माले : हिंदी महासागरातील मालदीव प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील प्रमुख शहर. लोकसंख्या ३७,३०० (१९८३ अंदाज) माले या बेटावरील हे शहर प्रमुख व्यापारी केंद्र असून येथून भारत व श्रीलंका या देशांशी जलमार्गाने वाहतूक चालते. देशाच्या प्रशासकीय कारभाराचे हे केंद्र आहे. शहरात मध्यवर्ती न्यायालय, शासकीय रूग्णालय, सरकारी व खाजगी विद्यालये आणि अभियांत्रिकीवर विशेष भर देणारी धंदेशिक्षण शाळा आहे. यांशिवाय येथे अनेक क्रीडामंडळे व मुस्लिमांच्या धार्मिक संघटनाही आहेत. माले कंकणद्वीपापैकी हूलेले या बेटावर विमानतळ आहे. नारळ व सुके खोबरे, विलायती फणस, बोनिटो व ट्यूना हे मासे, पाम वृक्षाच्या सालीपासून बनविलेल्या चटया इ. मालेमधील प्रमुख उत्पादने होते. येथे १३,००० पुस्तके (१९८१) असलेले ग्रंथालय असून मालदीवमधील ऐतिहासिक घटना विषयीचे संग्रहालय आहे. पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने शहरात पर्यंटकांना अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

दळवी, र. कों.