तुमकूर : कर्नाटक राज्यातील तुमकूर जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७०,४७६ (१९७१). हे बंगलोरच्या वायव्येस सु. ७० किमी. असून पुणे–बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील व अर्सिकेरे–बंगलोर लोहमार्गावरील मुख्य स्थानक आहे. दहाव्या शतकातील शिलालेखात याचा तुम्मेगुरू असा उल्लेख आढळतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या तुम्मे (तुंबे) या सुवासिक वनस्पतीवरून याचे नाव पडले. म्हैसूरच्या राजघराण्यातील कांत अरसू याने सध्याच्या तुमकूर शहराची स्थापना केली असे म्हणतात. सभोवतीच्या केळी, नारळी, पोफळीच्या बागांमुळे हे आकर्षक झाले आहे. हे वेस्लीयन मिशनचे मुख्य ठिकाण आहे. येथे १८७० पासून नगरपालिका आहे. भात सडणे, तंबाखूवर प्रक्रिया करणे, सुवर्णकाम, विडीउद्योग, फर्निचर, वीटा, कौले, साबण व इतर हस्तव्यवसाय इ. उद्योगधंद्यांचे येथे केंद्रीकरण झाले आहे. तसेच येथे म्हैसूर विद्यापीठाशी संलग्न असलेले शासकीय महाविद्यालय असून इतर शैक्षणिक संस्थाही आहेत. याच्या पूर्वेस १३ किमी. वर १,१९० मी. उंचीवर ‘देवरायदुर्ग’ हे निसर्गसुंदर आरोग्यधाम आहे.

कांबळे, य. रा.