ललिता पवार

पवार, ललिता : (१६ एप्रिल १९१८– ). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. जन्म इंदूर येथे. पूर्वाश्रमीचे नाव अंबिका लक्ष्मण सगुण. शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत. १९२८ साली आर्यमहिला या मूकपटात सर्वप्रथम  भूमिका. त्यानंतर गनिमी कावा (१९२८), जी. पी. पवारदिग्दर्शित ठकसेन राजपुत्र ( १९२९ ), समशेर बहादूर (१९३० ),चतुर सुंदरी ( १९३०), पृथ्वीराज संयोगिता (१९३०), दिलेर जिग़र (१९३१) इ.मुकपटांत त्यांंनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. मुंबईच्या चंद्र आर्ट‌्सच्या हिम्मते मर्दा (१९३५) या बोलपटात त्या नायिका होत्या. हाच त्यांचा पहिला बोलपट. पुढे १९३८ मध्ये टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून दुनिया क्या हे ? (१९३८) हा चित्रपट त्यांनी निर्मिला आणि त्यात भूमिकाही केली. त्यातील गाणी त्यांनी स्वतःच म्हटली होती. भालजी पेंढारकरलिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या नेताजी पालकर (१९३९ ) या चित्रपटात काशी  या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. यांखेरीज त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे अमृत (१९४२ ), गोराकुंमार, जय मल्हार (१९४७), रामशास्त्री (१९४४), अमर भूपाळी (१९५१), मानाचं पान (१९५०), चोरीचा भामला (१९७६) आणि हिंदी चित्रपट दहेज (१९५०), परछाई (१९५२), दाग, श्री ४२०, अनाडी, जंगली, प्रोफेसर, घराना, खानदान , घर बसा के देखो, परवरिश, सास मी कभी बहू थी, बहूरानी आनंद हे होत. ललिता पवारांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब आहे . त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहऱ्‍यावरील भावप्रकटनात चापल्य आहे. त्यामुळे खानदानी, तडफदार भूमिका तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकतात. आतापर्यंत त्यांनी सु. तीनशे चित्रपटांतून विविध भूमिका केल्या आहेत. त्यांमध्ये मराठामोळा तरुणीपासून ( जय मल्हार—१९४७ व मानाचं पान – १९५० ), तर वृद्धेपर्यंतच्या ( अमर भुपाळी–१९५१ व परछाई—१९५२) अनेक भूमिका आहेत. दहेज (१९५०), सतीचं वाण (१९७०) व सासुरवाशीण (१९७७) यांतील खाष्ट सासू, तर अनाडी (१९६०) मधील डिसा ही प्रेमळ घरमालकीण, परवरिश (१९५९)  मधील संसारदक्ष साधीसुधी गृहिणी व आनंद (१९७०) मधील सहृदय ख्रिश्चन परिचारिका यांसारख्या परस्परविरोधी व्यक्तिरेखा ललिताबाईनी प्रभावीपणे उभ्या केल्या.

त्यांना १९६१ सालचे संगीत नाटक अकादेमी पारितोषिक व १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून गृहस्थी,सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत मूकपटापासून बोलपटापर्यंतच्या सु.पाच दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेल्या ललिता पवार चरित्रनायिका म्हणून विशोष लक्षात राहतात.

वाटवे, बापू