सामंत, शक्ति : (१३ जानेवारी १९२६–९ एप्रिल २००९). हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक. जन्म बरद्वान (प. बंगाल) येथे. डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली (१९४४) व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. राज कपूर अभिनित सुनहरे दिन चे (१९४९) ते साहाय्यक दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान व धोबी डॉक्टर (१९५४). बहु (१९५४) हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथाचित्रपट होय. त्यानंतर त्यांनी इन्स्पेक्टर (१९५६), शेरु (१९५६), डिटेक्टिव्ह (१९५७) व हिलस्टेशन (१९५७) हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या निशाणाखाली त्यांनी हावडा ब्रिज (१९५८) हा पहिला चित्रपट निर्माण केला. त्याने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. सामंतांनी एकूण ४३ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांतील ३७ हिंदी व ६ बंगाली चित्रपट होते. त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिज, चायना टाऊन (१९६२), काश्मीर की कली (१९६४), ॲन इव्हनिंग इन पॅरिस (१९६७), आराधना (१९६९), कटी पतंग (१९७०), अमर प्रेम (१९७१) इ. उल्लेखनीय आहेत. एकच चित्रपट दोन भाषांत (हिंदी व बंगाली ) निर्माण करण्याचा प्रयोग प्रथमतः करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी अमानुष हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांत १९७४ मध्ये निर्माण केला. भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला पहिला चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्नाला (१९४२–२०१२) नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंगअमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. राजेश खन्नाला नटश्रेष्ठ (सुपरस्टार) पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चां क गाठला. राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांचा प्रभावी अभिनय व सचिन देव बर्मन यांचे सुमधुर संगीत, यांचा चित्रपटाच्या यशात मोठा वाटा होता. काश्मीर की कलीपासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अन्जाने (१९७४), मेहबूबा (१९७६), आनंद आश्रम, अनुरोध (१९७७), बरसात की एक रात (१९८१) व अलग अलग (१९८५) इत्यादींचा समावेश होतो. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत, लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही त्यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट त्यांनी निर्माण केले. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरु केली. निर्मितिपश्चात अंकीय श्राव्यसुविधा (डिजिटल ऑडिओ पोस्ट-प्रॉडक्शन फॅसिलिटी) पुरवणे, हे तिचे उद्दिष्ट होते. मुंबईच्या बॉलिवुड व पाश्चात्त्य हॉलिवुडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे सचेतनीकरण फिल्ममध्ये (ॲनिमेशन फिल्म) रुपांतर करण्यात आले.

सामंत यांना आराधना, अनुरागअमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना दूरदर्शनच्या ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ एकूण चित्रपटकारकीर्दीसाठी देण्यात आला (२००२). त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बैरुत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष (५ वर्षे), केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष (७ वर्षे) तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष (२ वर्षे) ही पदे त्यांनी भूषविली.

त्यांचे मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले.

इनामदार, श्री. दे.