चित्रपट उद्योग : एड्‌विन पोर्टर याने द ग्रेट ट्रेन रॉबरी  हा कथापट १९०३ मध्ये तयार केला. त्याच्या यशाची चिन्हे दिसताच धेदेवाईक लोकांनी चित्रपट-उद्योगाकडे लक्ष वळविले. त्या सुमारासच रस्त्यावर वा तंबूत दाखविले जाणारे चित्रपट निकल ओडियन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटगृहातून दिसू लागले. १९०४ मध्ये तयार झालेला ख्रिस्त चरित्र  हा चित्रपट जगात सर्वत्र दाखवला गेला. भारतात सेठना या नावाच्या एका गृहस्थाने एक फिरती चित्रपटकंपनी स्थापन करून तिच्या द्वारे तो सर्वत्र दाखविला होता. १९१० पर्यंत भारतातील काही मोठ्या शहरांत चित्रपट दाखविण्याची कायम स्वरूपाची व्यवस्थाही झाली होती.

दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र  हा स्वतः तयार केलेला चित्रपट मुंबईत दाखविला. त्यानंतरची अठरा वर्षे हा व्यवसाय मूकपटांना धरून होता. पुढे लाहोर, कलकत्ता, नासिक, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर इ. ठिकाणी अनेक चित्रपटनिर्माते उभे राहिले. त्या काळात चित्रपटनिर्मितीचा खर्च साधारणपणे पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत येत असे. चित्रपटाच्या तीन-चार प्रती पुरत आणि चित्रपटांचे निर्मितीप्रमाण कमी असल्यामुळे प्रदर्शनाची संधीही लगेच मिळे. असे असूनही भांडवल मिळण्याची अडचण होतीच.

यानंतर १९३६ च्या सुमारास भारतीय चित्रपट आणि अन्य देशीय चित्रपट असे वर्गीकरण होऊन त्यांची चित्रपटगृहे निरनिराळी झाली. परदेशी वितरकांनी चांगली चित्रपटगृहे स्वतः बांधली वा अन्य चित्रपटगृहे लांब मुदतीच्या कराराने राखून ठेवली. याच सुमारास भारतीय चित्रपटउद्योगाची २५ वर्षे पूर्ण होऊन एक रौप्य महोत्सव करण्यात आला. त्या निमित्ताने निर्माते, वितरक, प्रदर्शक यांच्या स्वतंत्र संघटना स्थापन होऊन आपापल्या व्यवसायाविषयी त्या जागरूक होऊ लागल्या. दुसऱ्या महायुद्धाला तोंड लागल्यावर भारतात या धंद्याची सर्व बाजूंनी नाकेबंदी होऊ लागली कारण त्याला लागणारे सर्वच साहित्य परदेशातून आणावे लागे. परवानापद्धती अमलात येईपर्यंत जे तग धरू शकले नाहीत, त्यांचा धंदा बुडाला. ज्यांना परवाने मिळाले, त्यांना चांगलाच फायदा करून घेता आला. याच काळात त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने माहितीपट काढावयास सुरुवात केली आणि ते दाखविण्याची चित्रपटगृहचालकांवर सक्ती केली. स्वतःचे चित्रपटनिर्मितिगृह नसलेले, पण जवळ पैसा असलेले लोक या धंद्याकडे वळले. त्यांच्या प्रोत्साहनाने कोठल्याही मालकाशी स्वतःला बांधून न घेणारा व्यावसायिक वर्ग तयार झाला. त्यांत कामगार, तंत्रज्ञ, कलावंत, नटनट्या हे सर्व होते. पुढे या धंद्याचे स्वरूप झपाट्याने बदलले. चित्रपटगृहांची संख्या वाढत होती व प्रेक्षकवर्गही वाढत होता. व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने प्रसिद्धीचे काम आवश्यक झाले. महायुद्धकाळात चित्रपटगृहे बांधण्यावर नियंत्रणे असल्याने चित्रपटगृहांच्या मालकांची धंद्यावर पकड बसली.

मद्रासच्या जेमिनी स्टुडिओत तयार झालेल्या चंद्रलेखा  या भव्य चित्रपटाने १९४८ मध्ये उत्पन्नाचे सर्व जुने उच्चांक मोडले व चित्रपटप्रदर्शनाचा एक नवा पायंडा पाडला. या चित्रपटाच्या एकाच वेळी सु. २०० प्रती भारतामध्ये सर्वत्र प्रदर्शित करून व त्याची प्रचंड जाहिरात अगोदरपासूनच करून ठेवून अतिशय पद्धतशीर रीतीने त्याचे वितरण करण्यात आले. हा चित्रपट सु. ३५ लाख रु. खर्चून तयार करण्यात आला होता. चित्रपटनिर्मितीसाठी प्रचंड खर्च करण्याची निर्मात्याने तयारी ठेवली पाहिजे, ही नवी दृष्टी चित्रपटधंद्यात या चित्रपटाने आली व निर्मितीच्या खर्चाचे प्रमाण वाढू लागले परंतु या चित्रपटाच्या मार्गे जी एक पद्धतशीर काम करण्याची विलक्षण दृष्टी होती, तिकडे मात्र इतर निर्मात्यांचे दुर्लक्ष झाले. उलट, प्रचंड बेसुमार खर्च म्हणजे यशाची हमी, असे एक अगदी चुकीचे समीकरण गृहीत धरले जाऊ लागले. त्यामुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून काही निर्मात्यांनी अधिक खर्चाचा, भव्य, डोळे दिपवणारा चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. याच काळात नव्या दृष्टीच्या, समस्याप्रधान कथानक हाताळणाऱ्या निर्मात्यांच्या पदरी अपयश आल्यामुळे चित्रपट वास्तवतेपासून अधिकाधिक दूर जाऊ लागला. तंत्र सुधारत जाऊनही संगीत व नृत्य यांचा जबरदस्त प्रभाव आजतागायत कमी न झाल्यामुळे चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांच्या बरोबरीने, तर कधी अधिक वेतन घेणारे व अधिक इतमामाने राहणारे संगीतकार, पार्श्वगायक-गायिका आणि नर्तक-वादक हाही एक महत्त्वाचा वर्ग निर्माण झाला. एखाद्या चित्रपटासाठी कोणी कोणी कामे केली आहेत यांची नामावळी पाहूनच प्रेक्षक तो चित्रपट पहावयाचा किंवा नाही हे ठरवी. या घटनेतूनच नटप्रधान पद्धती (स्टार सिस्टिम)चा उदय झाला. परिणामतः ज्यांची नावे चित्रपटांशी संबंधित असल्यावाचून चित्रपट बाजारात खपत नाही आणि त्यांना घेतल्यास खर्च वाढतो, असा हा दुहेरी पेच चित्रपट-निर्मात्यांसमोर उभा राहिला. यातून बाहेर पडण्याचा काही निर्माते यत्न करतात खरा, पण ते फसतात असाच आजवरचा अनुभव आहे.

या सर्व कारणांमुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस अधिकाधिक बेभरवशाचा होत चालला आहे. बोलपट सुरू झाल्यापासून पहिल्या २५ वर्षांच्या काळात फक्त ७२ निर्मात्यांनी १० किंवा त्यापेक्षा अधिक, फक्त पाचांनी पन्नासपेक्षा अधिक आणि अवघ्या दोन कंपन्यांनीच शंभरांच्यावर बोलपट काढले. त्या दोन कंपन्या म्हणजे रणजित फिल्म कंपनी (१२३ चित्रपट) आणि न्यू थिएटर्स (११४ चित्रपट) या होत.


या धंद्यावर कमीअधिक प्रमाणावर अवलंबून असलेले बरेच उपव्यवसाय आहेत. जाहिरात करण्याच्या आवश्यकतेमुळे भित्तिपत्रके (पोस्टर) छापणे, कापडावर जाहिरातीचे फलक रंगविणे, तसेच हस्तपत्रके (हँडबिल), गाण्याच्या पुस्तिका तयार करणे, वृत्तपत्रांतून जाहिराती देणे हा एक फार मोठा धंदा झाला आहे. चित्रपट चालू असताना जाहिरातीसाठी छायाचित्रे काढणे, त्यांच्या अनेक प्रती छापणे, त्या रंगवणे हाही एक जोडधंदा होऊन बसला. त्याचप्रमाणे चित्रपटनिर्मितीला लागणारे यांत्रिक सामान तयार करणारे, तसेच परदेशी यांत्रिक मालाची आयात करून तो पुरविणारेही आहेत. चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकांचा खपही अलीकडे खूपच वाढला असून त्यातून मिळणारे स्वामित्वाच्या हक्काचे पैसेही निर्मात्याच्या व गायकाच्या उत्पन्नाची एक मोठी बाब झाली आहे. चित्रपटगृहबांधणीच्या नवनवीन पद्धती अमलात येऊ लागल्यामुळे बांधकाम, वातानुकूल योजना, फर्निचरनिर्मिती इ. उद्योगांनाही उत्तेजन मिळत आहे.

धंद्याचा व्याप जसजसा वाढत चालला, तसतसे त्यातील लोक आपापल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊ लागले. निर्माते, वितरक, प्रदर्शक यांच्या संघटना तर होत्याच, त्याशिवाय विभागशः निरनिराळ्या संघटना ठिकठिकाणी स्थापन झाल्या. मग कामगार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, संगीतकार, पार्श्वगायक, भांडवलदार, आयात-निर्यात करणारे, चित्रपटनिर्मितिगृहांचे चालक इत्यादींच्याही संघटना स्थापन होऊ लागल्या. या सर्व संघटनांना सामावून घेऊ इच्छिणारी आणि शकणारी अशी फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही सर्वव्यापी संस्था १९६० मध्ये स्थापण्यात आली खरी, पण तिचे सर्व घटक तिच्याशी एकरूप झालेले नसल्यामुळे तिचा प्रभाव पडू शकला नाही. बहुतेक निर्माते चित्रपट तयार करण्यासाठी कर्ज काढतात. बरेच भांडवलदार निर्मात्याला चित्रपट कसा तयार करावा याविषयी सूचना देऊनच थांबत नाहीत, तर त्याला सरळ हुकूमच करतात. वितरक हा निर्माता आणि प्रदर्शक यांच्यामधील दुवा असला, तरी प्रसिद्धी आणि वितरण त्याच्या हातात असल्यामुळे त्याचाही निर्मात्यावर बराच प्रभाव असतो. प्रदर्शकाचा धंदा हा सर्वांत सुरक्षित. विशेषतः मोठ्या शहरांतील चित्रपटगृहे ठराविक भाड्याने दिली जातात, त्यामुळे चित्रपट चालो न चालो, प्रदर्शकाचे उत्पन्न मात्र नक्की आणि ठाम असते. हा सर्व भार शेवटी निर्मात्यावरच पडत असल्यामुळे त्याच्या दृष्टीने हा धंदा बेभरवशाचा आहे. चित्रपट तयार होताच तो प्रदर्शित होऊन पैसे लवकर हाती पडावे म्हणून प्रदर्शनाची त्याला घाई झालेली असते. येईल त्या किंमतीला तो झटपट विकून टाकण्यास तयार असतो. एकंदर उत्पन्नापैकी ६० टक्के उत्पन्न मुंबई, दिल्ली, कलकत्ता यांसारख्या मोठ्या शहरांतून येत असल्यामुळे तेथे चित्रपट लावण्याची त्याला घाई असते. हा व्यवसाय प्रत्येक ठिकाणी सरकारी अथवा निमसरकारी नियंत्रणे व कर यांच्या भाराखाली दबलेला आहे. उदा., कच्ची फिल्म व यंत्रसामग्रीसाठी लागणारा केंद्र सरकारचा आयात परवाना व त्यासाठी पडणारा केंद्रीय व राज्य सरकारचा कर, नगरपालिकेची जकात, केंद्रीय अबकारी कर, फिल्मचा साठा करण्यासाठी परवाना शुल्क, चित्रपट प्रशस्तिप्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडणारे शुल्क राज्याचा करमणूक कर, खेळावर व त्याच्या जाहिरातीवर पडणारा नगरपालिकेचा कर इत्यादी.

भारतीय निर्माते परदेशी बाजारपेठेकडे पहिल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवानंतर म्हणजे १९५२ पासून लक्ष देऊ लागले. सरकारनेही निर्यातीस उत्तेजन देणारी एक योजना अमलात आणून अधिक उत्पन्न आणणाऱ्यास अधिक सवलती जाहीर केल्या. अंशतः त्यांचा परिणाम म्हणून आणि इतरही अनुकूल परिस्थिती लाभल्यामुळे १९५४ पासून या दिशेने चांगली प्रगती झाली आहे. परदेशातून लाभणारे उत्पन्न स्टर्लिंग गटातील ४० देश आणि इतर २५ देशांतून आलेले आहे. त्यांपैकी श्रीलंका, केन्या, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, ग्रेट ब्रिटन, इंडोनेशिया आणि सुदान हे काही प्रमुख देश होत.

चित्रपटनिर्मितीत संख्येच्या दृष्टीने जरी भारत आघाडीवर असला, तरी लोकसंख्येच्या मानाने चित्रपटगृहांची वाढ अधिक व्हावयास हवी. तसे झाले तरच निर्मात्याच्या उत्पन्नात भर पडून धंद्याला स्थैर्य येऊ शकेल. सध्या तरी हा धंदा फक्त चित्रपटगृहांच्या मालकांच्याच हमखास फायद्याचा होऊन बसला आहे. यात बदल होणे जरूर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धंद्याला लागणारे सर्व साहित्य देशातल्या देशात तयार होणे, हीदेखील एक निकडीची गरज आहे.

भारतीय चित्रपट-उद्योगात १९७४ साली गुंतवलेले भांडवल सु. ३५० कोटी रु. होते. तसेच करमणूक करापोटी सु. १२५ कोटी रु. सरकारकडे जमा झाले. जगात ५८ देशांत चित्रपटनिर्मिती होत असून त्यासाठी आर्थिक उलाढाल सु. ५०० कोटी डॉलर्सहून अधिक होते. जगात दरवर्षी सु. २,५०० चित्रपट निर्माण होत असून चित्रपटगृहे सु. १ लाख आहेत. तसेच चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वर्षाला सु, १,१०० कोटी म्हणजे दररोज सु. ३ कोटी पडते. भारतातील सर्व उद्योगांत चित्रपटव्यवसायाचा क्रमांक दुसरा, तर जागतिक चित्रपटसृष्टीत १९७० पासून पहिला क्रमांक आहे. जगात २५ ते ३० लाख लोक चित्रपटव्यवसायात असून सु. दीड कोटी लोकांची उपजीविका त्यावर होते. जगातील एकूण चित्रपटनिर्मितीपैकी जवळजवळ १२ टक्के चित्रपटनिर्मिती केवळ भारतात होते. १ एप्रिल १९७३ ते ३१ मार्च १९७४ या एका वर्षातील काळात भारतीय बोलपट लहानमोठ्या १०५ देशांत प्रदर्शित झाले व त्यांतून सु. ५/ कोटी रुपयांचे परकीय चलन भारताला मिळाले. त्यापैकी ग्रेट ब्रिटनकडून सु. १ कोटीहून अधिक चलन प्राप्त झाले आहे.

'आलमआरा चित्रपटाची जाहिरात',१९३१ चित्रपटप्रदर्शन : धंदा या दृष्टीने चित्रपटप्रदर्शनाची खरी सुरुवात १९०३ मध्ये झाली. त्या वर्षी द ग्रेट ट्रेन रॉबरी  हा चित्रपट जाहीर रीत्या प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर चित्रपटनिर्मिती वाढू लागली व चित्रपटप्रदर्शन हा व्यवसाय बनला. सुरुवातीला उपहारगृहे किंवा वखारी यांचाच चित्रपटगृहे म्हणून उपयोग करण्यात येई. पुढे १९०२ साली टॉमस जे. टॅली याने लॉस अँजेल्‌स येथे जागातिक पहिले खास चित्रपटगृह बांधले. भारतात १९०३ साली बोअर युद्धाची काही दृश्ये चित्रपटरूपाने प्रथम तंबूच्या चित्रपटगृहात दाखविण्यात आली. त्यानंतर मात्र लघुचित्रपट दाखविण्याचा धंदा जमशेटजी फ्रामजी मादन यांनी सुरू केला आणि त्यांनीच १९०७ साली कलकत्ता येथे भारतातील पहिले एल्‌फिन्स्टन चित्रपटगृह चालू केले. त्यापूर्वी उघड्या मैदानात वा तंबूमध्ये चित्रपटगृह चालू केले. त्यापूर्वी उघड्या मैदानात वा तंबूमध्ये चित्रपट दाखविले जात असत. ज्या चित्रपटाने दादासाहेब फाळके यांसारख्या कल्पक तंत्रज्ञांना भारतीय चित्रपटनिर्मितीची स्फूर्ती मिळाली, तो चित्रपटसुद्धा माणिक डी. सेठना यांच्या फिरत्या सिनेमा कंपनीतर्फे मुंबईतील कापाच्या मैदानात (सध्याचे आझाद मैदान) तंबूमध्येच दाखविला गेला होता परंतु पुंडलिक (१९१२) आणि राजा हरिश्चंद्र (१९१३) हे प्रारंभीचे भारतीय चित्रपट मात्र मुंबईतील तेव्हाच्या कॉरोनेशन नावाच्या चित्रपटगृहात दाखविण्यात आले होते. प्रथम कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे कायम स्वरूपाची चित्रपटगृहे बांधली गेली. पुढे इतर शहरे व छोटी गावे येथेही तशीच चित्रपटगृहे बांधली जाऊन चित्रपटप्रदर्शन व्यवसायाला स्थैर्य येत गेले आणि तो एक कायम स्वरूपाचा व्यवसाय बनला.

चित्रपटप्रसिद्धी : पूर्वीच्या काळी एखाद्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची प्रसिद्धी त्या चित्रपटगृहातर्फे करीत असत. नंतर मात्र प्रसिद्धीचा खर्च निर्मात्याला सोसावा लागे. पण आता चित्रपट जाहिरातीत खूप नावीन्य आले असून विविध माध्यमातून चित्रपटाची प्रसिद्धी होऊ लागली आहे. अलीकडे वृत्तपत्र जाहिरातींवर तर बराच खर्च केला जातो. केवळ वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्याचेच काम काही संस्था करीत असतात. चित्रपटविषयक नियतकालिके व वृत्तपत्रे यांखेरीज चित्रपटांची प्रसिद्धी अन्य माध्यमांतूनही होते. उदा., (१) चित्रपटाचे संवाद व गीते (हल्ली बहुधा गीतेच) असलेल्या पुस्तिका, (२) चित्रपट-पत्रिका, (३) भित्तिपत्रके व प्रसिद्धिफलक, (४) पोस्टकार्ड, (५) भेटकार्ड, (६) साधी किंवा रंगीत छायाचित्रे, (७) नभोवाणी व दूरचित्रवाणी, (८) चित्रझलक (ट्रेलर) इत्यादी. त्यामुळे इतक्या पद्धतींची कामे करणाऱ्या कलाकारांना चित्रपटप्रसिद्धिक्षेत्रात कामे मिळतात. भारतात सु. २७० संस्था चित्रपटप्रसिद्धीची वेगवेगळ्या पद्धतीची कामे करीत असतात.

'ॲस्टा निएल्सन' या पाश्चात्य चित्रपटाचे भित्तिपत्रक, १९१३ रसायनशाळा : चित्रपटावर प्रक्रिया करणे म्हणजे रसायनशाळा चालविणे. गेली ३० वर्षे हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. पूर्वीच्या काळी चित्रपटनिर्मात्याचे स्वतःचे चित्रपटनिर्मितिगृह असे. त्यातच रसायनशाळाही असे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चित्रपटगृह नसणारे चित्रपटनिर्माते निर्माण होऊ लागले. चित्रपटांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे कामही वाढले. त्यातून या रसायनशाळा उभ्या राहिल्या. पूर्वी रंगीत चित्रपटावरील प्रक्रिया परदेशांतून करून आणावी लागे. आता तेही काम भारतात होते. सध्या भारतात सु. ४० रसायनशाळा आहेत आणि सु. १५ कोटी रुपयांचे भांडवल या व्यवसायात गुंतले आहे. तसेच सु. दोन हजार लोक या क्षेत्रात काम करतात. १९३४ साली पहिली वातानुकूलित रसायनशाळा प्रभात फिल्म कंपनीने त्यांच्या मोठ्या चित्रपटनिर्मितिगृहाला जोडूनच बांधली होती. काही रसायनशाळांत चित्रपटसंकलन, ध्वनिमुद्रण यांचीही सोय असते. तेथे गीते, धावती वर्णने (कॉमेंट्री) यांचे ध्वनिमुद्रण चालू असते. ठराविक भाड्यावर या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. रसायनशाळांचा तो एक जोडधंदा असतो.

चित्रपटवितरण : मूकपटाच्या जमान्यात चित्रपटनिर्मिती मर्यादित होत असल्यामुळे वितरणसंस्था किंवा प्रतिनिधिपद्धत अस्तित्वात नव्हती. ते काम निर्मात्यालाच करावे लागे. महाराष्ट्र फिल्म कंपनीने आपला एक स्वतंत्र वितरण-विभाग अगदी प्रथमपासून कोल्हापुरात चालू ठेवला होता तथापि मुंबईतील प्रत्यक्ष व्यवहाराची बाजू दादासाहेब तोरणे व बाबूराव पै हे दोघे पाहत असत. पाथे कंपनीने भारतात चित्रपटवितरणाची प्रथम सोय १९०७ साली केली. त्या वेळी भारतीय चित्रपटनिर्मितीस प्रारंभ झाला नसल्याने चित्रपटवितरण फक्त परदेशी चित्रपटांचेच करावे लागे. १९१७ साली अमेरिकेच्या युनिव्हर्सल पिक्चर्सने चुनिलाल मुनिम यांना भारतातील आपले वितरक नेमले. १९१९ साली कलकत्त्याच्या मादन कंपनीने मात्र चित्रपटवितरणाची स्वतंत्र व्यवस्था केली. तसेच त्यापाठोपाठ ग्लोब थिएटर्स, के. डी. अँड ब्रदर्स, मे. रेवाशंकर पांचोली या चित्रपटवितरणसंस्था अस्तित्वात आल्या. १९२६ साली युनिव्हर्सल पिक्चर्सने वितरणाचे कायम स्वरूपाचे कार्यालय भारतात सुरू केले आणि त्यानंतर इतर पाश्चिमात्य चित्रपटसंस्थांनीही आपापली वितरण-कार्यालये येथे सुरू केली. १९३० नंतर चित्रपटांची संख्या वाढली. तसेच चित्रपटनिर्मितीच्या खर्चातही वाढ झाली. त्यामुळे चित्रपटनिर्मात्यांना आपापले चित्रपट  प्रदर्शित करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थ आवश्यक वाटू लागला. ती उणीव चित्रपटवितरकांनी दूर केली. चित्रपटनिर्मात्यांना वेळोवेळी योग्य अटींवर द्रव्यसाहाय्य करण्याची सोय चित्रपटवितरकांकडून होत असल्याने, चित्रपटनिर्माता आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क वितरकाला कायमचे अगर ठराविक मुदतीपर्यंत देऊन पुढची दगदग टाळतो, किंवा ज्या मातब्बर निर्मात्याची स्वतःची अगर स्वतः भाड्याने घेतलेली चित्रपटगृहे असतात, तो स्वतःच्या वितरणसंस्थेतर्फे आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची व्यवस्था करतो परंतु असे चित्रपटनिर्माते, परदेशात काय, किंवा भारतात काय, फारच अल्प प्रमाणात असतात. सर्वसामान्य चित्रपटनिर्मात्यांना आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या बाबतीत वितरणसंस्थांवरच अवलंबून राहावे लागते.

चित्रपटप्रदर्शन पुढील तीन पद्धतींपैकी एखाद्या पद्धतीने होत असते : (१) चित्रपटनिर्माता आपल्या चित्रपटाचे सर्व हक्क चित्रपटवितरकाला कायमचे अगर काही मुदतीपुरते विकतो, अर्थात त्या चित्रपटाचे सर्व प्रकारचे मालकी हक्क कायमचे अगर ठराविक मुदतीपुरते चित्रपटवितरकाकडे जातात (२) चित्रपटवितरकाकडे अगर थेट चित्रपटप्रदर्शनाकडे ठराविक कमिशनवर चित्रपटप्रदर्शनाचा हक्क दिला जातो किंवा (३) चित्रपटवितरकाने चित्रपटनिर्मात्याला त्या त्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जी रक्कम आगाऊ दिलेली असते, ती वसूल करण्यासाठी चित्रपटवितरक त्या त्या चित्रपटाचे प्रदर्शन करून आलेल्या रकमेतून आपले कमिशन व आगाऊ दिलेली रक्कम कापून घेतो आणि उरलेला भाग निर्मात्याला देतो.

चित्रपटप्रदर्शनाचे हक्क देण्याघेण्याच्या सुकरतेसाठी व सोयीसाठी भारतीय सिनेमासृष्टीत पुढील पाच विभाग करण्यात आले आहेत. (१) मुंबई विभाग, (२) बंगाल विभाग, (३) मध्य विभाग, (४) उत्तर विभाग आणि (५) दक्षिण विभाग. या प्रत्येक विभागात शेकडो चित्रपटगृहे असून, चित्रपटनिर्माते, वितरक व प्रदर्शक आपापसांतील कराराप्रमाणे त्या त्या भागातील चित्रपटगृहांतून चित्रपटप्रदर्शन करतात. भारतात परदेशी चित्रपटनिर्मात्यांच्या मालकीचीसुद्धा काही चित्रपटगृहे आहेत आणि त्यांतून त्या चित्रपटनिर्मात्यांचे चित्रपट दाखविले जातात. परदेशी चित्रपटवितरणाचे व प्रदर्शनाचे हक्क संपादन करणाऱ्या जशा काही भारतीय संस्था आहेत, त्याचप्रमाणे भारतीय चित्रपटांचे परदेशात वितरण आणि प्रदर्शन करणाऱ्या काही परदेशी संस्थाही आहेत. अशा रीतीने चित्रपटप्रदर्शन हा एक स्वतंत्र धंदा असला, तरी तो चित्रपटवितरण आणि चित्रपटनिर्मिती यांच्याशी निगडित आहे. वितरणाचे विभाग पाडल्याने नवीन नवीन वितरकांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास उत्तेजन मिळाले. १९७४-७५ मध्ये भारतात सु. दीड हजार वितरक व वितरणसंस्था असून एकूण आर्थिक उलाढाल सु. ७७ कोटी रुपयांची होती.


चित्रपट-उद्योगक्षेत्रातील संस्था : चित्रपटाशी संबंधित असणाऱ्यांच्या संघटनात्मक संस्था अमेरिकेत प्रथम स्थापना झाल्या. न्यूयॉर्क येथील ‘इंटरनॅशनल अलायन्स ऑफ थिएट्रिकल स्टेज एम्प्लॉइज अँड मुव्हिंग पिक्चर मशिन ऑपरेटर्स ऑफ यू. एस. अँड कॅनडा’ ही एक तशा तऱ्हेच्या संस्थांपैकी जुनी आणि आद्य संस्था असून ती १७ जुलै १८९३ रोजी स्थापन झाली. त्यानंतर १८९६ च्या ऑक्टोबर महिन्यात स्थापन झालेली आणखी एक संस्था म्हणजे ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ म्युझिशियन्स’ ही होय. अमेरिकेमध्ये चित्रपटसृष्टीत कामे करणाऱ्यांच्या आणि चित्रपटसृष्टीशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असणाऱ्यांच्या शेकडो संस्था आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या संस्था अशा : (१) असोसिएटेड ॲक्टर्स अँड आर्टिस्ट ऑफ अमेरिका (१९१९) (२) ॲकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (१९२७) (३) असोसिएशन ऑफ पिक्चर प्रोड्यूसर्स (१९२४) (४) इंडिपेन्डंट मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स (१९३४) (५) मोशन पिक्चर थिएटर ओनर्स ऑफ अमेरिका इत्यादी. अमेरिकेप्रमाणेच इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, रशिया, जपान या देशांतही चित्रपटसृष्टीतील विविध व्यावसायिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संस्था आहेत.

भारतातही ही प्रथा सुरू झालेली आहे. भारतीय चित्रपट-उद्योगाच्या दृष्टीने पश्चिम विभाग, मध्य विभाग, उत्तर विभाग, पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग असे पाच विभाग कल्पिले, तर त्या त्या विभागांतील चित्रपट-व्यावसायिकांच्या अनेक संघटनात्मक संस्था स्थापन झाल्याचे आणि त्यांचे कार्यही सुरळीतपणे चालू असल्याचे आढळून येते. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन ही १९३७ साली स्थापन झालेली चित्रपटनिर्मात्यांची मातब्बर आणि वजनदार प्रातिनिधिक संस्था ‘इंपा’ या संक्षिप्त नावाने ओळखली जाते. या संस्थेचे कार्यालय मुंबईत आहे. चित्रपटनिर्मितिगृहाच्या मालकांची एक वेगळी संघटना मुंबईत असून त्या संघटनेचे नाव फिल्म प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया असे आहे. ही १९५४ साली स्थापना झाली. भारतीय चित्रपटवितरकांची संघटना इंडियन मोशन पिक्चर डिस्ट्रिब्यूटर्स असोसिएशन या नावाने प्रसिद्ध असून, सेंट्रल सर्कीट सिनेअसोसिएशन ही मध्य विभागातील वितरकांची व प्रदर्शकांची १९५१ साली स्थापन झालेली संस्था आहे.सिनेमॅटोग्राफ एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही चित्रपटप्रदर्शकांची प्रातिनिधिक संस्थादेखील १९४६ साली स्थापन झालेली आहे. मुंबईत चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांची व कर्मचाऱ्यांची अनेक मंडळे असून त्या मंडळांचे एक महामंडळ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइज या नावाने स्थापन करण्यात आले आहे.

पाश्चात्त्य देशांत चित्रपटप्रेक्षकांच्या संघटना असून त्यांची सूत्रे बहुधा महिलांच्या हाती असतात. भारतात चित्रपटप्रेक्षकांच्या प्रातिनिधिक संस्था नाहीत. मराठी प्रेक्षक संघ नावाची एक संस्था मात्र काही वर्षांपूर्वी मुंबईत स्थापना झाली होती, परंतु ती आता इतिहासजमा झाली आहे. पुण्याला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था सुरू झाली असून त्यात चित्रपटविषयक वस्तूंचे, प्रसिद्ध चित्रपटांचे आणि तदानुषंगिक इतर मौलिक गोष्टींचे जतन करण्यात येते.

शिंदे, मा. कृ. वाटवे, बापू