नथू ला : सिक्कीम–तिबेट सीमेवरील हिमालयातील एक महत्त्वाची खिंड. ही गंगटोकच्या ईशान्येस २४ किमी. वर स. स. पासून सु. ४,३०० मी. उंचीवर असून या खिंडीमार्गे बऱ्याच प्रमाणात वाहतूक होते. सिक्कीमहून चुंबी खोऱ्यात जाणारा रस्ता या खिंडीतूनच जातो आणि भारत–तिबेट मुख्य व्यापारमार्गास मिळतो. या खिंडीच्या आग्नेयीस सु. १० किमी. वर जेलेप ला (खिंड) असून, ती बर्फ पडल्यावर बंद होते. त्या वेळी नथू ला (खिंड) चा उपयोग केला जात असे. नथू ला-गंगटोक सडकेमुळे बागडोग्रा (सिलिगुडी) या भारतीय हवाई स्थानकाशी गंगटोक जोडले आहे. या खिंडीमार्गे तिबेटकडे चहा, मीठ, कापड तर भारताकडे लोकर, कातडी व लाकूड इत्यादींची वाहतूक होत असे. भारतातून तिबेटमध्ये ग्यांगत्से व ल्हासाकडे जाण्याचा सर्वांत जवळचा रस्ता येथून आहे. नेपाळी व्यापारीही भारताशी यामार्गे काही व्यापार करतात. तिबेटच्या सरहद्दीवर असल्यामुळे लष्करीदृष्ट्या ही खिंड महत्त्वाची आहे.

सावंत, प्र. रा.