तगर : पाना-फुलासह फांदी

तगर–२ : (तगारी म. गु. सगर हिं चांदणी सं. नंदिवृक्ष, बर्हिण, तगर क. कोटुहळ्ळे, दंदिबट्टल इं. मूनबीम, क्रेप जॅस्मिन लॅ. टॅबर्निमोंटॅना कॉरोनॅरिया, एर्व्हाटॅमिया कॉरोनॅरिया कुल-ॲपोसायनेसी). सु. तीन मी. उंच व अनेक फांद्या असलेल्या या सदापर्णी, काटक व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) झुडपाचा प्रसार भारतात सर्वत्र असून सुगंधी फुले व शोभा यांकरिता उद्यानांत याची लागवड करतात. याचे मूलस्थान मलाया व भारत असून उपहिमालयाच्या पट्ट्यात गढवाल ते पूर्वेस आसाम व बंगालपर्यंत आणि दक्षिणेस विशाखापटनम्‌च्या टेकड्यांपर्यंत ते आढळते. पाने साधी, समोरासमोर, हिरवी, चकचकीत, दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी व निमूळत्या टोकाची असून वल्लरीसारखे फुलोरे [→ पुष्पबंध], सामान्यपणे वर्षभर येतात पावसाळ्याच्या आरंभी अधिक येतात. फुले पांढरी शुभ्र, एकेरी किंवा दुहेरी पाकळ्यांची, खाली नळीसारखी व वर पसरट (छत्राकृती) असून फक्त रात्रीच त्यांचा मधुर वास सुटतो. पाकळ्या टोकाशी कुरतडल्यासारख्या असून फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ॲपोसायनेसी अथवा करवीर कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पेटिका फळे २·५–८ सेंमी. लांब, हिरवी, त्रिधारी, वाकडी व आत शेंदरी असतात. बिया ३–६ असून लाल व मांसल अध्यावरणाने (विशेष प्रकारच्या आवरणाने) वेढलेल्या असतात. आखूड व लांब किंजल असलेली अशी दोन प्रकारची फुले भिन्न झाडांवर येतात [→ परागण]. हिंदू लोक ही फुले श्रीमहादेवाच्या पूजेसाठी वापरतात.

तगरीचे लाकूड पांढरे, साधारण कठीण व प्रशीतक (थंडावा देणारे) असते धूप व सुगंधी द्रव्योद्योगात वापरतात. मूळ तिखट व कडू असून वेदनाहारक असल्याने दातदुखीवर चघळतात. इंडोनेशियात मुळांचा काढा अतिसारावर देतात. दुधी चीक कृमिनाशक आहे. तो चीक डोळ्यांच्या विकारांत लिंबांच्या रसाबरोबरच घालतात. फुलांचा रस तेलात मिसळून नेत्रदाहात वापरतात. जखमांवर पानांतील चीक लावतात. बियांवरील अध्यावरणाचा उपयोग सूत रंगविण्यास करतात. नवीन लागवड पावसाळ्यात कलमांनी करतात. चांगली निचऱ्याची कसदार जमीन व भरपूर सूर्यप्रकाश वाढीस अनुकूल ठरतातफुलांना व्यापारी महत्त्व आहे. या वनस्पतीला ‘गोडी तगर’ असेही म्हणतात.

जमदाडे, ज. वि.