वसंत देसाई

देसाई, वसंत कृष्णा : (? – २२ डिसेंबर १९७५). भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक.सोनवडे जि. रत्नागिरी येथे जन्म. लहानपणापासून त्यांच्या मनावर भजनाचे संस्कार झाले. सर्कशीत जावे असे त्यांना लहानपणी वाटत होते म्हणून ते कोकणातून कोल्हापुरास आले (१९२९) परंतु सर्कशीत न जाता प्रभात फिल्म कंपनीत गेले. मूकपटांतून किरकोळ भूमिकाही त्यांनी केल्या होत्या. त्याच सुमारास प्रभात फिल्म कंपनीचा अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्या बोलपटात त्यांनी संगीतदिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांना सहकार्य दिले, तर १९३४ साली प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापुराहून पुण्यास स्थलांतर झाल्यावर वसंतरावांनी केशवराव भोळे आणि मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यासारख्या संगीत-अभ्यासकांबरोबर साहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या सहवासात राहून त्यांनी गाण्यातील स्वर, तान, मुरकी इ. संगीत-विशेष संपादन केले व रसानुकूल भावदर्शन आपल्या गाण्यात आणण्याचे कसब दाखविले तसेच स्वतंत्र स्वररचनेचे तंत्र त्यांनी हाताळले. प्रभातच्या संत ज्ञानेश्वर आणि संत सखू या गाजलेल्या चित्रपटांच्या काही चाली व बरेचसे पार्श्वसंगीत वसंत देसाई यांचे आहे. त्याच वेळी देसाई यांनी उसना आवाजही प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांना दिला होता व चित्रपटांतून भूमिकाही ते करीत होते. प्रभातच्या धर्मात्मामध्ये राणू महार आणि संत ज्ञानेश्वरमधील भैरु गाडीवान या त्यांच्या विशेष लक्षात राहण्यासारख्या भूमिका होत. हलक्याफुलक्या संगीतापेक्षा रागदारी संगीतामध्ये त्यांना विशेष गोडी असल्यामुळे प्रभात फिल्म कंपनीत असतानाच त्यांनी इनायत खाँसाहेब यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताची साधना केली. तसेच ख्यातनाम गवयांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका वारंवार ऐकून व विविध घराण्यांच्या गायकांच्या बैठकांना जाऊन संगीतातील मर्म समजावून घेण्याचे त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या गाण्याच्या बैठकीही त्या काळात होत असत.

राजकमल कलामंदिराच्या शकुंतला (१९४३) चित्रपटापासून खऱ्या अर्थाने त्यांना स्वतंत्र संगीतदिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यानंतर ३२ वर्षे त्यांनी अनेक चित्रपट, नाट्यकृती, बालगीते, समरगीते यांना उत्कृष्ट संगीत दिले. शकुंतला, रामजोशी, अमरभूपाळी, दो आँखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, गुंज उठी शहनाई, आशीर्वाद व गुड्डी या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत विशेष गाजले. महाराष्ट्राच्या स्थापनाप्रसंगी त्यांनी चाल दिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ भूपाळी म्हटली गेली. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताने पाकिस्तानात आकाशवाणीवर व शाळांतून प्रार्थनेचा दर्जा संपादन केला. हिंदी-मराठी मिळून एकूण सु. ६५ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. या संगीतात रागदारीबरोबरच महाराष्ट्राच्या लोकगीतांचाही आविष्कार त्यांनी घडविला होता. त्यामुळेच भारतातील सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शक म्हणून वसंत देसाई यांचा लौकिक झाला. दुधात पाणी मिसळून जावे तसे त्यांचे संगीत चित्रवस्तूत सहजपणे मिळून जाई. त्यामुळे त्यांच्या संगीताने आपले स्वतःचे वेगळेपण टिकवून ठेवले होते. वसंत देसाई यांच्या स्वरसाजाने समृद्ध झालेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाने मराठी रंगभूमीची संगीतपरंपरा पुन्हा सुरू केली.

त्यांना समरगीतांचे जनकही मानण्यात येई. १९६२ मधील चीनच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी स्वरबद्ध केलेले ‘जिंकू किंवा मरू’ हे ग. दि. माडगूळकरांचे समरगीत विशेष लोकप्रिय ठरले. देसाई हे महाराष्ट्र राज्य शासनाचेही संगीतदिग्दर्शक होते. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय व परराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. १९७१ साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पदवी दिली होती तर १९७३–७४ मध्ये त्यांना मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. १९७५ मध्ये विधान परिषदेवर त्यांची राज्यपालांनी नियुक्ती केली होती.

वसंत देसाई यांना पाश्चिमात्य रचनाकारांची भ्रष्ट नक्कल करणे आवडत नसे. तसेच निर्मात्यांचे वर्चस्व सहन न करता स्वतःच्या कलासाधनेवरच ते दीर्घकाल ठाण मांडून उभे होते.

साधा पोषाख, निगर्वी स्वभाव व हसरा चेहरा हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष असून त्यांना आपल्या हातात सुगंधी फुलांचा गजरा बाळगण्याचा शौक होता. ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले होते. अशा या गुणी संगीततज्ञाला मुंबई येथील पेडर रोडवरील त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी वयाच्या एकसष्टाव्या वर्षी  लिफ्टमध्ये अपघाती मरण आले.

वाटवे, बापू जोशी, चंद्रहास