न्यू थिएटर्सच्या ‘स्ट्रीट सिंगर’ मध्ये सैगल

न्यू थिएटर्स : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक प्रसिद्ध चित्रपटनिर्मितिसंस्था. बीरेंद्रनाथ सरकार यांनी १९३० मध्ये कलकत्ता येथे इंटरनॅशनल फिल्म क्राफ्ट ही चित्रपटसंस्था स्थापन करून चोर कांटाचाषर मेये हे दोन मूकपट सादर केले परंतु पुढे बोलपटाचा जमाना सुरू झाल्यावर १९३१ साली याच संस्थेचे ‘न्यू थिएटर्स’मध्ये रूपांतर करण्यात आले. देना पवना हा बंगाली भाषेतील न्यू थिएटर्सचा पहिला बोलपट. त्यानंतर १९३२ साली न्यू थिएटर्सने ⇨ कुंदनलाल सैगलच्या सुरुवातीच्या भूमिका असलेले मुहबतके आँसू, सुबह का सितारा, जिंदा लाशजोशे मुहबत हे चार हिंदी बोलपट सादर केले. त्याच वर्षाच्या चंडीदास या बंगाली चित्रपटाने न्यू थिएटर्सला प्रतिष्ठा मिळवून दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवकी बोस यांनी केले होते. दृश्य प्रसंगाची परिणामकारकता पार्श्वसंगीतामुळे कशी वाढू शकते, हे त्यांनी दाखवून दिले. पूरणभक्त (१९३३) हा देवकीबाबूंचा न्यू थिएटर्ससाठी निर्मिलेला पहिलाच हिंदी बोलपट. ह्या चित्रपटाने सुखद पण अंतःकरणाला जाऊन भिडणारे असे काहीतरी नवीन पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांना मिळाला. देवदासने (१९३५) प्रथमेशचंद्र बरुआंना प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रीकरणाच्या दृष्टीने शरदबाबूंच्या मूळ कादंबरीमध्ये थोडा फरक करून बरुआंनी तो सादर केला होता. बंगाली आवृत्तीत त्यांनी स्वतः व हिंदीत के. एल्. सैगल यांनी नायकाची भूमिका केली होती.

बरुआंनी देवदासप्रमाणेच आपल्या मंझील, माया, अधिकार, मुक्ती जिंदगी या चित्रपटांतील कथा सूचकतेने चित्रित केल्या. यांपैकी देवदास, मंझील माया या व्यक्तिगत शोकात्मिका होत्या तर मुक्ती वा जिंदगी मध्ये त्यांनी सामाजिक दोषांमुळे घडणाऱ्या शोकात्मिकांचे विदारक चित्र रंगविले.

देवकीबाबूंनी १९३७ मध्ये विद्यापति सादर केला. ही प्रेमकथा त्यांनी विलक्षण नाजुक व हळुवार पद्धतीने खुलवीत नेली होती. त्यामुळे विद्यापति हे रजतपटावरील एक अभिजात काव्यच ठरले.

१९४१ मध्ये देवकीबाबूंनी मात्र सपेरा या बोलपटात गारुड्यांच्या जमातीची कथा चित्रित केली होती.

नितीन बोस हा न्यू थिएटर्सचा आणखी एक दिग्दर्शक. १९३४ साली चंडीदासची हिंदी आवृत्ती काढून निष्णात छायालेखकाचा तो कल्पक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध पावला. भाग्यचक्र (१९३५ हिंदीतील धूपछाँव ) व दीदी (१९३६ हिंदीतील प्रेसिडेंट ) हे त्याचे आणखी उत्कृष्ट चित्रपट. धरतीमाता, दुष्मन लगन (१९४१) या बोलपटांतून त्याने सामाजिक समस्या कुशलतेने हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बोलपटातील तांत्रिक सफाई डोळ्यात भरण्यासारखी असे. वरील तीन दिग्दर्शकांनी न्यू थिएटर्सला फार मोठे आर्थिक व लौकिक यश मिळवून दिले.

यानंतर सौगंध (१९४२ दिग्दर्शक हेमचंदर), स्ट्रीट सिंगर (१९३८ दिग्दर्शक फणी मजुमदार), यहुदी की लडकी (दिग्दर्शक प्रेमांकुर आयर्टी), बडी दीदी (दिग्दर्शक अमर मलिक), हमराही (१९४५ दिग्दर्शक बिमल रॉय), डॉक्टर (१९४१ दिर्गदर्शक सुबोध मित्तर) हे बोलपट लोकप्रिय ठरले. या दिग्दर्शकांचाही न्यू थिएटर्सची परंपरा टिकविण्यास हातभार लागला होता.

न्यू थिएटर्समध्ये सुबुद्ध व सुजाण दिग्दर्शक होते आणि त्यांनी केवळ आगळ्या, भारदस्त चित्रपटांची निर्मितीच केली होती असे नव्हे, तर सैगल, पृथ्वीराज, बरुआ, पहाडी सन्याल, काननबाला, उमाशशी, नवाब, दुर्गादास बॅनर्जी, अहिंद्र चौधरी, नेमो, जगदीश सेठी, विक्रम कपूर, अमर मलिक, जमुना, असित बरन, रतनबाई, मोलीना, चंद्रावती, राजकुमारी, भारतीदेवी, कमलेशकुमारी, लीला देसाई, संध्यादेवी, मेनका, छबी विश्वास, जहर गांगुली यांसारखे उत्तम कलाकारही निर्माण केले.

रायचंद बोराल, गायक पंकज मलिक व सरोदवादक तिमीर बरन या अभ्यासू संगीत दिग्दर्शकांनी न्यू थिएटर्सच्या चित्रपटांना दर्जेदार संगीत देऊन ते अतिशय लोकप्रिय करून दाखविले तर सैगलने आपल्या गोड आवाजाने बरीच कीर्ती मिळविली. त्यांच्याप्रमाणे अंधकवी के. सी. डे, उमाशशी, काननबाला हेही प्रसिद्ध गायक कलावंत न्यू थिएटर्समध्ये होतेच.

गेल्या २५ वर्षांत न्यू थिएटर्सने एकूण ११४ चित्रपट निर्माण केले परंतु १९४४ साली स्टुडिओला एकाएकी आग लागली व तीत बऱ्याच दर्जेदार चित्रपटांच्या प्रती भस्मसात झाल्या आणि त्या संस्थेची ती मोठीच शोकांतिका ठरली. बिलम रॉय यांचे हमराही (१९४५) व अंजनगड (१९४८) हे त्या संस्थेचे अखेरचेच चांगले चित्रपट. त्यानंतर चित्रपटनिर्मिती झाली, पण हे चित्रपट न्यू थिएटर्सला सावरू शकले नाहीत. न्यू थिएटर्सचा बोधचिन्ह असलेला हत्ती १९५६ साली कायमचाच पडद्याआड गेला.

वाटवे, बापू