चित्रपटनिर्मिती : चित्रपटनिर्मिती ही एक सांघिक निर्मिती असते. अनेक कलांचा व तंत्रांचा उपयोग करून अनेक कलावंतांचा आणि तंत्रज्ञांचा संघ परस्परांच्या सहकार्याने चित्रपटनिर्मिती करतो. चित्रपटनिर्मितीसाठी भांडवल पुरविण्याचे काम निर्मात्याचे असते. काही निर्माते स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शकही असू शकतात, तसेच काही संस्थाही चित्रपटनिर्मिती करतात. चित्रपटाच्या कथेपासून नटनट्या व तंत्रज्ञांपर्यंत सर्व बाबतींत निवड करण्याचा अधिकार निर्मात्याला असतो. तथापि ही निवड तो अनेकांच्या, विशेषतः त्याने नियुक्त केलेल्या दिग्दर्शकाच्या सल्ल्याने करतो. निर्माता आणि दिग्दर्शक हे चित्रपटनिर्मितीतील प्रमुख सूत्रधार होत.

चित्रपटासाठी कथा निवडताना निर्मितीचे संकल्पित अंदाजपत्रक विचारात घेतले जाते. त्यानंतर चित्रपटाची पटकथा, संवाद, गीते व संगीत यांसाठी योग्य ते लेखक निवडले जातात. पटकथा, संवाद, गीते इ. तयार झाल्यानंतर नटनट्यांची निवड केली जाते. पुष्कळदा चित्रपटाची कथा आणि त्यातील आपली भूमिका पसंत पडली, तरच प्रसिद्ध नटनट्या काम स्वीकारतात. यानंतर चित्रीकरणाच्या दृष्टीने अनेक तांत्रिक बाबींचा विचार करून त्यासाठी अनेक तंत्रज्ञ निश्चित केले जातात. विशेषतः छायाचित्रकार, संकलक, कलादिग्दर्शक तसेच संगीतदिग्दर्शक यांची निवड यासंबंधात केली जाते. प्रत्येक तांत्रिक कामासाठी सहायक तंत्रज्ञही निवडले जातात.

अशी प्राथमिक तयारी झाल्यानंतर चित्रपटातील एकूण दृश्यांची आखणी केली जाते. प्रत्येक दृश्याचे छायाचित्रण कसे करावयाचे, पार्श्वभूमी, पार्श्वसंगीत इ. रचना कशी ठेवावयाची, याची योजना केली जाते. गाण्यांची स्थळे निश्चित केली जातात. विशेषतः दिग्दर्शक याद्वारे सर्व आराखडा तयार करतो. यास ‘चित्रणदर्शिका’ (शूटिंग स्क्रिप्ट) म्हणतात. हे काम छायाचित्रकार, कलादिग्दर्शक, संकलक इ. सहकाऱ्यांच्या सल्ल्याने दिग्दर्शक निश्चित करतो. भारतात व्ही. शांताराम, हृषीकेश मुकर्जी, राजकपूर, सत्यजित रे यांसारखे मुरब्बी व या अंगात निष्णात असलेले दिग्दर्शक चित्रणदर्शिका स्वतः एकटेच तयार करतात. बाह्य चित्रीकरणाचा कार्यक्रम सर्व संबंधितांच्या सोयीने निश्चित करावा लागतो. अंतर्गत चित्रीकरणासाठी योग्य ते चित्रपटनिर्मितिगृह (स्टुडिओ) आधीच ठरवून ठेवावे लागते. ज्या निर्मात्यांचे स्वतःचे निर्मितिगृह आहे, त्यांना ही अडचण येत नाही.

यापुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष चित्रीकरणाचा प्रारंभ. यासाठी कलामंदिरांतर्गत (इन डोअर) देखावे व बाहेरील (आउट डोअर) देखावे यांची छाननी केली जाते. पावसाळा बाह्य चित्रीकरणास प्रतिकूल म्हणून पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर बाह्य चित्रीकरण हाती घेण्यात येते. बाह्य चित्रीकरणासाठी कलादिग्दर्शकाला बहुधा देखावा वगैरै मांडायचा नसतो. क्वचित् प्रसंगी एखादी भव्य वास्तू बाहेरच उभी करावी लागते किंवा एखादे विशिष्ट दृश्य बाहेरच देखावा मांडून चित्रित करावे लागते.

बाह्य चित्रीकरणात देखाव्याच्या मांडामांडीची कटकट नाही, हवा तो व हवा तसा नैसर्गिक व वास्तव परिणाम त्याद्वारा साधता येतो. हे खरे असले, तरी यात सूर्यप्रकाशाची अनुरूपता साधावी लागते. नको असलेले बाहेरचे आवाज टाळावे लागतात. शिवाय सर्व तंत्रज्ञ, यंत्रसामग्री, कलावंत यांना त्या त्या जागी घेऊन जाणे दगदगीचेही असते. काही वेळा दूरवेध बाहेर घेऊन समीपवेध कलामंदिरात तेवढा देखावा मांडून घेतात. अर्थात दोन्ही वेळच्या प्रकाशयोजनेत साम्य राखणे, हे छायाचित्रकाराचे काम असते आणि हुबेहुब देखावा उभा करणे, ही कलादिग्दर्शकाची जबाबदारी असते. पटकथेतील दृश्यांचे ओळीने चित्रीकरण कधीही होत नाही. तसे केल्यास ते अत्यंत कटकटीचे, बराच कालापव्यय करणारे आणि अतिशय खर्चाचे ठरते. म्हणून चित्रपटात देखावे किती व कोणते आहेत, त्यांवर कोणकोणती दृश्ये चित्रित होणार आहेत, याची यादी करून ती कलादिग्दर्शकाला दिली जाते. काेणत्या देखाव्यातील (सेटवरील) काेणत्या दृश्यात काेणकाेणत्या कलावंतांची गरज आहे, याची वेगळी यादी त्यांना लागणाऱ्या वेशभूषेसह दिग्दर्शकाजवळ असतेच. हे काम प्रमुख सहायक दिग्दर्शक करतो.

एका देखाव्याची मांडणी झाल्यानंतर त्यावर घडणाऱ्या सर्व घटनांचे चित्रीकरण संपविले जाते. अर्थात हे सर्व प्रसंग प्रत्यक्षात ओळीने घडत नसतात, त्यामुळे तो प्रसंग चित्रित करताना त्याअगोदर काय घडले आहे, पुढे काय घडणार आहे इ. लक्षात घेऊन त्या त्या कलावंताला त्यानुरूप मनःस्थिती ठेवावी लागते. त्याचप्रमाणे त्या त्या पात्राचा मागील व पुढील संदर्भ लक्षात घेऊन वेशभूषाही अगोदरच निश्चित करावी लागते. यासाठी समर्थ सहायक दिग्दर्शकाची आवश्यकता असते. तसेच दिग्दर्शक आपल्या कल्पनेप्रमाणे दूरवेध, मध्यवेध, समीपवेध असे विविध वेध घेत असतो. एका वेधानंतर दुसरा वेध घेताना सातत्य राखण्यासाठी सहायक दिग्दर्शकाला अतिशय दक्ष रहावे लागते. उदा., आधीच्या वेधामध्ये व वेधाच्या अखेरीस कलावंताच्या चेहऱ्यावर कोणते भाव होते, तो कुठे पहात होता, त्याची स्थिती कशी होती, संवाद कुठे संपला होता वगैरेंची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. तसेच पुष्कळदा दोन पात्रांचे संवाद चित्रित करीत असताना त्यांपैकी एकाचे सर्व वेध संपवून नंतरच दुसऱ्याचे वेध घेतले जातात. प्रत्यक्षात दोघांचा संवाद एकाच वेळी होत असतो. अशा वेळी तर सातत्य व संगती या गोष्टी फार बारकाईने पहाव्या लागतात. गेल्या वेधात समोरचे पात्र कॅमेऱ्याच्या ज्या बाजूला पाहून संवाद बोलत होते त्याच्या विरुद्ध बाजूला पाहून दुसऱ्या पात्राने संवाद म्हटला पाहिजे म्हणजेच ते एकमेकांकडे पाहून संवाद बोलत आहेत असे वाटते.

दिग्दर्शकाला प्रत्येक तांत्रिक अंगाची थोडीफार माहिती असावी लागते. संकलनाची तर पूर्ण कल्पना त्याला असली पाहिजे. शिवाय साहित्य, नाट्य, अभिनय, संगीत इत्यादींचीही उत्तम समज असेल, तरच तो यशस्वी दिग्दर्शक होऊ शकतो आणि अशाच दिग्दर्शकाचा कलावंत, तंत्रज्ञ व इतर सहकारी यांच्यावर प्रभाव टिकून चित्रीकरण व्यवस्थितपणे पार पडते.

दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार कलादिग्दर्शक देखावा उभा करतो. त्यावर चित्रीकरण कुठे व कसे व्हायचे आहे, याची दिग्दर्शकाकडून माहिती घेऊन व कॅमेऱ्याच्या हालचाली लक्षात घेऊन कलादिग्दर्शक तो मांडीत असतो. वातावरणनिर्मितीसाठी योग्य त्या वस्तूंनी तो सजावट करतो. विशेषतः ऐतिहासिक, पौराणिक अथवा कल्पनारम्य चित्रपटात कलादिग्दर्शकाला त्या त्या काळाला साजेल असाच देखावा अभ्यासपूर्वक उभारावा लागतो. पात्रांच्या वेशभूषेतही दिग्दर्शकाला तो योग्य त्या सूचना करतो. पुष्कळशा वस्तू तो चित्रपटनिर्मितिगृहातच बनवून घेतो.

चित्रपटातील प्रसंगाचा एकूण नूर व वेळ यांनुसार छायाचित्रकार प्रकाशयोजना करीत असतो. त्याचप्रमाणे दूरवेध, मध्यमदूरवेध, मध्यमवेध, समीपवेध, अतिसमीपवेध यांपैकी दिग्दर्शकाला जो कोणता वेध घ्यावयाचा असेल, त्याप्रमाणे तो कॅमेरा हाताळतो. पात्रांच्या हालचाली व अपेक्षित परिणाम साधण्यासाठी छायाचित्रकार दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार कॅमेऱ्याच्याही हालचाली करीत असतो. कॅमेरा मागून पुढे, पुढून मागे किंवा पात्राच्या चालण्याबरोबर हालविण्यासाठी ढकलगाडी (ट्रॉली)चा उपयोग करण्यात येतो. तसेच यारीवर ठेवून तो वरून खाली अथवा खालून वर नेता येतो. यामुळे चित्रीकरणामध्ये दृश्यविषयक विविधता तर आणता येतेच, शिवाय वेध अधिक परिणामकारक होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या लांबून एकदम जवळ किंवा जवळून एकदम दूर गेल्याचा आभास निर्माण करण्यासाठी कॅमेरा जागेवरच ठेवून ‘झूमलेन्स’ चा वापर उपयुक्त ठरतो. दर्दी छायाचित्रकार दिग्दर्शकाला योग्य तो वेध घेण्यासाठी उपयुक्त सल्लाही देत असतो. के. एस्. प्रसाद, सरस्वतीचंद्र, रविवर्मा, सोमेंदू रॉय, मार्क्‌स बर्टले, रामचंद्र, नंदू भट्टाचार्य, अपूर्व किशोर वीर, मार्शल ब्रँगांझा, जोसेफ वुरसिंग, पांडुरंग नाईक, केशवराव धायबर, फरेदूर इराणी, जाल मिस्त्री, फली मिस्त्री, आर्. डी. माथूर, द्वारका दिवेचा, व्ही. बाबासाहेब, के. वैकुंठ, युसुफ मुळजी, राधू कर्मकार, ई. महंमद, व्ही. अवधूत, जयवंत पाठारे, के. के. महाजन हे निष्णात छायाचित्रकार आहेत.

चमत्कृतिचित्रणाच्या (ट्रिक फोटोग्राफी) तंत्रात प्रगती झाल्याने चित्रपटात अद्‌भुत आणि चमत्कारिक अशी दृश्ये किंवा चमत्कार दाखविण्याची सोय झाली आहे. संवादाचे निर्दोष व सुस्पष्ट ध्वनिलेखन तर ध्वनिलेखकाला करावे लागतेच पण शिवाय गीताच्या ध्वनिलेखनाच्या वेळीही त्याला आपले कसब दाखवावे लागते. वाद्यवृंदाची बैठक त्याला अशा स्थळी अशा प्रकारे निश्चित करावी लागते, की सर्वच वाद्यांचा सुस्वर मेळ साधावा. कधीकधी इतर वाद्यांपेक्षा एखादेच वाद्य जोरात ऐकू येते, तर एखाद्या वाद्याचा आवाजदेखील येत नाही. तेव्हा हे टाळण्यासाठी त्याला दक्षता घ्यावी लागते. तसेच मध्येच एखाद्या विशिष्ट वाद्याचा किंवा अनेक वाद्यांचा खास तुकडा असतो, तो त्या वादकाने किंवा वादकांनी त्या वेळी ध्वनिग्राहकापासून किती अंतरावर येऊन वाजवायचा याचीही सूचना ध्वनिलेखक तालमीच्या वेळी देत असतो. गाण्यापेक्षा वाद्यांचा गजर अधिक न होता म्हणजे वाद्यमेळ गायनाला मारक न होता पूरक कसा होईल, हे ध्वनिलेखकाला सतत कान टवकारून पहावे लागते. मध्येच एखादे गायन किंवा एखादे वादन बेसूर होत असेल, तर ध्वनिलेखकाने त्याला वेळीच तशी जाणीव करून द्यावी लागते. विष्णुपंत दामले, शंकरराव दामले, मिनू कात्रक, मुकुल बोस, बी. एन्. शर्मा, मंगेश देसाई, अल्लादिन हे कसबी ध्वनिलेखक आहेत.

‘झनक झनक पायल बाजे'(१९६९) मधील ध्वनिलेखन

चित्रपट पूर्ण झाल्यावर निरनिराळ्या प्रसंगांना उठाव देण्यासाठी पार्श्वसंगीत दिले जाते. त्या वेळी त्यात आणखी काही विशिष्ट आवाज घालावयाचे असतात. संवादाची ध्वनिमुद्रित फिल्म असते. त्याचबरोबर पार्श्वसंगीत व इतर विशिष्ट आवाज यांच्या स्वतंत्र ध्वनिमुद्रित फिल्म असतात. त्या सर्वांचे एकत्र ध्वनिलेखन करणे आवश्यक असते, त्याला पुनर्ध्वनिलेखन (रीरेकॉर्डींग) म्हणतात. आता भारतात अशा सहा सहा ध्वनिमुद्रित फिल्म एका वेळी एकत्रित ध्वनिमुद्रित करता येतात. यांसाठी दोन ध्वनिलेखक काम करतात. एक तंत्रज्ञ एका वेळी तीन ध्वनिमुद्रित फिल्मवर नियंत्रण ठेवतो, तर दुसरा उरलेल्या तीनवर. त्यामुळे हवा तो, हवा तेथे आवाज कमीजास्त करता येतो आणि या चारसहा रूळपट्ट्यांचा (ट्रॅकचा) इष्ट तो परिणाम घडून येतो. छायाचित्रणासाठी जशी स्वतंत्र फिल्म असते, तशी ध्वनिलेखनासाठीही वेगळी फिल्म असते.

चित्रपटातील गीतांच्या चाली संगीतदिग्दर्शक बांधतो. त्याचप्रमाणे चित्रपटातील प्रसंगांना पार्श्वसंगीत देण्याचे कामही महत्त्वाचे असते. पार्श्वसंगीतात वसंत देसाई यांचा हातखंडा होता. चित्रपटातील विविध गाण्यांसाठी दिग्दर्शक गायकांची निवड संगीतदिग्दर्शकाच्या सल्ल्याने करतो.

इतर तंत्रज्ञांप्रमाणे चित्रपटसृष्टीत रंगभूषाकार व वेशभूषाकार यांनाही महत्त्व आहे. प्रत्येक पात्राची योग्य ती रंगभूषा व वेशभूषा करण्याची जबाबदारी या दोघांची असते. या कामी दिग्दर्शक व कलादिग्दर्शक त्यांना सूचना देतातच. सामाजिक चित्रपटापेक्षा ऐतिहासिक, पौराणिक वा कल्पनारम्य चित्रपटांसाठी रंगवेशभूषा अभ्यासपूर्वक ठरवावी लागते.

कथा हा चित्रपटाचा आत्मा असल्याने कथालेखक, त्याचबरोबर संवादलेखक व गीतकार हे अव्वल दर्जाचे असावे लागतातच पण त्याहीपेक्षा चित्रपटातील अभिनेत्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते किंबहुना चित्रपटाचे ते एक प्रमुख आकर्षण असते. मुरब्बी नटनट्या प्रसंगाला व पर्यायाने कथानकाला उठाव आणीत असतात. त्यांपैकी काही कलावंत भूमिकांसाठी प्रसिद्ध असतात, तर काही अत्यंत लोकप्रिय असतात. स्टार, सुपरस्टार अशा प्रकारचा लौकिक त्यांना प्राप्त झालेला असतो. काही नटनट्या चरित्र-भूमिकांसाठी प्रसिद्ध असतात तथापि आपल्या सर्वच अभिनयगुणांना पूर्ण वाव मिळेलच अशी कोणत्याच कलावंताला शाश्वती नसते. दिग्दर्शक सांगेल तेवढे व शिकवेल तसेच संवाद बोलावे लागतात आणि अभिनयही करावा लागतो. अलीकडे मात्र जुन्या, जाणत्या तसेच अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या नटनट्यांना चित्रपटात बराच वाव मिळत आहे. चित्रपटातील अभिनय रंगभूमीवरील अभिनयापेक्षा वेगळा असतो. सलगपणे एखादी भूमिका वठविण्याची संधी चित्रपटातील पात्रांना नसते. त्यांना वेगवेगळ्या प्रसंगांचे अभिनय पुष्कळदा एकाच वेळी करावे लागतात. छायाचित्रणाच्या सोयीच्या दृष्टीनेही अनेक बंधने त्यांच्यावर असतात. त्यामुळे चित्रपटातील अभिनय हा किचकट तांत्रिक प्रक्रियांच्या धीन असतो. निकट छायाचित्रणाच्या रूपाने कलाकाराचा चेहरा प्रेक्षकांना अगदी जवळून पाहण्याची सोय असते त्यामुळे त्यांच्या मुखाभिनयाला, विशेषतः केवळ डोळ्यांनीच भाव व्यक्त करण्याच्या सामर्थ्याला, चित्रपटसृष्टीत फार महत्त्व असते. लोकप्रिय नटनट्यांना पैसाही अमाप द्यावा लागतो. तसेच त्यांपैकी पुष्कळांच्या लहरीही सांभाळाव्या लागतात. चित्रपटनिर्मितीत सर्वांत जास्त खर्च नायक-नायिकादी कामे करणाऱ्या नामवंत कलावंतांवर होत असतो. त्या मानाने इतरांना अर्थप्राप्ती फार कमी होते, असे म्हटले जाते. ‘स्टार सिस्टिम’ म्हणजे मोठ्या नटनट्यांना कामे देऊन चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर करणे होय. या पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे कारण इतर अनेक कलावंतांची व तंत्रज्ञांची त्यामुळे कुचंबणा होते.

दृष्यांचे चित्रीकरण संपल्यानंतर ऋणचित्रफिल्म व ऋणध्वनिफिल्म रासायनिक प्रक्रियेसाठी पाठविण्यात येतात. ऋण आणि धन फिल्म तयार होऊन आल्यावर त्या संकलन विभागाकडे पाठविण्यात येतात.

चित्रसंपादन हे चित्रपटनिर्मितीचे फार महत्त्वाचे अंग आहे. दिग्दर्शक सोयीप्रमाणे वेध घेत असतो परंतु बहुतेक वेध पुनःपुन्हा घ्यावे लागतात. कारण संवाद, भावदर्शन, कॅमेऱ्याची हालचाल अगर आणखी काही तांत्रिक कारणांमुळे चूक होण्याची बरीच शक्यता असते. प्रत्येक वेधाच्या प्रारंभी फटमार (क्लॅपर) चित्रित व ध्वनित केला जातो. त्यावर दृश्य क्रमांक, वेध क्रमांक इ. लिहिलेले असते. चित्रण चालू असताना जो सहायक दिग्दर्शक कॅमेऱ्याला फटमार दाखवीत असतो, तो तोंडाने दृश्य क्रमांक व वेध क्रमांक मोठ्याने उच्चारून ठोकणीचा ‘फट्’ असा आवाज करतो. हा फट् आवाज आणि चित्रात ठोकणी जेथे मिटते तेथे संकलनकार जुळवून घेतो. त्याबरोबर कलावंताची ओठांची हालचाल आणि ध्वनित झालेले शब्द यांचा मेळ बरोबर साधतो. त्या जुळणीला दृश्यध्वनिमेलन (सिंक्रोनायझिंग) म्हणतात. गाण्यात ते फार बारकाईने बघावे लागते.

घेतलेल्या प्रत्येक वेधाची सहायक दिग्दर्शक नोंद ठेवतो. त्यातील उपयुक्त कोणता आणि निरुपयोगी कोणता, हे स्पष्ट लिहिलेले असते. तेवढेच वेध मुद्रित केले जातात. हे उपयुक्त वेध एका ओळीने जोडून घेऊन मग संकलनकार संपूर्ण दृश्याचे संकलन करतो. चांगला संकलनकार दिग्दर्शकाने घेतलेल्या दृश्यांतून एखादा प्रसंग अधिकाधिक उठावदार करण्याचा प्रयत्न करतो. अपेक्षित परिणाम साधत नसेल, तर दिग्दर्शकाला एखादा वेध आणखी घ्यावयास सांगतो. एखादे पाठलागासारखे दृश्य आहे, ते अधिकाधिक गतिमान व रोमहर्षक कसे होईल, ते संकलनकार पाहतो. प्रभात फिल्म कंपनीच्या रामशास्त्री  चित्रपटातील नारायणराव पेशव्यांच्या वधाचा चित्तथरारक प्रसंग पहात असताना प्रेक्षक अगदी श्वास रोखून बसतो. ही परिणामकारकता साधायला दिग्दर्शकाइतकाच संकलकही कल्पक असावा लागतो. तसेच गाण्याची लय, गती, प्रकार इ. लक्षात घेऊन त्याप्रमाणे तो संकलन करतो. वेधाची लांबी परिणामाच्या दृष्टीने कमीअधिक ठेवण्यासाठी त्याला तारतम्यबुद्धी वापरावी लागते. गाण्यातील वेध तोडताना त्याची लय व ताल बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. एक पात्र बोलत आहे व त्याचा परिणाम समोरच्या एका किंवा अनेक व्यक्तींवर होत आहे, हे दाखविण्यासाठी समोरची व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांचा वेध मध्येच दाखविला जातो. त्याला निवेशन (इन्सर्शन) म्हणतात. त्या वेळी बोलणारी व्यक्ती दिसत नाही पण संवाद ऐकू येत असतो व संवादाचा इतरांवर होणारा परिणाम दिसतो. निवेशनासाठी वेगळे वेध बहुधा दिग्दर्शक घेऊन ठेवतोच. त्यांतील कोणते, कसे व केवढे वेध वापरायचे, हे संकलनकार ठरवतो. हा प्रकार गाण्यातही करण्यात येतो. संकलनकाराचे काम खूप महत्त्वाचे असूनही इतर तंत्रज्ञांप्रमाणे त्याचे कौशल्य सर्वसामान्य प्रेक्षकांच्या ध्यानात मात्र येऊ शकत नाही.

दिग्दर्शकावर चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी असते. छायाचित्रकार, ध्वनिलेखक, कलादिग्दर्शक, संगीतदिग्दर्शक, रंगभूषाकार, वेशभूषाकार, संकलनकार, नटनट्या इत्यादींच्या कौशल्याचा चांगला उपयोग करून घेण्याचे कसब दिग्दर्शकात असावे लागते. सांघिक कार्य हे चित्रपटनिर्मितीचे एक सूत्र असते. दिग्दर्शकाला अनेक अवधाने सांभाळावी लागतात. वेगवेगळ्या संदर्भांत येणारी दृश्ये फुटकळपणे छायाचित्रित केली जात असल्यामुळे, ती जेव्हा सलगपणे जोडली जातील तेव्हा ती आपापल्या जागी चपखल बसावीत, मागील-पुढील दृश्यांशी ती विसंगत दिसणार नाहीत, यांसाठी ती ती दृश्ये आणि दृश्यचित्रे चित्रित करतानाच दिग्दर्शकाला फार काळजी घ्यावी लागते.

संपूर्ण लांबीच्या कथानकनिष्ठ चित्रपटाप्रमाणे अनुबोधपट, माहितीपट इ. करणाऱ्या दिग्दर्शकाला व संकलनकारालाही वरीलप्रमाणेच सर्व संबंधित गोष्टींचे अवधान राखावे लागते. वार्तापटनिर्मितीत बरीच जबाबदारी छायाचित्रकारावर असते. कधीकधी मार्गदर्शन व सूचना देण्यासाठी दिग्दर्शक नेमला जातो. व्यंगपटनिर्मितीत कथापरिपोषानंतर मुख्य कामगिरी चित्रकार आणि सचेतनीकरण चित्रित करणाऱ्या छायाचित्रकाराची असते.

भाषांतरणाची (डबिंगची) सोय उपलब्ध झाल्यावर एका भाषेतील बोलपट दुसऱ्या भाषेत भाषांतरित करणे शक्य झाले. तोच भाषांतरणाचा प्रकार गाण्याच्या बाबतीतही करावा लागतो. त्यासाठी संवाद व गीत यांचे उसन्या आवाजात ध्वनिमुद्रण करून घेऊन नंतर ओठांच्या हालचालींच्या बरहुकूम ते चपखल बसावे लागते. हे सर्व संवादलेखक व संकलनकार यांना फार कटकटीचे होत असले, तरी अत्यल्प खर्चात दुसऱ्या भाषेत बोलपट तयार होऊ शकतो कारण चित्रणाचा भागच यात नसल्याने बरोच खर्च व दगदग वाचते. पार्श्वसंगीतही मुळचेच चालते. या सर्व कारणांमुळे एका भाषेतील बोलपटावरून अगदी अल्पावधीत दुसऱ्या भाषेतील बोलपट तयार होतो. दाक्षिणात्य चित्रपटांत हे प्रमाण फारच मोठे आहे. एका भाषेतील चित्रपट इतर दोन-तीन दाक्षिणात्य भाषात भाषांतरित करण्याची प्रथा तिकडे आजही प्रचलित आहे.

हिंदी चित्रपटाच्या निर्मितीला साधारणतः अ, ब, क अशी वर्गवारी केली, तर अनुक्रमे सु. ६५ लक्ष, ३५ लक्ष वा १८ लक्ष रु. खर्च येतो. अतिभव्य चित्रपटाचा खर्च १ कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. यातील मोठा भाग लोकप्रिय नटनट्यांच्या मुशाहिऱ्यावरच खर्च होतो.

व्यंगचित्रपटनिर्मिती : व्यंगपटात (कार्टून्स) महत्त्वाचा भाग चित्रकार व छायाचित्रकार यांचा असतो. लेखकाने दिलेल्या कल्पनेवर चित्रकार चित्रे काढीत असतो. अशी शेकडो चित्रे काढावी लागतात. पात्रांच्या हालचालींची गती लक्षात घेऊनच ही  चित्रे काढावी लागतात. एका वेळी एकच चौकट चित्रित करावी लागते. ही एक वेगळीच कला असून तिचे तंत्रही थोडे निराळे असते व त्यासाठी कॅमेराही वेगळा वापरावा लागतो. व्यंगपट पूर्ण झाल्यावर पात्रांच्या तोंडी संवाद घातले जातात व पार्श्वसंगीत दिले जाते. चित्रातील ओठांच्या हालचालींप्रमाणे संवाद लिहिले-बोलले जातात व ते संकलनकाराला जमवून घ्यावे लागतात. यात नटनट्यांची जरूर नसतेच तथापि खरेखुरे अभिनेते व चित्रे एकत्र दाखविण्याची किमया व्यंगपटांचा जादूगार वॉल्ट डिझ्नी याने थ्री कॅव्हेलरास  या आपल्या व्यंगपटात करून दाखविली आहे. व्यंगपटांना देखावा, रंग-वेशभूषाकार, बाह्यचित्रण इत्यादींची गरज नसतेच. त्यामुळे अलीकडे छोटे प्रसिद्धिपट व्यंगपटाच्या माध्यमातून पहायला मिळतात. प्रभात फिल्म कंपनीने जंबूकाका, न्यू थिएटर्सने चटक चांदणी  व कोल्हापूर सिनेटोनने बकंभट  हे व्यंगपट एकाच वर्षी म्हणजे १९३४ साली सादर केले होते.

व्यंगचित्रपट तयार करणे हे चित्रकारांच्या दृष्टीने अत्यंत जिकिरीचे व किचकट काम असते. पडद्यावर एक सेकंद दृश्य दाखविण्यासाठी व्यंगचित्रकारांना १६ चित्रे काढावी लागतात. त्यातही व्यंगपटातील पात्रांची हालचाल गुंतागुंतीची असेल, तर मग अधिकच त्रास होतो परंतु आता रशियातील खार्कोव विज्ञान संस्थेमधील सोविएत वैज्ञानिकांनी हे काम संगणका (काँप्यूटर)च्या साहाय्याने सोपे केले आहे. त्यासाठी एखाद्या व्यंगपटातील हालचाल होण्यापूर्वीचे चित्र व हालचाल पूर्ण झाल्यानंतरचे चित्र अशी दोन चित्रे संगणकाला पुरविली, की त्यांमधील डझनावारी चित्रे छापून पुरविण्याचे काम संगणक स्वतःच करतो. संगणक चार तासांत व्यंगपटातील दोन हजार दृश्ये पुरवितो, तर हेच काम करायला आठदहा चित्रकारांना चार महिने लागतात. या नव्या शोधाने व्यंगपटाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती घडून येणार असल्याचे दिसते.

‘अंब्रेला ‘: कुटूंबनियोजनावरील अनुबोधपट, १९६९.

अनुबोधपटनिर्मिती : अनुबोधपट (डॉक्युमेंटरी फिल्म) बहुधा एक किंवा दोन रिळांचे असतात. दिग्दर्शक, छायाचित्रकार इ. सात-आठ माणसांचा संच अनुबोधपट निर्माण करू शकतो. अनुबोधपटात संवाद असत नाहीत, देखाव्याचीही फारशी गरज नसते. समालोचन व संगीत नंतरच घ्यावयाचे असतात. अनुबोधपट-चित्रणासाठी ठिकठिकाणी हिंडावे लागते पण एकूण व्यापच अत्यंत आटोपशीर असल्याने ते सोयीचे होते. अनुबोधपट अत्यंत परिणामकारकही असू शकत. वार्तापटात (न्यूजरील) मात्र छायाचित्रकारावर बरीच जबाबदारी पडते. जरूर असेल तरच सूचना देण्यासाठी दिग्दर्शक असतो.

सावेदादा तथा भाटवडेकर या भारतीयांनी १८९८ साली मुंबईच्या मलबारहिलच्या हँगिंग गार्डनवर कुस्तीची फिल्म घेतली होती. हाच पहिला भारतीय अनुबोधपट म्हणता येईल. १९०२ साली इंग्लंडहून आलेल्या रँग्लर परांजपे यांच्या सत्कार-समारंभाची फिल्म त्यांनीच घेतली होती. तोच पहिला भारतीय वार्तापट म्हणता येईल.

हौशी चित्रपटनिर्मिती : जोपर्यंत ३५ मिमी. जातीचीच फिल्म अस्तित्वात होती, तोपर्यंत केवळ हौसेखातर छायाचित्रण करू इच्छिणाऱ्या लोकांना ती परवडत नसे. कारण ३५ मिमी. रुंदीच्या फिल्मवर छायाचित्रण करण्यासाठी लागणारी कॅमेरादी यंत्रसामग्री आणि तिच्यावरचे रासायनिक संस्कार इ. गोष्टींना फार खर्च येतो परंतु १९२३ सालापासून मात्र केवळ हौस म्हणून लहानमोठे चित्रपट तयार करू इच्छिणारांची चांगली सोय झाली. अमेरिकेच्या ईस्टमन कोडॅक कंपनीने एक १६ मिमी. रुंदीची फिल्म तयार केली आणि हौशी लोक त्या फिल्मचा उपयोग करून आपल्या सहलींचे, लग्न किंवा अन्य घरगुती समारंभादी प्रसंगांचे चित्रपट तयार करू लागले. या फिल्मचे एक वैशिष्ट्य असे, की एकाच फिल्मवर अंतिम स्वरूपाचा चित्रपट तयार होतो म्हणजे अगोदर ऋणफिल्मवर छायाचित्रण करून नंतर त्यावरून धनफिल्म तयार करण्याचे सायास करायला नकोत. या पद्धतीला ‘रिव्हर्सल प्रोसेस’ म्हणतात. या प्रकारच्या फिल्मवरून आणखी प्रती तयार करता येत नसत ही मात्र एक अडचण होती. पुढे ती अडचण राहिली नाही. १९३१ साली तर १६ मिमी. आकारात बोलकी फिल्म तयार झाली आणि त्या फिल्मवर ध्वनिमुद्रण करणेही शक्य झाले. या प्रकारच्या बोलक्या फिल्मला एकाच कडेला भोके असतात आणि दुसऱ्या कडेला ध्वनिमुद्रणाची जागा राखून ठेवलेली असते. पूर्वी फक्त १६ मिमी.चे मूकपट तयार करता येत असत परंतु त्यावर आता बोलपटही तयार हाेऊ शकतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्या हव्या तेवढ्या प्रतीही तयार करून घेता येतात. या प्रकारच्या हौशी चित्रपटनिर्मितीसाठी कॅमेरा आदीकरून जी यंत्रसामग्री लागते, ती ३५ मिमी.च्या चित्रपटनिर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीपेक्षा कितीतरी स्वस्त असते. त्यामुळेच बरेच लोक १६ मिमी.चे कॅमेरे आपल्या संग्रही ठेवून प्रसंगविशेषी आपणास हवे तसे चित्रपट तयार करू शकतात. अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे मनोरंजनाचा एक हुकमी प्रकार म्हणून जशी गरज भागते, तशीच आपल्या इच्छेप्रमाणे सभासंमेलने, उत्सवसमारंभ इ. घटनांची चित्ररूपी नोंद करून ठेवण्याचीही सोय होते. ३५ मिमी.पेक्षा अरुंद जातीच्या ज्या फिल्म उपलब्ध आहेत, त्यांत १६ मिमी. आणि ८ मिमी. ह्या फिल्म हौशी लोकांत अधिक प्रिय आहेत. ८ मिमी.ने छायाचित्रण करण्याचा कॅमेरा तर १६ मिमी.च्या कॅमेऱ्यापेक्षा बराच स्वस्त असतो. त्यामुळे थोडेसे तांत्रिक ज्ञान असलेली तरुण मुलेसुद्धा ८ मिमी.च्या कॅमेऱ्याने रंगीत फिल्म सहज घेऊ शकतात. केवळ हौस म्हणून चित्रपट तयार करू इच्छिणाऱ्यांसाठी कोडॅक, आग्फा, ओरवो इ कंपन्यांच्या १६ मिमी. जातींच्या अनेक प्रकारच्या फिल्म मिळतात. कॅमेरे आणि चित्रदर्शक यंत्रे वगैरे साहित्यही मिळते. कोडॅकची ८ मिमी. फिल्म व कॅमेरेही उपलब्ध असल्यामुळे, हौशी लोकांना आपापल्या घरांतही छायाचित्रण करून घरातल्या घरात छोट्या पडद्यावर अगर स्वच्छ भिंतीवरही आप्तेष्टांसह पाहता येतो. (चित्रपत्रे ५२, ५३).

शिंदे, मा. कृ.


चित्रपत्र ५२

चित्रपत्र ५३