रोगांचे सर्वसामान्य स्वरूप पुष्कळ बाबतींत सारखे असते अथवा एकच रोग अशा प्रकारच्या अनेक पिकांवर पडतो. याचा उपयोग रोगनियंत्रणासाठी करतात.

हवामानाच्या प्रदेशावर आधारित वर्गीकरण : (अ) उष्ण कटिबंधातील पिके. उदा., भात, ऊस. (आ) समशीतोष्ण कटिबंधातीलपिके. उदा., गहू, सातू, ओट. 

हंगामावर आधारित वर्गीकरण : (अ) खरीप : जून ते ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर या पावसाळी हंगामातील पिके. उदा., कापूस, भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग. (आ) रबी : ऑक्टोबर ते मार्च या हिवाळी हंगामातील पिके. उदा., गहू, हरभरा, करडई, अळशी. (इ) उन्हाळी : मार्च ते जून या उन्हाळी हंगामातील पिके. उदा., उन्हाळी भुईमूग, कलिंगड, खरबूज, काकडी व उन्हाळ्यातील भाज्या.

पिकाच्या आयुष्यावर आधारित वर्गीकरण : (अ) वर्षायू : ज्या वनस्पती आपले जीवनचक्र एका पीक हंगामात पुरे करतात. उदा.,गहू, ज्वारी, बाजरी. (आ) द्विवर्षायू : ज्या वनस्पतींना आपले जीवनचक्र पुरे करण्यासाठी दोन पीक हंगाम लागतात. उदा., कांदे, गाजरे, मुळा. (इ) बहुवर्षायू अथवा बारमाही : तीन किंवा अधिक पीक हंगामांत वाढ चालू असते अशा वनस्पती. उदा., लसूणघास, गिनी गवत, आंबा, पेरू.

पाणीपुरवठ्यावर आधारित वर्गीकरण : (अ) जिरायती : फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पिके. उदा., भात, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग. (आ) बागायती : तलाव, विहिरी, कालवे यांतून पाण्याचा पुरवठा करून वाढविलेली पिके. उदा., ऊस, केळी, भाजीपाल्यांची पिके.

उपयोगावर आधारित वर्गीकरण : सर्वसाधारणपणे पिकांचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगाच्या तत्वावर केले जाते आणि पिकाखालील क्षेत्र व उत्पादन यांसंबंधी आकडेवारी गोळा करण्यासाठी या वर्गीकरणाचा उपयोग करतात. भारतातील महत्वाच्या पिकांचे या पद्धतीने केलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

(अ)तृणधान्ये : भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका, सातू, ओट, नाचणी, वरी, राळा, बंटी, कोद्रा (हरीक). लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टीने भारतात भात, ज्वारी, बाजरी आणि गहू ही पहिल्या चार क्रमांकाची पिके आहेत. देशातील लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी २४% क्षेत्र भाताखाली आहे. ज्वारीचा कडबा, बाजरीचे सरमाड, भाताचा पेंढा, गव्हाचे काड व भुसकट गुरांना चारण्यासाठी अथवा कागद करण्यासाठी वापरतात. खराब झाल्यास त्यापासून खत करतात. [ ⟶ तृणधान्ये ]. 

(आ)कडधान्ये : तूर, हरभरा, उडीद, मूग, मटकी, चवळी, कुळीथ, लाख, वाल, वाटाणा, मसूर. यांपैकी हरभरा व तूर या दोन पिकांचे भारतातील एकत्र क्षेत्र एकूण कडधान्यांच्या पिकांच्या निम्म्याने आहे. तसेच भारतातील लागवडीखालील पिकांच्या ८० % क्षेत्र तृणधान्ये व कडधान्ये यांखाली आहे. [ ⟶ कडधान्ये ]. 

(इ)गळिताची पिके : भुईमूग, करडी, तीळ, सूर्यफूल, कारळे, जवस, मोहरी, नारळ, एरंड व सोयाबीन. यांपैकी भारतात भुईमूगाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे.या पिकांची तेले खाण्यासाठी, वंगणासाठी व साबण धंद्यासाठी वापरतात. पेंड गुरांच्या खुराकासाठी आणि खताकरिता वापरतात. [ ⟶ गळिताची पिके ].

(ई) तंतू व वाखाची पिके : कापूस, ताग, अंबाडी, सन, लाल अंबाडी, घायपात आणि रॅमी यांच्यापासून कापड, दोरखेड, गोणपाट वगैरे अनेक वस्तू तयार करतात.

(उ) शर्करा व स्टार्चची पिके : ऊस, बीट, रताळे, टॅपोओका. ऊस व बीटपासून साखर आणि टॅपिओकापासून स्टार्च व साबुदाणा तयार करतात.

 (ऊ) भाजीपाल्याची पिके : (१) पालेभाज्या : मेथी, चुका, चाकवत, चंदनबटवा, अंबाडी, पोकळा, राजगिरा, पालक, शेपू, काटे माठ, माठ, कोबी, सालीट, अळू, घोळ इत्यादी (२) शेंगभाज्या : गवार, चवळी, डबलबीन, श्रावण घेवडा, मटार, पावटा, वाल, आबई, शेवगा इत्यादी (३) मूळभाज्या : बीट, गाजर, मुळा, सलगम, रताळे (४) कंद व खोड भाज्या : अळू, सुरण, कांदा, बटाटा, नवलकोल (५) फुलभाज्या : फुलकोबी, हदग्याची फुले (६) फळभाज्या : दुधी भोपळा, वांगे, काकडी, भेंडी, तोंडली, काशीफळ, लाल भोपळा, दोडका, घोसाळे, पडवळ, टोमॅटो, ढेमसे, परवर, करटोली, कोहळा, कारली इत्यादी.

 (ए) मसाल्याची पिके : जिरे, ओवा, मिरी, लवंग, वेलदोडे, मिरची, धने, बडीशेप, लसूण, आले, हळद. [ ⟶ मसाल्याची पिके]. 

 (ऐ) औषधे, रंग आणि मादक पदार्थांची पिके : नीळ, अफू व गांजा, तंबाखू, चहा, कॉफी, कोको, सुपारी इत्यादी.

 (ओ) फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, जांभूळ, चिंच, कवठ, केळी, द्राक्षे, काजू, सफरचंद, रामफळ, सीताफळ, संत्रे, मोसंबे, लिंबू, पपई, बोर, अंजीर, अननस, डाळिंब, नासपति इत्यादी.

(औ) वैरणीची पिके व गवते : ज्वारी (निळवा), मका, लसूणघास, बरसीम, हत्ती गवत (नेपिअर ग्रास), गिनी गवत, पॅरा गवत, गजराज, मारवेल, पवना, अंजन इत्यादी. [ ⟶ वैरण गवते].

(अं) हिरवळीच्या खताची पिके : सन ताग व धैंचा ही मुख्य पिके असून उडीद, चवळी, मूग व मटकी यांचाही या कामासाठी उपयोग करतात.

संदर्भ : 1.Hughes, H. E. Henson, E. R. Crop Production, Toronto, 1957.

   2. I.C.A.R.Handbook of Agriculture, New Delhi, 1967.

   3. Vaidya, V.G. Sahastrabudhe, K.R. Khuspe, V.S.Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.

चौधरी, रा.मो. गोखले, वा.पु.