फिल्म प्रभाग : अनुबोधपट व वार्तापट तयार करणारा भारत सरकारचा विभाग. स्वातंत्र्यपूर्व काळात इंडियन न्यूज परेड आणि इन्‍फर्मेशन फिल्म्‌स ऑफ इंडिया (आय्‌.एफ्‌.आय्‌) या नावाने ओळखले जाणारे एक सरकारी खाते मुंबईत होते. त्याची स्थापना १९४३ साली करण्यात आली. त्या खात्यामार्फत वार्तापट आणि माहितीपट काढले जात परंतु खर्चाची बचत करण्याच्या उद्देशाने १९४६ साली ते खाते बंद करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्याच्या अखत्यारीत फिल्म प्रभाग (फिल्म्‌स डिव्हिजन) १९४८ पासून सुरू करण्यात आला. या विभागांतर्फे भारतीय अनुबोधपट व वार्तापट तयार होऊ लागले. भारतीय आणि विदेशी चित्रपट प्रेक्षकांना देशातील महत्त्वाच्या घटना व विषय यांची माहिती करून देणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वसाधारणपणे वर्षाला सरासरी ५२ देशी वार्तापट, ५२ विदेशी वार्तापट आणि १४० अनुबोधपट तयार केले जातात. विशेष वार्तापट जगातील २१ वृत्तपत्रसंस्थांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे तयार करतात.

अनुबोधपट प्रामुख्याने भारतीय संस्कृती, इतिहास, कला, शास्त्र, शिक्षण, क्रीडा, शेती, उद्योगधंदे, आरोग्य, स्वच्छता, विविध प्रकारचे प्रकल्प, पारंपारिक जत्रा व उत्सव यांसारख्या विषयांवर आधारलेले असतात. सुरूवातीला इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ व तेलुगू अशा फक्त पाचच भाषांत या प्रभागाचे चित्रपट तयार करण्यात येत. नंतर पंचवार्षिक योजनेतील कार्याच्या प्रचारासाठी व विशेषतः भारतातील ग्रामीण जनतेच्या माहितीसाठी विशिष्ट विषयांवरील अनुबोधपट १९५४ सालापासून १४ भारतीय भाषांत तयार होऊ लागले. पुढे सर्वच अनुबोधपट आणि वार्तापट १४ भारतीय भाषांतून व इंग्रजीतून तयार केले जात. साधारणपणे दर आठवड्याला एक वार्तापट तयार केला जातो. मात्र सिंधी भाषेतील वार्तापट महिन्यातून दोनदा तयार होतात.

देशांतील १०,००० चित्रपटगृहांतून सु. ७ कोटींहून अधिक लोक फिल्म प्रभागाचे हे चित्रपट पाहतात. भारत सरकारने तयार केलेले हे चित्रपट प्रत्येक चित्रपटगृहात दाखविले पाहिजेत, असे कायदेशीर बंधन आहे. प्रत्येक खेळाच्या वेळेस फिल्म प्रभागाने पुरविलेले चित्रपट सु. ६०० मी.पर्यंत दाखविणे आवश्यक असते. त्याकरिता फिल्म प्रभागाला चित्रपटगृहांकडून आठवड्याच्या उत्पन्नापैकी सरासरी एक टक्का रक्कम भाडे म्हणून द्यावी लागते. या व्यवस्थेमुळे फिल्म प्रभागाला बरेच उत्पन्न मिळते. क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयातर्फे निवडक अनुबोधपट ग्रामीण विभागातून दाखविले जातात. फिल्म प्रभागाचे निवडक चित्रपट परदेशांतही पाठविण्यात येतात. तथापि त्यांची निवड परराष्ट्रीय खाते करते व त्याच्यामार्फतच असे चित्रपट परदेशांतील भारतीय वकिलातींकडे पाठविले जातात.

फिल्म प्रभागाची स्वतंत्र वितरण व्यवस्था असून दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, बंगलोर, हैदराबाद, नागपूर, लखनौ या आठ शाखांमार्फत प्रभागाने निर्माण केलेले चित्रपट वितरित केले जातात. वर्षाला नवे ६० ते ६५ हजार चित्रपट पुरविले जातात. देशांतील सु. १०,००० चित्रपटगृहे, राज्य आणि केंद्रसरकारचे फिरते प्रसिद्धी विभाग तसेच दूरदर्शनाची विविध केंद्रे यांना हे चित्रपट प्रामुख्याने पुरविण्यात येतात. फिल्म प्रभागाचे चित्रपट त्यांच्या शाखा कार्यालयांकडून, क्षेत्रीय प्रसिद्धी खात्यांकडून किंवा माहिती आणि नभोवाणी खात्याकडून मिळू शकतात.

फिल्म प्रभागाने निर्माण केलेले चित्रपट हे केंद्र सरकारच्या विविध खात्यातर्फे तसेच राज्यशासनांनी व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी पुरस्कृत केलेले असतात. संरक्षण खात्याला लागणारे शैक्षणिक चित्रपट तसेच अन्नपुरवठा आणि शेती या विषयांवरील चित्रपट दिल्ली येथील फिल्म प्रभागाच्या शाखेतर्फे तयार करण्यात येतात. फिल्म प्रभागात मे १९५६ पासून एक व्यंगपट विभाग सुरू करण्यात आला. या विभागातर्फे दरवर्षी चार व्यंगपट तयार होतात. त्याचप्रमाणे वार्तापट व अनुबोधपट यांच्या निर्मितीतही आवश्यक तेथे साहाय्य केले जाते. काही खाजगी निर्मात्यांनी तयार केलेले अनुबोधपटही फिल्म प्रभाग प्रदर्शित करतो. काही तयार अनुबोधपट प्रभागातर्फे घेण्यात येतात तर काही अनुबोधपट भेटवस्तू म्हणून स्वीकारले जातात किंवा विकत घेतले जातात.

आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात फिल्म प्रभागाचे चित्रपट पाठविले जातात. प्रभागाच्या अनेक चित्रपटांना सातत्याने आंतरराष्ट्रीय पुरस्कार व गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळालेली असून १९७९ साली प्रभागाने ४७ अनुबोधपट, ३९ राष्ट्रीय वार्तापट, ३६ देशी वार्तापट आणि ३ विशेष वार्तापट तयार केले.

भारतातील काही राज्यांतही शासनातर्फे अनुबोधपट वा वार्तापट यांची निर्मिती होत असते. त्यांचे विषय राज्यापुरतेच मर्यादित असतात. मद्रास, महाराष्ट्र, गुजरात, प. बंगाल इ. राज्यांचे स्वतंत्र वार्तापट निघतात आणि अनुबोधपट कंत्राटे देऊन तयार करवून घेतले जातात. इतर काही राज्य सरकारेही तज्ञांना कंत्राटे देऊनच आपल्याला हवे तसे अनुबोधपट तयार करवून घेतात.

शिंदे, मा. कृ. शहाणे, नर्मदा