चॅप्लिन, चार्ल्‌स स्पेन्सर : (१६ एप्रिल १८८९ –     ). पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीतील जागतिक ख्यातीचा विनोदी नट आणि चित्रपट-निर्माता. लंडन येथे जन्म. आईवडीलही नाट्यव्यवसायात होते. ते व्होडव्हील  या लोकनाट्याचे प्रयोग सादर करीत असत. चार्ल्‌सच्या लहानपणीच त्यांनी त्याला गाणे-नाचणे शिकविले होते. त्याच्या दुर्देवाने लवकरच झालेला पित्याचा मृत्यू आणि आईची मनोविकृती यांमुळे चार्ल्‌सवर सातव्या वर्षीच पोटासाठी या कलेचा उपयोग करण्याची पाळी आली. सडकेवर जीवन जगणाऱ्या पोरक्या चार्ल्‌सचे बालपण अतिशय दारिद्र्यात व विपन्नावस्थेत गेले. त्यामुळे त्याचे शिक्षणही फारसे होऊ शकले नाही. त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी त्याचा भाऊ सिडनी याने चार्ल्‌सला फ्रेंड कार्नो या नाटककंपनीत प्रवेश मिळवून दिला. १९१० मध्ये तो प्रमुख नट म्हणून काम करण्यासाठी या कंपनीसह अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला. तेथे डिसेंबर १९१३ मध्ये त्याला किस्टोनच्या मॅक सेनेट  या चलच्चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यानंतर तो नाट्यमंचाकडे पुन्हा वळला नाही. किड ऑटो रेसेस ॲट व्हेनिस (१९१४) या त्याच्या दुसऱ्या चित्रपटात त्याने परिधान केलेला पोषाख मोठा वैशिष्ट्यपूर्ण होता. डोक्यावर डर्बी, हॅट, घट्ट झगासदृश कोट, ढिली-गबाळी बिजार, बेढब आकाराचे जोडे, फडफडणाऱ्या मिशा व हातात छडी या विचित्र वेशामुळे चार्ल्‌स प्रेक्षकांना मूर्तिमंत विनोद वाटे. परंतु, विनोदाबरोबरच प्रेक्षकांच्या मनात चार्ल्‌सविषयी अनुकंपाही निर्माण होई. एकमेवाद्वितीय ठरलेल्या या आपल्या उपहासात्मक भूमिकेतून चार्ल्‌स सामाजिक दंभाचारावर टीका करी. विनोद हा चॅप्लिनच्या कलेचा आत्मा असला, तरी विषाद हे तिचे जीवन होते, म्हणून चार्ल्‌सच्या या विनोदनिर्मितीचा शेवट शोकांतिकेत होई.

खास विदूषकी पेहेरावात चॅप्लिन

चार्ल्‌स ‘फर्स्ट नॅशनल’ कंपनीत १९१७ मध्ये शिरला. त्यानंतर दोन वर्षांनी डग्लस फेअरबॅंक्स, डेव्हिड ग्रिफिथ व मेरी पिकफर्ड यांच्या बरोबर त्याने ‘युनायटेड आर्टिस्ट कार्पोरेशन’ ही चित्रपट कंपनी स्थापन केली. हॉलीवुडमध्ये त्याचे स्वतःचे चित्रपट निर्मितीगृहही होते. बोलपटाविषयी त्याने फारशी आस्था दाखविली नाही. ध्वनीचा चित्रपटात फारसा उपयोग करू नये, असे त्यास वाटे. १९३६ मधील मॉडर्न टाइम्स या चित्रपटात त्याने आवश्यकतेपुरताच ध्वनीचा उपयोग केला होता. द ग्रेट डिक्टेटर (१९४०) व माँशुअर व व्हर्दो (१९४७) या चित्रपटांनी त्याला अफाट प्रसिद्धी मिळवून दिली, तर १९५२ मधील लाइम लाइट  व १९५७ मधील ए किंग इन न्यूयॉर्क  हे त्याचे चित्रपटही बरेच गाजले होते. त्यांपैकी लाइम लाइटला १९७३ मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला. ए किंग इन न्यूयॉर्क  या चित्रपटामुळे त्याच्यावर तो कम्युनिस्टांचा पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला होता; परंतु त्याने तो नाकारला व ‘मी विश्वाचा नागरिक आहे’, असे कणखरपणे सांगितले. या धोरणाला अनुसरूनच त्याने १९६६ मध्ये ए कौंटेस फ्रॉम हाँगकाँग  हा वैश्विक स्वरूपाचा चित्रपट निर्माण केला.

चार्ल्‌सचे वैयक्तिक जीवन वादळी प्रसंगांनी भरलेले असून अतिशयच अस्थिर स्वरूपाचे होते. त्याने आयुष्यात चारदा विवाह केला. डाव्या मतप्रणालीचा प्रसार करणारा अशी टीका त्याच्यावर झाल्यामुळे त्याने अमेरिकन नागरिकत्व झुगारले व १९५३ पासून तो आपली चौथी पत्नी आणि सहा मुले घेऊन स्वित्झर्लंडमध्ये जिनीव्हा येथे राहू लागला. १९६४ मध्ये त्याने आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले. १९७५ च्या मार्चमध्ये चार्ल्‌सने आयुष्याची ८६ वर्षे पूर्ण केली. याप्रसंगी त्याला एलिझाबेथ राणीने ‘नाइटहूड’ देऊन त्याचा सन्मान केला. लंडन ही त्याची मातृभूमी असली, तरी गेली साठ वर्षे तो लंडनच्या बाहेरच आहे; कम्युनिस्ट म्हणून अमेरिकेतूनही त्याला जावे लागले. १९७२ मध्ये त्याला ऑस्कर पुरस्कार देऊन अमेरिकेने त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटननेही यापूर्वी एकदा त्याला नाइटहूड देऊ केली होती; पण त्याने नकार दिला होता. आता जीवनाच्या संध्याकालात मात्र या सन्मानाचा स्वीकार त्याने केला आहे. द प्रिक  हा चित्रपट निर्माण करण्याचा इरादाही त्याने यावेळी व्यक्त केला. चार्ल्‌स चॅप्लिन या नावाने जगभर प्रसिद्ध असलेला हा थोर कलावंत यापुढे सर चार्ल्‌स चॅप्लिन म्हणून ओळखला जाईल.

संदर्भ : 1. Cotes, Peter Nikhausm, Thelma, The Little Fellow, London, 1951.

2. Huff, Theodore, Charlie Chaplin, New York, 1951.

जोशी, चंद्रहास