चित्रपटकथा : चित्रपट ही एक संमिश्र व मुख्यतः दृक्‌श्राव्य कला असल्याने त्यातील कथानक केवळ वाङ्‌मयीन दृष्टीने निवडले जात नाही. शिवाय चित्रपटाच्या एकूण गुणवत्तेत त्यातील कथानकाला एकमेव महत्त्व नसते. चित्रपटकथा ही एक प्रकारे दृक्‌श्राव्य अशा दुहेरी स्वरूपाची कथा असते. तिच्यात डोळ्यांनी पाहण्यासारखे आणि कानांनी ऐकण्यासारखे पुष्कळ काही असावे लागते, तसेच चांगल्या कथेचे जे काही वाङ्‌मयीन गुणधर्म संभवतात, उदा., आकर्षक प्रारंभ, उत्कंठावर्धक विकास, नाट्यपूर्ण घटना, चित्तवेधकता आणि एखाद्या नव्या जीवनानुभवाचे दर्शन हे सर्व चित्रपटकथेत आवश्यक असतात. हे कथागुण साधण्यासाठी किंवा त्यांना उठावदारपणा आणण्यासाठी चित्रपटकलेत अनेक तांत्रिक सोयी असतात. उदा., कॅमेऱ्याच्या कुशल उपयोगाने कथानकातील नाना पात्रप्रसंग हव्या त्या प्रमाणात आणि स्वरूपात आकर्षक व कलात्मक करता येतात. केवळ वाचनासाठी अवतरलेली कथा-कादंबरी या दृष्टीने चित्रपटकथेच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. रंगभूमीवरील होणाऱ्या नाटकातील संविधानकही अनेक व्यावहारिक मर्यादांत उभे करावे लागते. चित्रपटकथा मात्र एक अत्यंत विमुक्त असा कथाप्रकार आहे. तिच्या आशय-आविष्काराला तांत्रिक सोयींमुळे अमर्याद वाव असतो तथापि तिचे स्वरूप या तांत्रिक गोष्टींनी मर्यादितही होते. पुष्कळदा तंत्रकुशलताच वरचढ होऊन कथा नाममात्र ठरते व तिचा प्राणशून्य सांगाडा तेवढा उरतो. असे असले, तरी दृश्यता आणि श्राव्यता या आवश्यक गुणांखेरीज चित्रपटकथा फारशी यशस्वी होऊ शकत नाही.

चित्रपटकथेचे दोन भाग असतात : एक म्हणजे मूळ कथा व दुसरा म्हणजे त्या कथेच्या आधारे प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी तयार केलेली पटकथा. अनेकदा वाङ्‌मयात प्रसिद्ध असलेल्या लघुकथांची मूळ कथा चित्रपटात स्वीकारलेली असते. उदा., वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा इ. मराठी चित्रपट य. गो. जोश्यांच्या त्याच नावांच्या लघुकथांवर आधारलेले आहेत. प्रसिद्ध कांदबऱ्यांवर आधारलेले चित्रपटही असतात. उदा., कुंकू, अमृतमंथन  हे मराठी व गुड अर्थ, आलिव्हर ट्‌विस्ट  हे इंग्रजी चित्रपट. त्याचप्रमाणे हॅम्लेटसारख्या नाटकांवर आधारलेले चित्रपटही आढळतात. तथापि मूळ कथा स्वतंत्र असो किंवा प्रसिद्ध कथाकादंबऱ्यांवर आधारित असो, ती कथा जशीच्या तशी चित्रित करता येत नाही. यासाठी पटकथा तयार करावी लागते. लघुकथेवरून चित्रपट तयार करण्यासाठी त्यात खूपच भर घालावी लागते. एवढेच नव्हे, तर कादंबरी किंवा नाटक यावरून चित्रपट तयार करतानाही पुष्कळदा काही नवीन भाग, पात्रे, उपकथानक यांची जोड चित्रपटकथेला द्यावी लागते. काही वेळा त्यातील काही भाग वगळावा लागतो. जी दृश्ये नाटकात तांत्रिक दृष्ट्या दाखविणे अशक्य असते, ती चित्रपटात घेता येतात तर कादंबरीतील एखादा प्रसंग कादंबरीत वर्णिला असला, तरी तो चित्रित करणे अवघड असते. तो गाळावा लागतो. पुष्कळदा मूळ कथालेखक व पटकथालेखक हे वेगळेही असतात. पटकथेत चित्रणयोग्य पात्रप्रसंगांची समग्र मांडणी करावी लागते. यासाठी मूळ कथेत अनेक फेरफारही करण्यात येतात. चित्रपटात येणारा प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक पात्र यांची तपशीलवार अशी ही आखणीच असते. या आणखीनुसार संवाद लिहिले जातात. पुष्कळदा मूळ कथालेखक, पटकथालेखक व संवादलेखक हे वेगवेगळे असतात. काही वेळा असा लेखक एकच असतो. संवादलेखनाबरोबरच गीतरचनाही पटकथेचाच एक भाग म्हणून निश्चित करावी लागते. अशी गीते रचणारा कवीदेखील वेगळा असतो. ग. दि. माडगूळकर मात्र कथा, पटकथा, संवाद व गीत-लेखक म्हणून यशस्वी झाले. सु. पाउणशे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अशा प्रकारचे लेखन केलेले आहे.

पटकथेतील चित्रणयोग्य प्रसंगाला क्रमदृश्य (सीक्वेन्स) असे म्हणतात. ही दृश्ये लहानमोठी असू शकतात. तसेच त्यांचा अनुक्रमही निश्चित केलेला असतो. प्रत्येक दृश्य संपले की दुसरे दृश्य सुरू होते. त्यांच्यात साखळीवजा दुवा असतो. अर्थात सगळीच दृश्ये अशा एकाच एक साखळीत बांधलेली असतातच, असे नाही. अतिशय वेगळे असे दृश्य पुष्कळदा सुरू करावे लागते व आधीच्या दृश्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंधही नसतो. दृश्याचे हे तंत्र उदयन-अपायन, वेधसंक्रमण, पूर्वदृश्य चित्रण इ. तंत्रांनी हाताळतात. म्हणूनच पटकथेत प्रत्येक दृश्याचा आरंभ आणि अंत स्पष्टपणे निश्चित करावा लागतो. पटकथालेखक नुसता लेखक असून भागत नाही. त्याला चित्रपटाच्या तांत्रिक अंगांची, विशेषतः छायाचित्रणाची आणि ध्वनिमुद्रणाची, पूर्ण कल्पना असावी लागते. कारण पटकथेच्या आधारेच संपूर्ण चित्रपटातील सर्व दृश्ये चित्रित केली जातात. तेव्हा या तांत्रिक बाबींचा जास्तीत जास्त कौशल्याने फायदा करून घेणे, हे पटकथाकाराचे काम असते. चित्रपटकथेचे संवाद हे कथानुकूल व वास्तववादी असावेत, अशी अपेक्षा असते. चित्रपट हे प्रत्यक्षाचे हुबेहूब प्रतिबिंब असल्याने संवादांत कृत्रिमता वा नाटकीपणा टाळणे इष्ट मानले जाते.

चित्रपट सुरू होताच साधारणतः सुरुवातीला त्याने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली पाहिजे. या आकर्षक आरंभाचे काम तांत्रिक गोष्टींनी साधता येते. तथापि चित्रपटकथेची ही महत्त्वाची जबाबदारी आहे. चित्रपटकथेचा आरंभ झटकन झाला पाहिजे आणि तो उत्कंठावर्धक असला पाहिजे. शेवटही परिणामकारक असला पाहिजे, मग तो चित्रपट विनोदी, सुखान्त किंवा शोकपर्यवसायी असो.


छायाचित्रणाची अनेक तंत्रे, ध्वनिमुद्रण आणि संकलन यांचा कौशल्याने केलेला वापर चित्रपटकथेला अधिक परिणामकारक बनवितो. भव्य देखावे (सेटिंग्ज) आणि प्रत्यक्ष खुल्या वातावरणात केलेले चित्रीकरण यांचा वातावरणनिर्मितीसाठी उपयोग करून घेता येतो. प्रत्येक दृश्य कॅमेऱ्याच्या कोणत्या कोनाने घ्यावे हे पटकथाकाराने सुचविल्यास त्यामुळेही कथेची परिणामकारकता वाढते. दृश्यमिश्रणासारख्या तंत्राचा उपयोग करून व प्रतीकात्मक दृश्ये योजून चित्रपटकथा प्रभावी करता येते.

एकंदरीत चित्रपटकथा हीदेखील एक मिश्र कलाच आहे. अनेक तंत्रे आणि तंत्रज्ञ यांच्या सांघिक आणि सहकारी प्रयत्नाने ती रूपास येते. मुख्यतः चित्रपटाच्या मूल्यमापनात निदान वीस टक्के गुण तरी चित्रपटकथेला दिले जावेत, असे म्हटले जाते. म्हणजे एकूण चित्रपटाच्या महत्त्वात निदान एकपंचमांश भाग चित्रपटकथेचा असतो. अलीकडे चित्रपटकथेसाठी मोठ्या निर्मितिसंस्थांचे स्वतंत्र असे विभाग असतात व त्या विभागातर्फे चित्रपटकथा तयार केल्या जातात तथापि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक श्रेष्ठ पटकथाकार होऊन गेले आहेत. चित्रपटकथा स्वतंत्रपणे प्रसिद्धही केल्या जातात. आचार्य प्र. के. अत्रे यांच्या काही चित्रपटकथा प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच प्रसिद्ध चित्रपटांच्या कथा वाङ्‌मयीन कथेप्रमाणे लिहून प्रसिद्ध केल्यास त्या चित्तवेधक ठरतात. मराठीत शांता शेळके यांनी काही पश्चिमी चित्रपटकथा या पद्धतीने प्रसिद्ध केल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत शिवराम वाशिकर, विष्णुपंत औंधकर, भा. वि. तथा मामा वरेरकर या मूकपटातील चित्रपटलेखकांना चित्रपटाच्या माध्यमाची बरोबर कल्पना आलेली होती. प्रभात फिल्म कंपनीच्या संत तुकाराम, गोपालकृष्ण, संत ज्ञानेश्वर  व रामशास्त्री  या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा शिवराम वाशिकर यांच्या होत्या, तर सावकारी पाश, भरत भेट  व रामराज्य  या चित्रपटांच्या पटकथा विष्णुपंत औंधकर यांच्या होत्या. मराठीतील इतर काही उल्लेखनीय पटकथाकार पुढे दिले असून त्यांच्या काही चित्रपटांचे निर्देश कंसात दिलेले आहेत : नानासाहेब सरपोतदार (मूकपट सैरंध्री ) वि. स. खांडेकर (अमृत छाया, सरकारी पाहुणे) आचार्य अत्रे ( ब्रह्मचारी, अर्धांगी) ना. ह. आपटे (कुंकू) विश्राम बेडेकर (पहिला पाळणा, अमरभूपाळी) ग. दि. माडगूळकर (रामजोशी, ऊनपास, मी तुळस तुझ्या अंगणी, पुढचं पाऊल, पेडगावचे शहाणे) दिनकर पाटील (जय मल्हार) व्यंकटेश माडगूळकर (सांगत्ये ऐका, धाकटी जाऊ) पु. ल. देशपांडे (दूधभात) मधुसूदन कालेलकर (क्षण आला भाग्याचा, बायांनो नवरे सांभाळा) ग. रा. कामत (गृहदेवता, घरचं झालं थोडं) शंकर पाटील (पिंजरा) इत्यादी.

हिंदी व नंतर भारतीय भाषांतील काही उल्लेखनीय पटकथालेखक पुढीलप्रमाणे आहेत : गुलजार (कोशिश, आंधी, आशीर्वाद) : सत्यजित रे (सोनार केल्ला, प्रतिद्वंद्वी) मृणाल सेन (भुवन शोम) तपन सिन्हा (एखनई) पुटण्णा (गेज्जे पूजे) भूपेन हजारिका (लोटीघोटी) बी. एन्. रेड्डी (रंगुला रातम्) ऋत्विक घटक (अजांत्रिक, कोमल गंधार, मेघ ढाके तारा) अख्तर उल् अमन (कानून) राजेन्द्रसिंग बेदी (दस्तक) अण्णादुराई (ओरे इखू वेलईक्कारी) करुणानिधी (मन मंगल, पराशक्ति) केशव देव (चेम्मीन) उरुब (नील कुयील) बशीर (बाल्यकाला सखी) थोपील भासी (तुलाभारम्) टी. वासुदेवन् नायर (ओळवूम तीरवूम) एल्. लक्ष्मीनारायण (उय्याले) गिरीश कर्नाड (संस्कार) सलीम जावेद (शोले) पं. मुखराम शर्मा (औलाद, एकही रास्ता) ख्वाजा अहंमद अब्बास (सात हिंदुस्तानी, बॉबी) इत्यादी.

काही महत्त्वाचे पश्चिमी पटकथाकार व त्यांच्या चित्रपटांची नावे अशी : कार्ल फोरमन (गन्स ऑफ नेव्हॅरॉन) फिलिप डन (हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली) वाइल्डर बिली (द लॉस्ट वीक-एन्ड) सिडनी हॉवर्ड (गॉन विथ द विंड) विल्यम रोझ (द रशियन्स आर कमिंग) रॉबर्ट बोल्ट (डॉक्टर झिव्हॅगो) एडवर्ड ॲन्हाल्ट (बेकेट) अर्नेस्ट लेहमन (नॉर्थ बाय नार्थवेस्ट) इअन एम्. हंटर (रोमन हॉलिडे) टेनेसी विल्यम्स (ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर) डेव्हिड लिन (ग्रेट एक्स्पेक्टेशन्स) इंगमार बर्गमन (वाइल्ड स्ट्रॉबेरीज) इत्यादी.

जाधव, रा. ग.