रन्वार, झां : (१५ सप्टेंबर १८९४–१२ फेब्रुवारी १९७९). प्रसिद्ध फ्रेंच चित्रपटनिर्माता व दिग्दर्शक. जन्म पॅरिस येथे. त्याचे वडील प्येअर ऑग्यूस्त रन्वार हे दृक्‌प्रत्ययवादी पंथातील सुप्रसिद्ध चित्रकार होते. झां रन्वार हा ॲक्स-आं-प्रॉव्हांस या विद्यापीठातून तत्त्वज्ञान व गणित विषयांचा पदवीधर झाल्यानंतर, त्याने लष्करातील घोडदळ पलटणीत १९१३ साली प्रवेश केला व तो घोडदळातील अधिकारी बनला. पहिल्या जागतिक महायुद्धात त्याच्या पायास दुखापत झाली. त्यातून बरा झाल्यावर तो वैमानिक झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने ह्युश्‌लिंग या मॉडेलिंग करणाऱ्या युवतीशी विवाह केला (१९१९). त्यानंतर दोघांनीही चार वर्षे मृत्स्नाशिल्पे तयार करणाऱ्या कारखान्यात काम केले. याच काळात त्याने अमेरिकन चित्रपट, तसेच ⇨ चार्लस चॅप्लिनचे चित्रपट चौकस दृष्टीने पाहिले व तो चित्रपटसृष्टीकडे आकर्षिला गेला. आपली स्वतंत्र चित्रपटसंस्था काढून आपल्या पत्नीस ‘कॅथरीन हेसलिंग’ या नावाने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री बनविले.

त्याने १९२४ मध्ये यून व्ही सां ज्वा हा मूकपट काढला. चित्रपटाची कथा व निर्मिती त्याचीच होती. त्यात त्याने एकडोळी चष्मा वापरून एक दुय्यम भूमिका प्रभावीपणे केली होती. आँ प्यूर्ज बेबे (१९३१) हाच त्याचा पहिला बोलपट होय. रन्वारने एकूण ३६ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हे चित्रपट मानवी स्वभावाचे व वास्तवतेचे चित्रण करणार आहेत. उदाहरणादाखल ग्रँड इल्यूजन (इं. शी. १९३७), द रूल्स ऑफ द गेम (इं. शी. १९३९) व द रिव्हर (इं. शी. १९५१) इत्यादींचा निर्देश करता येईल.

रन्वारने दूरदर्शनचे तंत्र वापरून काही चित्रपटांची निर्मिती केली. ल पती ते आत्र द जां रन्वार (१९६९) हा त्याचा शेवटचा चित्रपट होय. त्याने १९४४ मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर, ब्राझिलियन निर्मात्याच्या दीदो फ्रेइरे नामक मुलीशी दुसरा विवाह केला.

रन्वारने भारतात आल्यानंतर आपला पुतण्या क्लोद रन्वारच्या मदतीने ल फ्लव्ह (१९५१, इं. शी. रिव्हर) हा संपूर्ण रंगीत चित्रपट प्रथमच तयार केला. त्याचे भारतातील वास्तव्य ⇨ सत्यजित रे सारख्या दिग्दर्शकांना मार्गदर्शक ठरले.

भारतातून यूरोपात परत गेल्यावर रन्वारने काही रंगीत चित्रपटांची निर्मिती केली. त्याने काही नाटके व कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांपैकी ले काय्ये द्यु कापितॅन झॉर्झ (१९६६) ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्याचे मूळ फ्रेंचमधील आत्मचरित्र इंग्रजीमध्ये माय लाइफ माय फिल्म्स या नावाने १९७४ मध्ये लंडनमध्ये प्रकाशित झाले. आपल्या चित्रकार वडिलांच्या आठवणींवरील रन्वार हे त्याचे पुस्तकही (१९६२) प्रसिद्ध आहे. १९७५ साली ऑस्कर पारितोषिक समारंभाच्या वेळी लक्षणीय कामगिरीबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच १९७७ सालातही ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्‌स अँड सायन्सेस’ या संस्थेनेही त्याचा गौरव केला. लॉस अँजेल्स येथे त्याचे निधन झाले.

बोराटे, सुधीर