हेस, व्हिक्टर फ्रांट्स (फ्रान्सिस) : (२४ जून १८८३–१७ डिसेंबर १९६४). ऑस्ट्रियात जन्मलेले अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांनी ⇨ विश्व-किरणांचा (बाह्य अवकाशात उगम पावलेल्या उच्च ऊर्जा प्रारणाचा) शोध लावला. या संशोधन-कार्याबद्दल त्यांना १९३६ सालचे भौतिकी विषयाचे नोबेल पारितोषिक ⇨ कार्ल डेव्हिड अँडरसन यांच्या-समवेत विभागून मिळाले.
हेस यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हाल्डश्टाइन (स्टीरिया) येथे झाला. त्यांनी भौतिकी विषयाचे अध्ययन ग्रात्स विद्यापीठात (१९०१–०५) आणि व्हिएन्ना विद्यापीठात (१९०५–०८) केले. १९०६ मध्ये त्यांनी ग्रात्स विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी संपादन केली. ते व्हिएन्ना विद्या- पीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर रेडियम रिसर्च या संस्थेत व्याख्याते होते (१९१०–२०). नंतर ते १९२० मध्ये ग्रात्स विद्यापीठात सहप्राध्यापक झाले. ते न्यूयॉर्क येथील युनायटेड स्टेट्स रेडियम कॉर्पोरेशन या संस्थेत संशोधन संचालक होते (१९२१–२३). ते १९२५ मध्ये ग्रात्स वि द्या-पीठात प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक आणि १९३१ मध्ये इन्सब्रुक येथे भौतिकीचे प्राध्यापक झाले. १९३१ मध्ये त्यांनी विश्वकिरणांच्यादिवसा आणि रात्री होणाऱ्या कमी-जास्त प्रमाणांचा अभ्यास करण्या-करिता वेधशाळा स्थापन केली. १९३७ पर्यंत ते या वेधशाळेचे प्रमुखहोते. १९३८ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क येथील फोर्डहॅम विद्यापीठातील भौतिकी विषयाचे अध्यक्षपद स्वीकारले. १९४४ मध्ये त्यांना अमेरिकेचेनागरिकत्व मिळाले.
⇨ चार्ल्स टॉमसन रीस विल्सन यांनी १९०० मध्ये सिद्ध केले होतेकी, वातावरण किंचित विद्युत् संवाहक असते. तेव्हापासून असे समजले जात होते की, पृथ्वीवरील किंवा वातावरणातील किरणोत्सर्गी द्रव्यांतून उत्सर्जित झालेल्या गॅमा किरणांमुळे आयनीभवन झालेल्या वातावरणालाहा गुणधर्म प्राप्त झाला आहे. १९०१–११ या कालावधीत बलूनाचे [→ वातयान] आरोहण करताना प्रत्येक वेळी दिसून आले की, पृथ्वीवरून उत्सर्जित झालेल्या गॅमा किरणांमुळे आयनीभवन मोठ्या प्रमाणात झाले. १९१० मध्ये थिओडोर वुल्फ यांनी ३०० मी. उंच असलेल्या आयफेल टॉवरच्या पायथ्याशी व वरील टोकाशी घेतलेल्या निरीक्षणांवरूनही असेच निष्कर्ष आढळून आले.
हेस यांना वुल्फ यांच्या प्रयोगातील कारणमीमांसेबद्दल जिज्ञासानिर्माण झाली. हेस यांनी नवीन उपकरण तयार केले. त्यांनी १९११ मध्ये दोन, १९१२ मध्ये सात आणि १९१३ मध्ये एक अशी बलूनांची आरोहणे केली. त्यांनी दाखवून दिले की, बलूनाची उंची वाढत असताना, पहिल्यांदा आयनीभवनाचे प्रमाण कमी होते आणि नंतर ते झपाट्याने वाढत राहते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आयनीभवनापेक्षा ५ किमी. उंचीवरील आयनीभवन अनेक पटींनी अधिक आढळून आले. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, हा आविष्कार बाह्य अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या भेदक किरणांमुळे घडून येतो. एका आरोहणाच्या वेळी खग्रास सूर्यग्रहण असतानाही प्रारणात घट झाली नाही. यावरून हेस यांनी निष्कर्ष काढला की, वरील किरण सूर्यापासून उत्सर्जित झालेले नाहीत. हेस यांनी शोध लावलेल्या प्रारणाला ⇨ रॉबर्ट अँड्रूझ मिलिकन यांनी ‘कॉस्मिक रेज’ (विश्वकिरण) असे नाव दिले. या संशोधनामुळे अँडरसन यांनी ‘पॉझिट्रॉन’ या मूलकणाचा शोध लावला आणि आधुनिक भौतिकीमध्ये संशोधनाचे नवे क्षेत्र उदयास आले.
हेस यांना नोबेल पारितोषिकाशिवाय व्हिएन्ना ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचा लिबेन पुरस्कार मिळाला (१९१९). तसेच त्यांना कार्ल झेइस इन्स्टिट्यूटचे अर्न्स्ट ॲबे पदक मिळाले (१९३२). ते व्हिएन्ना ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि अमेरिकन जिओफिजिकल सोसायटी या संस्थांचे सदस्य होते. त्यांचे सु. १३० प्रबंध अनेक शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले : डिस्कव्हरी ऑफ कॉस्मिक रेज (१९१२), द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर (१९२८), आयनायझेशन बॅलन्स ऑफ द ॲटमॉस्फिअर (१९३३), कॉस्मिक रेडिएशन अँड इट्स बायोलॉजिकल इफेक्ट्स (१९४०).
हेस यांचे मौंट व्हर्नन (न्यूयॉर्क) येथे निधन झाले.
भदे, व. ग. एरंडे, कांचन
“