चित्रपट : चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले सर्जनशील असे बहुजन-माध्यम असून लोकरंजनाचे व लोकशिक्षणाचे एक प्रभावी साधन आहे. पडद्यावरील हालत्याचालत्या प्रतिमांतून जीवनाचे दर्शन घडविणारी ही गुंतागुंतीची कला छायाचित्रण आणि इतर तांत्रिक कौशल्य यांचे अपत्य होय. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून चित्रपटकलेचा विकास सातत्याने होत आला आहे.

चलत्‌चित्रणाचा शोध लागल्यानंतर चित्रपटकलेचा जन्म झाला. यातून मूकचित्रपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले व बोलत्या चित्रपटांचा कालखंड सुरू झाला. वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे चित्रपटनिर्मितीची नवीन नवीन अंगे विकसित होत गेली. विसाव्या शतकात अतिशय वेगाने चित्रपटकलेचा नाना अंगांनी विकास घडून आला. एका प्रचंड व्यवसायात तिचे रूपांतर झाले. प्रस्तुत लेखाच्या या पहिल्या भागात चित्रपटकलेच्या कलात्मक व तांत्रिक विकासाचा स्थूल आढावा घेतलेला आहे. त्याबरोबरच चित्रपटनिर्बंध, चित्रपटाचे लेखाधिकार (कॉपीराइट), चित्रपटनिर्मितीचा उद्योग, चित्रपटविषयक प्रशिक्षण, चित्रपटमहोत्सव, चित्रपटपुरस्कार व पारितोषिके या विषयांची ढोबळ रूपरेषा दिलेली आहे. दुसऱ्या भागात जगामधील प्रमुख देशांतील व तिसऱ्या भागात भारतातील विविध भाषिक चित्रपटांची, मुख्यतः ऐतिहासिक दृष्टीने माहिती दिलेली आहे.

फेनॅकिस्टोस्कोप डिस्कप्रॅक्झिनोस्कोपछायाचित्रणातील क्रांतिकारक टप्पा म्हणजे चलत्‌चित्रण किंवा हालत्याचालत्या वस्तूंचे क्रमशः छायाचित्रण हा होय. एकोणिसाव्या शतकात या दृष्टीने काही प्रयोग व प्रयत्न करण्यात आले होते. डॉ. पीटर मार्क रॉझे नावाच्या संशोधकाने २४ डिसेंबर १८२४ रोजी रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेस ‘हालत्याचालत्या वस्तूंचे दृश्यसातत्य’ या विषयावर एक निबंध सादर केला. १८२६ साली सर जॉन हर्शेल याने शिलिंगचे एक नाणे भोवऱ्यासारखे उभे फिरवून, त्या नाण्याच्या दोन्ही बाजू डोळ्यांना एकाचवेळी कशा दिसू शकतात, ते आपल्या बॅबेज नावाच्या मित्राला प्रात्यक्षिक करून दाखविले होते. १८३४ साली विल्यम जॉर्ज हॉर्नर या संशोधकाने स्थिरचित्रे हालतीचालती दिसतील असा झोइट्रोप (व्हील ऑफ लाइफ) नावाचा एक प्रयोग केला होता. त्या अगोदर १८३२ साली बेल्जियन शास्त्रज्ञ जोजेफ आन्तवान फर्डिनांड प्लातो याने फेनॅकिस्टोस्कोपचा शोध लावला. याखेरीज १६४० साली रोमच्या आटानाझिउस किर्खर याने तयार केलेला चित्रदीप अनेक प्रतिष्ठित मंडळींनी पाहिल्याची नोंद आहे. त्याचे नाव मॅझिआ कॅटोप्ट्रिका होते तसेच कॅटोप्ट्रिका होते तसेच १८६० साली फिलाडेल्फियाच्या कोल्मन सेलर्झ याने छायाचित्रांच्या मालिकेत हालचाल दाखविता येईल, अशी कल्पना मांडली होती. १८५३ साली एका ऑस्ट्रेलियन लष्करी अधिकाऱ्याने तशाच तऱ्हेच्या तबकडीला चित्रदीपाच्या प्रकाशाची जोड देऊन तबकडीवरील चित्रे पडद्यावर दिसतील अशी व्यवस्था केली. त्यानंतर रेनो नावाच्या गृहस्थाने आरशाचा उपयोग करून एक उपकरण तयार केले (१८७६) त्याचे नाव प्रॅक्झिनोस्कोप होते. या उपकरणातील एकेका आरशावर एकेका चित्राचे प्रतिबिंब पडे आणि ते हालचाल करीत असलेले दिसे. ते साल होते १८७७. अशा प्रकारे अनेक प्रयोग केल्यानंतर १८९२ साली त्याने थिएटर ऑप्टिक पॅरिसमध्ये सुरू केले. त्यात स्वतः रेखाटलेली कथात्मक चित्रावली दाखवून तो पंधरा-वीस मिनिटांचा कार्यक्रम सादर करी. १८७२ साली एडवर्ड माइब्रिज नावाचा एक छायाचित्रकार पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्याने छायाचित्रे घेण्याच्या कामगिरीवर होता. त्याच वेळी कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर आणि त्याचे काही मित्र यांच्यामध्ये एक वाद उपस्थित झाला. घोडा भरघाव धावत असताना एकाच वेळी तो आपले चारही पाय जमिनीच्या वर उचलतो की काय हा वादाचा मुद्दा होता. हा वाद एडवर्ड माइब्रिजच्या कानावर गेला तेव्हा गव्हर्नरच्याच सूचनेवरून त्याने त्या प्रश्नावर अनेक दिवस विचार केला व अखेर एक युक्ती शोधून काढली. त्या युक्तीप्रमाणे प्रथम १२ कॅमेरे टप्याटप्यावर ठेवून त्याने एक प्रयोग केला परंतु समाधानकारक निर्णय न लागल्याने नंतर एक एक फूट अंतरावर २४ कॅमेरे त्याने ओळीने लावून ठेवले आणि घोडे धावताना आपोआपच एकेच छायाचित्र टिपले जाईल अशी व्यवस्था केली (१८७७).

मारेची फोटोग्रॅफिक गन

याच्या पुढचे पाऊल टाकले फ्रान्सच्या एटयेन झ्यूल मारे या संशोधकाने. १८८२ साली छायाचित्रीकरणासाठी त्याने एक फोटोग्रॅफिक गन तयार केली. तिचा घोडा दाबला की, एका वेळी एक दृश्य छायाचित्रित होत असे. नंतर त्यातही काही यांत्रिक सुधारणा करून, त्याने जॉर्ज डेमिनी नावाच्या एका साहाय्यकाच्या मदतीने क्रोनोफोटोग्राफ नावाचा एक नवीन कॅमेरा तयार केला. त्याच्या भिंगामागून आडव्या दिशेने सरकणाऱ्या फिल्मवर दर सेकंदाला ६० चित्रे टिपता येत असत. जॉर्ज ईस्टमन नावाच्या न्यूयॉर्कमधील एका कल्पक गृहस्थाने १८८५ साली चलत्‌चित्रणासाठी उपयोगी पडेल अशी फिल्मची फीत तयार केली. तिच्यात आणखी सुधारणा करून १८८९ साली सध्या उपयोगात असलेली फिल्म तयार झाली. हा चित्रपटकलेच्या प्रगतीचा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे. फिल्म तयार झाल्यानंतर त्या फिल्मचा उपयोग करून चलत्‌चित्रीकरण करता येईल असा कॅमेरा विल्यम फ्रीझ ग्रीन याने तयार केला व चलत्‌चित्रीकरण आणि चित्रप्रक्षेपण या बाबतींत बरीच प्रगती केली. म्हणूनच त्याला चित्रपटकलेचा जनक मानतात. १८८९ साली एल्.ए.ए.लि प्रिन्स या फ्रेंच संशोधकानेही असाच सिनेकॅमेरा तयार करण्यात यश मिळविले होते.

एडिसनचा कायनेटोस्कोपएडिसनेही १८८९ साली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायनेटोग्राफ आणि कायनेटोस्कोप तयार केले. कायनेटोग्राफने चित्रित केलेली फिल्म कायनेटोस्कोपद्वारा पीप  शोसारखी दाखविली जाई. फ्रान्समध्येही ल्यूम्येअर बंधूंनी चलत्‌चित्र प्रक्षेपक तयार केला व २८ मार्च १८९५ रोजी लंच अवर ट द ल्यूम्येअर फॅक्टरी  हा पहिला चलच्चित्रपट तेथील एका भागात दाखविला तर २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिस येथील ग्रॅंड कॅफेमध्ये करमणुकीचे एक साधन म्हणून चार्ज ऑफ द ड्रॅगन्स  नावाचा सु. १५ मी. (५० फूट) लांबीचा एक चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आला. नंतर १८९६ च्या २० फेब्रुवारी रोजी लंडनचा रॉयल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्येही असाच एक प्रयोग करण्यात आला. चलत्‌चित्रप्रक्षेपकात महत्त्वाच्या सुधारणा टॉमस अरमॅट याने केल्या. अशा प्रकारचा सुधारलेला चलत्‌चित्रप्रक्षेपक म्हणजेच व्हिटास्कोप होय. पूर्वी दृश्यांचे चित्रीकरण सूर्यप्रकाशात उघड्या जागी होत असे. पुढे १८९३ साली फेब्रुवारीमध्ये वेस्ट ऑरेंज येथे एडिसनने अंतर्गृह चित्रीकरणासाठी ब्लॅक मारिआ नावाचे पहिले चित्रपटनिर्मितीगृह बांधले.

ल्यूम्येअरचा प्रोजेक्टरफिल्मच्या साहाय्याने एखादी गोष्ट किंवा कथानक दाखविण्याचा प्रयत्न अमेरिकेत प्रथम १८९७ साली झाला. आर्. जी. हॉलमन याने रंगभूमीवर कामे करणाऱ्या कलावंताचा आणि कृत्रिम देखाव्यांचा उपयोग करून कथानक असलेले एक चित्रपट तयार केला होता, त्याचे नाव पॅशन प्ले  होते. हा सु. ६५६ मी. लांबीचा चलत्‌चित्रपट होता. त्याच दरम्यान इंग्लंड व फ्रान्स या देशांतही कथानक असलेले चित्रपट तयार होऊ लागले होते. सोल्जर्स कोर्टशिप  हा कथानक असलेला प्रारंभीचा चित्रपट होय. परंतु खऱ्या अर्थाने चित्रपटाचा जन्म १९०३ साली झाला. त्या वर्षी एडविन एस्. पोर्टर याने काही तंत्रज्ञांच्या साहाय्याने द ग्रेट ट्रेन रॉबरी   हा सु. २४४ मी. लांबीचा कथाचित्रपट तयार केला. या चित्रपटात आजच्या संकलनकलेची बीजे होती. संकलनकलेच्या बाबतीत निरनिराळे प्रयोग करून नवेनवे तंत्रप्रकार प्रचारात आणण्याचे श्रेय रशियन तंत्रज्ञांकडे जाते. ⇨स्पिर्ग्येई आयसेन्स्तीन  आणि ⇨व्हस्येव्हलत पूडॉव्हकिन  यांनी चित्रपटविषयक व मुख्यतः संकलनविषयक बरेच प्रयोग रूढ केले. त्यांतील निकट छायाचित्र, पूर्वदृश्यचित्रण व दृश्यमिश्रण इ. प्रकार उल्लेखनीय आहेत. २१ एप्रिल १९१३ रोजी ८ रिळांचा व सु. दोन तास चालणारा को वादीस  हा 'द ग्रेट ट्रेन रॉबरी', आद्य अमेरिकन कथाचित्रपट, १९०३.पहिला इटालियन चित्रपट दाखविण्यात आला. अशाप्रकारे कथानकांवर आधारलेले चित्रपट तयार होत असतानाच, अंशतः किंवा पूर्णतः विनोदी असलेले चित्रपटसुद्धा तयार होत होते व त्यांना भरपूर लोकप्रियता मिळत होती. त्या क्षेत्रात चार्ल्‌स चॅप्लिन या कलावंताचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. त्याने १९१३ साली चित्रपटसृष्टीत प्रथम पदार्पण केले आणि अनेक चित्रपटांत स्वतः भूमिका करून त्यांचे दिग्दर्शनही केले. हे सर्व चित्रपट मूकचित्रपट होते. १९०७ सालच्या सुमारास कथानकातील घटना, संवाद किंवा संदर्भ स्पष्ट करण्यासाठी पडद्यावर उपशीर्षके (सबटायटल्स) दाखविण्याची प्रथा सुरू झाली. सप्टेंबर १९०८ मध्ये एक्लेरने (फ्रान्स) निक कार्टर  ही पहिली सिरिअल फिल्म दाखवायला सुरुवात केली. याच सुमारास चित्रपट रंगीत व बोलके करण्यासाठी प्रयोग चाललेले होते. १८६१ साली जेम्स क्लार्क मॅक्सवेल याने पहिले रंगीत छायाचित्र सादर करण्याचा यशस्वी  प्रयत्न केला. तसाच एक प्रयोग १८६२ साली फ्रान्समध्ये लुई द्युको द्यु होराँ याने केला होता. सूर्यप्रकाशातील विशिष्ट रंग आकर्षित करून ते ग्रहण करणारा रासायनिक लेप लावलेली एक फिल्म त्याने तयार केली होती. या पद्धतीला मोनोपॅक कलर असे नाव होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अनेकांनी रंगीत चित्रपट तयार करण्याचे प्रयत्न केले. जेंकिन्झ चार्ल्‌स फ्रान्सिस नावाच्या तरुणाने नाबेल द डान्सर  या नावाचा एक चित्रपट तयार केला. त्यातील प्रत्येक चित्र त्याने हाताने रंगविले होते. भारतातही रंगीत चित्रपट याच पद्धतीने तयार करीत असत. १९०५ साली शार्ल पाथेने रंगीत चित्रपट तयार करण्यासाठी एक नवीन पद्धत उपयोगात आणली. नंतर जुलै १९०६ च्या सुमारास इंग्लंडमध्ये चार्ल्‌स अर्बन आणि जी. आल्बर्ट स्मिथ यांनी किनेमाकलर नावाची दुरंगी चित्रपट तयार करण्याची पद्धती प्रचारात आणली. अर्बनच्या कल्पनेची नक्कल करण्याचे प्रयत्न अनेक देशांत अनेकांकडून झाले आणि तशाच प्रयत्नांतून विल्यम फ्रीझ ग्रीन याने बायोकलरची पद्धती शोधून काढली. १९०८ साली ⇨डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ  या नाट्यकलावंताचे नट व लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आगमन झाले. चित्रपटतंत्राचा जनक म्हणून त्याचा प्रभाव पुढे दहा वर्षे तरी चित्रपटसृष्टीवर होता. १९११ ते १९१४ या काळात चित्रपटसृष्टीची झपाट्याने प्रगती होत गेली व चित्रपटाची लांबी सु. ३०५ मी.पर्यंत वाढली.

पहिले जागतिक महायुद्ध (१९१४) सुरू झाल्यामुळे चित्रपटविषयक तांत्रिक प्रयोग आपोआपच थंडावले परंतु तेवढ्यातच (१९१५) हर्बर्ट टी. काल्मुर याने टेक्निकलर फिल्म तयार केली. फ्लॉरिडामध्ये १९१८ च्या सुमारास द गल्फ बिट्‌वीन  हा पहिला टेक्निकलर चित्रपट तयार करण्यात आला होता. मूकपटांच्या जमान्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण रंगीत चित्रपट म्हणजे डग्लस फेअरबॅंक्सचा १९२५ सालचा द ब्लॅक पिरेट  हा होय. वॉल्ट डिझ्नी याने १९३२ मध्ये तयार केलेला फ्लॉवर्स अँड ट्रीज  हा तिरंगी चित्रपट बराच निर्दोष होता. त्यानंतर बेकी शार्प  आणि गॉन विथ द विंड  हे अत्यंत यशस्वी चित्रपट अनुक्रमे १९३५ व १९३९ साली तयार झाले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर तिरंगी चित्रपटांना फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले. कारण जर्मनीच्या आग्फा कलर, बेल्जियमच्या गेव्हा कलर आणि इटलीच्या फेरानिया कलर पद्धतीचे रंगीत चित्रपट भराभर लोकप्रिय होऊ लागले. अमेरिकेच्या ईस्टमन कलरने कोडॅक्रोम नावाची रंगीत फिल्म १९३५ साली प्रचारात आणून हौशी चित्रपटनिर्मात्यांची चांगलीच सोय केली. ही फिल्म १६ मिमी. आकाराची असून नंतर ८ मिमी.ची फिल्म निघाली.

रंगीत चित्रपटांच्या बाबतीत असे प्रयोग चालू होते, तसेच मूक चित्रपटांना आवाजाची जोड देऊन ते बोलके करण्यासाठीही प्रयत्न चालू होते. त्या दिशेने पहिला प्रयत्न १८५७ साली झाला होता. फ्रान्समध्ये लेऑन स्कॉट याने धुरकट कागदावर ध्वनिलहरी रेखांकित केल्या होत्या. त्याचप्रमाणे ध्वनिलहरींचे विद्युत्‌लहरीत रूपांतर करण्याच्या बाबतीत इंग्लंडच्या क्लार्क मॅक्सवेल व अलेक्झांडर ग्रॅहम यांनी संशोधन करून तऱ्हेतऱ्हेची विद्युत उपकरणे तयार केली होती. अमेरिकेत एडिसननेसुद्धा १८७७ च्या सुमारास एका खास चितीवर ध्वनिलेखन करून परत ते एेकण्याची व्यवस्था केली होती. त्याने आपल्या फोनोग्राफ यंत्राच्या साहाय्याने मूक चित्रांना आवाजाची जोड देण्यात यश संपादन केले होते.

इंग्लंडच्या डोनिस्थोर्पे याने १८७८ सालीच ध्वनिलेखनविषयक शोध सूचित केला होता आणि १९०० च्या सुमारास यूजीन याने फिल्मवर ध्वनिलेखन करण्याची प्राथमिक पद्धती'द जाझ सिंगर', आद्य बोलपट, १९२७. शोधून काढली होती. डॉ. ली. डी. फॉरेस्ट आणि एच्. डी. आर्नल्ड यांनी ध्वनिक्षेपण दूर अंतरापर्यंत पोहोचवू शकेल असे एक साधन तयार केले (१९०७) परंतु आर्थिक अडचणीमुळे त्याचे प्रात्यक्षिक १९१२ साली ते करून दाखवू शकले. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात दूरदूरच्या ठिकाणी संदेश पोहोचविण्याच्या कामी त्याची फार मदत झाली. युद्ध संपल्यावर मात्र त्यांनी आपले लक्ष फिल्मवरील ध्वनिमुद्रणाकडे वळविले आणि ध्वनिलहरीचे प्रकाशलहरीत रूपांतर करून फिल्मवर ध्वनीमुद्रण करता येईल, अशी यांत्रिक साधनसामग्री तयार करण्यात बरेच यश मिळविले. इतरांनीही आपापल्या कल्पनेप्रमाणे अशी उपकरणे तयार करण्याचा प्रयत्न केला. १९१९-२० साली जर्मनीत अशा उपकरणांचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. १९२३ साली त्याला पूर्ण स्वरूप आले. १९२६ सालच्या ६ ऑगस्टपासून बेल टेलिफोन प्रयोगशाळेने ध्वनिमुद्रण केलेली एक मोठी तबकडी तयार करून एक रीळ (सु.१,००० फूट = ३०५ मी.) चित्रपटाला आवाजाची सुयोजित जोड देण्याची पद्धती प्रथम सुरू केली. याच पद्धतीचा वॉर्नर ब्रदर्स कंपनीने उपयोग करून ६ ऑगस्ट १९२६ रोजी डॉन जुआन  हा चित्रपट दाखविला. त्याच वर्षी ट्‌वेंटीएथ सेंचरी कंपनीने २८ ऑक्टोबर १९२७ रोजी ध्वनिमुद्रित फिल्मचा उपयोग करून लघुचित्रपट व मुव्हिटोन वार्तापट सुयोजित आवाजासह दाखविण्यात सुरुवात केली आणि वॉर्नर ब्रदर्स कंपनीने ७ ऑगस्ट १९२७ रोजी द जाझ सिंगर   हा बोलपट सादर केला. १९३० सालच्या सुमारास मूकपटांचा जमाना संपला. मात्र तबकडीवरील ध्वनिमुद्रण जाऊन फिल्मवरील ध्वनिलेखन केलेले बोलपट दाखविण्यासाठी उपकरणे तयार करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपापसांत बरेच तंटेबखेडे माजले व १९३५ साली ते सर्व सामोपचाराने मिटले. १९२९ साली ब्लॅकमेल हा ⇨ल्फ्रेड हिचकॉकदिग्दर्शित पहिला ब्रिटिश बोलपट तयार झाला. २२ ऑक्टोबर १९२९ रोजी लंडनच्या न्यू गॅलरी सिनेमात ए थ्रो ऑफ डाइस  हा परदेशी तंत्रज्ञांनी भारतात बनविलेला बोलपट दाखविण्यात आला होता. त्याची नायिका होती सीतादेवी. त्यात संवाद नव्हते परंतु परिणामकारक चित्रध्वनी होते आणि वाघाची शिकार हा त्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग होता. हा चित्रपट जर्मनीतही दाखविला गेला. १९३०–५२ पर्यंतच्या काळात तांत्रिक बाबतीत बऱ्याच सुधारणा झाल्या. सिनेरॅमा पद्धतीने ध्वनिमुद्रण आणि ध्वनिक्षेपण होऊ लागले. ते रुंद पडदा पद्धतीला पूरक असते, परंतु या पद्धतीचे बोलपट दाखविण्यासाठी चित्रपटगृहात महत्त्वाचे बरेच बदल करावे लागतात. यानंतर अधिक सोपी व सोयीची अशी सिनेमास्कोप पद्धती पुढे आली. त्यानंतर परफेक्ट-ए-साऊंड नावाची आणखी एक पद्धती रूढ झाली. यांखेरीज व्हिस्टा व्हिजन, टॉड-ए-ओ सिनेमिरॅकल इ. अनेक प्रयोगही करण्यात आले. त्याचप्रमाणे डी लक्स कलर, मेट्रो कलर यांनी तर टेक्निकलर पद्धतीच्या बाबतीतच नव्हे, तर साध्या फिल्मच्या बाबतीतही बरीच पुढची मजल गाठली.

चित्रपटांचे प्रकार  :  चित्रपटाच्या ऐतिहासिक विकासक्रमात दीर्घ लांबीच्या कथाप्रधान चित्रपटांबरोबरच व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धिपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट यांसारखे अनेक प्रकार उदयास आले. त्यांपैकी मुख्य आकर्षण कथाचित्रपटांचेच होते. हे कथाचित्रपट पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक इ. विषयांवरील असतात.

चित्रपटकलेचा इतिहास घडत व्यंगचित्रपटांचाही जन्म झाला. कथानकावर आधारलेला चित्रपट ज्यावेळी जन्मास आला, त्याच सुमारास व्यंगचित्रपटदेखील अस्तित्वात आला होता. गेम ऑफ प्लेइंग कार्ड्‌स   हा चित्रपट तयार करणाऱ्या झॉर्झ मिली व आर्. डब्ल्यू. पॉल यांनी व्यंगचित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यंगचित्रपटाचे जनकत्व त्यांना देण्यात येते परंतु १९०८ साली एमील कोल याने जो सु. ३१ मी. लांबीचा फॅंटास्मागोरिया  हा प्राथमिक स्वरूपाचा व्यंगचित्रपट तयार केला होता, तोच खऱ्या अर्थी पहिला व्यंगचित्रपट मानला जातो. त्या व्यंगचित्रपटासाठी त्यावेळी त्याला वेगवेगळ्या हालचालींची दोन हजार चित्रे रेखाटावी लागली होती परंतु पूर्णत्वाला पोहोचलेल्या रिलक्टंट ड्रॅगन  यासारख्या व्यंगचित्रपटासाठी तर वॉल्ट डिझ्नीला निरनिराळ्या वीस हजार चित्रांचा उपयोग करावा लागला. १९२८ साली त्याच्या एका बोलक्या व्यंगपटात मिकी माऊसचा प्रथम अवतार झाला. १९३७ साली डिझ्नीने स्नो व्हाईट अँड द सेव्हन ड्‌वार्फ्‌स  हा पहिला व्यंगचित्रपट तयार केला. साध्या वा रंगीत बोलपटांप्रमाणेच व्यंगचित्रपटदेखील अतिशय लोकप्रिय झाले व त्याच प्रमाणात अधूनमधून रंगीत बोलक्या व्यंगचित्रपटांची निर्मिती होऊ लागली.

चित्रपटकलेच्या उदयापासूनच वार्तापट तयार केले जात होते. २५ मार्च १८९६ रोजी डर्बीचा एक चित्रपट तयार करून तो प्रेक्षकांना दाखविण्यात आला होता खरा परंतु त्याला खऱ्या अर्थाने वार्तापटाचे महत्त्व प्राप्त झाले नव्हते. त्यानंतर ल्यूम्येअर बंधूंच्या एका प्रतिनिधीने आपल्या व्यावसायिक दौऱ्यात १९०१ साली व्हिक्टोरिया राणीच्या अंत्ययात्रेचा एक चित्रपट तयार केला होता. त्याला मात्र पहिल्या वार्तापटाचा मान देण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमाचा एवढा प्रभाव पडला, की त्याचा उपयोग करून ठिकठिकाणच्या घटना चित्ररूपाने टिपण्याची व पडद्यावर दाखविण्याची प्रथा सुरू झाली. वृत्तपत्राप्रमाणेच वार्तापटसुद्धा नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागले. पाथे वीकली  नावाचा साप्ताहिक वार्तापट १९०९ सालापासून दाखविण्यात येऊ लागला व तेव्हापासून अनेकांनी आपापल्या देशातील घटना धंदा या दृष्टीने वार्तापटाच्या स्वरूपात दाखविण्यात सुरुवात केली. धंदा म्हणून प्रथम पाथे आणि लीऑन फ्रॅंकोनी यांनी फ्रान्स व अमेरिकेत वार्तापट प्रदर्शित करण्यास प्रारंभ केला.

अनुबोधपटाला खरी सुरुवात १८९६ मध्ये झाली. ल्यूम्येअर (फ्रान्स), एडिसन (अमेरिका), मायब्रिज (अमेरिका) यांच्या चित्रपटांचा प्रारंभच मुळी अनुबोधपटांनी झाला होता. एखादा विषय सुसूत्र आणि कलात्मक पद्धतीने कॅमेऱ्याच्या साह्याने टिपून त्याचा ठराविक लांबीचा स्वयंपूर्ण असा लघुचित्रपट तयार करणे, हे या नव्या चित्रपटप्रकाराचे स्वरूप आहे. अनुबोधपट म्हणजे व्यक्ती अगर वस्तू यांची विस्तृत चित्ररूप नोंदच असते. रॉबर्ट फ्लाअर्टी याने ननूक ऑफ द नॉर्थ  नावाचा एक लघुचित्रपट तयार केला (१९२२). तोच जगातील पहिला अनुबोधपट होय. यादृष्टीने रॉबर्ट फ्लाअर्टी हा अनुबोधपटाचा जनक ठरतो. याखेरीज रशिया (१९२३), फ्रान्स (१९२६), जर्मनी (१९२७) व इंग्लंड (१९२९) इ. देशांतही अशा प्रकारचे लघुचित्रपट तयार झाले. ड्रिफ्ट्स  या नावाचा एक लघुचित्रपट १९२९ साली जॉन ग्रीअर्सन याने तयार केला होता. तेव्हा त्याने त्यासाठी ‘डॉक्युमेंटरी’ हा शब्द प्रथम प्रचारात आणला. तेव्हापासून अशा लघुचित्रपटांना अनुबोधपट किंवा माहितीपट म्हटले जाते. त्यात जरुरीप्रमाणे संवाद, गाणी किंवा पार्श्वसंगीत आणि दृश्यांचा खुलासा करणारे धावते समालोचन असते.

अनुबोधपटांना त्यांच्या विषयाप्रमाणे नावे देण्याची पद्धत आहे. उदा., केवळ माहिती देणारा तो माहितीपट, सांस्कृतिक विषयावर आधारलेला तो सांस्कृतिक चित्रपट, शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचा तो शैक्षणिक चित्रपट इत्यादी. सु. ३०–४० वेगवेगळ्या स्थिर चित्रांचा (फ्रेम्सचा) एखादा लघुतम चित्रपटसुद्धा असू शकतो. तो व्याख्यान देताना स्पष्टीकरणासाठी वापरतात. त्याला स्ट्रिप फिल्म म्हणतात. खास मुलांसाठी बालचित्रपट तयार केले जातात. चित्रपटगृहात मुख्य चित्रपट दाखवण्यापूर्वी आगामी चित्रपटातील आकर्षक दृश्यांचा जो एक लघुचित्रपट दाखविला जातो, तो ट्रेलर अर्थात चित्रझलक होय.

मालाची जाहिरात करण्यासाठी मुख्य चित्रपट सुरू होण्यापूर्वी अथवा मध्यंतरानंतर प्रसिद्धिपट प्रदर्शित करतात. मुंबईत १९१० साली बर्न्स स्टर्लाइज्ड मिल्क  हा प्रसिद्धिपट सर्वप्रथम प्रदर्शित झाला. लिव्हर ब्रदर्स लि. या कंपनीने १९३७-३८ च्या सुमारास आपल्या लिंटास लि. नावाच्या जाहिरात-संस्थेमार्फत लहान लहान प्रसिद्धिपट तयार केले. ते फिरत्या गाड्यांतून मोकळ्या मैदानावर गावोगावी दाखविले जात. १९४५-४६ च्या आसपास रंगीन चुटकिया  हा एक रंगीत प्रसिद्धिपटही काढण्यात आला होता. असे प्रसिद्धिपट चार ते साडेचार मिनिटे चालणारे असून सु. १२२ मी. लांबीचे असत. पुढे प्रसिद्धीपटांची लांबी कमी करण्यात येऊन सु. ५० सेकंद चालणारे सु. २३ मी. लांबीचे प्रसिद्धीपट प्रदर्शित होऊ लागले. भारतात रंगीत फिल्मचा फायदा प्रथम प्रसिद्धिपटांनीच मिळविला. मात्र रंगीत प्रसिद्धिपट एका मिनिटाहून अधिक चालणारा असता कामा नये, असे बंधन आहे. प्रसिद्धिपट तयार करणाऱ्या काही संस्था भारतात आहेत, तसेच जाहिरात-संस्था स्वतः प्रसिद्धिपट निर्माण करून मालाची जाहिरात करीत असतात. जागतिक स्तरावर प्रसिद्धिपटांचे महोत्सव दरवर्षी साजरे होत असतात. व उत्कृष्ट प्रसिद्धिपटांना पारितोषिकेही दिली जातात.

'डेझर्ट व्हिक्टरी', ब्रिटिश युद्धपट, १९४३.

चित्रपट हे प्रचाराचे व शैक्षणिक प्रसाराचे एक परिणामकारक माध्यम असल्यामुळे जगातील व अनेक राष्ट्रांनी आपापल्या सैन्यदलांतील सैनिकांना जरूर ते लष्करी, आरमारी आणि हवाई शिक्षण देण्यासाठी चित्रपटांचा उपयोग करून घेतला. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात, अमेरिकेत ‘ऑफिस ऑफ इंटरअमेरिकन अफेअर्स’, ‘ऑफिस ऑफ इन्फर्मेशन’ आणि ‘वॉर प्रॉडक्शन बोर्ड’ यांसारख्या समित्या युद्धविषयक आणि सैनिकी प्रशिक्षणविषयक चित्रपटनिर्मिती करीत होत्या. युद्धानंतर त्या बंद करण्यात आल्या असल्या तरी ‘ऑफिस ऑफ इंटरनॅशनल इन्फर्मेशन ॲड कल्चरल को ऑपरेशन’ या समितीतर्फे जरुरीप्रमाणे आणि जरूर तेव्हा महत्त्वाचे सैनिकी चित्रपट तयार केले जातात. इंग्लंडमध्येही दुसऱ्या महायुद्धकाळात लष्कर, आरमार आणि हवाई दल यांच्याकरिता प्रचारात्मक, प्रशिक्षणात्मक आणि मनोरंजक चित्रपट तयार करण्यासाठी, युद्धखात्याच्या अधिकारक्षेत्रात चित्रपटनिर्मिती करण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. तिन्ही दलांतील उच्च अधिकारी अशा निर्मितीचे सल्लागार अगर सूत्रधार असत. ‘आर्मी किनेमॅटोग्राफ कॉर्पोरेशन’ आणि ‘रॉयल नेव्हल फिल्म कॉर्पोरेशन’ या खास संस्था तेच कार्य करीत असत.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतातही एक सैनिकी चित्रपट विभाग सुरू करण्यात आला होता. त्यावेळच्या हिंदुस्थान सरकारने १९४०-४१ च्या दरम्यान ‘जनरल स्टाफ ट्रेनिंग फिल्म सेंटर’ या नावाने एक चित्रपटनिर्मिती विभाग एका लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरू केला. त्या विभागाने तयार केलेल्या लष्करी चित्रपटांची उपयुक्तता पाहून त्या विभागाची वाढ करण्यात आली आणि तो विभाग ‘कंबाइंड किनेमॅटोग्राफ सर्व्हिसेस फिल्म प्रॉडक्शन ग्रुप’ या नावाने ओळखला जाऊ लागला. या विभागाने कथाचित्रपट, माहितीपट इ. विविध प्रकारचे अनेक देशी चित्रपट तयार केले होते. ३१ मार्च १९४७ रोजी हा सैनिकी चित्रपट-विभाग बंद झाला. त्यावेळी त्या विभागात ४६ लष्करी अंमलदार आणि १५० मुलकी कर्मचारी होते. आता ‘फिल्म अँड फोटो सेक्शन’ या नावाचा एक छोटा सैनिकी चित्रपट-विभाग दिल्ली येथे असून तो आपल्या गरजेप्रमाणे मुंबईच्या केंद्रीय फिल्म प्रभागा (फिल्म्स डिव्हिजन)कडूनच लष्करी स्वरूपाचे चित्रपट तयार करून घेत असतो. जगातील बहुतेक सर्व पुढारलेल्या राष्ट्रांत सैनिकी चित्रपट-विभाग आहेत.

चित्रपटतंत्राचा विकास : चित्रपटकलेच्या विकासाच्या दृष्टीने पहिले प्रयत्न करण्याचे श्रेय डेव्हिड ग्रिफिथ या दिग्दर्शकाकडे जाते. आज रूढ असलेला निकट छायाचित्रण हा प्रकार व पूर्वदृश्यचित्रणाचे तंत्र (फ्लॅश बॅक अथवा स्वीच बॅक) त्यानेच प्रथम उपयोगात आणले. याचप्रमाणे दृश्यांतरण वा वेधांतरण (डिस्सॉल्व्ह), वेधसंक्रमण (वाइप), उदयनअपायन (फेंडइन-फेडआउट), दृश्यमिश्रण (माँटाज), प्रतीक पद्धती (सिंबॉलिझम), पार्श्वप्रेक्षपण (बॅक प्रोजेक्शन), पार्श्वगायन इ. तंत्रांचाही त्याने वापर केला. तसेच ॲल्फ्रेड हिचकॉकने अंडर कॅप्रिकॉर्न  या चित्रपटात वापरलेले टेन मिनिट्‌स टेक (टी.एम.टी.) तंत्र, डेव्हिड लिनने ऑलीव्हर टि्‌वस्टमध्ये वापरलेले थॉट ऑन द स्क्रीन (चित्रस्वगत किंवा विचारदर्शन) तंत्र यांनीही चित्रपटकलेच्या विकासास हातभार लावला. दृश्ये व्यवस्थित व स्पष्टपणे टिपता यावीत म्हणून कॅमेऱ्याच्या भिंगासमोर निरनिराळ्या रंगांची छानके (फिल्टर्स) वापरली जाऊ लागली.

'इंटॉरलरन्स', १९१६, निकट छायाचित्रणाचा आद्य नमुना.दूरचित्रवाणीचा क्रांतिकारक शोध १९३९ च्या सुमारास लागला. त्यामुळे नृत्य, नाट्य, संगीत इ. कार्यक्रम किंवा बोलपट घरी बसून पाहण्याची सोय झाली. १९४९ साली दूरचित्रवाणीवर रंगीत कार्यक्रम सादर करण्यात येऊ लागले. दूरचित्रवाणीच्या या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्रिमिती चित्रपट निघाले, पूर्वीच्या मूकपटातील अगर बोलपटातील दृश्यांना लांबीरुंदी होती, परंतु खोली नव्हती. ती उणीव त्रिमिती चित्रपटांनी दूर केली व तांत्रिक दृष्ट्या चित्रपटकलेचे पाऊल आणखी पुढे पडले.

त्रिमिती पद्धतीचा ब्वाना डेव्हिल  हा पहिला चित्रपट युनायटेड आर्टिस्ट या संस्थेने १९५३ साली हॉलिवुड येथे तयार केला आणि थोड्याफार फरकाने इतरांनीही तसे त्रिमिती चित्रपट तयार केले. या त्रिमिती चित्रपटांचे मुख्य तीन प्रकार आहेत. (१) नॅचरल व्हिजन, (२) सिनेमास्कोप आणि (३) पॅराव्हिजन अशा चित्रपटांची निर्मिती आणि प्रक्षेपण यांसाठी जरुरीप्रमाणे यांत्रिक साधने तयार करण्यात आली. रुंद पडदा-तंत्र (वाइड स्क्रिन टेक्निक) पुढे आले. यांतूनच व्हिस्टा व्हिजन, सिनेरॅमा, फोटोरॅमा, व्हेरीस्कोप, प्लॅस्टोरॅमा, अग्नी स्फिअर सिनेमास्कोप, टॉड ए-ओ, सिनेपॅनोरॅमिक, किनोपॅनोरॅमा, सुपरस्कोप, एम्.जी.एम्. ६५ मी., सरकॅरॅमा इ. तंत्रविशिष्ट चित्रपट तयार होऊ लागले.

फिल्मचे प्रकार  :  चित्रपटाच्या प्रथमावस्थेत हालचाली चित्रित करण्यासाठी विशिष्ट कागदी फितींचा उपयोग केला जात असे. १८८८ साली जॉर्ज ईस्टमन याने सेल्युलॉइडाच्या एका अंगाला रासायनिक लेप असलेली फिल्म तयार केली. १८९५ साली ३५ मिमी. आकाराची फिल्म तयार झाली. या आकाराच्या सु. ०·३० मी. (१ फूट) लांबीच्या फिल्ममध्ये १६ चित्रे (फ्रेम्स) असतात. ही बोलकी फिल्म सेकंदाला सु. ०·४५ मी. (दीड फूट) (म्हणजे २४ चित्रे) या गतीने चित्रीकरणाच्या व प्रक्षेपणाच्या वेळी चालते. ३५ मिमी. आकाराची फिल्म मुख्यतः धंदेवाईक चित्रपटनिर्मात्यांसाठीच असते.

हौशी लोकांना घरगुती उपयोगासाठी उपयुक्त होईल अशी फिल्म तयार करण्याचे प्रयत्न १९१२ च्या पूर्वीपासूनच सुरू झालेले होते. त्या प्रयत्नांतून २८ मिमी., १७·५ मिमी., ९·५ मिमी. आणि ८ मिमी. अशा आकाराच्या फिल्म्स अत्यंत लोकप्रिय झालेल्या असून त्या जगभर वापरात आहेत.

कोडॅक कंपनीने १९२३ साली विशिष्ट प्रकारची (रिव्हर्सल फिल्म) १६ मिमी. फिल्म तयार केली. या फिल्मचे वैशिष्ट्य असे की, ३५ मिमी. फिल्मप्रमाणे हिच्या धन आणि ऋण अशा वेगवेगळ्या दोन फिल्म तयार कराव्या लागत नाहीत. छायाचित्रीकरण आणि प्रक्षेपण यांसाठी एकच फिल्म असते. या फिल्मसाठी सिनेकोडॅक हा खास कॅमेराही तयार करण्यात आला. १६ मिमी.च्या सु. ३० मी. (एका फुटा) मध्ये ४० चित्रे असतात व ती फिल्म सेकंदाला १६ चित्रे आणि मिनिटाला सु. ११ मी. (३६ फूट) याप्रमाणे चालते. त्याच सुमारास फ्रान्समधील पाथे कंपनीने ९·५ मिमी. आकाराची फिल्म, त्यासाठी पाथे बेबी कॅमेरा व होम सिनेप्रोजेक्टर इ. साधने तयार केली. १९३१ साली ३५ मिमी. बोलक्या फिल्मप्रमाणेच १६ मिमी. बोलकी फिल्म मिळू लागली. मूळ १६ मिमी. आकाराच्या फिल्मला दोन्ही कडेला भोके असत परंतु बोलक्या १६ मिमी. फिल्मला एका कडेलाच भोके असून दुसऱ्या कडेला ध्वनीमुद्रणासाठी जागा करून देण्यात आली. तिची गतीही सेकंदाला १६ चित्रांऐवजी २४ चित्रे करण्यात आली. १६ मिमी. व ८ मिमी. आकाराच्या रंगीत फिल्म अंतर्गृहातील चित्रीकरणासाठी आणि बहिर्गृह चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या. रंगीत चित्रपटासाठी कोडॅक्रोम आणि डुफाय कलर नावाच्या १६ मिमी. व ९·५ मिमी. च्या फिल्म मिळू लागल्या. १९३२ सालापर्यंत ८ मिमी. आकाराची फिल्म उपलब्ध नव्हती. त्यावर्षी कोडॅक कंपनीने सिनेकोडॅक ८ हा कॅमेरा, चित्रप्रक्षेपक आणि ८ मिमी. फिल्म तयार केली. ती एकेरी व दुहेरी असते. तिच्या सु. ०·३० मी. (एका फुटा)मध्ये ८० चित्रे असतात. १९२८ ते १९३१ पर्यंत ५० ते ७५ मिमी. आकाराच्या फिल्म्सचे प्रयोग करण्यात आले होते. १९२९ च्या मे महिन्यात पॅरामाऊंट कंपनीने न्यूयॉर्क येथे मॅग्ना फिल्म नावाच्या ५६ मिमी. रुंदीच्या ३५ मिमी. फिल्मने दाखविले जातात परंतु ते प्रथम ५५ मिमी. फिल्मने चित्रित केले जातात. ट्‌वेंटीएथ सेंचरी फॉक्स कंपनीनेही १९२९ च्या सप्टेंबर महिन्यात ७० मिमी. आकाराच्या फिल्मवर तयार केलेला ग्रॅंजर  चित्रपट दाखविला.

चित्रपटनिर्बंध :  चित्रपटनिर्मिती व्यावसायिक दृष्टीने होऊ लागल्यावर तिला एकप्रकारची शिस्त लावण्यासाठी १८९६ सालापासून तिच्यावर कायदेशीर निर्बंध घालण्यात आले. चित्रपटात काय असावे व काय नसावे, हे ठरविण्यात आले. अश्लील, बीभत्स, अत्याचारी व अवास्तव अशा दृश्यांचा प्रेक्षकांच्या मनावर अनिष्ट परिणाम होतो व सामाजिक नीती बिघडते, असे आढळून आल्यामुळेच ते निर्बंध घालण्यात आले. मात्र नीती-अनीतीच्या व श्लील-अश्लीलतेच्या कल्पना देशपरत्वे भिन्न-भिन्न असल्यामुळे या निर्बंधाच्या स्वरूपातही देशपरत्वे भिन्नता निर्माण झाली.


चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात प्रेक्षक फार थोडे असत. परंतु दिवसेंदिवस चित्रपटाचे आकर्षण एवढे वाढले, की दर दिवशी अक्षरशः हजारो प्रेक्षक चित्रपटगृहाला भेट देऊ लागले. ऐकीव किंवा लिखित साहित्यापेक्षा त्याच साहित्यावर आधारलेल्या चित्रपटातील दृश्यांचा प्रेक्षकांच्या मनावर अधिक परिणाम होतो आणि परिणामतः समाजाच्या दैनंदिन आचारविचारावर त्यांचा बरावाईट ठसा उमटतो. लोकांना खरे आकर्षण असते ते चित्रपटातील प्रेक्षणीय आणि श्रवणीय दृश्यांचे त्या आकर्षणामुळेच प्रेक्षक चित्रपटाकडे आकर्षिले जाऊ लागले. परंतु तेवढ्यातच एक अपघाती घटना घडली. ४ मे १८९७ रोजी पॅरिसच्या चॅरिटी बझारमध्ये एक चित्रपट दाखविला जात असतानाच आग लागून त्या आगीत १८० प्रेक्षक जळून मेले. या दुर्दैवी घटनेमुळे चित्रपटागृहात पाऊल टाकणे लोकांना धोक्याचे वाटू लागले. चित्रपट कलेवर फार विघातक टीका होऊ लागली. आणि प्रत्यक्ष त्या कलेच्या भवितव्याविषयी अनिश्चितता निर्माण झाली. तरी त्या दुर्घटनेने खचून न जाता निर्मात्यांनी चित्रपटनिर्मिती चालू ठेवली आणि प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिल्याने हे संकट टळले.

अभ्यवेक्षण : चित्रपट हे करमणुकीचे साधन असले, तरी ती करमणूक सद्‌भिरूचीचा भंग करणारी असू नये, अशा मताचा एक सुजाण लोकांचा वर्ग चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळीही होताच. द किस  या चित्रपटामध्ये मे आयर्विन नावाच्या नटीने चुंबनाच्या एका दृश्यात इतका उत्तान अभिनय केला, की त्यामुळे सद्‌भिरुचिसंपन्न प्रेक्षकांना धक्काच बसला. परिणामतः चित्रपटातील दृश्ये उत्तान शृंगारप्रधान, बीभत्स किंवा सांस्कृतिक मूल्यांवर आघात करणारी असू नयेत, म्हणून चित्रपटनिर्मात्यांवर काही बंधने असावीत असा लोकांनी आग्रह धरला. हॉलिवुडच्या चित्रपट वसाहतीत तरुण आणि सुंदर नट्यांना पळवून नेणे, नट्या, नट अगर दिग्दर्शक यांचे खून करणे , बलात्कार इ. अत्याचार घडू लागले. म्हणूनच काही वजनदार निर्मात्यांनी एकत्र जमून चित्रपटनिर्मितीबाबत आणि चित्रपटांच्या अंतरंगाबाबत काही निर्बंध असावेत म्हणून विचारविनिमय केला. अतिरेकी चुंबनाचे दृश्य असणारा चित्रपट वास्तविक १८९६ साली तयार झालेला होता आणि तेव्हापासून त्यावर टीका होऊ लागली होतीच. त्यानंतर विल हेझ नावाच्या एका विद्वान आणि थोर व्यक्तीने अमेरिकेतील चित्रपटनिर्मात्यांच्या आणि वितरकांच्या संस्थांच्या विनंतीवरून पोस्टमास्टर जनरलपदाचा १९२२ साली राजीनामा दिला आणि चित्रपटविषयक एक आचारसंहिता (कोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन) तयार केली. तेव्हापासून अमेरिकेतील चित्रपटनिर्माते त्या आचारसंहितेचे पालन करतात. उच्च मानवी मूल्ये, नीतीच्या रूढ कल्पना इत्यादींची जोपासना व्हावी या उद्देशाने इंग्लंड, फ्रांन्स, जर्मनी, डेन्मार्क इ. देशांतही चित्रपटविषयक आचारसंहिता तयार झाल्या. म्हणजे चित्रपट सोज्वळ स्वरूपाचे असावेत यासाठी चित्रपटांच्या अगदी बाल्यावस्थेपासूनच खबरदारी घेण्यात आलेली आहे, असे मानण्यास हरकत नसावी. हीच अभ्यवेक्षणाची (सेन्सॉरशिप) सुरुवात होय. अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनमधील अभ्यवेक्षण-पद्धतीदेखील आपखुषीचीच आहे. इंग्लंडमध्ये १९०९ साली सिनेमॅटोग्राफ ॲक्ट झाला व त्यानंतर १९१२ साली प्रथम ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर्स ही समिती स्थापन झाली. तेव्हापासून पार्लमेंटने मान्यता दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी तेथे होत आहे.


अमेरिका आणि इंग्लंड या देशांतील अभ्यवेक्षण-पध्दतीचे अनुकरण करून भारतात १९१८ साली इंडियन सिनेमॅटोग्राफ ॲक्ट नावाचा कायदा करण्यात आला. त्यानंतर १९२० साली मुंबई, कलकत्ता, मद्रास व रंगून येथे आणि १९२७ साली पंजाबमध्ये प्रांतीय अभ्यवेक्षण-मंडळे स्थापन होऊन कार्य करू लागली. पुढे भारतीय चित्रपट कायद्यात १ सप्टेंबर १९४९ रोजी झालेल्या दुरुस्तीप्रमाणे भारतातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चित्रपट दाखविला जाण्यापूर्वी तो सार्वजनिक रीत्या दाखविण्यास योग्य की अयोग्य हे ठरवून त्याप्रमाणे पसंतीचा दाखला देणे, नको असलेला भाग काढून टाकायला लावणे किंवा नापसंतीचा शिक्का मारून तो रद्द ठरविणे इ. अधिकार केंद्रीय शासनाने आपल्याकडे घेतले आहेत. त्यापूर्वी ते ते अधिकार राज्य शासनांकडेच होते. ज्या प्रकारच्या दृश्यांना अभ्यवेक्षण-मंडळ आक्षेप घेते, त्यांचे पन्नास प्रकार कायद्यात दिले आहेत.

नवा अधिक कडक कायदा १ मे १९४९ रोजी संमत होऊन १ सप्टेंबर १९४९ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली . त्यानुसार भारतातसुद्धा आता पसंत असलेल्या चित्रपटांना यू (युनिव्हर्सल, म्हणजे सार्वत्रिक) व ए (ॲडल्टस म्हणजे प्रौढांकरिता) असे दोन प्रकारचे दाखले देण्यात येतात. कोणत्याही वयाच्या प्रेक्षकांना दाखवायला योग्य अशा चित्रपटांना यू हा दाखला मिळतो आणि फक्त १८ वर्षांवरील वयाच्या प्रेक्षकांना दाखविण्याजोगा चित्रपट असला, तर ए असा दाखला मिळतो. मात्र या अटीतून तीन वर्षांच्या मुलामुलींना वगळलेले आहे. इंग्लंडमध्ये ए दाखला मिळालेला चित्रपट, १८ वर्षांखालील मुलामुलींना आपल्या मातापित्यांबरोबर अगर पालकांबरोबर पहायला मुभा असते. तशी मुभा भारतीय कायद्याने दिलेली नाही. चित्रपट, मग तो कथाचित्रपट, लघुचित्रपट, माहितीपट, वार्तापट अगर शैक्षणिकपट असो, त्याच्या सार्वजनिक प्रदर्शनापूर्वी अभ्यवेक्षण मंडळाची मान्यता घेतलीच पाहिजे. असा मुख्य निर्बंध असून मान्यतेचा दाखला चित्रित करून ती फिल्म त्या त्या चित्रपटाच्या प्रारंभी जोडलीच पाहिजे, असे ही बंधन आहे. १५ जानेवारी १९५१ पर्यंत राज्य शासन चित्रपट तपासणी करीत असे. बहुतेक चित्रपट मुंबई, बंगाल व तमिळनाडू या राज्यांत तयार होत असत. चित्रपट तपासणीचे काम ते ते राज्य शासन करीत आल्यामुळे प्रत्येक शासन आपापल्या दृष्टीकोनातून तपासणी करी. परंतु त्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी झाल्या म्हणून १५ जानेवारी १९५१ रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरची स्थापना होऊन त्याची मुख्य कचेरी मुंबईत सुरू झाली. १९५२ मध्ये चित्रपट कायद्यात सरकारने सुधारणा केली व २८ जुलै १९५२ पासून सेन्सॉर बोर्डाच्या कामाला रीतसर प्रारंभ झाला. या मंडळाने आपल्या कामकाजाचा वार्षिक अहवाल केंद्रीय सरकारला सादर करायचा असतो. मध्यवर्ती मंडळात अध्यक्षासह सात सभासद असतात. दर तीन वर्षांनी त्यांची केंद्रीय सरकारकडून नियुक्ती होत असते. मध्यवर्ती मंडळाला सल्ला देण्यासाठी मुंबई, बंगाल आणि मद्रास येथे तीन प्रादेशिक सल्लागार मंडळे असून त्यांची कार्यालये अनुक्रमे मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे आहेत. या सल्लागार मंडळाचे सभासद, मध्यवर्ती मंडळाच्या संमतीने केंद्रीय सरकारकडूनच नेमले जातात.

जानेवारी १९५३ पासून अभ्यवेक्षण-मंडळाकडे एक चित्रपटप्रत (प्रिंट) ठेवण्याची सक्ती करण्यात आली. परंतु मंडळाकडे ही एक प्रत निष्कारण अडकून पडू लागली. मंडळालाही या पेट्या सांभाळत बसणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. अनेक निर्मात्यांनी त्याबद्दल तक्रारी केल्यानंतर १९५५ साली चित्रणप्रत (शूटिंग स्क्रिप्ट) देऊन चित्रपटप्रत परत नेण्याची परवानगी देण्यात आली. १९५३ मध्येच अभ्यवेक्षण-मंडळाने चित्रपटावर आणखी एक बंधन घातले. ते म्हणजे या मंडळाने दिलेली मान्यता फक्त ५ वर्षे मुदतीची असे परंतु नंतर मात्र हा नियम शिथिल करून ही मुदत ५ ऐवजी १० वर्षे करण्यात आली. चित्रपट अभ्यवेक्षणात काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत. १ जुलै १९७५ पासूनच चित्रपटांना बदललेले हे नियम लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी पार्श्वसंगीत नसलेली प्रत अभ्यवेक्षण-मंडळाकडे पाठविली, तरी चालत असे. आता चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणारी सर्वांगपरिपूर्ण अशीच प्रत त्या मंडळाला द्यावी लागते व त्या चित्रपटाला अनुमतिपत्र मिळाल्यावरच बाकीच्या प्रती काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या फिल्मचा परवाना निर्मात्याला मिळतो. तसेच तयार फिल्मची प्रत या मंडळाने वर्षभर ठेवावी लागते.

प्राथमिक तपासणी-समितीने दिलेला निर्णय एखाद्या निर्मात्याला अमान्य झाल्यास त्याला फेरतपासणी-समितीकडे व त्या समितीचाही निर्णय मान्य न झाल्यास अपील न्यायाधिकरणाकडे अपील करण्याचा अधिकार असतो व त्याचा निकाल अखेरचा व बंधनकारक मानला जातो. अर्थात या निर्णयातही बदल करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार नव्या नियमानुसारही अबाधित आहेच. अभ्यवेक्षण-मंडळाकडे मान्यतेसाठी चित्रपट पाठविताना संवाद-गीतांच्या चार प्रतींबरोबर अर्जात सरकारकडून मिळालेल्या परवान्याचा क्रमांक, ज्या रसायनशाळेत संस्करण झाले असेल त्या रसायनशाळेचे संपूर्ण नाव व संपूर्ण प्रत तयार असल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. अभ्यवेक्षण मंडळाकडे अर्ज केल्यापासून १५ दिवसांच्या आत तो चित्रपट तपासणी-समितीला दाखविण्यात येतो व नंतर तीन दिवसांच्या आत प्रादेशिक अधिकारी संबंधित निर्मात्याला कारणे दाखवा नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्याची संधी देतो. त्याप्रमाणे निर्मात्याला आपले म्हणणे १४ दिवसांच्या आत मंडळात कळवावे लागते. त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मंडळाला जरूर वाटल्यास पुन्हा एकदा चित्रपट पाहिला जातो.

यापूर्वी अभ्यवेक्षण मंडळावर सरकारी व निमसरकारी असे साधारणतः ३५ सभासद होते. आता नव्या मंडळावरील सर्व सभासद नवे असून त्यांची संख्या १५ आहे. पूर्वी चित्रपटपरीक्षण मंडळावर एकंदर पाच सभासद होते, त्या जागी आता तीन सभासद आले असून त्यांत दोन विनावेतन सन्मान्य सभासद घेण्यात आले आहेत. मात्र या सन्मान्य सभासदांना चित्रपटपरीक्षण मंडळाच्या प्राथमिक कामकाजात भाग घेता येणार नसून फक्त फेरतपासणीच्या वेळी एकाला बोलावले जाते. प्रादेशिक अधिकाऱ्याचा मतदानाचा हक्क आता काढून घेण्यात आला आहे. काही नियमांत विशेष सवलत देण्याचे अधिकार मंडळाचे अध्यक्ष किंवा त्यांनी खास नियुक्त केलेला एक सभासद यांना देण्यात आले आहेत. अभ्यवेक्षण-मंडळावर संपूर्ण वेळ काम करणारे दोन कायमचे सभासद नियुक्त करण्यात आले आहेत. यापुढे नवीन नियमाप्रमाणे एखाद्या चित्रपटाला अभ्यवेक्षण-मंडळाने दिलेल्या प्रमाणपत्राचा अनुक्रम व इतर सर्व तपशील चित्रपटगृहाच्या बाहेर प्रेक्षकांना सहज समजेल अशा ठळक अक्षरात प्रदर्शित करण्याची सक्ती चित्रपटप्रदर्शकावर करण्यात आलेली आहे.

कृतिस्वाम्य : १९५७ सालच्या कृतिस्वाम्य (कॉपीराईट) कायद्याप्रमाणे चित्रपटाच्या कर्त्याला चित्रपट तयार करणे, चित्रपटाची चित्रफिल्म, ध्वनिफिल्म, त्या चित्रपटांतील गायनादी संगीताच्या ध्वनिमुद्रिका, चित्रपटांचे कथानक, संवाद, गीते इ. बाबतीत जे काही विशिष्ट हक्क दिलेले आहेत, त्यांना कृतिस्वाम्याधिकार म्हणतात. या कायद्याप्रमाणे चित्रपट पूर्ण होताना त्याचा जो मालक असेल, तो चित्रपटाचा कर्ता मानावयाचा. या कर्त्याला चित्रपटाची विक्री करण्याचा, तो भाड्याने देण्याचा वा त्या चित्रपटाचे खाजगी अगर सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करण्याचा आधिकार असतो. तसेच त्या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकांचे पुनर्मुद्रण करणे व त्या खाजगी अगर सार्वजनिक ठिकाणी वाजवू देणे, रेडिओद्वारे त्या ध्वनिक्षेपित करणे इ. बाबतींतही कायदेशीर हक्क असतात. या कायद्याप्रमाणे ज्या वर्षी चित्रपट विक्रीसाठी किंवा भाड्याने देण्यासाठी तयार झाला असेल, त्याच्या पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून ५० वर्षे चित्रपटाच्या मालकाकडे सर्व हक्क सुरक्षित असतात. ध्वनिमुद्रिकांच्या बाबतीतही तोच नियम लागू आहे. कृतिस्वाम्याधिकाराचा भंग झाला असे चित्रपटकर्त्याला आढळून आल्यास त्याला तसे करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर इलाज करून आपल्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करता येते. चित्रपटासंबंधी कर्त्याच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्यांवर फौजदारी खटला होऊन त्याला एक वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

चित्रपटनिर्मितीचा उद्योग : चित्रपटधंद्याला आजचे प्रगत व सुविहित स्वरूप येण्यापूर्वी, निर्माताच बहुधा आपले छोटे चित्रपट प्रदर्शित करीत असे. नंतर गावोगावी फिरून चित्रपट दाखविले जाऊ लागले आणि १९०५ पासून इंग्लंडमध्ये धंदा या दृष्टीने चित्रपटांचे प्रदर्शन होऊ लागले. अमेरिकेतसुद्धा त्याच वर्षापासून चित्रपटधंद्यांची सुरुवात झाली. १९१४ सालापर्यंत ब्रिटनमधील प्रत्येक मोठ्या शहरात एकतरी चित्रपटगृह होते.

या उद्योगात १९०७ पासून १९१४ पर्यंत फ्रान्सने यूरोपात चांगलाच जम बसवला. १९१७ साली जर्मनीतही तो धंदा स्थिरावला. अमेरिकेत हॉलिवुडमध्ये वेगाने चित्रपट तयार होऊ लागले व १९१८ सालच्या सुमारास जगभर त्यांचेच प्रदर्शन होऊ लागले. पूर्वी वैयक्तिक स्वरूपाचा असलेला चित्रपटव्यवसाय उत्तरोत्तर फोफावला व निर्मिती, वितरण आणि प्रदर्शन अशा त्याच्या परस्परांवलंबी शाखा निर्माण झाल्या. अमेरिकन चित्रपटांचा ठसा बऱ्याच देशांच्या चित्रपटांवर उमटला होता, तरी रशियन चित्रपट त्यापासून अलिप्त होते. त्याची जडणघडण स्वतंत्र असे. रशियात १९१८ पासून चित्रपट व्यवसायाला राष्ट्रीय उद्योगधंद्याचे स्वरूप आले. यूरोपीय चित्रपटधंद्यांला भांडवल अपुरे पडे, म्हणून अमेरिकेला तेथे संधी मिळाली.

हळूहळू जगभर चित्रपटगृहांची संख्या वाढली. चित्रपटनिर्मितीला गती मिळाली आणि चित्रपटधंद्यात अनेक तंत्रज्ञ कलावंत व कारागीर, तसेच इतर कर्मचारी इत्यादींना रोजगार मिळू लागला. चित्रपटधंदा जगातील मोठ्या धंद्यापैकी एक अग्रगण्य धंदा ठरला. [⟶  चित्रपटउद्योग] .

चित्रपटविषयक प्रशिक्षण : जगामध्ये ५८ देशांत चित्रपटनिर्मिती होत आहे. त्यांपैकी निम्म्या देशांत म्हणजे भारतासकट २४ देशांत चित्रपटविषयक प्रशिक्षणसंस्था आहेत. सर्वांत अधिक चित्रपटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अमेरिकेमध्ये आहेत. ज्या विद्यापीठांत चित्रपटविषयक प्रशिक्षण दिले जाते, परंतु पदवी दिली जात नाही अशा १६२ संस्था आहेत, तर चित्रपटविषयक प्रशिक्षण पूर्ण केल्यास पदवी दिली जाते, अशा ५१ संस्था आहेत. फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, पोलंड, जपान यांसारख्या इतरही प्रगत देशांत अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्था आहेत.

भारतातील चित्रपटविषयक प्रशिक्षण : १९२७ साली इंडियन सिनेमॅटोग्राफ कमिटीसमोर दिलेल्या साक्षीत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी अशी सूचना केली होती, की चित्रपटनिर्मितीच्या सर्व अंगांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी राष्ट्रीय संस्था असावी व जरूर पडल्यास सरकारने या संस्थेला मदत करावी. त्याप्रमाणे १९५१ साली भारत सरकारने नियुक्त केलेल्या चित्रपटचौकशी-समितीच्या शिफारशीनुसार ⇨ द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया  या संस्थेची पुणे येथे स्थापना होऊन तेथे एक शिक्षणक्रमही सुरू करण्यात आला होता. पुढे मात्र खोसला कमिटीने सुचविलेल्या शिफारशीवरून या शिक्षणक्रमात ऑगस्ट १९७५ पासून थोडा बदल करण्यात आला आहे.

चित्रपट माध्यमाच्या व्यापक स्वरूपाचा परिचय व्हावा म्हणून सुरूवातीच्या काळात ३ महिन्यांचा एक शिक्षणक्रम होता, त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयाचे विशेष ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, तो विषय घेता येत असे. परंतु आता ज्याप्रमाणे कला, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात सर्व विषयींचे मूलभूत ज्ञान प्रत्येक विद्यार्थाला प्रारंभी शिकविले जाते, त्याप्रमाणे २ वर्षाचा शिक्षणक्रम पूर्ण केलाच पाहिजे, असा नवीन नियम करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला विशिष्ट विषयासाठी म्हणून प्रवेश दिला जात नाही. प्रारंभीच्या २ वर्षांच्या सर्वसामान्य शिक्षणक्रमासाठी त्याला प्रथम प्रवेश घ्यावा लागतो व या शिक्षणक्रमात प्रत्येक विद्यार्थाला उत्तीर्ण व्हावेच लागते. या दोन वर्षांतील विद्यार्थ्याची प्रगती पाहून नंतर त्याला हव्या त्या विषयाकडे जाता येते. मात्र हा पुढचा अभ्यासक्रम विषयानुरूप एक वर्ष किंवा त्याहून थोड्या अधिक कालावधीचा असतो.

या संस्थेची दूरचित्रवाणी शाखा पुण्याला २ ऑक्टोबर १९७४ पासून सुरू झाली. या संस्थेला निरनिराळ्या देशांतील चित्रपटविषयक प्रशिक्षण संस्थांशी संपर्क साधता यावा म्हणून तिने द इंटरनॅशनल लिएजन सेंटर ऑफ सिनेमा अँड टी. व्ही. स्कूल्स या जागतिक संस्थेचे सभासदत्व स्वीकारले आहे. अशा तऱ्हेने शिक्षण देणाऱ्या संस्थांचे आय. एल्. सी. सी. टी. (International Liaison Centre for Cinema and Television Schools) हे जागतिक मंडळ ब्रूसेल्सला आहे. जगातील चोवीस राष्ट्रांमध्ये चित्रपट व दूरचित्रवाणी यासंबंधी प्रशिक्षण देणाऱ्या ४२ संस्था या मंडळाच्या सभासद आहेत. पुण्याच्या राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना चित्रीकरणाकरिता सुसज्ज निर्मितीगृहे, निसर्गरम्य परिसर व आधुनिक प्रयोगशाळा या सोयींचा लाभ मिळतो. या संस्थेच्या परिसरात असलेल्या ⇨ राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार (नॅशनल फिल्म आर्काइव्हज) या संस्थेतून विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता चित्रपट आणि त्यासंबंधी साहित्य व साधनसामग्री मिळू शकते.

पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळात, मद्रास सरकारने विद्यार्थ्यांना चित्रपटप्रक्षेपण, ध्वनिलेखन इ. तांत्रिक विषयांचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम आयोजित केला होता. या अभ्यासक्रमातूनच पुढे के.सुब्रह्मण्यमसारख्या दिग्दर्शकांच्या प्रयत्नामुळे अड्यार येथील इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म टेक्नॉलॉजी ही संस्था अस्तित्वात आली. खाजगी चित्रपटनिर्मात्यांनाही या संस्थेच्या साधनसामग्रीचा वापर करता येतो, हा या संस्थेचा उल्लेखनीय विशेष होय. प्रामुख्याने तिची व्यवस्था आणि कारभार राज्यशासनाच्या नियंत्रणाखाली असला, तरी चित्रपटव्यवसायातील वजनदार निर्मात्यांची एक सल्लागार समिती शासनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाकरिता नियुक्त केलेली असते.

मुंबई, मद्रास यांसारख्या शहरांतून चित्रपटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी संस्था सुरू झालेल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या राज्यांतून फिल्म इन्स्टिट्यूट धर्तीवर संस्था स्थापन होत आहेत. मद्रास येथील साउथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अभिनयाचा अभ्यासक्रम व हैदराबाद येथील नटराज फिल्म आणि टेलिव्हिजन स्कूल या अशाच संस्था होत.

चित्रपटमहोत्सव : चित्रपटकलेचा दर्जा वाढून तिचा अधिकाधिक विकास व्हावा आणि चित्रपटांतील तंत्रादी अंगे निर्दोष बनून देशोदेशींचे चित्रपट एकत्र पाहण्याची संधी चित्रपटरसिकांना मिळावी, या प्रमुख उद्देशाने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळ्यांवर चित्रपट महोत्सव साजरे करण्याची कल्पना निघाली. सुरुवातीला व्हेनिस (इटली) येथे भरणाऱ्या पारंपारिक कलाप्रदर्शनाचा एक भाग म्हणून चित्रपटमहोत्सव साजरे होत असत. अशा तऱ्हेचा पहिला चित्रपटमहोत्सव व्हेनिस येथे १९३२ साली साजरा झाला. तो उपक्रम इतका यशस्वी झाला की अशा तऱ्हेचे महोत्सव मग इतर देशांतही नियमितपणे साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. कॅन (फ्रान्स) येथे १९३९ सालापासून प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटमहोत्सव साजरे होऊ लागले.

या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटमहोत्सवाचे नियंत्रण आणि नियोजन करण्याची जबाबदारी, जगातील निरनिराळ्या देशांतील चित्रपटनिर्मात्यांच्या प्रातिनिधिक मंडळाच्या महामंडळाने म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोशिएशन या संस्थेने घेतली. तेव्हापासून त्या संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि तिने घालून दिलेल्या नियमांनुसार वेगवेगळ्या देशांत चित्रपटमहोत्सव साजरे होऊ लागले. या संस्थेने चित्रपटमहोत्सवाचे चार वर्ग केलेले आहेत. ते वर्ग असे कॅन आणि बर्लिन येथे भरणारे चित्रपटमहोत्सव ‘अ’ वर्गात मोडतात. साऊँ पाउलू (ब्राझील), सॅन सिबॅस्‌चॅन (स्पेन), मार देल प्लाता (अर्जेंटिना), एडिंबरो (स्कॉटलंड), कारलॉवी व्हारी (चेकोस्लोव्हाकिया) व तेहरान या शहरांत भरणारे चित्रपटमहोत्सव ‘ब’ वर्गातील समजले जातात. तर कार्तीना दांपेस्ता (इटली), लोकार्नो (स्वित्झर्लंड) आणि ब्रूसेल्स (बेल्जियम) या शहरांत ‘क’ वर्गातील चित्रपटमहोत्सव साजरे होतात आणि पून्ता देल एस्ते (यूरग्वाय), कैरो (ईजिप्त) येथील चित्रपट महोत्सव ‘ड’ वर्गात मोडतात. यांपैकी ‘अ’ वर्गातील चित्रपटमहोत्सव हे स्पर्धात्मक असतात, तर ‘ब’ वर्गातील चित्रपटमहोत्सव अस्पर्धात्मक असतात. ‘क’ वर्गातील चित्रपटमहोत्सव हे फक्त विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांचे म्हणजे माहितीपट, वैज्ञानिक चित्रपट किंवा बालचित्रपट यांपुरतेच मर्यादित असतात आणि ‘ड’ वर्गातील चित्रपटमहोत्सवांना केवळ राष्ट्रीय महत्व असते.

भारतात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव १९५२ साली, दुसरा १९६१ साली, तिसरा १९६४ साली, चौथा १९६५ आणि पाचवा १९७४-७५ साली साजरा झाला. पहिल्या दोन चित्रपटमहोत्सवांनी इतर देशांतील चित्रपटनिर्मात्यांचे फारसे लक्ष वेधले नाही, परंतु तिसऱ्या चित्रपटमहोत्सवाच्या वेळी भारत सरकारने महोत्सवविषयक ध्येय धोरणात आवश्यक आणि इष्ट असे फेरबदल करून फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने तो चित्रपटमहोत्सव साजरा केला व तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव ठरला.

प्रादेशिक भाषांतील चित्रपटनिर्मितीचा दर्जा सुधारावा, त्यांतील कलात्मकता आणि तंत्रशुद्धता वाढावी आणि कलाकरांबरोबरच तंत्र विशारदांनाही उत्तेजन मिळावे या उद्देशाने काही राज्यांत राज्यपातळीवर चित्रपटमहोत्सव साजरे होतात. १९६३ पासून महाराष्ट्रात मराठी चित्रपट महोत्सव साजरे होऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रपट महोत्सव १९६६ पासून साजरे होऊ लागले असून पहिला व्यंगचित्रपट महोत्सव, २४ ते २८ जून १९६६ पर्यंत बूकारेस्ट येथे साजरा झाला.

चित्रपट पुरस्कार व पारितोषिके : उत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू करण्याचे श्रेय, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्‌स अँड सायन्स या प्रसिद्ध संस्थेला आहे. ही प्रथा १९२७ -२८ मध्ये सुरू झाली. त्या संस्थेतर्फे सोन्याचा मुलामा दिलेली ब्राँझची मूर्ती उत्कृष्ट चित्रपटाला व सर्वोत्तम कलावंताला समारंभपूर्वक देण्यात येते. त्याला ऑस्कर पुरस्कार म्हणतात. हा पुरस्कार मिळविणे एक बहुमानाची बाब मानली जाते. १९२८ साली सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला मान पॅरामाऊंट पिक्चर्सच्या विंग्ज  या चित्रपटाला मिळाला. पूर्वी ऑस्कर पुरस्कारांची संख्या १२ होती, ती पुढे २३ करण्यात आली. अमेरिकेत पारितोषिके देणाऱ्या इतरही काही संस्था आहेत. अशाच प्रकारची पारितोषिके द ब्रिटिश फिल्म ॲकॅडेमीच्या वतीने ही देण्यात येतात.

भारतात केंद्रीय सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्यातर्फे उत्कृष्ट भारतीय चित्रपटांना शासकीय पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रे देण्याचा उपक्रम १९५४ सालापासून सुरू झाला. तसेच १९५५ सालापासून प्रादेशिक पुरस्कार देण्यासही प्रारंभ झाला व १९५८ पासून रोख बक्षिसे देण्यास सुरुवात झाली. पुढे सर्वोत्कृष्ट कलावंत व तंत्रज्ञांना रोख बक्षिसेही देण्यात येऊ लागली. अखिल भारतीय पारितोषिके मुख्य तीन आहेत : (१) सर्वोत्तम कथाचित्रपटाला राष्ट्रपतिसुवर्णपदक, (२) सर्वोत्तम माहितीपटाला उपराष्ट्रपतिसुवर्णपदक व (३) सर्वोत्तम बालचित्रपटाला पंतप्रधानसुवर्णपदक.

या तीन प्रकारच्या चित्रपटांत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला गुणवत्ता प्रशस्तिपत्रक दिले जाते. शिवाय प्रत्येक प्रादेशिक भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाला राष्ट्रपतिरौप्यपदक देण्यात येते व दुसऱ्या क्रमांकाच्या चित्रपटांना गुणवत्ता प्रशस्तिपत्रे देण्यात येतात. यासाठी राज्य सरकारनियुक्त परीक्षक मंडळ आपल्या राज्यातील स्पर्धकांची शिफारस करते व त्याला केंद्र सरकारच्या निवड समितीकडून मान्यता घ्यावी लागते.

पहिल्या वर्षी (१९५४) अखिल भारतीय उत्कृष्ट कथाचित्रपटांचे राष्ट्रपति सुवर्णपदक श्यामची आई  या मराठी चित्रपटाला मिळाले होते आणि माहितीपटासाठी असलेले उपराष्ट्रपतिसुवर्णपदक महाबलीपुरम्  या माहितीपटाला मिळाले होते. १९७४ सालापासून पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतात.

केंद्रीय चित्रपटपारितोषिके  :

(१) सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मात्याला राष्ट्रपतिसुवर्णपदक आणि ४०,००० रु. आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व १५,००० रु. रोख.

(२) दुसऱ्या क्रमांकाच्या चित्रपटाच्या निर्मात्याला रौप्यपदक व १५००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व १०,००० रु. रोख.

(३) राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मात्याला रौप्यपदक व ३०,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व १०,००० रु. रोख.

(४) प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मात्याला रौप्यपदक व १०,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व ५,००० रु. रोख.

(५) दिग्दर्शनातील विशेष नैपुण्याबद्दल त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला रौप्यपदक व २०,००० रु. रोख.

(६) त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार : रौप्यपदक व ५,००० रु. रोख.

(७) त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार (रंगीत) : रौप्यपदक व ५,००० रु. रोख.

(८) सर्वोत्कृष्ट अभिनेता : भारत पारितोषिक.

(९) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  : उर्वशी पारितोषिक.

(१०) सर्वोत्कृष्ट बालकलाकार (१६ वर्षांच्या आतील) : रौप्यपदक.

(११) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : रौप्यपदक.

(१२) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : रौप्यपदक.

(१३) सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शक : रौप्यपदक व १०,००० रु. रोख.

(१४) सर्वोत्कृष्ट पटकथालेखक : रौप्यपदक व १०,००० रु. रोख.

(१५) सर्वोत्कृष्ट कथालेखक : रौप्यपदक व १०,००० रु. रोख.

(१६) सर्वोत्कृष्ट गीतलेखक (राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्तमगीत) : रौप्यपदक व ५,००० रु. रोख.

(१७) सर्वोत्कृष्ट बालचित्रपटनिर्माता : सुवर्णपदक व १५,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व १०,००० रु. रोख.

(१८) सर्वोत्कृष्ट माहितीपटनिर्माता : रौप्यपदक व ५,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व ४,००० रु. रोख.

(१९) सर्वोत्कृष्ट शैक्षणिक किंवा अनुबोधपटनिर्माता : रौप्यपदक व ५,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व ४,००० रु. रोख.

(२०) उत्कृष्ट सामाजिक चित्रपटनिर्माता  : रौप्यपदक व ५,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला ४,००० रु. रोख.

(२१) उत्कृष्ट व्यापारी उत्तेजक अनुबोधपट-निर्माता व दिग्दर्शक : प्रत्येकी एकेक रौप्यपदक.

(२२) राष्ट्रीय प्रश्नविषयक उत्कृष्ट अनुबोधपट-निर्माता आणि दिग्दर्शक : प्रत्येकी एकेक रौप्यपदक.

(२३) उत्कृष्ट प्रायोगिक चित्रपटनिर्माता : रौप्यपदक व ५,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व ४,००० रु. रोख.

(२४) उत्कृष्ट सचेतन अनुबोधपटनिर्माता : रौप्यपदक व ५,००० रु. रोख आणि दिग्दर्शकाला रौप्यपदक व ४,००० रु. रोख.

(२५) भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक म्हणजे सुवर्णपदक, रु. २०,००० रोख व शाल या स्वरूपाचे असते. १९७४ च्या राष्ट्रीय पारितोषिकांच्या नामाभिधानांत बदल झाला असून सुवर्णपदक, रौप्यपदक, बाँझपदक यांऐवजी सुवर्णकमल, रौप्यकमल व ब्राँझकमल अशी नावे देण्यात आली आहेत.


राज्यपातळीवर त्या त्या राज्यातील भाषेत निर्माण झालेल्या चित्रपटांना पारितोषिके आणि रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात. अशा प्रयत्नांत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. ही प्रथा महाराष्ट्रात १९६३ साली प्रथम सुरू झाली. १ जानेवारी १९६१ ते १ ऑगस्ट १९६२ या दरम्यान तयार झालेल्या उत्तम मराठी चित्रपटांना आणि त्यांच्या निर्मात्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यांत पहिले पारितोषिक प्रपंच  या चित्रपटाला मिळाले.

महाराष्ट्र राज्य चित्रपटपारितोषिके :

(१) सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रथम क्रमांक : निर्मात्याला २०,००० रु. रोख व दिग्दर्शकाला ५,००० रु. रोख.

(२) दुसरा क्रमांक : निर्मात्याला १२,००० रु. रोख व दिग्दर्शकाला ३,००० रु.रोख.

(३) तिसरा क्रमांक : निर्मात्याला ८,००० रु. रोख व दिग्दर्शकाला २,००० रु. रोख याशिवाय प्रत्येक चित्रपटसंस्थेला व निर्मात्याला एकेक मानचिन्हही देण्यात येते.

(४) सर्वात्कृष्ट चित्रपटकथा  : १,५०० रु. रोख व मानचिन्ह.

याशिवाय खालीलप्रमाणे प्रत्येकी १,००० रु. रोख आणि मानचिन्ह देण्यात येते, (१) उत्कृष्ट अभिनेता. (२) उत्कृष्ट अभिनेत्री (३) उत्कृष्ट पटकथा. (४) उत्कृष्ट गीते. (५) उत्कृष्ट संवाद. (६) उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (७) उत्कृष्ट छायाचित्रकार, (८) उत्कृष्ट ध्वनिमुद्रक (९) उत्कृष्ट संकलक, (१०) उत्कृष्ट कलादिग्दर्शक (११) उत्कृष्ट पार्श्वगायक किंवा गायक-अभिनेता, उत्कृष्ट पार्श्वगायिका किंवा गायक अभिनेत्री.

सर्व राज्य चित्रपटपारितोषिके विजेत्यांना प्रमाणपत्रेही देण्यात येतात. पहिल्या तीन उत्कृष्ट ठरलेल्या चित्रपटांची रोख रकमेची पारितोषिके ते चित्रपट निर्माण करणाऱ्या संस्थाना देण्यात येतात आणि चित्रपटांसाठी देण्यात येणारी मानचिन्हे मात्र त्या त्या चित्रपटांच्या निर्मात्यांना देण्यात येतात.

अशा प्रकारची राज्य चित्रपटपारितोषिके देण्याची प्रथा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व गुजरात राज्यात आहे. तमिळनाडू सरकारने मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही प्रथा बंद केली आहे. फिल्म फेअर  या इंग्रजी सिनेपाक्षिकाने १९५४ पासून सर्वात्कृष्ट हिंदी व प्रादेशिक भाषांतील चित्रपट त्याचबरोबर लेखक, कलावंत, तंत्रज्ञ यांना ऑस्कर पुरस्कारांच्या धर्तीवर पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. हे चित्रपटपारितोषिक वाचकांची मते घेऊन दिले जाते, तर इतर चित्रपटपुरस्कारांसाठी या संस्थेतर्फे नेमण्यात आलेल्या मंडळाच्या शिफारशी लक्षात घेण्यात येतात.

नासिकच्या रसरंग  या साप्ताहिकातर्फे आणि वसंतराव पहेलवान स्मृति पारितोषिक-समितीतर्फे काही खाजगी व वैयक्तीक स्वरूपाची पारितोषिकेही मराठी चित्रपटांना दिली जातात.

अमेरिकन चित्रपट : अमेरिकन चित्रपटाच्या इतिहासाचे मुख्यतः चार कालखंड पडतात. चित्रपटाची प्राथमिक अवस्था, मूकपटांचा जमाना, बोलपट व रंगीत चित्रपटांचे युग आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा कालखंड विकसित चित्रपट असे ते चार कालखंड आहेत.

पहिल्या कालखंडात चित्रपटविषयक नाना प्रकारचे प्रयोग झाले व शोध लागले. जॉर्ज ईस्टमन आणि हॅनिबल गुडविन यांच्या संयुक्त प्रयत्नाने १८८९ साली चित्रपटनिर्मितीसाठी अत्यावश्यक असलेली सेल्युलॉइडची फिल्म निघाली. १ फेब्रुवारी १८९३ रोजी न्यू जर्सीमधील वेस्ट ऑरेंज येथे टॉमस एडिसनने ब्लॅक मारिआ हे चित्रपटनिर्मितिगृह उभारले. हेच जगातील पहिले चित्रपटनिर्मितीगृह. या प्रयत्नांतून छोटे छोटे चित्रपट तयार होऊ लागले. १८९६ पासून व्हिटास्कोपच्या साहाय्याने अमेरिकेत अनेक ठिकाणी लघुचित्रपट दाखविले जाऊ लागले.

विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात चित्रपटाच्या अनेक अंगोपांगाविषयी नवीन प्रयोग चालूच होते. एडविन एस. पोर्टर दिग्दर्शित द ग्रेट ट्रेन रॉबरी  हा पहिला कथापट १९०३ साली प्रदर्शित झाला. याच चित्रपटात निकट छायाचित्रण (क्लोज्-अप) हा प्रकार प्रेक्षकांना प्रथम दिसला. जॉर्ज बार्न्झ या नटाच्या निकट छायाचित्रावर हा चित्रपट संपत असे. परंतु  ⇨ डेव्हिड ग्रिफिथ  या दूरदर्शी आणि कल्पक दिग्दर्शकानेच निकट छायाचित्राचा खरा प्रभावी उपयोग केला. त्यावर टीका झाली तरीही ग्रिफिथने आपले प्रयोग चालूच ठेवले. पूर्व दृश्य चित्रण (फ्लॅशबॅक) दृश्यांतरण (डिस्सॉल्व्ह) तसेच संकलनविषयक इतर सुधारणा यासारखे नवे तांत्रिक प्रयोग त्याने केले. रमोना (१९०५), आफ्टर मेनी इअर्स (१९०८) फॉर लव्ह ऑफ गोल्ड (१९०९) द बर्थ ऑफ नेशन (१९१५) इंटॉलरन्स (१९१६) यांसारख्या चित्रपटांत ग्रिफिथचे तंत्रकौशल्य दिसून आले. ग्रिफिथने पुष्कळ कलावंताना पुढे आणले. कॉन्स्टन्स टॅलिमिज या नटीने इंटॉलरन्स या चित्रपटात प्रमुख भूमिका करून, बरीच प्रसिद्धी मिळविली होती. पुढे नामवंत झालेली मेरी पिकफर्ड ग्रिफिथच्या लोन्ली व्हिलामध्ये प्रथम चमकली. याच कालखंडात आणखी एक अभिजात कलावंत अमेरिकन चित्रपटसृष्टीत प्रगट झाला. १९१३ साली चित्रपटात त्याने प्रथम भूमिका केली. त्याचे नाव  ⇨ चार्ल्‌स चॅप्लिन. आपल्या कलागुणांनी तो पुढे जगप्रसिद्ध अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक बनला.

ग्रिफिथने मेरी पिकफर्ड, चार्ल्‌स चॅप्लिन, डग्लस फेअरबँक्स या त्या काळातील अग्रगण्य कलावंताना घेऊन युनायटेड आर्टिस्ट ही चित्रपटसंस्था स्थापन केली व तिच्याद्वारे उत्तमोत्तम चित्रपट सादर केले. पुढे ॲल्फ्रेड हिचकॉक या प्रसिद्ध दिग्दर्शनकानेही या संस्थेसाठी चित्रपट दिग्दर्शित केले होते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल हा १८६१ साली पहिले रंगीत छायाचित्र काढण्यात यशस्वी झाला होता. तर तो प्रयोग फिल्मवर करण्यात जी. ए. स्मिथने १९०६ साली यश मिळविले. प्रारंभीच्या काळात चित्रपटाच्या फिल्ममधील प्रत्येक चित्र हाताने रंगवावे लागे, परंतु पुढे रंगीत चित्रपटासाठी खास फिल्म तयार झाली व विविध पद्धतीने रंगीत चित्रपट निघू लागले. १९१७ साली द गल्फ बिट्‌विन  हा पहिला अमेरिकन टेक्निकलर चित्रपट तयार झाला. या कालखंडात आणखी जे प्रयोग करण्यात आले, त्यात रुंद फिल्मचा प्रयोग विशेष महत्वाचा आहे. चित्रपटासाठी ३५ मिमी. फिल्म वापरली जाते. परंतु काहीजणांनी १९२८ ते १९३१ या काळात ५० पासून ७५ मिमी. पर्यंतची फिल्म वापरून पाहिली. या प्रयोगाला तेव्हा फारसे मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही.

बोलपटाचे नवयुग तिसऱ्या कालखंडात सुरू झाले. वास्तविक एडिसनने १८७७ च्या सुमारास यशस्वी ध्वनिमुद्रणाची घोषणा केली होती व त्यासंबंधी अधिक प्रयोग १८९४-९५ पर्यंत चालूच होते. परंतु द जाझ सिंगर हाच १९२७ साली प्रदर्शित झालेला पहिला अमेरिकन बोलपट होय. या बोलपटाचे निर्माते वॉर्नर ब्रदर्स होते. या चित्रपटापासून बोलपटाचा जमाना सुरू झाला. त्याअगोदर पाच वर्षे अनुबोध पट किंवा माहितीपट सुरू झाले होते. या कालखंडातील एक विशेष महत्वाची घटना म्हणून  ⇨ वॉल्ट डिझ्नीच्या स्नो व्हाइट अँड सेव्हन ड्‌वार्फ्‌स  या पहिल्या संपूर्ण लांबीच्या व्यंगपटाचा उल्लेख केला पाहिजे. १९३७ साली वीस हजार वेगवेगळ्या चित्रांच्या साहाय्याने वॉल्ट डिझ्नीने रंगीत व्यंगपट तयार केला. एडिसन, ग्रिफिथ, चॅप्लिन आणि डिझ्नी हे आपापल्या क्षेत्रातील युगप्रवर्तक मानले जातात. ग्रिफिथनंतर अमेरिकन चित्रपटसृष्टीत तंत्रविषयक नवेनवे प्रयोग करणारे दिग्दर्शक म्हणून ॲल्फ्रेड हिचकॉक आणि डेव्हिड लिन यांचा उल्लेख करावा लागेल.

चौथा कालखंड दुसऱ्या महायुद्धानंतरचा. महायुद्धकाळातही अमेरिकन चित्रपटसृष्टीत नवे प्रयोग चालूच होते. १९३९ साली तेथे दूरचित्रवाणी सुरू झाली. १९४९-५० सालापर्यंत रंगीत दूरचित्रवाणीही पुढे आली. त्यामुळे दूरचित्रवाणीचा चित्रपटसृष्टीवर विपरित परिणाम होईल या भीतीने काहीतरी नावीन्यपूर्ण तंत्र शोधून काढण्याची धडपड सुरू झाली. त्यातूनच त्रिमिती चित्रपट तयार करण्याचे नवे तंत्र पुढे आले. वॉनर्र ब्रदर्सनी १९५२ साली ब्‌वाना डेव्हिल  हा पहिला त्रिमिती रंगीत चित्रपट सादर केला. या पद्धतीला नैसर्गिक दृश्य (नॅचरल व्हिजन) असे नाव आहे. पॅरामाऊंट या मान्यवर संस्थेने पॅराव्हिजन नावाची पद्धत शोधून काढली, पण या त्रिमिती पद्धतीचा प्रेक्षकांच्या डोळ्याला त्रास होऊ लागल्याने तिच्यावर टीका होऊन ती मागे पडली.

तथापि रुंद-पडदा प्रक्रिया (वाइड स्क्रीन प्रोसेस) पद्धत मात्र मूळ धरू लागली. १९५३ साली रोब  हा पहिला सिनेमास्कोप-चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर व्हिस्टाव्हिजन, पेरिफेरल व्हिजन, व्हेरिओस्कोप, टॉड ए-ओ यांसारख्या पद्धती निघाल्या. टॉड ए-ओ पद्धतीच्या चित्रपटाच्या प्रती ७० मिमी. फिल्मवर तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यासाठी तसाच लांबरुंद पडदाही वापरावा लागे. १९५६ साली वॉल्ट डिझ्नी यांनी सर्करॅमाचा प्रयोग आपल्या करमणूक केंद्रात केला.

रेमन नोव्हॅरो, रूडाल्फ व्हॅलेंटीनो, डग्लस फेअरबँक्स, चार्ल्‌स चॅप्लिन, क्लार्क गेबल, गेअरी कूपर, पॉल म्यूनी, रॉनल्ड कोल्मन, चार्ल्‌स लॉटन, चार्ल्‌स बोये, स्पेन्सर ट्रेसी, कॅरी ग्रँट, ग्रेगरी पेक, रॉक हडसन, मार्लन ब्रँडो, रिचर्ड बर्टन व नट्यांमध्ये नॉर्माशिअरर, ⇨ गार्बो ग्रेटा, मार्लिनी डिट्रिख, क्लाडिट्टी कोलबर्ट, ग्रीर गार्सन, बेटी डेव्हिस, ऑड्री हेप्‌बर्न, सॅन्ड्रा डी, मेरीलिन मन्रो, एलिझाबेथ टेलर आदींनी संस्मरणीय भूमिका केलेल्या आहेत, चाळीस वर्षांपूर्वी पॉल रॉबसन या निग्रो गायक अभिनेत्याने आणि आता सिडनी पोटिअरने आपल्या अभिनय कौशल्याने अमेरिकन चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान प्राप्त करून घेतले आहे.

'म्युटिनी ऑन द बौंटी', १९३५

ऐतिहासिक दृष्टीने पाहता अमेरिकन चित्रपटांनी जगात महत्वाचे स्थान मिळवले हे निर्विवाद आहे. परंतु नवे अमेरिकन चित्रपट केवळ उत्पन्नावर दृष्टी ठेवून तयार केले जातात. कथानकदृष्ट्या ते निकृष्ट असतात. मात्र तांत्रिक बाबतीत ते अत्यंत सफाईदार व दर्जेदार असतात, अशी टीकाकारांची तक्रार आहे. पूर्वीचे चित्रपट काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून तयार करीत असत. उदा. अत्याचारांचा व राक्षसी वृत्तीचा निषेध करणारा द वाइल्ड वन, वांशिक द्वेषभावना त्याज्य ठरविणारा सायोनारा, सूडवृत्तीचा तिटकारा आणणारा म्युटिनी ऑन द बौंटी  इ. चित्रपट उल्लेखनीय आहेत.

चित्रपटांचे आकर्षण आणि नावीन्य टिकविण्यासाठी अमेरिकेत सतत प्रयत्न होत आहेत. १९४१-४२ साली चित्रपटांचा आकडा ५३४ पर्यंत गेला होता. परंतु नंतर मात्र चित्रपटांची संख्या कमी होत चालली. अमेरिकन चित्रपटसृष्टीत दरसाल अब्जावधी डॉलरची उलाढाल होत असते. १९७३ साली तेथील चित्रपटनिर्मिती सु. ३५० पर्यंत होती, तर चित्रपटनिर्मितीगृहे २६ होती.

रशियन चित्रपट : सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) येथे १८९६ च्या मे महिन्यात ल्यूम्येअर बंधूनी रशियातील पहिले चित्रपटगृह सुरू केले. १९०८ च्या सुमारास मॉस्कोमधील अलेक्झांडर उद्यानात चित्रपट दाखविण्यात येत. १९०८ सालीच अलेक्झांडर ड्रँकॉव्हने Stenka Razian  हा चित्रपट निर्माण केला. १९१० मध्ये टॉलस्टॉयच्या निधनावर आधारित वार्तापट दाखविण्यात आला. १९१३ मध्ये रशियात १,५१० चित्रपटगृहे होती. खाजगी मालकीच्या या धंद्यात त्या काळी विलक्षण चढाओढ होती. १९१५ मध्ये वॉर अँड पीस  या कादंबरीवर निघत असलेल्या अलेक्झाडर खान्झोन्कोव्हनिर्मित व प्यॉटर चार्डिनिनदिग्दर्शित चित्रपटाच्या अगोदर आपला चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून थिमन आणि राइनहार्ट यांनी गार्डिन व प्रोटॅझिनॉव्ह यांच्याकडून अवघ्या बारा दिवसांत वरील कादंबरीवरील ३,००० मी. लांबीचा चित्रपट तयार केला. तो कलादृष्ट्या विशेष चांगला नसतानाही फार यशस्वी ठरला. याच काळात अलेक्झांडर ताइरोव्हेन एकही शब्दफलक नसलेला द डेड मॅन नावाचा चित्रपट काढला. १९०७ ते १९१७ या काळात पूर्ण लांबीचे सु. दोन हजार चित्रपट रशियात तयार झाले होते. महायुद्धपूर्वकाळात इव्हान मॉझ्युकीन हा अभिनेता व व्हेरा खोलोज्ञा ही अभिनेत्री अत्यंत लोकप्रिय होती. राज्यक्रांतीनंतर लेनिनच्या धोरणानुसार चित्रपटांच्या धंद्याचे २७ सप्टेंबर १९१९ रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचा परिणाम त्वरित दिसून आला आणि चित्रपटगृहांची संख्या वाढू लागली. १९६० नंतर ही संख्या एका लाखावर गेली आहे. चित्रपटनिर्मितीही प्रतिवर्षी सु. दोनशेच्या आसपास आहे. याखेरीज अनेक लघुपटही रशियात तयार होत असतात. चित्रपटांचा धंदा सरकारी मालकीचा झाला. त्या सुमारास कूलेशोव्ह हा निर्माता आघाडीवर होता. तो केवळ १८ वर्षांचा असताना त्याने Proyekt Inzhenera Praita चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्याने काढलेले डेथ बे, स्ट्रेन्ज अँडव्हेन्चर ऑफ मि. वेस्ट इन द लँड ऑफ द बोल्शेहिक्स  इ. चित्रपट चांगलेच गाजले. १९२३ मध्ये रेड डेव्हिल्स  या नावाचा पहिला देमार (स्टंट) चित्रपट तयार करण्यात आला. त्याची कथा क्रांतीतील तीन युवकांच्या अनुभवांवर आधारलेली होती. त्याच सुमारास पेट्रोग्राड फिल्म फोटो सेक्शनतर्फे कुगेल व मास्लोव्ह यांनी द मिस्टरी ऑफ लेबर फ्रीड  हा चित्रपट व अलेक्झांडर राझग्नी याने गॉर्कीच्या कादंबरीवर आधारलेला मदर  असे चित्रपट काढले. त्या काळातील दिग्दर्शक स्यिर्ग्येई म्यिकायलव्हिच आयसेन्स्तीन याची कामगिरीही फार मोठी आहे. १९२५ मध्ये आयसेन्स्तीनने द बॅट्‌लशिप पोटेम्किन  आणि १९२६ मध्ये पूडॉव्हकिन याने मदर  हा नवा चित्रपट काढून रशियन चित्रपटकलेला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. तंत्र, स्वभावरेखन, कलात्मकता इ. दृष्टीने हे दोनही चित्रपट अजोड होते. वरील दोघेही दिग्दर्शक नवीन पंथाचे अध्वर्यू ठरून त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या दिग्दर्शकांची एक नवी पिढीच नंतर उदयास आली. द एंड ऑफ सेंट पीटर्झबर्ग, स्टॉर्म ओव्हर एशिया  (द एअर टू चेंगीझखान) या मदरनंतरच्या चित्रपटांनी पूडॉव्हकिन जगातील अग्रगण्य दिगदर्शक ठरला. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईतोपर्यंतच्या

 'इव्हॉन द टेरिबल', १९४६.काळात रशियाच्या घटक राज्यांत लघुपट तसेच विनोदी आणि संगीतप्रधान चित्रपटही निर्माण होऊ लागले. मात्र बऱ्याच चित्रपटांचा विषय क्रांती हाच असे. क्रांतिपूर्वकाल आणि क्रांत्युत्तरकाल दर्शविणारा पख्ता अरल  हा एका हौशी कलाकाराने स्वतःच्या कथेवरून तयार केलेला चित्रपट डी.व्हासिल्येव्ह आणि जी. व्हासिल्येव्ह यांचा चापायेव्ह नावाच्या एका काल्पनिक वीराची कथा सांगणारा चित्रपट, ग्यिगॉर्यइ कोझिन्त्सेव्ह आणि ट्राउबर्ग यांनी तयार केलेला मॅक्झिम् नावाच्या भूमिगत क्रांतिकारी नेत्याच्या जीवनावरील चित्रपट हे त्या काळी खूप गाजले. गोगोल, पुश्किन, चेकॉव्ह, गॉर्की, डॉस्टयेव्हस्की, शेक्सपिअर इ. श्रेष्ठ लेखकांच्या कृतींवर तसेच क्रांतीवीर लेनिनच्या जीवनावर आधारलेले चित्रपट काढणे हे उत्तम निर्मात्याचे लक्षण समजले जाई. म्यिखईल रोग्म याने तर लेनिनच्या जीवनावर बरेच चित्रपट काढले. त्या प्रत्येकात ओकिव हा नट लेनिनचे काम करी.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशाभिमानाने परिपूर्ण असेच बोलपट काढण्याकडे निर्मात्यांची प्रवृत्ती होती. शॉल्‌खॉफच्या व्हर्जिन सॉइल अपटर्न्‌डवर पहिला चित्रपट १९४० मध्ये निघाला. स्यिर्ग्येई आयसेन्स्तीन याचा इव्हॉन द टेरिबल (१९४६) हा चित्रपटही असाच उल्लेखनीय होता. झोया, स्टालिनग्राड, जर्मन डीफीट नीअर मॉस्को, बर्लिन, बॅट्‌ल ऑफ यूक्रेन  आदी चित्रपटांद्वारे पोझलव्हस्की, येरमॉलॉव्ह,दोब्रोव्हॉलस्की, सुखोव्ह, रेस्मन, ल्युब्येडेफ, शुबीन्स्की यांसारखे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार पुढे आले. १९५८ मध्ये म्यिखईल काल्टझोव्ह याने क्रेन्स आर फ्लाइंग  या चित्रपटाबद्दल कॅन येथील महोत्सवात सुवर्ण पारितोषिक पटकावले. या चित्रपटात तातीआना सॅमोलोव्हा ही देखणी व अभिनयकुशल आणि प्रख्यात अभिनेत्री प्रथम चमकली. १९६० मध्ये क्वाएट फ्लोझ द डॉन  हा स्यिर्ग्येई गेरासेमाव्हचा आणि व्हर्जिन सॉइल अपटर्न्‌ड  हा पुन्हा निघालेला चित्रपट उल्लेखनीय आहे. फेट ऑफ ए मॅन  व द क्लिअर स्काय्  यांनाही आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुवर्ण पदके मिळाली आहेत. आजपर्यंत रशियातील सु. २५० चित्रपटांना पदके वा पारितोषिके मिळाली आहेत. द बॅलड ऑफ ए सोल्जर  आणि द लेडी विथ द लिट्‌ल डॉग  यांचीही त्यात गणना आहे. ग्यिगॉर्यइ चुखराय व व्हॅल्डिमिर फेंटिन हे दिग्दर्शक उल्लेखनीय आहेत. रशियन चित्रपटसृष्टी ही सरकारी मालकीची असल्यामुळे तेथे स्पर्धा नाही. जाहिरातबाजी, भडक दिखाऊपणा, उत्तान शृंगार यांनाही रशियन चित्रपटसृष्टीत वाव नाही. तंत्रदृष्ट्या काहीतरी अद्‌भूत करण्यापेक्षा कथावस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोनच निराळा ठेवण्याकडे रशियन चित्रपटनिर्मात्यांची प्रवृत्ती अधिक आहे. त्यामुळे कलादृष्ट्या त्यांचे स्वरूप इतरांपेक्षा निराळे भासते. वास्तववादाकडे अधिकाधिक झुकत असलेला आधुनिक प्रेक्षक, टीकाकार, निर्माता, दिग्दर्शक, इ. सर्वांचेच ते एकपरीने आदर्श आहेत.

व्यंगचित्रपट, कळसूत्री बाहुल्यांचे चित्रपट, बालचित्रपट व वैज्ञानिक चित्रपट यांद्वारे लोकशिक्षणाचे कार्यही रशियात केले जाते. या विषयावर सु. १,५०० पुस्तके रशियन सरकारने प्रसिद्ध केली आहेत. मॉस्कोमध्ये चित्रपटविषयक प्रशिक्षण देणारी एक संस्थाही आहे. त्याखेरीज चित्रपटांचे अभिलेखागारही तेथे आहे. रशियात तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाची एक ऋणप्रत व धनप्रत राष्ट्रीय अभिलेखागाराकडे पाठवावी लागते. रशियात १९७४ साली ३९ चित्रपटनिर्मितिगृहांत १३० पूर्ण लांबीचे चित्रपट, ५० दूरचित्रवाणी चित्रपट, ४५ पूर्ण लांबीचे अनुबोध पट, ६५ व्यंगपट व २,००० लघुपट तयार झाले. दूरचित्रवाणीची स्पर्धा असूनही रशियात चित्रपटांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

इटालियन चित्रपट : ल्यूम्येअरचे चलत्‌चित्रपट पॅरिसमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी नोव्हेंबर १८९५ मध्ये फिलोतिओ अल्‌बेरिनी याने स्वतःच तयार केलेल्या कॅमेऱ्याचे पेटंट घेतले होते. १९०५ साली त्याने सॅन्तोनीबरोबर चित्रपटनिर्मितीस प्रारंभ केला. सिनेज असे त्या चित्रपटसंस्थेचे नाव होते. १९१२ साली याच संस्थेने को वादीस  हा चित्रपट तयार केला. त्या अगोदर आर्तूरो आंब्रोस्यो याने द लास्ट डेज ऑफ पाँपेई  हा भव्य मूकपट सादर केला होता.

मूकपटांच्या काळात इटालियन चित्रपटांचे स्वरूप फारसे वैशिष्ट्यपूर्ण नव्हते. तेथील चित्रपटसृष्टी बऱ्याच बाबतीत मागासलेली होती असेच म्हणावे लागते. तेथील चित्रपटनिर्मात्यांनी को वादीससारखे ऐतिहासिक विषयांवर जे चित्रपट काढले होते. त्यांनी मात्र जगाचे लक्ष वेधून घेतले होते. १९१३ च्या एप्रिल महिन्यात को वादीस  हा मूकपट न्यूयॉर्क येथे दाखविण्यात आला. निवडक भव्य व भपकेदार दृश्यांचा हा नेत्रदीपक चित्रपट चित्रपटसृष्टीत एक क्रांतिकारक टप्पा मानला जातो. प्रेक्षकांना तो फार आवडला होता. पुढे मात्र परिस्थिती बरीच पालटली. १९२९ साली तयार झालेला सोल  हा मूकपट एका नाटकावर आधारलेला होता. तेव्हापासून नाटकांतील कथावस्तू आणि रंगभूमीवरील कलावंत चित्रपटांवर प्रभाव गाजवू लागले. इटलीतील फॅसिस्ट सरकारच्या ल्यूस या सरकारी चित्रपटसंस्थेने फॅसिस्ट तत्वप्रणालीचा प्रचार करण्यासाठी माहितीपट आणि वार्तापट काढले. पूर्वी चित्रपटनिर्मितीसाठी भांडवल मिळत नसे. शिवाय जुनीपुराणी साधने व अननुभवी माणसे यामुळेही इटालियन चित्रपटनिर्मिती फारशी प्रगती करू शकली नाही. परंतु बोलपटांचे युग उदयास आल्यानंतर इटालियन चित्रपटसृष्टीत नवचैतन्य दिसू लागले. ब्लॅक शर्ट  हा एक प्रसिद्ध इटालियन बोलपट १९३३ साली तयार झाला. दुसऱ्या महायुद्धकाळात स्वाभाविकपणेच चित्रपटनिर्मिती कमी झाली. यूरोपा फिल्म्स हे इटलीतील एक मोठे चित्रपटनिर्मितीगृह सरकारने ताब्यात घेतले. चित्रपटनिर्मितीवर कडक नियंत्रणे घातली गेली व तिकिटांचे दरही वाढले. त्यामुळे चित्रपटप्रेक्षकांची संख्या घटली. याही स्थितीत १९३९ साली ड्रीम ऑफ बटरफ्लाय  नावाचा गीतनृत्यप्रधान बोलपट निघाला व तो परदेशातही लोकप्रिय ठरला. १९४४ साली इटलीत अवघे १६ चित्रपट निघाले. महायुद्ध संपल्यावर इटालियन चित्रपटसृष्टीचे पुनरुज्जीवन झाले. १९४६ साली महायुद्धाच्या अखेरच्या चार महिन्यांचे चित्रण असलेला Paisan हा रोसेलीनीचा बोलपट फार गाजला. परंतु युद्धपरिस्थितीने गांजलेल्या जनतेला मनोरंजक चित्रपट हवे होते. यादृष्टीने इटालियन सरकार आणि अमेरिका यांच्यामध्ये १९४६ साली चित्रपट आयातीबाबतचा एक करार झाला. इटली आणि अमेरिका यांच्या सहकार्याने तयार झालेला को वादीस  हा भव्य दृश्यांचा बोलपट उल्लेखनीय आहे.

'द बाय्‌सिकल थीफ', १९४९.

त्यानंतर मात्र इटालियन चित्रपटाचे स्वरूप पालटले. वास्तववादी चित्रपटांना लोकप्रियता मिळू लागली. कला आणि तंत्र या बाबतींतही इटालियन चित्रपटांत बरीच प्रगती झाली. ओपन सिटी (१९४५) फेडोरा, बोहेम, ओ सोल मियो, शूशाइन (१९४६) द बाय्‌सिकल थीफ   इ. इटालियन चित्रपट अमेरिकादी देशांतही फार लोकप्रिय झाले. रोम इलेव्हन ओ क्लॉक (१९५२) आणि थ्री फोरबिडन स्टोरीज या शोकात्म चित्रपटांनी तर इटलीत मोठी खळबळ उडवून दिली. लव्ह अँड ड्रीम्स  या खऱ्या जीवनाचे साक्षात दर्शन आकर्षक रीतीने घडविणाऱ्या चित्रपटाने १९५३ साली फार मोठी लोकप्रियता मिळविली. यासंबंधात व्हितॉरिओ डी सिका व रोसेलीनी आदी दिग्दर्शक फार प्रसिद्ध आहेत. आधुनिक इटालियन चित्रपटांना इतर काही देशांच्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. कलात्मकता आणि तंत्रशुद्धता या दोन्ही गुणांनी समृद्ध म्हणजे इटालियन चित्रपट हे आजच्या इटालियन चित्रपटाचे वर्णन रास्त ठरेल.

१९७२ साली द वर्किंग क्लास गोज टू हेवन  या फ्रांचेस्को रोसी याच्या चित्रपटाला कॅन येथील चित्रपटमहोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. १९७३ मध्ये चित्रपटनिर्मितीची सरासरी १५० होती.

'द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क', १९२८.

फ्रेंच चित्रपट : चलत्‌चित्रणाचे व त्याच्या प्रक्षेपणाचे प्रयोग फ्रान्स मध्ये १८८८ पासूनच सुरू झाले. लुई व ऑगस्त ल्युम्येअर या बंधूनी कारखान्यातील मजूर बाहेर पडत असल्याचा १७ मी. लांबीचा देखावा चित्रित करून तो फक्त ३५ प्रेक्षकांसमोर २८ डिसेंबर १८९५ रोजी दाखविला. कथाविषयक असलेला पहिला फ्रेंच चलत्‌चित्रपट लारोझर अरोरा  हा होय. १८९७ साली फ्रेंच चित्रपटसृष्टीला एक धक्का सहन करावा लागला. मे महिन्यात पॅरिसच्या चॅरिटी बझारमध्ये चित्रपटाचा खेळ चालू असताना मोठी आग लागली. फिल्मचा साठा ज्वालाग्राही असल्याने आग भडकली व त्या आगीत सु. १८० लोक जळून खाक झाले. त्यामुळे नव्यानेच सुरू होत असलेल्या या व्यवसायाला जनतेचा रोष पत्करावा लागला. १९०८ पर्यंत या क्षेत्रात फ्रान्सने खूप प्रगती केली. शार्ल पाथे व लेआँन गॉमाँ यांनी चित्रपटसंस्था स्थापन केल्या. झॉर्झ मिली, एमील कोहल, माक्स लिंडर, लुइ फियाल इ. तंत्रनिपुण कलावंत पुढे आले व त्यांनी कथापट, व्यंगपट तयार केले. शिवाय चित्रपटाबरोबर ग्रामोफोन वाजवून त्याला ‘क्रोनोफोन’ या नावाने बोलते करण्याचाही प्रयत्न केला. १९०८ ते १९१४ या काळात निक् कार्टर, झिगोमार  यांसारख्या पडद्यावरील चिरस्मरणीय व्यक्तीरेखा तयार झाल्या आणि सेअरा बर्नहार्ट, मिस्टिंगेट, क्लोड चॅब्राल इ. कलावंतही गाजले. फॅन्टोमसचे धाडशी जीवनही लोकांना वेड लावून गेले. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाल्याने फ्रान्समधील चित्रपटनिर्मिती स्थगित झाली. मोठमोठ्या कंपन्या बंद पडल्या. जे चित्रपट निर्माण होत, ते फक्त युद्धप्रयत्नासाठीच असत. महायुद्धानंतर झेरमेअन ड्यूलाक ही सुजाण नटी व ल्वी दलूक हा निर्माता यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले. फ्रेंच रंगभूमीवरही नव्या प्रयोगांचा उदय होत होता आणि तद्‌नुरूप चित्रपटातही ते नवतंत्र येऊ लागले. ⇨ आंद्रे आंत्वान  हा या नवविचारांचा पुरस्कर्ता असून मार्सेल लर्बिए, आबेल गान्स, लेआँ पॉरिएर, झान एप्स्टाइन व झाक फेदेर व झूलाँन डुव्हिव्हीअर इत्यादींनी नव्या विचारधारेनुरूप चित्रपट काढले. पुढे १९२३-२४ च्या सुमारास अतिवास्तववादी चित्रपट निर्माण होऊ लागले. १९२५ ते ३१ या काळात धंदा आणि नवे तंत्र यांचा सुंदर मेळ बसला. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क  (१९२८) हा चित्रपट होय. त्यात निकट छायाचित्रणाचे तंत्र पूर्णावस्थेला गेले होते. १९२८ मध्ये ५२, १९३० मध्ये ९४, १९३१ मध्ये १३९, तर १९३३, मध्ये १६० पर्यंत चित्रपट फ्रान्समध्ये निर्माण झाले. रने क्लेअर हा त्या काळी गाजलेला एक निर्मातादिग्दर्शक, याच सुमारास अमेरिकन निर्मात्यांनी फ्रान्समध्ये एक यूरोपीयन हॉलिवुडच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मूकपटांचे बोलपटात रूपांतर झाल्यानंतर यूरोपातील निरनिराळ्या भाषांत त्याचे भाषांतरण (डबिंग) करणे आवश्यक झाले. त्या दृष्टीनेही फ्रान्स हा मध्यवर्ती देश सोयीचा होता. त्यामुळे सु. १४ यूरोपीय भाषांत चित्रपट तयार करण्याचे काम फ्रान्समध्ये होऊ लागले. जर्मनांनीही काही चित्रपटनिर्मितीगृहे बांधली. या काळात झांन व्हिगो ही एक विशेष गाजलेली चित्रपट सृष्टीतील कलावंत व्यक्ती चित्रपटाची कला आणि धंदा अशी विभागणी ही याच काळात होऊ लागली आणि दोघांचेही क्षेत्र निराळे मानले जाऊ लागले.

जागतिक मंदीच्या लाटेत १९३४-३५ च्या सुमारास फ्रेंच चित्रपट व्यवसायही सापडला. १९३९ मध्ये फ्रेंच चित्रपटांची निर्मिती अवघी ७५ होती व महायुद्धास तोंड लागल्यावर तर सर्वच धंदा विस्कळित झाला. महायुद्धानंतर फ्रान्स  अमेरिका यांत १९४६ मध्ये एक करार झाला. त्या कराराप्रमाणे फ्रान्समध्ये प्रदर्शित होणाऱ्या अमेरिकन चित्रपटांच्या संख्येवर निर्बंध असावेत असे ठरले आणि ती मर्यादा १२० चित्रपटांपुरतीच सीमित झाली. त्यामुळे फ्रेंच चित्रपटांना संरक्षण मिळाले. महायुद्धात उद्ध्वस्त झालेली चित्रपटगृहे पुन्हा बांधण्यात आली. ४,००० चित्रपटगृहांची संख्या ४,४४० झाली. चित्रपटनिर्मिती १९४९ मध्ये पुन्हा १०० पर्यंत वाढली. या निर्मितीमध्ये अर्थातच युद्धविषयक चित्रपट जास्त होते. रने क्लेमान याचा ला बतायू दु रेल (१९४६) हा चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे. रने क्लेमान् अमेरिकेत गेला होता, तोही याच काळात परत आला. झाक ताती या विख्यात विनोदी कलावंताचाही हा चलतीचा काळ होता. ला सालेर द ला पर (१९५३) या आंरी झाँर्झ क्लूझोनिर्मित चित्रपटात एक उत्कृष्ट सत्यकथा प्रभावीपणे रंगविलेली होती (१९५३). १९५० ते ५६ या काळात फ्रेंच चित्रपट व्यवसायाला बरेच स्थैर्य लाभले. परदेशांशी सहकार्य करून चित्रपट काढण्याच्या योजनांना चालना मिळाली, त्यांचे निर्यात उत्पन्न वाढले, गॉमाँ आणि पाथे यांच्या चित्रपटसंस्था बँकांकडे गेल्या आणि धंद्यामधील विस्कळितपणा जाऊन त्यात सुसूत्रता आली. रने क्लेमान् याच्या ला बोते दु दिआब्ल (१९४९) या चित्रपटामुळे ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हा जुनाच वाद नव्याने पुढे आला. १९५० मध्ये फाउस्ट  या चित्रपटाने हा प्रश्न प्रथम उपस्थित केला होता. चित्रपटाचे बदलते तंत्र आणि वास्तवतेकडील कल यांचाच परिपाक म्हणजे नवी लाट होय. १९५९ मध्ये कॅन येथील महोत्सवात हिरोशिमा मोनामूर  या आलॅन रेने याच्या ले कात्र साँ कू  या फ्रांक्का त्रूफो याच्या आणि ब्लॅक ऑर्फस (१९५८) या मार्सेल कोमू इत्यादींच्या चित्रपटांमुळे लोकांचे लक्ष या नव्या लाटेकडे वेधले गेले. नव्या विचारांच्या ४९ कलावंतांनी एकत्र येऊन ही चळवळ १९५० मध्येच सुरू केली होती, पण लोकमतावर तिचा परिणाम घडून येण्यास जवळजवळ नऊ वर्षे लागली आणि मुळातला हा तिसांचा गट नवी लाट म्हणून ख्याती पावला. तीन वर्षांनंतर ल बॉलॅन् रूज (१९५६) हा सुंदर काव्यात्मक कथापट, ल मिस्तेअर पिकासो  हा कलाचित्रपट आणि ल माँद द्यू सिलान्स  हा वार्तापट सर्वमान्य ठरले. या नव्या लाटेचे वैशिष्ट्य सुरुवातीला जरी चित्रपटांची कमीतकमी लांबी असे होते, तरी ते तिचे व्यवच्छेदक लक्षण मात्र नव्हे. या लाटेत सामील झालेले दिग्दर्शक कोणतीही गुरूशिष्यपरंपरा न मानता नवीन प्रयोग आपल्या स्वतंत्र प्रज्ञेप्रमाणे करीत. रॉझे व्हादिम, झान ल्यूक गॉदार् किंवा वर उल्लेखिलेले रेने, त्रूफो व कोमू यांच्या कलात्मक दृष्टीकोनात काहीही साम्य नाही आणि तरीही ते सर्व या नव्या लाटेचेच प्रवर्तक मानले जातात. १९७३ मध्ये तयार झालेल्या चित्रपटांत लास्ट टँगो  हा चित्रपट सर्वांत यशस्वी ठरला. १९७० साली ६६ चित्रपट फ्रेंच निर्मात्यांनी तयार केले, तर ७२ परदेशी निर्मात्यांच्या सहकार्याने तयार झाले. चित्रपटगृहे सु. ४,३०० असून १९७० पासून मात्र ही संख्या घटत आहे. चित्रपटनिर्मितीची वर्षाला सरासरी १४० ते १५० पडते.

ब्रिटिश चित्रपट  :  ल्यूम्येअर ब्रदर्सच्या विद्यमाने इंग्लंडमध्ये चलत चित्रपटांचा पहिला खेळ २० फेब्रुवारी १८९६ रोजी झाला पण त्या अगोदर विल्यम फ्रीझ ग्रीन व बर्ट एकर्स यांनी छोटे छोटे चित्रपट चित्रित करण्याचा प्रयत्न केला होता. आर्.डब्ल्यू. पॉल याने १८९९ साली उत्तर लंडन (ग्रेट ब्रिटन) मधील पहिले चित्रपटनिर्मितिगृह उभारले.

जॉर्ज आर्ल्बट स्मिथ याने १८९७ पासून स्वतः बनविलेल्या सिनेकॅमेऱ्याच्या साहाय्याने छोटे छोटे चित्रपट तयार केले होते. द्विप्रकाशन वापरून चित्रचमत्कृतीचा प्रयोगही त्याने करून पाहिला.

यासंबंधात जेम्स ए. विल्यमसन, आर्थर मेलर्बन कूपर, विल्यम हॅग्गर यांच्या प्रयत्नांचाही उल्लेख करावा लागेल. तसेच सेसिल हेप्‌वर्थ, ल्यूइन फिट्‌झहॅमन यांचे कार्यही उल्लेखनीय आहे.


सुरुवातीच्या दहा वर्षात ब्रिटनने या धंद्यात चांगलीच आघाडी मारली. १९१२ सालापर्यंत ब्रिटन या धंद्यात अग्रेसर होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील कलावंत, तंत्रज्ञ यांना प्रत्यक्ष रणभूमीवर जावे लागले. या परिस्थितीचा फायदा अमेरिकेला मिळून १९१७ च्या सुमारास ती या धंद्याचे केंद्र बनली. ⇨ चार्ल्‌स चॅप्लिन  व  ⇨ ॲल्फ्रेड हिचकॉक  यांसारखे जगन्मान्य ब्रिटिश कलावंत अमेरिकेत पुढे गेले. उत्तमोत्तम ब्रिटिश कलावंत अमेरिकन चित्रपटांतून चमकू लागले आणि काही अंशी ब्रिटिश आणि अमेरिकन असा फरक करणेही कठीण होऊन बसले. ही परिस्थिती ओळखून काही ब्रिटिश दिग्दर्शकांनी एकत्र येऊन लघुपट काढण्यास आरंभ केला व फारच थोड्या अवधीत त्यांनी आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांत हंफ्रीजेनिग्झचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दुसऱ्या महायुद्धकाळात या लघुपटांचा सरकारने उपयोग करून घेतला आणि या शाखेतील ब्रिटनचे स्थान उंचावले.

ॲल्फ्रेड हिचकॉकदिग्दर्शित 'ब्लॅकमेल', १९२९.फ्लॉरेन्स टर्नर ही अभिनेत्री १९०७ सालापासून चित्रपटांत कामे करीत होती, लॅरी ट्रिंबल या निर्मात्याच्या सहकार्याने तिने हेप्‌वर्थ चित्रपट निर्मितिगृहात टर्नर फिल्म कंपनीची स्थापना करून (१९१३) एक व दोन रिळांचे उत्तमोत्तम लघुचित्रपट सादर केले. त्याकाळी ती अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यापर्यंत तिचा प्रभाव टिकून होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जॉर्ज पीअर्सन व नंतर दिग्दर्शक ग्रेहम कट्‌स आणि निर्माता हर्बर्ट विलकॉक्स हे चित्रपटसृष्टीत बरेच आघाडीवर होते. त्यांच्यानंतर ॲल्फ्रेड हिचकॉक या दिग्दर्शकाचा जमाना सुरू झाला. दिग्दर्शक अँथोनी ॲस्कविथ व निर्माता अलेक्झांडर कोर्डॉ यांचे चित्रपट १९३० पासून दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत गाजले.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात मात्र चित्रपटप्रेक्षकांची संख्या कमी होऊ लागली. तसेच चित्रपटगृहांची संख्यादेखील कमी झाली. त्याचे कारण प्रामुख्याने दूरचित्रवाणीचा प्रसार हे असून शिवाय मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध असणे, हेही आहे. ब्रिटनमधील ४० टक्के चित्रपटधंदा जे. आर्थर रॅक यांच्या चित्रपटसंस्थेच्या हाती आहे. मेट्रो या अमेरिकन कंपनीचेही लंडनपासून जवळच स्वतःचे एक चित्रपट निर्मितिगृह असून त्यांच्या यूरोपीय चित्रपटांची निर्मिती तेथे होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर डेव्हिड लिन दिग्दर्शकाच्या ग्रेट एक्स्पेक्टेशन, ऑलिव्हर टि्‌वस्ट, समर मॅडनेस, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, लॉरेन्स ऑफ अरेबिया, डॉ. झिव्हॅगरे  या चित्रपटांनी फार मोठी लोकप्रियता संपादन केली. कॅरॅल रीड व मायकेल पोएल हे दिग्दर्शक आणि मायकेल बाल्कन हा ब्रिटिश निर्माता इ. लोक उल्लेखनीय आहेत.

या धंद्याला मदत करण्यासाठी नॅशनल फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन ही संस्था १९४९ मध्ये स्थापन करण्यात आली. तिला सरकारकडून साठ लक्ष पौंड आणि खाजगीतून वीस लक्ष पौंड भांडवल उभारण्याची परवानगी आहे. ब्रिटनमध्ये तयार होणाऱ्या निम्म्याहून अधिक चित्रपटांना ती भांडवल देते. शिवाय १९५० साली उद्योगपतींनी आपण होऊन सुरू केलेल्या एका योजनेला १९५७ पासून सरकारने मान्यता दिल्यामुळे निर्मात्यांच्या उत्पन्नांत २० टक्क्यांहून अधिक भर पडू लागली. या योजनेनुसार प्रत्येक ब्रिटिश चित्रपटनिर्मात्याला तिकिटांच्या पैशांतील ठराविक भाग मिळतो. १९२७ साली केलेल्या एका कायद्याला अनुसरून प्रत्येक चित्रपटगृहात ठराविक काळ ब्रिटिश चित्रपट दाखवावेच लागतात. १९५० पासून हे प्रमाण ३० टक्के आहे. ब्रिटन मध्ये चित्रपटासाठी प्रत्यक्ष संमती लागत नाही. ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर स्वतंत्र आहे. सर्वांनी पहाण्यालायक, फक्त प्रौढांनीच पहाण्यालायक आणि मुलांनी न पाहण्यासारखे अशी चित्रपटांची तीन वर्गीकरणे करण्यात येतात. चित्रपट दाखविण्याची परवानगी मात्र स्थानिक अधिकाऱ्याकडून घ्यावी लागते. १९३३ मध्ये सरकारतर्फे ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली. एक कला म्हणून चित्रपटांची जोपासना करणे, हे तिचे कार्य आहे. याशिवाय एका स्वतंत्र कायद्यान्वये बालचित्रपटांना उत्तेजन देण्याचे कार्य चालू आहेच. मुलांसाठी सु. ९०० स्वतंत्र चित्रपटगृहे आहेत.

१९२० च्या पूर्वी बेटी बॅल्फुर ही नटी अतिशय लोकप्रिय होती. नंतरच्या काळात चार्ल्‌स लॉटन, रॉर्बट डोनेट, लेस्ली हॉवर्ड, अँथोनी ॲस्कविथ, ग्रीर गार्सन, जेम्स मेसन, ॲलेक गिनेस्, जोसेफ कॉटन इ. अभिनेते व अभिनेत्री उदयास आल्या. फ्रेंच चित्रपटसृष्टीतील नवी लाट खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये आली. पण ती सरळ चित्रपटगृहात न जाता रंगभूमीच्या वाटेने शिरली. त्यामुळे रंगभूमीवर जे दिसते त्याचीच प्रतिकृती चित्रपटात सापडते. सॅम्युएल बेकेट, जॉन ऑस्बर्न इ. नव्या नाटककारांची नाटके घेऊन चित्रपट तयार करण्यात आले. ते करणारे नवीन निर्माते आणि दिग्दर्शकही उदयास आले. १९७३ मध्ये ब्रिटनमध्ये सु. ९० चित्रपट तयार झाले असून चित्रपटनिर्मितिगृहे २८ होती.

'द स्लाट लाफ', १९२४.

जर्मन चित्रपट : जर्मन चित्रपटसृष्टी १९१८ पर्यंत तरी विशेष प्रगत नव्हती. फ्रिट्‌स लांग याचा १९१० पूर्वीचा हॅम्लेट  व १९१३ सालचा डेर ॲन्डेअर  या दोन चित्रपटांचा बराच गाजावाजा झाल्याचा उल्लेख मिळतो. जर्मन चित्रपटनिर्मितीला चालना देण्याची कामगिरी ओस्कार मेस्सटेर याने केली . पुढे पाऊल वेगेनर व हेन्रिक गॅलीन यांनीही याबाबत प्रयत्न केले. १९१४ साली डेर गोलेम  हा हेन्रिक गॅलीनचा चित्रपट बर्लिनमधील एका चित्रपटगृहात दाखविण्यात आला होतो. पहिल्या महायुद्धानंतर लगेच म्हणजे १९१८ मध्ये उफा (Universell Film Aktienqesellschaft) या संस्थेची स्थापना सरकारी प्रेरणेने करण्यात आली. कारण युद्धकाळातच चित्रपटासारख्या महत्वाच्या प्रचारसाधनाची उपयुक्तता जनरल लूडेन्डोर्फ याला पटली होती आणि त्यानेच सादर केलेल्या एका निवेदनाच्या आधारे जर्मन बँकेचा तेव्हाचा अध्यक्ष स्ट्रस याने अडीच कोटी मार्क भांडवल देऊन ही संस्था स्थापन केली. जर्मनीतील सर्व चित्रपटव्यवसायी या संस्थेशी कुठल्या तरी नात्याने जोडले गेले. पुढील पाचसहा वर्षे जर्मन चित्रपटव्यवसाय प्रगत होत गेला. अर्न्स्ट लूबिच हा दिग्दर्शक आणि एमील यानिंग्‌स हा अभिनेता हे दोघे जगभर मान्यता पावले. उत्कृष्ट अभिनेता म्हणून पहिल्या ऑस्कर पुरस्काराचा मान त्याने मिळवला. चरित्रकलावंत या नात्याने एमील यानिंग्‌स हा अनन्यसाधारण मानला जातो. त्याचा द लास्ट लाफ  हा जागतिक कीर्तीचा चित्रपट एक अजोड कलाकृती मानली जाते. पोला नेग्री ही तत्कालीन अभिनेत्री उत्कृष्ट जर्मन कलावंतांत गणली जाई. १९२२ च्या सुमारास जर्मनीत ४७४ चित्रपट तयार झाले. इतर देशांप्रमाणे जर्मनीतही वास्तववादाची लाट आली. मात्र तिचा परिपोष निराळ्या दिशेने झाला. रोबेर्ट व्हीन या दिग्दर्शकाने डॉक्टर कालिगारी हे एक नवीन व्यक्तीचित्र लोकांसमोर उभे केले. त्यांतून मानसिक व्यथा व तिचे विश्लेषण प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. याच विचारधारेचा दुसरा दिग्दर्शक लुपु पिक् हा होय. यांशिवाय एफ्. डब्ल्यू. मर्नो, फ्रिटस लांग व कार्ल ग्र्यून यांनीही जर्मन चित्रपटसृष्टीला समृद्ध केले. मेट्रोपार्लस  पासून ब्लू एंजल  या चित्रपटापर्यंत जर्मनचित्रसृष्टी सतत विकसनशील राहिली. एमील यानिंगस्‌चा ब्लू एंजल  १९३० सालीच तयार झाला होता, त्यामुळे तो लगेच बोलपट करण्यात आला. या चित्रपटातील प्रमुख स्त्रीभूमिका मार्लिन डीट्रिखने केली होती, पण पुढे जर्मनीतील राजकीय वातावरण बदलले आणि उफाच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्वच शाखांना गोबेल्स यांच्या सूचनानूसार आपआपल्या कार्यक्रमांत फेरबदल करावे लागले, तरीही मुन्शास्सेन, बेल आमि, ज्यू सस्‌  इ. विख्यात चित्रपट अशाही वातावरणात तयार झाले. या काळातील रेनी रायफेनस्टाल या दिग्दर्शक बनलेल्या स्त्रीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

दुसऱ्या महायुद्धाचा काळ संपल्यानंतर जर्मनीची फाळणी होऊन दोन स्वतंत्र जर्मन राष्ट्रे अस्तित्वात आली. उफा या संस्थेचे पुनरूज्जीवन करण्याची परवानगी १९५४ मध्ये देण्यात आली. त्या सुमारास द डेझर्ट फॉक्स  हा अमेरिकन युद्धचित्रपट चांगला चालला. मग जर्मनांनाही युद्धकाळावर आधारित असे चित्रपट तयार करण्याची परवानगी मिळाली, परंतू नाझी इतिहास कसा दाखवावा याबद्दल काहीच स्पष्ट कल्पना कोणाच्याच मनात नव्हती . पूर्व जर्मनीत डेफा ही संस्था आहे, परंतु तिला सरकारी चित्रपट समितीच्या सूचनांप्रमाणे कार्य करावे लागते.

रोबेर्ट झिओडमॅक, फ्रिट्स लांग हे अमेरिकेत गेलेले कलावंत दुसऱ्या महायुद्धानंतर परत मायदेशी आले, परंतुु त्यांचा विशेष प्रभाव चित्रपट सृष्टीवर पडला नाही . नाही म्हणायला रोबेर्ट झिओडमॅक, फ्रेड झिनेमान, बिली वाइल्डर आणि एटगार उलमेर या जर्मन दिग्दर्शकांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा लाभलेली आहे. पश्चिम जर्मनीने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेतला व त्यांत सु. १५० पारितोषिके, पुरस्कार व खास प्रशस्तिपत्रे मिळविली. पूर्व जर्मनीत चित्रपट निर्मितीचे प्रमाण सरासरी १२५ पडते.

जपानी चित्रपट : जपानमध्ये १८९७ साली एडिसनचा व्हिटास्कोप व ल्यूमेअर बंधूंचा सिनेमॅटोग्राफ पोहोचला होता. मोमीजिगारी  हा माहितीपटात्मक पहिला चित्रपट येथे १९०२ साली तयार झाला. १९०३ साली जपानमध्ये पहिले चित्रपटग्रह बांधले गेले, तर पहिला महत्त्वाचा दिग्दर्शक शोझो माकीनो हा होता. त्याचे स्वतःचे चित्रपटगृहही होते. प्रथमावस्थेतील जपानी चित्रपटांवर पारंपरिक ⇨ काबूकी  नाट्यकलेची रीच छाप होती व मोमिजिगारी हा पहिला चित्रपटसुद्धा काबुकी नाट्यावरच आधारलेला होता. सुरुवातीच्या चित्रपटांतून स्त्रीभूमिका पुरुषच करत असत. स्त्रीभूमिकाप्रमाणेच पुरुषभूमिकाही करणारा त्या वेळचा एक प्रसिद्ध नट म्हणजे कासुओ हासेगावा होय. योशिझावा कंपनीने १९०८ साली पहिले चित्रपटनिर्मितीगृह बांधले, परंतु १९१० मध्ये काबूकी रंगभूमीवरच्या नटांनी चित्रपटात काम करायचे नाकरल्यामुळे मोठीच अडचण निर्माण झाली. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी तत्कालीन चार प्रमुख चित्रपटनिर्मितीसंस्थांनी एकत्र येऊन, १९१२ मध्ये द निक्कात्सु कंपनी ही आद्य धंदेवाईक संस्था स्थापन केली आणि तेव्हापासूनच जपानी चित्रपटांच्या निर्मितीला चालना मिळाली. वरील संस्थेने टोकिओ आणि क्योटो येथे चित्रपटनिर्मितीगृहे उभारली. पुढे स्त्रियाही चित्रपटात काम करू लागल्या. १९१४ पासूनच जपानमध्ये बोलपट आणि रंगीत चित्रपट तयार करण्याच्या दिशेने प्रयोग सुरू झाले होते. जपानमध्ये तयार झालेला संपूर्ण लांबीचा पहिला चित्रपट म्हणजे द ब्रिलिअन्स ऑफ लाइफ  हा होय. हा चित्रपट १९१८ साली स्थापन झालेल्या मोशन पिक्चर आर्ट्‌स असोशिएशन या संस्थेने तयार केला होता. त्यानंतर अनेक कंपन्या निघाल्या व चित्रपटांचा सर्वांगीण विकास होत गेला. चित्रपटांचा कलात्मक दर्जा वाढविण्याचे श्रेय केनजी मिझोगुची या दिग्दर्शकाला दिले जाते. जपानला दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा जबरदस्त तडाखा बसल्यामुळे, चित्रपटधंद्याची अतिशय हानी झाली. सु. ५०% चित्रपटनिर्मितीगृहे व चित्रपटप्रदर्शनगृहे युद्धकाळात नष्ट झाली. त्यापूर्वी १९२३ च्या धरणीकंपाने जवळजवळ सर्वच चित्रपटगृहे जमीनदोस्त झाल्यामुळे प्रचंड हानी झाली होती.

'युकी वारिसू', १९५४.महायुद्ध संपल्यानंतर जपानी चित्रपटव्यवसायाचे हळूहळू पुनरूज्जीवन झाले. चित्रपटांच्या कलात्मक व तांत्रिक अंगात सुधारणा होत गेल्या. १९५१ साली व्हेनिस येथील आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आकिरा कुरोसावा याच्या राशोमोन  या जपानी चित्रपटाला ग्रँड प्रिक्स हा सर्वोच्च पुरस्कार लाभला. केनजी मिझोगुची या दिग्दर्शकाच्या चित्रपटांनाही १९५२-५३ व ५४ साली पारितोषिके मिळाली. १९५४ साली द ग्रेट ऑफ हेल  या चित्रपटाला व १९५८ साली द रिक्षामॅन  ह्या चित्रपटाला अनुक्रमे फ्रान्स आणि इटली येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात उत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार मिळाला. १९५४ साली जपानी चित्रपटांची संख्या जगात सर्वांत जास्त होती.

चित्रपटांची कथानके आणि ती हाताळण्यातील कल्पकता व कौशल्य हे जपानी चित्रपटांचे खास वैशिष्ट्य असते. तासाका तोमोताकादिग्दर्शित युकी वारिसू  या चित्रपटाने भारतातही एकेकाळी अपार लोकप्रियता मिळवली होती.

चित्रपटनिर्मितीसंस्थांमध्ये निक्कात्सु, त्तो-एइ, दाइ-एइ, तोहो आणि शोचिकु या चित्रपटनिर्मितीसंस्था म्हणजे जपानी चित्रसृष्टीतील पंचमहासंस्था मानल्या जात असत परंतु १९७१ च्या अखेरीस दाइ-एइ स्टुडिओचे दिवाळे वाजले. दिग्दर्शकांमध्ये मिनोसु मुराता व युताका आबे हे प्रसिद्ध दिग्दर्शक मानले जातात. शिवाय दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर हेइनोसुके गोशो, मिकिओ नरूसे व यासुजिरो ओझु इ. नामवंत दिग्दर्शक प्रसिद्धिला आले. त्याचप्रमाणे आकिरा कुरोसावा, हिरोशि तेशिगाबारा, हिरोशि इनागाकि, नागिसा ओशिमा, माशाहिरो शिनोला, तोमु उचीदा तसेच तादाशि इमाई, केइसुके किनोश्ता, शिरोटोयोडा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे काही दिग्दर्शक आहेत, तर द फ्लेश मार्केट, ही इज ए डेव्हिल ऑफ ए मॅन , ए मोमेंट ऑफ टेरर, द फेस ऑफ अनदर  हे काही उल्लेखनीय जपानी चित्रपट आहेत. लोकप्रिय प्रमुख कलाकारांत तात्सुया नाकादाई, तोशिमो मिफूने, मुगा ताकेवाकी, किओकोकिशीडा हे नट आणि मिझुतानी याको, माचिको क्यो, मियुकी कुवानो, योको बेनिझावा आणि उताको नाकायामा या नट्या यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

जपानी चित्रपटांत लैंगिकतेला दिले जाणारे फाजील महत्त्व तेथील काही सद्‌भिरुचीसंपन्न प्रेक्षकांना आवडेनासे झाले. त्याचा परिणाम म्हणून १९५६ साली उत्तर जपानमधील मोटोमीआ नावाच्या एका लहानशा शहरातील महिलांच्या प्रेरणेने तेथील नागरिकांनी चित्रपटातील लैंगिक दृश्यांविरूद्ध संघटितपणे विरोध करायला सुरवात केली आणि त्यांनीच स्वतः काही तंत्रज्ञाच्या साह्याने द माउंटस ऑफ द हार्ट  या नावाचा एक सोज्ज्वळ चित्रपट काढला.

अनुबोधपटांच्या निर्मितीतही जपानने बरीच प्रगती केली आहे. त्या देशातील दृक्‌श्राव्य शिक्षणपद्धतीत माहितीपटांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. साकुमा डॅम  आणि द चिल्ड्रेन्स साँग्ज ऑफ जपान यासारखे अनेक माहितीपट नमुनेदार मानले जातात, परंतु जपानी चित्रपट व्यवसायाला दूरचित्रवाणीशी सामना द्यावा लागत आहे. या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी जपानमधील चित्रपटनिर्मिते अधिक भव्य आणि तंत्रदृष्ट्या आकर्षक चित्रपट काढण्याकडे आपले लक्ष्य केंद्रित करू लागले आहेत. तरीही दूरचित्रवाणीशी स्पर्धा करणे त्यांना जड जात आहे. याचे कारण म्हणजे तेथे दूरचित्रवाणीचा प्रसार व लोकप्रियता अधिक आहे हे होय. १९५८ साली चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचा उच्चांक होता. १९५९ मध्ये तर जपानने चित्रपटनिर्मितीत जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावर्षी एकूण ५३८ चित्रपट तयार झाले, पण ही संख्या उत्तरोत्तर कमी-कमी होत आहे.

अन्य देशीय चित्रपट : फिनिश चित्रपटसृष्टीमध्ये १९१९ सालापर्यंत छोटे छोटे चित्रपट तयार होत होते. पुढे रंगभूमीचे दोन प्रसिद्ध कलावंत एर्क्की कारुद व तैवो प्युरो यांनी सूऑमी फिल्म ही चित्रपटसंस्था स्थापन करून चित्रपटनिर्मिती सुरू केली. मॉरित्स स्टीलर व गुस्टाव्ह मोलँडर हे दोन प्रख्यात दिग्दर्शक फिनलंडमध्ये जन्मले असले, तरी जॉर्न डोनर हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक जगाला फिनिश चित्रपटसृष्टीनेच दिला आहे. एडविन लेनेचा द अन्‌नोन सोल्जर (१९५५) हा चित्रपट बराच गाजला, तर एरिक ब्लूमबर्गच्या द व्हाईट रेनडियर  या चित्रपटाला चित्रपटमहोत्सवात प्रवेश मिळाला होता. मिक्को निस्कॅनन हा तिकडील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. जॉर्न डोनर याने १९६७ साली ब्लॅक ऑन व्हाइट  हा रंगीत चित्रपट सादर केला. त्यात त्याचीच प्रमुख भूमिका होती. त्याने स्वतः सिक्स्टीनाइन  व पोर्ट्रेट्स ऑफ वुईमेन  हे दोन उत्तम चित्रपट निर्माण केले असून फोर टाइम्स ओन्ली  व टाइम ऑफ रोझेस  इ. त्यांचे चित्रपटही उल्लेखनीय आहेत. या दिग्दर्शकाने मॅकिननबरोबर फिनिश नॅशनल फिल्म आर्काईव्हचीही स्थापना केली. १९७४ मध्ये फक्त ५ फिनिश चित्रपट निर्माण झाले. जॉर्न डोनरच्या चित्रपटांना जागतिक प्रदर्शनात ओळीने दोनदा चित्रपट पारितोषिक मिळाले. त्यानंतर कॅसल ऑफ पॉल  या सेप्पो हुनानेन याच्या चित्रपटाला हा मान मिळाला. येथे सु. ६०० चित्रपटगृहे आहेत.

स्वीडीश चित्रपटसृष्टीतील Komische Begegnung  या पहिल्या स्वीडिश चित्रपटाचा निर्माता ओतोमार आन्श्युट्स असला, तरी खराखुरा जनक अर्न्स्ट फ्लोरमन हाच आहे. त्यानंतर चार्ल्‌स माग्नूसॉन व जॉर्ज ऑफ क्लेरकेर यांनी स्वीडीश चित्रपटसृष्टी विकसित केली. येथील व्हिक्टर, मॉरित्स स्टीलर वगैरे दिग्दर्शक दुसऱ्या महायुद्धकाळात प्रसिद्ध होते. स्टीलरचे एरोटिकॉन, सर अर्नेज ट्रेझर, गुन्नर हेजेस सागा  हे चित्रपट बरेच गाजले. त्यानेच  ⇨ गार्बो ग्रेटासारख्या अभिजात अभिनेत्रीला प्रथम संधी दिली. त्यानंतरच तिने पाब्स्ट यांच्या द जॉयलेस स्ट्रीट  व स्ट्रीट ऑफ सॉरो  या जर्मन चित्रपटात भूमिका केल्या. पुढे स्टीलरबरोबर ती हॉलिवुडला गेली. व्हिक्टर या कलावंत दिग्दर्शकाची कामगिरीही स्वीडीश चित्रपटसृष्टीत फार मोठी आहे. त्यालाही हॉलिवुड येथे बोलावण्यात आले होते, पण तो काही दिवसांनी परत आला. ए मॅन देअर वॉज, द आउटलॉ अँड हिज वाइफ, द व्रीड ऑफ लव्ह  व द सेव्हन्थ सील  हे त्याचे सुरुवातीचे चित्रपट खूप गाजले. हॉलिवुडमधील त्याचा द विंड  हा चित्रपट तर उत्कृष्ट ठरला. १९५७ साली त्याने केलेले आयझॅक बोर्ज ही वाइल्ड स्ट्रॉबेरी (१९५९) या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली. गुस्टाव्ह मोलँडर या दिग्दर्शकाचा Swedeubielms  व Intermezzo  या चित्रपटातून इन्ग्रिड बर्गमन ही विख्यात अभिनेत्री प्रथम चमकली. याच दिग्दर्शकाने वन नाइट  हा पहिला स्वीडिश बोलपट दिग्दर्शित केला (१९३१). इंगमार बर्गमन हा येथील प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्याने अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. जॉन ट्रायल व कार्ल ड्रायर हे दिग्दर्शकही प्रसिद्ध आहेत. येथे १९७३ मध्ये चित्रपटनिर्मिती सु. ४० होती.

नॉर्वेजियन चित्रपटक्षेत्रात १९३६ साली यार येथील पहिले नॉर्वेजियन चित्रपटनिर्मितीगृह उभे राहिले असले, तरी त्याअगोदर दहा वर्ष क्रिस्तिनिआ फिल्म कंपनीने चित्रपटनिर्मिती सुरू केली होती. त्याचा दिग्दर्शक रास्मस ब्रेइस्टीन हा होता. लिफ सिडिंग या दिग्दर्शकाने Fantegutten  हा पहिला नॉर्वेजियन संगीतप्रधान बोलपट दिग्दर्शित केला होता (१९३२). द ग्रेट बॅप्टिझम  हा पहिला बोलपट दिग्दर्शित करणारा टॅन्क्रेड लिब्सेन हा प्रथम हॉलिवुड येथे पटकथालेखक होता. नंतर त्याने स्वीडन व नॉर्वे येथे बरेच चित्रपट दिग्दर्शित केले. आर्ने स्कोऊनदिग्दर्शित फ्लेम्स इन द नाइट (१९५४) हा फ्रेंच चित्रपटमहोत्सवात दाखविलेला पहिला नॉर्वेजियन बोलपट होय. टीम फिल्म असोसिएशन या संस्थेने सादर केलेले ललबाय ऑफ नॉर्वे  लिनाज वेडिंग  हे दोन उल्लेखनीय चित्रपट आहेत.

डेन्मार्कमध्ये १९०६ साली नॉर्डिस्क फिल्म कंपनी ही संस्था स्थापन झाली. आज जगातील जुन्यांत जुन्या चित्रपटनिर्मितीसंस्थापैकी ती एक आहे. बेंजामिन क्रिस्टेनसन हा प्रारंभीच्या काळातील मोठा दिग्दर्शक असून नंतरच्या काळात कार्ल ड्रायर या दिग्दर्शकाने विशेष किर्ती संपादन केली. द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क, द पार्सन्स विडो, मायकेल व्हँपायर  हे त्याचे चित्रपट बरेच गाजले. दुसऱ्या महायुद्धानंतर काही डॅनिश चित्रपटांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. दरवर्षी सु. २० मोठे चित्रपट व बरेच लघुपट व अनुबोधपट येथे तयार होतात. द रेड अर्थ  या चित्रपटाने कॅनच्या चित्रपटमहोत्सवात चित्ररसिकांचे लक्ष वेधून घेतले असून हंगर  या चित्रपटानेही मोठी लोकप्रियता संपादन केली. पाले जेरूल्फ श्मिट व यर्गेन रॉस हे तेथील अणखी दोन प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. येथील चित्रपटनिर्मितीगृहे अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज आहेत. १९७३ मध्ये चित्रपटनिर्मिती सु. २५ होती.


पोलंडच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास जुना आहे. काझीम्येश प्रोझेंस्की याने एकोणिसाव्या शतकांच्या अखेरीस बरेच छोटे-छोटे विनोदी चित्रपट तयार केले होते. परंतु आंटॉनी फेर्टनर या प्रख्यात विनोदी अभिनेत्याची भूमिका असलेला टोनी इन वॉर्सा  (१९०८) या चित्रपटापासूनच चित्रपटनिर्मितीला तेथे खरी सुरवात झाली. १९११ पासून आणखी काही संस्थांनी चित्रपटनिर्मितीस प्रारंभ केला. १९२० साली येथे पहिले चित्रपटगृह उभारण्यात आले. पोला नेग्री ही पोलिश अभिनेत्री प्रथम बर्लिन व नंतर हॉलिवुड येथे प्रसिद्धीस आली. जोझेफ लायटर याच्या द यंग फॉरेस्ट (१९३४) व द डे ऑफ द ग्रेट डव्हेंचर (१९३५) या पोलिश चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली. आन्जेइ वाज्दादिग्दर्शित शेस अँड डायमंड (१९५८) हा चित्रपट १९४४ मधील पोलिश-जर्मन संघर्षावर आधारित असून तो अतिशय हृदयस्पर्शी होता. लॅलका  व द सॅरोगोसा मॅन्यूस्क्रिप्ट  या चित्रपटानंतर १९७३ साली फ्रान्समध्ये फ्रेंच चित्रपटमहोत्सवात पोलंडचा द सँडग्लास  हा चित्रपट दाखविण्यात आला होता.

चेकोस्लोव्हाकियामध्ये १८९८ साली प्रागचा एक शिल्पकार यान क्रिझेनेकी याने सिनेमॅटोग्राफ आणून बोहिमिया येथे काही चित्रपट्ट्या दाखविल्या होत्या. पुढे १९०८ साली चित्रपटनिर्मितीस प्रारंभ झाला पण खऱ्या अर्थाने १९१२ पासून चित्रपटनिर्मिती सुरू झाली. १९४५ मध्ये चेक चित्रपटसृष्टीचे राष्ट्रीयीकरण होईपर्यंत चेक चित्रपटनिर्मितीला तसा जोम नव्हता, परंतु त्याच वर्षी ‘फाम्यू’ (फॅकल्टी ऑफ द अकॅडमी ऑफ ड्रॅमॉर्टक आर्ट्‌स) या नाट्यकला अकादमीची स्थापना झाली आणि त्याच वर्षी फ्रान्टिशेक कॅप या दिग्दर्शकाच्या मेन विदाऊट विंग्ज  या चित्रपटाला कॅन येथील चित्रपटमहोत्सवात पारितोषिक मिळाले. तसेच १९६४ साली ए शॉप ऑन द हाय स्ट्रीट  या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. १९४७ साल चेक चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यावर्षीच्या कारॉल स्टेकलीच्या द स्ट्राइक  या चित्रपटाला व्हेनिस येथे उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. ब्लॉडिमिर बॉर्स्कीने वॉरियर्स ऑफ फेथ  हा पहिला रंगीत चित्रपट सादर केला. १९५६ साली द अन्‌व्हँक्विश्‌ड  तसेच १९५७ साली सप्टेंबर नाईट  आणि वुल्फ ट्रॅप  या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटांची पारितोषिके मिळाली. यिरीना सेज्‌बॉलोव्ह ही अभिनयकुशल अभिनेत्री याच चित्रपटात चमकली. त्याच चित्रपटांतील याना ब्रेज्‌कोव्हा ही एक अभिनेत्री अग्रगण्य समजली जाते. हे सर्व फाम्यू संस्थेचे विद्यार्थी होते. १९५८ साली डिझायर  या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचे कॅन चित्रपटमहोत्सवात पारितोषिक मिळाले. फर्स्ट रेस्क्यू पार्टी (१९५९) रोमिओ ज्यूलिएट  व डार्कनेस  या चित्रपटांनाही (१९६०) बरीच पारितोषिके मिळाली.

हंगेरीमध्ये पहिला चित्रपट १८९६ साली दाखविला गेला असला तरी १९१२ पासून तेथे चित्रपट निर्मितीस प्रारंभ झाला. त्यावर्षी ह्यूनिया हे पहिले चित्रपटनिर्मितीगृह येथे उभे राहिले. तेथे १९१८ साली १५ दिग्दर्शक होते. त्यांत जगप्रसिद्ध अलेक्झांडर कोर्डाे याचाही समावेश होता. १९३१ साली स्टिव्ह सेकेलीदिग्दर्शित हिप्पोलिट द बटलर  हा येथील पहिला उत्तम बोलपट, तर मिक्लोश जॉन्स्को हा प्रसिद्ध दिग्दर्शक असून रेड साम  हा त्याचा उल्लेखनीय बोलपट आहे.

ऑस्ट्रियामध्ये फिल्मचा शोध लागण्यापूर्वी म्हणजे १८९५ च्या पूर्वी काही हालत्या चित्रांचे प्रयोग झाले होते. सायमन स्टँफरचे लेबेनस्त्राद म्हणजे व्हील ऑफ लाईफसारखे प्रयत्न प्रारंभीचे होते. २० मार्च १८९६ रोजी व्हिएन्ना येथे ल्यूम्येअरच्या सिनेमॅटोग्राफच्या साह्याने पहिल्यांदा चलत्‌चित्रपट दाखविण्यात आला. १९०३ साली मुन्स्टेड किनो हे कायम स्वरूपाचे पहिले चित्रपटगृह व्हिएन्ना येथे उभारण्यात आले. अलेक्झांडर कोलोरॅट हा येथील चित्रपटसृष्टीचा आद्यप्रवर्तक. त्याला ‘द फिल्म अर्ल’ हे टोपणनाव होते. त्याने १९१० साली प्फाउंबेर्क येथे चित्रपटनिर्मितीगृह उभारले, पण त्याच्या चित्रपटांचे स्वरूप म्हणजे नाटकांचे चित्रीकरणच असे. त्यानेच व्हिएन्ना येथेही १९१६ साली चित्रपटनिर्मितीगृह उभारले. दुसऱ्या महायुद्धानंतर ऑस्ट्रीयन चित्रपटसृष्टी कलात्मक दृष्टीने नसली तरी अर्थिक बाबतीत प्रगत झाली. १९२३ साली व्हिटा-फिल्म-एजी या संस्थेचे भव्य चित्रपटनिर्मितीगृह व्हिएन्ना येथे उभे राहिले. १९३८ साली तेथील चित्रपटनिर्मिती जर्मन सरकारच्या ताब्यात गेल्यावर तेथील चित्रपटसृष्टीचे स्वतंत्र अस्तित्व संपले. युद्धकाळानंतरचे पाब्स्ट याचे द नेल (१९४८) व द लास्ट ॲक्ट (१९५५) आणि हेल्मूट काँटरचे द लास्ट ब्राइड  हे उल्लेखनीय चित्रपट होत. पुढे १९५८ साली दूरचित्रवाणीचे आगमन झाल्यावर येथील चित्रपटसृष्टीला जोरदार तडाखा बसला. त्यातून ती नीटशी सावरली गेली नाही. चित्रपटगृहांची संख्या १९७२ साली जवळजवळ ७०० होती. त्याच वर्षी १३ चित्रपट तेथे तयार झाले, त्यात ५ रंगीत, २ श्वेतकृष्ण, ४ परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने तर २ कराराने झालेले आहेत.

रूमानियात चलत्‌चित्रपटाचा १९११ पासून प्रारंभ झाला. १९३५ मध्ये नॅशनल टुरिस्ट ऑफिसने सिनेमॅटोग्राफी डिपार्टमेंट सुरू केले व त्याद्वारे अनुबोधपटनिर्मितीस सुरुवात केली. १९३८ साली द कंट्री ऑफ द मोटझिन  या अनुबोधपटाला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्याअगोदरचे अनुबोधपट परदेशातही लोकप्रिय ठरले होते. त्याचे बरचसे श्रेय पॉल कालिनेस्क्यू यालाच जाते. युद्धानंतर द व्हॅली रीसाउंड्‌स  हा संपूर्ण लांबीचा पहिला चित्रपट त्यानेच तयार केला (१९४९) लीव्ह्यू ग्युली हा सुबुद्ध दिग्दर्शक असून त्याने द फॉरेस्ट ऑफ द हॅंग्ड  हा उत्कृष्ट चित्रपट तयार केला. त्याला पारितोषिकही मिळाले होते (१९६५). त्याच वर्षी मिर्चिआ म्युरेसान याच्या ब्लेझिंग विंटर  या चित्रपटालाही पारितोषिक मिळाले, तर लूचान पिंटिली याच्या ॲट सिक्स ओ क्लॉक  या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली. १९७४ मध्ये ३० रूमानियन चित्रपटांना परदेशातून मागणी आली होती.

यूगोस्लाव्हियातील Karadjordje (१९१०) हा पहिला चित्रपट आहे. १९४५ मध्ये येथील चित्रपटधंद्याचे राष्ट्रीयीकरण झाले. येथे दरवर्षी २० ते ३० संपूर्ण लांबीचे चित्रपट व २०० लघुपट तयार होतात. साधारणतः  युद्धपटांची निर्मिती येथे बरीच आहे.

बल्गेरियाच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास १९०८ पासून सुरू होत असला तरी १९१५ साली द बल्गेरियन इज गॅलंट  या विनोदी चित्रपटाने येथे चित्रपटनिर्मितीस खरी सुरुवात झाली. १९५० मध्ये येथील चित्रपटसृष्टीचे राष्ट्रीयीकरण झाले. त्यावर्षीचा पाहिला बोलपट कॅलिन द इगल  हा असून डॉन ओव्हर द होमलँड, अंडर द योक, पिपल ऑफ डिमिट्रोग्राड  हे त्यानंतरचे उल्लेखनीय बोलपट होत. व्हॅलेरी पेत्राव्हच्या सन अँड शॅडो  या चित्रपटाला बरीच आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली (१९६२), १९७३ मध्ये बल्गेरियात संपूर्ण लांबीचे १८ चित्रपट व २७ लघुपट तयार झाले. येथील बहुतेक चित्रपट रंगीत असतात. चित्रपटगृहे सु. ३ हजार असून १९७२ साली ८ व्यंगपटांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली होती .

ग्रीक चित्रपटसृष्टीचा आद्यप्रवर्तक डिमिट्रिस गॅझिओडिस हा असून ग्रीक वंडर  हा त्याचा पहिला अनुबोधपट (१९२१) होय. १९२७ मध्ये त्याने प्रोमेथेउस बाउंड  हा उत्कृष्ट शोकात्म चित्रपट सादर केला, तर १९३० मध्ये ॲपेक्स ऑफ अथेन्स  व किस मी मारित्सा  हे दोन उत्तम संगीतप्रधान चित्रपट निर्माण केले, परंतु १९४० पर्यंत पंचवीस वर्षांंत ग्रीसमध्ये फक्त ४७ चित्रपटच तयार होऊ शकले. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वच बाबतीत तेथे प्रगती झाली व चित्रपटतंत्र खूपच सुधारले. चित्रपटनिर्मितीगृहे उभारण्यात आली. फिनॉस फिल्म ही तेथील सर्वांत महत्वाची चित्रपटनिर्मितीसंस्था असून स्टेला, गर्ल इन ब्लॅक, ए मॅटर ऑफ डिग्नीटी  व झोर्बा द ग्रीक  हे तेथील उत्तम चित्रपट आहेत. १९६६ मध्ये ग्रीक चित्रपटांची संख्या शंभराहून अधिक झाली. १९७२ मध्ये येथे ६३ चित्रपट तयार झाले, तर १९७३ मध्ये ती संख्या ८६ वर गेली पण १९७४ मध्ये हा आकडा एकदम २० वर घसरला २२ फेब्रुवारी १९७३ रोजी केटिना पॅक्झीनो ही येथील प्रख्यात अभिनेत्री निधन पावल्याने चित्रपटसृष्टीची फार मोठी हानी झाली. फॉर हूम द बेल टोल्समध्ये ती चमकली होती.

स्वित्झर्लंडमध्ये पहिल्या महायुद्धानंतर चित्रपटनिर्मितीस खरी सुरुवात झाली. रॉबर्ट फ्लोरी व जां शोक्स हे त्या वेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक. चार्ल्‌स ड्यूवॅनेल याने प्रथम स्थानिक वार्तापट तयार केला, तर लाझर वेश्लर याने स्वतंत्र चित्रपटसंस्था सुरू करून धिस हिज हाउ चायना लिव्ह्‌ज  ही चित्रपट मालिका सादर केली . येथील अनुबोधपटाची परदेशीयांवर छाप पडली होती. पुढे येथे पूर्ण लांबीचे चित्रपट तयार होत राहिले , परंतु भांडवलाच्या अभावी तेथील चित्रपटसृष्टी दुबळीच राहिली. तेथील नॅशनल फिल्म सेंटरने आर्थिक साहाय्यही देऊ केले, परंतु दूरचित्रवाणीच्या आगमनाने चित्रपटसृष्टीला पुन्हा जबर धक्का दिला. १९७३ साली क्लॉड गॉरेत्ताच्या ल इनव्हिटेशन  चित्रपटाचा कॅन चित्रपटमहोत्सवात गौरव झाला.

अल्बेनियामध्ये १९४७ साली पहिला वार्तापट चित्रित झाला. १९५७ पर्यंत अनुबोधपट आणि महितीपटच येथे तयार होत असून अपवाद म्हणून १९५४ मध्ये रशियन दिग्दर्शक स्यिर्ग्येई युत्केव्हिच याने सादर केलेला द ग्रेट वॉरियर स्कँडर्बेग  हा चित्रपट म्हणता येईल. येथील बहुतेक चित्रपट युद्धविषयक आणि ऐतिहासिक असतात. ब्रॉड होरायझन  हा आधुनिक यांत्रिक युगावरचा बोलपट (१९६८) व पीपल्स पेंटर  हा १९६६ चा अनुबोधपट उल्लेखनीय आहे. लघुपटाशिवाय आता येथे प्रतिवर्षी सु. ४-५ मोठे चित्रपट तयार होतात. १९५४ साली येथे पहिले चित्रपटनिर्मितीगृह उभारले गेले. १९७२ अखेर येथे १८९ चित्रपटगृहे होती.

तुर्कस्थानात १९७३ मध्ये २१२ बोलपट तयार झाले. परंतु तत्पूर्वी म्हणजे १९१७ ते १९२९ या १२ वर्षांत फक्त तेराच मूकपट तयार झाले होते, तर १९३० ते १९५० या वीस वर्षांत १२० चित्रपट निर्माण झाले होते. तथापि दूरचित्रवाणीच्या आगमनाचे येथील चित्रपटसृष्टीवर हळूहळू विपरित परिणाम होत आहे.

नेदर्लंड्समधील सतत पारितोषिक मिळविणारे चित्रपटनिर्माते म्हणजे बर्ट हान्सूत्रा, चार्ल्‌स ह्यूगेनॉट व व्हँडर लिंडेन हे असून ब्ल्यू मुव्ही  व बिझिनेस इज बिझिनेस  हे येथील खूप गाजलेले चित्रपट आहेत. योहान फोन डेर केउकेन या दिग्दर्शकाचे नाव त्याच्या डायरी  या चित्रपटाने परदेशातही प्रसिद्ध झाले. लिंडेन याच्या धिस टायनी वर्ल्ड  चित्रपटाला १९७३ चे अकादमी पारितोषिक मिळाले होते. मात्र येथील चित्रपटगृहांची संख्या ३९२ वरून ३७७ वर येऊन ठेपली आहे.

बेल्जियममधील बॉरिस झुलसिंगरच्या द लोनली किलर्स  या चित्रपटाची परदेशातही प्रशंसा झाली. बेनाँ लामीदिग्दर्शित होम स्वीट होम  हा येथील एक उत्कृष्ट चित्रपट असून एमिल डिजिलाइनच्या पॅलॅबर  या १९७१ च्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्णपदक मिळाले. बेल्जियममध्ये सु. आठशे चित्रपटगृहे आहेत. आंद्रे देवाँदिग्दर्शित बेल  हा एक उल्लेखनीय चित्रपट होय.

स्पेनमधील खऱ्या अर्थाने पहिला चित्रपट फ्लोरियन रेदिग्दर्शित द डॅम्‌ड व्हिलेज (१९२९) हा असून लूईस ब्यूनेल हा त्या काळातील अग्रगण्य दिग्दर्शक होय. लुईस बर्‌लँगा हा तेथील सर्वांत जुना, जाणता व कर्तबगार दिग्दर्शक असून या दिग्दर्शकाचे मि. मार्शल  व द एक्झिक्यूशनर  हे दोन विनोदी चित्रपट उत्तम मानले जातात. येथे एकूण ११ चित्रपटनिर्मितीगृहे आहेत.

कॅनडामध्ये १९१९ ते १९२३ या काळात अर्नेस्ट शिपमन या निर्मात्याने द स्काय पायलट, द मॅन फ्रॉम ग्लेनगॅरी, ब्ल्यू वॉटर्स  यांसारखे बरेच चित्रपट तयार केले असले, तरी बहुतांशी माहितीपट, जाहिरातपट, शैक्षणिक लघुपट अशीच त्याची चित्रपटनिर्मिती होती. त्या काळात एकही नामवंत दिग्दर्शक वा कलावंत तेथे उदयास आला नव्हता. पुढील दशकात मात्र रिटा हेवर्थ, विल्यम गॅर्गन, लिली टॅबोल्ट, वेन्डी बॅरी, रॉबी विंग यांसारखे कलावंत कॅनेडियन चित्रपटांतून कामे करू लागले. १९२९ साली द नॅशनल फिल्म बोर्डाची स्थापना झाल्यावर प्रोलॉग, क्रिस्टोफर्स, मुव्ही मॅटिनी, डोन्ट लेट टू द एंजल्स फॉल  व ड्रायलँडर्स  यांसारखे चित्रपट निर्माण झाले, तथापि सिडनी फ्यूरी, नॉर्मन जेविसन, आर्थर हिलर, टॉड कोर्ट्‌चेफ, सूझन क्लार्क, मायकेल साराझॅन, डॉन्‌ल्ड सदर्लंड, अलेक्झांड्रा स्ट्यूअर्ट इ. दिग्दर्शक व कलावंत अमेरिकन आणि ब्रिटिश चित्रपटसृष्टीकडे वळले. कॅनेडियन प्रेक्षकांवर अमेरिकन चित्रपटांचा अतिशय प्रभाव आहे. येथे सु. १,२०० चित्रपटगृहे आहेत.

मेक्सिकोमध्ये १९७३ मध्ये ५२ चित्रपट तयार झाले. सेंट्रल सिनेमा ऑफिस या सरकारी संस्थेच्या वतीने येथे चित्रपटनिर्मिती व वितरण होत असते. मेक्सिको येथील चित्रपटनिर्मितीची प्रतिवर्षीय सरासरी ५२ पडते.

क्यूबामध्ये १९५९ साली आय्‌सीएआय्‌सी (Instituto Cubano del Arte e Industria Cinematograticas) ही चित्रपटनिर्मितीची मध्यवर्ती संस्था स्थापन झाली. तत्पूर्वी तेथे परदेशांतून भांडवल आणून चित्रपटनिर्मिती होत असे. वरील संस्थेच्या स्थापनेनंतर नवीन चित्रपटगृहे  उभारण्यात आली. १९६० ते १९६८ या काळात क्यूबामध्ये ४४ बोलपट तयार झाले पण प्रथमपासून चित्रपट हे शिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्याकडे पाहण्यात येत असे. त्यानुसारच शैक्षणिक चित्रपट आणि माहितीपट तयार होत असत. सांत्यागो अल्बारेस हा त्यातील प्रमुख निर्माता व वरील संस्थेच्या लघुपटांचा प्रमुख आहे. Historias de la revolucian (१९६०) हा टॉमस एलीआदिग्दर्शित येथील पहिला संपूर्ण लांबीचा बोलपट असून मेमरीज ऑफ अंडर डेव्हलपमेंट (१९६९) हा त्याचा उल्लेखनीय चित्रपट आहे. हंबर्टो सोलास याचा ल्यूसिया (१९६८) हा क्यूबातील एक अत्युत्कृष्ट बोलपट समजला जातो .

चिलीमध्ये बहुतेक लघुपटच तयार होतात. एन्रिक उर्तेगा याचा ऑपरेशन अल्फा  हा राजकीय गुन्हेगारीवरचा उत्तम चित्रपट होय. राऊल रुइझ या दिग्दर्शकाचे नाव थ्री सॅड टायगरर्स  या चित्रपटाने परदेशातही ज्ञात झाले.

ईजिप्तमध्ये ३ जानेवारी १९६३ रोजी ६ चित्रपट वितरण व निर्मितीसंस्था स्थापन झाल्या, पण ऑक्टोबर १९६६ मध्ये त्यांचे कैरो सिनेमा कंपनी व कैरो डिस्ट्रिब्यूशन कंपनी अशा दोनच संस्थांत विसर्जन झाले. १९७२ पासून ईजिप्शिअन चित्रपटव्यवसाय बाळसे धरू लागला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये १९७३ साली २१ चित्रपट तयार झाले. रॉस डेव्हेनिश याने दिग्दर्शित केलेला बोसमन अँड लेना तसेच सायनर इन डाय सबर्बज  हा फ्रँकोइस स्वार्ट याने दिग्दर्शित केलेला चित्रपट आणि द हाऊस ऑफ द लिव्हिंग डेड  हा रे ऑस्टिनने दिग्दर्शित केलेला पहिला चित्तथरारक मानसशास्त्रीय चित्रपट उल्लेखनीय आहे.

ऑस्ट्रेलियात १८९६ च्या ऑगस्टमध्ये मेलबर्न येथे पहिला चलत्‌चित्रपट दाखविला गेला. १९०६ मध्ये जे. अँड एन्. टेटानिर्मित द स्टोरी ऑफ द केली गँग  हा येथील पहिला संपूर्ण लांबीचा चित्रपट होय, असे सांगितले जाते. १९३० नंतर केन जी. हॉल हा तेथील एकमेव दिग्दर्शित निर्माता असून त्याच्या चित्रपटनिर्मितीगृहातून पिटर फिंच, ॲन रिचर्ड्‌स यांसारखे कलावंत पुढे हॉलिवुड येथे प्रसिद्धीस आले. आता अमेरिकन आणि ब्रिटिश निर्मात्यांच्या सहकार्याने तेथे चित्रपटनिर्मिती होत असते. येथे सु. १,१०० चित्रपटगृहे आहेत.

न्यूझीलंडमधील नॅशनल फिल्म युनिट हे येथील एकमेव सुसज्ज चित्रपटनिर्मितिगृह आहे. हिंज फिल्म प्रॉडक्शन ही एक नवी चित्रपटनिर्मितिसंस्था तेथे सुरू झाली आहे. बहुतेक निर्मिती लघुपटांचीच असते.

चीनमध्ये सु. ८० चित्रपटनिर्मितिगृहे आहेत. त्यांपैकी फक्त सात ठिकाणी संपूर्ण लांबीचे चित्रपट तयार होतात. अन्य ठिकाणी मात्र लघुपट तयार होतात. १९५७ ते १९७२ या १५ वर्षांत तेथे ५४० संपूर्ण लांबीचे चित्रपट तयार झाले. मात्र गेल्या १४ वर्षांत १९० पूर्ण लांबीचे अनुबोधपट,  २,९०० लघुपट ३,००० माहितीपट, १,४०० शास्त्रीयपट आणि २०० व्यंगपट तयार झाले. अमेरिकन चित्रपट मात्र येथे आणले जात नाहीत. कामगार, निसर्ग, पुराणवस्तू संशोधन, आंतरराष्ट्रीय खेळ, परदेशी पाहुण्यांच्या भेटी यांसारखे विषय बहुधा त्यांच्या लघुचित्रपटांत असतात. येथे सु. २,००० चित्रपटगृहे आहेत.

मलेशियामध्ये १९७१ साली १३ चित्रपट तयार झाले असून पर्फिमा ही नुकतीच स्थापन झालेली तेथील मोठी चित्रपटसंस्था आहे. पी. रामलीक व जीन्स शामसुद्दिन या दोन प्रख्यात कलावंतानी ती स्थापना केली असून तिच्याद्वारे सांदेरा  हा भव्य चित्रपट त्यांनी सादर केला.

फिलिपीन्समध्ये दरवर्षी सु. १६३ चित्रपट तयार होतात. पोर्तुगालमधील पोर्तुगीज सीमा सेंटर ही संस्था गेली दोन वर्षे चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात कार्य करत आहे.

श्रीलंका येथे १९७१ मध्ये सु. १७ सिंहली चित्रपट तयार झाले. येथे सु. ३२५ चित्रपटगृहे आहेत, पण त्यांत बहुतेक सिंहली व भारतीय (तमिळ) चित्रपट दाखवितात. थोडेबहुत इंग्रजी बोलपटही चालतात.

पाकिस्तानमध्ये उर्दू, सिंधी, गुजराती, पुश्तू, पंजाबी व बंगाली अशा विविध भाषांत चित्रपट तयार होतात. १९७० पर्यंतची वार्षिक निर्मिती सरासरी १५० होती.

इराणमध्ये १९७३ साली ९० चित्रपट तयार झाले. मेहरजूई हा तेथील अत्यंत यशस्वी पटकथा लेखक आहे. त्याच्या द पोस्टमन  व बिटा  या दोन चित्रपटांनी उत्पन्नाचे विक्रम केले आहेत. १९७१ मध्ये येथे चार चित्रपट तयार झाले तर १९७२ मध्ये ती संस्था ६ पर्यंत गेली.

इझ्राएलमध्ये १९६० ते १९६८ या आठ वर्षांत ४० चित्रपट तयार झाले, तर पुढील चार वर्षांत हा आकडा ८७ पर्यंत पोहचला. १९७२ मध्ये तेथे २९ चित्रपट तयार झाले.

                             शिंदे, मा. कृ.; वाटवे, बापू

 

भारतीय चित्रपट  : चलत्‌चित्रपटाचा उदय १८९६ साली झाला असला तरी भारतामध्ये त्याची सुरुवात १९२२ साली झाली. हे साल भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मवर्ष असले तरी १५ एप्रिल १९११ रोजीच येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील मूकपटासारखा श्रीकृष्णाच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचा निश्चय ⇨ दादासाहेब फाळके यांनी केला व त्याच्या निर्मितीच्या तयारीला ते लागले. भांडवलाची जुळवाजुळव करून काही अत्यावश्यक यंत्रसामग्री आणण्यासाठी व चित्रपट निर्मितीगृहातील प्रत्यक्ष कामाचे स्वरूप पाहण्यासाठी १ फेब्रवारी १९१२ रोजी ते इंग्लंडला गेले व तेथे ए.बी.सी. ऑफ सिनेमॅटोग्राफी  या पुस्ताकाचा अभ्यास करून त्यानी चलतचित्रपटाची माहिती मिळविली. तेथून परतताना त्यांनी ५० पौंडी विल्यमसन कॅमेरा, एक मुद्रणयंत्र व फिल्मला छिद्र पाडण्यासाठी एक छिद्रकयंत्र एवढी सामग्री आणली व कोडॅक कंपनीकडे कच्च्या फिल्मची मागणी नोंदवून १ एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले आणि मे महिन्यात रोपट्याची वाढ  हा सु. १५ मीटरचा लघुपट त्यांनी प्रथम चित्रित केला. हा लघुपट १९१२ च्या जुलै-ऑगस्टमध्ये त्यांनी काही निवडक मंडळींना दाखविला. त्या मंडळीत क्रिकेट व छायचित्रणाच्या मालाचे प्रसिद्ध दुकानदार यशवंत घनःश्याम नाडकर्णी, प्रख्यात सॉलिसिटर आबासाहेब चिटणीस इ. प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. त्या लघुपटातील वाटाण्याच्या बीचे नैसर्गिक क्रमाने वेलात होणारे रूपांतर पाहून मंडळी थक्क झाली. ही रोपट्याची वाढ व्यंगपट पद्धतीने चित्रित केली होती.

यानंतर दादसाहेबांनी राजा हरिश्चंद्र  हा सु. १,१२८ मी. लांबीचा पहिलावाहिला भारतीय चित्रपट पुरा केला (१९१३). राजा हरिश्चंद्रासोबतच त्यांनी पिठाचे पंजे  नावाचा एक विनोदी लघुपटही तयार केला होता. त्यावेळी मुंबईच्या टाईम्स ऑफ इंडियाचा संपादक युरोपीयन असूनदेखील त्याने भारताच्या पहिल्या पहिल्या चित्रपटाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.

राजा हरिश्चंद्रानंतर मोहिनी भस्मासुर, सावित्री सत्यवान  हे मुकपटही त्यांनी पाठोपाठ तयार केले. याच निर्मितीबरोबर दादासाहेबांनी वेरूळची लेणी आणि नाशिक व त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांवर अनुबोधपट तयार केले. प्रत्येक चित्रपटाबरोबर एखादा माहितीपट दाखवावा अशा मताचे ते होते. विचित्र शिल्प, लक्ष्मीचा गालीचा, आगकाड्यांची मौज, धुम्रपानाच्या लीला, पिठाचे पंजे  हे त्यांनी तयार केलेले लघुपट प्रत्येकी १० मिनिटांचे होते व ते प्रेक्षकांना फार आवडले होते. या दृष्टीने लघुपटांचे जनकही दादासाहेबच ठरतात. त्यावेळी अर्थातच पुरेशी यंत्रसामग्री नव्हती, तंत्रज्ञ नव्हते, रसायनशाळा नव्हत्या. दिवसा चित्रण करणे व रात्री नटमंडळींना तंत्रज्ञ बनवून त्यांच्या मदतीने फिल्म जोडणे-तोडणे, फिल्मला भोके पाडणे वगैरे कामे करावी लागत. त्यावेळी कच्ची फिल्मसुद्धा हवी तशी व हवी तेथे मिळत नसे. त्यावेळी चित्रपटात काम करण्यासाठी नटी मिळणे तर अश्यक्यप्रायच होते. वेश्यादेखील काम करायला तयार नसत. आपल्या पहिल्या चित्रपटात स्त्री-भूमिका करायला त्यांनी साळुंखे नावाच्या एका नटाला त्यांनी तयार केले आणि अशा प्रकारे राजा हरिश्चंद्रासाठी तारामती मिळविली.

आद्य भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’, १९१२.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकत्वाचा मान दादासाहेब फाळके यांचा असला, तरी त्यांच्या अगोदरही चित्रपटनिर्मितीचे प्रयत्न झाले होते. चित्रदीपाचा उपयोग करून १८८९-९० च्या सुमारास श्रीकृष्ण चरित्रातील काही प्रसंगाचा चलत्‌चित्रपट सदृश कार्यक्रम मदनराव माधवराव पितळे नावाचे हरहुन्नरी गृहस्थ मुंबईत खाजगी रित्या दाखवित असत. काचेवर चित्रे रेखाटण्याची व अशी चित्रे चित्रदीपाच्या साह्याने दाखविण्याची अभिनव कला कल्याणच्या पटवर्धन कुटुंबाने चिकाटीने हस्तगत केली. भारतीय कथा पडद्यावर दाखविणाऱ्या व्यवसायाला त्यांनीच ‘शांबरिखरोलिका’ असे भारतीय नाव दिले. १८९६ च्या जुलै महिन्यात झालेल्या चलत्‌चित्रपटाच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन सेल्युलॉईडच्या फिल्मवर अनेक दृश्ये उमटविण्याचे व ती दृश्ये प्रक्षेपकाच्या साहाय्याने पडद्यावर दाखविण्याचे तंत्रही हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर तथा सावेदादा या कल्पक गृहस्थाने १८९८ साली आत्मसात केले. त्यांनी परदेशातून चलत्‌चित्रपटाचा कॅमेरा मागवून पुंडलिक व कृष्णान्हावी या दोन पहेलवानांच्या कुस्तीचे चित्रण मुंबईच्या हँगिंग गार्डनमध्ये केले. इंग्लंडवरून ही फिल्म पुढील प्रक्रिया होऊन परत आल्यावर ती काही धनिक मंडळींना त्यांच्या त्यांच्या घरीच दाखविण्यात आली, तसेच ८ आण्यांपासून ३ रुपयांपर्यंत तिकीट लावून या चित्रपटाचे खेळही त्यांनी केले. १९०१ साली र. पु. परांजपे रँग्लर ही बहुमानाची पदवी संपादन करून केंब्रिजहून भारतात परत आले, भारताचे पहिले रँग्लर म्हणून त्यांच्या आगमनाचे चित्रीकरण सावेदादांनी केले होते. हाच पहिला भारतीय माहितीपट. १९०५ साली सावेदादांनी लॉर्ड कर्झनचा दरबारही चित्रित केला होता.

पुढे श्रीकृष्णाच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची सावेदादांची योजना होती. त्यासाठी त्यांनी सर्व तयारीही केली, परंतु त्याचवेळी त्यांच्या बंधूंच्या निधनामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला. त्यांचे बंधू त्यांचे एक सहकारीही होते. सावेदादांना या दुःखद घटनेमुळे एवढे वैराग्य उत्पन्न झाले, की त्यांनी आपल्या जवळचा कॅमेराही विकून टाकला. सावेदादांचा हा कॅमेरा अनंत परशराम करंदीकर, एस्.एन्.पाटणकर व व्ही. पी दिवेकर या तिघांनी विकत घेतला आणि १९११ साली त्यांनी राजदरबार चित्रित केला, तसेच १९१२ साली त्यांनी सावित्री  हा सु. ३०५ मीटरचा चित्रपट तयार केला होता. नर्मदा मांडे या अहमदाबादच्या एका तरुणीने त्यात सावित्रीची भूमिका केली होती. भारतीय चित्रपटात भूमिका करणारी हीच पहिली स्त्री-कलावंत, परंतु या चित्रपटातील काही तांत्रिक दोषामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यात दिवेकरांनी व्यासाची भूमिका केली होती आणि रंगभूमीचे नट के. जी. गोखले जयमुनी बनले होते. १९१५ साली याच मंडळींनी सु. १,८२९ मी. लांबीचा एक ऐतिहासिक चित्रपट तयार केला. त्यात नारायणराव पेशव्यांची भूमिका गोपाळ रानडे यांनी, तर रघुनाथराव पेशव्यांची भूमिका के. जी. गोखले यांनी व आनंदीबाईंची भूमिका दामू जोशी यांनी केली होती परंतु हा चित्रपट दाखविला गेला की नाही याचा पुरावा उपलब्ध नाही. या तिघांनी, विशेषतः पाटणकरांनी बरेच मूकपट दिग्दर्शित केले. नारायण गोविंद तथा नानाभाई चित्रे (मॅनेजर, ॲडव्होकेट इंडिया प्रेस), पुरूषोत्तम राजाराम टिपणीस (मॅनेजर, कॉरोनेशन सिनेमा, मुंबई), दत्तात्रय दामोदर दाबके, बुकबाईंडर जोशी, रामराव बाळकृष्ण कीर्तिकर इ. मंडळींनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन सिनेकॅमेऱ्यावर पुंडलिक  हा कथापट तयार केला. त्याचे पटकथा लेखक रामराव कीर्तिकर होते व दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे होतेे. श्रीपाद संगीत मंडळीच्या नाटकाचेच हे चित्रीकरण होते. हे चित्रीकरण आज स्वस्तिक व नाझ सिनेमा जेथे आहेत, त्या मंगलदास वाडीत झाले. सु. २,४३८ मी. लांबीचा हा चित्रपट शनिवार दिनांक १८ मे १९१२ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो दोन आठवडे दाखविण्यात आला.

याच चित्रपटगृहात १७ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र  दाखविण्यात आला. राजा हरिश्चंद्राचे संपूर्ण चित्रीकरण स्वतः दादासाहेबांनीच केले असल्याने आणि त्यावर प्रक्रियाही भारतातच झाली असल्याने खऱ्या अर्थाने तोच पहिला भारतीय बोलपट ठरतो.

चित्रपट प्रेक्षकांना आवडेल की नाही, याची खात्री नसल्यामुळे राजा हरिश्चंद्राबरोबर एक नृत्याचा कार्यक्रमही सादर केला जाई. त्या वेळी मुंबईची बहुतेक चित्रपटगृहे भांडवलवाल्यांच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे, तसेच अमेरिकन सिरिअल्स धडाक्याने चालत असल्यामुळे दादासाहेबांचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची हिंमत कोणत्याही चित्रपटगृहाच्या चालकाने दाखविली नाही. शेवटी नानाभाई चित्रे यांनीच धाडस करून कॉरोनेशन चित्रपटगृहात तो दाखविण्याची व्यवस्था केली. या पहिल्या भारतीय कलाकृतीला मराठी प्रेक्षकांनी फारशी साथ दिली नाही. उलट उदार आश्रय दिला, अलोट कौतुक केले, ते गुजराती, पाशी यांसारख्या अन्य भाषिकांनी.

त्या वेळी चित्रपटवितरणसंस्था नव्हत्या. मोठमोठ्या शहरी जाऊन दादासाहेबांना स्वतःचा चित्रपट स्वतःच प्रदर्शित करावा लागे. सुरत या शहरी नित्याप्रमाणे दादासाहेब स्वतःचा पडदा व प्रकाशप्रक्षेपक घेऊन गेले. चित्रपट लावला, दर ‘तीन आणे’ ठेवला, पण उत्पन्न फक्त तीन रुपये झाले. दादासाहेबांनी मग एक खुबीदार जाहिरात केली, ती अशी ‘दोन मैल लांब, पाऊण इंच रुंद, सत्तावन्न हजार फोटो असलेला चित्रपट फक्त दोन आण्यात पहा’. या जाहिरातीचा मात्र प्रेक्षकांच्या मनावर परिणाम झाला व भरपूर गल्ला जमू लागला.

पुढे १९१४ साली राजा हरिश्चंद्र, मोहिनी भस्मासुरसावित्री सत्यवान  हे तीन चित्रपट घेऊन दादासाहेब फाळके लंडनला गेले. तेथील बायोस्कोप  व किनोमॅटोग्राफ  या साप्ताहिकांनी या चित्रपटांबद्दल असे मत दिले, की तांत्रिक दृष्ट्या फाळके यांचे चित्रपट उत्कृष्ट आहेतच शिवाय विविध व वैचित्र्यपूर्ण कथा व विचार यांबाबतीत ते अजोड आहेत. वॉर्नर ब्रदर्स यांनी तर फाळके यांना एक मोठी संधी देऊ केली होती पण त्याच वेळी पहिल्या महायुद्धाला प्रारंभ झाल्यामुळे दादासाहेबांना भारतात परतावे लागले.

दादासाहेब फाळके यांनी १९१७ सालापर्यंत १३ लघुपट धरून १७ चित्रपट सादर केले. त्यांतील १९१७ सालच्या लंकादहन  या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परप्रांतांतही अमाप आर्थिक यश मिळविले. इतके दिवस चित्रपटाकडे एक नाविन्यपूर्ण कला किंवा हौस म्हणून पाहिले जाई परंतु या चित्रपटापासून व्यवसाय म्हणून काही धनिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः मुंबईतील भांडवलदार या व्यवसायाकडे आकर्षित झाले व त्यातूनच पुढे मुंबईला कोहिनूर, कृष्ण, शारदा या चित्रपटसंस्थांची स्थापना झाली. लंकादहनच्या अपूर्व यशानंतर मुंबईचे प्रख्यात उद्योगपती वामन श्रीधर आपटे, तसेच माया शंकर भट्ट, एल्. बी. पाठक, माधवजी जेसिंग आणि गोकुळदास दामोदरदास यांनी दादासाहेब फाळके यांना आपल्याबरोबर भागीत घेऊन फाळके फिल्मचे त्याच वर्षी म्हणजे १९१७ साली हिंदुस्थान फिल्म कंपनीमध्ये रूपांतर करून तिच्या द्वारे सु. शंभर मूकपट तयार केले. त्या काळी मद्रासमध्ये येथील मूकपट खूप चालत. त्यांच्या वितरणाची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी वामन श्रीधर आपटे यांनी तेथे एक चित्रपट-वितरण कार्यालयही उघडले होते.

दादासाहेब फाळके यांनी आपला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र जरी मुंबईला तयार केला असला, तरी नंतरची चित्रपटनिर्मिती त्यांनी नासिक येथे केली. विशेषतः पौराणिक चित्रपटातील बहिर्दृश्यांसाठी नासिकक्षेत्र फार उपयुक्त आहे, हे लक्षात घेऊन, त्यांनी हा निर्णय घेतला. त्याच सुमारास मराठी रंगभूमीवर नेपथ्यविशारद म्हणून अग्रभागी असलेले आनंदराव पेंटर तथा मिस्त्री व त्यांचे सहकारी आणि मावसबंधू बाबूराव पेटर चित्रपटाकडे आकर्षित झाले होते. चित्रपटप्रदर्शनाच्या व्यवसायामुळे चित्रपटाशी त्यांचा संबंध सतत येत होता. त्यामुळे चित्रपटनिर्मितीची त्यांना प्रेरणा मिळाली, पण परिस्थिती अनुकूल नसल्याने दादासाहेब फाळके यांच्याप्रमाणे परदेशी जाऊन चित्रपटकलेचे यांत्रिक व तांत्रिक ज्ञान मिळविणे त्यांना शक्य नव्हते म्हणून कॅमेरा आदी चित्रपटनिर्मितीस लागणारी उपकरणे त्यांनी स्वतःच तयार करून ती अजमावण्याचे प्रयोग सुरू केले. या प्रयोगातील यशाची निश्चिती होताच आनंदराव पेंटर यांनी चित्रपटासाठी पैसा उभा करण्यास सुरुवात केली पण ही महत्वकांक्षा पुरी होण्यापूर्वीच त्यांचे अचानक निधन झाले (१९१७). भारतात सिने-कॅमेरा स्वतः बनविल्याचा मान आनंदराव पेंटर यांचा आहे. त्यावरच पुढे बाबूराव पेंटर यांनी चित्रिकरणही केले. बाबूराव पेंटर यांनी त्यांचे चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पुरे करण्याचाही चंग बांधला, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते अशक्य ठरले तेव्हा गायनमहर्षी अल्लादियाँखाँ यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध गायिका तानीबाई कागलकर यांनी बाबूराव पेंटर यांना आर्थिक साहाय्य देऊ केले.

मूकपटांतील घटना व संवाद केवळ उपशीर्षकांद्वारे निवेदिले जात. ही उपशीर्षके हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी आणि इतर प्रांतिक भाषांमधून लिहिली जात. महाराष्ट्रीय निर्मात्यांनी त्यात मराठी उपशीर्षकेही घातली. ही उपशीर्षके तयार करण्याचे काम नानासाहेब सरपोतदार व ना. सी फडके यांनी केले. पुढे ना. ह. आपटे, शिवराम वाशिकर, विष्णुपंत औंधकर यांसारख्या जाणकारांचे लेखनसाहाय्य महाराष्ट्र फिल्म कंपनीला लाभले होते. मराठी परंपरा, मराठी संस्कृती आणि मराठी कलेचा वारसा या गोष्टी महाराष्ट्रीय माणसाने काढलेल्या चित्रपटात दिसून येत. फाळके यांच्या राजा हरिश्चंद्रमध्ये तारामती नऊवारी लुगडे नेसली होती. मात्र नऊवारीतील तारामती परप्रांतात रूचली नाही. या चित्रपटानंतर सर्व पौराणिक चित्रपटांच्या कथा, त्यांची मांडणी, केशभूषा व वेशभूषा वगैरे बाबतींत फाळके यांनी तोच दृष्टिकोन ठेवला होता.

मूकपटातील उपशीर्षक

बाबुराव पेंटर यांनी काढलेल्या मूकचित्रपटात हा दृष्टिकोन प्रामुख्याने आढळतो. सुरुवातीला बाबूराव यांनी आनंदराव पेंटर यांच्याबरोबर उमेदवारी केली होती. आनंदराव पेंटर यांनी काही लघुपट काढले होते. बाबूराव पेंटरांनी १९१८-१९ मध्ये सैरंध्री  हा पहिला कलात्मक चित्रपट काढला. त्यांच्या चित्रपटात फाळके यांच्या चित्रपटांच्या मानाने तांत्रिक सफाई कमी असली, तरी अधिकृतपणाबद्दलचा त्यांचा आग्रह व कलात्मक दृष्टी यांमुळे त्यांना भारतीय चित्रपटातील कलेच्या जनकत्वाचा मान मिळाला. अत्यंत चोखंदळपणे व सौंदर्यपूर्ण दृष्टीने सजविलेली दृश्ये (सेट्स) आणि वेशभूषा यांनी संपन्न असलेल्या सैरंध्री, वत्सलाहरण, सुरेखा अभिमन्यू  यांसारख्या चित्रपटांच्या द्वारे बाबूरावांनी प्राचीन भारताचे ऐश्वर्य उभे केले होते. सिंहगड  हा पहिला ऐतिहासिक मूकपट बाबूराव पेंटर यांनी सादर केला. त्यानंतरचा कल्याण खजिना  हा त्यांचा ऐतिहासिक मूकपटही बराच गाजला. पुढे सावकारी पाश  हा पहिला वास्तववादी चित्रपट त्यांनी तयार केला. या चित्रपटाची कथा ना. ह. आपटे यांची होती.

बाबूरावांचे शिष्योत्तम दामले, फत्तेलाल, व्ही. शांताराम यांनीही पुढे चित्रपटनिर्मितीस प्रारंभ केला. मुंबईला कोहिनूर, शारदा, कृष्ण या चित्रपटसंस्थांनी एकापाठोपाठ एक मूकपट काढण्याचा धडाका लावला होता. महाराष्ट्रात मुंबई, नासिक, कोल्हापूर व पुणे येथून मूकपटांची निर्मिती होत होती. अर्थात बहुतेक मूकपट पुराणकथा, दंतकथा, लोककथा, इतिहास यांवर आधारलेले होते. फाळके, पेंटर यांच्याखेरीज आर्यन फिल्म कंपनीचे नानासाहेब सरपोतदार पुण्यास मूकपट काढीत होते. कुशल छायाचित्रकार पांडुरंग तलगिरी यांच्या युनायटेड पिक्चर सिंडिकेट या खडकीच्या चित्रपटसंस्थेने बरेचसे ऐतिहासिक चित्रपट सादर केले. त्यांतील पुष्कळसे चित्रपट नानासाहेब सरपोतदारांनीच दिग्दर्शित केले होते.

महाराष्ट्रात चित्रपटसृष्टी आकार घेत असताना बंगालमध्येही चित्रपटनिर्मितीचे प्रयत्न चालूच होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी म्हणजे १८९३ साली कलकत्त्याचे हिरालाल सेन यांनी एक चित्रप्रक्षेपक विकत घेतला. १९०० साली पाथे कंपनीचा एक छायाचित्रकार भारतात आला होता, त्याच्याबरोबर काम करून त्यांनी यांत्रिक व तांत्रिक माहिती करून घेतली व १९०३ साली अलिबाबा  या लोकप्रिय बंगाली नाटकातील नृत्याचा काही भाग चित्रित केला. तो त्या नाट्यप्रयोगाबरोबर दाखविला जाई. त्यांनी दिल्लीदरबारासारखे समारंभ चित्रित केले होते. सुरेंद्रनाथ सेन यांनी १९०५ साली बंगालच्या फाळणीच्या वेळी चळवळ केली होती, तिचा लघुपट बंगालमधील सर्वांत जुनी चित्रपटसंस्था अरोरा फिल्म कंपनी हिच्यासाठी ज्योति सरकार यांनी तयार केला होता. ही संस्था आजही अस्तित्वात आहे. या संस्थेसाठी दाबी घोष हे लघुचित्रपट तयार करीत होते. कलकत्याला १९१७ साली जे. एफ्. मादन यांनी इटालियन कलावंत घेऊन बंगालमधील नलदमयंती  हा पहिला मूकपट सादर केला. १९२० ते १९३० या दशकात बंगालमध्ये बऱ्याच चित्रपटनिर्मितिसंस्था सुरूही झाल्या आणि बंदही झाल्या. त्यांतील एकही संस्था मादन थिएटर्सशी स्पर्धा करू शकली नाही. निर्मिती, प्रदर्शन, वितरण व पाश्चात्य चित्रपटांची आयात या चारही क्षेत्रांत मादन थिएटर्सचे वर्चस्व असल्याने या संस्थेपुढे टिकून राहणे इतर संस्थांना केवळ अशक्य होते. मादन थिएटर्सचे एकूण ८६ मूकपट निर्माण केले. १९३० साली बी. एन्. सरकार यांच्या इंटरनॅशनल फिल्म क्राफ्टने मात्र भक्कम पाय रोवले. याच संस्थेचे पुढे प्रसिद्ध न्यू थिएटर्समध्ये रूपांतर झाले.

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात दक्षिणेत नटराज मुदलियार यांनी चित्रपटनिर्मितीची धडपड केली परंतु हे सर्व प्रयत्न प्राथमिक स्वरूपाचे होते. १९२१ पासून स्टार ऑफ द ईस्ट फिल्म कंपनीची मद्रासमध्ये स्थापना होऊन भीष्मप्रतिज्ञा  या चित्रपटाने दक्षिणेत चित्रपट निर्मितीस प्रारंभ झाला. अर्थात १९३४ पर्यंत दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांचीही निर्मिती मुंबई व कलकत्ता येथेच होत असे. पंजाबमध्ये १९२६ साली दिल्लीच्या ग्रेट ईस्टर्न फिल्म कॉर्पोरेशनने द लाईट ऑफ एशिया  हा मूकपट सादर करून तेथील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, सादरकर्ते होते हिमांशु रॉय. तथापि त्यामानाने पंजाबमध्ये चित्रपटनिर्मिती मूळ धरू शकली नाही.


भारतीय चित्रपटव्यवसाय हळूहळू वाढत होता. त्याला स्थैर्य येणार हे लक्षात घेऊन १९१८ साली चित्रपटविषयक कायदा अमलात आला. त्यान्वये १९२० सालापासून चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो सरकारनियुक्त मंडळाकडून मंजूर करून घेणे सक्तीचे करण्यात आले. या मंडळाची कार्यालये मुंबई, कलकत्ता, मद्रास, रंगून येथे १९२० साली व लाहोर येथे १९२८ साली सुरू झाली. या मंडळाला चित्रपट व चित्रपटगृह तपासण्याचे अधिकार होते. १९२२-२३ साली बंगाल आणि मुंबई राज्यांत करमणूक कर जारी करण्यात आला. चित्रपटातून राष्ट्रीय विचारांचा प्रचार करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. १९२६ साली भालजी पेंढारकर यांच्या वंदेमातरम्  या चित्रपटाला परीक्षामंडळाच्या कात्रीला बळी पडावे लागले व चित्रपटाचा महत्वाचा भाग गाळावा लागला, तसेच चित्रपटाचे नाव वंदेमातरम् आश्रम  असे करण्यात आले.

मुंबईची चित्रपटसृष्टी कोल्हापूर, पुणे व नासिकपेक्षा वेगळी होती. बहुतेक भांडवलदार गुजराती, पारशी होते. पौराणिक चित्रपटाबरोबरच देमार (स्टंट) चित्रपट, जादुईपट अथवा कौटुंबिक चित्रपट तयार केले जात. मुंबईतील मूकपटांची प्रेरणा व्यावसायिकच होती. महाराष्ट्र फिल्म कंपनी किंवा प्रभात फिल्म कंपनी यांच्यासारखा ध्येयवाद किंवा आदर्शवाद मुंबईतील संस्थात नव्हता. द्वारकादास संपत यांची कोहिनूर, बी. एम्. दवे यांची शारदा, अर्देशीर इराणी यांची इंपीरिअल, एम्. बी पटेल यांची कृष्ण, चंदुलाल शहा यांची रणजित या चित्रपटसंस्था धंदा करण्याच्या हेतूने स्थापन झाल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून चित्रपटसृष्टी वाढीला लागली. त्याकाळी देमार चित्रपटांची पौराणिक चित्रपटांप्रमाणे चलती सुरू झाली. शारदा फिल्म कंपनीसाठी भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या १९२५ सालच्या बाजीराव मस्तानी  चित्रपटातील अभिनेता मा. विठ्ठल पुढे देमार चित्रपटांचा नायक झाला. त्याने अफाट लोकप्रियता संपादन केली. हाच मा. विठ्ठल आलमआरा  या पहिल्या भारतीय बोलपटाचाही नायक होता.

रणजित आणि प्रभात या दोन चित्रपटसंस्था एकाच वर्षी म्हणजे १९२९ साली स्थापना झाल्या, मूकपटांकडून बोलपटांकडे आल्या व दोन तपे टिकून राहिल्या. १९३० मध्ये स्थापना झालेल्या कलकत्त्याच्या न्यू थिएटर्सचाही या संदर्भात उल्लेख करावा लागेल. प्रभात फिल्म कंपनी इतकी वर्षे यशस्वीपणे उभी होती, याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रभातने दर्जेदार व कलात्मक चित्रपट सादर करून फार मोठी प्रतिष्ठा मिळवली हे होते. त्याचबरोबर तिने धंद्याकडेही बरेच लक्ष दिले, ते इतर महाराष्ट्रीय संस्थांना साधले नाही. बंगलोरच्या सूर्य फिल्म कंपनीने ४ वर्षांत ३८ मूकपट निर्माण केले, महाराष्ट्र फिल्म कंपनीने ११ वर्षांत अवघे २३ मूकपट सादर केले. कलात्मक दृष्ट्या हे मूकपट चांगले होते पण ते धंद्याच्या दृष्टीने यशस्वी झाले नाहीत.

भारतातील मूकपटांना १९२८ नंतर बहर येऊ लागला. विष्णुपंत दामले, एस्. फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, हिमांशु रॉय, देवकी बोस, नितीन बोस, प्रथमेश बरुआ यांसारखे श्रेष्ठ कलावंत पुढे आले. भा. वि. वरेरकर, शिवराम वाशिकर, शं. प. जोशी, विष्णुपंत औंधकर यांसारखे जाणकार लेखक चित्रपटसृष्टीत उतरले होते या अगोदर नाटक हे सर्वसामान्यांचे करमणुकीचे प्रमुख साधन होते. तथापि लोकांना त्यामानाने चित्रपट ही अधिक सुलभ व सुबोध अशी स्वस्तातील करमणूक वाटत होती. त्यामुळे सामान्य माणूस चित्रपटाकडे आकर्षित झाला. त्यावरून चित्रपटसृष्टी भारतात मूळ धरणार असे वाटू लागले, परंतु हे खरे नव्हते. कारण भारतात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी ८७ टक्के परदेशी चित्रपट होते, तर अवघे १३ टक्के भारतीय होते. इंडियन सिनेमॅटोग्राफ कमिटीने (१९२७-२८) आपल्या अहवालात म्हटले आहे, की ‘भारतीय चित्रपटसृष्टीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून या व्यवसायाचा शेवट जवळ आला आहे, असे वाटते’. या समितीची नियुक्ती करण्यास ब्रिटिश सरकारचे उद्देश पुढीलप्रमाणे होते (१) केंद्रीय स्तरावर चित्रपट तपासणीचे नियम तयार करणे (२) भारतीय चित्रपटसृष्टीचा समग्र अभ्यास करणे व (३) ब्रिटिश चित्रपटांना विशेष सवलत द्यावी काय, याचा विचार करणे. या अभ्यासामुळे दोन गोष्टी झाल्या. भारतीय चित्रपटसृष्टीची स्थिती काय आहे, याचा सविस्तर तपशील तयार झाला आणि चित्रपट हे केवळ करमणुकीचे साधन नसून लोकशिक्षणाचे फार प्रभावी माध्यम आहे, हे स्पष्ट झाले. या समितीचे अध्यक्ष होते दिवाणबहादूर टी. रंगाचारी. त्यांनी भारतीय चित्रपटांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सूचना केल्या, तथापि या अहवालाला ब्रिटिश सरकारने जाणूनबुजून महत्व दिले नाही.

या अहवालानंतर लवकरच म्हणजे १९३१ साली भारतात बोलपटाचा जमाना सुरू झाला. भारतात सर्वसाधारण ज्ञात असलेले चित्रपट-विषय निर्मात्यांनी आपल्या चित्रांसाठी निवडले. भारतीय जनतेने या नव्या माध्यमाचे स्वागत केले. मोठ्या संख्येने प्रेक्षक बोलपटांना आश्रय देऊ लागले. निराशा, भीती, चिंता यांचे चित्रपटसृष्टीवर पडलेले काळेकुट्ट सावट दूर झाले. पुढील ४४ वर्षांत तर भारतीय चित्रपटसृष्टीने बरीच प्रगती केली. भारतातील सर्व उद्योगाधंद्यात चित्रपटउद्योगाचा आता दुसरा क्रमांक लागतो, तर पूर्वीच्या तीन वर्षांप्रमाणेच १९७५ सालीही भारतीय चित्रपटसृष्टीचा क्रमांक सर्व जगात प्रथम लागला. भारतात एकूण १,२६८ मूकपट तयार झाले. दोनशेहून अधिक चित्रपटसंस्थांनी हे चित्रपट सादर केले. त्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ६७३ मूकपट १२ संस्थांनी सादर केले. त्या संस्था अशा : महाराष्ट्र : कोहिनूर (९८), हिंदुस्थान (९७), शारदा (८६), कृष्ण (६६), इंपीरियल (६२), रणजित (३९), रॉयल आर्ट (२९), युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट (२४), आर्यन (२४), महाराष्ट्र (२३)  बंगाल : मादन (८६) द. भारत (बंगलोर) : सूर्य (३८).

भारतात आतापर्यंत एकूण ३४ भाषांत बोलपट तयार झाले आहेत. १९२० सालापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीचा फारच त्रोटक इतिहास उपलब्ध आहे परंतु १९२० साली अभ्यवेक्षण मंडळा (सेन्सॉर बोर्ड)ची स्थापना झाल्यावर चित्रपटांची रीतसर नोंद व्हायला लागली.

चित्रपट सल्लागार मंडळ : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनुबोधपट हे प्रभावी प्रचाराचे माध्यम आहे, हे लक्षात घेऊन पाश्चिमात्य देशांत प्रचारपटांची निर्मिती होऊ लागली. त्याची उपयुक्तता पाहून ब्रिटिश सरकारने भारतातही प्रचारपटांच्या निर्मितीची योजना आखली होती. त्यासाठी चित्रपट सल्लागार मंडळ (फिल्म ॲडव्हायझरी बोर्ड) याची स्थापना जून १९४० मध्ये करण्यात आली. यात भारतीय आणि ब्रिटिश सभासदांचा समावेश होता. या मंडळातर्फे प्रचारपटाच्या निर्मितीची तसेच भारतीय व पाश्चिमात्य प्रचारपटांच्या वितरणाचीही व्यवस्था करण्यात आली. परदेशी चित्रपटांना भारतीय भाषांतून निवेदन जोडलेले असे. हे पाश्चिमात्य माहितीपट व लघुपट भारतात प्रदर्शित करण्याबाबत मान्यता देणे, हे या मंडळाचे काम होते.

ब्रिटिश सरकारने १ फेब्रुवारी १९४३ रोजी हे चित्रपट सल्लागार मंडळ सरकारी कक्षेत आणले व ‘इन्फर्मेशन फिल्म्स ऑफ इंडिया’ची स्थापना करून अनुबोधपट आणि वार्तापट यांची निर्मिती चालू केली. हे प्रचारपट प्रेक्षकांना आवडत नसत, म्हणून कोणताही चित्रपटप्रदर्शक ते दाखविण्यास राजी नसे. लोकांनी हे प्रचारपट पाहिले पाहिजेत, अशी सरकारची इच्छा होती शिवाय युद्धप्रचारपट तयार केल्याखेरीज अमेरिकेकडून कच्ची फिल्म मिळणेही दुरापास्त झाले होते. अशा परिस्थितीत चित्रपटप्रदर्शकांना असे २,००० प्रचारपट दाखविणे त्या वेळी कायद्याने सक्तीचे करण्यात आले.

इन्फर्मेशन फिल्म ऑफ इंडियाच्या अस्तित्वापर्यंत म्हणजे जून १९४० ते मे १९४६ या सहा वर्षांच्या काळात १७० अनुबोधपट व वार्तापट तयार करण्यात आले. त्यांतील बहुतेक युद्धप्रचारपटच होते, परंतु अवर हेरिटेज, ट्री ऑफ वेल्थ  यांसारखे उत्कृष्ट अनुबोधपटही त्यांत होते.

स्वातंत्र्योत्तर काळात, १९४९ साली भारत सरकारने चित्रपट सल्लागार मंडळांची पुनर्रचना केली. भारत सरकारच्या चित्रपट विभागाने (फिल्म डिव्हिजनने) तयार केलेले अगर इतर चित्रपटनिर्मात्यांनी तयार केलेले माहितीपट, वार्तापट अथवा शैक्षणिक लघुपट जर भारत सरकारच्या चित्रपट-वितरणयंत्रणेद्वारा चित्रपटगृहातून प्रदर्शित करायचे असतील, तर त्यांना या चित्रपटा सल्लागार मंडळाची मान्यता असावी लागते. केवळ अभ्यवेक्षण मंडळाचे मान्यतापत्रक असून भागत नाही. या मंडळाचे सामान्यतः दोन किंवा तीन सभासद दर आठवड्यातून एकदा चित्रपटांची तपासणी करीत असतात.

फिल्म प्रभाग : स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ साली भारत सरकारने  ⇨ फिल्म प्रभाग (फिल्म्स डिव्हिजन) हा स्वतंत्र लघुपट विभाग मुंबई येथे सुरू केला. चौदा प्रमुख भारतीय भाषा व एक इंग्रजी अशा एकूण १५ भाषांत हे लघुपट तयार होतात. एवढेच नव्हे, तर परदेशी भाषांतही त्यांचे भाषांतर केले जाते. संस्थेची स्वतःची वितरण-व्यवस्था आहे. या माहितीपटांचे व वार्तापटांचे प्रदर्शन प्रत्येक चित्रपटगृहात करावेच लागते. ही संस्था व्यंगपटही निर्माण करते. फिल्म डिव्हिजनच्या अनुबोधपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. बहुतेक राज्यांचे असे स्वतंत्र चित्रपटविभाग आहेत.

राज्य चित्रपट विभाग : महाराष्ट्र राज्याच्या चित्रपट विभागातर्फे दरमहा अनुबोधपट व वार्तापट तयार करण्यात येतात. त्यांतून राज्यातील विकासकार्याची प्रगती व राज्यातील महत्त्वाचे समारंभ चित्रित केले जातात. हे चित्रपट ३५ व १६ मिमी. मध्ये तयार करण्यात येतात.

या विभागाद्वारे व इतरांच्या साहाय्याने दरवर्षी सु. १५ अनुबोधपट तयार होतात. त्यांच्या ३५ मिमी.च्या प्रती काढून ते चित्रपट भारत सरकारच्या माहिती व आकाशवाणी मंत्रालयातर्फे विविध ठिकाणच्या चित्रपटगृहांत प्रदर्शित केले जातात. दरमहा सरासरी एक वार्तापट व दोन अनुबोधपट राज्यात वितरीत करण्यात येतात. भारतात इतरत्र वितरीत करण्याच्या दृष्टीनेही काही अनुबोधपट तयार करण्यात येतात.

महाराष्ट्र राज्याप्रमाणे तमिळनाडू, बंगाल, गुजरात, कर्नाटक राज्य यांचेही अनुबोधपट व वार्तापट नित्य निघत असतात. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, ओरिसा, मणिपूर, बिहार या राज्यांतही अनुबोधपट व वार्तापटांची निर्मिती होत असते. असे एकूण चौदा राज्यांत अनुबोधपट-वार्तापट तयार होतात.

मराठी चित्रपट :  दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला संपूर्ण चित्रपट १७ मे १९१३ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला आणि मराठी चित्रपटसृष्टी व भारतीय चित्रपटसृष्टी यांच्या इतिहासाच्या प्रारंभाला एकदमच सुरुवात झाली. चित्रपटकलेचे जनक दादासाहेब फाळके हे असले, तरी ⇨ बाबूराव पेंटरांनी तिला अधिक समृद्ध केले. दादासाहेब फाळक्यांचे समकालीन असलेले करंदीकर, पळणीटकर व दिवेकर या तीन महाराष्ट्रीय व्यक्तींनी १९११ साली चलत्‌चित्रपट काढण्याच्या हेतूने पाटणकर फ्रेंड्स अँड कंपनी ही चित्रपटसंस्था सुरू केली होती व तिच्या द्वारे त्यांनी काही मूकपट काढले होते. १९१९ पर्यंत चाललेल्या पहिल्या महायुद्धाने चलत्‌चित्रपटांची वाढ खुंटली तथापि त्याच काळात दादासाहेब फाळके यांनी लंकादहन हा प्रसिद्ध मूकपट धरून एकूण सतरा चित्रपट तयार केले होते. लंकादहन  चित्रपटाला घवघवीत आर्थिक यश मिळाले व त्याने चित्रपटधंद्याची बैठक पक्की केली. १९१७ साली दादासाहेबांनी उद्योगपती वामन श्रीधर आपटे व माया शंकर भट्ट यांच्या भागीदारीत हिंदुस्थान फिल्म कंपनीची स्थापना केली. या कंपनीने मुख्यतः पौराणिक कथांवर शंभरांंवर मूकपट काढले. १९१९ पर्यंत चाललेल्या पहिल्या महायुद्धाने चलत्चित्रपटांची वाढ खुंटली; तथापि त्याच काळात दादासाहेब फाळके यांनी लंकादहन हा प्रसिद्ध मूकपट धरून एकूण सतरा चित्रपट तयार केले होते. लंकादहन चित्रपटाला घवघवीत आर्थिक यश मिळाले व त्याने चित्रपटधंद्याची बैठक पक्की केली. १९१७ साली दादासाहेबांनी उद्योगपती वामन श्रीधर आपटे व माया शंकर भट्ट यांच्या भागीदारीत हिंदुस्थान फिल्म कंपनीची स्थापना केली. या कंपनीने मुख्यतः पौराणिक कथांवर शंभरांवर मूकपट काढले. बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा पहिला कलापूर्ण मूकपट १९१८ साली सादर केला. त्यांनी आपले मावसबंधू आणि कल्पक कलावंत आनंदराव पेंटर यांच्या साहाय्याने सिनेकॅमेरा तयार करून त्यांनी हा मूकपट चित्रित केला. बाबूराव पेंटर यांना आर्थिक साहाय्य अल्लादियाखाँच्या शिष्या श्रीमंत तानीबाई कागलकर यांनी केले होते. त्याच्या बळावरच त्यांनी वत्सलाहरण, सुरेखा, अभिमन्यू, सिंहगड, कल्याण खजिना, बाजीप्रभू देशपांडे, सावकारी पाश, मुरलीवाला, नेताजी पालकर, महारथी कर्ण यांसारखे भव्य कलात्मक मूकपट सादर केले. दामले- फत्तेलाल-दिग्दर्शित महारथी कर्णसारखा भव्य चित्रपट यानंतर क्वचितच निघाला. ना. ह. आपटे यांच्या कादंबरीवरील सावकारी पाश हा वास्तवतेचे दर्शन घडविणारा पहिलाच मूकपट होता. त्याचे पुढे बोलपटातही रूपांतर करण्यात आले.

पांडुरंग तलगेरी यांची खडकी येथील युनायटेड आर्टिस्ट व नानासाहेब सरपोतदार यांची पुण्याची आर्यन फिल्म कंपनी या संस्थाही मूकपट तयार करू लागल्या होत्या. त्यात शिवराम वाशिकर, विष्णुपंत औंधकर, ग्रामोपाध्ये या लेखकमंडळींचे सहकार्य लाभले होते. भालजी पेंढारकर यांनीही शारदा फिल्म कंपनीसाठी बाजीराव मस्तानीवंदेमातरम् हे दोन मूकपट स्वतः लिहून दिग्दर्शित केले होते.

महाराष्ट्र फिल्म कंपनीतच तयार झालेले कलावंत-तंत्रज्ञ विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर या चौघांनी सीतारामपंत कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने १ जून १९२९ रोजी कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. प्रभात फिल्म कंपनीने दोन वर्षांत गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब ऊर्फ बजरबट्टू, उदयकाल, चंद्रसेनाजुलूम हे सहा मूकपट सादर केले. राणीसाहेब ऊर्फ बजरबट्टू हा बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेला भारतातील पहिलाच चित्रपट होय.

कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनी व प्रभात फिल्म कंपनी या दोन संस्था सरस मूकपट तयार करीत असतानाच १९३१ साली मुंबईच्या इंपीरिअल फिल्म कंपनीने आलमआरा आणि कलकत्त्याच्या मादन सिनेटोनने लेला मजनू हे बोलपट सादर करून बोलपटाचे युग सुरू केले, आलमआरा या भारतातील पहिल्या बोलपटाचे नायक, मूकपटात बरीच लोकप्रियता संपादन केलेले अभिनेते मा. विठ्ठल हे मराठी कलावंत होते.  याचा परिणाम म्हणून की काय, प्रभात फिल्म कंपनीनेही बोलपट निर्माण करण्याचे ठरवून मंगळवार पेठेतून शाहूपुरी येथे आपले स्थलांतर केले आणि दादासाहेब फाळके यांनी ज्या विषयाने भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रारंभ केला तोच विषय, म्हणजे अयोध्येचा राजा हरिश्चंद्र ही कथा चित्रीकरणासाठी निवडली. त्यांच्या ध्वनिमुद्रणासाठी आर्. सी. ए. सारखे उत्तम ध्वनिमुद्रणयंत्र आर्थिकदृष्ट्या प्रभातला परवडणे शक्य नव्हते, म्हणून ऑडिओ कॅमिक्ससारखे परवडणारे यंत्र प्रभातने आणले. कलकत्त्याच्या मादन सिनेटोनने आर्. सी. ए. यंत्राबरोबर त्या कंपनीचा तंत्रविशारदही आणला होता; परंतु प्रभातला तेही शक्य नव्हते. म्हणून उपलब्ध यंत्रावर कंपनीतील एक हरहुन्नरी चालक विष्णुपंत दामले यांनीच त्यांचे इंग्रजी शिक्षण जुजबी असूनही केवळ पुस्तके वाचून व अहोरात्र धडपडून, त्या चित्रपटाचे ध्वनिलेखन पार पाडले व शेवटी ६ फेब्रुवारी १९३२ रोजी मुंबईस कृष्ण सिनेमात अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. त्याची हिंदी आवृत्ती मात्र तत्पूर्वी २३ जानेवारीलाच प्रदर्शित झाली होती.

त्याच सुमारास दादासाहेब तोरणे व बाबूराव पै यांनी पुण्यास सरस्वती सिनेटोनची स्थापना केली व १९३२ सालीच भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित शास सुंदर हा बोलपट प्रदर्शित झाला. शाहू मोडक व शांता आपटे याच बोलपटात प्रथम चमकले. शामसुंदरने मुंबईच्या वेस्टएंड चित्रपटगृहात (हल्लीचे नाझ) रौप्य महोत्सव साजरा करून पहिल्या भारतीय रौप्यमहोत्सवी चित्रपटाचा मान मिळविला होता. पुढे सरस्वती सिनेटोनने ओटघटकेचा राजा हा हिंदी-मराठी भाषेत तयार केलेला बोलपट सादर केला. मार्क ट्वेनच्या मिन्स अँड पॉपवरून मो. ग. रांगणेकरांनी त्याची पटकथा लिहिली होती, त्याचे दिग्दर्शन मा. विठ्ठल यांनी केले होते आणि शाहू मोडक यांनी दुहेरी भूमिका (डबल रोल) केली होती. हीच मराठीतील पहिली दुहेरी भूमिका.

अयोध्येचा राजा या बोलपटाच्या पाठोपाठ ज्योत्स्ना भोळे (दुर्गा केळेकर) यांची प्रमुख भूमिका असलेला संत सखू हा बोलपट भारत मुव्हियेनने सादर केला. बाळासाहेब यादवांचा मराठ्यांची दुही अर्थात संताजी घोरपडे हा चित्रपटही त्याच वर्षीना, १९३२ साली शारदा फिल्म कंपनी आणि मास्टर अँड कंपनी या दोन संस्थांनी संत तुकाराम हा बोलपट सादर केला. त्याच वर्षी प्रभात फिल्म कंपनीने अग्निकंकणमाया हे आणखी दोन हिंदी मराठी बोलपट सादर केले. बोलपटाचा जमाना सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी एकूण आठ मराठी बोलपट निर्माण झाले.

अयोध्येचा राजा या मराठी बोलपटात दुर्गा खोटे यांच्यासारख्या सुविद्य अभिनेत्रीची पहिलीच भूमिका होती, तर गोविंदराव टेंबे यांच्यासारखा नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध गायक कलावंत व संगीतदिग्दर्शक यांनी केलेल्या राजा हरिश्चंद्राच्या भूमिकेमुळे चित्रपटाला एकप्रकारचा उच्च दर्जा प्राप्त झाला होता. तसेच बाबूराव पेंढारकर यांच्या गंगानाथ महाजन या खलनायकाच्या भूमिकेमुळे चित्रपटातील अभिनयाच्या अंगाला नवीन परिमाण लाभले. सफाईने खलनायकाची भूमिका करणारे तेच पहिले नट होत.

प्रभात फिल्म कंपनीने १९३३ साली पहिला ऐतिहासिक बोलपट सिंहगड मराठीत सादर केला. नंतर बोलपटातही काही तरी नवीन करून दाखवावयाचे, या उद्देशाने महाराष्ट्र फिल्म कंपनीचा पंधरा वर्षांपूर्वीचा सैरंध्री हा पहिला मूकपट डोळ्यासमोर ठेवून भारतातील पहिला रंगीत बोलपट काढण्याची योजना प्रभातने आखली. बोलपट तयार झाल्यावर तो रंगीत करण्याच्या प्रक्रियेसाठी व्ही. शांताराम जर्मनीला गेले. दुर्दैवाने रंगसंगती तितकीशी जमली नाही; ती वाजवीपेक्षा अधिक भडक झाली व त्यामुळे प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला. तथापि पहिला भारतीय रंगीत बोलपट सादर करण्याचा मान प्रभात फिल्मकंपनीकडेच जातो (१९३३).

प्रभात व सरस्वती यांचे यश पाहून महाराष्ट्रात निरनिराळ्या मराठी व हिंदी बोलपट संस्था उदयास येऊ लागल्या. खुद्द कोल्हापुरातच भालजी पेंढारकरांची शाम सिनेटोन, राजोपाध्ये यांची ललित पिक्चर्स आणि सुशिक्षित नाट्यप्रेमी रसिकांची युनिव्हर्सिटी आर्ट फेडरेशन अशांसारख्या संस्था स्थापन होऊन पार्थ कुमारी, मेनका, भरतभेट इ. चित्रपट निर्माण करण्यात आले.

सैरंध्रीनंतर प्रभात फिल्म कंपनीने पुण्याला हनुमान टेकडीच्या पायथ्याला आपल्या स्वतःच्या २१ एकर जागेत अतिभव्य चित्रपटनिर्मितिगृह उभारले. बाह्यचित्रीकरणाच्या सोयीदेखील या निर्मितिगृहाच्या आवारातच होत्या. अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज असे हे ध्वनिरोधक निर्मितिगृह आहे. एवढे भव्य चित्रपटनिर्मितिगृह साऱ्या आशिया खंडात नाही. याची संपूर्ण कल्पना, रचना, बांधणी आणि उभारणी प्रभातचे एक चालक विष्णुपंत दामले यांच्या देखरेखीखाली झाली. प्रभात फिल्म कंपनीची अल्पावधीतच भरभराट झाली. चालकांची एकजूट, कष्टाळूपणा व कल्पकता हे त्याचे एक कारण. याशिवाय तांत्रिक बाजूंबरोबरच नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा यांतही त्यांनी आपली कलात्मक पातळी उच्च राखण्याचा प्रयत्न केला. कलात्मक चित्रपटनिर्मितीबरोबरच प्रभातच्या चालकांत व्यावसायिक दृष्टीही होती. त्यांनी मराठीबरोबर हिंदी बोलपट सादर केले व भारतभर बाजारपेठ मिळविली.

प्रभात फिल्म कंपनीचे स्थलांतर पुण्याला झाल्यावर कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीत काहीसे औदासिन्य पसरले होते; परंतु कोल्हापूरचे अधिपती राजाराम महाराज यांनी मोठी आर्थिक मदत देऊन भालजी व बाबूराव पेंढारकर यांच्या सहकार्याने कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली आणि आकाशवाणी हा श्रीकृष्ण जीवनावरील चित्रपट सादर केला. या चित्रपटाबरोबर गणपतराव भोसले यांचा बकंमट हा व्यंगपट दाखविण्यात येई. बकंमटच्या अगोदर प्रभातच्या अमृतमंथन बरोबर प्रभातनेच तयार केलेला जंबूकाका हा व्यंगपट दाखवला जाई. परंतु या दोन्ही व्यंगपटांच्या अगोदर मे. केतकर आणि रावसाहेब यांनी तिस्मारखाँ हा व्यंगपट तयार केला होता. यानंतर मात्र व्यंगपटांची निर्मिती थांबलीच.

पुण्याला आल्यावर प्रभात फिल्म कंपनीने ना. ह. आपटे यांच्याकडून अमृतमंथन हा भव्य चित्रपट लिहून घेतला (१९३४). केशवराव दाते यांच्यासारखा मराठी रंगभूमीचा श्रेष्ठ नट या चित्रपटासाठी प्रभातला लाभला. त्याच्या हिंदी रूपांतरात त्याची भूमिका चंद्रमोहन याने केली होती. चंद्रमोहनची ही पहिलीच भूमिका. केशवराव भोळ्यांसारख्या अभ्यास, प्रयोगशील आणि मेहनती संगीतदिग्दर्शकाचाही या चित्रपटाला लाभ झाला. अमृतमंथन तयार झाल्यावर तो मुंबईच्या कृष्ण सिनेमात २९ आठवडे चालला. हिंदी चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा पहिला मान अमृतमंथनला मिळाला.

या वेळेपर्यंत रंगभूमीवरील पुष्कळसे नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीकडे वळले होते. सर्वप्रथम गोविंदराव टेंबे अयोध्येचा राजामध्ये पडद्यावर आले. त्यानंतर बंडोपंत सोहनी (श्याम सुंदर), केशवराव दाते (अमृतमंथन), नानासाहेब फाटक (आकाशवाणी), गणपतराव बोडस (सुषर्ण मंदिर), हिराबाई बडोदेकर (सुषर्ण मंदिर), बालगंधर्व (धर्मात्मा), के. नारायण काळे (धर्मात्मा), मा. दीनानाथ (कृष्णार्जुनयुद्ध), वैशंपायन (छाया), चिंतामणराव कोल्हटकर (अंधेरी दुनिया), बापूसाहेब पेंढारकर (विजयाची लग्ने), सुरेशबाबू माने (अमृतमंथन), दिनकर कामण्णा (सावित्री), दामुअण्णा मालवणकर (कृष्णार्जुनयुद्ध), विष्णुपंत पागनीस (संत तुकाराम), सरस्वती राणे (सावित्री), जी. एम्. लोंढे (कान्होपात्रा), कमलाबाई बडोदेकर (मक्क अंबरीश), कृष्णराव गोरे (सावित्री), मामा भट (माझा मुलगा), विष्णुपंत औंधकर (सावकारी पाश), विनायकराव पटवर्धन (माधुरी) इत्यादी. यांपैकी फक्त केशवराव दाते, दामुअण्णा मालवणकर व दिनकर कामण्णा हे चित्रपटसृष्टीतही अतिशय गाजले. विष्णुपंत औंधकरांना चित्रपटमाध्यमाची कल्पना बरोबर समजली होती. त्यामुळे नट व त्याहीपेक्षा लेखक म्हणून ते चित्रपटसृष्टीतदेखील यशस्वी झाले.

चित्रपटसृष्टीच्या प्रारंभकालात नाटकातील बरेच कलावंत या क्षेत्रात आले होते; कारण ते अभिनयकुशल होते. शिवाय पूर्वी चित्रपटात स्वत:चे गाणे स्वत: गावे लागे; त्यामुळे गायक'संत तुकाराम', १९३६. नटांना चित्रपटसृष्टीत लवकर प्रवेश मिळाला.

बोलपटाच्या प्राथमिक अवस्थेत पुष्कळदा नाटकच बोलपटाच्या स्वरूपात चित्रित केलेले असे. १९३७ साली बालगंधर्वांनी साध्वी मीराबाई हा बोलपट काढला. तोपर्यंत प्रभात फिल्म कंपनीने चित्रपटतंत्रात बरीच प्रगती केलेली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांनी करूनही त्याचे नाटकी स्वरूप लपले नाही. त्यात बालगंधर्वांनी मीराबाईची भूमिका केली होती. ती प्रेक्षकांना मुळीच रुचली नाही; कारण पडद्यावर स्त्रीभूमिका करणाऱ्या स्त्रियाच आल्यामुळे बालगंधर्वांना पडद्यावर स्त्रीभूमिकेत पाहण्यास प्रेक्षक तयार नव्हते.

रंगभूमी व चित्रपट या दोन माध्यमांतील फरक अमृतमंथन या चित्रपटाने १९३४ साली प्रथम स्पष्ट केला होता. शांतारामबापूंनी कॅमेरा कसा फिरवला असेल, हा त्या वेळी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय शाला होता. हाताशी असलेल्या सुसज्ज साधनसामग्रीचा शांतारामबापूंनी पुरेपूर उपयोग करून घेतला होता. नव्या चित्रपटनिर्मितिगृहातील बऱ्याच सोयी त्यांना उपकारक ठरल्या होत्या. त्यापूर्वी चित्रीकरण सूर्यप्रकाशावर अवलंबून असे, त्यामुळे पावसाळ्यात तर चार महिने चित्रीकरण जवळजवळ थांबलेलेच असे. रात्रीची दृश्ये घेणेदेखील अशक्यच होते. सिंहगडमधील लढाईची दृश्ये मशाली व मोटारच्या दिव्यांच्या उजेडावर घेतली होती, निर्मितिगृहात प्रकाश येण्यासाठी त्याच्या तीन बाजू उघड्या ठेवाव्या लागत; त्यामुळे बाहेरचे आवाज येत व ध्वनिमुद्रणाचे काम अत्यंत जिकीरीचे होई. आरसे व कागदी चांदी लावलेल्या परावर्तकांच्या साह्याने प्रकाशयोजना करावी लागे, त्यामुळे पात्रांच्या डोळ्याला त्रास होई. शिवाय मनासारखी प्रकाशयोजना करता येत नसे. सकाळी एका बाजूने, तर दुपारी दुसऱ्या बाजूने ऊन येई, त्यामुळे कितीतरी प्रश्न उभे राहत. एका जर्मन तंत्रज्ञाने त्यावेळी कोल्हापूरच्या निर्मितिगृहाला भेट दिली. या उघड्या निर्मितिगृहाचे स्वरूप पाहून आणि प्रभातने तेथेच सहा बोलपट त्यातही एक रंगीत चित्रपट सादर केला, हे ऐकून तो थक्कच झाला.

अमृतमंथननंतर प्रभातने चंद्रसेना हा चित्रपट मराठी, हिंदी व तमिळ भाषेत सादर केला होता. त्यातील शेख फत्तेलाल यांचे वैशिष्ट्यपूर्ण भव्य सेट्स आणि वेशभूषा इ. दीर्घकाल लक्षात राहण्यासारखी होती. यानंतर प्रभातने धर्मात्मा हा संत एकनाथांच्या जीवनावरील संतपट चित्रित केला (१९३५). त्यात प्रेक्षकांना बालगंधर्वाच्या पुरुष भूमिकेचे रजतपटावरील प्रथम दर्शन घडले. या चित्रपटाला मा. कृष्णरावांसारखा संगीतदिग्दर्शक आणि थिरकवाँसारखा तबलजी यांचा लाभ झाला. या चित्रपटाचे मूळ नाव महात्मा होते; पण ते त्या काळच्या ब्रिटिश सरकारने बदलावयास लावले.

कोल्हापुरात कालियामर्दननंतर विलासी ईश्वर (१९३५) हा मराठीतील पहिला सामाजिक चित्रपट सादर करण्यात आला. त्याचे लेखक होते मामा वरेरकर, तर दिग्दर्शक होते मा. विनायक. मा. विनायकांना दिग्दर्शनाची पहिली संधी या चित्रपटामुळेच मिळाली होती. सरोज शिलोत्री ही घरंदाज सुविद्य अभिनेत्री या बोलपटामुळेच पुढे आली. हीच नंतरची शोभना समर्थ. त्याच सुमारास सांगलीला भट बेडेकर प्रॉडक्शनच्या विद्यमाने विश्राम बेडेकर यांनी ठकीचे लग्नसत्याचे प्रयोग हे विनोदी आणि उपहासात्मक चित्रपट काढले. ते फारसे यशस्वी झाले नसले, तरी विश्राम बेडेकरांनी १९३५ सालीच विनोदी चित्रपटाचा प्रारंभ करून दिला होता. ठकीच्या लग्नाचे लेखक होते राम गणेश गडकरी व सत्याचे प्रयोगाचे चिं. वि. जोशी, ठकीच्या लग्नामुळे चित्रपटसृष्टीला दामुअण्णा मालवणकरांसारखा अभिजात विनोदी नट मिळाला.

सरस्वती सिनेटोनने औटघटकेचा राजानंतर भक्त प्रल्हाद, छत्रपती संभाजी, ठकसेन राजपुत्रसावित्री यांसारखे यशस्वी बोलपट सादर केले; तर इंपीरिअल फिल्म कंपनीचे अर्देशिर इराणी यांनी नानासाहेब सरपोतदार यांच्या सहकार्याने रुक्मिणीहरणदेवकी हे दोन बोलपट निर्माण केले. सोलापूरलाही ओंकार फिल्म स्टुडिओ निघाला होता. ओंकार ललित प्रॉडक्शनच्या नावाने श्याम हा चित्रपट त्या संस्थेने काढला, पण तो पडला. तेथून पुढे (१९३७) सोलापूरला चित्रपटनिर्मिती झाली नाही. १९३६ साली मराठीत एकाहून एक तीन उत्कृष्ट चित्रपट निघाले. त्यांपैकी एक हंस पिक्चर्सचा वि. स. खांडेकरलिखित छाया हा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मा. विनायक यांनी केले होते. दुसरा चित्रपट शालिनी सिनेटोन, कोल्हापूर यांचा बाबूराव पेंटर दिग्दर्शित सावकारी पाश हा असून या वास्तववादी चित्रपटाचे लेखक व प्रमुख नट विष्णुपंत औंधकर होते. चंद्रकांत यांचीही प्रथम भूमिका याच चित्रपटात होती. गणिकेचे एकच गाणे या चित्रपटात होते. पं. जवाहरलाल नेहरूंनादेखील हा चित्रपट अतिशय आवडला होता. तिसरा यशस्वी झालेला चित्रपट विष्णुपंत दामले व शेख फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेला प्रभातचा संत तुकाराम हा होता. या चित्रपटाने तर भारत व भारताबाहेरही मराठी चित्रपटाला चिरस्मरणीय केले. त्यात कोणीही नामवंत कलाकार नाहीत; परंतु साधेपणा, वास्तवता, योग्य वातावरण व हळुवारपणा यांमुळे संत तुकारामने मराठी आणि अन्य भाविकांनाही वेड लावले. पारशी, गुजराती, बोहरी समाज संत तुकाराममधील अभंग ऐकून तल्लीन होऊन जाई. संत तुकाराम अमेरिका, मध्यपूर्व, आशिया, इंडोचायना, चीन या ठिकाणीही आवडला. व्हेनिसच्या जागतिक चित्रपटप्रदर्शनात जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटात संत तुकारामची गणना झाली. हा बहुमान संत तुकारामने भारताला सर्वप्रथम मिळवून दिलां (१९३७). एवढेच नव्हे, तर एकाच चित्रपटगृहात सुवर्णमहोत्सव (मुंबईचे सेंट्रल चित्रपटगृह – ५७ आठवडे) साजरा करणारा संत तुकाराम हा भारतातील पहिला चित्रपट होय, तसेच हा पहिलाच यशस्वी संतपटही होय. संत तुकारामची अमाप लोकप्रियता पाहून रणजित स्टुडिओने विष्णुपंत पागनीसांना घेऊन संत तुलसीदास हा चित्रपट सादर केला. त्याचबरोबर संत जनाबाई (रविंद्र पिक्चर्स), भक्त दामाजी (प्रिन्स शिवाजी मुव्हिट्टोन), संत चोखामेळा (मोहन पिक्चर्स), अयोध्येची राणी (प्रगती चित्र), देवयानी (सरस्वती सिनेटोन) इ. चित्रपट पुढे निघाले. १९३७ साली चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी ना. ह. आपटेलिखित गंगावतरण हा बोलपट दिग्दर्शित केला; पण तो अयशस्वी झाला. दादासाहेब फाळकेदिग्दर्शित असा हा पहिला आणि शेवटचाच बोलपट ठरला.

यानंतरचा पाच वर्षांचा काळ मराठी चित्रपटांना अनुकूल होता, असे म्हणावे लागेल. या काळात वर्षाला साधारण १० ते १२ मराठी बोलपट प्रदर्शित होत होते. १९३८ साली के. पी. भावे दिग्दर्शित धुत्रकुमार हा शालिनी सिनेटोनचा शेवटचा चित्रपट. त्याचवर्षी प्रभा पिक्चर्ससाठी निर्माते राजा पंडित यांनी बालकलाकार घेऊन ध्रुष हा बोलपट सादर केला. दिग्दर्शक होते डी.के. काळे व ध्रुव होता बालकराम. सूर्यकांत हाही त्यात एक बालकलाकार होता. बालकलाकार घेऊन चित्रपट सादर करण्याचा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच प्रयोग असूनही तो यशस्वी झाला.

याच काळात भालजी पेंढारकर यांनी कान्होपात्रा (१९३७) या शालिनी सिनेटोनच्या चित्रपटानंतर सरस्वती सिनेटोनसाठी राजा गोपीचंद (१९३८) व स्वतःच्या अरुण पिक्चर्ससाठी नेताजी पालकर (१९३९), फेमस अरुणसाठी गोरखनाथ, सूनबाई (१९४०) व थोरातांची कमळा (१९४१) या चित्रपटांचे दिग्दर्शन व लेखन केले होते, भालजींच्या खटकेबाज व झणझणीत संवादांमुळे त्यांचे ऐतिहासिक चित्रपट हमखास यशस्वी होत. प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन्सचे स्वराज्य सीमेवर या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटाचे तेच लेखक होते.

बाबूराव पेंढारकर, मा. विनायक व प्रख्यात छायालेखक पांडुरंग नाईक यांनी हंस पिक्चर्सची स्थापना केली होती. छायानंतर आचार्य अत्रे या आणखी एका थोर साहित्यिकाला हंसने चित्रपटसृष्टीत आणले. मा. विनायक दिग्दर्शित व आचार्य अत्रे लिखित पहिला चित्रपट म्हणजे धर्मवीर (१९३७). एका ढोंगी प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्याची कथा यात सांगितली होती. त्याच वर्षी त्या दोघांचा प्रेमवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने तरुणांची मने जिंकली. पार्श्वगीतांचा उपयोग केलेला हा पहिला मराठी बोलपट, १९३८ सालच्या ब्रह्मचारीने तर यावर कळसच केला. चंद्रमोहनची प्रमुख भूमिका असलेला त्याअगोदरचा ज्वाला हा बोलपट मात्र साफ पडला होता. आचार्य अत्रे यांनी तीन दिवसांत ब्रह्मचारी हा चित्रपट लिहून पूर्ण केला व मा. विनायक यांनी तीन महिन्यांत त्याचे चित्रीकरण संपविले. हा हिंदी-मराठी भाषेतील चित्रपट आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी विकणे भाग पडले. या चित्रपटाने मुंबईत रौप्यमहोत्सव व पुण्यात सुवर्णमहोत्सव साजरा केला. उपहास, विनोद, प्रणय यांचा सुंदर मेळ या चित्रपटात होता. या चित्रपटाने मीनाक्षी-विनायक जोडी पुढे आली. वि. स. खांडेकरलिखित व बाबूराव पेंढारकरांची प्रमुख भूमिका असलेले १९३९ मधील देवतासुखाचा शोध हे दोन चित्रपट खास उल्लेखनीय आहेत.

आचार्य अत्रे यांचा अर्धागी (१९४०) तसेच दामुअण्णा मालवणकरांची प्रमुख भूमिका असलेला अँडीची बाटली (१९३९) हे दोन्ही चित्रपट लोकप्रिय झाले.

याच सुमारास घडलेली एक घटना उल्लेखनीय आहे. चित्रपटाची श्रेयनामावली (टायटल्स) इंग्रजीमधून देण्याची तेव्हा प्रथा होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही प्रथा बंद करून मराठीतून श्रेयनामावली देण्याचे सुचविले. इतकेच नव्हे, तर त्यांनीच मूळ इंग्रजी शब्दांना सुयोग्य असे मराठीत प्रतिशब्दही सुचविले. बोलपट हा मराठी शब्द त्यांचाच. त्यांच्या सूचनेनुसार पुढे मराठी चित्रपटांत मराठी श्रेयनामावली देण्यात येऊ लागली. यालाच अनुसरून काही हिंदी चित्रपटांनीही हिंदी भाषेत श्रेयनामावली देण्यास प्रारंभ केला.

संत तुकारामनंतर दामले व फत्तेलाल यांनी गोपालकृष्ण (१९३८), संत ज्ञानेश्वर (१९४०), संत सखू (१९४१ ); तर व्ही. शांताराम यांनी कुंकू (१९३७), माणूस (१९३९) व शेजारी (१९४१) यांसारखे चित्रपट ओळीने सादर केले. या चित्रपटांमुळे प्रभातला दिगंत कीर्ती लाभली व भरपूर आर्थिक लाभही झाला. भारत व भारताबाहेरही या चित्रपटांची प्रशंसा झाली. न्यूयॉर्कच्या कार्नेगी हॉलमध्ये दाखविलेले पहिले भारतीय बोलपट म्हणजे प्रभातचे संत ज्ञानेश्वर, कुंकूमाणूस. अमेरिकेतील निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कलाकार यांनी हे चित्रपट पाहिले. कुंकूचे तंत्र सर्वांना आवडले, कथानकही बरे वाटले. तसेच संत ज्ञानेश्वरावरही सर्वजण खूष झाले, तर ⇨ चार्ल्स (चार्ली) चॅप्लिनला माणूस फार पसंत पडला. ख्यातनाम दिग्दर्शक फ्रैंक कामा याने अमेरिकन सिनेमॅटोग्राफरमध्ये एका लेखात, ‘पुण्यासारख्या लहानशा गावी पुरेशी साधने नसताना प्रभात फिल्म कंपनीने इतका तंत्रशुद्ध बोलपट काढावा, याचे खरोखर आश्चर्य वाटते’, असे अत्यंत कौतुकाने लिहिले होते. प्रभात फिल्म कंपनीचे हे भाग्य कोणत्याही चित्रपटसंस्थेच्या वा निर्मात्याच्या वाट्याला आले नाही. कुंकू हा जसा प्रभातचा पहिला सामाजिक बोलपट, तसाच तो एक फूटभरही पार्श्वसंगीत नसलेला पहिला बोलपट होय. हा प्रयोग कोणत्याही चित्रपटात करण्यात आलेला नाही.

हंस पिक्चर्सची कायमची आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी ही संस्था लिमिटेड करण्याचे आचार्य अत्रे यांच्या सल्ल्यानुसार चालकांनी ठरविले आणि हंसचे रूपांतर नवयुग चित्रपट लिमिटेडमध्ये झाले. नवयुगने लपंडाव (१९४०) आणि अमृतसंगम (१९४१) असे तीन बोलपट तयार केले. त्यांतील अमृत हा सर्वोत्तम होता. त्याचे लेखक होते वि. स. खांडेकर आणि दिग्दर्शक मा. विनायक. पुढे नवयुगमधून बाबूराव पेंढारकर व पांडुरंग नाईक बाहेर पडून नवहंस ही संस्था त्यांनी चालू केली. त्यांचा पहिलाच बोलपट विश्राम बेडेकरलिखित-दिग्दर्शित पहिला पाळणा (१९४२) हा अविस्मरणीय विनोदी बोलपट ठरला. नंतरचा भालजी पेंढारकरलिखित-दिग्दर्शित भक्त दामाजी, त्याचवेळी मा. विनायक यांनी नवयुगसाठी लग्न पहावे करून (१९४०) हा चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव या कथेवरून अप्रतिम विनोदी बोलपट सादर केला. नंतर मा. विनायक यांनी प्रफुल्ल पिक्चर्स ही संस्था कोल्हापुरात स्थापन करून माझं बाळ, चिमुकला संसार, बडी माँराजाभाऊ हे चित्रपट निर्माण केले. भालजींनी आपल्या प्रभाकर पिक्चर्सतर्फे बहिर्जी नाईक, महारथी कर्णे, वाल्मीकी, सुवर्णभूमी, सासुरवास, मीठभाकर, जय भवानी, शिलंगणाचे सोने, मी दारू सोडली, छत्रपती शिवाजी, माझी जमीन, महाराणी येसूबाई इ. चित्रपट सादर केले.

कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या. त्यांनी सावळ्या तांडेल (१९४२), रुक्मिणी स्वयंवर  हे मराठी आणि पुढे पन्नादाई  हा हिंदी बोलपट निर्माण केला होता. आचार्य अत्रे यांनी स्वतःची चित्रपट संस्था सुरू करून पायाची दासी, वसंत सेना, बाईलवेडा  हे चित्रपट सादर केले. दरम्यान नवयुगने १९४२ मध्ये सरकारी पाहुणे, तुझाचपहिली मंगळागौर  हे तीन चित्रपट तयार केले. विनायकांचा सरकारी पाहुणे ही लग्न पहावे करूनची पुढची आवृत्तीही तशीच विनोदी व खूपच यशस्वी ठरली. र. शं. जुन्नरकारांचा पहिली मंगळागौरही यशस्वी झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कच्च्या फिल्मचा तुटवडा पडला. १७ जुलै १९४३ रोजी एका सरकारी आदेशानुसार कच्च्या फिल्मवर कडक निर्बंध आले, त्यामुळे चित्रपटनिर्मिती रोडावली पण त्या काळात सामान्य लोकांजवळ पैसा होता. साहजिकच त्यांचा कल मनोरंजनाकडे वळला. त्यातल्या त्यात स्वस्त व सुलभ करमणूक म्हणून हिंदी चित्रपटातील नाच, ढंगदार गाणी, प्रणयप्रसंग व इतर करमणुकप्रधान बाबी यांशिवाय भव्य देखावे व डोळ्यांना सुखावणारी इतर निर्मितिमूल्ये यांमुळे सामान्य माणूस हिंदी चित्रपटाकडे आकृष्ट झाला. त्यातच हिंदी जाणणाऱ्यांची संख्या भराभर वाढू लागली, त्यामुळे खेडोपाडीही हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले. यापूर्वी मराठी भाषिक प्रदेशांत मराठी चित्रपटच प्रामुख्याने चालत. ते चित्र बदलले. वाढत्या खर्चाच्या मानाने मराठी चित्रपटाला उत्पन्न मिळेनासे झाले. परिणामतः मराठी चित्रपटव्यवसाय अडचणीत आला. आज ३० वर्षे होऊनही मराठी चित्रपटव्यवसाय सुस्थितीत व सुस्थिर नाहीच. प्रभात फिल्म कंपनीने मराठी चित्रपटांची निर्मिती थांबवून चांद, लाखाराणी, हम एक हैं, गोकुल, आगे बढो, सीधा रास्ता, अपराधी  असे ओळीने हिंदी चित्रपट काढल्याने ही संस्था त्या काळात टिकून राहिली.

'रामशास्त्री', १९४४. व्ही. शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी दहा वाजता  हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला. रामशास्त्री  अर्धा तयार झाल्यावर राजा नेने यांनी १९४३ नोव्हेंबरमध्ये प्रभात कंपनी सोडली. त्यांच्याबरोबर इतरही अनुभवी मंडळी बाहेर पडली. पुढे रामशास्त्री  विश्राम बेडेकर यांनी पुरा केला (१९४४). त्यात गजानन जहागिरदार यांनी रामशास्त्रींची भूमिका केली होती. संत तुकाराम, गोपालकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत सखू  या चित्रपटांचे अत्यंत यशस्वी लेखक शिवराम वाशिकर हेच रामशास्त्रीचे लेखक होते. प्रभातच्या माणूसखेरीज सर्व चित्रपटांत गीतरचना शांताराम आठवले यांची असे. शांतारामबापूंच्या चित्रपटांना ना.ह. आपटे, के. नारायण काळे, अनंत काणेकर, विश्राम बेडेकर यांच्यासारखे मान्यवर लेखक लाभले होते. १९४५ च्या आसपास मराठी चित्रपटसृष्टीचे उज्ज्वल पर्व संपुष्टात आले. यानंतर प्रभातने चित्रपट काढले पण ते बहुतेक हिंदी भाषेत. संत जनाबाई (१९४९) व श्रीगुरूदेवदत्त (१९५२) हे प्रभातचे पुढील काळातील फक्त दोन मराठी चित्रपट. त्यांतील संत जनाबाई  बरा चालला पण श्रीगुरूदेवदत्त  साफ पडला व तो प्रभात फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट ठरला.

शांतारामबापूंच्या पश्चात दामले, फत्तेलाल यांनी प्रभातची तुतारी निनादत ठेवली होती. ५ जुलै १९४५ रोजी विष्णुपंत दामल्यांच्या अकाली निधनाने प्रभातचा उरला सुरला आधारही तुटला. १३ ऑक्टोबर १९५३ रोजी प्रभात फिल्म कंपनीचे परिसमापन झाले व मराठी चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी प्रभात पर्व संपले.

प्रकाश पिक्चर्स मुंबई या संस्थेने १९४२ मध्ये भरतभेट  व त्यापुढील वर्षी रामराज्य  हे दोन भव्य आणि उत्तम पौराणिक चित्रपट सादर केले. त्यांचे लेखक होते विष्णुपंत औंधकर व दिग्दर्शक विजय भट्ट. व्ही. शांताराम यांच्या राजकमलने निर्माण केलेला भक्तीचा मळा (१९४४) हा चित्रपट बेताचाच गेला. त्यावर्षी फक्त ४ मराठी बोलपट तयार झाले, तर १९४५ साली एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर १९४६ साली दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतर मराठी चित्रपटांच्या निर्मितीत हळूहळू वाढ होत गेली व १९६२ साली २२ चित्रपट प्रदर्शित झाले व १९७१ साली सर्वाधिक म्हणजे २३ मराठई चित्रपटांचे प्रकाशन झाले.

मराठी चित्रपटांच्या प्रारंभकाळात चित्रपटनिर्माते हे स्वतःच संचालक, दिग्दर्शक व तंत्रज्ञ असत. युद्धकाळानंतर चित्रपटनिर्मितिगृह भाड्याने घेऊन चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. शांताराम, मा. विनायक, अत्रे, बाबूराव पेंढारकर, प्रभात आणि नवयुग यांसारखे मराठीतील मातबर निर्माते व संस्था यांनी आपले लक्ष मराठीकडून हिंदीकडे वळविले. अर्थात त्यावेळी संस्था टिकविण्यासाठी हेच करणे योग्य होते.

प्रभात, सरस्वती, हंस, नवयुग, प्रफुल्ल यांसारख्या संस्थांनी मराठी चित्रपटांची एक परंपरा निर्माण केली होती. ही परंपरा कलावादीही होती व ध्येयवादीही होती. या परंपरेने एकेकाळी महाराष्ट्रीय चित्रपट कलेला भारतात आघाडीचे स्थान मिळवून दिले होते. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर व त्यांच्यानंतर व्ही. शांताराम, व्ही. दामले, एस्. फत्तेलाल, मा. विनायक, भालजी पेंढारकर इत्यादींनी श्रद्धेने चित्रपटाच्या अंगोपांगांकडे लक्ष पुरविले. सरस चित्रपट निर्माण करण्याची चढाओढ असल्याने चित्रपटविषयांत वैचित्र्य येई, चित्रपटांच्या प्रकारांत विविधता आढळे. नवनवीन अभिनयकुशल नटनट्या पुढे येत. संगीत-नियोजन, छायालेखन, ध्वनिलेखन, कलादिग्दर्शन इत्यादींचाही विकास होई परंतु दुसऱ्या महायुद्धकाळात चित्रपटाचा साचाच एकदम बदलला. प्रेक्षकांची अभिरुची पालटली. प्रेक्षकांच्या आवडीनुसार चित्रपट बनू लागल्यावर पुन्हा चित्रपटव्यवसाय सावरला गेला तथापि मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळी जो जबर फटका बसला त्यातून आजपर्यंत ती धडपणे सावरू शकली नाही. दुसरे कारण म्हणजे हिंदीच्या स्पर्धेत मराठी चित्रपट मागे राहिले कारण पुढे मराठी चित्रपटांना मिळणारा पैसा निर्मितीच्या वाढत्या खर्चापुढे अपुरा पडू लागला, त्यामुळे प्रत्येक मराठी चित्रपटाला काटकसर-योजना अपरिहार्य झाली. हिंदी चित्रपटांच्या तुलनेने मराठी चित्रपट सर्वच बाबींत दुय्यम वाटू लागले. उत्तमोत्तम कथानके, खर्चाची बाजू झेपणार नाही म्हणून बाजूला ठेवावी लागली, परिणामतः प्रभातच्या चित्रपटात दिसणारी नेत्रदीपक निर्मितिमूल्ये त्यांत राखणे अशक्य झाले. त्यातच १९४७ च्या ऑगस्टमध्ये झालेले मा. विनायक यांचे आकस्मिक निधन हा मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक जबर धक्का बसला.

पुढे १९४७ साली मंगल पिक्चर्सचा जयमल्हार  व व्ही. शांताराम दिग्दर्शित राजकमल कलामंदिराचा रामजोशी  हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांतील कथानक, वातावरण व गीते प्रेक्षकांना एकदम पसंत पडली. जयमल्हार चित्रपटातील गीतांना  ⇨ शं. वि.चांदेकरांनी प्रथमच लावणी पद्धतीच्या चाली दिल्या. त्या प्रेक्षकांना अतिशयच आवडल्या. तेव्हापासून मराठी चित्रपट संगीताला एक नवीनच वळण मिळाले. या दोन चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला जे एक नवे वळण लागले, ते आजतागायत या ना त्या स्वरूपात दिसून येते. या दोन चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला ग. दि. माडगूळकरांसारख्या चतुरस्त्र कवि-लेखकाचा लाभ झाला. पुढे पंधरा वर्षे तर माडगूळकरांची कारकीर्द गाजली. या काळात माडगूळकरांनी सु. ७५ पटकथा व त्यांहून अधिक चित्रपटांची गीतरचना केली. पु. ल. देशपांडे, ग. रा. कामत यांसारखे सहकारीही त्यांना लाभले होते. संगीतदिग्दर्शक सुधीर फडके यांचा उदयही याच काळातील.

आचार्य अत्रे यांनी मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा, ही माझी लक्ष्मी, श्यामची आई  व महात्मा फुले  हे चित्रपट सादर केले. पैकी श्यामची आई  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिलेच राष्ट्रपति सुवर्णपदक मिळाले (१९५३).

विश्राम बेडेकरांनी वासुदेव बळवंत  व फेमस पिक्चर्ससाठी चूल आणि मूल  हे चित्रपट तयार केले. त्यांपैकी वासुदेव बळवंत  एक उल्लेखनीय चित्रपट होता.

गौरी पिक्चर्स द्वारा भालजी पेंढारकरांनी स्वराज्याचा शिलेदार, शिवा रामोशी, माय बहिणी  व श्रीलक्ष्मी चित्रकृत येरे माझ्या मागल्या  आणि जय भवानी  चित्रासाठी गाठ पडली ठका ठका, पावन-खिंड, नायकिणीचा सज्जा  हे चित्रपट सादर केले. याच काळात सुरेल चित्रासाठी दिग्दर्शक माधव शिंदे यांनी तयार केलेले गृहदेवता, शिकलेली बायको, कन्यादान  हे चित्रपट खूपच यशस्वी झाले. विजय पिक्चर्सचा सीता स्वयंवरही खूप गाजला. त्यांतील माडगूळकरांची गीते व सुधीर फडके यांचे संगीत दोन्ही उत्कृष्ट होते. माणिक स्टुडोओने सादर केलेले दत्ता धर्माधिकारीदिग्दर्शित माया बाजार  व राजा परांजपेदिग्दर्शित पुढचं पाऊल हे दोन्ही चित्रपट खूपच यशस्वी झाले. राजा परांजपे यांनी त्याअगोदर मंगल पिक्चर्ससाठी दिग्दर्शित केलेला जिवाचा सखा  हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला होता. मंगल पिक्चर्सचे नवे दिग्दर्शक राम गबाले त्यावेळी पुढे येत होते. श्रीगणेश चित्रसाठी पु. ल. देशपांडेलिखित व राम गबालेदिग्दर्शित दूधभात  हा एक उत्तम चित्रपट निघाला होता.

'अमर-भूपाळी', १९५१. त्याच वर्षी मकरंद फिल्मसाठी माडगूळकरलिखित व राजा परांजपेदिग्दर्शित पेडगावचे शहाणे  व गजराजसाठी लाखाची गोष्ट हे दोन चित्रपट लोकप्रिय ठरले परंतु त्यांचाच ऊनपाऊस  हा एक उत्तम चित्रपट असूनही त्याला जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही किंवा सरकारी प्रशस्तिपत्रही लाभले नाही. राजा नेने यांचे सहायक दत्ता धर्माधिकारी यांनी मायाबाजारनंतर कुंकवाचा धनीअखेर जमलं  हे दोन चित्रपट दिग्दर्शित करून स्वतःची आल्हाद चित्र ही संस्था स्थापन केली. बाळा जो जो रे (१९५१), चिमणी पाखरं (१९५२) व स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (१९५२) हे त्यांनी सादर केलेले चित्रपट अतिशय यशस्वी झाले. या तिन्ही चित्रपटांचे पटकथा लेखक-कवी होते ग. दि. माडगूळकर.

राजकमल कलामंदिरचा अमर भूपाळी  हा एक उत्तम चित्रपट १९५१ सालीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची पटकथा विश्राम बेडेकर व संवाद चिं. य. मराठे यांचे होते. युद्धकाळनंतर ज्या थोड्याफार चित्रपट निर्मितिसंस्था उरल्या त्यांत राजकमल कलामंदिर, माणिक स्टुडिओज व आल्हाद चित्र यांचा उल्लेख करावा लागेल. १९५३ साली श्यामची आई  या चित्रपटांखेरीज मोशन पिक्चर्स एंटरप्राइझेसचा राम गबाले दिग्दर्शित देवबाप्पा  व शांताराम आठवले दिग्दर्शित सहकार चित्राचा वहिनींच्या बांगड्या  हे चित्रपट विशेष गाजले. १९५५ चाच शेवग्याच्या शेंगा  हा शांताराम आठवले यांचा दुसरा यशस्वी चित्रपट होय. नव चित्राच्या रेशमाच्या गाठी (१९५४) व बोलविता धनी (१९५३) या चित्रपटांमुळे कसबी संकलनकार राजा ठाकूर हे दिग्दर्शक म्हणून पुढे येऊ लागले होते. या काळात चित्रपटनिर्मिती वाढली पण धंदा बसत चालला. यशस्वी चित्रपटांची संख्या अगदीच मोजकी होती. त्या काळातील अत्यंत यशस्वी निर्माते दत्ता धर्माधिकारी. त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या भाग्यवान  नाटकावर १९५३ साली महात्मा  चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजीतही काढण्याचा प्रयत्न केला पण या चित्रपटाने सपाटून मार खाल्ला व आल्हाद चित्राची बसलेली सारी घडी विसकटून गेली. तसेच भालजी पेंढारकरांनाही छत्रपति शिवाजी (१९५२) या हिंदीतील चित्रपटाच्या अपयशाने जबर फटका बसला. पुण्यातील डेक्कन स्टुडिओ व नवयुग स्टुडिओ हे बंद पडले होते. प्रभात स्टुडिओचे भवितव्य अनिश्चित होते. अशा वेळी अनंत माने, माधव शिंदे व राजा ठाकूर यांसारखे काही नवोदित दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टी स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करीत होते. राजा ठाकूर यांचे मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), माझे घर माझी माणसं (१९५६), घरचं झालं थोडं (१९५७) व रंगल्या रात्री अशा (१९६२) हे चित्रपट दर्जेदार होते. माधव शिंदे यांचा गृहदेवता (१९५७) या चित्रपटाला भारत सरकारचे प्रादेशिक भाषेचे पारितोषिक मिळून ताश्कंद येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवासाठी त्याची निवड झाली होती. अनंत माने यांचे पुनवेची रात, प्रीतिसंगम, धाकटी जाऊ, दोन घडीचा डाव, अवघाची संसार, मानिनी, रंगपंचमी, साता जन्माचे सोबती, सागंत्ये ऐका  असे यशस्वी चित्रपट निघाले. सांगत्ये ऐका (१९५९) तर पुण्यात १३३ आठवडे चालला व तो एक विक्रमच ठरला. फिल्मिस्तानही मध्यंतरी मराठी चित्रपटक्षेत्रात उतरले होते. मधुसूदन कालेलकरलिखित व दत्ता धर्माधिकारीदिग्दर्शित आलिया भोगासी (१९५७) व राजा नेनेदिग्दर्शित पहिलं प्रेम (१९५७) हे दोन्ही बोलपट चांगले चालले. पुढे त्यांचे मराठी चित्रपट चालले नाहीत म्हणून फिल्मस्तानने मराठी चित्रपटनिर्मिती बंद केली. पतिव्रता (१९५९) या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी आणि लेखक मधुसूदन कालेलकर यांची पुन्हा चलती सुरू झाली. त्यांचे कलंक शोभा, सप्तपदी, क्षण आला भाग्याचा, एक धागा सुखाचा  हे चित्रपट यशस्वी झाले, तर कालेलकरलिखित व राजा नेनेदिग्दर्शित याला जीवन ऐसे नाव  हा चित्रपट चांगला चालला. तसेच दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा  व उमज पडेल तर  हे चित्रपटही समाधानकारक होते. ग. दि. माडगूळकरांनंतर लेखक म्हणून मधुसूदन कालेलकर यशस्वी झाले. राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके या लोकप्रिय त्रयींच्या जगाच्या पाठीवर (१९६०) व सुवासिनी (१९६१) ह्या दोन चित्रपटांनी यश मिळविले. आधी कळस मग पाया रे  हाही उल्लेखनीय होता. १९६९ साली इंडियन नॅशनल पिक्चर्सच्या प्रपंच  या चित्रपटाचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. कुटुंबनियोजनासारख्या राष्ट्रच्या ज्वलंत प्रश्नावर हा चित्रपट आधारित होता. मधुकर पाठक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला त्या वर्षीचा उत्कृष्ट चित्रपट म्हणून राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले होते. तसेच अखिल भारतीय प्रशस्तिपत्रकही लाभले आणि उत्कृष्ट भारतीय चित्रपटात त्याचा तिसरा क्रमांक लागला.

'सोंगाड्या', १९७१. मराठी चित्रपटसृष्टीचा १९६० नंतरचा आढावा घेतला असता त्यात काही गोष्टी प्रामुख्याने आढळतात. एक म्हणजे १९६३ साली महाराष्ट्र सरकारने नाटकावरील करमणूक कर माफ केला. त्यामुळे नाटकांची मराठी चित्रपटाशी स्पर्धा वाढली. त्याच सुमारास रंगीत हिंदी चित्रपटनिर्मितीत वाढ होऊ लागल्याने त्या चढाओढीचीही भर त्यात पडली. तथापि दक्षिण महाराष्ट्रातील वाढत्या साखर कारखान्यांच्या संख्येमुळे त्या भागातील शेतकरी वर्गाच्या हातात पैसा खेळू लागला. तमाशाप्रधान वा लावणीप्रधान चित्रपटाला मागणी वाढली. असा चित्रपटांना हमखास प्रेक्षकवर्ग मिळू लागला. ग्रामीण भागातील समस्या मराठी चित्रपटांत येऊ लागल्या. अनंत माने यांचा सवाल माझा ऐका, केला इशारा जाताजाता, एक गाव बारा भानगडी  हे चित्रपट अतिशय यशस्वी झाले. पण मधुचंद्रसारखा शहरात लोकप्रिय झालेला चित्रपट ग्रामीण भागात पडला. दिग्दर्शक वसंत पेंटर यांचा टिळा लावते मी रक्ताचा, वारणेचा वाघ, १२ वर्षे ६ महिने ३ दिवस  या चित्रपटांनीही धंदा बरा केला. १९७४ चा उत्कृष्ट चित्रपट म्हणून वसंत पेंटर यांच्या सुगंधी कट्ट्याला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. सर्वांत यशस्वी निर्माते म्हणून १९७० नंतरच्या कालखंडात दादा कोंडके यांचे नाव घ्यावे लागेल. लोकनाट्य क्षेत्रातील हा हरहुन्नरी कलावंत चित्रपटसृष्टीत आला आणि सोंगाड्या (१९७१) हा चित्रपट त्याने सादर केला. या चित्रपटाचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. त्या पाठोपाठ एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, आणि पांडु हवलदार या चारही चित्रपटांनी शहरांत व खेड्यांत भरघोस यश संपादन केले. एवढे यश संपादन करण्याचे भाग्य प्रभात फिल्म कंपनीनंतर दादा कोंडके यांच्याच वाट्याला आले, असे म्हणावे लागेल.

व्ही. शांताराम यांचा पहिला मराठी रंगीत चित्रपट इये मराठीचिये नगरी (१९६५) हा पूर्ण अयशस्वी ठरल्यानंतरही त्यांनी पिंजरा (१९७२) या रंगीत चित्रपटाचे पुन्हा धाडस केले. यावेळी मात्र व्ही. शांताराम या धाडसात पूर्णपणे सफल झाले. पिंजरा या मराठी रंगीत चित्रपटाचे यश पाहून बायांनो नवरे सांभाळा (१९७४), राजा शिवछत्रपति (१९७४), पुंडलिक (१९७५), औंदा लगीन करायचं (१९७५), ज्योतिबाचा नवस  (१९७५), व चंदनाची चोळी…. (१९७५) हे सहा रंगीत मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.

त्यांतील बायांनो नवरे सांभाळा  व चंदनाची चोळी…. यशस्वी झाले. दत्ता केशवदिग्दर्शित बायांनो नवरे सांभाळा या चित्रपटाचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. हा तमाशाप्रधान किंवा ग्रामीण चित्रपट नसूनदेखील तो लोकप्रिय झाला व त्याने चांगले बिगरलावणीतमाशा चित्रपटही चालू शकतात,हे सिद्ध करून दाखविले. निर्मितिखर्च जवळजवळ दुप्पट येत असूनही मराठीत रंगीत चित्रपट काढणे जरूरीचे होऊन बसले आहे.

शांतता कोर्ट चालू आहे  या मराठी नाटकावरून सादर केलेला त्याच नावाचा प्रायोगिक चित्रपट (१९७५) अयशस्वी झाला परंतु नाट्यसृष्टीतील दुसरे एक यशस्वी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा सामना  चित्रपट प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटाने काहीशी खळबळही उडवून दिली होती. १९६० नंतरच्या मराठी चित्रपटांचा आढावा घेताना आणखी एक गोष्ट लक्षात येते ती ही, की दरवर्षी तयार होणाऱ्या मराठी चित्रपटांतून एखादाच चित्रपट आर्थिक दृष्ट्या खराखुरा यशस्वी होतो. बाकीचे कमीअधिक प्रमाणात नुकसानकारकच ठरतात. याचे कारण रंगीत व करमणूकप्रधान तसेच सामान्य प्रेक्षकांना खूष करणारी नेत्रदीपक निर्मितिमूल्ये असणाऱ्या हिंदी चित्रपटांची स्पर्धा हे आहे. यशस्वी चित्रपटांची नोंदच घ्यायची झाली, तर यशवंत पेठकरदिग्दर्शित मोलकरीण (१९६३), राजा परांजपेदिग्दर्शित पाठलाग (१९६४), कमलाकर तोरणेदिग्दर्शित आम्ही जातो आमुच्या गावा (१९६८), राजदत्तदिग्दर्शित अपराध (१९६९), राजा ठाकूरदिग्दर्शित मुंबईचा जावई (१९७०), गजानन जहागिरदारदिग्दर्शित दोन्ही घरचा पाहुणा (१९७१) इ. चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल.

शांताराम आठवलेदिग्दर्शित वावटळ  या चित्रपटाला १९६५ चे सर्वोत्तम चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. एवढेच नव्हे, तर या चित्रपटाला अन्य दहा पारितोषकेही मिळाली होती परंतु आर्थिक दृष्ट्या हा चित्रपट अपयशीच ठरला. तसेच भालजी पेंढारकर यांचा साधी माणसं (१९६५) व दिनकर द. पाटील यांचा धन्य ते संताजी धनाजी (१९६८), या चित्रपटांचा बोलबाला होऊनही ते आर्थिक दृष्टीने यशस्वी झाले नाहीत. १९७३ व १९७४ ही सामान्य मराठी चित्रपटांचीच दोन वर्षे. १९७३ साली सोळा मराठी चित्रपट पडद्यावर आले, त्यांतील बहुतेक पडले. १९७४ मध्ये ९ मराठी चित्रपट प्रसिद्ध झाले. पैकी महाभक्त तुकाराम  हा मद्रासहून मराठीत आला आणि काहीतरी अडचणींनी बरेच दिवस रखडलेले तीन चित्रपट प्रदर्शित झाले, म्हणून ते वगळता खऱ्या अर्थाने फक्त पाचच नवे चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाले, असे म्हणता येईल.

मराठी चित्रपटसृष्टीचा गेल्या ४२-४३ वर्षांचा इतिहास पाहता कितीतरी दिग्दर्शक, कलावंत, लेखक, कवी, संगीतदिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचे कार्य महत्वाचे ठरते. त्यांतील काही नावे प्रसिद्ध आहेत. उदा., दुर्गा खोटे, ललिता पवार, लीला चिटणीस, शांता आपटे, मा. विनायक, गजानन जहागिरदार, बाबूराव पेंढारकर, शाहू मोडक, केशवराव दाते, बी. नांद्रेकर, दामुअण्णा मालवणकर, साळवी, मा. विठ्ठल, चंद्रकांत, सूर्यकांत, हंसा वाडकर, बेबी शकुंतला, उषा किरण, रमेश देव, सीमा, जयश्री गडकर, रेखा, चित्रा, विवेक, स्मिता, राजा गोसावी, राजा परांजपे, चंद्रकांत गोखले, धुमाळ, वसंत शिंदे, शरद तळवळकर, काशिनाथ घाणेकर, अरूण सरनाईक, दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील जुने-नवे लोकप्रिय कलावंत होत. केशवराव भोळे, मा. कृष्णराव या संगीतदिग्दर्शकांखेरीज शंकर विष्णू ऊर्फ दादा चांदेकर, अण्णासाहेब माईणकर, सुधीर फडके, वसंत देसाई, वसंत पवार, राम कदम यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. अत्रे, खांडेकर, वाशिकर, माडगूळकर या अत्यंत यशस्वी पटकथा लेखकांव्यतिरिक्त कथा किंवा संवाद लेखक म्हणून व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, ना. ग. करमरकर, ग. रा. कामत, जगदीश खेबूडकर यांनीही वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त करून घेतले आहे, तर ग. दि. माडगूळकर, शांताराम आठवले, राजा बढे या कवींखेरीज पी. सावळाराम व आता जगदीश खेबूडकर आघाडीवर आहेत. इतर भाषिक चित्रपटांच्या मानाने मराठी चित्रपटनिर्मिती अल्पस्वल्पच म्हणजे भारतातील एकूण चित्रपटनिर्मितीच्या फक्त ५ टक्केच आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना आखली आहे. तिच्या द्वारे एखाद्या चित्रपटाचा करमणूक कर पुढील चित्रपटाला भांडवल म्हणून देण्यात येणार आहे. त्याचा तपशील जाहीर झाल्यावर या योजनेचे स्वरूप स्पष्ट होईल.

आद्य भारतीय बोलपट 'आलमआरा', १९३१. हिंदी चित्रपट :  अर्देशिर इराणी यांच्या इंपीरिअल फिल्म कंपनीचा आलमआरा  हा पहिला हिंदी बोलपट १४ मार्च १९३१ या दिवशी मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यात मा. विठ्ठल, झुबेदा, पृथ्वीराज व जगदीश सेठी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मुंबईच्या कृष्ण फिल्म कंपनीचा हरिश्चंद्र  हा त्यानंतरचा दुसरा बोलपट, तर कज्जन व निस्सार यांच्या प्रमुख भूमिका असलेला कलकत्त्याच्या मादन थिएटर्सचा शिरीन फरहाद हा तिसरा बोलपट होता. यांपैकी शिरीन फरहाद सर्वांत यशस्वी झाला. १९३१ ते १९३५ या काळात बोलपटाबरोबर मूकपटाचीही निर्मिती होतच होती परंतु त्याचे प्रमाण मात्र झपाट्याने कमी झाले होते. १९३४ मध्ये अवघे ७ मूकपट निघाले व १९३५ नंतर तर मूकपटानिर्मिती थांबलीच. १९३५ पर्यंत पश्चिम भारतात ८५ चित्रपटनिर्मितिसंस्थांनी विविध चित्रपट निर्माण केले. त्यांपैकी इंपीरिअल फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी, रणजित मुव्हिटोन, सागर फिल्म कंपनी, सरोज मुव्हिटोन, प्रकाश पिक्चर्स, पॅरामाउंट फिल्म कंपनी, वाडिया मुव्हिटोन, सरस्वती सिनेटोन व कोल्हापूर सिनेटोन या संस्थांचा उल्लेख करावा लागेल. कलकत्त्यात मादन थिएटर्स लि. व न्यू थिएटर्स या संस्था आघाडीवर होत्या. १९३५ मध्ये हिमांशु रॉय यांनी बाँबे टॉकीज लि. ही पब्लिक लिमिटेड संस्था मुंबईत सुरू केली.

त्या काळात रणजितचा देवी देवयानी (१९३१), राधारानी (१९३२)  प्रभातचा अयोध्या का राजा (१९३२), जलती निशानी (१९३२), माया मच्छिंद्र (१९३२), अमृत मंथन (१९३४), धर्मात्मा (१९३५) सरस्वतीचा श्यामसुंदर (१९३५), ईस्ट इंडियाचा सीता (१९३४)  न्यू थिएटर्सचा राजारानी (?), मीरा (१९३३), पूरण भक्त (१९३३), चंडीदास (१९३४), देवदास (१९३५), धूपछाँव (१९३५)  इंपीरिअलचा टेंपल बेल्स (१९३३) इ. चित्रपटांच्या यशामुळे बोलपटाची वाटचाल उत्साहाने सुरू झाली. तांत्रिक दृष्ट्या आजच्यासारखी सफाई त्या चित्रपटांत नव्हती परंतु उत्तम कथा व नाट्यपूर्ण प्रसंग मात्र त्यांत भरपूर असत.

दिग्दर्शक देवकी बोस यांनी चंडीदास  या चित्रपटात पार्श्वसंगीताचे महत्त्व प्रथम सिद्ध केले. नादियाची प्रमुख भूमिका असलेले वाडिया मुव्हिटोनचे हाणामारी व चित्तथरारक प्रसंगांची रेलचेल असलेले देमार बोलपट त्या काळी सामान्य प्रेक्षकांना फार आवडत. बोलपट लोकप्रिय व्हावयाला या प्रकारच्या चित्रपटांनी निश्चितच हातभार लावला आहे.

प्रभात फिल्म कंपनीचा अमृतमंथन (१९३४) या चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक  ⇨ व्ही. शांताराम  यांनी चलत्‌चित्रपटांच्या साधनांचा सुजाणपणे उपयोग करून नाटक व चित्रपट या दोन माध्यमांतील भेद प्रथमच स्पष्ट करून दाखविला.

त्या काळी प्रभात फिल्म कंपनी आणि न्यू थिएटर्स या दोन संस्था भारदस्त व कलात्मक चित्रपट काढीत, तर रणजित मुव्हिटोन व वाडिया मुव्हिटोन हलकेफुलके पण मनोरंजक चित्रपट सादर करीत असत. नटनट्या किंवा इतर गोष्टींपेक्षा चित्रपटनिर्मितिसंस्था, कथानक, त्यांतील नाट्यपूर्णता इत्यादींकडे प्रेक्षक अधिक आकर्षिले जात. चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी तालीम घेण्याची प्रथा त्यावेळी होती. तालमीला किंवा चित्रीकरणाच्या वेळी उशिरा येणाऱ्या कलावंताची गय केली जात नसे. ही चूक त्यांनी पुनःपुन्हा केली, तर त्यांना कामालाही मुकावे लागे. सर्व कलावंत हे त्यावेळी संस्थेचे पूर्णवेळ नोकर असत. त्या काळात चित्रपट बरेच आठवडे चालला किंवा साफ पडला या दोन्ही एकांतिक गोष्टी सहसा घडत नसत. दोन आठवडे जरी चित्रपट चालला, तरी निर्मात्याला थोडाफार आर्थिक लाभ होतच असे. १९३६ ते १९४२ हा सहा वर्षांचा काळ चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण प्रगतीचा काळ होता. या काळात काही उत्तमोत्तम चित्रपट निर्माण झाले आणि त्यांद्वारे काही चित्रपटसंस्थांनी प्रतिष्ठा मिळविली. उदा., (१) प्रभात फिल्म कंपनी लि., पुणे : अमरज्योती (१९३६), संत तुकाराम (१९३६), दुनिया न माने (१९३७), गोपाळकृष्ण (१९३८), आदमी (१९३९), संत ज्ञानेश्वर (१९४०), व पडोसी (१९४१)  (२) न्यू थिएटर्स लि., कलकत्ता : विद्यापति (१९३७), प्रेसिडेंट (१९३७), मुक्ति (१९३७), स्ट्रीट सिंगर (१९३८), अधिकार (१९३८), जिंदगी (१९४०), डॉक्टर (१९४१), लगन (१९४१), सौगंध (१९४२)  (३) बाँम्बे टॉकीज लि., मुंबई : अछूत कन्या (१९३६), कंगन (१९३९), पुनर्मीलन (१९४०), बंधन (१९४०), झूला (१९४१), बसंत (१९४२)  (४) रणजित मुव्हिटोन, मुंबई : अछूत (१९४०)  (५) नॅशनल स्टुडिओज लि., मुंबई : औरत (१९४०)  (६) मिनर्व्हा मुव्हिटोन, मुबंई : पुकार (१९३९), सिकंदर (१९४१)  (७) प्रकाश पिक्चर्स, मुंबई : नरसी भगत (१९४०), भरत मिलाप (१९४२)  (८) पांचोली आर्ट पिक्चर्स, लाहोर : खजांची (१९४१), खानदान (१९४२).

'प्रेसिडेंट', १९३७.अमेरिकेतील तंत्रज्ञ-कलावंतांनी प्रभातच्या दुनिया न माने, संत ज्ञानेश्वर  व आदमी  या चित्रपटांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. प्रभात फिल्म कंपनी व न्यू थिएटर्स आपल्या कथाप्रधान चित्रपटांचा दर्जा सांभाळून होते. अभिरुचिसंपन्न चित्रपट काढणाऱ्या संस्था असा त्यांचा त्या काळी लौकिक होता. बाँबे टॉकीजचा भर हलक्याफुलक्या चित्रपटांवर होता व मिनर्व्हा मुव्हिटोनने भव्य ऐतिहासिक चित्रपटांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. प्रभात फिल्म कंपनी व प्रकाश पिक्चर्स यांच्या यशात पौराणिक चित्रपटांचाच मुख्य वाटा होता. बाँबे टॉकीजच्या देविकारानीने त्या वेळी नटनटीवर्गाला प्रतिष्ठित स्थान प्राप्त करून दिले होते तर मुमताज अल्ली यांनी झूला (१९४१) व बसंत (१९४२) या चित्रपटांतून प्रवर्तित केलेला सर्वसामान्यांना आवडेल व समजेल असा नवा नृत्यप्रकार लोकप्रिय होण्यास प्रारंभ झाला होता. १९३३ साली प्रभात फिल्म कंपनीने सैरंध्री  हा भारतातील पहिला रंगीत बोलपट सादर करण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्यासाठी तो जर्मनीत न्यावा लागला होता पण तेथे नेऊनही रंगसंगती समाधानकारक झाली नाही. त्या दृष्टीने पाहता पहिला यशस्वी भारतीय रंगीत बोलपट किसान कन्या  हा १९३७ साली अर्देशिर इराणी यांच्या इंपीरिअल फिल्म कंपनीने निर्माण केला. किसान कन्याचे दिग्दर्शक मोती बी. गिडवानी होते. पद्मादेवी, झिल्लुभाई, गुलाम महंमद व निस्सार यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. हा चित्रपट आर्थिक दृष्ट्या अयशस्वी झाला खरा परंतु भारतीय चित्रपटसृष्टीचा तो एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मानला जातो. मात्र पुढल्याच वर्षी काढलेला याच संस्थेचा दादा गुंजाळदिग्दर्शित मदर इंडिया  यशस्वी ठरला. तथापि रंगीत चित्रपटाची निर्मिती परवडण्यासारखी नाही, ही एक गोष्ट निश्चित झाली व म्हणून रंगीत चित्रपटाची निर्मिती थांबली. डब्ल्यू. एम. खान यांनी आलमआरा  या चित्रपटाला संगीत दिले आणि त्यातील काही गाणी लोकप्रिय झाली, त्यामुळे चित्रपट यशस्वी होण्यास संगीत हे एक महत्वाचे अंग आहे, हे दिवसेंदिवस स्पष्ट होऊ लागले. न्यू थिएटर्सच्या ⇨ कुंदनलाल सैगल  यांच्या गाण्याने तर साऱ्या भारतालाच मोहिनी घातली होती. त्यांच्या गाण्यासाठी चित्रपटाला जाणारा प्रेक्षक वर्ग मोठा होता. बाँबे टॉकीज लि. व नॅशनल स्टुडिओज या दोन पब्लिक लि. संस्थांमुळे इतर धंद्यांतील भांडवलदार चित्रपटसृष्टीत पैसा गुंतवू लागले. या चित्रपटसंस्थांना आर्थिक दृष्ट्या यशस्वी झालेले चित्रपट निर्माण केल्याने धनिकांना चित्रपटसृष्टीत पैसा गुंतवायला हरकत नाही, असा विश्वास वाटू लागला पण पुढे या संस्थांच्या अपयशाने भांडवलदारांनी पुन्हा आपले हात आखडले. पांचोली आर्ट पिक्चर्स व प्रधान पिक्चर्स या लाहोरच्या चित्रपटसंस्था पंजाबमध्ये प्रमुख होत्या. पांचोली आर्ट पिक्चर्सच्या खजांची (१९४१) चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत पंजाबी ढंगाच्या, उडत्या चालीच्या संगीतयोजनेचा नवा जमाना सुरू केला. त्या वेळी खजांची  चित्रपटाची गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. चित्रपटसंगीताचा हा साज आजही लोकप्रिय आहे.


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चित्रपटसृष्टीला तडाखा बसला. कच्ची फिल्म व यंत्रसामग्री यांची आयात होणे कठीण झाले. १९४२ मध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली व सरकारला चित्रपटांवर काही निर्बंध घालणे आवश्यक ठरले. १९४२ च्या मार्चमध्ये कोणत्याही चित्रपटाची लांबी सु. तीन हजार मी. पेक्षा अधिक असता कामा नये, असा नियम करण्यात आला. १७ जुलै १९४३ ते १५ डिसेंबर १९४५ या काळात कच्च्या फिल्मचे वाटप सरकारी कक्षेत गेले. प्रत्येक निर्मात्याला कमीतकमी कच्ची फिल्म देण्याकडे सरकारी कल होता. दर तीन चित्रपटांत एक युद्धप्रचारपट काढलाच पाहिजे, अशी सक्ती करण्यात आली. नवीन निर्मात्यांना कच्ची फिल्म मिळणे कठीण होऊन बसले. फक्त १९४३ पूर्वीच्या चित्रपटनिर्मात्यांचाच कच्च्या फिल्मसाठी विचार केला जाई.

या काळात चित्रपटांचा धंदा मात्र वाढला. खेडोपाडी चित्रपट दाखविले जाऊ लागले. चलनफुगवटाही वाढला होता. त्यामुळे ज्यांना कच्च्या फिल्मचे परवाने होते, त्यांना खूप फायदा झाला. तथापि या साऱ्या प्रकारांनी चित्रपटांचा दर्जा मात्र घसरला. याच सुमारास चित्रपटगृहांचा तुटवडा भासू लागला. लहान लहान गावांतून जेथे चित्रपटगृह चालणे शक्य होते, तेथेही चित्रपटगृह बांधण्यास सरकार परवानगी देईना आणि काही चित्रपट आठवडेच्या आठवडे चित्रपटगृह अडवून बसू लागले. कलकत्त्याला बाँबे टॉकीजचा किस्मत दोन वर्षे चालला, तर मुंबईला राजकमलच्या शकुंतलाने दोन वर्षे एकच चित्रपटगृह अडवून ठेवले. या काळातील यशस्वी चित्रपट म्हणजे बाँबे टॉकीजचा किस्मत (१९४३) रणजितचा तानसेन (१९४३)  न्यू थिएटर्सचा काशिनाथ, वापस (१९४३), माय सिस्टर (१९४४) व हमराही (१९४५)  प्रकाशचा रामराज्य (१९४३) व विक्रमादित्य (१९४५)  राजकमलचा शकुंतला (१९४३) मिनर्व्हाचा पृथ्वीवल्लभ (१९४३)  जयंत देसाई प्रॉडक्शनचा सम्राट चंद्रगुप्त (१९४५)  प्रधान पिक्चर्सचा दासी (१९४४) आणि प्रभात फिल्म कंपनीचा रामशास्त्री (१९४४) हे होते.

युद्धसमाप्तीनंतर १९४५ च्या डिसेंबरमध्ये कच्च्या फिल्मवरील निर्बंध उठविण्यात आले. हिंदी चित्रपटनिर्मितीत वाढ होऊ लागली. कितीतरी नवीन निर्माते या क्षेत्रात उतरू लागले, तरी कच्ची फिल्म व इतर साहित्य यांची चणचण भासतच होती. नवीन निर्मात्यांपुढे नित्य नव्या अडचणी होत्याच, त्यातच जातीय दंगलींमुळे ठिकठिकाणी चित्रपट बंद करावे लागले आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ लागला. १९४६ साली हा परिणाम विशेष जाणवला. हातात पैसा खेळत असल्यामुळे खालचा वर्ग वाढत्या संख्येने चित्रपट पाहू लागला होता, त्यामुळे चित्रपटधंदा पुन्हा स्थिरावला. युद्धकाळात आणि नंतरही मजूरवर्ग हाच चित्रपटाचा मोठा आश्रयदाता बनला. त्यामानाने मध्यम वर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारली नाही. म्हणून खरा आश्रयदाता जो खालचा वर्ग त्याला आवडतील-रुचतील अशी चित्रपटनिर्मिती करण्याकडे निर्मात्यांचा कल होता. याच काळात नटनट्यांचे भाव वाढू लागले. त्यांच्या नावावर चित्रपट चालू लागले. एका कलावंताने एकाच वेळी किती चित्रपटांत काम करावयाचे याला काही धरबंध राहिला नाही. स्वतःच्या चित्रपटनिर्मितिगृहात चित्रपटनिर्मिती करणाऱ्यापेक्षा चित्रपटनिर्मितिगृह भाड्याने घेऊन चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढली. चित्रपटनिर्मितिगृहाचे संचालकच चित्रपटनिर्मितीगृह भाड्याने देऊ लागले. ती त्यांची एक उत्पन्नाची बाब झाली.

उसन्या आवाजाची म्हणजे पार्श्वगायनाची पद्धत याच काळात (१९३५) रूढ झाली होती. काही चित्रपटांची गाणी कित्येक दिवस अगोदर लोकप्रिय होऊ लागली, त्यामुळे चित्रपटाचा प्रचार होण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग होऊ लागला. परिणामतः चित्रपटातील गीतगायनासाठी पार्श्वगायकांच्या सोयी-सवडीने अगोदरच तारखा घेणे क्रमप्राप्त ठरले, १९४६ ते १९५५ या काळात जे उल्लेखनीय बोलपट निघाले, ते पुढीलप्रमाणे :

१९४६ : अनमोल घडी (मेहबूब प्रॉडक्शन्स), धरती के लाल (इंडियन पीपल थिएटर्स असोशिएशन), हम एक हैं (प्रभात फिल्म कंपनी), मीलन (बॉम्बे टॉकीज), नीचा नगर (इंडियन पिक्चर्स), शहाजहान (कारदार प्रॉडक्शन्स), डॉ. कोटनीस की अमर कहानी (राजकमल कलामंदिर). या पूर्वी धरती के लाल  या के. अब्बास यांच्या चित्रपटात सामाजिक वास्तवतेचा एक नवा पैलू दाखविण्यात आला होता. हा चित्रपट रशिया व इतर काही विदेशी राष्ट्रांत दाखविला गेला. डॉ. कोटनीस की अमर कहानी  ही तर एक सत्यकथाच होती. या चित्रपटाची इंग्रजी आवृत्तीही निघाली होती. कॅन येथील जागतिक चित्रपटमहोत्सवात नीचा नगरची प्रशंसा झाली होती.

१९४७ : भक्त ध्रुव (प्रकाश), मतवाला शायर (राजकमल कलामंदिर), मीरा (चंद्रप्रभा सिनेटोन), सिंदूर (फिल्मिस्तान लि.) यांपैकी मतवाला शायर  हा चित्रपट मराठीताल ख्यातनाम शाहीर राम जोशी यांच्या जीवनावर होता, तर मीरा या चित्रपटाला एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी यांनी उत्कृष्ट संगीत दिले होते. तो प्राग व व्हेनिस येथील जागतिक चित्रपटमहोत्सवात दाखविण्यात आला होता. सिंदूर हा उत्तम भावस्पर्शी सामाजिक चित्रपट असून सिने व्हाईस मोशन पिक्चर अवॉर्ड कमिटीचे त्या वर्षीचे पहिले पारितोषिक या चित्रपटाला मिळाले होते.

१९४८: आग (आर्. के. फिल्म), चंद्रलेखा (जेमिनी स्टुडिओज), गोपीनाथ (शांती लोकचित्र), गृहस्थी (आईना पिक्चर्स), मजबूर (बाँबे टॉकीज). यांपैकी आग  हा राजकपूर यांचा पहिला चित्रपट. चंद्रलेखा  या जेमिनीच्या अतिभव्य व प्रेक्षणीय हिंदी चित्रपटाने दाक्षिणात्य चित्रपटांना हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रवेशाचा मार्ग सोपा करून दिला होता. त्याच वर्षी जागतिक कीर्तीचे नृत्यकार उदय शंकर यांनी कल्पना  या आपल्या चित्रपटाद्वारे शास्त्रोक्त नृत्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला.

१९४९ : अंदाज  (मेहबूब प्रॉडक्शन्स), अपना देश (राजकमल कलामंदिर), बरसात (आर्. के. फिल्म), छोटा भाई (न्यू थिएटर्स), महल (बाँबे टॉकीज), सावन आया रे (हिंदुस्थान चित्र), स्वयंसिद्धा (इंडियन नॅशनल पिक्चर्स, कलकत्ता). याच वर्षात एम्. भवनानी यांनी अजित  या नावाने रंगीत चित्रपट सादर केला होता. त्याचे छायाचित्रण १६ एम्. एम्. कोडॅक्रोमवर करण्यात आले होते. अमेरिकेत ॲन्स्को पद्धतीने ३५ एम्. एम्. वर तो पुन्हा रूपांतरित केला होता.

१९५० : दहेज (राजकमल कलामंदिर), जोगन (रणजित मुव्हिटोन), मशाल (बाँबे टॉकीज).

१९५१ : आन (मेहबूब प्रॉडक्शन्स), आवारा (आर्. के. फिल्म), हमलोग (रणजित मुव्हिटोन), बहार (ए. व्ही. एम्. प्रॉडक्शन्स, मद्रास), दीदार (फिल्मकार लि.), संसार (जेमिनी प्रॉडक्शन्स). १६ एम्.एम्. वर चित्रीकरण करून त्याची ३५ एम्. एम्. वर टेक्निकलर प्रत तयार करण्यात आन  या रंगीत चित्रपटाला समाधानकारक यश लाभले. विशेष म्हणजे या चित्रपटाने मध्यपूर्व व अतिपूर्वेकडील देशांत लोकप्रियता मिळवून भारतीय चित्रपटांना तिकडची बाजारपेठ उपलब्ध करून दिली होती. तसेच या चित्रपटानेच भारतीय रंगीत चित्रपटांना परदेशी बाजारपेठही मिळवून दिली. याच वर्षी मोटवानी यांनी आंदोलन नावाचा चित्रपट तयार केला होता. त्यात मुख्यत्वे स्वातंत्र्य चळवळीची नोंद होती.

१९५२ : दाग (मार्स अँड मुव्हीज), माँ (बाँबे टॉकीज), मि. संपत (जेमिनी स्टुडिओ), विद्यासागर (एम्. पी.स्टुडिओ), यात्रिक (न्यू थिएटर्स) यांपैकी मि. संपत  हा राजकीय व सामाजिक ढोंगबाजीवर बोट ठेवणारा उत्तम चित्रपट होता, तर थोर शिक्षणतज्ञाचे जीवन विद्यासागर या चित्रपटात चित्रित केले होते.

१९५३ : अनारकली (फिल्मिस्तान), बाबला (एम्. पी. प्रॉडक्शन्स, कलकत्ता), दो बिघा जमीन (बिमल रॉय प्रॉडक्शन्स), झांसी की रानी (मिनर्व्हा मुव्हिटोन), मयूरपंख (साहू फिल्म्स लि.), परिणीता (अशोककुमार प्रॉडक्शन्स), राही (नया संसार चित्र). यांपैकी अनारकली  आर्थिक दृष्ट्या अतिशय फायदेशीर ठरला. या चित्रपटाच्या यशात त्यातील संगीत आणि नृत्ये यांचा फार मोठा वाटा होता. अजित  व आन  हे चित्रपट रंगीत असले, तरी त्यांचे चित्रण १६ एम्. एम्. वर झाले होते. म्हणून खऱ्या अर्थाने पहिला भारतीय टेक्निकलर चित्रपट झांसी की रानी  हाच ठरतो. दो बिघा जमीन, राही  हे वास्तववादी चित्रपट शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत होते. दो बिघा जमीनला कॅन येथील चित्रपटमहोत्सवात पारितोषिक मिळाले होते.

१९५४ : औलाद (कुलदीप पिक्चर्स लि.), बिराजबहू (हितेन चौधरी), मिर्झा गालीब  व वारीस (मिनर्व्हा मुव्हीटोन), नागीन (फिल्मिस्तान), बूटपॉलिश (आर्, के. फिल्म). १९५४ चा उत्कृष्ट चित्रपट म्हणून मिर्झा गालीब या चित्रपटाला राष्ट्रपतिसुवर्णपदक मिळाले होते. नागीन  हा चित्रपट त्यातील संगीतामुळे अत्यंत लोकप्रिय झाला होता.

१९५५ : आझाद (पक्षिराज प्रॉडक्शन्स), बंदिश (बासू चित्रमंदिर), देवदास (बिमल रॉय प्रॉडक्शन्स), इन्सानियत (जेमिनी प्रॉडक्शन्स), झनक झनक पायल बाजे (राजकमल कलामंदिर), कुंदन (मिनर्व्हा मुव्हिटोन), मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह (गुरूदत्त प्रॉडक्शन्स), श्री चारसो बीस (आर्. के फिल्म), उडन खटोला (सनी आर्ट प्रॉडक्शन्स), वचन (गोएल सिने कॉर्पोरेशन). कला, करमणूक व कलात्मक दृश्य मांडणी असलेल्या झनक झनक पायल बाजे  या चित्रपटाला १९५५ चे सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचे राष्ट्रपति-रौप्यपदक मिळाले होते.

बोलपटाच्या पहिल्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीकडे पाहिले, तर असे आढळून येते, की चित्रपटांची प्रगती आश्चर्यकारक झाली होती परंतु ती पूर्णत्वाला गेली नव्हती. इतर व्यवसायांप्रमाणे अर्थ हाच चित्रपटव्यवसायाचाही पाया आहे. प्रारंभीच्या काळात चित्रपट बोलतात, गातात याचे आकर्षण प्रेक्षकांना पुरेसे होते परंतु पुढे हा व्यवसाय रुळल्यावर विविध कलांचा वापर चित्रपटांसाठी जाणीवपूर्वक करता येतो व त्यामुळे अधिक कलात्मकता साधता येते, याची जाणीव निर्माण झाली. चित्रपटाच्या माध्यमाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नसून लोकजागृती, लोकशिक्षण यांसाठीही प्रभावीपणे करता येईल अशी जाणीव दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या चित्रपटनिर्मितीमध्येच दिसून येते. १९४२ पर्यंत चार प्रकारचे चित्रपट तयार झाले. (१) सामाजिक, (२) ऐतिहासिक, (३) पौराणिक व (४) देमार (स्टंट). १९४२ ते १९४५ या काळात चित्रपटाची निर्मितीच मंदावली होती. स्वातंत्र्यानंतर जादू, हाणामारी अशा प्रकारांना उत्तेजन देण्याकडे शासनाचाही कल नव्हता त्यामुळे मूकपटांच्या जमान्यात अतिशय लोकप्रिय असलेल्या देमार चित्रपटांची निर्मिती जवळजवळ थंडावलीच पण सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक या प्रकारांतील चित्रपट मात्र चालूच राहिले. जीवनाचे वास्तव चित्रण दाखविणारे बरेच सामाजिक बोलपट निघू लागले. तथापि हाणामारी, जादू, चित्तथरारक घटना इ. वेगळ्या प्रकारे कथानकातून घुसडण्यात येऊ लागले.

दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात चित्रपटनिर्मात्यांची संख्या वाढली व त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. पुष्कळसे अनभिज्ञ निर्मातेही त्यांत आले. चित्रपटनिर्मिती जोरात सुरू झाली, पण त्यांतील बहुतेक चित्रपट पडले. पांचोली आर्टस्‌चा खजांची  व फिल्मिस्तानचा शहनाई  या अत्यंत यशस्वी चित्रपटांची भ्रष्ट नक्कल कितीतरी निर्मात्यांनी करून शेवटी अपयश पदरात घेतले. बऱ्याच कालावधीनंतर मात्र हा नक्कल करण्याचा प्रयत्न शहाणपणाचा नाही, हे पुष्कळशा निर्मात्यांना कळून चुकले.

जेमिनीचा चंद्रलेखा  या १९४८ च्या चित्रपटाने एक वेगळाच साचा निर्माण करून अपूर्व यश मिळविले होते. नाट्यपूर्ण व चित्तथरारक प्रसंग, उत्कंठा वाढविणाऱ्या घटना, नृत्ये, गाणी, विनोद, भव्यता इ. त्यात होते. तेव्हापासून नेत्रदीपक निर्मिती व सर्वसामान्यांना आवडेल असे भडक कथानक निवडून दाक्षिणात्य चित्रपटनिर्माते हिंदी क्षेत्रात यशस्वी झाले. डोळ्यांना सुख देणारी निर्मिती व भरपूर मनोरंजन ही प्रेक्षकांची अपेक्षा जगातील सर्व चित्रपटांच्या बाबतीत वाढली. सिनेमास्कोपसारख्या चित्रपट-तंत्रात नवनव्या सुधारणा झाल्या, तरी प्रेक्षकांची अभिरुची कायम राहिली. समाजाचे वास्तव दर्शन असणाऱ्या चित्रपटांचीही मागणी तीच राहिली त्यामुळेच प्रेक्षकांची नाडी ओळखून तसे तंत्र व कला राबविणे आणि चित्रपट यशस्वी करून दाखविणे, यावर निर्मात्याचे यशापयश ठरू लागले.

मुंबईतच १९५५ च्या सुमारास २५ चित्रपटनिर्मितिगृहे व ११ रसायनशाळा होत्या. एका चित्रपटात काम करण्यासाठी मान्यतप्राप्त कलावंताची मागणी या वेळेपावेतो ४ लक्ष रुपयांपर्यंत गेली होती. १९३१ साली जेवढे बोलपट तयार झाले, त्यांपैकी ८०% चित्रपट हिंदी होते. १९४१ साली हिंदी चित्रपट ५०%, १९४७ साली ६४%, १९५१ साली ३८%, तर १९५५ साली ४४ %होते. ३० जून १९५६ म्हणजे पहिल्या २५ वर्षांत २,७१३ बोलपट तयार झाले. त्यांतील ५५·२५% हिंदी होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चित्रपटसृष्टीला व चित्रपटांना वेगळे वळण लागले. नवनवे धनिक निर्माते बनून या क्षेत्रात उतरले. १९४५ साली ९९ हिंदी चित्रपट तयार झाले, त्यांत फक्त १० नवे निर्माते होते, तर १९४८ साली १६४ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांतील १३९ नवीन निर्मात्यांचे होते पण १९५० साली २४१ चित्रपटांपैकी फक्त १२० नव्या निर्मात्यांचे होते. १९४९ साली भारत सरकारने जी चित्रपट चौकशी समिती नेमली होती, तिने आपल्या अहवालात असे म्हटले आहे, की १९४७, १९४८ व १९४९ या वर्षात अनुक्रमे १७७, १७८ व १८६ चित्रपटनिर्मात्यांनी फक्त एकेकच चित्रपट निर्माण केला होता. याचे कारण म्हणजे फार मोठ्या लाभाच्या आशेने चित्रपटसृष्टीत आलेले तथाकथित चित्रपटनिर्माते अपयशी ठरले, हे होते.

'दो ऑंखें बारह हाथ', १९५७. हिंदी चित्रपटसृष्टीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजे १९५६ साल परंतु या वर्षी निघालेले बहुतेक हिंदी चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना पसंत पडतील अशी कथागाणी व नृत्ये यांनी भरलेले होते. बी. आर्. चोपडा यांचा एक ही रास्ता, मोहन सैगल यांचा नई दिल्ली  हे दोनच चित्रपट ५५ हिंदी चित्रपटांत वैशिष्ट्यपूर्ण होते. पुढील वर्षी गुरुदत्त यांचा प्यासा, व्ही. शांताराम यांचा दो आंखे बारह हाथ, हृषीकेश मुकर्जी यांचा मुसाफिर  हे तीन उत्कृष्ट चित्रपट तयार झाले. प्यासा हा कलात्मक व दर्जेदार चित्रपट होता. त्यात गाणी होती व विनोदही होता परंतु त्याचा जरूरीपुरताच उपयोग करून घेतला. या भावपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांनी बरीच साथ दिली. तुरुंग सुधारणेसारख्या नव्या व सामाजिक महत्वाच्या विषयावरील व्ही. शांताराम यांच्या दो आंखे बारह हाथ  या चित्रपटाने १९५६ ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके संपादन केली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपतिसुवर्णपदकही या चित्रपटाला मिळाले होते.

हृषीकेश मुकर्जी यांचा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट मुसाफिर  हा असून त्यात त्यांनी आपले कसब दाखविले आहे. बी. आर्. चोपडा यांच्या नया दौर  या यशस्वी चित्रपटात मानव व यंत्र यांच्या संघर्षाची मनोरंजक कहाणी आहे, तर मद्रासचे एल्. बी. प्रसाद यांचा शारदा  हा चित्रपट एक शोकात्मिका आहे. हाही यशस्वी चित्रपट होता. मेहबूब यांच्या भव्य व भावनाप्रधान मदर इंडिया  या चित्रपटातील भूमिकेबद्दल नर्गिसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला होता (१९५७). हा चित्रपट अद्यापही भारतात व परदेशांतही खूपच चालतो. नौ दो ग्यारह, पेईंग गेस्ट, तुमसा नही देखा  यासारखे यशस्वी, पण रंजनप्रधान चित्रपटही त्यावर्षी निघाले. या चित्रपटांचा पगडा पुढे दहा वर्षे तरी प्रेक्षकांवर राहिला. याच वर्षी रशियाच्या सहकार्याने ख्वाजा अहमद अब्बास यांनी परदेशी चित्रपट सादर केला. त्यामुळे स्क्रसीस्कोप व रंग प्रथमच भारतीय पडद्यावर दिसले पण हा चित्रपट यशस्वी झाला नाही. १९५८ साल निराशजनकच होते. बी. आर्. चोपडा यांनी साधना  हा चित्रपट वेश्याजीवनावर सादर करण्याचा प्रयत्न केला परंतु या चित्रपटावर व्ही. शांताराम यांच्या वीस वर्षांपूर्वीच्या आदमीची छाप दिसून येते. सावक वाच्छा यांनी संगीत-मधुर यहूदी  हा भव्य चित्रपट काढला, त्याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते.

गुरुदत्त यांनी कागज के फूल   हा सिनेमास्कोपी चित्रपट १९५९ साली रुपेरी पडद्यावर प्रथम प्रकाशित करण्याचा मान मिळविला परंतु त्या चित्रपटाला आर्थिक यश मात्र मिळाले नाही. त्यामानाने व्ही. शांताराम यांचा नवरंग  हा रंगीत चित्रपट आर्थिक दृष्ट्या यशस्वी झाला. बिमल रॉय यांचा त्या वर्षाचा सुजाता  हा एक सुंदर चित्रपट होता. ख्वाजा अहमद अब्बास यांचा प्रायोगिक चित्रपट चार दिल चार राहें  व कृष्ण चोपडा यांचा हीरा मोती  चित्रपट तसेच बी. आर्. चोपडा यांचा धूल का फूल, गोयल यांचा चिराग कहाँ रोशनी कहाँ, जेमिनीचा पैगाम, हृषीकेश मुकर्जीदिग्दर्शित अनाडी  हे त्या वर्षीचे काही उल्लेखनीय चित्रपट परंतु फिल्मालयाचा दिल देके देखो  हा चित्रपट आर्थिक दृष्ट्या अत्यंत सफल ठरला. या चित्रपटाचे निर्माते होते शशिधर मुखर्जी व दिग्दर्शक नासिर हुसेन.

उल्लेखनीय असे फारच थोडे चित्रपट १९६० च्या दशकात निघाले. १९६० मध्ये के. आसिफ यांचा मुगले आझम  हा अतिभव्य चित्रपट निघाला. गॉन विद द विंड  या भव्य पाश्चिमात्य चित्रपटासारखा तो अत्यंत यशस्वी चित्रपट ठरला. हृषीकेश मुकर्जी यांचा अनुराधा  हा भावकोमल चित्रपट याच वर्षीचा (१९६०). या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णपदक मिळाले होते. बिमल रॉय यांचा परख  हा एक अगदी वेगळ्या धर्तीचा चित्रपट होता. दरोडेखोर डाकूंच्या जीवनावरी १९६१ सालचा गंगाजमना  व जिस देश मे गंगा बहती है  या चित्रपटांत अनुक्रमे दिलीपकुमार आणि राजकपूर या दोन श्रेष्ठ कलाकारांनी भूमिका केल्या होत्या परंतु सुबोध मुकर्जी यांच्या जंगली  या ईस्टमनकलर मनोरंजक चित्रपटाने अधिक आर्थिक यश मिळविले. बी. आर्. चोपडा यांचा कानून  हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. मात्र हृषीकेश मुकर्जी यांचा मेम दीदी, बिमल रॉयनिर्मित काबुलीवाला, व्ही. शांताराम यांचा स्त्री   हे चित्रपट कमी अधिक प्रमाणात अयशस्वीच ठरले. याच वर्षी पाकिस्तनने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली. त्याच्या भारतीय चित्रपटांच्या बंगाली बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम झाला.

गुरुदत्त यांचा साहिब बीबी और गुलाम  हा अगदी वेगळ्या धर्तीचा चित्रपट १९६२ साली निर्माण झाला. शोभना पिक्चर्सचा सूरत और सीरत, बी. आर्. चोपडा यांचा धर्मपुत्र, महेश कौल यांचा सौतेला भाई, बिमल रॉय यांचा प्रेमपत्र   आणि केदार शर्मा यांचा हमारी याद आयेगी  या चित्रपटांत काही वेगळे साधण्याचा प्रयत्न होता परंतु हेमंतकुमार यांचा बीस साल बाद  हा रहस्यमय चित्रपट त्यांच्यापेक्षा खूप यशस्वी झाला. त्याच वर्षी दारासिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कुस्तीगिराचे देमार चित्रपटांतून नायक म्हणून आगमन झाले. तशा पद्धतीचे चित्रपट आवडणारा प्रेक्षकवर्गही तयार होता.

चित्रपटसृष्टीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजे १९६३ साल. या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ख्वाजा अहमद यांच्या शहर और सपना  या चित्रपटाला राष्ट्रपतिसुवर्णपदक मिळाले. याखेरीज आणखी काही उत्कृष्ट चित्रपट या वर्षी निघाले. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका तेजस्वी स्त्रीची कहाणी बिमल रॉय यांच्या बंदिनीमध्ये होती तर चंबळखोऱ्यातील डाकूंचे वास्तव जीवन दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न मुझे जीने दो या चित्रपटात सुनील दत्त यांनी केला होता. त्यासाठी चंबळखोऱ्याच्या भूमीतच त्याचे चित्रण केले होते. गुमराहमध्ये बी. आर्. चोपडा यांनी एका प्रौढ व्यक्तीच्या अत्याधुनिक पत्नीच्या बेछूट वागण्यावर रहस्यमय कथा सादर केली होती तरीही चित्रपटाची पातळी उच्च राखली गेली होती. मद्रासचे निर्माते श्रीधर यांचे दिल एक मंदिर  तसेच एका सत्यघटनेवरील आधारित यह रास्ते है प्यारके  हे दोन सुवर्णमहोत्सवी चित्रपट ठरले.

'हकीकत', १९६४. राजकपूर यांचा १९६४ सालचा संगम आर्थिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी झाला असला, तरी नेहमीच्या प्रेमाच्या त्रिकोणाची एक साचेबंद कथाच त्यात होती. याउलट चेतन आनंद यांनी भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हकीकत  हा पहिला व चांगला युद्धचित्रपट सादर केला तर निर्माते ताराचंद बरजात्या यांनी एका लंगड्याच्या व एका आंधळ्याच्या अतूट दोस्तीची हृदयस्पर्शी कहाणी दोस्तीमध्ये चित्रित केली होती. आर्थिक दृष्ट्या दोन्ही चित्रपट यशस्वी झाले. सुनील दत्त यांनी एकच कलाकार (स्वतः) व एकच रंगमंच यांवर यादें   चित्रपट निर्माण केला. हा प्रयोग अभिनव होता. अखिल चित्रपटसृष्टीत तो अद्यापही अजोड आहे पण त्याला आर्थिक अपयश पत्करावे लागले.

ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेता मोतीलाल हा १९६५ साली दिग्दर्शक बनला. नट म्हणून तीस पस्तीस वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी होता तरी तो दिग्दर्शक म्हणून अपयशी ठरला. त्याच्या छोटी छोटी बाते  हा चित्रपट साफ पडला. एका प्रसिद्ध तमिळ नाटकावरील ऊंचे लोग   हा फणी मजुमदारदिग्दर्शित चांगला चित्रपट होता. केवळ कश्यप यांचा शहीद भगतसिंगांवरील शहीद  हा चित्रपट निश्चित स्फूर्तिदायक होता परंतु त्या वर्षी गाजला तो आर्. के. नारायण यांच्या प्रसिद्ध कादंबरीवरील चित्रपट गाईड. याचे दिग्दर्शक होते विजय आनंद. या चित्रपटाची इंग्रजी आवृत्तीही काढण्यात आली होती. हिंदी आवृत्तीत भरपूर गाणी व नृत्ये होती. शेवटी शेवटी हा चित्रपट भलतीकडेच वाहत जातो, तरी या चित्रपटाला मोठे आर्थिक यश मिळाले. शिकागो येथील चित्रपट महोत्सवात त्याची नायिका वहिदा रहेमान हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते. त्यापुढील वर्षी कवी शैलेंद्रनिर्मित तीसरी कसम  या चित्रपटाला राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त झाले. शंकर-जयकिशन यांनी लोकसंगीताचा सुरेख वापर या चित्रपटात केला होता. दिग्दर्शक बासु भट्टाचार्य यांनी हा चित्रपट कल्पकतेने हाताळला परंतु दुर्दैव असे, की शैलेंद्र यांच्या मृत्युनंतर या चित्रपटाला राष्ट्रपतिसुवर्णपदक मिळाले व त्यानंतरच हा चित्रपट खरा चालला. हृषीकेश मुकर्जी यांचा अनुपमा, कृष्ण चोपडा यांचा गबन  व चेतन आनंद यांचा आखिरी खत  हे त्या वर्षी उल्लेखनीय चित्रपट. आखिरी खतमध्ये राजेश खन्नाचे प्रथम दर्शन प्रेक्षकांना घडले. १९६७ साली तर नाव घेण्यासारखा एकही चित्रपट निघाला नाही. हृषीकेश मुकर्जीचा मझली दीदी  व मनोजकुमारचा उपकार  हे त्यातल्या त्यात बरे होते. रात और दिन  या चित्रपटात अभिनयकुशल अभिनेत्री नर्गिसने प्रभावी भूमिका करून राष्ट्रीय पुरस्कार संपादन केला. त्यामानाने १९३८ साली हृषीकेश मुकर्जीचा आशिर्वाद, गोविंद सरैयांचा सरस्वतीचंद्र  व असित सेन यांचा अनोखी रात  हे चित्रपट उत्तम होते.

काही उत्तम चित्रपट १९६९ सालात प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांनी हिंदी भाषेत सादर केलेला भुवन शोम  हा चित्रपट यावर्षी चांगलाच यशस्वी झाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपतिसुवर्णपदक व व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवातील सुवर्णपदकही याच चित्रपटाला मिळाले. सरळ, साधेसुधे, अगदी कमी खर्चातील, नामवंत कलाकारविरहित, संपूर्ण चित्रपटाचे बहिर्गृह चित्रण झालेले, असा हा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट होता. अशा प्रकारचा, पण दमदार कथानकाचा चित्रपटही चालू शकतो, हे या चित्रपटाने दाखविले. हृषीकेश मुकर्जी यांच्या सत्यकाम  चित्रपटात एका आदर्शवादी आणि सत्यवादी एंजिनिअरची आगळी कथा चित्रित केली आहे. असित सेन यांचा खामोशी  हा असाच एक उत्कृष्ट चित्रपट होता. ख्वाजा अहमद अब्बास यांचा सात हिन्दुस्तानी, वसंत जोगळेकरांचा प्रार्थना, तरुण मुजुमदार यांचा राहगीर, बी. आर्. चोपडा यांचा इत्तफाक, बासु चॅटर्जी यांचा सारा आकाश  या चित्रपटांत काही तरी आगळेवेगळे साधण्याचा प्रयत्न होता.

निर्माता-दिग्दर्शक आय्. एम्. कुन्नू व लेखक-दिग्दर्शक बी. आर्. इशारा यांनी चित्रपटनिर्मितिगृहाबाहेर अगदी अल्पावधीत कॉलगर्ल  या चटकदार विषयावर चेतनासारखा सादर केलेला चित्रपट आर्थिक दृष्ट्या खूपच यशस्वी झाला याचे कारण म्हणजे या चित्रपटाला दिले गेलेले ‘फक्त प्रौढांसाठी’हे प्रशस्तीपत्र, हे होय. त्यामुळेच यानंतर चित्रपटाने धंदा करावा म्हणून भडक व उत्तान चित्रपटावर भर दिला जाऊ लागला. १९७२ चा जरूरत  हा चित्रपट त्याचा नमुना होय.

हृषीकेश मुकर्जी यांचा १९७१ चा आनंद  हा चित्रपट संपूर्णतः वास्तववादी नसूनही मजबूत पटकथा व कल्पक दिग्दर्शन तसेच राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांचा उत्कृष्ट अभिनय यांमुळे तो चांगलाच यशस्वी झाला. त्याच्या अगोदरच्या वर्षीचा राजकपूर यांचा मेरा नाम जोकर  हा भव्य रंगीत चित्रपट मात्र साफ पडला, अशा चित्रपटनिर्मितीच्या गर्दीत बासु भट्टाचार्य यांचा अनुभव, कमलेश्वर यांच्या कथेवरील शिवेंद्र सिन्हा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिर भी, प्रेम कपूरचा बदनाम बस्ती, मणी कौल यांचा उसकी रोटी, विजय आनंद यांचा तेरे मेरे सपने, सुनील दत्त रेश्मा और शेरा, हृषिकेश मुकर्जी यांचा गुड्डी, किशोरकुमार यांचा दूर का राही, कमाल अमरोही यांचा पाकीजा, ख्वाजा अहमज अब्बास यांचा दो बूंद पानी, हे चित्रपट त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसले.

१९७१ नंतरच्या तीनचार वर्षांच्या काळातील यशस्वी चित्रपट म्हणून बॉबी, जंजीर, जुगनू, व्हिक्टोरिया नं. २०३, सीता और गीता, अमीर-गरीब, दोस्त, रोटी कपडा और मकान, दीवार,  इ. चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटांच्या यशस्वीतेचे रहस्य त्यांनी वापरलेल्या सामान्य प्रेक्षकांना आवडणाऱ्या गोष्टींचे वेगवेगळे तंत्र हे आहे. वेगळ्या चाकोरीतील असूनही अनुराग, अमर प्रेम, नमकहराम, आपकी कसम, कोरा कागज, जीवन संग्राम  इ. चित्रपटदेखील यशस्वी झाले. तसेच पुष्कळसे चाकोरीबाहेर असलेले बावर्ची, कोशिश, परिचय, अभिमान, प्रभात, सगीना, वह मैं नहीं, आंधी, हे देखील यशस्वी चित्रपट होत परंतु उल्लेखनीय असे दरार, अनोखा दान, अचानक, नया नशा, सौदागर, हे चित्रपट तितकेसे यशस्वी झाले नाहीत. रजनीगंधा, अंकुर, गर्म हवा  हे चित्रपट आर्थिक दृष्ट्या फारसे यशस्वी झाले नसले, तरी दर्जेदार होते. हृषीकेश मुकर्जी, बासु भट्टाचार्य, बासु चॅटर्जी, गुलजार यांचे चित्रपट आर्थिक दृष्ट्या यशस्वी होतात, याचे कारण म्हणजे आपल्या चित्रपटांतून वेळोवेळी काहीतरी वेगळे देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, हे आहे. आंधीमध्ये निवडणुका व राजकारण, गर्म हवा  व जूलीमध्ये अल्पसंख्याकांच्या समस्या, सगीनामध्ये ट्रेड युनियनचे राजकारण, आविष्कार, परिचय, कोरा कागज, आपकी कसममध्ये वैवाहिक जीवनातील प्रश्न, अंकुरमध्ये जमीनदाराची आपमतलबी अरेरावी वृत्ती, प्रभातमध्ये जबरदस्तीच्या वेश्याजीवनाचा प्रश्न, नमकहराममध्ये मालक-मजूर संघर्ष, नया नशामध्ये मादक पदार्थांच्या व्यसनाची समस्या यांसारखे भिन्नभिन्न विषय हाताळलेले आहेत.

हिंदी बोलपटनिर्मितीला १९७५ साली ४४ वर्षे झाली. गेल्या सु. पावणेचार तपांच्या हिंदी चित्रपटांच्या वाटचालीचे सिंहावलोकन केले तर असे दिसते, की भारतात १९३१ साली २८ बोलपट निघाले त्यांपैकी २३ हिंदी होते, ३ बंगाली व एकेक तमिळ-तेलुगू होता. या २३ हिंदी चित्रपटांपैकी १६ हिंदी चित्रपट मुंबईला व ७ कलकत्त्याला निघाले होते. तेव्हापासून मुंबई हे हिंदी चित्रपटाचे केंद्रस्थान ठरले. त्यामुळे मुंबईच्या मानाने अन्य कोणत्याही हिंदी भाषिक राज्यात नाव घेण्यासारखी हिंदी चित्रपटनिर्मिती झालीच नाही. बंगालमध्येच मात्र थोडीफार हिंदी चित्रपटनिर्मिती झाली. १९४८ पासून मद्रासमध्ये हिंदी चित्रपट तयार होऊ लागले परंतु त्यांची संख्या अगदी अल्प होती. त्या वर्षी दोन हिंदी चित्रपट दक्षिणेतून आले. पुढे १९५१ ते १९५५ या पाच वर्षांत अनुक्रमे २, २, ३, ३, ४ एवढेच हिंदी चित्रपट मद्रास मध्ये निर्माण झाले. पुढेपुढे कलकत्त्यात हिंदी चित्रपटांचे प्रमाण कमी झाले. १९७४ साली भारतात एकूण १३२ हिंदी चित्रपट निघाले. त्यांत मद्रासमधील २० होते आणि ११० मुंबईत निर्माण झाले होते. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्माण करणारे निर्माते, दिग्दर्शक, नट, नट्या, लेखक, कवी व तंत्रज्ञ यांपैकी बरेचसे अन्य राज्यांतून येऊन मुंबईत स्थायिक झाले आहेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत चित्रपटनिर्माते किंवा दिग्दर्शक परिश्रम घेऊन आपल्या इच्छेनुसार चित्रपट काढीत असत. दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती पालटत चालली. साधनसाम्रगी महाग होऊ लागली. कच्ची फिल्म दुर्मिळ झाली. निर्मितिखर्चही वाढू लागला परंतु याच वेळी देशातील बेकारी कमी होत होती, सामान्य माणसांच्या हातात पैसा खेळत होता. नित्य जीवनाला लागणाऱ्या वस्तू मिळणे कठीण झाले होते. दैनंदिन जीवन बिकट व कष्टप्रद वाटत होते. म्हणून रोजची विवंचना घटकाभर तरी विसरता यावी यासाठी त्यांना मनोरंजनाची आवश्यकता वाटू लागली. ती त्यांची गरज चित्रपटांनी विशेषतः हिंदी चित्रपटांनी पुरी केली. त्यामुळे हिंदी चित्रपटाला गर्दी करणारा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. त्यात मध्यमवर्गापेक्षा खालच्या वर्गाचे प्रमाण अधिक होते. अर्थातच चित्रपटाकडून त्यांना करमणुकीशिवाय दुसरी अपेक्षा नव्हती. डोळ्यांना, कानांना सुख देणारी तांत्रिक सफाई, हलकेफुलके संगीत, नेत्राकर्षक नृत्ये, मोहक चेहरे, ढोबळ कथानक, एवढ्या स्वप्नरंजन करणाऱ्या गोष्टी त्याला पुरेशा वाटू लागल्या त्यामुळे भडक व रंजक चित्रपट यशस्वी होऊ लागले.

महायुद्धकाळातच चित्रपटनिर्मितीसाठी चित्रपटनिर्मितिगृहे भाड्याने देण्याची प्रथा सुरू झाली. बडे भांडवलदार चित्रपटाची काहीही माहिती नसताना चित्रपटनिर्माते बनले. त्यांच्या इच्छेप्रमाणे चित्रपट तयार करून देणारेही लोक होतेच. नटनट्यांच्या नावावर चित्रपट चालू लागले, त्यामुळे त्यांच्या आर्थिक अपेक्षाही खूपच वाढू लागल्या. अगदी चार आकड्यापर्यंत त्या पोहोचल्या. तसेच एखाददुसरा चित्रपट निर्माण करून चित्रपटसंस्थाही बंद पडू लागल्या. काही निर्माते पैसा व नाव मिळेल या आशेने या व्यवसायाकडे वळले पण अशा कित्येक निर्मात्यांना जबर आर्थिक फटका बसून ते नामशेष झाले. तथापि दुसरे येत राहिले. त्यामुळे हे चक्र फिरतच आहे. वितरकही भांडवलदार बनले आणि चित्रपट विकला जाण्याच्या किंवा चालण्याच्या दृष्टीने ते सांगतील ते कलावंत वा संगीत दिग्दर्शक घेणे क्रमप्राप्त ठरले. निर्मात्यांच्या सांगण्याप्रमाणे नटनट्या, कथानक, नृत्य, गीते इ. गोष्टी दिग्दर्शकाला योजाव्या लागल्या. परिणामतः चित्रपटाचा दर्जा घसरू लागला. तथापि काही चाकोरीबाहेरील व प्रायोगिक चित्रपट तयार होत राहिले.

उसना आवाज घेण्याची प्रथा ३० वर्षांपूर्वीच रूढ झाली व त्यात एकाहून एक सरस पार्श्वगायकांनी आपले स्थान निर्माण केले. हिंदी चित्रपटाचे संगीत हे एक खास आकर्षण झालेले आहे. चित्रपटप्रसिद्धी पूर्वी व नंतर आकाशवाणीवर वाजविली जाणारी काही गीते लोकप्रिय होतात. आपल्या आवडत्या नटनट्यांना ती गाणी पडद्यावर गाताना पाहण्यास एक मोठा वर्ग नेहमी उत्सुक असतो व त्यासाठी चित्रपटाला गर्दी होते. लता मंगेशकर, महंमद रफी, आशा भोसले, किशोरकुमार यांसारख्या पार्श्वगायकांना अग्रगण्य कलाकारांसारखी मागणी आहे. निर्माते शक्य तो त्यांचा उसना आवाज आपल्या चित्रपटाला मिळावा म्हणून त्यांच्याकडे धाव घेत असतात. त्यामुळे मोठमोठे अभिनेते व चित्रपटसंगीत यांसाठी हिंदी चित्रपटांचा अधिक पैसा खर्च होतो.

एस्. एस्. वासन यांनी १९४८ साली चंद्रलेखा  या चित्रपटापासून नेत्रदीपक दृश्ये व भव्यता ही हिंदी चित्रपटांची आकर्षणे प्रस्थापित केली. तेव्हापासून सर्वसाधारण हिंदी चित्रटात नामवंत कलाकार, लोकप्रिय होण्यासारखे संगीत, त्याचबरोबर नृत्ये, भव्यता आणि भपका यांचाही वापर केला जातो. त्यामुळे देशातील बहुतेक भागांत हिंदी चित्रपटांनी आपला पगडा बसविला आहे. गेल्या दहा वर्षांत रंगीत हिंदी चित्रपटांची संख्या वाढू लागल्याने हिंदी चित्रपटाचे ते एक खास आकर्षण झाले. बहुतेक हिंदी चित्रपटांचा हा साचा ठरून गेलेला आहे.

चित्रपट यशस्वी होण्यासाठी निर्माते व वितरक यांची धडपड चालूच असते. एखादा चित्रपट गाजला, की तशा प्रकारच्या चित्रपटांची लाटच उसळते. तसेच गाजलेल्या चित्रपटातील कलावंताला घेऊन त्यांच्या यशस्वी भूमिकेसारखी कामे त्याला सतत दिली जातात. परिणामतः पुढे प्रेक्षकांना आणि स्वतः कलावंतालाही त्याचा उबग येऊ लागतो. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये भव्य देखाव्यांचे, कौटुंबिक, गुन्हेगारीवर आधारित लैंगिकता व हिंसाचार यांचा प्रभाव असलेले सामाजिक समस्याप्रधान व संगीतप्रधान अशा वेगवेगळ्या वर्गांतील चित्रपटांची निर्मिती आढळून येते.

भारी भांडवलाचा चित्रपट असेल, तर त्यात धोकाही अधिक असल्याने हिंदी चित्रपटनिर्माता एकतर कौटुंबिक चित्रपटाकडे वळतो, किंवा गुन्हेगारी वा उत्तान शृंगारिक चित्रपटाचा तो आश्रय घेतो. अशा चित्रपटांवर पाश्चिमात्य चित्रपटांची छाप असते. युवकवर्ग व कामगारवर्ग या चित्रपटांकडे आकर्षित होतील अशी निर्मात्याची अपेक्षा असते.

हिंदी चित्रपटातील खलनायक हा प्रथमपासून प्रेक्षकपरिचितच असतो. पूर्वीचा खलनायक हा भांडणे लावणारा, गरिबांना आणि अगतिकांना छळणारा असे परंतु अलीकडे वीस वर्षांतील खलनायक खून, बेकायदा दारूविक्री (पाच दुष्मन) पासून शत्रुसाठी हेरगिरी करणाराही आढळतो (आंखे). मग पाठलाग, मोटार व विमानांचे अपघात, वेश्या आणि नर्तिकागृहे, कुटिल कारस्थान, हाणामाऱ्या, अर्धनग्न नर्तिका व कॅबरे, गुंडांचे अड्डे इत्यादींची वापर अनेक हिंदी गुन्हेगारी चित्रपटांतून केला जातो. हिंदी चित्रपटात गुंतवलेले मोठे भांडवल वसूल करण्यासाठी पुष्कळ निर्माते उत्तान शृंगारिक चित्रपट सादर करतात. भडक पोशाख, नृत्यातील उत्तेजक हालचाली, द्वयर्थी वाक्ये, जे दृश्य स्वरूपात दाखवायला मिळणार नाही ते गीतातील वर्णनातूनच व काही विशिष्ट ध्वनींमधून व्यक्त करणे, हे प्रकार नेहमीच चालतात. कितीतरी शृंगारिक हिंदी बोलपट निघाले, पण त्यांतील कलात्मक असे चित्रपट फारच अल्प होते. इव्हिनिंग इन पॅरिस  तसेच दो राह  या चित्रपटांतील बलात्कार व अतिरेकी शारीरिक जवळीक या गोष्टी भडकच म्हणाव्या लागतील.

हेतुप्रधान चित्रपटांत मात्र वरील प्रकारच्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न असतो. कारण अशा चित्रपटांत काही तरी सांगण्याचा उद्देश असतो. काही गुन्हेगारी व प्रणयप्रधान चित्रपटांत काही तरी सांगण्याचा उद्देश असतो. काही गुन्हेगारी व प्रणयप्रधान चित्रपटांतही नैतिक मूल्यांची तरफदारी केलेली आढळते, तर काही चित्रपटांत दरोडेखोर हाही नायक दाखविला गेला आहे. गंगाजमना, जिस देशमे. गंगा बहती है, मुझे जीने दो अशांसारख्या काही हिंदी चित्रपटांत इतर गोष्टींबरोबरच सावकारी, जमीनदारी यांच्या अन्यायी अत्याचारी कृत्यांचे दुष्परिणाम दाखविले आहेत.

बिमल रॉय, व्ही. शांताराम, के. अब्बास, हृषीकेश मुकर्जी, गुरुदत्त, गुलजार, बासु भट्टाचार्य, बासु चॅटर्जी व श्याम बेनेगल यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी हेतुप्रधान चित्रपट यशस्वी करून दाखविले आहेत. त्यांच्या चित्रपटांत काही तरी सामाजिक संदेश तर आहेच, शिवाय अस्पृश्यता, जातिभेद, आर्थिक शोषण अथवा तत्सम सामाजिक समस्या यांचेही दर्शन त्यांतून होते. चीन व पाकिस्तान यांनी केलेल्या आक्रमणांमुळे पुष्कळ हिंदी युद्धपट तयार झाले.

तांत्रिक सफाई, नेत्रदीपक देखावे, अभिनय व रासायनिक प्रक्रिया या सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटांनी प्रगती केली आहे. या दृष्टीने हिंदी चित्रपट प्रगत परदेशी चित्रपटांच्या तोडीचे असतात. १९३१ ते १९७४ अखेरच्या ४३ वर्षांत एकूण ११,२७२ बोलपट तयार झाले. त्यांतील जवळजवळ ४,६९६ म्हणजे ४५% हिंदी बोलपट होते. ज्या १०५ देशांत भारतीय चित्रपट दाखविले जातात, त्यांतील ९९ टक्के बोलपट हिंदी असतात. त्याद्वारे भारताला ५ कोटींचे परकीय चलन प्राप्त होते.

बंगाली चित्रपट : बंगालच्या हीरालाल सेन यांनी रॉयल बायोस्कोप कंपनीतर्फे सात बंगाली नाटकांतील काही प्रवेशांचे चित्रीकरण करून ते १९०१ च्या फेब्रुवारीत सार्वजनिक ठिकाणी दाखविले. बंगाली चित्रपटसृष्टीचा प्रारंभ अशा प्रकारे झाला असला, तरी जे. एफ्. मादन यांच्या एल्‌फिन्स्टन बायोस्कोप कंपनीने तयार केलेला नलदमयंती  हाच पूर्ण लांबीचा पहिला बंगाली मूकपट होय. हा मूकपट १९१७ मध्ये प्रदर्शित झाला असून त्यासाठी इटालियन कलावंत-तंत्रज्ञांचे सहकार्य घेण्यात आले होते. कलावंत म्हणून मनेली पतिपत्नी हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकांत होते.

बंगाली चित्रपटासृष्टीचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने जे. एफ्. मादन यांचाच उल्लेख करावा लागेल. उर्दू नाट्य व रंगभूमी यांत मुरब्बी असलेल्या या कलावंताने १९०७ साली चित्रपटप्रदर्शनाला प्रारंभ केला होता. १९२९ साली एल्‌फिन्स्टन पिक्चर पॅलेस हे भारतातील पहिले बोलपटगृह त्यांनी कलकत्त्यात उभारले. पुढे शंभराहून अधिक चित्रपटगृहांचे ते संचालक झाले. बंगालमधील लोकप्रिय साहित्यकृतींवर आधारलेल्या सामाजिक चित्रपटनिर्मितीस त्यांनीच सुरुवात केली. एकूण चित्रपट वितरण, चित्रपटप्रदर्शन व चित्रपटनिर्मितीत त्यांनी फार मोठी कामगिरी केली.

बंगालमध्ये धीरेन गांगुली यांनी १९२१ मध्ये इंग्लंड रिटर्न्ड  हा पहिला सामाजिक मूकपट तयार केला. त्यानंतर १९२४ साली मादन थिएटर्सने रोमच्या यू. सी. इटालिना या चित्रपटसंस्थेच्या सहकार्याने सावित्री  हा मूकपट सादर केला. मादन थिएटर्सच्याच कपालकुंडला  या मूकपटाने भारतात रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा पहिला मान १९२९ साली मिळविला होता. इंपीरिअल फिल्म कंपनीच्या आलमआरा  या हिंदी चित्रपटाचा पहिला भारतीय बोलपट म्हणून मान असला तरी त्याच वेळी कलकत्त्याच्या मादन थिएटर्सने काही शास्त्रीय गाणी, काही नाट्यप्रवेश ध्वनिमुद्रित करण्यात यश मिळविले होतेच. तसे पाहिले तर मुंबईची इंपीरिअल फिल्म कंपनी व कलकत्त्याची मादन थिएटर्स या संस्थांनी बोलपटनिर्मितीस जवळजवळ एकाच वेळी प्रारंभ केला होता परंतु इंपीरिअल फिल्म कंपनीचा आलमआरा  हा थोडा अगोदर प्रदर्शित झाला (१४ मार्च १९३१) व पुढे त्याच महिन्याच्या शेवटी मादन थिएटर्सचा पहिला बंगाली बोलपट जामाई षष्ठी  व लगेच जोरे भारत  हे बोलपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनीच बंगाली बोलपटांचा जमाना सुरू झाला. पुढे १९३० साली स्थापन झालेल्या बी. एन्. सरकार यांच्या न्यू थिएटर्सचा देना पवना  प्रदर्शित झाला. याच न्यू थिएटर्सने पुढे कितीतरी दर्जेदार बंगाली व हिंदी बोलपट सादर केले. बी. एन्. सरकार यांनी एकट्याच्या हिंमतीवर १९५६ पर्यंत म्हणजे सव्वीस वर्षे एक चित्रपटसंस्था यशस्वीपणे चालवून दाखविली होती.

प्रारंभीच्या काळात चित्रपटाचा दर्जा राखण्यापेक्षा तो झटपट तयार करण्याकडे कल असे. पहिली दोन-तीन वर्षे बोलपटाचे नाविन्य असल्याने चित्रपट चाले. त्यांतील काही बोलपटांना चांगले पैसेही मिळाले. १९३१-३२-३३ या वर्षांत अनुक्रमे ३, ४ व ९ बंगाली बोलपट प्रदर्शित झाले. इंद्रसभा (१९३२) या बंगाली बोलपटात पन्नासांहून अधिक गाणी होती. एका बोलपटात इतकी गाणी असणे हा एक विक्रमच होय. विशेष म्हणजे हा बोलपट खूप चालला. याच्या यशाने इतर निर्मातेही संगीताकडे अधिक लक्ष देऊ लागले पण पुढे मात्र गाण्यांची संख्या कमीकमी होत गेली. उदा., १९४५ साली प्रदर्शित झालेला निरेन लाहेरीदिग्दर्शित भाभीकाल  या चित्रपटात एकही गाणे नव्हते. १९३२ साली मादन थिएटर्सने बिल्वमंगल  हा भारतातील पहिला रंगीत बोलपट सादर करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

न्यू थिएटर्सच्या चंडीदास  (१९३२) या बोलपटामुळे देवकी बोस सारखा प्रतिभावान दिग्दर्शक प्रकाशात आला. या चित्रपटात देवकीबाबूंनी मानवी भावनांचे हृद्य दर्शन घडविले तसेच मृदुता व हळुवारपणा या देवकीबाबूंच्या वैशिष्ट्यांचाही प्रत्यय या बोलपटात प्रकर्षाने जाणवला. पार्श्वसंगीताचा परिणामकारक वापर याच बोलपटात प्रथम झाला.

देवकीबाबूंच्या पूरणभक्त  (१९३३) या उत्कृष्ट चित्रपटाला तर अखिल भारतीय स्वरूपाची बाजारपेठ लाभली. ईस्ट इंडिया फिल्म कंपनीचा देवकी बोस दिग्दर्शित सीता  (१९३४) हा एक भावकोमल चित्रपट होता. इतक्या हळुवारपणे पौराणिक चित्रपट अन्य कोणीही चित्रित केला नाही. व्हेनिस येथील जागतिक चित्रपटमहोत्सवात या चित्रपटाची खूपच प्रशंसा झाली. जागतिक चित्रपटमहोत्सवात जाणारा हाच पहिला भारतीय चित्रपट होय. ⇨ दुर्गा खोटे आणि पृथ्वीराज कपूर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या.

देवकी बोसप्रमाणे प्रमथेशचंद्र बरुआ हे बंगालमधील त्या काळातील आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक. त्यांच्या देवदास (१९३५) या बोलपटाने सामाजिक चित्रपटासंबंधी एक नवा दृष्टिकोन दिला. हा चित्रपट शरत्‌चंद्रांच्या देवदास  या कादंबरीवरून तयार केला होता. या ख्यातनाम साहित्यिकाच्या साहित्यावरून यापूर्वीही चित्रपट तयार झाले होते परंतु पी. सी. बरुआ यांनीच त्यांचे मूळ कथानक योग्य प्रकारे प्रथम पडद्यावर आणले. गृहदाह  या पुढच्या चित्रपटाने तर शरत्‌चंद्रांचे नाव चित्रपटसृष्टीत दुमदुमू लागले (१९३६). देवदासच्या हिंदी आवृत्तीत नायक होते  ⇨ कुंदनलाल सैगल  आणि बंगालीमध्ये स्वतः बरुआ. देवकीबाबूंचा विद्यापति  हा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट होता (१९३७).

पी. सी. बरुआप्रमाणे नितीन बोस हे न्यू थिएटर्सचे एक नवीन दिग्दर्शक त्या काळी पुढे येत होते. नितीन बोस उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होतेच. त्यांच्या तंत्रशुद्ध दिग्दर्शनचातुर्याने न्यू थिएटर्सच्या प्रतिष्ठेत भर घातली. त्यांनी दिग्दर्शित केलेला भाग्यचक्र (हिंदीतील धूपछाँव ) १९३५, दीदी (हिंदीतील प्रेसिडेंट) १९३६ आणि जीवन मरण  हे चित्रपट उत्कृष्ट होते. नीतिनबाबूंच्या धूपछाँव  या चित्रपटात उसना आवाज (प्ले बॅक) देण्याची कल्पना सर्वप्रथम ध्वनिलेखक मुकुल बोस यांनी राबवली होती (१९३५).


रविंद्रनाथ टागोर यांची गीते बंगाली चित्रपटांतून अधूनमधून वापरली जात परंतु बरुआंच्या मुक्ति (१९३७) मधील त्यांची गीते विशेष लोकप्रिय झाली व त्यामुळेच गीतांचे चित्रपटांतील महत्व चित्रपटनिर्मात्यांच्या लक्षात आले. मुक्तिमधील गीतांना दिलेल्या मधुर चालींमुळे संगीतदिग्दर्शक पंकज मलिक पुढे आले. जंगलाच्या पार्श्वभूमिवर चित्रित केलेला मुक्ति  हा पहिलाच बंगाली चित्रपट होता. या चित्रपटाचे बहुतेक चित्रण आसाममध्ये प्रत्यक्ष जंगलात जाऊन केले होते. १९३५ ते १९३७ हा तीन वर्षांचा काळ बंगाली चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने सुवर्णकाळ समजला जातो. त्यातील पहिल्या दोन वर्षांत बंगालमध्ये १४८ चित्रपट तयार झाले. त्यांपैकी ६६ हिंदी, ३८ बंगाली व ४४ अन्य भाषिक होते. याचा फायदा अर्थातच स्थानिक चित्रपटव्यवसायाला झाला. १९३५ ते १९३९ या काळात बंगालमधील चित्रपटनिर्मितिगृहे गजबजून गेलेली असत. चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ व कामगार यांना भरपूर काम होते. चित्रपटनिर्मितीगृहे व रसायनशाळा अद्ययावत् यंत्रसामग्रीने सज्ज झाल्या होत्या. त्या काळात निर्माण झालेल्या चित्रपटांबद्दल बंगाल आजही अभिमान बाळगतो. त्या काळात न्यू थिएटर्स व प्रभात फिल्म कंपनी यांच्यात उत्तमोत्तम चित्रपट सादर करण्याची जणू अहमहमिकाच लागली होती. एक गोष्ट मात्र निश्चित, की बंगालमधील बिगरबंगाली, म्हणजे प्रामुख्याने हिंदी व तमिळ, चित्रपटांची निर्मिती बंगाली चित्रपटसृष्टीला हानिकारक न ठरता उपकारकच ठरली. त्यामुळे बंगालमध्ये चित्रपटव्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर विकसित झाला. इतकेच नव्हे, तर बंगालमध्ये तयार होणाऱ्या अन्य भाषिक चित्रपटांचा दर्जा बंगाली चित्रपटांबरोबर वाढला होता. न्यू थिएटर्सने पुढे आणखी दोन चांगले चित्रपट दिले. उदयेर पथे (हिंदीतील हमराही) १९४४ व महाप्रस्थानेर पथे (हिंदीतील यात्रिक) १९५२. उदयेर पथे  हा बिमल रॉयदिग्दर्शित पहिलाच चित्रपट होय. बिमल रॉय अगोदरच निष्णात छायालेखक, त्यात त्यांचे संवादचातुर्य त्यामुळे खटकेबाज व चुरचुरीत संवाद हे उदयेर पथेचे वैशिष्ट्य बनले. हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालला. महाप्रस्थानेर पथेचे खास आकर्षण म्हणजे भावपूर्ण विषय आणि निसर्गसुंदर पार्श्वभूमी. हिमालयातील तिर्थक्षेत्र व तेथील नयनरम्य परिसर यांचे पडद्यावरील प्रथम दर्शन प्रेक्षकांना या चित्रपटात घडले. कार्तिक चॅटर्जी यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. १९४३ ते १९५५ या काळातील आय्. एन्. ए. पिक्चर्सचे माइकेल मधुसूदन (१९५०), एम्. पी. प्रॉडक्शन्सचे विद्यासागर (१९५०) व चलत्‌चित्र प्रतिष्ठानचे राणी रासमनी (१९५५) हे चरित्रात्मक चित्रपट उत्तम होते. नॅशनल प्रोग्रेसिव्ह पिक्चर्सचे परिवर्तन (१९४९) व एम्. पी. प्रॉडक्शन्सचे बाबला  या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात पुरस्कारही प्राप्त झाला होता (१९५३). या चित्रपटांतून बालगुन्हेगारीचा सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळला होता तर नॅशनल प्रोग्रेसिव्ह पिक्चर्सचे बरयात्री (१९५१) आणि चारूचित्रचे छेलेकार (१९५४) हे दोन निर्भेळ करमणूक करणारे विनोदी चित्रपट होते. देवकी बोस यांचा भगवान श्रीकृष्ण चैतन्य (१९५३) हा भक्तिप्रधान चित्रपटही उल्लेखनीय आहे. १९५४ मधील आज प्रॉडक्शन्सचे ढूली आणि सनराइज फिल्म्स्‌चे यदू भट्ट  या दोन बंगाली चित्रपटांत शास्त्रीय संगीताचा प्रयोग होता. अव्वल व अभिजात संगीतप्रधान चित्रपटांचा या दोन चित्रपटांनी पायंडा पाडला. या चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शक अनुक्रमे राजेन सरकार व ज्ञानप्रकाश घोष हे होते.

बंगालमध्ये १९४९ साली ७८ चित्रपट निर्माण झाले. ही बंगालमधील चित्रपटनिर्मितीची सर्वाधिक संख्या. त्यांपैकी ६२ बंगाली होते. १९४६ पर्यंत २५ देखील बंगाली बोलपट तयार होत नसत परंतु १९४७ साली ३३, तर १९४८ साली ३७ बंगाली चित्रपट तयार झाले. इतक्या बोलपटांच्या प्रदर्शनाची सोय नसल्याने त्याचा बंगाली चित्रपटसृष्टीवर विपरित परिणाम घडून आला. अशाही अवस्थेत बंगाली चित्रपटांची निर्मिती होतच राहिली. प्रमाण थोडे कमी झाले, तरी १९५० ते १९५५ या सहा वर्षांत अनुक्रमे ४२, ३८, ४३, ५०, ४७, ५२ चित्रपट निघाले.

महाराष्ट्र (मुंबई) व तमिळनाडूखेरीज बंगाल हे चित्रपटनिर्मितीचे तिसरे केंद्र. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या तिसऱ्या केंद्राची परवड झाली. मुंबई किंवा मद्राससारखी चित्रपटव्यवसायाची बंगालमध्ये व्याप्ती वाढली नव्हती. या दोन केंद्रांइतकी बंगालची आर्थिक क्षमताही नव्हती. त्यातच विभाजनामुळे बंगाली भाषिकांची बाजारपेठ ही दोन तृतीयांशाने कमी झाली. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर जबरदस्त आघात झाला. त्यातून बंगाली चित्रपटसृष्टी सावरली गेली नाही. न्यु थिएटर्ससारख्या मातब्बर संस्थेने मंजूर (१९४९) व नया सफर (१९५३) (बंगाली नबिन जत्रा) यांसारखे हिंदी-बंगाली चित्रपट सादर करून बंगाली चित्रपटसृष्टी सावरण्याचा थोडा फार प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने हिंदी आवृत्त्या अयशस्वी झाल्याने उत्तर भारतातून मिळणाऱ्या मोठ्या प्राप्तीला त्यांना मुकावे लागले आणि त्याची परिणती न्यू थिएटर्ससारखी मोठी संस्था बंद होण्यास झाली (१९५६). बंगाली चित्रपटसृष्टीला हा एक मोठा हादरा बसला. अशी विपरीत परिस्थिती ओढवल्यावर वास्तविक बंगाली चित्रपटांची निर्मिती बरीच कमी व्हायला हवी होती पण ती तशी झाली नाही. १९५७ साली देखील ५५ बंगाली चित्रपट निर्माण झाले. म्हणजे हिंदी चित्रपट वगळल्यास सर्वाधिक बंगाली चित्रपटच तयार झाले. याचे कारण युद्धकाळात जो बिनहिशोबी पैसा धनिकांजवळ होता, तो चित्रपटसृष्टी येत होता. त्यातच पाकिस्तानातून बंगालमध्ये आलेल्या निर्वासितांना स्वस्तात करमणूक म्हणजे चित्रपट हीच होती. त्यांनीही चित्रपटांना आश्रय दिला. त्यामुळे धंद्याला बरकत आली व चित्रपटनिर्मिती कमी न होता ती वाढली. मुंबईप्रमाणेच बंगालमधील बिनहिशोबी पैसा चित्रपटात घालून काही धनिक आपले नशीब आजमावू लागले. मध्यमवर्गीय लोकही मोठ्या संख्येने चित्रपट पाहू लागले. या सर्वांचा परिणाम म्हणजे बंगाली चित्रपटांच्या निर्मितीत झालेली वाढ.

तथापि १९५५ साली प्रदर्शित झालेल्या सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली  या चित्रपटाने मात्र भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव जगभर केले. हा चित्रपट पश्चिम बंगाल सरकारने सादर केला होता. या चित्रपटांत कोणीही नामवंत कलाकार नव्हते. जरूर तेवढाच संवादांचा उपयोग केला होता पण या वास्तव व सहजसुंदर चित्रपटाचे चित्रपटरसिक व जाणकार यांनी हार्दिक स्वागत केले. चित्रपटनिर्मितीला एक नवी दृष्टी नवी दिशा त्यामुळेच लाभली. या चित्रपटाला त्या वर्षीचे राष्ट्रीय सुवर्णपदक तर मिळालेच शिवाय कॅन येथील जागतिक चित्रपटमहोत्सवात ‘बेस्ट ह्यूमन डॉक्युमेंट’ म्हणून त्यास खास पारितोषिकही लाभले. तसेच इतरही जागतिक चित्रपटमहोत्सवात त्याला उत्तम चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाले. असा मानसन्मान संपादन करणारा हाच पहिला भारतीय चित्रपट आणि सत्यजित रे हेच पहिले भारतीय दिग्दर्शक.

'अपूर संसार', १९५९. सत्यजित रे यांचे चित्रपट शोकात्मक असून ते बुद्धिवादी व कलात्मक दृष्टी असलेल्या उच्चभ्रू प्रेक्षकांसाठीच असतात, अशी काहीजण टीका करतात. तथापि सर्वसामान्य प्रेक्षकांनाही त्यांचे चित्रपट आवडत असल्याचे दिसून आले. दोन-तीन अपवाद सोडल्यास सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेले वीस चित्रपट आर्थिक दृष्ट्याही यशस्वी झाले आहेत. त्यांचे अपराजितो, जलसाघर, अपूर संसार, तीन कन्या, महानगर, चारुलता, नायक  हे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात गाजले आहेत. सत्यजित रे यांच्यापासून ऋत्विक घटक, मृणाल सेन, तपन सिन्हा, राजेन तरफदार यांसारख्या नव्या दिग्दर्शकांनीही स्फूर्ति घेतली आहे. ज्या बंगाली दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे ते गेल्या वीस वर्षांतील दिग्दर्शक आणि चित्रपट असे : सत्यजित रे : पारश पाथर (१९५८), अपूर संसार (१९५९), देवी (१९६०), रविंद्रनाथ ठाकूर (१९६१), अभिजान  व कांचनजंगा (रंगीत) राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त (१९६२), चारूलता राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त (१९६४), का पुरूष ओ महापुरूष (१९६५), चिडियाखाना (१९६७), गोपी गाये बाधा बाये (१९६८), अरन्येर दिनरात्री (१९६९), प्रतिद्वंद्वी (१७७०) व सीमाबंध (१९७२)  निमाई घोष : छिन्नमूल (१९५०)  देवकी बोस : सागर संगमे   राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त (१९५८)  ऋत्विक घटक : अजंत्रिक (१९५८), बाडी थेके पालिये (१९५९), मेघे ढाका तारा (१९६०), कोमल गंधार (१९६१), सुवर्णरेखा (१९६५)  मृणाल सेन : नील आकशेर नीचे (१९५९), बाइशे श्रावन (१९६०) या चित्रपटांत दारिद्र्याविरुद्ध लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न आहे, अबशेषे (१९६३), प्रतिनिधी (१९६४), आकाश कुसुम (१९६५) राजेन तरफदार : गंगा (१९६०) तपन सिन्हा : काबुलीवाला   राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त (१९५६), क्षणिकेर अतिथी (१९५९), क्षुधित पाषाण (१९६०), अतिथी (१९६५), हाटे बाजारे  राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त (१९६७), आपनजन (१९६८), सगिनो महातो (१९७०)  विजय बोस : भगिनी निवेदिता  राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त (१९६१) अजय कार : सात पाके बांधा (१९६३)  सुधीर मुकर्जी : दादा ठाकूर  राष्ट्रीयसुवर्णपदक प्राप्त (१९६२). १९६६ साली तीन नवीन दिग्दर्शकांचे चित्रपट उत्तम होते. ते म्हणजे तरुण मुजुमदार यांचा बालिका बोधू, पूर्णेन्दू पत्री यांचा स्वप्ननिये  व अरुंधती देवी यांचा छुटी. तपन सिन्हा यांचा काबुलीवाला, आरोहीहाटे बाजारे  या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत. तसेच हा मान मृणाल सेन यांचा बाईशे श्रावन, भुवन शोमइंटरव्ह्यू या चित्रपटांनाही मिळालेला आहे. पथेर पांचालीच्या दशकात जे जे बंगाली चित्रपट निघाले, त्यांत भारतीय जीवनाचे खरेखुरे दर्शन घडविले होते परंतु त्यांतील पुष्कळ चित्रपटांना आर्थिक अपयश पत्करावे लागले. १९६१ साली पाकिस्तानने भारतीय चित्रपटांची आयात थांबविल्यावर बंगाली चित्रपटसृष्टीवर अधिकच अनिष्ट परिणाम झाला. त्याच वर्षीच्या तारू मुकर्जी प्रॉडक्शनच्या इंगित  या बंगाली बोलपटात एकही संवाद नव्हता. हा एक साहसी प्रयोगच म्हणावा लागेल. सत्यजित रे सोडले, तर फक्त मृणाल सेन हेच या प्रतिकूल परिस्थितीत टिकू शकले, सतत आर्थिक अपयश आल्यानंतर त्यांच्या भुवन शोम  या हिंदी चित्रपटाला यश मिळाले. हिंदी चित्रपटांतील नित्याचे संकेत व युक्त्याक्लृप्त्या न वापरता चाकोरीबाहेरचा चित्रपट त्यांनी यशस्वी करून दाखविला. या यशाने त्यांची उमेद वाढली आणि त्यांनी इंटरव्ह्यू, कलकत्ता ७१  पदातिक  हे तीन बंगाली चित्रपट सादर केले. कोरस  हा त्यांचा चित्रपट १९७४ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला गेला व त्याला राष्ट्रीयसुवर्णपदक मिळाले. बंगालमध्ये हिंदी चित्रपटांचा वरचष्मा आहे. १९५७ साली ५५ बंगाली चित्रपट तयार झाले होते. १९७१ मध्ये ही संख्या ३० पर्यंत खाली आली. सत्यजित रेसारखा विश्वविख्यात दिग्दर्शक-निर्माता बंगालमध्ये असूनही अनेक अडचणी असलेली बंगाली चित्रपटसृष्टी अद्याप स्थिरपद झालेली नाही.

भारतात चित्रपटगृहांचा असलेला तुटवडा हेही बंगाली चित्रपटसृष्टीच्या विकासातील अडसर असणारे आणखी एक कारण आहे. पश्चिम बंगालमध्ये फक्त ६१३ चित्रपटगृहे आहेत. पंचवीस हजार लोकवस्तीला एक चित्रपटगृह धरले, तरी तेथे कमीत कमी १,३२५ चित्रपटगृहे असणे जरुर आहे. बंगालमधील एकूण लोकसंख्यंपैकी सु. ३ कोटी लोकसंख्या खेडेगावात किंवा छोट्या शहरांत आहे. तेथेच चित्रपटगृहांची चणचण मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून बंगाली चित्रपटसृष्टीची वाढ व्हायला हवी असेल, तर चित्रपटगृहेही वाढविणे आवश्यक आहे.

प्रारंभापासून १९७४ अखेरपर्यंत एकूण १,३०६ व त्यानंतर १९७४ सालात ३५ बंगाली चित्रपट प्रदर्शित झाले त्यांपैकी २ रंगीत होते. १९७४ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट म्हणून मृणाल सेनदिग्दर्शित कोरस  या बंगाली चित्रपटाची निवड झाली. मॉस्को चित्रपटमहोत्सवातही याच चित्रपटाला रौप्यपदक मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक सत्यजित रे यांना त्यांच्या सोनार केल्ला  या बंगाली चित्रपटासाठी मिळाले. बंगालीतही हा चित्रपट सर्वोत्तम ठरला. याशिवाय उत्कृष्ट श्वेतकृष्ण छायालेखन, उत्कृष्ट संगीत इत्यादींची पारितोषिके कोरस  चित्रपटाला मिळाली तर उत्कृष्ट रंगीत छायालेखन, उत्कृष्ट बालनट, उत्कृष्ट पटकथा यांची पारितोषिके सोनार केल्ला  आणि उत्कृष्ट कथेचे पारितोषक जुकती ताक्को और गाप्पो  या बंगाली चित्रपटाला मिळाले. एकूण १९७३ ची बरीच राष्ट्रीय पारितोषिके बंगाली चित्रपटांनी हस्तगत केली होती. शक्ति सामंत यांच्या अमानुष  या १९७४ च्या हिंदी चित्रपटाने यश मिळविले असल्याने बंगाली चित्रपटांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. काही बंगाली दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टी गाजवीत आहेत. हृषीकेश मुकर्जी, बासु भट्टाचार्य, बासु चॅटर्जी, सत्येन बोस, असित सेन, शक्ति सामंत, फणी मजुमदार, यांसारखे आघाडीचे दिग्दर्शक, तर सैगल, पहाडी सन्याल, उमाशशी, मोलीना, काननदेवी, बरुआ, नवाब, जहर गांगुली, असित बरन, चंद्रावती, छबी विश्वास, अहिन्द्र चौधरी, दुर्गादास बॅनर्जी, इत्यादींनी बंगाली चित्रपटसृष्टीत कलावंत म्हणून मोठे नाव कमावले होते. सध्या उत्तमकुमार, अपर्णा सेन, सौमित्र चॅटर्जी, मंजू डे, सुमित्रादेवी, भारतीदेवी, सुचित्रा सेन, उत्पल दत्त इ. नटनट्या अग्रेसर आहेत. उत्पल दत्त यांना भुवन शोम (१९६९) मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले असून त्याच वर्षी दिबारात्रीर काव्य (१९६९) मधील भूमिकेसाठी माधवी मुकर्जीला सर्वोत्तम अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते.

तमिळ चित्रपट : दक्षिणेत चित्रपटधंद्याचा पाया घालणाऱ्यांमध्ये आर्. नटराज मुदलियार, आर्. व्यंकय्या हे प्रमुख आहेत. त्यांपैकी आर्. नटराज मुदलियार यांनी १९१७ साली इंडियन फिल्म कंपनी ही संस्था स्थापन केली. त्यांनी १९१९ साली सादर केलेला कीचकवध  हा मद्रासकडील पहिला चित्रपट. आर्. व्यंकय्या आणि त्यांचे चिरंजीव आर्. प्रकाश यांनी १९२१ साली स्टार ऑफ द ईस्ट फिल्म कंपनीसाठी भीष्मप्रतिज्ञा  हा चित्रपट निर्माण केला. पहिले चित्रपटप्रदर्शक म्हणून एस्. व्हिन्सेंट यांचे नाव घेतले जाते. त्यांनी १९१४ साली चित्रपट-प्रदर्शनालाही दक्षिण भारतात प्रारंभ केला. आर्. व्यंकय्या यांनी १९१७ साली चित्रपट-प्रदर्शनालाही सुरुवात केली. म्हणून या क्षेत्रातील आद्य प्रवर्तकांत त्यांचेही नाव घेतले जाते. १९२८ साली स्थापन झालेली एक्झिबिटर्स फिल्म सर्व्हिस ही दक्षिण भारतातील पहिली चित्रपटवितरण संस्था होय. एक विशेष गोष्ट म्हणजे इलीस आर्. डंकन या अमेरिकन दिग्दर्शकाने प्रारंभीच्या काळात बरेच तमिळ चित्रपट दिग्दर्शित केले होते. प्रारंभीच्या काळातील आणखी एक महत्वाचे चित्रपटनिर्माते म्हणजे ए. नारायण हे होत. त्यांनी १९२७ साली जनरल पिक्चर्स कॉर्पोरेशन ही संस्था स्थापन केली. ए. नारायण हे के. डी. ब्रदर्स या प्रसिद्ध चित्रपटवितरण संस्थेचे व्यवस्थापक होते. पुढे चित्रपटप्रदर्शक म्हणूनही त्यांनी यश मिळविले. ठाकूर एच्. देसाई आणि चिमणलाल बी. देसाई यांनी दक्षिणेत येऊन चित्रपटवितरक म्हणून जम बसविला. त्यांपैकी ठाकूर एच्. देसाई यांनी बंगलोर येथून बऱ्याच संस्थांच्या चित्रपटांचे वितरण केले. चिमणलाल देसाई हे प्रथम हरिभाई देसाई यांच्या सहकार्याने दक्षिण विभागात चित्रपटवितरक म्हणून प्रतिनिधित्व करीत, नंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

तमिळ बोलपट प्रारंभी मुंबई व कलकत्ता येथे तयार होत असत. पहिला तमिळ बोलपट म्हणून ज्या कालिदास (१९३१) बोलपटाचा उल्लेख केला जातो, तो मुंबईच्या इंपीरिअल फिल्म कंपनीने तयार केला होता. त्यात टी. पी. राजलक्ष्मी, पी. जी. वेंकटेशन्, एम्. एस्. संतानलक्ष्मी, जे. सुशीला, टी. सुशीला, देवी व राजा सँडो इत्यादींच्या भूमिका होत्या. यातील संवाद तमिळ व गीते तेलुगू होती आणि दिग्दर्शक एच्. एम्. रेड्डी होते. १९३२ साली चार तमिळ चित्रपट निघाले मुंबईच्या सागर मुव्हिटोननेच दोन चित्रपट सादर केले. त्यांमध्ये गलवा  व हरिश्चंद्र  या चित्रपटांतील प्रमुख भूमिकांत डी. आर्. मुत्तुलक्ष्मी व व्ही. सुंदरेसा अय्यर हे होते. याशिवाय इंपीरिअल फिल्म कंपनीचा पारिजात पुष्पहरम्  व ईस्ट इंडिया फिल्म कंपनीचा रामायण  हे दोन बोलपट त्याच सुमारास निघाले होते. १९३३ साली तमिळ चित्रपटांची संख्या सातपर्यंत गेली. पैकी कलकत्त्याच्या न्यू थिएटर्सने नंदनार  व प्रल्हाद  हे दोन बोलपट सादर केले. ईस्ट इंडिया फिल्म कंपनीचाही प्रल्हाद  चित्रपट निघालेला होताच. कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीनेही सीता कल्याणम्  हा तमिळ बोलपट त्याच वर्षी तयार केला. राजम्, जया, शेषगिरी, व्ही. सुंदरम् अय्यर, शेखर व टी. एस्. मुत्तुस्वामी हे कलावंत त्यांत होते. पुढे त्यांतील काही नट, निर्माते व दिग्दर्शक म्हणूनही गाजले. १९३४ पर्यंत बोलपट तयार होऊ शकतील असे एकही चित्रपटनिर्मितिगृह मद्रासमध्ये नव्हते. निर्माते ए. नारायण यांनी साऊंड सिटी हे दक्षिणेतील पहिले चित्रपटनिर्मितिगृह मद्रासमध्ये उभारले. त्यांनी तेथे श्रीनिवास कल्याणम्  हा पहिला तमिळ बोलपटही निर्माण केला. प्रमुख भूमिका होत्या आर्. बी. लक्ष्मीदेवी व एस्. कमलादेवी. त्याच वेळी टी. के. ब्रदर्स या प्रख्यात नाट्यसंस्थेतील नटवर्ग चित्रपटसृष्टीकडे वळला. १९३४ साली १४ तमिळ चित्रपट तयार झाले. त्यांतील चार मद्रासमध्ये, सात कलकत्त्यात व तीन मुंबईत तयार झाले होते. प्रारंभी मद्रासला बहुतेक तंत्रज्ञ बाहेरून येत, नंतर हळूहळू स्थानिक तंत्रज्ञ तयार झाले. ए. नारायण यांच्या पत्नी ध्वनिमुद्रक होत्या (१९३४). भारतातील त्या पहिल्या स्त्री-ध्वनिमुद्रक होत. १९३५ साली तमिळ चित्रपटांची संख्या ३८ होती. पैकी मद्रासमध्ये २२, तर कलकत्त्यात १६ तयार झाले. त्या वर्षी मुंबईत एकही तमिळ चित्रपट तयार झाला नाही. ही संख्या १९४१ पर्यंत जवळजवळ कायम होती. १९४२ मध्ये मात्र एकूण तमिळ चित्रपटांची संख्या अठरावर आली. पैकी मद्रसमध्ये १७ आणि मुंबईत एक चित्रपट तयार झाला होता. पुढे १९४५ पर्यंत तमिळ चित्रपटनिर्मिती कमी होत गेली. नंतर मात्र पुन्हा ती वाढत गेली. १९४३ पासून बहुतेक सर्व तमिळ चित्रपट मद्रास येथेच तयार होऊ लागले. क्वचित एक दोन तमिळ चित्रपट मुबई किंवा कलकत्त्याला निघाले. या १२ वर्षांच्या तमिळ बोलपटसृष्टीमधील विशेष उल्लेखनीय बाबी म्हणजे १९३५ साली आसनदास क्लासिकल्स या संस्थेच्या नंदनार  या चित्रपटातील भूमिकेसाठी के. बी. सुंदरम्‌बाल या अभिनेत्रीने एक लाख रुपये घेतले होते. त्या काळात ही रक्कम प्रचंडच होती. प्रभात फिल्म कंपनीने त्या वर्षी चंद्रसेना  हा आपला दुसरा व अतिशय कलात्मक तमिळ चित्रपट सादर केला. १९३६ साली चित्रपटनिर्मितिगृहांची संख्या मद्रासमध्ये १० झाली होती. या वर्षी टी. पी. राजलक्ष्मी यांनी मिस्. कमला  या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. चित्रपटाची कथा-पटकथाही त्यांचीच होती. त्या भारतातील पहिल्या स्त्री-दिग्दर्शिका होत. १९३५ साली लोटस पिक्चर्सचा पट्टीनाथर  हा प्रदर्शित झालेला पहिला यशस्वी चित्रपट असून त्यात प्रमुख भूमिका दंडपाणी दिक्षिदर यांची होती. षण्मुखानंद टॉकीजकृत मेनका  हा बोलपट बराच गाजला. १९३७ साली आसनदास क्लासिकल्स या संस्थेने सादर केलेल्या मॉडर्न यूथ (गीतासार) या चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण इंग्लंडमध्ये झाले होते. रॉयल टॉकीजचा चिंतामणी (१९३७) हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात ७२ आठवडे चालला व त्याने एक विक्रम प्रस्थापित केला. या चित्रपटाला वाय. व्ही. राव यांचे दिग्दर्शन लाभले होते. त्यात त्यागराज भागवतर व के. अश्वत्थामा प्रमुख भूमिकांत होते. त्याच वर्षीचा सालेम शंकरकृत अंबिकापति  हा त्यागराज भागवतर यांचीच प्रमुख भूमिका असलेला चित्रपटही असाच एक वर्षाहून अधिक काळ चालला होता. जलजा  हा सागर मुव्हिटोनचा जी. के. शेषगिरीदिग्दर्शित पहिला नृत्यप्रधान तमिळ चित्रपट १९३८ साली प्रदर्शित झाला. पुढे मद्रासमध्ये हिंदी बोलपटांचीही निर्मिती सुरू झाली. निर्माते के. सुब्रह्मण्यम् यांनी १९३९ साली प्रेमसागर  हा पहिला हिंदी बोलपट सादर केला तर रॉयल टॉकीज डिस्ट्रिब्यूटर्स या संस्थेने सावित्री (१९४१) हा चित्रपट सादर केला होता. त्यात मराठीतील प्रख्यात अभिनेत्री शांता आपटे यांची सावित्रीची आणि एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी यांची नारदाची भूमिका होती. रॉयल टॉकीज डिस्ट्रिब्यूटर्सने सादर केलेला हरिदास  हा चित्रपट १६ ऑक्टोबर १९४४ रोजी ब्रॉडवे चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो १३३ आठवडे चालला. त्याचे दिग्दर्शत सुंदरराव नाडकर्णी होते व प्रमुख भूमिका त्यागराज भागवतर आणि टी. आर्. राजकुमारी यांनी केल्या होत्या.

संगीत आणि नृत्य हे तमिळ चित्रपटांचे प्रमुख आकर्षण. गाण्यांची संख्या व चित्रपटांची लांबी यांची सर्वसाधारण प्रेक्षकाला उत्सुकता असते. साधारणतः तमिळ चित्रपटांची लांबी सु. पाच हजार मी. तरी असते परंतु युद्धकाळात या लांबीवर निर्बंध घातले गेले. हे निर्बंध तमिळ चित्रपटांना विशेष जाचक ठरले. सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक एस्. एस्. वासन् यांनी याविरुद्ध अर्ज केला व त्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे पुन्हा चित्रपटांची लांबी पहिल्यासारखी झाली. पुढे डिसेंबर १९४५ मध्ये हे निर्बंधही उठले.

प्रारंभी तमिळ चित्रपटांची कथानके पौराणिक असत, पुढे संतपट झाले व नंतर चित्रपटनिर्माते सामाजिक विषयांकडे वळले. जेमिनीचा मिस्. मालिनी (१९४७), ज्युपिटर पिक्चर्सचा वेलेकारी (१९४९), उमा अँड एनाक्षीचा नल्लतंबी (१९४९) हे प्रारंभीच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक चित्रपट होत. नॅशनल पिक्चर्सचा पराशक्ति  (१९५२) या चित्रपटात सुविख्यात अभिनेता  ⇨ शिवाजी गणेशन्  प्रथम चमकला. जेमिनी स्टुडिओज्‌चा भक्तिप्रधान भव्य संतचित्रपट अवैयार (१९५३) हा त्या वेळी अतिशय गाजला होता. १९४८ सालापासून एस्. एस्. वासन् यांच्या चंद्रलेखा  या हिंदी चित्रपटामुळेच पुढे हिंदीची फार मोठी बाजारपेठ मद्रासच्या निर्मात्यांना मिळाली. भव्य देखावे, तांत्रिक सफाई, विशेष वेशभूषा, भरपूर संगीत व नृत्ये इ. सामान्य प्रेक्षकांना आवडेल अशा बाबी वापरून तमिळ निर्मात्यांनी हिंदी चित्रपट यशस्वी करून दाखविले. टी. आर्. सुंदरम् यांच्या मॉडर्न थिएटर्समध्ये तयार केलेला अलिबाबा अँड फॉर्टी थीव्हज्  हा पहिला तमिळ रंगीत चित्रपट सलेम यंनी १९५५ साली सादर केला. मॉडर्न थिएटर्स हे चित्रपटनिर्मितिगृह फार जुने आहे. शंभरहून अधिक चित्रपट त्यात तयार झाले आणि आणखी होत आहेत. वासन् यांच्या जेमिनी स्टुडिओच्या पाठोपाठ ए. व्ही. एम्. प्रॉडक्शन्स, ज्युपिटर पिक्चर्स, पक्षीराज स्टुडिओज्. ए नारायण प्रॉडक्शन्स व अन्य चित्रपटसंस्थांनी स्वातंत्र्योत्तर काळात अनेक हिंदी चित्रपट निर्माण केले आहेत. मोठमोठे निर्माते हिंदीकडे वळल्यावर होतकरू आणि उमेदीच्या निर्मात्यांना तमिळ भाषेत उत्तम चित्रपट सादर करावयास संधी मिळाली. या नव्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांत अधिक वास्तवता आणण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक समस्या, श्रीमंतांचे दुर्गुण, गरिबांची दुःखे, जातिभेद, विधवांच्या यातना, कुमारी माता, धर्मभोळेपणा, बदलती अर्थव्यवस्था यांसारखे जिव्हाळ्याचे विषय त्यांनी हाताळले. अर्थात त्याचबरोबर हलकेफुलके विनोदी चित्रपटही त्यांनी सादर केले. १९४९ साली सुरू झालेले मिनर्व्हा हे मद्रासमधील पहिले वातानुकूल चित्रपटगृह होय.

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी २३ टक्के लोक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम् या दाक्षिणात्य भाषा बोलतात. १९४६ साली भारतातील एकूण चित्रपटनिर्मितीपैकी ७७ टक्के चित्रपटनिर्मिती एकट्या मुंबईत होत असे, तर मद्रासमध्ये फक्त ११ टक्के. १९५९ मध्ये मुंबईचे हे प्रमाण ३८ टक्क्यावर आले, तर मद्रासमध्ये ४६ टक्क्यापर्यंत वाढले. तेव्हापासून चित्रपटनिर्मितीत मद्रासचा पहिला क्रमांक कायम आहे. याचे बरेचसे श्रेय जेमिनी स्टुडिओचे एस्. एस्. वासन् व ए. व्ही. एम्. स्टुडिओचे मय्यप्पन चेटियार यांना द्यावे लागेल. १९६० साली वीरपांड्यकट्टबोम्मन  या चित्रपटाला आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणून शिवाजी गणेशन्  यांना जागतिक चित्रपटमहोत्सात पुरस्कार मिळाला. सी. व्ही. श्रीधर, के. एस्. गोपालकृष्णन्, के. बालचंदर, डी. जयकांतन् हे १९६० नंतरचे नव्या दृष्टीने कल्पक दिग्दर्शक आहेत. त्यांनी सादर केलेले इरू कोडुगळ (१९६९), विळ्याट्ट पिळै  (१९७०), व्हिएटनाम विड (१९७०), व उन्नई पोल उरुवन (१९६४) हे चित्रपट उल्लेखनीय आहेत. एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी, बी. सरोजा. त्यागराज भागवतर व एस्. डी सुब्बुलक्ष्मी यांसारख्या कलावंतांनी तमिळ चित्रपटांना उच्च दर्जा प्राप्त करून दिला. एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी या श्रेष्ठ गायिकेला पद्मविभूषण मान सर्व प्रथम म्हणजे १९५४ मध्ये मिळाला. निर्माता-दिग्दर्शक जयकांतन् यांच्या उन्नई पोल उरूवन  या चित्रपटाला राष्ट्रपती गुणवत्ता प्रशस्तिपत्र मिळाले. दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर, के. बालचंदर यांनी काही चाकोरीबाहेरचे चित्रपट निर्माण केले पण ते आर्थिक दृष्ट्या अपयशी ठरले. राजगोपालाचारीलिखित संगीतम् श्रीनिवास राव यांच्या दिक्कत्र पार्वतीला १९७३ चा प्रादेशिक भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला.

तमिळ चित्रपटात राजकारण मोठ्या खुबीने घातलेले असते. अर्थात या चित्रपटांना कलात्मक बाजू कमी असते, असे नाही. अण्णादुरै यांचे ओरु इख, वेलेकारी  त्याचप्रमाणे करूणानिधीलिखित मन मंगल  व पराशक्ति  ही त्याची उदाहरणे आहेत. आणखी काही चित्रपट असे आहेत, की ज्यांत एम्. जी. रामचंद्रन् यांची प्रमुख भूमिका व करूणानिधी यांचे संवाद आहेत. अशा चित्रपटांत मात्र राजकारण भरपूर आढळते. शिवाजी गणेशन् व एम्. जी. रामचंद्रन या दोन तमिळ कलावंतांची लोकप्रियता दीर्घकालीन आहे.

'तिल्लाना मोहनाम्बाळ', १९६८. पुढील तमिळ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत : कुळंदैक्काग (१९६८) : सर्वोत्तम बालकलाकार : बेबी राणी उइरंद मनिदन (१९६८) : सर्वोत्तम पार्श्वगायिका : पी. सुशीला कुळंदैक्काग (१९६८) : सर्वोत्तम राष्ट्रीय ऐक्य गीत : कन्नदासन् तिल्लाना मोहनाम्बाळ (१९६८) : सर्वोत्तम रंगीत छायालेखन : के. एस्. प्रसाद तुणैवन (१९६९) : सर्वोत्तम पार्श्वगायिक : कै. बी. सुंदरांबाळ शांति निलयम् (१९६९) : सर्वोत्तम रंगीत छायालेखन : मार्क्‌स बर्टली रिक्षाकारन  (१९७१) सर्वोत्तम अभिनेता : एम्. जी. रामचंद्रन् देवी पार्वती (१९६१) व उन्नई उंंरुवन (१९६४) : तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक.

तेलुगू चित्रपट : तमिळ चित्रपटांप्रमाणेच तेलुगू चित्रपटही प्रारंभी मुंबई किंवा कलकत्ता येथे तयार होत. भारत मुव्हिटोनने भक्त प्रल्हाद  हा पहिला तेलुगू बोलपट १९३१ साली सादर केला. या बोलपटाची निर्मिती मुंबईतच झाली. या बोलपटाचे दिग्दर्शक होते एच्. एम्. रेड्डी आणि प्रमुख कलाकार होते व्ही. व्ही. सुब्बाराव व सुरभी कमलाबाई. १९३२ साली पादुका पट्टाभीष्मकम्  व शकुंतला  या दोन्ही तेलुगू बोलपटांची निर्मिती मुंबईच्या सागर मुव्हिटोनने केली होती. १९३३ साली एकूण पाच तेलुगू बोलपट तयार झाले. सरस्वती सिनेटोनचा पृथ्वीपुत्र  हा बोलपट सोडल्यास दोन रामदास  व दोन सावित्री  चित्रपट तयार झाले. एक रामदास चित्रपट मुंबईच्या इंपीरिअल फिल्म कंपनीचा, तर दुसरा कलकत्त्याच्या ईस्ट इंडिया फिल्म कंपनीचा होता. त्यांनीच एक सावित्री  चित्रपटही निर्माण केला. दुसरा सावित्री चित्रपट कलकत्त्याच्या कृष्ण फिल्म कंपनीने काढला.

तमिळ चित्रपटांप्रमाणेच तेलुगू बोलपटांची निर्मिती १९३४ पासून मद्रासमध्ये सुरू झाली. व्हेल पिक्चर्सचा सीता कल्याणम्  हा मद्रासमधील पहिला तेलुगू बोलपट. याचे निर्माते होते पी. व्ही. दास आणि प्रमुख कलावंत होते राम तिलकम्, माधव पेड्डी, वेंकटरामय्यान, मा. कल्याणी, टी. वेंकटेश्वरलु आणि राजरत्नम्. १९३४ मधील पायोनिअर पिक्चर्सचा अहल्या  व ईस्ट इंडिया कंपनीचा लवकुश  हे चित्रपट कलकत्त्याला तयार झाले. त्या वर्षी एकूण तीनच तेलुगू बोलपटांची निर्मिती झाली. १९३४ सालीच जी. के. मंगराजू यांनी क्वालिटी पिक्चर्स ही तेलुगू चित्रपटवितरण संस्था सुरू केली. त्यांनीच पुढे पूर्णा पिक्चर्स लि. ही चित्रपटवितरण संस्था विजयवाडा येथे स्थापन केली. बहुतेक सर्व तेलुगू चित्रपटांची प्रमुख वितरणकार्यालये विजयवाडा येथे आहेत. १९३५ साली निर्माण झालेल्या ७ तेलुगू बोलपटांपैकी दोन मद्रासमध्ये व पाच कलकत्त्याला तयार झाले. यानंतर मात्र तेलुगू चित्रपटांची निर्मिती मद्रास मध्ये वाढली. १९४० साली मात्र १४ तेलुगू चित्रपटांपैकी मुंबई व कलकत्ता येथे फक्त एकेकच चित्रपट तयार झाला. १९४१ साली १५ व १९४२ साली ८ तेलुगू चित्रपट तयार झाले, ते सर्वच मद्रासमध्ये निघाले. पुन्हा १९४३ साली सहांपैकी दोन, १९४४ साली सहांपैकी दोन, १९४६ साली नऊंपैकी एक, १९५० साली अठरापैकी एक एवढेच चित्रपट मुंबईत निघाले. १९४१ साली १५ तेलुगू चित्रपट तयार झाले असले, तरी इतर प्रादेशिक चित्रपटांप्रमाणे १९४२ पासून तेलुगू चित्रपटांची निर्मितीही कमी झाली. १९५० पासून मात्र पुन्हा तेलुगू चित्रपटनिर्मितीली वेग आला.

तेलुगू बोलपट प्रथमपासूनच लोकप्रिय ठरले, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तेलुगू रंगभूमीने निर्माण केलेली अभिरुची. शिवाय तेलुगू चित्रपटांत भरपूर लोकगीतांचा वापर करण्यात येई व कलाकारही जाणते असत. बोलपटाचा जमाना सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे १९३० च्या आसपास तेलुगू रंगभूमीचा भरभराटीचा काळ होता. रंगभूमीवर मुरब्बी कलाकार होते एवढेच नव्हे, तर त्या काळातील काही प्रसिद्ध पुढाऱ्यांचा रंगभूमीशी संबंधही होता. उदा., कोंडा वेंकटाप्पा, के. नागेश्वरराव, बी. कृष्णराज राजू हे पुढारी पुरुषभूमिका उत्तम करीत, तर आंध्रकेसरी टी. प्रकाशम्, कलेश्वरराव हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्ध होते. एम्. टी. राजन् यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या व्हेल पिक्चर्सचा सीता कल्याणम्  हा पहिला बोलपट त्यांच्या मद्रासच्या चित्रपटनिर्मितिगृहात तयार झाला होता. या चित्रपटाला खूपच यश मिळाले. १९३५ साली बालाजी यांनी सादर केलेल्या स्टार फिल्म कार्पोरेशनच्या हरिश्चंद्र  या चित्रपटालाही भरपूर यश लाभले. हाही बोलपट मद्रासमध्येच तयार झाला होता. त्याचे दिग्दर्शक होते सी. एस्. व्ही. रामन् व कलावंत होते अदंकी श्रीराममूर्ती, निल्लोरी, नागराजराव, कन्नम्बा व पुलीपती वेंकटेरश्वलु.

पुढे तेलुगू निर्माते सामाजिक विषयांकडे वळले. मला-पिल्ला (१९३८), गृहलक्ष्मी (१९३८), वंदेमातरम् (१९३९), यांसारखे उत्तम बोलपट त्या वेळी तयार झाले. मद्रासच्या सारथी फिल्म्सने तयार केलेला मला-पिल्ला (१९३८) हा पहिला यशस्वी सामाजिक बोलपट. याचे दिग्दर्शक होते जी. रामब्रह्यम् व प्रमुख कलावंत होते कांचनमाला-भानुमती, अनसूया वाय्. सत्यम्. त्याच वर्षी रोहिणी पिक्चर्सने सादर केलेला गृहलक्ष्मी  या चित्रपटाने तर इतिहास घडविला. आजही हा बोलपट कित्येकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटामुळे कांचनमाला ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटात एम्. सी. राघवन्, जी. व्ही. सुब्बाराव, पी. कन्नम्बा, सरला, रोहिणी हे इतर कलावंतही होते. एच्. एम्. रेड्डी यांनी रोहिणी पिक्चर्ससाठी हाच बोलपट १९५५ साली पुन्हा नव्याने तमिळमध्ये सादर केला. दिग्दर्शक एच्. व्ही. बाबू आणि प्रमुख भूमिकेत अंजलीदेवी व एम्. के. राधा हे होते. तेलुगू चित्रपटाच्या विकासात एच्. एम्. रेड्डींचा फार मोठा वाटा आहे. ते प्रारंभी मुंबईच्या शारदा फिल्म कंपनीत व त्यानंतर इंपीरिअल फिल्म कंपनीत होते. नंतर ते कोल्हापूरला शालिनी व कोल्हापूर सिनेटोनमध्येही होते. कृष्ण मुव्हिटोन, मुंबई या संस्थेने सादर केलेला कालिदास  या पहिल्या तमिळ बोलपटाचे तेच दिग्दर्शक होते. त्यांचे निर्मितिगृह आता गोल्डन स्टुडिओ म्हणून ओळखले जाते.

'नम्मीन बंतु', १९५९.

वाहिनी पिक्चर्सतर्फे मद्रासचे बी. एन्. रेड्डी यांनी १९४० साली सुमंगली  नावाचा विधवांच्या समस्येवर एक प्रभावी सामाजिक चित्रपट सादर केला होता. पुनर्विवाह हाच विधवांच्या ज्वलंत प्रश्नावर उपाय आहे, असे या चित्रपटात त्यांनी सुचविले होते. बी. एन्. रेड्डीदिग्दर्शित या चित्रपटात कुमारी नागय्या, मालती, वीरचारी यांच्या भूमिका होत्या. रेड्डींनी तेलुगू साहित्यातील निवडक कलाकृती चित्रांकित केल्या. स्वर्गसीमा  व मल्लेश्वरी  (१९५१) या चित्रपटांद्वारे बी. एन्. रेड्डी यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांच्या पेड्‌डामनिशूल (१९५४) व बंगारू पाप (१९५५) या चित्रपटांना केंद्र सरकारचे रौप्यपदकही मिळाले होते. नागी रेड्डी यांच्या विजय प्रॉडक्शन्सनेही उत्तम चित्रपट दिले आहेत. पाताल भैरवी (१९५१) या त्यांच्या अद्‌भुतरम्य चित्रपटात रहस्यमयता, रोमहर्षक प्रसंग व प्रणय दृश्ये यांची रेलचेल होती, तर पेल्ली चेसी चूडू  हा त्यांचा चित्रपट विनोदी होता. सोसायटी पिक्चर्ससाठी १९५३ साली एम्. एच्. एम्. मुनास यांनी सादर केलेला प्रपंचम् (तेलुगू) व उलगम् (तमिळ) या चित्रपटांनी एकाच वेळी १०१ चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याचा विक्रम केला होता. सी. पुलय्या यांचा सावित्री (१९५७) व लवकुश (१९६३) हे चित्रपट अतिशय गाजले. या चित्रपटांचे यश पाहून धनिक मंडळी या व्यवसायात भांडवल गुंतवायला तयार झाली. जेमिनी स्टुडिओनेही काही तेलुगू चित्रपट सादर केले आहेत. कांचनमालाची प्रमुख भूमिका असलेला बाल नागम्मा (१९४२) हा तेलुगू बोलपट एका लोककथेवर आधारित होता. यावरून पुढे जेमिनीने बहुत दिन हुए  हा हिंंदी बोलपट काढला. १९५० साली साधना पिक्चर्ससाठी निर्माते एल्. व्ही. प्रसाद यांनी संसारम् (तमिळ) हा एक उत्तम सामाजिक चित्रपट सादर केला होता. त्यावरूनच पुढील वर्षी जेमिनी स्टुडिओने संसार  हा हिंदी चित्रपट सादर केला. शोभनाचलाने त्याच वर्षी रझाकारांच्या पार्श्वभूमीवरील पल्लेतुरुपिल्ला  हा चित्रपट निर्माण केला होता. पुढे याच बोलपटावरून जेमिनीने १९५५ साली इन्सानियत  हा हिंदी चित्रपट तयार केला होता. १९५० सालीच सारथी पिक्चर्सने रोझुलू मरायी  हा चित्रपट तयार केला होता. त्यात हिंदीतील प्रख्यात अभिनेत्री वहिदा रहेमान हिची भूमिका होती. नॅशनल फिल्म आर्ट्सचा तोडू डोंगलू (१९५४) व भरणी पिक्चर्सचा विप्रनारायण (१९५५) हे चित्रपटही उल्लेखनीय होते. पुष्कळसे चित्रपट तमिळ व तेलुगू भाषेत एकदम तयार होतात किंवा त्यांचे भाषांतरण तरी करतात. शिवाय कन्नड व मलयाळम् या भाषांतही बऱ्याच वेळा त्यांचे भाषांतरण केले जाते. दाक्षिणात्य भाषेत जसे प्रत्यक्ष चित्रीकरण करून चित्रपट तयार होतात तसेच भाषांतरण करूनही होत असतात. तेलुगू चित्रपटसृष्टीत सी. पुलय्या, बी. नागी रेड्डी, के. व्ही. रेड्डी, पी. एस. रामाकृष्णराव हे आणखी काही प्रसिद्ध तेलुगू चित्रपटनिर्माते, तर सावित्री, जमुना, देविका, नागय्या, रेलंगी, बी. आर्. पंथुलु हे तिकडील कलावंत आहेत. बी. आर्. पंथुलु हे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शकही आहेत. अर्धांगिनी (१९५५), तेन्नाली रामकृष्ण (१९५६), पेल्लीनाटी प्रमाणलू (१९५८), नम्मीन बंतु (१९५९), महाकवि कालीदास (१९६०), भार्या भरतलु (१९६१), महामंत्री तिम्मरासु (१९६२), डॉ. चक्रवर्ती (१९६४) या चित्रपटांना राष्ट्रपतिरौप्यपदके व गुणवत्ता प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. बी. एन्. रेड्डी यांचा थोडु नीदा (१९६५) व ए. सुब्बाराव यांचा सुडी गुंडलु (१९६७) हे दोन चांगले तेलुगू चित्रपट होते. एन्. टी. रामाराव, ए. नागेश्वरराव, अंजलीदेवी, भानुमती, वरलक्ष्मी रंजनी यांसाखे जाणते कलावंत तमिळ आणि तेलुगू या दोन्ही भाषेतील चित्रपटात सफाईने कामे करतात. एन्. टी. रामाराव आणि ए. नागेश्वरराव यांची लोकप्रियता तर कित्येक दिवस टिकून आहे. १९७४ मध्ये ७४ तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाले असून सुरुवातीपासून आतापर्यंत १,३३० तेलुगू चित्रपट निर्माण झाले आहेत.

कन्नड : बंगलोर येथे १९२९ साली स्थापन केलेल्या आपल्या सूर्य फिल्म कंपनीसाठी हरिभाई आर्. देसाई यांनी पहिल्या चार वर्षांत ३८ मूकपट तयार केले होते. निर्माता, दिग्दर्शक व लेखक म्हणून त्यांचा पुढे अनेक तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांशी संबंध आला. त्या वेळी मुंबई, कलकत्ता, नासिक, पुणे व कोल्हापूर यांच्या खालोखाल चित्रपटनिर्मिति केंद्र म्हणून बंगलोरचा क्रमांक होता. १९३४ साली दोन कन्नड बोलपट निघाले. जयवाणी टॉकीजने ध्रुवकुमार  हा पहिला कन्नड बोलपट सादर केला. त्यात प्रमुख भूमिका मा. मुत्तू व कनकलक्ष्मी यांच्या होत्या आणि दिग्दर्शक होते जयवंत. दुसरा बोलपट साऊथ इंडिया मुव्हिटोनचा सती सुलोचना  हा होता. १९३५ साली सदारामा  हा शकुंतला फिल्म्स्‌चा एकच कन्नड बोलपट निघाला. हे तीनही बोलपट मुंबईतच तयार झाले होते. देवी फिल्म्स्‌चा संसारनौका  हा १९३६ साली निघालेला मद्रासमधील पहिला कन्नड बोलपट होय. तो बराच गाजला. त्याचे दिग्दर्शक होते पुरूषोत्तम दास व प्रमुख कलावंत एम्. व्ही. राजम्मा आणि बी. आर्. पंथुलु. देवी फिल्म्स्‌ने १९३७ साली पुरंदरदास  हा चित्रपट कन्नड व तमिळ भाषांत सादर केला. त्याच वर्षी मद्रासला राजसूय  व पुण्याला चिरंजीवी  असे आणखी दोन कन्नड बोलपट निघाले. चिरंजीवीचे दिग्दर्शन के. पी. भावे यांनी केले होते. त्यानंतर पुढील तीन वर्षे कन्नड चित्रपटांची निर्मिती झालीच नाही. १९४१ पासून पुन्हा कन्नड बोलपट निघू लागले. १९५४ मध्ये त्यांची संख्या ११ होती. त्या वर्षी गुब्बी फिल्म्स्‌चा बेदर कन्नपा  व पुढील वर्षीचा ललितकला या संस्थेचा महाकवी कालिदास या चित्रपटांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रशस्तिपत्रे मिळाली होती. १९४९ पर्यंत एखादा तरी कन्नड चित्रपट महाराष्ट्रात तयार होई परंतु १९५० पासून ते मद्रासला निघू लागले. प्रेमदा पुत्री (१९५७), स्कूल मास्टर (१९५८), संत तुकाराम (१९६३), चंदवालिया थोटा (१९६४), सत्य हरिश्चंद्र (१९६५), संध्याराग (१९६६) आणि अबच्युरीना पोस्ट ऑफिस (१९७३) या कन्नड चित्रपटांना रौप्यपदके मिळाली आहेत. कन्नड चित्रपटसृष्टी उभारण्यास  ⇨ वीराण्णा गुब्बी, के. हीरानाथ, आर्. नागेंद्रराव, सुब्बय्या नायडू यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. सुब्बय्या नायडू व नागेंद्रराव यांनी एस्. एस्. एस्. नाटक मंडळी स्थापन केली होती परंतु हळूहळू इतर दाक्षिणात्य नाट्यसंस्थांतील कलावंतांप्रमाणे त्यांनाही चित्रपटसृष्टीकडे वळावे लागले.

इतर दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे प्रारंभी कन्नड चित्रपटांचेही विषय प्रायः पौराणिकच असत. पुरंदरदास, बेदर कन्नप्पा  यांप्रमाणे गुब्बी फिल्म्सच्या हेमरेड्डी मल्लम्मा (१९४५) हाही भक्तिप्रधान बोलपट होता. हे तीनही चित्रपट चांगले चालले. हेमरेड्डी मल्लम्मा  तर अतिशय लोकप्रिय झाला होता.

'काडु', १९७३. काही तमिळ निर्माते तमिळ चित्रपट कन्नडमध्ये भाषांतरित (डब) करतात. पुष्कळसे कन्नड चित्रपट तमिळ-तेलुगू भाषांत यशस्वी झालेल्या चित्रपटांवरूनच तयार केले जातात. १९५४ ते १९६३ या काळात वर्षाला वीसदेखील कन्नड चित्रपट निघत नसत. पुढे मात्र हे प्रमाण तीसपेक्षा अधिक झाले. आर्. नागेंद्रराव यांनी आर्. एन्. आर्. प्रॉडक्शनसाठी तयार केलेला जातक फला (१९५३), एच्. एल्. एम्. सिन्हा यांनी गुब्बी फिल्म्ससाठी तयार केलेला बेदर कन्नप्पा (१९५४) आणि बी. व्ही. आचार्य यांनी विठ्ठल प्रॉडक्शनसाठी तयार केलेला कन्यादान (१९५४) हे चित्रपट उल्लेखनीय आहेत.

एल्. लक्ष्मीनारायण यांच्या उय्याले (१९६९) या चित्रपटाचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. तथापि यानंतर कन्नड चित्रपटांना खरा कलात्मक घाट गिरीश कार्नाड यांनी दिला. समस्कारा  हा एक दाक्षिणात्य चित्रपटांतील उत्कृष्ट चित्रपट होय. या चित्रपटाला १९७० चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपतिसुवर्णपदक मिळाले. त्यात गिरीश कार्नाड यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय स्नेहलता रेड्डी, पी. लंकेश, बी. आर्. जयराम यांच्याही भूमिका होत्या. दिग्दर्शन टी. पट्टाभिराम रेड्डी यांचे होते. गिरीश कार्नाड आणि बी. व्ही. करंत या दोन दिग्दर्शकांना १९७२ च्या वंशवृक्ष  या चित्रपटाबद्दल दिग्दर्शनाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. आतापर्यंत अखिल भारतीय पुरस्कार लाभलेले कन्नड चित्रपट असे : गेज्जे पूजे (१९६९) सर्वोत्तम पटकथा : एस्. आर्. पुट्टणा कनगल समस्कारा (१९७०) : सर्वोत्तम चित्रपट काडु (१९७३) : दिग्दर्शनाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक : गिरीश कार्नाड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : नंदिनी भक्तवत्सला सर्वोत्कृष्ट बालकलाकार : जी. एस्. नटराज उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट म्हणून १९७४ चा कंकण  हा कन्नड चित्रपट निवडला गेला होता.

जयम्ना, एम्. व्ही. राजम्ना, नागेंद्रराव, सुब्बय्या नायडू, होनाप्पा भागवतर, अश्वत्थामा यांसारख्या कसलेल्या कलावंतांनी तमिळ-तेलुगू चित्रपटांतूनही समर्थपणे भूमिका केल्या आहेत. यांशिवाय पंढरीबाई, हरिणी, सूर्यकला, कृष्णाकुमारी, राज सुलोचना, राजकुमार, नृसिंह राजू, उदयकुमार, भारती, कल्पना, बी. सरोजादेवी, के. एस्. अश्वत्थ व जयंती या कन्नड कलावंतांनी कन्नड बोलपटाच्या प्रगतीस हातभार लावला. द. रा. बोंद्रे, ए. व्ही. कृष्णराव, टी. आर्.सुब्बाराव, सदाशिवय्या यांसारख्या मान्यवर कन्नड साहित्यिकांचे सहकार्य कन्नड चित्रपटसृष्टीला लाभले आहे.

कन्नड चित्रपटांची निर्मिती प्रथम महाराष्ट्रात म्हणजे मुंबई व कोल्हापूर येथे प्रामुख्याने झाली. नंतर बरेचसे कन्नड चित्रपट मद्रासला तयार होऊ लागले, पण स्वातंत्र्योत्तर काळात म्हैसूर हे कन्नड चित्रपटांचे केंद्र बनत आहे. म्हैसूरला आता प्रिमियर फिल्म स्टुडिओ हे फार मोठे चित्रपटनिर्मितिगृह तयार झाले आहे. कर्नाटक सरकारने, कर्नाटकात तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला एक लाख रु. व रंगीत चित्रपटाला दीड लाख रु. अनुदान देण्याची योजना अंमलात आणल्यापासून कन्नड चित्रपट साहजिकच कर्नाटकात तयार होऊ लागले आहेत. शिवाय आता इतरही दाक्षिणात्य भाषांतील चित्रपट म्हैसूरच्या प्रिमियर चित्रपटनिर्मितिगृहात तयार होत आहेत.

बंगलोरलाही चार चित्रपटनिर्मितिगृहे आहेत. कर्नाटक सरकारने म्हैसूर व बंगलोरला चित्रपटनिर्मितिगृहे उभारण्यास आर्थिक साहाय्य दिलेले आहे. १९७४ साली ३० कन्नड चित्रपट प्रदर्शित झाले, तर १९७४ अखेर एकूण ४८७ कन्नड चित्रपट निघाले आहेत.

मलयाळम् चित्रपट : जे. सी. डॅनिअल यांनी १९२८ साली विगताकुमारन्  हा पहिला मलयाळम् मूकपट तयार केला. त्याचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक व प्रमुख कलाकार तेच होते. त्यांनी एक तात्पुरते चित्रपटनिर्मितिगृहही उभारले होते परंतु या चित्रपटामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. चित्रपटनिर्मितिगृहही गेले, त्यामुळे ते पुन्हा चित्रपटनिर्मितिकडे वळलेच नाहीत. त्या चित्रपटाची प्रत किंवा इतर साहित्य यांपैकी आता काहीच शिल्लक नाही परंतु सी. व्ही. पिलाई यांच्या मार्तंड वर्मा  या गाजलेल्या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट सुंदराज यांनी सादर केला. याची प्रत मिळविण्यात मात्र पुण्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यशस्वी झाले. तथापि या दोन्ही चित्रपटांची अधिकृत नोंद चित्रपट अभ्यवेक्षण मंडळाच्या दप्तरी नाही.

सलेमच्या मॉडर्न थिएटर्सचे टी. आर्. सुंदरम् यांनी बालन  हा पहिला मलयाळम् बोलपट १९३८ साली सादर केला. त्यात के. एन्. लक्ष्मी व एस्. के. के. अरूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शक होते नोतानी. मॉडर्न थिएटर्स हे दक्षिण भारतातील सर्वांत जुने व सर्वात अधिक चित्रपट निर्माण केलेले केंद्र होय. मलयाळम् चित्रपटांची निर्मिती तेलुगू, तमिळ वा कन्नड चित्रपटांप्रमाणे महाराष्ट्र वा बंगाल येथे न होता फक्त मद्रासलाच होत असे. १९३९ मध्ये एकही मलयाळम् चित्रपट निघाला नाही. १९४० साली श्यामला पिक्चर्सचा ज्ञानांबिका व १९४१ मध्ये मद्रास युनायटेड आर्टिस्टचा प्रल्हाद  हा बोलपट निघाला. मलयाळम् चित्रपट सादर करणारी मंडळी तमिळ चित्रपटव्यावसायिक होती व केरळची बाजारपेठ मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. केरळात तमिळ चित्रपट चालत, पण मलयाळम् चित्रपटांना मात्र फारसा प्रतिसाद मिळत नसे. १९४२ ते १९४७ या सहा वर्षांत एकही मलयाळम् चित्रपट निघाला नाही. १९४८ साली केरळा टॉकीजचा निर्मला  व १९४९ साली उदय स्टुडिओचा वेल्ली नक्षत्रम्  हा बोलपट निघाला. १९५० साली मात्र सहा मल्याळम् बोलपट निर्माण झाले तरी १९५२ साल सोडले, तर १९६० सालापर्यंत मलयाळम् बोलपटांची निर्मिती दहाच्या पुढे कधी गेली नाही. सुरुवातीच्या कालखंडात बहुतेक लेखक, कलावंत, दिग्दर्शक हे रंगभूमीच्या क्षेत्रातील होते. चित्रपट ही नाटकाची सुधारलेली आवृत्ती आहे, असाच त्यांचा समज होता. या नव्या माध्यमाची नीटशी कल्पना त्यांना बरेच दिवस आली नाही.

'स्वंयवरम्', १९७२.

पुढे १९५० साली प्रदर्शित झालेल्या सहा मल्याळम् चित्रपटांपैकी पक्षीराज स्टुडिओचा प्रसन्ना  हा बोलपट खूपच लोकप्रिय झाला होता. १९५१ साली के. अँड के. प्रॉडक्शन्सचा जीवित नौका  हा बोलपट प्रथम तेलुगू व हिंदी या भाषांत तयार झालेला होता. तोच पुढे मलयाळम्‌मध्ये चित्रित करण्यात आला. ललिता, पद्मिनी व रागिणी या ‘त्रावणकोर भगिनी’ प्रसन्ना  या चित्रपटात प्रथम चमकल्या. मलयाळम् भाषेत तयार होणारे बोलपट तमिळ व तेलुगू या भाषांत यशस्वी झालेल्या बोलपटांवरून तयार करीत. एखादा चित्रपट एकमेकांच्या भाषेत भाषांतरित (डब) करण्याची प्रथा दाक्षिणात्य चित्रपटात प्रथमपासून आहे. पुढे मलयाळम् चित्रपटनिर्माते गाजलेली नाटके व साहित्यकृती यांकडे वळले. उदा., उरूब यांचा नील कुयील (१९५४) पी. केशव देव यांचा ओडयिल निन्नू (१९६४)  थोपील भासी यांचे मुडियानाय पुत्रन् (१९६१)  तुलाभारम् (१९६८) व यक्षी (१९६८) बशीर यांचा बाल्यकाला सखी (१९६७)  एम्. टी. वासुदेवन् नायर यांचे मरप्पेण (१९६५), इरुट्टिन्डे आत्माऊ (१९६६), आलेवूम तीरवूम् (१९६९) व तकझी शिवशंकर पिल्ले यांचा चेम्मीन (१९६५) इ. चित्रपटांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच मलयाळम् चित्रपटांना खरी चालना मिळाली. भारतात साक्षरतेचे प्रमाण केरळ राज्यात सर्वाधिक असल्याने गाजलेल्या साहित्यावरील बोलपट तेथे लोकप्रिय होऊ लागले परंतु मलयाळम् चित्रपटांची मर्यादित बाजारपेठ लक्षात घेऊन पौराणिक, कल्पनारम्य आणि ऐतिहासिक अशा खर्चिक चित्रपटांना फाटा देऊन सामाजिक विषयांवर माफक खर्चात बसतील असेच चित्रपट सादर केले जातात. केरळमधील निसर्गसौंदर्य आणि सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन तयार केलेले वास्तव कथानक हे मलयाळम् चित्रपटांचे वैशिष्ट्य असते. चंद्रात्रा प्रॉडक्शन्सच्या रामू करियटदिग्दर्शित नील कुयील (१९५४) या चित्रपटाला अखिल भारतीय गुणवत्तेचे प्रशस्तिपत्रक व राष्ट्रपतिरौप्यपदक मिळाले होते, त्यामुळे मलयाळम् चित्रपटसृष्टीत उत्साह वाढला. त्याच वर्षाचा असोशिएटेड पिक्चर्सचा स्नेह सीमा  हा एक उल्लेखनीय चित्रपट होय. १९५५ च्या न्यूज पेपर बॉय या चित्रपटाचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे कारण या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्याने केले तो महात्मा मेमोरिअल असोशिएटेड संस्थेचा तरुण निर्माता-दिग्दर्शक पी. रामदास त्यावेळी अवघा २० वर्षांचा होता. जगातील सर्वांत तरुण निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्याचे नाव आहे. त्याचा तो चित्रपटही चांगला होता. १९६४ पासून मात्र मलयाळम् चित्रपटनिर्मितीला वेग आला व तो वाढत गेला. वर्षाला ३० ते ४० मलयाळम् चित्रपट तयार होऊ लागले परंतु बहुतेक बोलपटांचा दर्जा सामान्यच होता. पुष्कळसे चित्रपट आर्थिक दृष्ट्या अयशस्वी होत. एस्. एस्. राजन्‌चा थाचोली ओथेनान (१९६४) व रामू करिअटचा चेम्मीन (१९६५) यांसारखे दर्जेदार चित्रपटही तयार झाले. कण्मणी पिक्चर्सचा चेम्मीन  या रंगीत बोलपटाचा परदेशातही गौरव झाला. या चित्रपटाने राष्ट्रपतिसुवर्णपदकही मिळविले. १९६८ च्या तुलाभारम्  या मलयाळम् चित्रपटाला राष्ट्रपतिरौप्यपदक प्राप्त झाले. १९७२ च्या अडूर गोपालकृष्ण यांच्या स्वयंवरम्  चित्रपटाने मात्र मलयाळम् चित्रपटाचे एक नवेच पर्व सुरू केले. हा चित्रपट पटकथा, दिग्दर्शन, तंत्र व अभिनय अशा सर्वच बाबतींत कोणत्याही सर्वांगसुंदर भारतीय बोलपटाच्या तोडीचा होता. ⇨ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया  या पुण्याच्या चित्रपटसंस्थेत शिक्षण घेतलेल्या अडूर गोपालकृष्ण या दिग्दर्शकाला त्या वर्षाचे उत्कृष्ट दिग्दर्शनाचे राष्ट्रीय पारितोषिक तर मिळालेच, शिवाय स्वयंवरम्  सर्वोत्कृष्ट ठरून या चित्रपटाला राष्ट्रपतिसुवर्णपदकही लाभले. १९७३ मध्येही निर्माल्यम्  हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरून त्याने राष्ट्रपतिसुवर्णपदकाचा मान मिळविला. निर्माल्यम्  हा चित्रपटाचे दिग्दर्शक एम्. टी. वासुदेवन् नायर हे एक अग्रगण्य कादंबरीकार, पटकथा लेखक असून त्यांनी आपले कौशल्य दिग्दर्शनातही प्रकट केले. ते स्वतः छायाचित्रणही उत्तम जाणतात. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ६० मलयाळम् चित्रपटांपैकी आर्थिक दृष्ट्या सु. चौदाच यशस्वी झाले. चांगल्या कथांची निवड व प्रगत चित्रपटतंत्र असूनही केरळ राज्यात चित्रपटांच्या उत्पन्नाला मर्यादा पडतात.

प्रेम नझीर, अदूर भाशी, थिक्कुरिषी, सुकुमारन् नायर, विनोदमूर्ती एस्. पी. पिल्ले, मुथुकुलम् राघव पिल्ले, कोट्टारकर श्रीधरन् नायर, बी. एस्. सरोजा, कुमारी, ललिता, पद्मिनी, शीला, जया भारती, बहाद्दूर, मधू, संकराडी, के. पी. उन्नर, पी. जे. अँथनी, सत्यन, शारदा आदी मलयाळम् चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार आहेत तर के. एस्. सेतुमाधवन्, शशीकुमार, पी. भास्करन्, ए. बी. राज, एम्. कृष्णन् नायर हे तेथील आणखी काही उल्लेखनीय दिग्दर्शक आहेत.

गुजराती चित्रपट : चंदुलाल शहा यांनी १९२७ साली गुणसुंदरी  हा गुजराती मूकपट सादर केला. त्यात प्रमुख भुमिकेत गोहर होती. पुढे १९३२ साली चिमणलाल बी. देसाई यांनी एक प्रयोग म्हणून नरसी मेहता  हा पहिला गुजराती बोलपट सादर केला. त्याचे दिग्दर्शक होते नानूभाई वकील व कलावंत होते मारूतराव पहेलवान, नूरजहाँ, मोहनलाल, उमाकांत, जमुना, मगन देसाई आणि मेहताब, यांतील काही कलावंत चित्रपटसृष्टीत बराच काळ होते. नानूभाई वकिलांनी पुढे बऱ्याच हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. चिमणलाल बी. देसाई हे सागर मुव्हिटोनचे एक भागीदार होते. त्याच वर्षी चंदुलाल शहा यांच्या रणजित मुव्हिटोनने सती सावित्री  हा पौराणिक चित्रपट काढला. नंतर मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सने संसार लीला (१९३४) व स्नेहलता (१९३६) या दोन गुजराती चित्रपटांची निर्मिती केली. त्यांत थोडेफार अधिक यश मिळाले. गुजराती चित्रपटांचे प्रेक्षक अल्पसंख्यच होते. उलट गुजराती भाषिक प्रेक्षक हिंदी चित्रपट आवडीने पाहत. त्यामुळे गुजराती चित्रपटांना आर्थिक लाभ अगदी जेमतेम होई. म्हणून चिमणलाल देसाई यांनी मोतीलाल व शोभना समर्थ या हिंदीतील प्रसिद्ध नायक-नायिका घेऊन कन्हय्यालाल मुन्शी यांच्या एका गाजलेल्या कादंबरीवर बे खराबजन  हा चित्रपट हिंदी व गुजराती भाषेत तयार केला (१९३७). त्या अगोदरच्या प्रिमियर फिल्म कंपनीने १९३५ साली घर-जमाई  हा सामाजिक चित्रपट सादर केला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. १९३६ साली तीन गुजराती चित्रपट निर्माण झाले. पुढे दोन वर्षे गुजराती चित्रपटांची निर्मिती झालीच नाही. १९३९ आणि १९४० यावर्षी एकेक गुजराती चित्रपट निघाला. एकूण गुजराती चित्रपटनिर्मिती अशी नगण्य होती. १९३९ सालचा अछूत  हा सरदार चंदुलाल शहा यांनी अस्पृश्यतेवर सादर केलेला बोलपट तांत्रिक दृष्ट्या पूर्वीच्या गुजराती चित्रपटांच्या मानाने बराच वरच्या दर्जाचा होता. तो गुजरातीबरोबर हिंदी भाषेत देखील निघाला (१९४०). मोतीलाल, गोहर व वासंती यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. व्ही. एम्. व्यास यांचा रानकदेवी (१९४६) या ऐतिहासिक चित्रपटाच्या उत्पन्नाने पूर्वीचे सर्व उच्चांक मोडले. त्यावर्षी हा एकच चित्रपट निघाला होता. व्ही. एम्. व्यास यांनी पुढेही गुजराती चित्रपट काढले. त्यांत नागदेवता (१९५५) विशेष चालला.

महायुद्धकाळात गुजराती चित्रपटसृष्टी थंडावली होती परंतु फिल्मवरील निर्बंध दूर झाल्यावर रतिलाल पुनातर यांनी गुणसुंदरी  हा अत्यंत यशस्वी चित्रपट सादर केला. यातील प्रमुख कलावंत निरूपा रॉय व मनहर देसाई यांना या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचा मार्ग खुला झाला (१९४८). रतिलाल पुनातर यांनी आपल्या अजित पिक्चर्सतर्फे मंगल फेरा  व गाडोनोबेल  हे दोन यशस्वी चित्रपट सादर केले परंतु गुजराती चित्रपट कितीही यशस्वी झाले, तरी त्यांना हिंदी चित्रपटाकडेच वळावे लागले.


चिमणलाल बी. देसाई यांचा १९४८ मधील करियावर  हा उपहासात्मक चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. त्या काळातील सती अनलदे, शामल शहानो विवाह, वेवी शाला, दिवा दांडी, बहार वटियो, जेसल तोरल, वारसदार, हरिश्चंद्र, लग्नमंडप  हे १९४७-४८ मधील काही उल्लेखनीय गुजराती बोलपट आहेत. १९४८ साली सर्वांत अधिक म्हणजे २७ व १९४९ साली १७, तर १९५० साली १३ गुजराती चित्रपट निघाले. त्यानंतर गुजराती चित्रपटांची निर्मिती कमी होऊ लागली. १९७० नंतर ती सरासरी ५ आहे.

'कंकु', १९६९. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिला तीन वर्षे मराठी, मलयाळम्, तेलुगू वा कन्नड चित्रपटांपेक्षा गुजराती चित्रपटांची संख्या अधिक होती. रानकदेवीच्या अपूर्व यशाने गुजराती चित्रपटांची निर्मिती वाढली होती परंतु ती हळूहळू घसरत गेली. सर्वच प्रादेशिक चित्रपटांना हिंदी चित्रपटांशी चढाओढ करणे अवघड होऊन बसले. हिंदीच्या साच्यात प्रादेशिक चित्रपट तयार करून चालत नाही, तसेच हिंदीसारखे चित्रपट बनवायचे, तर अफाट खर्च करावा लागतो. मुंबईसारख्या ठिकाणी चित्रपटनिर्मितीच्या सर्व सोयी उपलब्ध असूनही त्याचा फायदा गुजराती चित्रपटनिर्माते घेऊ शकले नाहीत. ज्या वेळी यशस्वी हिंदी चित्रपटांची नक्कल करून गुजराती चित्रपटनिर्मिती वाढली होती, त्या काळात मंगल फेरा (१९४९) किंवा चुडी चांडलो  (१९५०) यांसारखे चित्रपट देण्याचा प्रयत्न झाला. तथापि गुजराती प्रेक्षक आकर्षित करण्यात हे चित्रपट अपयशी ठरले. १९५६ चे चामशीभाई नागडांचे माळेला जीव  हा चित्रपट एका गाजलेल्या कादंबरीवर आधारलेला असूनही तो फारसा यशस्वी झाला नाही.

कांतिलाल राठोड यांच्या कंकु  (१९६९) या चित्रपटाला १९७० साली शिकागो येथील जागतिक चित्रपटमहोत्सवात पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक पल्लवी मेहता या नायिकेला लाभले. या चित्रपटाने गुजराती चित्रपटांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत केल्या व १९७१ साली तीन, १९७२ साली चार, १९७३ साली पाच, तर १९७४ साली सात गुजराती चित्रपट प्रदर्शित झाले. एकूण चित्रपटनिर्मितीत थोडीथोडी वाढ होत गेली. याचे कारण बडोद्याला लक्ष्मी फिल्म स्टुडिओची उभारणी, तसेच राज्य शासनाने देऊ केलेले साहाय्य हे आहे. याशिवाय गुजरात राज्यात तयार होणाऱ्या चित्रपटांच्या पहिल्या आठ प्रतींचा सहा महिन्यांपर्यंत करमणूक कर माफ केलेला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रविंद्र दवे हे सर्वांत यशस्वी दिग्दर्शक आहेत. जेसल तोरल (१९७१), राजा भर्तृहरी (१९७३) आणि होताल पद्मिनी  व कुवरबाईनु मामेरु (१९७४) हे त्यांचे चित्रपट बरेच गाजले तसेच ते आर्थिक दृष्ट्याही यशस्वी ठरले. गुणसुंदरीनो घरसंसार  या चित्रपटाला तर १९७२ चे सर्वोत्तम चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिही मिळाले. बाबुभाई मिस्त्रीदिग्दर्शित रानकदेवी (१९७३) हाही यशस्वी चित्रपट होता.

पंजाबी चित्रपट : पंजाबची फाळणी झाली व लाहोर हे महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र पाकिस्तानमध्ये गेले. विभाजन झालेल्या पंजाबमध्ये चित्रपटव्यवसायाची अतिशय हानी झाली. मूकपटाच्या जमान्यात पंजाबमध्ये ए. आर्. करदार यांचे युनायटेड प्लेअर्स कार्पोरेशन व आर्. एल्. शोरे यांचे पंजाब फिल्म कंपनी ही दोन चित्रपटनिर्मितीगृहे होती. इष्क-ए-पंजाब  हा हिंदमाता सिनेटोनने १९३५ साली मुंबईत तयार केलेला पहिलाच पंजाबी बोलपट तयार झाला. १९३६ सालीही शीला  हा एकच पंजाबी बोलपट कलकत्त्याच्या मादन थिएटर्स लि. ने सादर केला. पुढील वर्षी एकही पंजाबी बोलपट निघाला नाही. १९३८ साली पुन्हा हीर सिआल  हा एकच पंजाबी बोलपट निघाला. हा इंद्र मुव्हिटोनने कलकत्त्याला तयार केला होता. १९३९ साल पंजाबी चित्रपटाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले कारण त्या वर्षी सात पंजाबी बोलपट निघाले. पैकी चार कलकत्त्यात, एक मुंबईत व दोन पंजाबमध्ये तयार झाले. पांचोली आर्ट पिक्चर्सचा गुलबकावली  हा पंजाबमधील पहिला पंजाबी बोलपट होय. त्याच वर्षी कमला मुव्हिटोनने सोनी महिवाल हा बोलपट सादर केला. ही पंजाबमधील सुरुवातीची बोलपटनिर्मिती होती. १९४० सालीही सात पंजाबी बोलपट निर्माण झाले. पैकी तीन कलकत्त्यात व चार पंजाबमध्ये. त्यांपैकी पांचोली आर्ट पिक्चर्सच्या यमला जाटमध्ये पुढे हिंदीत मोठे नाव कमावलेली गायक अभिनेत्री नूरजहाँ प्रथम चमकली. अलिबाबा चाळीस चोर  हा चित्रपट मुंबईच्या सागर मुव्हिटोनने तमिळ, तेलुगू, गुजराती या भाषांप्रमाणेच पंजाबी भाषेतही तयार केला पण तो यशस्वी झाला नाही. १९४१ पासून मात्र पंजाबी बोलपटांची निर्मिती मुख्यतः पंजाबमध्ये होऊ लागली. १९४३, ४५, ४७, ५२, ५५ आणि १९५६ या सहा वर्षांत एकही पंजाबी चित्रपट निघाला नाही. चित्रपटसृष्टीची वाढ होण्यास पंजाबमध्ये पुष्कळ वाव आहे परंतु जे थोडेफार प्रयत्न झाले, ते हिंदी चित्रपटांसाठीच झाले.

लाहोर पाकिस्तानात जाण्यापूर्वी पंजाबी चित्रपटांची निर्मिती वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु विभाजनानंतर पंजाबी चित्रपटांची निर्मिती कमी झाली. १९६१ मध्ये पाच पंजाबी चित्रपट निर्माण झाले, तर १९६४ साली आठ हा पंजाबी चित्रपटांच्या निर्मितीचा उच्चांक होय. दिग्दर्शक जुगल किशोर यांचे जग्गा (१९६४) आणि दिग्दर्शक पी. पी. महेश्वरी यांचे सतलज दे कंडे (१९६७) या पंजाबी चित्रपटांना रौप्यपदक मिळाले, तर नानकनाम जहाज (१९६९) या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्तम संगीतदिग्दर्शनाचे राष्ट्रीय पारितोषिक एस्. मोहिंदर यांना लाभले.

'सतलज दे कंडे', १९६७. बहुतेक सर्व पंजाबी चित्रपटांची निर्मिती मुंबईतच होते. विशेष म्हणजे त्यांतील बरेच चित्रपट रंगीत असतात. हे चित्रपट तेथील लोककथांवर आधारित असले, तरी ते आर्थिक दृष्ट्या यशस्वी व्हावे, म्हणून त्यांत नेहमीच्या आकर्षक बाबी वापरल्या जातात. परिणामतः पंजाबी समाजाचे खास दर्शन पंजाबी बोलपटांतून घडत नाही. कितीतरी पंजाबी अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आज हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीवर आहेत पण ते सर्व हिंदी बोलपटांतच मग्न आहेत. पंजाबमधील निर्मात्यांनी काही हिंदी बोलपट सादर केले आहेत. त्यांपैकी कमला मुव्हिटोनने काढलेला राधेश्याम (१९३२) हा पहिला हिंदी बोलपट. १९४१ साली पांचोली आर्ट पिक्चर्सने लाहोर येथे तयार केलेला खजांची  हा हिंदी चित्रपट त्या काळी अतिशय गाजलेला होता. या चित्रपटापासून पंजाबी ढंगाचे, उडत्या चालीचे संगीत लोकप्रिय झाले. खजांची  चित्रपटात हिंदी चित्रपटनिर्माते एस्. डी. नारंग नायक होते, तर संगीतकार गुलाम हैदर होते. त्यावर्षी पंजाबमध्ये सात हिंंदी चित्रपट निघाले होते. पांचोली आर्ट पिक्चर्सचा खानदानही असाच यशस्वी झाला (१९४२). हिंदी चित्रपटसृष्टीतील अग्रेसर अभिनेता प्राण हे या चित्रपटाचे नायक होते. प्रधान पिक्चर्सचा दासी (१९४४) हा एक उत्तम हिंदी चित्रपट होता. रामनारायण दवे यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्यातील प्रमुख कलावंत रागिणी, नजम, ग्यानी, कलावती, ओमप्रकाश, नजमलहुसेन, बेबी प्रवीण इ. होते. जमीनदार (१९४२) हा पांचोली आर्ट पिक्चर्सचा आणखी एक यशस्वी चित्रपट. यात शांता आपटे नायिका होती. पांचोली आर्ट पिक्चर्सचे लाहोरला स्वतःचे चित्रपटनिर्मितिगृह होते. १९७४ अखेरपर्यंत सु. १११ पंजाबी बोलपट तयार झाले आहेत. १९७३ साली निर्माण झालेल्या पाच पंजाबी बोलपटांपैकी चार रंगीत होते, तर १९७४ साली निर्माण झालेले चारही पंजाबी बोलपट रंगीत होते, हे विशेष होय. पंजाबी चित्रपटांची निर्मिती पंजाबमध्येच व्हावी म्हणून चंडीगढजवळ सरकारी प्रयत्नाने पंजाब फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चित्रपटनिर्मितिगृह उभारणार असून पंजाबमध्ये तयार होणाऱ्या पंजाबी चित्रपटांना त्याच्यामार्फत आर्थिक साहाय्य मिळणार आहे. या संस्थेची चित्रपटगृहे उभारण्याचीही योजना आहे.

'अमरा बाटा', १९६४. ओडिया चित्रपट : काली फिल्म्सने सितार विवाह  हा १९३६ साली ओडिया भाषेतील पहिला बोलपट कलकत्त्याला निर्माण केला. पुढे बारा वर्षांनी म्हणजे १९४८ साली ग्रेट ईस्टर्न मुव्हिटोनने ललिता  हा ओडिया बोलपट सादर केला. १९४९, ५२, ५५, ५८ आणि १९७० मध्ये ओडिया चित्रपट तयार झालेच नाहीत. १९६२ साली सर्वाधिक म्हणजे सात व त्याअगोदर १९६० साली पाच ओडिया बोलपट प्रदर्शित झाले होते. १९६० पूर्वी जे बारा ओडिया चित्रपट निघाले, त्यांत दहा पौराणिक होते. ओरिसामध्ये तेलुगू भाषिकांची संख्या बरीच असल्यामुळे तेथे तेलुगू पौराणिक चित्रपटांचा प्रभाव विशेष आहे. यांच्याशी स्पर्धा करून ओडिया भाषेत असे पौराणिक चित्रपट काढणे, अर्थातच खर्चाच्या दृष्टीने परवडत नाही. म्हणून ओडिया भाषेत सामाजिक चित्रपटनिर्मितीकडे अधिक कल दिसून येतो. बसंतकुमारी पटनाइक यांच्या कथाधारे निर्मिलेला अमरा बाटा (१९६४) व के. सी. महंती यांच्या कथेवरून तयार केलेला का (१९६५) हे चित्रपट ओरिसातील जीवनाचे वास्तव दर्शन घडवितात. ओडिया भाषेतील चित्रपटांना प्रेक्षक मोजकाच असतो. काही निर्मात्यांनी हिंदी चित्रपटांसारखे खर्चिक चित्रपट सादर करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांचे आर्थिक नुकसानच झाले. म्हणून काटकसरीने चित्रपट सादर करण्याखेरीज गत्यंतर नाही, हे तेथील चित्रपटनिर्मित्यांनी ओळखले. त्यामुळे आता भारी मोटार गाडीतून भ्रमण करणारी नायिकाही ओडिया चित्रपटांत सहसा मिळत नाही. तेथील निसर्गसौंदर्य, शिल्पसुंदर मंदिरे इत्यादींचा उपयोग ओडिया चित्रपटात आढळतो. ओडिया चित्रपट बहुतेक बंगाली दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले आहेत. कालिंदीचरण पाणिग्रही यांच्या गाजलेल्या कादंबरीवरून मृणाल सेनसारख्या बंगालच्या समर्थ दिग्दर्शकाने तयार केलेला मटीर मनीष (१९६६) हा ओडिया भाषेतील एक उत्कृष्ट चित्रपट परंतु प्रेक्षकांना तो रुचला नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण स्थानिक निसर्गसान्निध्यात झाले होते. मा. मनीष, प्रसन्नता, नंदा, शरत पुजारी, भानुमति आणि सुजाता यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. ओडिया चित्रपटसृष्टीत जिचा प्रामुख्याने उल्लेख केलाच पाहिजे ती पार्वती घोष ही चित्रपटनिर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री व लेखिका म्हणून अतिशय यशस्वी आहे. लक्ष्मी (१९६२), का (१९६५) आणि स्त्री (१९६९) या तिच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तिचे यजमान गौरप्रसाद घोष हेही उत्तम अभिनेते व दिग्दर्शक आहेत. पार्वती घोषने श्री जगन्नाथ  या ओडियी चित्रपटात बालपणी कृष्णाची भूमिका केली होती (१९५०). तेव्हापासूनच तिचा चित्रपटसृष्टीशी संबंध आहे. ती स्वतः वेषभूषाकारही आहे. ओडिया चित्रपटसृष्टीत पार्वती घोषला फार मानाचे व महत्त्वाचे स्थान आहे.

ओडिया चित्रपटांपैकी श्री लोकनाथ (१९६०), जीवनसाथी (१९६३), साधना (१९६४), मटीर मनीष (१९६६), अरुंधती (१९६७), स्त्री (१९६९) या चित्रपटांना राष्ट्रीय रौप्यपदके मिळाली आहेत, तर अदिना मेघा (१९६९) व संसार (१९७१) यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ओरिसामध्ये चित्रपटनिर्मितिगृह किंवा रसायनशाळा नाहीत. छायाचित्रकार मिळत नाहीत म्हणून ओडिया चित्रपटनिर्मात्यांना कलकत्त्याला धाव घ्यावी लागते. आतापर्यंत सु. ४८ ओडिया बोलपट निघाले आहेत.

'लोटीघोटी', १९६६. असमिया चित्रपट : ओडिया चित्रपटांप्रमाणे बहुतेक असमिया चित्रपट बंगाली दिग्दर्शकांनीच दिग्दर्शित केले आहेत. हे बंगाली दिग्दर्शक आसाममधील रीतिरिवाजांशी फारसे परिचित नसल्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट अस्सल वाटत नाहीत. चित्रकला मुव्हिटोनने सादर केलेला योगमती  हा पहिला असमिया बोलपट होय (१९३५). त्यानंतर १९३९ मध्ये त्याच संस्थेने इंद्रमालती  हा दुसरा चित्रपट सादर केला. १९४१ साली मनोमती  हा चित्रपट आरोरा फिल्म कॉर्पोरेशनने काढला. पुढील सहा वर्षे असमिया चित्रपट निघालेच नाहीत. १९४७ व १९४९ साली प्रत्येकी दोन असमिया चित्रपट निघाले. १९५३ साली मात्र एकच असमिया चित्रपट निघाला, तथापि तेथून पुढे असमिया चित्रपटांची निर्मिती बरीचशी नियमित झाली. पुन्हा १९६०-६२-६५ मध्ये एकही असमिया चित्रपट निघाला नाही. त्यानंतर मात्र १९७४ पर्यंत चित्रपटनिर्मिती अखंडपणे चालू राहिली. रोंगा पोलीस (१९५८), पूबेरून (१९५९), शकुंतला (१९६१) यांतील काही भाग रंगीत होता, तर लोटीघोटी (१९६६) व अरण्य (१९७१) यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि ममता (१९७३) या चित्रपटाला रौप्यपदक मिळाले आहे.

डॉ. भूपेन हजारिका यांचा आसामी लोककथेवर आधारित कामरूप चित्रचा प्रतिध्वनि  हा चित्रपट मात्र आसामी लोकांना आपलासा वाटला. डॉ. भूपेन हजारिका हे आसामचेच असल्याने त्यांनी आसामी लोकगीतांचा त्यात वापर केला होता. या चित्रपटालाही रौप्यपदक प्राप्त झाले होतेच (१९६४). कलावंत-दिग्दर्शक ब्रिजने बरुआ यांनी तयार केलेला चौधरी चित्रायनचा मणिराम दिवान (१९६३) आणि रंगधर सिनेप्रॉडक्शनचा डॉ. बेझ बरुआ  हे चित्रपटही उल्लेखनीय आहेत.

ब्रिजने बरुआ हे असमिया चित्रपटातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, संगीतदिग्दर्शक व नट आहेत. बरुआ आर्ट प्रॉडक्शनच्या स्मृतीरापारश (१९५६) या चित्रपटामुळे ते पुढे आले. काटकसरीने चित्रपट कसा काढावा हे त्यांनी या चित्रपटाद्वारे सिद्ध केले. त्याच्या पुढच्या वर्षी एरा बाटोर सूर  या चित्रपटामुळे दिग्दर्शक-कलावंत डॉ. भूपेन हजारिका यांचे नाव गाजले. लोटीघोटी (१९६६) चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक संपादन केलेले विजय शंकर हे आसाममधील प्रख्यात अभिनेते आहेत.

असमिया चित्रपटांना बाजारपेठ फारच मर्यादित आहे. त्यामुळे येथे चित्रपटनिर्मितीही फार कमी असते. १९६७ पर्यंत सर्व असमिया चित्रपट कलकत्ता येथे तयार होत असत परंतु राज्य सरकारने १९६७ साली २१ लाख रु. खर्च करून गौहाती येथे ज्योति चित्रबन हे एक सुसज्ज चित्रपटनिर्मितिगृह उभारले आहे. ज्यांनी पहिला असमिया चित्रपट सादर केला, त्या ज्योति प्रसाद यांचे नाव या चित्रपटनिर्मितिगृहास दिले आहे. १९७४ अखेरपर्यंत ६४ चित्रपट निघाले आहेत. १९७१ मधील पाच चित्रपटांपैकी जग बियोग  व मानव और दानव  हे चित्रपट यशस्वी झाले होते, तर १९७२ च्या सात आणि १९७३ च्या नऊ चित्रपटांपैकी दोन दोन चित्रपट यशस्वी झाले होते.

इतर भाषिक भारतीय चित्रपट : भारतात १९७४ अखेरपर्यंत एकूण सु. ३४ भाषांत बोलपट तयार झाले. त्यांपैकी अकरा प्रमुख भाषांतील चित्रपटांचा संक्षिप्त आढावा स्वतंत्रपणे वर दिला आहे. उरलेल्या २३ भाषांत बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट निघाले आहेत. त्यांत इंग्रजी बोलपटांची संख्या सर्वांत अधिक म्हणजे २६ आहे. काही भाषांत एक वा दोनच बोलपट निघाले आहेत. त्या २३ भाषा अशा : इंग्रजी, फार्सी, इराणी, अरबी, सिंहली, जर्मन, कोकणी, नेपाली, सिंधी, राजस्थानी, भोजपुरी, पुश्तू, मारवाडी, अवधी, डोगरी, मागधी, काश्मीरी, छत्तीसगडी, मैथिली, तुळू, कोडगू, मणिपुरी व थाई.

हिमांशु रॉय यांच्या इंडो इंटरनॅशनल टॉकीजने नूरजहाँ  हा १९३२ साली पहिला इंग्रजी बोलपट सादर केला, तर १९३३ साली कर्म  हा दुसरा इंग्रजी बोलपट त्याच संस्थेने तयार केला. पुढील आठ वर्षांत भारतात इंग्रजी चित्रपट निघाला नाही. १९४१ साली वाडिया मुव्हिटोनने कोर्ट डान्सर  प्रदर्शित केला. तो हिंदी व बंगालीतही होता. हा इंग्रजी चित्रपट संपूर्ण भारतीय बनावटीचा होता. याचे प्रकाशन मुंबईच्या मेट्रो टॉकीजमध्ये झाले. हा चित्रपट अमेरिकेतही दाखविला गेला. १९५४ साली निर्माते-दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांनी पु. ल. देशपांडे यांचा महात्मा  चित्रपट मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांत सादर केला. पुढे १९७२ साली सर्वांत अधिक म्हणजे तीन इंग्रजी चित्रपट निघाले. १९७४ साली भारतीय चित्रपट विभागाने द व्हिक्टरी स्टोरी  हा माहितीपटवजा चित्रपट १९७१ ते १९७३ या काळातील भारतीय क्रिकेटच्या विजयमालिकेवर तयार केला होता. त्या वर्षी एवढाच एक इंग्रजी चित्रपट निघाला.

नऊ फार्सी बोलपट १९७४ पर्यंत तयार झाले. १९३३ साली मुंबईच्या इंपीरिअल फिल्म कंपनीने दुरन्तरे हूर हा पहिला फार्सी बोलपट सादर केला. त्यानंतर ओळीने तीन वर्षे फार्सी बोलपट निघाले. उदा., फिरदोसी (१९३४), इंपीरिअल फिल्म कंपनी ब्लॅक आईज (१९३५), श्रीकृष्ण फिल्म शिरीन् फराद् (१९३५) इंपीरिअल फिल्म कंपनी लैला मजनू (१९३६), ईस्ट इंडिया फिल्म कंपनी इत्यादी. त्यानंतर १९४७ साली मुंबई मिनर्व्हा मुव्हिटोनने सिकंदर  सादर केला. त्या वर्षी आणखी दोन फार्सी बोलपट निघाले. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९५७ साली एकच फार्सी बोलपट निघाला. यापुढे मात्र १९७४ पर्यंत फार्सी बोलपटाची निर्मिती झाली नाही.

मुंबई येथील स्टँडर्ड पिक्चर कॉर्पोरेशनने १९४६ साली बहेरामखान  हा हिंदी बोलपट काढला. दिग्दर्शन व प्रमुख भूमिका गजानन जहागिरदार यांची होती. त्यावरूनच पुढील वर्षी इराणी भाषेत चित्रपट सादर केला. तोच एकमेव इराणी चित्रपट. १९४७ पर्यंत फक्त दोन अरबी बोलपट निघाले. ते दोन्ही मुंबईच्या वसंत पिक्चर्सने काढले होते. ते म्हणजे अरबी हंसा (१९४३) व हंटरवाली की बेटी (१९४४).

मदुराईच्या चित्रकला मुव्हिटोनने १९४७ मध्ये सादर केलेला ब्रोकन प्रॉमिस  हा एकच सिंहली बोलपट असून तो मुंबईत तयार झाला होता. फिल्म ऑफ इंडिया कंपनीने १९५४ साली पंपोश  हा जर्मन बोलपट काढला होता. तेवढा एकच जर्मन बोलपट. तो हिंदी व बंगाली भाषांतही काढण्यात आला होता. मोगाचो औंदो (१९५०) हा कोकणी भाषेतील चित्रपट एक्सचेंज टॉकीज ऑफ इंडिया, आफ्रिका अँड चायना यांनी सादर केला. निर्माता, दिग्दर्शक व प्रमुख नट होते जेरी ब्रॅगन्झा. त्यानंतर १९६३, ६५ आणि १९६७ यावर्षी एकेक व १९६८ मध्ये दोन कोकणी बोलपट निघाले तर १९६९-७०-७१ या तीन वर्षांत एकेक कोकणी बोलपट निघाला.

'लौहाकपट', नेपाळी चित्रपट.

कलकत्त्याच्या बिहार मुव्हिटोनचा हरिश्चंद्र (१९५१) व सुजाता मुव्हिटोनचा कर्म के फूल (१९६८) तसेच लौहाकपट  हे तीन नेपाळी भाषेतील बोलपट आतापर्यंत निर्माण झाले आहेत.

वाडिया मुव्हिटोनचा १९४२ साली एक्ता  हा पहिला सिंधी बोलपट निघाला. त्यानंतर १९५८ साली एकदम तीन सिंधी बोलपट प्रदर्शित झाले. भारतात सिंधी बोलपटांच्या निर्मितीचा हा उच्चांक होय. पुढे १९६०–६५, ६६, ६७ व १९६८ साली एकेक सिंधी बोलपट निघाला. १९६९ साली दोन आणि १९७१-७२-७३ साली पुन्हा एकेक सिंधी चित्रपट निघाला.

'हमार संसार', भोजपुरी चित्रपट.

बाबासा री लाडली  हा पहिला राजस्थानी बोलपट १९६१ साली निर्माता-दिग्दर्शक आदर्श यांनी सादर केला. त्यानंतर १९६३ आणि १९६४ साली तीन तीन राजस्थानी बोलपट निघाले. पुढे १९६५–७०–७३ मध्ये एकेकच राजस्थानी बोलपट निघाला. १९७४ मध्ये राजस्थानी बोलपट निघाला नाही. १९७६ चा लाज राखो राणी सती  हा चित्रपट बऱ्यापैकी होता.

भोजपुरी चित्रपटांचा प्रारंभ राजस्थानी बोलपटाप्रमाणे बराच उशिरा म्हणजे १९६२ साली झाला. त्या वर्षी एकच भोजपुरी चित्रपट निघाला असला, तरी पुढील वर्षात दोन, १९६४ मध्ये सात व १९६५ मध्ये पाच भोजपुरी चित्रपट निघाले. १९६६ मध्ये दोन आणि १९६८ व १९७१ मध्ये एकेक भोजपुरी चित्रपट निघाला. १९७४ मध्ये भोजपुरी चित्रपट निघाला नाही. आतापर्यंत फक्त १९ भोजपुरी चित्रपट निघाले. १९६२ सालचा गंगामैया तोहे प्यारी चधैबो  हा चित्रपट अत्यंत यशस्वी झाला. हिंदीतील बऱ्यापैकी कलावंतांनी यात कामे केली होती.

साहद पिक्चर्सचा लैला मजनू (१९४१) हा पहिला पुश्तू बोलपट. त्यानंतर १९४३ साली आणखी एकच पुश्तू बोलपट निघाला. नंतर पुश्तू बोलपटाची निर्मिती थांबली.

अनुपमा चित्रने नझराना  हा पहिला मारवाडी बोलपट १९४२ साली सादर केला. हिंदी चित्रपटांतील नायक महिपाल हे या चित्रपटाचे नायक होते. हा चित्रपट मद्रासमध्ये तयार झाला होता.

एम्. आर्. शेठ प्रॉडक्शन्सचा मैंझ रात (१९६४) हा पहिला काश्मीरी बोलपट. या चित्रपटाला रौप्यपदक मिळाले होते (१९६५). त्याचे दिग्दर्शक होते श्याम व जगीराम पॉल. १९६९ मध्ये पुन्हा एक काश्मीरी चित्रपट निघाला.

'मैंझ रात', १९६४, काश्मिरी चित्रपट.

अवधी भाषेत १९६४ साली एकच चित्रपट तयार झाला. त्याच प्रमाणे १९६६ साली डोगरी भाषेतही एक चित्रपट तयार झाला. तसेच १९६४-६५ मध्ये दोन मागधी बोलपट निघाले. १९६५ आणि १९७१ साली एकेक असे दोन छत्तीसगडी बोलपट निर्माण झाले. कोडगू एक (१९७२), मैथिली एक (१९७१), थाईन एक (१९७२) असा एकेकच बोलपट तयार होऊन या भाषांतील चित्रपटांची निर्मिती थांबली.

मणिपुरी, तुळू व हरियानवी बोलपटांची निर्मितीही अगदी अलीकडची, पण त्यामानाने त्यांनी बरी प्रगती केली आहे. १९७२ साली दोन व १९७४ साली दोन असे मणिपुरी चित्रपट निघाले. १९७२ च्या मतमगी मणिपुर  या मणिपुरी चित्रपटाचा दिग्दर्शक देवकुमार बोस होता. त्याला उत्तम दिग्दर्शनाबद्दलचे प्रादेशिक भाषेतील पदक व पाच हजार रुपये रोख मिळाले. हा चित्रपट आर्थिक दृष्ट्याही खूप यशस्वी झाला. या चित्रपटात रवींद्र वीरबाबू, इंदिरा व रोमादेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १९७१ ते १९७३ पर्यंत प्रत्येक वर्षी दोन दोन व १९७४ मध्ये चार तुळू बोलपट निघाले. १९७२ साली दिग्दर्शक अरोर पट्टाभी यांनी केलेला बिसाति बाबू  चांगलाच गाजला. के. एन्. टेलर, लीलावती यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. सर्वांत नवीन चित्रपट-निर्मिती हरियानवीची. १९७३ साली बीरा शेरा  हा हरियानवी चित्रपट मुंबईत तयार झाला. गतवर्षी मुंबईच्या कंबोज फिल्म्सने याच भाषेत चौधरी हरफुलसिंग  हा चित्रपट सादर केला. याचे दिग्दर्शन सुशीलकुमार व्यास यांनी केले होते.

संदर्भ :  1. Barnouw, E. Krishnaswamy, S. Indian Film, New York, 1963.

2. Grey, E. Behind the Scenes in a Film Studio, London, 1967.

3. Kracauer, S. Theory of Film, New York , 1965.

4. Levitan, E. L. Animation Techniques and Commercial Film Production, New York, 1962.

5. Lindgren, E. The Art of the Film, London, 1963.

6. Mujawar, Isak, Maharashtra : Birthplace of Indian Film Industry, New Delhi, 1969.

7. Robinson, D. World Cinema : A Short History, London, 1973.

8. Rotha, P. Griffith, R. The Film till Now, London, 1967.

9. Rotha, P. Road, S. Griffith, R. Documentary Film, London, 1951.

10. Stork, L. Industrial and Business Films, London, 1962.

११. आठवले, शांताराम प्रभात काल, पुणे, १९६५.


वाटवे, बापू

'को वादीस' (१९१३) दोन तास चालणारा व पहिला इटालियन चित्रपट.  'इंटॉलरन्स' (१९१६) अमेरिकन चित्रपट 'द रोब ' (१९२१) अमेरिकन चित्रपट. 'बुदरिंग हाइट्‌स' (१९३९) अमेरिकन चित्रपट. 'लाईफ लाइट' (१९५२) अमेरिकन चित्रपट. 'ॲशेस अँड डायमंड' (१९५८) पोलिश चित्रपट. 'स्टेज कोच' (१९३९) अमेरिकन चित्रपट. 'द सेव्हन्थ सोल' (१९५६) स्वीडीश चित्रपट.

'राजा हरिश्चंद्र ' (१९१३) आद्य भारतीय मूकपट. 'सुजाता' (१९५९) बिमल रॉय प्रॉडक्शननिर्मित बंगाली चित्रपट.

'विद्यापती' (१९३७) न्यू थिएटर्सनिर्मित बंगाली चित्रपट.'मदर इंडिया' (१९५७) मेहबूब प्रॉडक्शननिर्मित हिंदी चित्रपट.'द लाइट ऑफ एशिया' (१९२५) आद्य पंजाबी मूकपट.

'अछूत कन्या' (१९३६) बॉम्बे टॉकीजनिर्मित हिंदी चित्रपट.

'चंद्रलेखा' (१९४८) जेमिनीनिर्मित हिंदी चित्रपट, मद्रास. 'ए थ्रो ऑफ ट्वाइस' (१९२९) हिमांशु रॉयनिऱ्मित व परदेशी तंत्रज्ञांनी तयार केलेला इंग्रजी चित्रपट.

'भुवन-शौम' (१९६९) मृणाल सेनदिग्दर्शित व आंतरराष्ट्रीय चित्रपट पारितोषिकप्राप्त हिंदी चित्रपट. 'गीत गाया पत्थरोने' (१९६४) व्हि शांतारामदिग्ददर्शित हिंदी चित्रपट.

'मझली बिबी' (१९६७) हृषिकेश मुकर्जीदिग्दर्शित हिंदी चित्रपट. 'अंदाज' (१९४९) मेहबूब प्रॉडक्शननिर्मित हिंदी चित्रपट.

'संघर्ष' (१९६८) सामाजिक हिंदी चित्रपट. 'समशेरबाज' (१९४०) देमार चित्रपट.

'बलरामश्रीकृष्ण' (१९६८) पौराणिक हिंदी चित्रपट. 'यादे' (१९६४) सुनिल दत्तदिग्दर्शित नावीन्यपूर्ण हिंदी चित्रपट.

'संत ज्ञानेश्वर' (१९४०) प्रभातची एक सुंदर कलाकृती. 'अयोध्येचा राजा' (१९३२) प्रभातचा व्हि. शांतारामदिग्दर्शित व आद्य मराठी बोलपट.

'ऊनपाऊस' (१९५४) राजा परांजपेदिग्दर्शित कौंटुबिक चित्रपट. 'रामजोशी' (१९१४७) लोकशाहिरावरील गाजलेला चित्रपट.

'सांगते ऐका' (१९५९) तमाशाप्रधान चित्रपट.  'श्यामची आई' (१९५३) आचार्य अत्रेदिग्दर्शित राष्ट्रपतिसुवर्णपदक प्राप्त पहिला भारतीय चित्रपट.

'कुंकू' (१९३७) प्रभातचा एक अमर चित्रपट. 'सामना' (१९७५) जब्बार पटेलदिग्दर्शित दर्जेदार चित्रपट. 'पवनाकाठचा धोंडी' (१९६५) ग्रामीण पार्श्वभूमीवरील मराठी चित्रपट.