चिरडिंभता : ठराविक काळानंतरही डिंभाची (एखाद्या प्राण्याच्या भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या आणि प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेची) लक्षणे दिसून येण्याच्या घटनेला चिरडिंभता म्हणतात. बहुतेक प्राणी प्रौढावस्थेतच प्रजोत्पादन करू शकतात. परंतु काही प्राण्याची डिंभावस्था दीर्घकालीन असून त्या अवस्थेत त्यांची प्रजोत्पादक इंद्रिये कार्यक्षम होतात व हे डिंभावस्थेतील प्राणी प्रजोत्पादन करतात. काही प्राण्यांत ही अवस्था अल्पकालिक असते, तर काहीत ती चिरकालिक असते. या अवस्थेला कोलमन यांनी ‘निओटेनी’ म्हणजे ‘चिरडिंभता’ आणि फोन बायर यांनी ‘पीडॉजेनेसिस’ म्हणजे ‘शावकीजनन’ (डिंभापासून वा अपक्व प्राण्यापासून होणारे प्रजोत्पादन) अशी नावे दिली आहेत. चिरडिंभता आणि शावकीजनन हे शब्दप्रयोग बरेच वेळा चुकीचे वापरले जातात. एटकेन या शास्त्रज्ञांच्या मते त्यांचा खरा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. ‘चिरडिंभता’ म्हणजे प्राण्यांच्या जीवनावस्थेतील एक दीर्घकालीन डिंभावस्था, तर ‘शावकीजनन’ म्हणजे डिंभावस्थेत प्राण्याला प्राप्त झालेली प्रजोत्पादनाची पात्रता होय.

चिरडिंभतेची उदाहरणे निरनिराळ्या प्राणिवर्गांत आढळतात. टिनोफोरा वर्गातील यूकॅरिस, सायफोझोआ (छत्रिक) वर्गातील टेट्राप्लॅटिया आणि ॲक्टिनोझोआ वर्गातील ॲक्टिनिअन या जातींचे प्राणी डिंभावस्थेत आणि प्रौढावस्थेत अशी दोन वेळा प्रजोत्पत्ती करतात. ट्रायलोबाइट उपसंघातील प्रोपॅरिआ, सेफॅलोपोडा वर्गातील टेट्राब्रँकिया गणातील ॲमोनाइट्‍स आणि ब्रॅकिओपोडा (क्लोमपाद) उपवर्गातील प्राण्यांत चिरडिंभता आढळते. यूरोकॉर्डेटा (पुच्छरज्जुमान) उपसंघाच्या लार्व्हासिया वर्गातील प्राणी (जलोद्‌गारींच्या डिंभांच्या स्वरूपाचे) डिंभावस्थेत प्रजोत्पादन करतात.

उभयचर (पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गातील सायरेन, प्रोटिअस आणि अँफियूमा या प्राण्यांत चिरकाल डिंभावस्था असते. सायरिडॉन प्राण्यात डिंभावस्था दीर्घकालीन असली, तरी कालांतराने त्यांचे प्रौढावस्थेत रूपांतर होते. अँब्लिस्टोमा व सॅलॅमँडर हे प्राणी डिंभावस्थेत प्रजोत्पादन करतात.

शास्त्रज्ञांना उभयचर वर्गातील ॲक्झोलोटल हा डिंभावस्थेत प्रजोत्पादन करणारा प्राणी  माहीत होता. या प्राण्याला प्रौढावस्था नसावी असे यांचे मत होते. परंतु १८६५ साली मेक्सिकोमधून फ्रान्समध्ये आणलेल्या एका ॲक्झोलोटलाचे अँब्लिस्टोमा या पूर्णावस्थेतील प्राण्यात रूपांतर झाले. या प्रकारामुळे शास्त्रीय जगतामध्ये मोठी खळबळ उडाली. काही शास्त्रज्ञांनी या प्राण्याच्या जीवनाचा सखोल अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळून आले की, ॲक्झोलोटल हा चिरस्थायी डिंभ असला, तरी भोवतालच्या परिस्थितीतील हवामानात विशेष बदल झाला, तर त्याचे प्रौढावस्थेत रूपांतर होते. मेक्सिकोमधून फ्रान्समध्ये स्थलांतर केल्यावर भोवतालच्या हवामानात झालेल्या बदलामुळे डिंभावस्थेतील ॲक्झोलोटलाच्या शरीरात झपाट्याने बदल होऊन त्याचे प्रौढावस्थेतील अ‍ँब्लिस्टोमामध्ये रूपांतर झाले.

शास्त्रज्ञांच्या मते चिरडिंभतेची अवस्था प्राप्त होण्याची पुढील कारणे असावीत : (१) प्राण्यांच्या भोवतालच्या परिस्थितीतील प्रतिकूल हवामान आणि प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची उंची (२) जलचर प्राणी राहत असलेल्या पाण्यात आयोडिनाचे प्रमाण कमी असणे आणि (३) शरीरातील अवटू ग्रंथीमधून (घशाच्या भागात आहारनालाच्या खाली असलेल्या ग्रंथीमधून) प्रवर्तकाचे (उत्तेजक स्त्रावाचे, हॉर्मोनाचे) स्त्रवण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात न होणे.

डेलसोल या शास्त्रज्ञांनी उभयचर वर्गातील डिप्लोग्लॉसस या प्राण्यांवर केलेले प्रयोग विशेष उल्लेखनीय आहेत. या प्राण्याला नैसर्गिक परिस्थितीमध्ये डिंभावस्थेतून प्रौढावस्थेत रूपांतर होण्यासाठी ३० दिवस लागतात. अवटू ग्रंथीत निर्माण होणाऱ्या प्रवर्तकाच्या प्रभावामुळे या  प्राण्याची योग्य मुदतीत वाढ होते. या प्रवर्तकाच्या विरूद्ध गुण असलेले थायोयूरासील हे द्रव्य जर पाण्यात मिसळले, तर या पाण्यात वाढ होणाऱ्या डिप्लोग्लॉससाला प्रौढावस्था प्राप्त होण्यासाठी १५० दिवस लागतात. या प्राण्याची डिंभावस्था दीर्घकालीन होते आणि या अवस्थेत त्याच्या शरीराचा आकार फार मोठा होतो. अशा डिंभांना राक्षसी डिंभ असे म्हणतात. त्यांच्या शरीरातील प्रजोत्पादक ग्रंथींची पूर्ण वाढ होऊन शुक्राणू तयार झालेले असतात.


काही शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ॲक्झोलोटल या प्राण्यात अवटू ग्रंथी कार्यक्षम नसते. त्यामुळे डिंभावस्था दीर्घकालीन असते. परंतु स्थलांतर केल्यावर भोवतालच्या परिस्थितीत घडणाऱ्या हवामानातील बदलामुळे त्याची अवटू ग्रंथी कार्यक्षम होऊन प्रवर्तकाचे स्रवण करते आणि या स्रावाच्या प्रभावामुळे ॲक्झोलोटलाचे अँब्लिस्टोमामध्ये रूपांतर होते.

काही आधुनिक शास्त्रज्ञ मात्र चिरडिंभता या संज्ञेचा वापर वर दिलेल्या काही बाबतीतच न करता जास्त विस्ताराने करतात. बोल्क या मानवशास्त्रज्ञांना गर्भावस्थेतील मानवसदृश कपी आणि पूर्ण वाढ झालेला मानव यांच्यात बरेच समान गुण आढळले. कपीच्या नवजात पिलाच्या कवटीच्या हाडांच्या शिवणी पक्क्या झालेल्या असतात. परंतु मानव ३० वर्षांचा होईपर्यंत या शिवणी पक्क्या होत नाहीत. कारण मानवाच्या मेंदूची पूर्ण वाढ होईपर्यंत कवटी आकारमानाने वाढत असते. नीअँडरथल मानव ही मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अवस्था आहे. मानवसदृश कपी व नीअँडरथल मानव यांच्या भुवयांची हाडे बळकट व मोठी असतात. त्यांना कपाळाची सरळ आणि उभी हाडे नसतात. त्यांचा खालचा जबडा फार मजबूत असतो. खालचा जबडा जेव्हा वरच्या जबड्याशी मिटतो तेव्हा वरच्या जबड्याला हा दाब सहन होण्यासाठी भुवयाची बळकट हाडे फार उपयोगी पडतात. मानवाची कपाळाची हाडे सरळ आणि उभी असतात. त्याच्या भुवयांची हाडे फार बळकट नसतात. तसेच त्याचा खालचा जबडा लहान असल्याने जेव्हा वरच्या जबड्याशी मिटतो तेव्हा वरच्या जबड्यावर थोडाच दाब पडतो व तो सहन करण्यासाठी कपाळाची हाडे उपयोगी पडतात. गर्भावस्थेतील मानवसदृश कपी, पिल्टडाऊन मानव (गृहीत धरलेला सुरुवातीचा आधुनिक मानव) व पूर्ण वाढ झालेला मानव यांची भुवयांची हाडे लहान असतात. म्हणून पिल्टडाऊन मानवाला मानवाचा जवळचा नातेवाईक मानतात.

बोल्क यांनी कपी, मानवसदृश कपी आणि मानव यांच्या शरीरावर उगवणाऱ्या केसांचा अभ्यास केला. त्यांनी काढलेले निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत : (१) कपीच्या नवजात पिलाच्या सर्वांगावर केस असतात (२) जन्मतःच गिबनच्या पिलाच्या डोक्यावर आणि पाठीवर केस असतात (३) जन्मतः गोरिलाच्या पिलाच्या फक्त डोक्यावर केस असतात आणि पिलू जसजसे मोठे होते तसतसे त्याच्या सर्व अंगावर केस उगवतात आणि (४) मानवाच्या नवजात अर्भकाच्या फक्त डोक्यावर केस असतात. बालक जसजसे मोठे होते तसतशी त्याच्या शरीरावर तुरळक लव उगवते. अशा प्रकारे मानवाच्या शरीरावरील केसांची पद्धतशीर पिछेहाट झाली आहे. गोरिलाच्या पिलाला जन्मतःच दात असतात. तर मानवाच्या अर्भकाला ते नसतात. अर्भक जसजसे मोठे होते तसतसे त्याला दात येतात. गोरिलामध्ये प्रजोत्पादक ग्रंथी फार लवकर कार्यक्षम होतात, तर मानव १४ वर्षांचा झाल्यानंतर त्या कार्यक्षम होतात.

वरील अभ्यासावरून बोल्क यांनी असे अनुमान काढले की, मानवाच्या भुवयाची हाडे, केस, दात, प्रजोत्पादक ग्रंथी इत्यादींच्या वाढीमध्ये पद्धतशीर पिछेहाट झाली आहे. म्हणून मानवसदृश कपीच्या पिलात आणि मानवात अनेक समान गुणधर्म आढळतात. हीही एक प्रकारची चिरडिंभता आहे असे त्यांचे मत आहे. 

रानडे, द. र.