हॉलिवुड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेल्स महानगराचे उपनगर व जगभरातील चल चित्रपट उद्योगाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले शहर. १९१० पूर्वी हे एक लहानसे गाव होते. त्याची स्थापना १८८० च्या सुमारास झाली असावी. उत्तरेस व पश्चिमेस डोंगररांगा व टेकड्या, दक्षिणेस व पूर्वेस दुतर्फा झाडी असलेला रुंद रस्ता, पूर्वेस नदी असे नैसर्गिक सौंदर्य व आल्हाददायक हवामान या भागाला लाभले आहे. 

 

अमेरिकन निर्माता व दिग्दर्शकडेव्हिड वॉर्क ग्रिफिथ हे १९१० मध्ये ‘बायोग्राफ’ या चित्रपट संस्थेकरिता इन ओल्ड कॅलिफोर्निया या लघुपटासाठी काही चित्रीकरण करीत होते. त्यात काही नवीन चित्रीकरण स्थळांचा समावेश करावा म्हणून त्यांनी हॉलिवुड परिसराचे प्रथमच चित्रीकरण केले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील हॉलिवुडचे दर्शन पडद्यावर पाहून अनेक चित्रपटनिर्माते या भागाकडे आकर्षित झाले. नेस्टर मोशन पिक्चर कंपनीने १९११ मध्ये हॉलिवुडमध्ये पहिले चित्रपटनिर्मिति- गृह उभारले. १९१२ पासून येथे चित्रपटनिर्मितीला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. येथील निसर्गसौंदर्य, स्वच्छ आणि बाह्य चित्रीकरणास योग्य असा जवळ जवळ वर्षभर मिळणारा सूर्यप्रकाश, विविध पार्श्वभूमी अर्थात जंगले, पर्वत, टेकड्या, समुद्रकिनारा, शहर, खेडे अशा चित्रीकरणासाठी योग्य स्थळांची उपलब्धता इत्यादींमुळे चित्रपटनिर्मात्यांसाठी येथे चित्रीकरण करणे, हे आर्थिक दृष्ट्या सोयीचे होते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेक उद्योजक चित्रपटनिर्मितीकडे एक व्यवसाय-संधी म्हणून पाहत होते. त्यामुळे अनेक उद्योजकांनी हॉलीवुडमध्ये चित्रपटनिर्मितिगृह व त्याच्या अनुषंगाने विविध उद्योगांची उभारणी केली. आज जगभरात चित्रपटनिर्मिती क्षेत्रात ज्यांचा दबदबा आहे, त्यावॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, कोलंबिया पिक्चर्स, पॅरामाउंट, एम्जीएम् (मेट्रो-गोल्डविन-मेयर), एरॉस, फॉक्स स्टुडिओ यांसारख्या चित्रपटनिर्मितिगृहांची उभारणी याच काळात झाली. सचेतन चित्रपट निर्माण करणारे सुविख्यात निर्मातेवॉल्ट (वॉल्टर) इलायस डिझ्नी यांचे चित्रपटनिर्मितिगृह येथेच आहे. १९४० पर्यंत हा उद्योग येथे चांगलाच विकसित झाला. १९४० या एकाच वर्षात येथे ४०० चित्रपटांची निर्मिती झाली. यानिमित्ताने चित्रपट व्यवसायविषयक अनेक उद्योग क्षेत्रांचा विकास झाला. मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका, ॲकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स् अँड सायन्सेस (स्था. १९२७) या येथील प्रसिद्ध संस्था आहेत. चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात ॲकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर…. या संस्थेने केली. जगभरातल्या रसिकांच्या हृदयावर राज्य करणारेचार्ल्स चॅप्लिन(चार्ली चॅप्लिन), मर्लिन मन्रो, ग्रेगरी पेक, सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अर्नाल्ड स्वार्झनेगर, ⇨ ॲल्फ्रेड हिचकॉक, जेम्स कॅमेरून, ⇨ स्टीव्हन स्पीलबर्ग यांसारखे अभिनेते, अभिनेत्री व दिग्दर्शक यांची कारकीर्दही येथेच घडली. 

 

हॉलिवुडला वेगळ्या शहराचा दर्जा मिळावा, अशी करण्यात आलेली मागणी २००२ च्या सार्वत्रिक मतदानाने फेटाळली गेली. आजही हा प्रदेश आपल्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. 

दुसाने, मिलिंद मधुकर