प्रभात फिल्म कंपनी : भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवणारी महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मितीसंस्था. स्थापना १ जून १९२९रोजी कोल्हापूर येथे. विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, ⇨ व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने प्रभात फिल्म कंपनी स्थापना केली. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारीत आलेले ‘प्रभात’चित्रपटांचे वितरक बाबूराव पै यांनी प्रभातला कॅमेरा व इतर यंत्रसामग्री पतीवर मिळवून दिली. दिग्दर्शन : व्ही. शांताराम कला : दामले व फत्तेलाल आणि छायाचित्रण : केशवराव धायबर, अशी स्थूलमानाने कामाची विभागणी त्यांनी करून घेतली होती.

पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचै परिसर, १९३४.

प्रभातने आरंभीच्या दोन वर्षांत गोपालकृष्ण (१९२९), खुनी खंजीर (१९३०), राणीसाहेब ऊर्फ बजरबट्टू (१९३०), उदयकाल (१९३०), चंद्रसेना (१९३१), व जुलूम (१९३१) असे सहा मूकपट निर्माण केले. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती. बजरबट्टू हा बालकलाकराची प्रमुख भूमिका असलेला आणि चंद्रसेना हा दुहेरी भूमिका व भव्य देखावे योजिलेला पहिला भारतीय चित्रपट होता. इंपीरिअल फिल्म कंपनीच्या आलमआरा या १९३१ च्या बोलपटापासून भारतात बोलपटाचा जमाना सुरू झाला. त्याच वेळी मंगळवार पेठेसारख्या गजबजलेल्या वस्तीतून शहराबाहेरील शाहूपुरी येथे प्रभातच्या येथे प्रभातच्या चित्रपटनिर्मितीगृहाचे स्थलांतर झाले.

वेशभूषा-साहित्याचे दालन

प्रभातने पहिल्या बोलपटाचे कथानक निवडले ते राजा हरिश्चंद्राचे. हा (अयोध्येचा राजा–१९३२) बोलपट पूर्ण करताना प्रभातला बऱ्याच अडचणींवर मात करावी लागली. या चित्रपटातून दुर्गा खोटे (तारामती), गोविंदराव टेंबे (राजा हरिश्चंद्र), ⇨मास्टर विनायक (नारद), बाबूराव पेढारकर (गंगानाथ महाजन) इ. श्रेष्ठ कलावंत रुपेरी पडद्यावर आले. कोणताही पूर्वानुभव नसताना दामल्यांनी दुय्यम दर्जाच्या ध्वनिमुद्रण यंत्रावर उत्कृष्ट ध्वनिमुद्रण करून दाखविले. त्यानंतर लगेच १९३२ साली प्रभातने अग्निकंकण (हिंदी : जलती निशानी) व माया मच्छिंद्र हे यशस्वी बोलपट सादर केले. प्रभातचे हे बोलपट तत्कालीन इतर भारतीय चित्रपटांपेक्षा सर्वच बाबतींत सरस ठरले. त्यानंतरचा गड आला पण सिंह गेला या ह. ना. आपटे यांच्या कादंबरीवरून गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेला सिंहगड (१९३३) हा फक्त मराठी बोलपट प्रभातने सादर केला. याच बोलपटाबरोबर कोल्हापुरात साजऱ्या झालेल्या काव्यसंमेलनाचा काव्यसृष्टी (१९३३) हा लघुपट दाखविला जाई. सैरंध्री (१९३३) हा प्रभातचा पहिला रंगीत चित्रपट. कंपनीच्या चालकांनी जरूर ती तांत्रिक माहिती मिळवून हा चित्रपट पूर्ण केला व तो पुढील तांत्रिक प्रक्रियांसाठी जर्मनीला पाठविला, परंतु तांत्रिक दोष राहिल्यामुळे रंगसंगती मात्र काहीशी बिघडली. तथापि भारतात आद्य रंगीत बोलपट निर्माण करण्याचा मान या चित्रपटामुळे प्रभात फिल्म कंपनीने मिळविला.

त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीचे स्थलांतर कोल्हापुरहून पुण्याला झाले आणि पुण्याच्या पश्चिमेला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी स्वतःच्या सु. ८·४९ हे. (२१ एकर) जागेत अतिभव्य असे ध्वनिरोधक चित्रपटनिर्मितीगृह उभारण्याचे काम चालू झाले. हे चित्रपटनिर्मितीगृह व त्यातील निरनिराळे समृद्ध विभाग पाहण्यास देशातील तसेच परदेशांतीलही हौशी व जिज्ञासू लोक येत.


शांता आपटे यांच्या गीताचे ध्वनिमुद्रण

पुण्याच्या स्टुडिओत सर्व तांत्रिक सोयी उपलब्ध झाल्यावर व्ही. शांताराम यांनी ना. ह. आपटेलिखित अमृतमंथन (१९३४) या पुण्यातील पहिल्या चित्रपटात आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले. चित्रपट व नाटक या दोन माध्यमांतील फरक या चित्रपटाने सर्वप्रथम स्पष्ट केला. हिंदी चित्रपटात सर्वप्रथम रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान प्रभातच्या याच चित्रपटाला मिळाला. हा चित्रपट हिंदी-मराठी होता. या चित्रपटाबरोबरच प्रभातच्या कार्यपद्धतीचा परिचय करून देणारा प्रभातचे प्रभातनगर (१९३४) हा अनुबोधपट व जंबूकाका (१९३४) हा व्यंगपटही दाखवीत असत. त्यानंतरच चंद्रसेना (१९३५) हा बोलपट प्रभातने मराठी, हिंदी व तमिळ अशा तीन भाषांतून सादर केला होता. या बोलपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पडद्यावर सर्वप्रथम दिसलेली सागरी वातावरणाची भव्य कलात्मक दृश्ये.

चित्रपटनिर्मितिगृहाचे अंतर्गत दृश्य

समयोचित चित्रपट काढणे हे प्रभातचे वैशिष्ट्य होते. म. गांधींची अस्पृश्यता-निवारणाची मोहीम तेव्हा चालू होती म्हणून संत एकनाथांच्या जीवनावरील महात्मा हा चित्रपट प्रभातने निर्माण केला. त्यात बालगधर्वांनी संत एकनाथांची भूमिका केली. या चित्रपटाच्या वेळी संगीतकलानिधी ⇨ मास्तर कृष्णराव आणि तबलेनवाझ ⇨ अहमदजान थिरकवा, कादिर बक्ष व हरिभाऊ देशपांडे इ. संगीततज्ञ प्रभातमध्ये दाखल झाले. त्या अगोदर केशवराव भोळे संगीतनियोजक म्हणून प्रभातला लाभले होते परंतु या चित्रपटाला अभ्यवेक्षण मंडळाकडून बराच त्रास झाला. मूळ ‘महात्मा’हे नाव बदलून ‘धर्मात्मा’असे करावे लागले. शिवाय चित्रपटात बरेच बदल झाल्यावरच त्याला परवानगी मिळून धर्मात्मा (१९३५) या चित्रपटाची निर्मिती झाली. त्यामुळे प्रभातवर आर्थिक ताण बराच पडला होता. तो कमी करण्यासाठी म्हणून काढलेला केशवराव धायबरदिग्दर्शित रजपूत रमणी (१९३५) हा हिंदी चित्रपट अयशस्वी ठरला. यानंतर शांतारामबापूंनी अमरज्योती (१९३६) हा हिंदी चित्रपट हाती घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीत दर्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी या चित्रपटात प्रथमच वापरण्यात आली. पार्श्वप्रक्षेपणाच्या (बॅक प्रोजेक्शन) साह्याने चित्रीकरण करण्याची कल्पना याच वेळी पुढे आली.

याच चित्रपटापासून प्रभातने पार्श्वगायनाची प्रथाही सुरू केली. शांता आपटे यांनी गायलेले ‘सुनो सुनो बनके प्राणी’हे या पद्धतीने गायिलेले पहिलेच गाणे त्यावेळी लोकप्रिय झाले होते. अमरज्योती (१९३६) आर्थिक दृष्ट्याही यशस्वी झाला होता. त्यानंतर अगदी कमी खर्चात एखादा संतपट फक्त मराठीतच काढावा, असे प्रभातच्या चालकांनी ठरविले व दिग्दर्शनाची जबाबदारी विष्णुपंत दामले व शेख फत्तेलाल या जोडीवर प्रथमच टाकण्यात आली. त्यांनी निर्माण केलेल्या संत तुकाराम (१९३६) या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. असा बहुमान मिळालेला हाच पहिला भारतीय बोलपट होय.

शिल्प विभाग : प्रभातचे एक खास वैशिष्ट्य.पुढील वर्षी ना. ह. आपटे यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर आधारित प्रभातचा पहिला सामाजिक बोलपट कुंकू सादर करण्यात आला. शांतारामबापूंनी कितीतरी नवीन कल्पनांचा वापर त्यात केलेला आढळतो. या चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या फूटभरही पार्श्वसंगीत घातलेले नाही. मात्र पात्र-पसंग व स्थळ-काळ यांना अनुसरून निवडक पार्श्वध्वनींचा खुबीदार वापर यात केला होता.

यानंतर दामले-फत्तेलाल यांनी गोपालकृष्ण (१९३८) हा संगीतप्रधान पौराणिक चित्रपट हाती घेतला. चमत्कारांवर फारसा भर न देता कंसाच्या जुलमी राजसत्तेविरुद्ध गोकुळवासियांची लोकसत्ता असा तत्कालीन सूचक विषय त्यात गोवला होता.

यानंतर व्ही शांतारामदिग्दर्शित माणूस (१९३९) हा चित्रपट गाजला. या चित्रपटात प्रेमभंगामुळे हताश होऊन व्यसनाधीन होणाऱ्या किंवा जीवनाचा शेवट करावयास प्रवृत्त होणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला होता. नायिका मैना हिच्या तोंडी घातलेले भारतातील प्रमुख भाषांतील गाणे हाही यातील एक अभिनव प्रयोग होता. त्यात शांतारामबापूंच्या कल्पकतेचा परमोत्कर्ष झालेला आढळतो. माणूसची पटकथा–संवाद–गाणी इत्यादींचे लेखक-कवी ⇨ अनंत काणेकर हे होते.


दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात मानवतेचा दिव्य संदेश देणारा संत ज्ञानेश्वर (१९४०) हा प्रभातचा चित्रपट औचित्यपूर्ण ठरला. तो न्यूयॉकमध्ये दाखविला गेलेला पहिला भारतीय चित्रपट होता. कुंकूमाणूसचेही अमेरिकेत कौतुक झाले होते.

यापुढच्या चित्रपटासाठी व्ही शांताराम यांनी हिंदु-मुसलमान-ऐक्यावर आधारलेली विश्राम बेडेकरलिखित एक अगदी अपूर्व कथा निवडली. शेजारी (१९४१) हा या कथेवरील चित्रपट होय. या चित्रपटातील धरणफुटीच्या व जलप्रलयाच्या शहारे आणणाऱ्या दृश्यांची करामत प्रल्हाद दत्त यांनी करून दाखविली होती.

शेजारीनंतर प्रभातच्या चालकांतील मतभेद दुर्दैवाने विकोपाला गेले. तशा कुंद वातावरणात दामले-फत्तेलाल यांचा संत सखू (१९४१) हा चित्रपट सुरू झाला. दिग्दर्शनाची बहुतेक जबाबदारी राजा नेने यांनी पार पाडली होती. संत सखू सर्वांगसुंदर होऊनही तो अगोदरच्या ‘प्रभात’चित्रपटांइतका यशस्वी होऊ शकला नाही तथापि त्यातील हंसा वाडकरांनी केलेली संत सखूची भूमिका उत्तम वठली होती. या चित्रपटानंतर १३ एप्रिल १९४२ रोजी व्ही. शांताराम यांनी प्रभात सोडली आणि प्रभातमधील चैतन्य हरपल्यासारखे झाले. तरीपण प्रभातची निर्मिती सुरूच होती. राजा नेनेदिग्दर्शित दहा वाजता (१९४२) हा हिंदी–मराठी बोलपट व डी. डी. कश्यपदिग्दर्शित नई कहानी (१९४३) हा हिंदी चित्रपट हे दोन त्यानंतर प्रदर्शित झाले.

यानंतर प्रभातवर गडांतरे येऊ लागली. १९४३च्या जूनमध्ये प्रभातचे आधारस्तंभ असलेले विष्णुपंत दामले रक्तदाबाच्या विकाराने अंथरूणाला खिळले, तर रामशास्त्री निम्मा झाल्यावर राजा नेने, केशवराव भोळे, ध्वनिलेखक शंकरराव दामले, कवी व सहायक दिग्दर्शक शांताराम आठवले, छायालेखक ई. महंमद, सहायक दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी, सहायक संकलक अनंत माने यांसारख्या कुशल तंत्रज्ञांचा संच मतभेदामुळे १ नोव्हेंबर १९४३ रोजी प्रभातमधून बाहेर पडला. तथापि निर्माते दामले–फत्तेलाल यांनी रामशास्त्री सारखा समर्थ चित्रपट देऊन प्रभातला पुन्हा कीर्ती प्राप्त करून दिली. ‘रामशास्त्री’ची भूमिका गजानन जहागिरदार यांनी उत्तम रीतीने वठविली होती. रामशास्त्री (१९४४) प्रभातचे अखेरचे मानचित्र ठरले. संत तुकाराम, गोपालकृष्ण, संत ज्ञानेश्वर यांसारख्या प्रभातला दिगंत कीर्ती मिळवून देणाऱ्या चित्रपटांचे लेखक शिवराम वाशिकर हे रामशास्त्रीचे लेखक होते.

पुढे ५ जुलै १९४५ रोजी विष्णुपंत दामल्यांचे निधन झाले आणि प्रभातचा उरलासुरला आधारही गेला. व्ही. शांताराम आणि दामले प्रभातमध्ये होते, तोवर प्रभात फिल्म कंपनीत कडक शिस्त होती. दामले अत्यंत व्यवहारदक्ष व कुशल कारभारी होते. त्यामुळे प्रभातचा सारा कारभार चोख चालू होता. चालक व कामगार यांचे संबंध आपुलकीचे तसेच सौहार्दाचे होते.

प्रभात ‘तुतारी’

शांताराम-दामले यांच्या पश्चात प्रभातमध्ये पहिली शिस्त उरली नाही. पुढेही चित्रपटनिर्मिती होत राहिली तथापि निकृष्ट चित्रपटनिर्मिती, मूळ ध्येयाचा विसर, वाढते मदभेद व वाढते खर्च यांमुळे प्रभातचे वैभव वाढणे तर राहोच परंतु आहे तेही टिकणे अशक्य झाले आणि दुर्दैवाने प्रभातच्या-पंचविसाव्या वर्षात १३ ऑक्टोबर १९५३ रोजी तिचे परिसमापन झाले व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी पर्व संपले.

सुमारे २४ वर्षांच्या या काळात प्रभातचे हिंदी-मराठी ३४, केवळ हिंदी ११, केवळ मराठी ३, तमिळ १ असे ४९ बोलपट ६ मूकपट जंबूकाका हा १ व्यंगपट आणि काव्यसृष्टी व प्रभातचे प्रभातनगर असे २ लघुपट सादर केले. प्रभातने केवळ भव्य, भारदस्त, तंत्रशुद्ध आणि दर्जेदार बोलपटच सादर केले असे नव्हे तर मराठीबरोबर त्यांची शक्य तो हिंदी आवृत्तीही सादर केली व प्रभातला प्रथमपासूनच भारताची बाजारपेठ मिळवून दिली.

त्यानंतर स. ह. केळकर यांनी १९५७ साली प्रभात फिल्म कंपनी जुन्या चित्रपटांसह लिलावात विकत घेतली व प्रभातच्या नावाखाली राजा ठाकूर-दिग्दर्शित गजगौरी (१९५८) हा पौराणिक हिंदी चित्रपट निर्माण केला, पण तो यशस्वी झाला नाही. आणखी इतर काही चित्रपटांचीही निर्मिती त्यावेळी या स्टुडिओत झाली होती. पुढे केळकरांनी १९५८ साली प्रभातचे सर्व चित्रपट एका दाक्षिणात्याला विकून टाकले व १९६० मध्ये केंद्र सरकारला चित्रपटसंस्था काढण्यासाठी प्रभात स्टुडिओ विकला. योजनाबद्ध प्रचंड स्टुडिओ, विस्तीर्ण आवार व चित्रीकरणाला आवश्यक अशा सर्व सोयी असल्यामुळे त्या ठिकाणी ⇨फिल्म ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली. तथापि १९७० साली प्रभातचे एक आद्य संस्थापक विष्णुपंत दामले यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनंतराव दामले हे प्रभात चित्रपट परत मिळवण्यात यशस्वी झाले. १ जून १९७९ रोजी प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी निर्माते-दिग्दर्शक राम गबाले यांनी केळकरांकडून घेतलेले ‘प्रभात फिल्म कंपनी’हे व्यावसायिक नाव व ‘तुतारी’हे व्यावसायिक चिन्ह दामल्यांना परत केले. ८ जुलै १९७९ रोजी पूर्वीच्या प्रभात स्टुडिओत घरगुती स्वरूपात एक हृद्य संमेलन साजरे झाले. सु. पाचशे प्रभातकुटुंबीय या समारंभाला उपस्थित होते.

पहा : चित्रपट, चित्रपटनिर्मितीगृह.

वाटवे, बापू