पॅटरसन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यू जर्सी राज्यातील एक प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर. लोकसंख्या १,४४,८२४ (१९७०). हे न्यूयॉर्कच्या उत्तरेस २२ किमी. व न्यूयॉर्कच्या वायव्येस २७ किमी. पसेइक नदीकाठी वसले आहे. लेनी लेनाप इंडियनांनी १६७९ मध्ये हा भूभाग डच वसाहतकऱ्यांना विकला. पुढे सु. १०० वर्षांनी अमेरिकन क्रांतीनंतर अलेक्झांडर हॅमिल्टन व त्याच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेला इंग्‍लंडच्या औद्योगिक जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने या शहराजवळील २१ मी. उंचीच्या पसेइक धबधब्याच्या योगे जलविद्युत् उत्पादनाची शक्यता लक्षात घेऊन, औद्योगिक उत्पादनक्षमतेचे केंद्र म्हणून या शहराची स्थापना करण्याचे ठरविले. १७९१ मध्ये ‘सम्’ (सोसायटी फॉर एस्टॅब्लिशिंग यूसफुल मॅन्युफॅक्चरर्स) ही संस्था स्थापन करण्यात आली. न्यू जर्सी राज्याचा तत्कालीन गव्हर्नर विल्यम पॅटरसन याचे नाव शहराला देण्यात आले. या लहान नगराचे १८५१ मध्ये शहरात रूपांतर झाले. पॅटरसनला १८३२ व १८४९ मध्ये कॉलरा, १८८३ मध्ये देवी, तर १९०२ मध्ये वादळ, पूर इ. संकटांना तोंड द्यावे लागले.

पसेइक धबधब्यापासून निर्माण केली जाणारी वीज शहरातील उद्योगधंद्यांना पुरविली जाते.‘सम्’ संस्थेने शहरातील आपल्या मालकीची जलविद्युत् शक्ती व इमारतींसाठी जागा खाजगी उत्पादकांना विकली. संस्थेने १७९४ मध्ये सूतगिरणीची स्थापना केली. रेशीम उत्पादनास १८४० पासून प्रारंभ होऊन १९१० मध्ये त्या उत्पादनाने अत्युच्च टोक गाठले. एकोणिसाव्या शतकात शहरातील अनेक रेशीम सूतगिरण्यांमुळे पॅटरसनला ‘रेशमाचे शहर’ म्हणण्यात येऊ लागले. कनेक्टिकट राज्यातील कोल्ट कुटुंब पॅटरसनमध्ये येऊन स्थायिक झाले. सॅम्युएल, जॉन, क्रिस्टोफर या कोल्ट बंधूंनी येथे खिळे, लाटणयंत्रे, बंदूक, डक कापड, रेशीम इ. उद्योगांची स्थापना केली. येथील बंदुकीच्या कारखान्यातून सॅम्युएल कोल्टने आपल्या पहिल्या पिस्तुलाची (कोल्ट रिव्हॉल्व्हर) निर्मिती केली (१८३५). १८३७ मध्ये रेल्वे एंजिनांच्या उद्योगाची स्थापना झाली, तर १८६४ मध्ये तागाच्या सूत उत्पादनास प्रारंभ झाला. पॅटरसनमध्ये वस्त्रनिर्मिती (रेशीम, रेयॉन, नायलॉन, लोकरी वस्त्रे, विणमाल इ.), यंत्रे व यंत्रावजारे, रसायने, प्लॅस्टिके, रबरी वस्तू, नक्षीदार काचा, ओतकाम, लाकडी सामान, विमानांची एंजिने, दूरचित्रवाणी संच, कापडगिरणी यंत्रे, विद्युत‌् सामग्री, स्वयंचलित साधन-उपकरणे इ. महत्त्वाचे उद्योग चालतात.

सीटन हॉल विद्यापीठ व रट्‍गर्झ विद्यापीठ यांच्या विद्याशाखा, पॅटरसन महाविद्यालय व शिक्षक महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था येथे आहेत. शहरात न्यू जर्सी राज्यातील खडकांचे नमुने व इंडियनांचे स्मारकावशेष यांचा समावेश असलेले पॅटरसन वस्तुसंग्रहालय, वेस्ट साइड पार्क व तेथील प्रदर्शनातील जॉन हॉलंडची पहिली आधुनिक व यशस्वी पाणबुडी (१८८१), गॅरेट किल्ला (१८९१), जुना बंदूक कारखाना, पसेइक परगण्यातील ऐतिहासिक ग्रंथालय व संग्रहालय, नगरभवन, अलेक्झांडर हॅमिल्टनचा पुतळा, डॅनफोर्थ मेमोरियल ग्रंथालय (१९०५), अनेक विस्तीर्ण उद्याने इ. प्रेक्षणीय आहेत. अमेरिकेचे अटर्नी जनरल जॉन विल्यम ग्रिग्झ (१८९८–१९०१), येल विद्यापीठातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेअम समनर, सेनेटर आणि वुड्रो विल्सनचा सहयोगी विल्यम ह्यूझ, अमेरिकेचा उपाध्याक्ष गॅरेट ए. होबर्ट (१८९७–९९), कोलंबिया विद्यापीठाचा अध्यक्ष निकोलस मरी बटलर (१९०२–४५) इ. पॅटरसनमधील प्रसिद्ध व्यक्ती होत.

चौधरी, वसंत