नॉक्सव्हिल : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील टेनेसी राज्याच्या नॉक्स परगण्याचे मुख्य ठिकाण व औद्योगिक शहर. लोकसंख्या १,७४,५८७ महानगरीय लोकसंख्या १,९०,५०२ (१९७०). हे ग्रेट ॲपालॅचिअन खोऱ्यात स. स. पासून २८४ मी. उंचीवर टेनेसी नदीच्या उजव्या काठावर वसले असून चॅटानूगाच्या ईशान्येस सु. १६८ किमी. आहे. मेरीव्हिल, ॲल्कोआ व ओक रिज या नगरांचा नॉक्सव्हिलमध्ये समावेश होतो. १७८५ साली चेरोकी इंडियनांशी झालेल्या तहानुसार हा प्रदेश वसाहतीस खुला झाला. क्रांतिकारी युद्धनेता कॅ. जेम्स व्हाइट याने सीमेवर ‘व्हाइट्स फोर्ट’ नावाचे ठाणे उभारले. १७८६ मध्ये येथे शहराची स्थापना झाली आणि १७९१ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन मंत्रिमंडळातील युद्धसचिव हेन्री नॉक्स याच्या स्मरणार्थ यास नॉक्सव्हिल असे नाव दिले गेले. हे १७९२–९६ मध्ये ओहायओ नदीच्या दक्षिणेकडील प्रांताचे व १७९६–१८१२ पर्यंत टेनेसी राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. यादवी युद्धात याचे फार नुकसान झाले. येथे टेनेसी खोरे प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय, तसेच चार धरणे असून ओक रिज येथे अणुकेंद्राची स्थापना झाल्यामुळे नॉक्सव्हिलचा फार विकास झाला. येथील विद्युत् शक्तीमुळे उद्योगधंद्यांची वाढ झाली, तर जलवाहतुकीच्या सोयींमुळे शहराची दळणवळणक्षमता वाढली. येथे वस्त्रोद्योग, रसायने, प्लॅस्टिक, आसवन्या, सिमेंट, कपडे, फर्निचर इ. उद्योगधंदे असून याच्या आसमंतात जस्त, संगमरवर, कोळसा, लोखंड व तांबे यांच्या खाणी आहेत. हे तंबाखूच्या व्यापाराचे मुख्य केंद्र आहे. पर्यटन हादेखील येथील महत्त्वाचा उद्योग असून आग्नेयीकडील ग्रेट स्मोकी मौंटन्स नॅशनल पार्क व पश्चिमेक़डील कंबर्लंड मौटन्स ही पर्यटकांची आकर्षण केंद्रे आहेत. येथे टेनेसी विद्यापीठ (१७९४), नॉक्सव्हिल महाविद्यालय (१८७५) व बहिऱ्यांची शाळा या शैक्षणिक संस्था आहेत. ब्लंट मॅन्शन (१७९२), ब्लीक हाउस (१८६३), प्रादेशिक इतिहास व वंशावळी यांविषयी १२,००० पेक्षा जास्त ग्रंथ असलेले लॉसन माक्‌घी ग्रंथालय आणि कन्फेडरेट मेमोरियल हॉल या येथील ऐतिहासिक वास्तू आहेत. येथे ‘डॉगवुड आर्ट्स फेस्टिव्हल’ हा उत्सव प्रतिवर्षी एप्रिल महिन्यात साजरा होतो.

सावंत, प्र. रा.