बर्गमन, इंगमार :(१४ जुलै १९१८-). एक श्रेष्ठ स्वीडिश चित्रपटनिर्माता व दिग्दर्शक. जन्म अप्साला येथे. विद्यार्थीदशेतच नाट्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध. स्टॉकहोमच्या रॉयल डॅमॅट्रिक थिएटरचा दिग्दर्शक म्हणून १९५९ मध्ये नेमणूक व पूढे या संस्थेचे प्रमुख (१९६३-६६). १९४४ मधील फ्रेन्झी (इं. शी.) या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक पटकथा-लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश. स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला व त्याचीच पटकथा असलेला क्रायसिस (इं.शी.) हा त्याचा पहिला चित्रपट होय. १९४७ ते १९५२ या काळात स्वीडिश रंगभूमीवरील कलावंतांचा उपयोग करून त्याने सी पोर्ट (इं. शी.), मोनिका (इं. शी.), वेटिंग वूमेन (इं.शी.) इ. चित्रपटांचे दिग्दर्शन. द सेव्हन्थ सील (इं. शी., १९५६) हा त्याचा सर्वात गाजलेला चित्रपट. मध्ययुगीन धर्मयुद्धातून परतलेला योद्धा व मृत्यू यांच्यातील बुद्धीबळाच्या खेळाचे अर्थपूर्ण चित्रण या रूपकात्मक चित्रपटात केलेले आहे. वाइल्ड स्ट्रॉबेली (इं. शी., १९५७), द मॅजिशियन (इं. शी., १९५८), द व्हर्जिन स्प्रिंग (इं. शी., १९६०) हे त्याचे उल्लेखनीय चित्रपट. थ्रू ए ग्लास डार्कली (इ. शी., १९६१), विंटर लाइट (इं. शी., १९६२), द सायलेन्स (इं. शी. १९६३) ही एकच चित्रपटत्रयी कलात्मक दृष्टीने यशस्वी मानली जाते.

बर्गमनच्या १९५५ पर्यंत चित्रपटांतून रंगभूमीच्या संकेतांचा प्रभाव दिसतो. तथापि मनोविश्लेषणाचे तंत्र वापरून पात्रांचे मानसिक संघर्ष चित्रित करण्याचे वैशिष्ट्य त्यांत आढळते. नंतरच्या चित्रपटांत त्याने छायाचित्रणाचे कोन आणि गतिमानता, संकलन, रंगसंगती यांसारख्या तंत्राचा कौशल्याने उपयोग करून चित्रपटाचा आशय संपन्न करण्यात यश मिळविले. पटकथालेखन आणि पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक चौकटीतील कलात्मकता व सूचकता ही बर्गमनची वैशिष्टये उल्लेखनीय आङेत. पर्सोना (इं. शी. १९६६), आषर ऑफ द वुल्फ (इं. शी., १९६८), पॅशन ऑफ ॲन (इं. शी., १९६९), सीन फ्रॉम द मॅरेज (इं. शी., १९७४) इ. चित्रपटांतून त्याने स्त्री-मनाचे तसेच वृद्धापकालीन समस्यांचे हृदयस्पर्शी चित्रण केलेले आढळते. लिव्ह उलमन, बिबी आन्डरसॉन, इन्प्रिड टुलिन यांसारख्या नायिकांचा असामान्य अभिनय बर्गमनच्या चित्रपटांतून दिसून आला.

बर्गमनने रंगभूमीचा त्याग केलेला नाही. हिवाळ्यात तो नाट्य-क्षेत्रात, तर उन्हाळ्यात चित्रपटसृष्टी गुंतलेला असतो.

दीक्षित, विजय