पापडी : (घाट्यातील अळी). पापडीचा समावेश लेपिडॉप्टेरा गणाच्या नॉक्ट्युइडी कुलात होतो. हेलिओथिस ऑबसोलेटा हे तिचे शास्त्रीय नाव आहे. हरभरा, वाटाणा, तूर, कापूस, टोमॅटो, तंबाखू, करडई या पिकांना या किडीचा बऱ्याच वेळा उपद्रव होतो. तिचे पतंग २५ मिमी. लांब असून फिकट पिवळसर तपकिरी रंगाचे असतात. त्यांचे पुढील पंख फिकट तपकिरी असून त्यांवर काळे ठिपके असतात, तर मागील पंख फिकट व त्यांच्या कडा गर्द भुरकट रंगाच्या असतात. जसजशी त्यांची वाढ होत जाते तसतसे त्यांचे रंग बदलतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या २५-३० मिमी. लांब, हिरव्या रंगाच्या आणि त्यांच्या शरीराच्या दोन्ही कडांवर करड्या रंगाच्या तुटक तुटक रेषा असतात.
मादी पतंग झाडाच्या कोवळ्या भागावर हिरवट पिवळसर रंगाची गोलाकार अंडी पुंजक्या-पुंजक्याने घालते. ती सहा-सात दिवसांत उबतात. सु. दोन दिवसांत अळ्या पुर्ण वाढतात व झाडाजवळ जमिनीमध्ये मातीच्या वेष्टनात कोशावस्थेत जातात. कोशावस्थेतून एक वे चार आठवड्यात पतंग बाहेर पडतात. कोशावस्थेतच ही कीड पुढील हंगामापर्यंत सुप्तावस्थेत राहते. नोव्हेंबर-मार्च या काळात या किडीचा बराच उपद्रव होतो.
“