युनायटेड आर्टिस्ट कॉर्पोरेशन : अमेरिकेत १९१९ साली स्थापन करण्यात आलेली चित्रपटनिर्मिती व वितरण संस्था.⇨चार्ल्‌स चॅप्लिन, डग्लस फेअरबँक्स, मेरी पिकफर्ड व ⇨डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ हे ख्यातनाम कलावंत या संस्थेचे संस्थापक होत. १९११ च्या सुमारास चित्रपटगृहांची संख्या १०,००० चे वर पोहोचली आणि ती सतत वाढतच होती. आपल्या नावावर निर्माते अमाप पैसा मिळवितात हे पाहून मेरी पिकफर्ड, डग्लस फेअरबँक्स, चार्ल्‌स चॅप्लिन आणि दिग्दर्शक ग्रिफिथ यांनी स्वतःच निर्माते होऊन आपले चित्रपट स्वतःच्या वितरण संस्थेतर्फे जगभर प्रदर्शित करण्याचे ठरविले व युनायटेड आर्टिस्ट कॉर्पोरेशन संस्थेचा जन्म झाला. इतर निवडक चित्रपटाचे वितरणही ह्या कंपनीने करावयाचे ठरविले.सॅम्युएल गोल्डविन, जोझेफ स्केन्क, अलेक्झांडर कोर्डा, डेव्हिड ओ सेल्झनिक, डॅरिल झानूक, हॉवर्ड ह्यूझ, वॉल्टर बॅजर, हल रोच इ. सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते या कंपनीशी चित्रपटवितरणानिमित्त सहभागी झाले होते त्यामुळे पुढील पंधरावीस वर्षांत या कंपनीची सतत भरभराट होत गेली. मूकपटांच्या जमान्यात कंपनीच्या भागीदारांचे अनेक चित्रपट जगभर गाजले. उदा., दिग्दर्शक ग्रिफिथ यांचा ऑर्फन ऑफ द स्टॉर्म (१९२१), मेरी पिकफर्डचा टेस ऑफ द स्टॉर्म कन्ट्री (१९२२), डग्लस फेअरबँक्सचा द थीफ ऑफ बगदाद (१९२४) किंवा चार्ल्‌स चॅप्लिनचा गोल्ड रश (१९२५). द थीप ऑफ बगदाद या चित्रपटाने तर हिंदुस्थानातही लोकप्रियतेचा इतिहासच घडवला. १९३३ साली दिग्दर्शक ग्रिफिथ यांनी युनायटेड आर्टिस्टमधील आपली भागीदारी काढून घेतली आणि १९३९ साली डग्लस फेअरबँक्स यांचे निधन झाले त्यामुळे कंपनीची जबाबदारी मेरी पिकफर्ड आणि चार्ल्‌स चॅप्लिन या राहिलेल्या दोन भागिदारांवर येऊन पडली. त्यातच १९४० नंतर कंपनीची आर्थिक स्थितीही हळूहळू खालावत गेली. परिणामी १९५१ साली कंपनीच्या व्यवस्थापनात अपरिहार्यपणे बदल झाला. आर्थर क्रीम व रॉबर्ट बेंजामिन या दोघांनी पिकफर्ड व चॅप्लिन या भागीदारांकडून कंपनी आपल्या ताब्यात घेतली. अशा रीतीने सुरुवातीला केवळ कलावंतांची कंपनी म्हणून प्रसिद्धी पावलेली ही संस्था ३२ वर्षांनंतर केवळ एक चित्रपट वितरण संस्था म्हणून चालू राहिली. बेंजामिन आणि क्रीम या जोडीने अनेक प्रयत्न करून थोड्याच वर्षांत कंपनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. १९५७ साली कंपनीची खाजगी मालकी जाऊन ती सार्वजनिक मालकीची झाली आणि १९६७ साली कंपनीचे सर्व भाग-भांडवल ट्रान्स अमेरिका कॉर्पोरेशन, सॅन फ्रॅन्सिस्को या बड्या कंपनीकडे गेले. अजूनही जगातील आठ अग्रेसर चित्रपट व्यावसायिकांत युनायटेड आर्टिस्टचा अंतर्भाव करण्यात येतो.

धारप, भा. वि.