ग्रिफिथ, डेव्हिड वॉर्क : (२२ जानेवारी १८७५–२३ जुलै १९४८). मूकपटांच्या काळातील एक युगप्रवर्तक अमेरिकन निर्माता व दिग्दर्शक. जन्म क्रेस्टवुड येथे. वयाच्या अठराव्याडेव्हिड वॉर्क ग्रिफिथ वर्षापासून तो नाटकात दुय्यम भूमिका करू लागला. १८९७ मध्ये नट म्हणून तो मेफर्ट स्टॉक कंपनी या नाट्यसंस्थेत शिरला पण या क्षेत्रात काम करायला त्याला इतका कमीपणा वाटला, की त्याने आपले मूळ नाव बदलून ‘लॉरेन्स’ हे टोपणनाव धारण केले. ग्रिफिथचा ओढा रंगभूमीपेक्षा साहित्याकडे अधिक होता. १९o७ मध्ये त्याने अ फूल अँड अ गर्ल  हे आपले नाटक नट जेम्स हॅकेट याला विकले पण ते साफ पडले. मग त्याने ई. एस्. पोर्टर या द ग्रेट ट्रेन रॉबरी  या पहिल्या चलच्चित्रपटाच्या निर्मात्याला एक पटकथा दिली. ती नापसंत ठरली पण रेसक्यूड फ्रॉम ॲन ईगल्स नेस्ट  या चित्रपटात मात्र त्याला प्रमुख भूमिका मिळाली (१९o७).

यानंतर बायोग्राफ या चित्रपट संस्थेने त्याच्या बऱ्याच पटकथा घेतल्या, त्यांत त्याने प्रमुख भूमिकाही केल्या. तेथेच तो दिग्दर्शकही झाला (१९o८) व ॲड्व्हेंचर ऑफ डॉली  हा ९ मिनिटांचा चित्रपट त्याने सर्वप्रथम दिग्दर्शित केला. या वेळेपासून तो आपले मूळ नाव वापरू लागला. यानंतर त्याने असे छोटे ५oo तरी चित्रपट दिग्दर्शित केले परंतु त्याचे खरे नाव झाले ते द बर्थ ऑफ अ नेशन  या बारा रिळांच्या (म्हणजे सु. ३,६५८ मी. लांबीचा) दोन तास चालणाऱ्या संपूर्ण लांबीच्या चित्रपटामुळे (१९१५). त्या पाठोपाठ त्याने दिग्दर्शित केलेले इन्टॉलरन्स (१९१६), ब्रोकन ब्लॉसम (१९१९), वे डाउन ईस्ट (१९२o), ऑर्फन ऑफ द स्टॉर्म  (१९२१) व इजन्ट लाइफ वंडरफुल  (१९२४) हे चित्रपट अतिशयच गाजले. १९२७ साली चित्रपट बोलू लागले व ग्रिफिथला यश सोडून गेले. त्यातही त्याने अब्राहम लिंकन (१९३o) हा चित्रपट काढण्याचे धाडस केले खरे, पण अपयशाच्या तडाख्यामुळे त्याने १९३१ पासून चित्रपटसंन्यास घेतला. तरीपण त्याला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बहुमान मिळाला. स्ट्रगल हा त्याचा शेवटचा चित्रपट त्यानंतर त्याने आपल्या व दुसऱ्यांच्याही चित्रपटकथा खपविण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. शेवटी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी हॉलिवुडमधील एका अतिसामान्य हॉटेलात विपन्नावस्थेमध्ये ग्रिफिथचा अंत झाला. तथापि कॅमेऱ्याच्या काही हालचाली, रात्रीची दृश्ये, निकट छायाचित्र (क्लोजअप), दूरवेध (लाँगशॉट), दृश्यमिश्रण (मॉन्टाज), चलवेध (मूव्हिंग शॉट), दृश्यांतरण (डिस्सॉल्व्ह्) यांसारख्या तांत्रिक सुधारणा घडवून चित्रपटसृष्टीला त्याने उपकृत करून ठेवले आहे. त्याच्या या कर्तृत्वामुळे ‘द शेक्सपिअर ऑफ द मोशन पिक्चर’ म्हणून त्याचा गौरव केला जातो.

संदर्भ : 1. Barry, Iris, D. W. Griffith, American Film Master, Chicago, 1940.

  2. Croy, Homer, Star Maker : The Story of  D. W. Griffith, New York, 1959.

वाटवे, बापू